विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे    
 
गर्ग (१)- वैदिक कालामध्यें गर्ग कुलाची स्थापना झाली व त्याचें श्रौत धर्मांत थोडेसें वैशिष्टय स्थापन झालें. गर्गत्रिरात्र नांवाची एक सोमसंस्था वेदग्रंथांत वर्णिली आहे. या प्राचीन गर्गाचा ज्योतिषाशीं संबंध दिसत नाहीं. पुराणांत गर्गाचें स्वरूप निराळें दिसतें. कालयवन नांवाच्या एका परक्या जातीच्या शिष्याचा हा पुरस्कर्ता होता आणि त्यामार्फत कांही सामाजिक क्रांति घडवून आणणारा एक गर्ग दृष्टीस पडतो. याज्ञवल्क्याबरोबर वादविवाद करणारी प्रसिद्ध विदुषी गार्गी ही कोणत्या गर्गाची मुलगी असावी हें निश्चित होत नाहीं.

(२) एक प्राचीन ज्योतिषी, यादवांचा उपाध्याय गर्ग व हा एकच कीं काय हें सांगतां येणार नाहीं. कारण गर्ग नांवाच्या पौराणिक व्यक्ती अनेक आहेत. वराहमिहिरानें आपल्या ग्रंथांतून जागोजाग सर्व प्राचीन ग्रंथकारांच्या आधीं गर्गाचा उल्लेख केला आहे. यावरून गर्गसंहिता अत्यंत प्राचीन दिसते.हल्ली गर्गसंहिता दोन तीन प्रकारच्या उपलब्ध आहेत. त्यांत मूळ कोणती हें ठरविणें कठिण पडेल. गर्गाला ज्योतिषी मुहूर्ताच्या बाबतींत प्रमाण मानितात. तेव्हां त्याच्या नावांवर वाटेल ती विधानें दडपून देण्याची जुनी वहिवाट प्रचलित आहे. वृद्ध गर्ग नांवाचा ज्योतिषी वेगळा दिसतो. याचाहि वराहमिहरानें अनेकदां उल्लेख केला आहे. तो वराहापूर्वी दोन तीनशें वर्षे होऊन गेलेला दिसतो.