प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें
        
कोंकण— चतु:सीमा- सामान्यतः दमणगंगानदीच्या दक्षिणेकडील व सह्याद्रीच्या पश्चिमेकडील खालील चतु:सीमेचा जो प्रदेश तो कोंकण होय. पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस सह्याद्री, उत्तरेस दमण व दक्षिणेस गोव्याच्या सरहद्दीवरील तेरेखोलपर्यंतचा प्रदेश अशी याची चतु:सीमा आहे. डफने तापी नदी ते सदाशिवागड अशी याची उत्तर-दक्षिण सरहद्द दिली असून या भागास त्याने थळ कोंकण असेही म्हटले आहे. कोकणात हल्ली मुंबई शहर, ठाणे, कुलाबा, रत्‍नागिरी हे जिल्हे, उत्तर कानड्याची पट्टी, जंजिरा व सावंतवाडी ही संस्थानें व गोवे प्रांत इतक्यांचा समावेश होतो. या प्रदेशाची रुंदी साधारण २५।३० व मैल लांबी सुमारे ३२० मैल असून, लोकसंख्या जवळजवळ ५७ लाख आहे.

प्राचीन उल्लेख— कोंकण हा शब्द फार प्राचीन आहे. परंतु वरील भूप्रदेशाला हे नाव का व कसे देण्यात आले याचा समाधानकारक उलगडा अद्याप झालेला नाही. निरनिराळ्या काळी कोंकणच्या मर्यादा बर्‍याच भिन्न असाव्यात असे उपलब्ध झालेल्या तत्कालीन उल्लेखांवरून दिसते, महाभारतात (भी. प.अ.९) अपरान्त व कोंकण ही दोन्ही नावे आली आहेत. हरिवंश व विष्णुपुराण आणि वराहमिहिर यांनीही कोंकणचा नामनिर्देश केला आहे. अपरातांतील शूर्पारक हे शहर फार जुने असून बौद्ध वाङ्मयांत त्याचा अनेकदा प्रामुख्याने उल्लेख येतो. शूर्पारक म्हणजे हल्लीचे सोपारे (ठाणे जिल्हा, वसईजवळ बी.बी.सी.आय. रेल्वेचे स्टेशन) असून येथे थोड्या वर्षांपूर्वी बुद्धाचा एक स्तूप व अशोकाची धर्मशासनांकीत एक लेखशिला सापडली होती. महाभारतात शांतिपर्वाच्या ४९ व्या अध्यायात या शूर्पारकाचा उल्लेख आहे; तसेच सहदेवाच्या दक्षिण विजयात कोंकण देशाचे नाव आले आहे. बृहतसंहितेत (१४.१२) देखील दक्षिण विभागांतील देशात याची गणना असून एके ठिकाणी तर 'सप्‍तकोंकण' असाहि याचा उल्लेख आला आहे. दशकुमार चरित्रांत कोंकण असा शब्द आला आहे. ख्रि.पू. तिसर्‍या शतकात यास अपरांत म्हणत; रघुवंशात अपरांत हेच नाव आहे. संस्कृत वाङ्मयात त्रिंबक ते कन्याकुमारीपर्यंतच्या पश्चिमकिनार्‍यावरील प्रदेशात कोंकण हे नाव येते. 'अपरान्त' याची व्युत्पत्ती कांही जण पुढीलप्रमाणे देतात :- अपरा म्हणजे पश्चिमदिशा, तिचा जेथे अंत होतो (म्हणजे पुढे समुद्र लागतो) तो प्रदेश. परंतु काहींचे म्हणणे की सोप्पार (सोपारे) प्रांताचा अंत या शब्दावरून 'अपरांत' शब्द झाला असावा. 'महावंशो' या बौद्ध ग्रंथांत सोपार्‍याच्या दक्षिणेकडील देशास अपरांत म्हटले आहे व अशोकाने तेथें आपले धर्मप्रचारक पाठविल्याचाही निर्देश केला आहे. राजतरंगिणीत व चालुक्याच्या शिलाशासनात वरील सप्‍तकोंकण हा शब्द आलेला आहे. ख्रि.