विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे    

गणेशपुराण- अष्टादक्ष पुराणांच्या उपपुराणांतील एक पुराण. या गणेशपुराणांतील साररूपानें वाचकांस घेण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत. त्यांचा थोडक्यांत विचार करूं. गणेशपुराणाचे मुख्य दोन खंड; पहिला उपासना व दुसरा कीडा खंड. उपासनाखंडांत गणेश-उपासनेचें विविध प्रकार सांगितले असून, क्रीडाखंडांत गजाननांनीं वेळोंवेळीं अवतार घेऊन कसकशा क्रीडा केल्या त्यांचें वर्णन दिलें आहे.

उ पा स ना खं ड.- उपासनाखंडांतील अध्याय १ ते ९ पर्यंत सोमकांत नामक राजाची कथा सांगितली आहे. त्यांतील ३ ऱ्या अध्यायांत राजानें पुत्रास केलेला नीतिशास्त्राचा उपदेश प्रत्येक राजपुत्रानें व सर्वसाधारण गृहस्थाश्रमी मनुष्यानें मनन करण्यासारखा आहे. त्याच प्रमाणें सुधर्मा राणीची पतिनिष्ठा व पतिप्रेम सर्व गृहिणींनीं लक्ष्यांत घेण्यासारखें आहे. तसेंच न्यायनीतीचा त्याग करून अन्यायानें परधानसक्त झालेल्या मनुष्याच्या मनाची कशी स्थिति होते, व त्यामुळें त्याच्या हातून कशी महान् पातकें घडतात, आणि त्या पापांमुळें त्यास पुढें कशी दशा प्राप्त होते, हेंहि सोमकांत राजाच्या कथेंत उत्तम प्रकारें दाखविलें आहे. अध्याय १०, ११ व १२ यांत व्यासाच्या गर्वाचें निरसन करून गणेशस्वरूपाचें वर्णन दिलें आहे, त्यांत श्रीगजानन ओंकारस्वरूप परब्रह्म असल्याचें दाखविलें आहे. अध्याय १३, १४ व १५ यांत गजाननानें आपल्या उदरांत अनंत ब्रह्मांडें दाखवून ब्रह्मदेवाच्या गर्वाचें निरसन केल्याची कथा व्यवहारांत मिथ्या अभिमान बाळगणारांस बोधामृताप्रमाणें होणार आहे. अ. १६ ते १८ पर्यंत मधु व कैटभ राक्षसांची कथा आहे. या कथेंत विष्णूसारखें सर्वमान्य देव सुद्धां प्रसंगीं इष्टकार्य साधण्यासाठीं हताश न होतां हवीं तीं कामें मानापमान बाजूस ठेवून करण्यास कसे उद्युक्त होतात याचा धडा घेण्यासारखा आहे. अध्याय १९-२१ यांमध्यें निपुत्रिक भीम राजाची कथा आहे. देवतेच्या पूजनानें पतितांचा उद्धार कसा होतो, हें या कथाभागावरून कळून येतें. अध्याय २२ ते २३ मध्यें आलेली बल्लाळ नामक महान् भगवद्भक्त वैश्यपुत्र या लहान बालकाची कथा अत्यंत मनोरम आहे. अध्यान २४-२७ मध्यें गजाननाच्या वरप्रदानानें दक्षाला आकस्मिक राज्यप्राप्ति कशी झाली, तो इतिहास आहे; पुढें अध्याय २५-३५ यामध्यें दक्षवंशांतील रुक्मांगद राजाची हकीगत असून तो राजा एकदां शिकारीस गेला असतां रानांत त्याला वांचक्नवीॠषीचा आश्रम आढळला. राजाला पाहून त्याच्या मुकुंदा नामक पत्नीला प्रबल