विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
खुलना, जि ल्हा.- बंगाल इलाख्यांतील प्रसिडेन्सी पोटविभागापैकीं एक जिल्हा. या जिल्ह्याचें क्षेत्रफळ, दक्षिणेकडील सुंदरबनांचें क्षेत्रफळ सोडून देतां, १९११ सालीं ४७६५ चौ. मै. होतें. या जिल्ह्यांत हुगळी व मेघना नद्यांच्या मुखामधील टापूच्या दक्षिणेकडील भाग येतो. या जिल्ह्याच्या उत्तरेस जेसोर जिल्हा, पूर्वेस वकरगंज, पश्चिमेस चोवीस परगण्यांचा मुलुख व दक्षिणेस बंगालचा उपसागर आहे. या जिल्ह्याचे वर्णनाच्या सोईसाठीं चार भाग पाडतां येतील. ते वायव्य, ईशान्य, मध्य व दक्षिण या दिशेकडील भाग होत. वायव्य भागांतील जमीन उन्नत आहे. तर ईशान्य भागांतील जमीन सखल व दलदलीची आहे. मध्यभागांतील जमीन सखलच आहे व हल्लीं ती लागवडीखालीं आणण्यांत आली आहे. दक्षिणेकडील भागांत नद्यांचें जाळेंच असल्यानें व दलदलीच्या जागा, फार असल्यानें त्या ठिकाणची जमीन लागवडीला अयोग्य झाली आहे. या भागांत स्थिर लोकवस्तीहि नसते. हा जिल्हा म्हणजे एक पुळणीयुक्त सपाट प्रदेश असून या प्रदेशांतून उत्तरेकडून दक्षिणेकडे पुष्कळ नद्या वहात गेल्या आहेत. मधुमती ही नदी या जिल्ह्यांतून वहात जाऊन व पुढें बालेश्वर हें नांव पावून, हरिणघात या मुखानें समुद्राला मिळाली आहे. याशिवाय इच्छामती, यमुना, कबदक, भैरव या नद्या प्रमुख असून छोटया छोटया नद्या तर पुष्कळच आहेत. या टापूंत सरोवर असें मुळींच नाहीं. पण दलदलीच्या जागा मात्र फार असून त्यांपैकीं बाययबिल या दलदलीच्या जागेची लांबी ४० मैल आहे. पण त्यापैकीं बराचसा भाग हल्लीं लागवडीखालीं आणण्यांत आला आहे. जिल्ह्याच्या वायव्यभागांत खजूरीच्या झाडांचीं वनेंच्या वनें आहेत. ईशान्यकडील भाग व मध्यभाग हे पावसाळयामध्यें पाण्यात बुडून जातात. नदीचीं तीरें हीं उंचावर असल्यानें तेवढींच काय तीं पाण्यावर रहातात. या तीरावर मोठमोठीं दाट जंगलें आहेत व त्यांत अनेक प्रकारचे वृक्ष, व वनस्पती आहेत. बांबू, माड, ताड इत्यादि झाडांची येथें समृध्दि आहे. पाण्यानें बुडलेल्या प्रदेशांत कांही ठिकाणीं तांदूळ पेरण्यांत आलेला दिसतो. पण बहुतेक भागांत शेवाळ, कमळें, इत्यादींचाच सुकाळ आढळतो. दक्षिणेकडील सुंदरबनाच्या टापूंत सागवान व इतर प्रकारचें लांकूड भरपूर मिळतें.
सुंदरबनामध्यें वाघ, चित्ते, रानम्हशी, डुकरें, हरिण, काळवीट, माकडें, इत्यादि पशू विपुल आढळतात. विशेषतः वाघाचा या भागांत फार उपद्रव असल्यानें या भागांत जमीनीची लागवड करण्याला लोक फारसे धजत नाहींत. मधुमती, भैरव व सुंदरबनांतील सर्व नद्यांमध्यें सुसरीं आढळतात. त्याप्रमाणें या जिल्ह्यांत निरनिराळया प्रकारचे सापहि भरपूर सांपडतात. या जिल्ह्यामध्यें पावसाचें वार्षिक प्रमाण ६५ इंच आहे. जिल्ह्यांत नद्यांचा सुकाळ असल्यानें वरचेवर मोठमोठे पूर येऊन नासधूस होते. अशा प्रकारचें पूर १८८५, १८९० व १९०० सालीं आले होते. हल्लीं, मधुमती नदीचे कालवें निघाल्यापासून व छोटया नद्यांचे प्रवाह आटल्यामुळें पूर वरचेवर येण्याचें कमी झालें आहे.
