विभाग अकरावा : काव्य - खतें
कोंगनोली- मुंबई इलाख्यांतील बेळगाव जिल्ह्याच्या चिकोडी तालुक्यातील एक खेडे याचे जुने नांव कोंगुलवल्ली आहे. बेळगांवाहून कोल्हापुरकडे जो रस्ता गेला आहे त्या रस्त्यावर हे वसलेले आहे. १९०१ मध्ये याची वस्ती ५५९७ होती. हे व्यापाराचे गाव असून येथील तांदूळ बेळगाव, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी जातो. येथे कापड, खजूर, मीठ, साखर इत्यादी जिनसांची आयात होते. येथे दर गुरुवारी बाजार भरतो व त्या वेळी कापूस, तंबाखू, गुरे इत्यादींचा मोठा व्यापार चालतो. लुगडी तयार करणे, हलक्या प्रकारच्या घोंगड्या विणणे हे येथील मुख्य धंदे होत. १८७६ पूर्वी येथे पुठ्ठे तयार करण्याचा कारखाना होता, पण १८७६ च्या दुष्काळात पुठ्ठे तयार करणारे लोक हे गाव सोडून गेल्यामुळे हा धंदा बसला.