पू. चौथ्या शतकात कोंकण हे नाव प्रसिद्ध झाले होते. रा. रा. भागवत यांनी या शब्दाची व्युत्पत्ती अशी दिली होती की, चेर देशास काग किंवा कोंग (कोंगु ?) असे म्हणण्याची बरीच जुनी वहिवाट आहे. कांग आणि गंग हे दोन्ही शब्द एकार्थी आहेत व ते एका राजघराण्याचेंही नाव आहे. यावरून कोंगवत हा शब्द तयार झाला असावा व कोंगवत याचा कोंकण शब्द बनला असावा. (वि.ज्ञा. वि.पु. २२ पृ. ९९).  कालिदास आणि भारवी यांच्या कोंकणवर्णनांत थोडासा फरक आहे. शके ४२६ मधील पंचसिद्धांतिका या ग्रंथांत कोंकण हा शब्द आला आहे. इ.स. ८० मधील पेरिप्लसच्या कर्त्याने कोंकणाचा व झिनोल (चौल बंदर)चा उल्लेख केला आहे. कदंबराजवंशाच्या लेखावरून ख्रि.श. पूर्वी बौद्धधर्मप्रसारकांचे पाय कोंकणास लागल्याचे स्पष्ट होते. ख्रि.पू. १ ल्या शतकात मलबारावर सत्ता गाजविणार्‍या पेरमाल राजांची एक मोठी सभा कोंकणांत भरल्याचा उल्लेख आढळतो. रेवदंड्याबद्दल एक दंतकथा अशी सांगतात की, श्रीकृष्णाने (आपली भावजय जी रेवती हिला निर्वाहार्थ रेवतीक्षेत्र म्हणून जी भूमी दिली होती, तेंच हल्लीचे रेवदंडा होय. (वि.ज्ञा.वि.पु. २१ अं. १-२). टॉलेमीने कोंकणाचा निर्देश लारिका (लाटदेश (सं.) = गुजराथ व उत्तर कोंकण) व आरिका (दक्षिण कोंकण) असा केला आहे. (इ.स. १५०). पेरिप्लसमध्ये लारिका वे नाव नसून बरुगझ (भरुकच्छ = भडोच) हे नाव येते व आरिका देशांत चांचे लोकांचा फार उपसर्ग होता असे त्यांत म्हटले आहे, हे चाचे म्हणजे अरब लोक होत. या चांच्यांचा उल्लेख स्ट्रॅबोनेही केला आहे. तत्कालीन कल्लिएन म्हणजे हल्लीचे कल्याण (जी.आय.पी. रेलवेचें स्टेशन) व सेसेक्रिएनी म्हणजे वेंगुर्ला होय असें स्मिथ म्हणतो (स्मिथ. पु. २. ४२२); पैकीं कल्याण हें नांव बरोबर आहे; सेसेक्रिएनी म्हणजे वेंगुर्ला हे संशयित दिसते. या दोन बंदरांच्या दरम्यान टॉलेमी व पेरिप्लस पुढील गांवें देतात :- ओपार (सोपारे), सेमुल्ल (चेऊल ?), मंदगोर, पलपोटम किंवा बलपाटण, मेलिझिगर व तोपरोन. टॉलेमीने ओपार व सेमुल्ल यांच्यांत बिंद ही नदी दिली आहे, प्लेनीचे झिझेरस व टॉलेमीचे मेलिझिगर हे सुवर्णदुर्ग किंवा जयगड असावे असे लासेन व स्मिथ म्हणतात. (झिझरेस या शब्दाचें जंजिरा या शब्दाशी बरेचसे साम्य आहे.) प्लिनीचे बायझँटियम हे विजयदुर्ग व निट्रिअस हे (मालवण व वेंगुर्ले यांच्यामधील) निवती होय असे रेनेल म्हणतो (व्हिन्सेन्ट पु. २). पेरिप्लस व टॉलेमीची तत्कालीन ग्रामनामे हल्ली स्पष्ट ओळखता येत नाहीत; याचे करण ती हल्ली नष्ट झाली असून नवीनच बंदरे पुढे आली आहेत. ख्रि.पू. तिसर्‍या शतकांत अशोकाने आपले प्रेषित बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अपरांतात पाठविल्याचा उल्लेख, त्याच्या गिरनार खालशी व शहाबाज गढी येथील शिलालेखात आढळतो. यावरून ख्रि.पू. दुसर्‍या व तिसर्‍या शतकात अपरांत मौर्यांच्या ताब्यात होते व त्या काळी शूर्पारक ही त्यांची राजधानी होती असे ठरते. बायबलातील ऑफीर हेंच सोपारा होय, असे काहींचे म्हणणे आहे. अलबेरूणीने समुद्राजवळील कोंकण असा कोंकणाचा निर्देश केला आहे.