कामविकारानें पीडिलें, राजानें तिचा धिक्कार केल्यामुळें, तिनें रुक्मांगदाला 'कृष्टी हो' असा शाप दिला. या कथाभागावरून अनुकरणीय असें रुक्मांगदाचें धैर्य व दुर्जन संगतीपासून होणारे तोटे यांचें स्पष्ट चित्र डोळ्यांपुढें उभें राहतें. अध्याय ३६-३८ मध्यें दुराचरणी मुकुंदेच्या पोटीं इंद्रापासून जन्मलेल्या गृत्समदाची कथा आहे. त्यांत गजाननाच्या तपश्चर्येनें त्याला ब्राह्मणत्व कसें मिळालें ती हकीकत हृदयंगम आहे. अध्याय ३६ ते ४७ त त्रिपुरासुराची कथा आहे.  गृत्समदानें त्याला ‘गणांनांत्वा’ या मंत्राचा उपदेश केल्यावर गजाननाच्या वरप्रसादानें तो पूर्ण ऐश्वर्यसंपन्न झाला, परंतु अहंकारानें उन्मत्त होऊन वाटेल तीं दुराचरणें तो करूं लागला, त्यामुळें शेवटीं त्याचा नाश झाल्याचा उल्लेख आहे. धन, ऐश्वर्य वगैरे सर्व असूनहि दुराचारी मनुष्यांचा अन्तीं कसा नाश होतो हें यावरून चांगलें लक्षांत घेण्यासारखें आहे. पुढें अध्याय ४८-५३ पर्यंत त्रिपुरासुराच्या भयानें शंकरांसह सर्व देव वाट सांपडेल तिकडे पळून गेले असतां, गिरिकंदरांत लपून राहिलेल्या विरही पार्वतीला तिचा पिता हिमवान् यानें केलेला उपदेश विशेषतः स्त्रियांना फारच बोधप्रद आहे. या कथाभागांत हिमवानानें पार्वतीला इष्टहेतूच्या सिद्धयर्थ गणेशोपासना सांगून, त्याच्या उपासनेचे व पूजेचे प्रकार, तसेंच गणेशचतुर्थिव्रतमहात्म्य, गणेशाचें मूलपरब्रह्मस्वरूप, वरदगणेशाची कथा, नलराजाची दृढ गणेशभक्ति इत्यादि निवेदन केलें आहे; गणेशभक्तांनां ही विधिपूर्वक प्रतिपादिलेलीं माहिती विशेष उपयोगी आहे. अध्याय ५७-५८ मध्यें एका वाटमाऱ्या धीवराची कथा असून त्याला मुद्गलॠषींचें दर्शन झाल्यानें तो गणेशभक्तीला लागला व शेवटीं तपश्चर्येच्या शुद्धीमुळें भुशुंडी ॠषी कसा झाला, तें कथानक विचक्षणांस विचारणीय आहे. अध्याय ५९-६४ मध्यें संकष्टचतुर्थीमहात्म्य, अंगारकीचतुर्थिमाहात्म्य, दूर्गामाहात्म्य इत्यादिकांचें दृष्टांतासुद्धां विवरण असून गणेशदेवतेची नुसती चंद्रासारख्यानें कुचेष्टा केली असतां त्याला सुद्धां त्याबद्दल प्रायश्चित कसें भोगावें लागलें इत्यादि कथा मनोरंजक आहेत. अध्याय ६५ मध्यें दुष्ट अनलासुराचें हनन आहे. अध्याय ६६-६९ मध्यें मिथिला नगरीच्या जनक राजाचा वृत्तांत असून एकदां सिंधु नामक दैत्याच्या हननासाठीं पार्वतीच्या उदरीं गणनायकास अवतार धारण करावा लागला, तो कथाप्रसंग पुढील अध्यायांत आहे. अध्याय ७३ ते ८० पर्यंत सिंधुदैत्यानें स्वर्ग, भूमि व पाताळ इ. सर्व लोकांस जिंकून त्यांची विटंबना कशी चालविली याचें दिग्दर्शन