विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे  
   
गदरिया- गरेरी. यांची वस्ती संयुक्तप्रांत, मध्यहिंदुस्थान वगैरे भागांतून आहे. एकंदर लो. सं. (१९११) १३,६८,९९०. पैकीं संयुक्तप्रांतांतच ९,८३,०९९ आहे. गंगाधर अथवा कंदाहार या शब्दावरून गदरिया शब्दाची व्युत्पत्ति लावण्यांत येते. गदरिया ही एक धनगरांची व घोंगडी विणणाऱ्या लोकांची जात आहे. गुआल अथवा अहीर जातीशीं त्यांचा निकट संबंध असावा, कारण गुआल जातीच्या हातची कच्ची व पक्की रसोई ते खाऊं शकतात. संयुक्तप्रांतांत बाघेल, बाह्मनिया, चंडेल, धिनगर, हरनवाल, कच्छवाह, निखर, फुलसिंघिय, राठोड, रौटेल, सागर व सरस्वार अशा त्यांच्या बारा पोटजाती आहेत. यांपैकी निम्मीं नांवें रजपुतांतलीं आहेत. बनारस येथें धिनगर, निख, जोनपुरी, अलाहाबादी, बकरसाब, नामदावाल व चिकवा इत्यादि जाती प्रसिद्ध आहेत. यांपैकीं पहिल्या चार जाती धनगराचा धंदा करतात व कांबळीहि विणतात. बकरकसाब व नामदावाला हे हाच धंदा करतात. चिकवा हे मुसुलमान जातीचे आहेत. वरील पोटजातींशिवाय भरारिया, बैकट, तासेल्हा, चाक, बारिया, पैवार व भैयातार अशाहि पोटजाती आहेत. पश्चिमेकडील गदरिया ग्वाल्हेरहून आल्यामुळें स्वतःस मराठे म्हणवितात व तेथील काली देवीच्या दर्शनार्थ जातात. गदरिया या ज्ञातीची एक पंचायत असते. बालविवाह, विधवाविवाह वगैरे गोष्टी या जातीत रूढ आहेत. त्यांच्या लग्नांतील चालींत वधूस कपटानें व बलात्कारानें पळवून नेण्याच्या जुन्या चालीचा थोडासा अवशेष अद्यापहि पहावयास सांपडतो. त्यांच्यांत कांही जन्मसंस्कार असून मृत्युसंस्कारांत पिंड व श्राद्ध वगैरे विधी पाळण्यांत येतात.

गदरिया हे जुन्या वालीचे हिंदू असून या जातीच्या मुसुलमान शाखेंत फारच थोडी संख्या आढळते. त्यांची काली हीच मुख्य देवता होय. त्याशिवाय चामार व जोखाइ या विशिष्ट देवता असून त्यांनां बकरें व डुकर यांचा बळी वहाण्यांत येतो. बिहारमध्यें गदरियांचा दर्जा अहीरांपेक्षां मोठा असतो. त्यांचा मूळ धंदा धनगराचा व घोंगडी विणण्याचा असला तरी कांही लोक शेती व व्यापारहि करतात. [क्रूक].

मध्यप्रांतांत यांची संख्या सुमारें ४०,००० आहे. ही मिश्रजात असून हे आपल्या उत्पत्तीबद्दल पुष्कळ दंतकथा सांगतात. यांच्या मुख्य निखार, धेन्गार व वारमैयान या तीन पोटजाती आहेत. यांशिवाय कांहीं स्थानपरत्वें नामांतरें व पोटजाती पडल्या आहेत. यांचीं लग्नें देवकांप्रमाणें होतात. निखार जात सर्वांत उच्च समजतात पण ते दुसऱ्या जातीतील मुलगी अडचणीच्या प्रसंगीं करतात. लग्नप्रसंगीं एक स्त्री नग्नावस्थेंत स्त्रियांमध्यें नाचत असते. यांचीं नैतिक बंधनें शिथिल आहेत. विधवेनें दिराबरोबर त्याची बायको हयात असतांहि लग्न करणें प्रशस्त मानतात. लग्नाची वयोमर्यादा निश्चित नाहीं. वरापेक्षां वधू वयानें मोठी असली तरी चालते. [रसेल व हिरालाल- कास्ट्स् टॉड ट्राइब्स इन सी. पी.]