भूप्रदेश:- सामान्यतः किनार्‍याजवळचे प्रदेश सुपीक, बर्‍याच लागवडीचे व दाट वस्तीचे असून किनार्‍यापासून लांबचे प्रदेश खडकाळ रुक्ष असे आहेत. येथील हवा थंड असून पाऊस फार पडतो. उष्ण वारे क्वचित् वाहतात. हवेत घडोघडी फेरफार होत नाहीत, ती सामान्यत निरोगी असते. मुंबईच्या उत्तरेस किनारा सखल व वालुकामय असून नद्या उथळ व बंदरे कमी महत्त्वाची अशी आहेत. मुंबईच्या दक्षिणेकडील किनारा चांगला असून त्याच्या बाजूने टेकड्यांच्या रांगा आहेत. तसेच या भागात पुष्कळ नद्या व मोठी बंदरेही आहेत. जमिनीपासून पाव मैलाच्या आत दर्यामध्ये अर्नाळा, कुलाबा, दांडाराजापूर व सुवर्णदुर्ग यासारखी लहान लहान खडकाळ बेटे असल्याने, त्यावर मराठी साम्राज्यात किल्ले बांधले गेले व त्यामुळे त्यांना महत्त्व आले. उत्तर कोंकणात वस्ती पातळ असून दक्षिण कोकणात मात्र दाट आहे. दक्षिण कोंकणातली जमीन सामान्यतः खडकाळ व नापीक आहे, परंतु तीत नद्या व खाड्या पुष्कळ असल्याने त्यांच्या काठचा प्रदेश सुपीक आहे. उत्तरकोंकणात झाडी बरीच असून त्यांत ताड व खजूर पुष्कळ आहेत. दक्षिण कोंकणात फारशी झाडी नाहीं, येथें ताडाऐवजीं नारळाचीं झाडें पुष्कळ आहेत.  खेड्यांतील लोकांनां या नारळींच्या बागांपासून बरेच उत्पन्न मिळते. सह्याद्रीमुळें पावसाचे वारे अडले जाऊन  कोकणांत पाऊस फार पडतो, म्हणून तेथें अवर्षण व दुष्काळ यांची भीती कधी नसते. मुख्य पीक तांदूळ हें असून नागली, वरी, वाल वगैरे धान्य साधारण प्रमाणांत होतें. नारळ, सुपारी, कलमी आंबे, काजू, कोकंबा, फणस वगैरे फळे व सर्वसाधारण शाकभाज्या उत्पन्न होतात. माशांचा व्यापार बराच चालतो. वाघ, चित्ते, सर्प हे प्राणी फार आहेत. पर्वताच्या पायथ्याशी मलेरियाचा रोग विशेष जाणवतो. खनिज संपत्ती बहुतकरून मुळीच नाही.

