विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
खुरिया- मध्यप्रांत. जशपूर संस्थानचा वायव्य भाग व्यापणारें पठार व इलाखदारी. उ. अ. २३० ०' ते २३० १४ व पू. रे. ८४० ३०' ते ८३० ४४'. या पठारावर मोठमोठीं कुरणें असल्यामुळें मिर्झापुरचे व इतर ठिकाणचे बरेच गोपाल व अहीर ढोरांचे कळपच्या कळप येथें चारावयास आणतात. अशा कांही अहीरांनीं येथें कायमची वस्ती केली आहे. येथील मुख्य वस्ती 'पहाडी कोरवा' लोकांची असून जमीनदार त्याच जातीचा आहे. कांहीं काळापूर्वीं त्यास कोरवांचा 'माझी' असें म्हणत असत. त्यास 'दिवाण' ही स्थानिक पदवी आहे. परंतु तो बाघेला रजपूत व खुरिया राणीचा वंशज आणि रतनपूरच्या हैहयवंशी राजाचा संबंधीं असून रतनपूरहून येथें आला असल्याचें सांगतो. या जमीनदारींत ७९ गांवें असून ५६२ रुपये टाकोळी आहे.