विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गंधर्वगड किल्ला- मुंबई इलाखा. बेळगांव जिल्हा. बेळगांवच्या पश्चिमेस सुमारें २१ मैलांवर पायथ्यापासून ४०० फूट उंचीवर हा एक किल्ला आहे. किल्याचें क्षेत्रफळ सुमारें १००० फूट चौरस असून किल्ला इ. स. १७२४ सालीं सांवतवाडीच्या फोंड सांवताचा मुलगा नाग सावंत यानें बांधला. हल्लीं किल्ला पडक्या स्थितींत आहे. इ. स. १७७८ सालीं कोल्हापूर सरकारनें हा किल्ला सर केला होता. परंतु इ. स. १७९३ सालीं शिंद्यांचें वजन पडल्यामुळें तो परत सांवतवाडीकरास देणें भाग पडलें. इ. स. १७८७ सालीं नेसरगीच्या सरदारानें कोल्हापूर सरकारविरुद्ध बंड केलें होतें. त्यावेळीं त्यानें इतर किल्ल्यांबरोबर हाहि किल्ला सर केला होता, परंतु लवकरच या बंडाचा मोड करण्यांत आल्यामुळें किल्ला परत कोल्हापुरकडे आला.