लोक— मुख्यतः महाराष्ट्रीय लोकांचीच वस्ती जास्त आहे. उत्तर कोंकणात गुजराथी व तत्सम लोक आणि मूळचे लोक थोडेफार आहेत. मात्र दक्षिण कोंकणात शुद्ध महाराष्ट्रीय आहेत. कोंकणातील बहुतेक लोक शेती करतात. इंग्रजी राज्य सुरू होण्यापूर्वी पुष्कळ लोक (मुख्यत्वें मराठा, भंडारी, कुणबी व थोडेफार ब्राह्मणही) लष्करी पेशा स्वीकारीत असत. हल्ली थोडेफार कोंकणी मराठे लष्करात दाखल होतात. अलीकडे या १५।२० वर्षांत मुंबईस गिरण्यांत मजूर म्हणून या कोंकणी (बालू) लोकांची भरती सपाटून होऊ लागली आहे. कोंकणी लोक पोटाकरिता घर सोडून बरेच दूरवर जातात खरे. परंतु म्हातारपणी ते घरी येतात. इकडील गावे फार लहान लहान असतात; मोठ्या गांवची लोकसंख्या १५ हजारांच्या वर क्वचितच जाते. किनारा विस्तृत व बंदरे सोयीची असल्याने पूर्वी दूरदूरचे परदेशी लोक येथे उतरत असत. अरबस्तानापासून कोंकण जवळ असल्याने प्रथम अरबांचा उपसर्ग कोंकणास झाला. प्रदेश सुपीक असल्याने या प्रांताला महत्त्वही चढले. बौद्धांनी व पुढे ब्राह्मणांनी आपापले मठ साष्टी येथे स्थापून इतरत्र लेणी कोरली होती. पूर्वी येथे आलेले फारशी, ज्यू, हबशी व अरब यांचे वंशज अध्यापिही आढळतात. यापैकीं बेनेइस्रायल व पारशी यांचे आगमन कोंकणच्या इतिहासात महत्त्वाचें गणलें जाते. बेनेइस्रायल हे बहुतेक उत्तरकोंकणात राहतात. पारशांनी व्यापारात बराच पुढाकार मिळविला असून ते बहुतेक सारे श्रीमंत आहेत. पंधराव्या शतकांत पोर्तुगीज येथे येऊन त्यांनी चौल, वसई वगैरे ठाणी घेऊन आपले पाय पसरले. सोळाव्या शतकात त्यांनी वरीलप्रमाणे अंमल पसरवून हिंदू लोकांवर धार्मिक बाबतीत अतिशय जुलूम केला. अठराव्या शतकात आंग्र्यांनी यांचा व इंग्रज आणि डच यांचा पुरता नक्षा उतरविला. त्यांनी सतराव्या शतकात येथे आपल्या वखारी घातल्या होत्या व मराठी राज्यांत व्यापाराच्या सवलती मिळविल्या होत्या. मराठी साम्राज्यांत तर कोंकण किनार्‍याचे महत्त्व फारच वाढले होते. इंग्रजी राज्य आल्यानंतर ते हळूहळू कमी होत चालले व बंदरांचे व किल्ल्यांचे अस्तित्व नाममात्र भासूं लागले आणि व्यापारी बसत चालला. ठाणे जिल्ह्यात तेवढी आगगाडी सुरू आहे. कोंकण व देश यांत सह्याद्रीची प्रचंड भिंत असल्याने (जरी मधून मधून  पुष्कळसे घाट व वार्‍या जाण्यायेण्यास आहेत तरी) परस्परांत व्यापार जोरात चालू नाही; त्यामुळे कोंकण हे खालावलेले व दरिद्री झाले आहे. फक्त तेथें सृष्टीशोभा पाहावयास सांपडते व कोंकणी लोक बुद्धीने हुशार असतात एवढाच फरक आहे.