इतिहासः- प्राचीन काळीं या जिल्ह्याचा वंगाच्या अगर समततांच्या राज्यांत अंतर्भाव होत असे. पुढें बल्लाळसेनानें बंगालचे जे भाग पाडले त्यांपैकीं बागरी पोटविभागांत हा जिल्हा मोडूं लागला. सुमारें पांच शतकांपूर्वीं, खानजी अल्ली नांवाच्या एका सरदाराला गौरच्या राजानें हा जिल्हा जहागिर दिला. त्यानें सुंदरबनांतील बरींच झाडें झुडपें तोडून टाकून तेथें राहण्याजोगीं व्यवस्था केली. तो या जिल्ह्याचा राजाच होता म्हटलें तरी चालेल. त्यानें आपल्या जहागिरींत असंख्य मशीदी व थडगीं बांधलीं. त्यापैकीं कांहीं अद्यापि वाघेरहाट व मास्जिरकुर येथें जीर्णावस्थेंत असलेलीं पहावयास सांपडतात. बंगालचा शेवटचा राजा दाऊदखान याच्या विक्रमादित्य नांवाच्या आपल्या प्रधानानें दिल्लीच्या राजाकडून सुंदरबनची जहागिर मिळविली व ईश्वरीपूर नांवाचें एक शहर वसविलें. या शहरापासून हल्लींच्या जेसोर जिल्ह्याला 'जेसोर' हें नांव पडलें. विक्रमादित्यामागून त्याचा मुलगा प्रतापदित्य हा सुंदरबनचा कारभार पाहूं लागला. त्यानें दक्षिणबंगालमधील छोटया संस्थानिकांना आपल्या ताब्यांत आणलें. पण पुढें अकबराचा सेनापति मानसिंग यानें त्याचा पराभव केला व त्याला बंदिवान केलें. हल्लींचा खुलना जिल्हा हा १८८२ मध्यें पाडण्यांत आला. ब्रिटिशांच्या ताब्यांत हा जिल्हा आल्यापासून त्यांनीं या जिल्ह्याच्या दक्षिण, मध्य, नैर्ॠत्य भागांतील लागवडीची जमीन वाढविण्यास सुरुवात केली व त्यामुळें या भागांतींल लोकवस्ती वाढूं लागली. वायव्येकडील भाग मात्र फार दलदलीचा असल्याकारणानें त्या भागांतील वस्ती उत्तरोत्तर कमी होत चालली आहे. उत्तरेकडील भागाची हीच स्थिति झाली. या भागांत हिंवतापाची सांथ नेहमीं असते. याशिवाय अमांश, अतिसार, अग्निमांद्य या रोगांचाहि फैलाव येथें फार आहे. खुलना जिल्ह्यांत खुलना बाघेरहाट व सातखिरा या पोटविभागांचा समावेश होतो. या जिल्ह्यांत एकंदर लोकसंख्या १९११ सालीं १३,६६,७६६ होती. खुलना, देभाट व सातखिरा हीं तीन मुख्य शहरें आहेत. जिल्ह्यांत हिंदु व मुसुलमानांची सारखीच वस्ती आहे. पूर्वबंगाली उर्फ मुसुलमानी व बंगाली या भाषा प्रचलित आहेत. मुसुलमानांत शेख, अजलाफ व जोलाह या जातींचे लोक पुष्कळ आहेत. यांतील बहुतेक मुसुलमान हे मुळचे हिंदू होते. हिंदूमध्ये कायस्थ, कैवर्त व ब्राह्मण या जाती प्रमुख आहेत.
मथियाल जमीनींत तांदूळ पुष्कळ पिकतो. याशिवाय कडधान्यें, सुपारी इत्यादि जिन्नस 'दोआशिय' जमीनींत पिकतात. खजुराचीं झाडेंहि पुष्कळच होतात. जिल्ह्यांत कुरणें फारच थोडीं आहेत. गुरांना भरपूर चारा मिळणें देखील अशक्य होतें. येथील गुरांची निपजहि फारच हलक्या दर्जाची आहे. सुंद्री, पशुर, अमूर, केवडा, गराव, जोआ हीं झाडें सुंदरबनांतील जंगलांत मुबलक आहेत.
