विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे  
    
गवळी- दुधदुभत्याच्या धंद्यावरून ‘गवळी’ हें नांव पडलेली जात फक्त मुंबई इलाख्यांतच आहे. अहिरांची
माहिती स्वतंत्र दिलेली आहे. लो. सं. ३८५४२. दक्षिण-हिंदुस्थान, कोंकण व कर्नाटक या प्रांतभर हे लोक आहेत.धनगर, कुरुबा, मराठा कुणबी इत्यादि लोकांचा भरणा या जातींत बराच असून त्यांच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे. यांमध्यें आठ पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोक एकमेकांशीं रोटीबेटीव्यवहार करीत नाहींत. यांखेरीज कानडी 'गोपाल किंवा गोला' हाहि गवळयांचाच एक पोटभाग आहे असें म्हणतात.या लोकांच्या पुष्कळ चालीरीती लिंगायतांप्रमाणें असून कांहीं खास लिंगायत झालेले आहेत. एक आडनांव असलेल्या लोकांमध्यें विवाहसंबंध होत नाहींत. पुनर्विवाह व घटस्फोट या दोन्ही चाली यांमध्यें रूढ आहेत.हे लोक मांसाहारी असून त्याचा सामाजिक दर्जा कुणब्यांहून वरचा आहे. यांची मुख्य देवता कृष्ण ही होय.यांच्या कुलदेवता महादेव, खंडोबा, विठोबा इत्यादि आहेत.जंगम व ब्राह्मण हे त्यांचे उपाध्ये असतात परंतु लग्नाच्या वेळीं ब्राह्मण असावाच लागतो.

ग व ळा जा त- आसामांतील गवळी लोकांची संख्या सुमारें चाळीस हजार आहे. बिहारमध्यें ब्राह्मण, गवळयाच्या हातचें पाणी घेतात. बंगाल्यांत ह्या लोकांनां नवसखा लोक पेक्षां हलके समजतात. परंतु ओरिसामधील गवळी आपणाला उच्च जातीचे समजून बंगाल व बिहारमधील गवळयांनां ते तुच्छ मानितात. ब्रह्मपुत्रा नदीच्या थडीवरील गवळी बहुतेक सर्व बाहेरून आलेले आहेत व तसेंच सिलहट् व काचरमधील फारच थोडे गवळी स्थानिक आहेत.[सेन्सस रिपोर्ट अहीर पहा].