प्राचीन व्यापार व दळणवळण— एलफिन्स्टन म्हणतो की भडोच व अरिका येथून आफ्रिकेला पहिल्या शतकाच्या सुमारास तांदूळ व इतर धान्य, लोणी, तिळाचे तेल, जाड व बारीक कपडा, साखर, वगैरे माल रवाना होई. हा व्यापार कच्छी व अरबी लोक करीत. प्राचीन इजिप्शियन लोकांशी हिंदुस्थानचा व्यापार होता. तसेच रोमन लोकांचा व्यापारही अरबांमार्फत हिंदुस्थानशी असे, असे स्मिथ व एलफिन्स्टन म्हणतात. पेरिप्लसचें मुझीरीस (हल्लीचे मंगळूर) हे अशा व्यापारांचे मोठे बंदर होते. याकाळी अरिका हा देश तगरच्या राजांच्या अंमलाखाली होता. तगर म्हणजे हल्लीचे निजामशाहीतील तवरगिरी असे रा. राजवाडे म्हणतात. पेरिप्लसनंतर सहाव्या शतकांत कॉस्मस नांवाच्या ग्रीक व्यापार्‍यानें तत्कालीन व्यापाराची माहिती पुढीलप्रमाणें दिली आहे :- कल्याण हे व्यापाराचें मोठे ठिकाण असून तेथून जहाजें परत जातांना, पितळ, तीळ, लांकूड व कापड हे जिन्नस नेत. सातव्या शतकांत आलेला बौद्धभिक्षु ह्युएनत्संग हा परत जातांना कल्याण किंवा बाणकोट येथें जहाजावर चढला असें म्हणतात. याने कोंकणपूर या राज्याचा घेर ४०० कोस असून तो प्रदेश पूर्वी कदंबाच्या राज्यात मोडे असे म्हटले आहे. कास्मसच्यानंतर आरबांनीं कोंकणचा उल्लेख केला आहे.  त्यांनी कोंकणाला केमकेम, कोमकम, कंकन, कोंकण वगैरे नांवे दिली आहेत. इब्न बतुता याने कोंकण, ठाणे व एका इटालियन प्रवाशाने कोसिटण म्हटले आहे. इ.स. ६३६ त खलीफ उमर याने ठाण्यास फौज पाठविली होती, असे एक अरब ग्रंथकार म्हणतो. (रीनांड-फ्रॅग्मेंटस्. १८२६) इ.स. ८५१ त एक सुलेमान नावाचा व्यापारी इकडे आला होता. त्याने कोंकण हे बलहार राजांच्या अंमलाखाली असल्याचे नमूद केले आहे, बलहार म्हणजे शिलाहार असावेत. अबुरिहानने कोंकणची मैदाने दंडका या प्रदेशात दिली आहेत. अलबेरुणी हा कोंकणची राजधानी तालह (तळे?) असल्याचे लिहितो. त्याने भडोच, सिंदन (संजान?) सौबर, टाणा (ठाणे), लारण, दिजमौर, मलाय, कंदजी, द्रवीर वगैरे मोठ्या गावाची व प्रांताची नावे दिली आहेत. यातील अंतरे त्याने परसंग या इराणी मापाने दिली आहेत. (एक परसंग म्हणजे साडेतीन मैलांपेक्षा थोडे अधिक अंतर होय). पुढे स. १३०० च्या सुमारास रशिमुद्दीन हा कोंकण व गुजराथचा उल्लेख, खंबायत, कंकन, टाणा, मलबार या नांवासह करतो. याच्यापूर्वी एक शतक अल् इद्रिसी हा प्रवासी आला होता. त्याने आपले वृत्त असे दिले आहे :- बरूक (भडोच) पासून सिंधापूर हे किनार्‍याने चार दिवसांच्या मजलीवर असून तेथून बन (ठाणे?) चार दिवसांच्या वाटेवर आहे. हें एका मोठ्या आखाताच्या किनार्‍याला असून येथें मोठमोठी गलबते राहूं शकतात. ठाण्याच्या खाडीच्या पूर्व व पश्चिमेकडील टेकड्यांच्या मधील भागांत व ठाणे आणि वसई या दरम्यानच्या प्रदेशावर थोड्या काळापूर्वी पाणी असावे हे लक्ष्यांत घेतल्यास, आठ शतकांपूर्वीच्या ठाण्यासंबंधाची वरील वर्णने चुकीची नसावीत असे वाटते. या अरब प्रवाशांपैकी शेवटचा इब्न बतुता हा होय. त्याने ठाण्याहून मोठमोठी जहाजे व्यापारानिमित्त एडनला जात असत असे म्हटले आहे. मार्कोपोलो या व्हेनिसच्या प्रवाशाने कोंकणचे वर्णन (स. १२९०) दिले आहे; परंतु ते फार संदिग्ध आहे. त्याने कोकणावर त्यावेळी ठाणे व लार (लाट) अशी दोन राज्ये होती असे म्हटले आहे. ठाणे भरभराटीस आल्यावेळी साहजिकच कल्याण मोडकळीस आले. त्यामुळे पुढील प्रवाशांच्या वर्णनांत कल्याण येत नाही. तसेच दाभोळ व चेऊल यांचीही नावे त्यावेळी आढळत नाहीत. कारण ही पोर्तुगीज व मुसुलमानांच्या रियासतीत नांवारूपास चढली.