आहे. अध्याय ८१-१०३ पर्यंत बालगजाननानें अनेक राक्षसांचा नाश कसा केला यासंबंधाचे पुष्कळ आश्चर्यजनक चमत्कार सांगितले आहेत. अध्याय १०४ यांत ब्रह्मदेवाचें गर्वनिरसन, १०५ यांत विष्णु व गणेश यांचें अभेदत्व, १०६ यांत सर्व गणांचा स्वामी म्हणून गजाननाला मिळालेलें 'गणेश' हे नामाभिधान व शंकरांनां आपल्या खऱ्या स्वरूपाचा साक्षात्कार, अ. १०७ व १०८ मध्यें इंद्र आणि यम यांचें गर्वनिरसन, इत्यादि मनोरम कथाप्रसंग आहेत. पुढें अध्याय १०९-१२६ पर्यंत सिंधुदैत्याशीं झालेल्या युद्धाची हकीकत असून, गजाननाचा सिद्धि-बुद्धीशीं विवाह व अद्भुत गोष्टी यांचें रसभरित वर्णन आहे. सिंधूप्रमाणेंच सिंदुरासुराच्या नाशाकरितां द्वापारयुगांत गजाननाला अवतार धारण करावा लागला तो कथाप्रसंग अध्याय १२७-१३७ पर्यंत आहे. १३८ ते १४८ पर्यंतच्या १२ अध्यायांत गजाननानें वरेण्य राजाला गणेशगीता सांगितली आहे. शेवटीं अध्याय १४९ व १५० यांत कलियुगामध्यें पुढें उत्पन्न होणाऱ्या धूम्रवर्णावताराचा उल्लेख करून अखेरीस १५२-१५५ या अध्यायांत गणेशपुराणाच्या फलश्रुतीचें महात्म्य व तें कोणाकोणाला प्रत्ययास आलें तें सांगितलें; आणि याप्रमाणें गणेशपुराणाचें हें पहिले सुमनोहर उपासनाखंड पूर्ण केलें आहे.

क्री डा खं ड.- क्रीडाखंडाच्या पहिल्या १ ते ४ अध्यायांमध्यें रौद्रकेतु ब्राह्मणाच्या देवांतक व नरांतक नामक पुत्राची हकीकत आहे. मातापितार ब्राह्मण असूनहि त्यांच्या पोटीं दैत्य कसे निर्माण होतात हें या कथानकावरून कळून येतें; आणि दैत्य म्हणजे दूसरे कोणी नसून जे क्रियेनें घोर आचरण करतात, ते उच्च कुलोत्पन्न असले तरी दैत्यच होत हें या उदाहरणावरून स्पष्ट ठरतें. हे दैत्य महापराक्रमी असून त्यांच्या नाशासाठीं गणेशाला अवतारा धारण करावा लागला आहे. त्याचप्रमाणें अदितीच्या स्तुतीला प्रसन्न होऊन तिला पूर्वी दिलेल्या वरास अनुसरून गजाननानें तिच्या पोटी महोत्कटरूपानें अवतार धारण केल्याची अध्याय ५ व ६ मध्यें कथा आहे. पुढें अध्याय ७ ते ११ पर्यंत गजाननाच्या अनेक लीलांचें व चमत्कारांचें वर्णन आहे. यांत मुख्य गोष्ट अशी आहे कीं, जे अनन्य भक्तीनें गजाननाला परब्रह्मस्वरूपीं जाणून नम्र होत, त्यांस त्यानें वैभवशिखरावर चढविलें; व उन्मत्तांचा नाश केल्याचें दाखविलें आहे. या कथेंत नम्रता व भक्ति यांची योग्यता दाखविली आहे. अध्याय २२ ते २८ पर्यंत शुल्क ब्राह्मणाकडे महोत्कट भोजनास गेल्याची कथा असून, परमेश्वर दांभिक, डामडौली अशा लोकांचा मुळींच भुकेला नसून केवळ भक्तीचा व प्रेमाचा भुकेला आहे हें या कथेंत दाखविलें आहे.

