विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
 
खाटिक- यांची वस्ती संयुक्त प्रांतांत सुमारें दोन लक्ष आहे. खट्टिक या संस्कृत शब्दावरून खाटिक हा शब्द झालेला असून त्याचा अर्थ कसाई अथवा व्याध असा आहे. शेती करणारी, मजुरी करणारी व भाज्या विकणारी ही एक जात आहे. हिचा पासी नांवाच्या जातीशीं निकट संबंध असूनहि त्यांची एक पोटजात आहे असेंहि म्हणतात. अयोध्यावासी, संखर, बकरकसाब, चलनमहाराव व घोरचराव अशा यांच्या मुख्य पोटजाती आहेत. यापैकीं बकरकसाब अथवा कसाई हे मांस विक्रयाचें काम करतात. चलन महाराव हें कातडयाचे काम करतात व घोरचराओ, हे पोतदार असतात.

खानेसुमारीच्या एकंदर अहवालावरून पहातां ८१६ हिंदूंच्या व सात मुसुलमानांच्या अशी खाटिक जातीच्या पोटविभागांची संख्या आहे. त्यांपैकी ब-याच स्थानिक आहेत. एकाच कुटुंबांत चार पिढयापर्यंत अंतर्विवाह करण्याची चाल नाही. लग्नसंबंध जुळवून आणण्याच्या वेळीं, दुसरा पक्ष धंद्यानें कसाई, चांभार किंवा खताची गाडी हांकणारा असल्यास ती गोष्ट गौण मानली जाते. त्यांची पंचायत असून तिचा मुख्य असा एक चौधरी असतो. पंचायतींत अपर ध्यास शासन करून दंड करण्यांत येतो. विधवेस दिराशीं विवाह करण्याची मोकळीक आहे. परंतु सक्ती नाहीं. विधवाविवाह या जातींत रूढ आहे. लग्न ठरवितांना उभय पक्ष सुरापान करितात. मिरवणूक, कलशपूजा, वराचे पाय धुणें व सीमान्त पूजन वगैरे समारंभ करण्यांत येतात. करारबीर ही मुख्य देवता असून जोनपूर हें तिचें स्थान आहे. हा कारारबीर अहीर जातीचा होता व मुसुलमानी धर्मांत जाण्यापेक्षां त्यानें प्राणत्याग पत्करला असें सांगतात. जोनरपूरच्या कराकत परगण्यांत व अन्यत्र करारकोट व करार मोहलज यांवरून नांवे मिळालीं आहेत असें सांगतात. बामट, बाभण अथवा ब्राह्मण नांवाच्या देवाची हि पूजा ते करितात. त्यांना मद्यमांस व यज्ञोपवात अर्पण्यांत येतें. कित्येक भवानीची पूजा करितात व बिरतिया नांवाच्या राक्षसीला भजतात. देवीची सांथ उदभवतांच सीतळा माईला पूजितात. चैत्र नवरात्राच्यावेळीं भवानीची पूजा करून तिला डुक्करपुरी व हलवा अर्पिण्यांत येतो. गंगा, देवी व अमरोहाचा मिरान साहेब यांना खाटिक लोक अत्यंत पूज्य मानतात.

स्त्रिया बाहूवर गोंदून घेतात. त्या नथ आणि चुडे घालीत नाहींत. तरीपण कानांतील अलंकार, काकणें व माळ इत्यादि अलंकार त्या वापरतात. चांभार, डाम, धारकर, मुसाहर, पासी व धोबी यांच्या हातच्या अन्नास ते स्पर्श करीत नाहींत. नाओवारी व अहीर यांनीं स्पर्श केलेलें अन्न त्यांस चालतें. त्यांचा मुख्य धंदा म्हणजे डुकरांची खरेदी विक्रीं करणें व कोहरी लोकांपासून खरेदी केलेलीं फळें विकणें हा असतो. एकंदरींत हे लोक फार निरुपद्रवी व सुस्वभावी आहेत.

मध्यप्रांतांत सुमारें १३००० खाटिकांची वस्ती आहे. हे मांस विक्रय करितात. मराठी जिल्ह्यांत वर्‍हाडी व झाडींतील असे खाटिकांत दोन भेद आहेत. जबलपुराकडे डुकरें पाळणा-यास हलकें समजून त्यांस लेंडा म्हणतात. एकाच आडनांवाच्या लोकांस लग्नव्यवार होत नाहींत. यांच्यांत देवकेंहि आहेत. वर लग्नास निघाला म्हणजे त्याची आई त्यास स्तनपान करविते. उच्च जातीशीं व्याभिचारा पासून झालेल्या संततीस जातींत घेतात नीच जातींची संतति घेत नाहींत. विजातीय रखेली ठेवल्यास जातीबाहेर टाकतात.

काश्मीर व पंजाबातहि हिंदु व मुसुलमान खाटीक असून हिंदु डुकरें पाळतात व मुसुलमान कातडीं कमावितात. ('कसाई' पहा) [क्रुक; रसेल व हिरालाल; सेन्सस रिपोर्ट].