विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
 
खोकंद- एशियाटिक रशियांतील एक शहर. हें फरघन प्रांतांत समरकंदपासून अंडिजानला जाणा-या आगगाडीच्या रस्त्यावर आहे. येथील हवा फार रुक्ष असते. प्रतिवार्षिक पाऊस ३.६ इंच असतो. शहरांत मोठाले रस्ते, विस्तृत चौक व सुंदर बाजार आहेत. हें व्यापाराचें महत्वाचें केंद्रस्थान आहे. येथें 'रम्य खोकंद' मुद्रालेख असलेलीं नाणीं पूर्वीं प्रचारांत होतीं व अझूनहि आहेत.

१८ व्या शतकांत या खानटेचा उदय झाला. १७३२ त अबदुर रहीम यानें या शहराची स्थापना केली. याच्याहि पूर्वीं म्हणजे १० व्या शतकांत खोकंद हें होकंद या नांवांनें अरब व्यापार्‍यांनां माहीत होतें. १७५४८-५९ त फरघन येथील राजांनी चीनचें मांडलिकत्व कबूल केलें. १८०७ किंवा १८०८ मध्यें नरबुताचा मुलगा अलीम यानें ताश्कंद व चिम्केंट हीं शहरें जिंकलीं व फरघनच्या राजांवर आपलें वर्चस्व स्थापिलें. त्याचा भाऊ ओमर याच्या अनुयायांनीं १८१७ त त्याला ठार केलें. ओमर यानें किरगिझ लोकांच्या स्वार्‍यांपासून फरघन प्रांताचें रक्षण करण्याकरितां सिरदर्यावर किल्ला बांधिला. यामुळें रशियाशीं वैमनस्य उत्पन्न झालें. सिरदर्याजवळील प्रदेशाचें स्वामित्व मिळविण्याकरितां १८४७ नंतर रशियानें पुष्कळ लढाया केल्या. याचा परिणाम असा झाला कीं, १८६६ त बुखारापासून खोकंदचें खानेट वेगळें करण्यांत आलें. १८६० त अलीमकुल यानें रशियाविरुद्ध 'पवित्र युद्ध' (गझावत), पुकारलें परंतु तो १८६५ त मारला गेला. १८६८ त खुदायरखान यानें रशियाशीं व्यापारी तह केला. १८५७ त फिरून रशियाशीं युद्ध पुकारण्यांत आलें. याचा परिणाम खोकंदरचें व बुखाराचें स्वातंत्र्य नष्ट होऊन, रशियाला नारयिन नदीच्या उत्तरेकडील सर्व मुलुख मिळाला. १८७६ त खोकंद खानेट रशियास जोडण्यांत आलें व यांतूनच रशियन फरघन प्रांताची उत्पत्ति झाली.