पुढें २९ पासून ३८ पर्यंतच्या प्रत्येक अध्यायांत कथा सुरस व बोधप्रद आहे. कश्यपॠषीला दिती व अदिती अशा दोन भार्यांच्या निरनिराळ्या आचरणानें त्यास अनुक्रमें दैत्य व देवसंतती झाल्याचा जो कथाभाग आहे, त्यांत सुसंतति होण्यास नीतिमार्गाची आवश्यकता दाखविली आहे व तो भाग प्रत्येक गृहिणीस उपदेशपर असा आहे. अध्याय ४८ पासून ५४ पर्यंत भूतलोक, दानवलोक, गंधर्वलोक, सिद्ध, चारण, यक्ष यांची स्थानें अमरावती, अग्निलोक, यमलोक, इंद्रलोक, वरुणलोक, कुबेरलोक, वायुलोक, सूर्यलोक, चंद्रलोक, गोलोक, सत्यलोक आणि त्या सर्वांपेक्षां रमणीय असा वैकुंठलोक व अखेरीस गणेशलोक यांचें वर्णन आहे. त्या वर्णनापासून खगोल व भूगोलविद्या यांचा आस्थापूर्वक अभ्यास करणारास बरेंच साह्य होण्यासारखें आहे. अध्याय ५५-७७ पर्यंत नरांतक व देवांतक यांच्याशीं गजाननानें केलेल्या संग्रामांचें वर्णन व अनेक बोधपर गोष्टी आहे. विशेषतः एकदां हट्टास पेटलेला दुष्कर्मी मनुष्य उत्तरोत्तर खडयांतच कसा पडतो आणि अखेरीस कसा धुळीस मिळतो याचें स्पष्ट चित्र यांत दाखविलें आहे. शेवटीं अध्याय ७१ व ७२ यांत विनायकाची अवतारसमाप्ति ग्रथित केली आहे.

इंद्रासारख्यांचा गणेशानें सहज लीलेनें केलेला गर्वपरिहार सामान्य जनांस बोधप्रद आहे. अध्याय ७०-७२ यांमध्यें संकष्टचतुर्थिव्रताचें समग्र विधान आणि पार्वती, दमयंती, अगस्ती, चित्रलेखा, प्रद्युम्न, रुक्मिणी, श्रीकृष्ण, ब्रह्मदेव अशांसारख्या मोठ्यामोठ्या उत्कर्षेच्छु मनुष्यांनीं पूर्वी हें व्रत कशा प्रकारें केलें, व त्यांनां सिद्धी कशा प्राप्त झाल्या, तें सांगितलें आहे. अध्याय ७३-८३ पर्यंत कार्तवीर्याची कथा आहे. जन्मतःच तो हस्तपादांनीं व्यंग असून गणोशोपासनेनें त्याला सहस्त्र हस्त व पाय प्राप्त झाले. त्यामुळें त्याला आपल्या पराक्रमाची घमेंड वाटून त्यानें जमदग्नि ॠषीला मारून टाकिलें. गणेशाच्या प्रसादानेंच त्याच्या परशुराम नामक पुत्रानें कार्तवीर्याला जिंकिलें. हा सर्व कथाभाग अत्यंत मनोरम असून, त्यांतच एका दुराचारी व वेश्यासक्त गौडपुत्राची उपकथा, नसत्या प्रकारच्या छंदी लोकांनां उपदेशपर आहे. अध्याय ८४-८८ मध्यें तारकासुराची कथा आली आहे. त्या दुर्जनाच्या वधासाठीं महादेवासारख्या वीर पुरुषांनां आणि पार्वती व मदनाची स्त्री रती यांच्यासारख्या स्त्रियांनां किती कष्ट सहन करावे लागले, त्याचें अश्रुतपूर्व वर्णन आहे. देवकार्यासाठीं मदनानें आपणांस जाळून घेतल्याची उपकथा सार्वजनिक देहयज्ञ किंवा मेहनत करूं इच्छिणाऱ्यांना खचित आल्हादकारक व प्रोत्साहनपर वाटेल. तसेंच या उपासनाकांडांतील शेवटच्या ८९ ते ९२ अध्यायांत गजाननाची स्तुति वर्णिली आहे.

गणेशपुराणाच्या प्रती अनेक असण्याचा संभव आहे. आम्ही महाराष्ट्रास परिचित अशा रा. दातार यांनीं मूळ म्हणून मान्य केलेल्या व भाषांतरलेल्या प्रतीवरून वरील मजकूर घेतला आहे.