प्राचीन इतिहास:— हा इतिहास शिलालेख ताम्रपटादि साधनांवरून देता येतो. कोंकणात बौद्ध किंवा ब्राह्मणी लेणी व खोदकामे बरीच असून ती पुढील ठिकाणी आहेत : कान्हेरी, कोंदिवटे, जोगेश्वरी, मंडपेश्वर, मागाठण, घारापुरी, करंज, जंब्रुग, कोंडाणे व चंदनसार ही ठाणे जिल्ह्यात असून पाल व कुडा ही कुलाबा जिल्ह्यात आहेत; आणि रत्‍नागिरी जिल्ह्यांत चिपळूण, खेड, दाभोळ, संगमेश्वर, गव्हाणे, वेळगांव व वाडेपाडेल ही आहेत. यांत असलेल्या शिलालेखांवरून तत्कालीन पुष्कळ माहिती निघते. कान्हेरी लेण्यांत शिलाहार व आंध्रभृत्य राजांची नावे येतात. ही पुष्कळशी लेणी बौद्धधर्मीयांचीच आहेत. त्यावरून एके काळी साष्टी व मुंबईच्या दक्षिणेकडील काही भागांत बौद्धाचे ठाणे असावे असे दिसते. कोंकणावर निरनिराळ्या काळी निरनिराळे (म्हणजे मौर्य, आंध्र, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, मुसुलमान, पोर्तुगीज व मराठे इ.) राजे झाले. ख्रि.पू. तिसर्‍या शतकांत अशोक मौर्याचा अंमल होता. सोपारें येथे सापडलेल्या स्तूपात गोतमीपुत्र शातकर्णी याचे एक नाणे आढळलें; सोपारे ही अशोकाची या भागाची राजधानी होती. मौर्याचे राज्य ख्रि.पू. २ र्‍या शतकांतही होते. पुढे इ.स.च्या पहिल्या शतकात शातवाहनाचे राज्य कोकणावर झाले. हेच आंध्रभृत्य होत. नाशिक जिल्ह्यातील एका (त्रिरश्मि पर्वताच्या) लेण्यांत पुलुमायी शातवाहनाच्या राज्यविस्तारात अपरांतकाचे नाव आले आहे. हा शातवाहनांचा अंमल बहुधा इ.स. ३ र्‍या शतकापर्यंत टिकला असावा. यापुढे इ.स.च्या चौथ्या शतकात कलचुरी घराण्याचा अंमल कोंकणावर बसला. या घराण्यातील कृष्णराज (इ.स. ३७५-४००) याची काही नाणी मुंबई व साष्टीस आढळली. हे घराणे ५ व्या शतकापर्यंत कोंकणचे अधिकारी असावे. तसेच इ.स.च्या ६ व्या शतकापर्यंत मौर्यांचा अंमल इकडे असल्याचाही पुरावा मिळतो. या वेळी नळ नांवाचे एक घराणेही कोंकणात राज्य करीत होते. सहाव्या शतकात चालुक्य घराण्यांतील कीर्तिवर्मा याने (इ.स. ५६७-५९१) उत्तर कोंकणवर स्वारी करून मौर्यांचा पराभव केला. त्याचा नातू दुसरा पुलकेशी याने (६११-६४०) तर मौर्यांचे उच्चाटण करून कोंकण प्रांत खालसा केला. या मौर्यांची राजधानी पुरी (हल्लीचे घारापुरी किंवा त्याच्या शेजारचे मोरे बंदर असावे) हे शहर होते. ते पुलकेशीच्या चंडदंड या सेनापतीने १०० जहाजांच्या आरमारानिशी लढाई करून काबीज केले. हे चालुक्य उत्तर कोकणावर साधारणतः इ.स. ८१० पर्यंत राज्य करीत असावेत. यापुढे शीलाहारांचा अंमल कोकणावर बसला. वरील चंडदंडाची हकीकत वाडें येथील एका शिलालेखात सापडते. त्यावेळी सुकेतुवर्मा नावाचा मौर्यराजा होता. इ.