विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गंगै कोन्डपुरम्- मद्रास इलाख्यांतील त्रिचनापल्ली जिल्ह्याच्या उदयपार पालेयम् तालुक्यांतील खेडें. जयम कोन्ड चोलपुरम्च्या पूर्वेस ६ मैलांवर हें आहे. लोकसंख्या (१९०१) २७०२. इतिहासदृष्टया व प्राचीनवस्तुशास्त्र दृष्टया हें गांव फार महत्वाचें आहे. याच्या नांवाचा अर्थ 'गंगेच्या थडीवरील शहर' असा आहे. बाणासुराच्या भक्तीकरितां शंकरानें येथें गंगा आणली अशी कथा आहे. परंतु ह्या गांवाचें वास्तविक नांव 'गंगै कोन्ड चोलपुरम् हेंच असावें. कारण हें गांव चोलवंशीय नृपानें स्थापिलें. शहराचा अवशेष अझूनहि दृष्टीस पडतो. राजेन्द्र चोल ते कुलोत्तुंग चोल पर्यंतचे राजे १०११-१२ ते १११८ पर्यंत येथेंच रहात असत. येथें एक जुनाट पण मोठें देवालय आहे, ते राजेन्द्र चोलचा पिता व राजराजा ह्यानें बांधिलें असें म्हणतात. इलियटच्या मतें वीर राजेन्द्र चोल कोप्पर केशरीवर्मा यानें हें बांधलें असावें. फर्ग्युसन हा याचा काल १४ वें शतक ठरवितो. १८३६ मध्यें ह्या देवालयाचें आवार वगैरे पाडून त्याचें साहित्य कोलेरूनचा लोअर अनिकट बांधण्यास नेलें. [ब्रॅन्फिल- जे. ए. एस्. बी. पु. ४९. ए. रि. ए.].