विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
 
खाडववन- वनविशेष. हें अर्जुनानें अग्नीस भक्षणार्थ दिलें होतें. हें जळत असतां तक्षकाचा पुत्र अश्वसेन त्यांतून कसा तरी वांचला. मयासुर शरण येऊन वांचला व शार्ङ् पक्ष्याची चार बालकें अग्नीनें वाचविलीं. (भार. आदि अ. २२४). हें वन कोठें असावें याविषयीं तर्क पुष्कळ आहेत. हें यमुनेच्या तीरावर असून पांडवांनीं या वनांत इंद्रप्रस्थनगर वसविलें असें भारतावरून दिसतें.

व्युत्पत्तीवरून प्रत्येक ठिकाणचा छडा लावूं पाहण्यार्‍यांनीं त्याविषयीं खालील विचार व्यक्त केले आहेत.

सध्यां हिंदुस्थानच्या पूर्वेकडील देशांत खांड म्हणून लोक आहेत. त्यांचें पूर्वींचें म्हणजे भारतकालीं तरी खांडव असें नांव असावें. ह्या खांडववनांत सध्याचे खांडवा शहर आहे. भीमाशंकराच्या पायथ्याशीं तळकोंकणांत कर्जतपासून सहा कोसांवर खांड म्हणून गाव आहे. तेथें सध्यां कोळी उर्फ कोळ लोक रहातात. ह्या कोळ लोकांच्या प्रदेशाला 'कोळवन' म्हणतात. कोळांवरून जसें कोळवन तसे गोंडावरून 'गोंडवन'. कोळवन, गोंडवन व खांडवन अशीं वनशब्दान्त नामें ह्या कोळ, गोंड व खांड लोकांच्या प्रदेशला फार पुरातन कालापासून असलेलीं दिसतात. वह उत्तरपद लागून खांडवह त्यानें प्राकृत खांडवा (ग्रामनाम) प्रस्थपुरवहन्ताच्च (४  २-१२२) मुंडवा सैंधवा, हीं रूपेंहि अशाच मासल्याचीं होत. (भा. इ. सं. मं. १८३२).

तथापि खंड, व खांडव याचें ऐक्य सिद्ध करू पाहणारें हें सर्व विवेचन स्थलनिर्णायक होत नाहीं. खांडांची वस्ती. अनेक ठिकाणीं अनेक काळी असावी एवढाच पुरावा वरील विवेचन देईल. पण त्यांपैकीं अर्जुनकालीन खांडव स्थान हें कळण्याजोगें नाहीं.