जिल्ह्यांतील मुख्य धंदा साखर व काकवी तयार करण्याचा आहे. कालीगंज येथील मातीच्या भांडयांचा धंदा, तसेंच चाकू, कातर्यां तयार करण्याचा धंदा व शिंगांपासून निरनिराळया वस्तू तयार करण्याचा धंदा प्रसिद्ध आहे. तांदूळ, भात, चणे, डाळ, जूट, तंबाखू, साखर, सरपण, सागवान, विडयाचीं पानें, नारळ, सुपारी, मासे इत्यादि जिन्नस बाहेर गांवीं जातात. कापूस, कांचसामान, परदेशी कापड, कातडयाचें सामान, कोळसा इत्यादि जिनसांची आयात होते. खुलना, दौलतपूर, फुलतला, अलिपूर, कपिलमुनी, चक्रनगर, चलवा, बाघेरहाट, जात्रापूर, बारदाल, कालीगंज, देभाट, वसंतपूर वगैरे ठिकाणीं बाजारपेठा आहेत. खुलना, जेसोर कलकत्ता यांमधून ईस्टर्न बंगाल स्टेट रेल्वेचा फांटा गेला आहे. खुलना जेसोर व बाघेरहाट यांमधून एक मोठा रस्ता गेला आहे. १९०३-४ मध्यें या जिल्ह्यांत ४९० मैल रस्ता होता. पैकीं १२ मैलांचा रस्ता खडीचा होता. जिल्ह्यांतील मोठया नद्यांमधून बोटी जाऊं शकतात व जलमार्गानें व्यापार बराच चालतो.
राज्यकारभाराच्या सोयीकरितां जिल्ह्याचीं खुलना बाघेरहाट, साताखिरा हीं तीन मुख्य ठिकाणें केलीं आहेत. खुलना पोटविभागावर एक मॅजिस्ट्रेट व त्याच्या हाताखालीं चार डेप्युटी माजिस्ट्रेट असतात. बाकीच्या दोन पोटविभागांवर एक कलेक्टर व त्याच्या हाताखालीं एक डेप्युटी कलेक्टर असतो. सुंदरबन विभागाची व्यवस्था पहाण्याकरितां एक स्वतंत्र 'जंगलअधिकारी व त्याच्या दिमतीला दोन दुय्यम अधिकारी असतात व ते खुलना येथें रहातात. न्यायखात्यावर डिस्ट्रिक्ट व सेशन्स जज्ज हा मुख्य अधिकारी असून त्याच्या हाताखालीं, खुलना पोटविभागावर दोन मुनसफ व एक सबॉर्डिनेट जज्ज व इतर विभागांवर तीन मुनसफ असतात. जिल्ह्यामध्यें एकंदर १२ फौजदारी कोर्टें आहेत.
बंगालमध्यें ज्यावेळीं कायमधारापद्धति सुरू झाली त्यावेळीं या जिल्ह्याच्या पुष्कळ 'जमीनदारी' पाडण्यांत आल्या. या सर्व जमीनदारींचें मिळून ६.९ लाख उत्पन्न येतें. जिल्ह्याचें एकंदर उत्पन्न १९०३-४ सालीं १४,२३,००० रुपयें होतें. खुलना, सातखिर व देभाट येथें म्युनिसिपालिटया स्थापन झाल्या आहेत. जिल्ह्यांत एकंदर १३ पोलिसठाणीं आहेतः व त्यांच्यावर डिस्ट्रिक्ट सुपरिंटेंडंट हा मुख्य अधिकारी असतो. खुलना, बाघेरहाट व सातखिर येथें एक तुरुंग आहे.
शिक्षणाच्या बाबतींत खुलना जिल्हा बराच मागासलेला आहे. १९०३-४ मध्यें या जिल्ह्यांत ३४००० मुलें व ३०० मुली शिक्षण घेत असून १००९ शिक्षणसंस्था होत्या. १९०३-४ सालीं जिल्ह्यांत ११ दवाखाने होते.
पो ट वि भा ग- क्षेत्रफळ ६४९ चौ. मै. लोकसंख्या ४,४१,२४५. या पोटविभागांत खुलना हें शहर असून ९२९ खेडीं आहेत. खुलना, अलीपूर, दौलतपूर, डमरिया, फुलतला कपिलमुनि या ठिकाणीं बाजारपेठा आहेत.
श ह र- खुलना जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. भैरव नदी ज्या ठिकाणीं सुंदरबन येथें शिरते त्या ठिकाणीं हें वसलेलें आहे. याची लोकसंख्या १९११ सालीं १,५९,८७० होती. खुलना हें सुंदरबनाची राजधानी असून हें व्यापारी शहर आहे. ईस्टइंडिया कंपनी ज्यावेळीं मीठ तयार करीत होती त्या वेळीं खुलना येथें मिठाचें कोठार होतें.येथून नारायणगंज, बारीसाल, मादारीपूर इत्यादि ठिकाणीं जलमार्गानें व्यापार चालतो. तांदूळ, साखर, सुपारी, नारळ इत्यादी जिनसांची येथून निर्गत होते. १८८४ सालीं खुलन्याला म्युनिसिपालिटी देण्यांत आली. येथें दिवाणी, फौजदारी व रेव्हेन्यु कोर्टें आहेत. याशिवाय जिल्हातुरुंग, शाळा व दवाखानाहि येथें आहे.