विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे   

गजेंद्रगड- मुंबई, धारवाड जिल्हा. हें बदामीच्या पश्चिमेस २८ मैलावंर एक खेडे आहे. हें पूर्वी मुधोळच्या घोरपड्यांकडे होतें. येथें शिवाजीनें बांधलेला एक किल्ला आहे. येथील उंचगिरी नांवाचा दुसरा किल्ला १६८८ त दौलतराव घोरपडयांनी बांधला. गांवापासून ३ मैलांवर एका खोऱ्यांत यात्रा भरत असते. या खोऱ्यांत शंकराची मूर्ति आहे. लोकसंख्या (१९११) ८३०९.

येथील घोरपडयांनां हिंदुराव ही पदवी आहे. बहिरजी घोरपड्यानें शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत गजेंद्रगड व गुत्ती मिळविली. संताजी हा प्रख्यात सेनापति या बहिरजीचा भाऊ होय. संताजीला पुढें कापशी गांव इनाम मिळाल्यानें त्याचे वंशास कापशीकर नांव पडलें व बहिरजी हा गजेंद्रगडास राहिल्यानें त्याच्या वंशास गजेंद्रगडकर म्हणूं लागले. याचा वडील मुलगा हा बावीस वर्षांचा असतांनाच मुसुलमानांबरोबरच्या एका लढाईंत ठार झाला. त्याचा धाकटा भाऊ शिदोजी याला हिंदुराव ममलकतमदार जफ्तनमुल्क फत्तेजंग समशेर बहादूर सेनापति अशी पदवी होती. कोल्हापुरची देवी मुसुलमानांच्या भयामुळें मध्यंतरीं दुसरीकडे ठेविली होती, ती पुन्हां कोल्हापुरच्या राज्याची स्थिरस्थावर होतांच या शिदोजीनें स्थापिली. त्याबद्दल त्याला देवीच्या प्रधानकीचीं वस्त्रें व पांच गांवची सरदेशमुखी इनाम मिळाली. शिदोजी हा पेशव्यांनां अनुसरून वागे. याचे मुरारराव, दौलतराव व भुजंगराव असे तीन पुत्र होते. पैकी भुजंगराव हा २० व्या वर्षी लढाईंत मरण पावला. मुरारराव हा पराक्रमी होता. हा जवळ जवळ स्वतंत्र वागे; याच्या पदरीं कवायती पलटणें असल्यानें त्याचा दरारा निजाम, टिपू व इंग्रज यांस त्या प्रांतीं चांगलाच असे. हा पेशव्यांच्या तर्फेनें तिकडे बंदोबस्त ठेवी. त्यांनीं त्याला सेनापतिपद दिलें होतें. हा बहुधा गुत्तीस राही. वीस पंचवीस लाखांचा प्रांत त्यानें काबीज केला होता. अनेक कारकीर्दी त्यानें पाहिल्या होत्या. इंग्रजांसहि यानें अडचणींत मदत केली होती. मुराररावाकडे गुत्ती व दौलतरावाकडे गजेंद्रगड अशी वांटणी पेशव्यांनीं करून दिली. मुरारराव शेवटीं टिपूच्या हातीं लागले. त्यानें त्याला शेवटपर्यंत रुप्याची बेडी पायांत घालून कपालदुर्गास कैदेंत ठेविलें होते. टिपूनें गजेंद्रगडहि घेतला. पुढें हरिपंत तात्या टिपूवर चालून आले तेव्हा पेशव्यांच्या मदतीनें दौलतरावानें गजेंद्रगड हस्तगत केला. त्यावेळीं तीन लाखांचा सरंजाम किल्ल्याकडे चालत होता. परशुरामभाऊ पटवर्धन व दौलतराव यांची फार दोस्ती होती. दौलतरावहि शूर होता. निजामाशीं तह झाल्यावेळीं हरिपंततात्यांनीं दौलतरावाची पावणेतीन लक्षांची जहागीर निजामाकडे देऊन दौलतरावास पंचवीस हजारांची जहागीर खर्चास ठेविली. मध्यंतरी थोरल्या माधवरावांनी गलगलें, इंगल वगैरे ५०।६० हजारांची जहागीर यांना दिली होती. रावबाजीच्या वेळीं पुन्हा घोरपड्यांच्या जहागिरीपैकीं कांही गांवे जप्त झालीं. दौलतरावास बहिरजी म्हणून पुत्र होता. त्याचा पुत्र भुजंगराव. बहिराजी याच्या वेळी इंग्रजी झाली. त्यावेळीं गजेंद्रगड संस्थान तेरा हजारांचें होतें. [डफ; कैफियती; बिजापूर ग्याझे. राजवाडे. खं. ७, १०].