स. ६३७ च्या सुमारास अरबांनी ठाण्याजवळील कोंकण किनार्‍यावर चढाई केली होती. शिलाहारराजे हे इ.स. ८१० ते १२६० पर्यंत कोंकणवर अधिकार गाजवीत होते. या अवधीत वीस राजे होऊन गेले. परंतु त्यांचा इतिहास चांगलासा उपलब्ध नाही. यांचीही राजधानी पुरी हे शहर असून संजाण, ठाणे, चौल, लोनाड, सोपारे, चेमुली व उरण ही शहरे राज्यांत प्रमुख होती. म्हणजे हल्लीच्या ठाणे व कुलाबा जिल्ह्यांतील बराच भाग त्यांच्या ताब्यात होता. हे राजे स्वतःस तगरपुराधीश्वर असे बिरुद लावून, जीमूतवाहनाचे वंशज म्हणवीत. यांचा पहिला पुरुष कर्पोद होय; त्याचा मुलगा पुलकेशी. याच्याबद्दल कान्हेरीच्या शिलालेखात "कोंकणातील मंगलपुरीच अधिपती'' असे म्हटले आहे. तो अमोघ वर्ष राष्ट्रकुटांचा मांडलिक असावा असेही त्या लेखावरून दिसते. कान्हेरी लेण्यातील दुसर्‍या एका शिलालेखावरून या पुलकेशीचा मुलगा दुसरा कपर्दि (८५३-८०) हा देखील राष्ट्रकुटांचा अंकित होता असे दिसते. या कपर्दीचा नातू झांझ हा सैमूर (चौल?) प्रांताचा राजा असल्याबद्दल समसुदी हा अरब इतिहासकार (इ.स. ९१६) सांगतो; पुढे या झांझचा नातू अपराजित (इ.स. ९२०-९४०) हा मात्र स्वतंत्र बनला. कारण, त्याचा सार्वभौम जो कक्कल राष्ट्रकूट त्याचा वध चालुक्य तैलप याने परभारे केल्यामुळे (भिवंडी तालुक्यातील भेरगांवचा शिलालेख पाहा) यास फावले. त्याचा (अपराजितचा) पुत्र अरिकेसरी (इ.स. ९४०-१०१७) हा कोंकणातील १४०० गावांवर राज्य करीत असून, त्यांत पुरी व श्रीस्थानक (ठाणे) ही मुख्य गावे होती असे (स. १०९७ च्या) एका शिलालेखात म्हटले आहे. या घराण्यातील १७ वा राजा (अरिकेसरीचा पणतू) जो दुसरा अपरादित्य त्यांचा नातू) मल्लिकार्जुन (स. ११५६-६०) हा मोठा बढाईखोर असून स्वतःस राजपितामह म्हणवीत असे. त्याच्या एका भाटाने गुजराथच्या कुमारपाल सोळंखी (स. ११४३-७४) राजाच्या देखत मल्लिकार्जुनाला राजपितामह म्हणून त्याची स्तुती केली असता, ती ऐकून त्याने आपला सेनापती आनंद यास मोठ्या सैन्यानिशी मल्लिकार्जुनावर पाठविले. पहिल्या लढाईत आनंदाचा पराभव झाला, परंतु दुसरीत त्याने मल्लिकार्जुनास ठार मारिले. याच्या वेळचे दोन शिलालेख (वसई व चिपळूण) उपलब्ध आहेत. कुमारपालाचा अंमल थोडे दिवस ठाणे कोकणावर होता; परंतु पुढे थोड्याच दिवसांत ठाणेकर शिलाहार हे कोल्हापूरकर शिलाहारांच्या मदतीने स्वतंत्र बनले. मल्लिकार्जुनाचा पणतू सोमेश्वर हा या वंशातील शेवटचा- विसावा- पुरुष होय. (स. १२५० ते १२६०). त्याच्यावर १२६० मध्ये महादेव यादव देवगिरीकर याने स्वारी केली; तेव्हा सोमेश्वर हा नौका गमन शास्त्रांत प्रवीण असल्याने, त्यानें दर्याचा आसरा धरला; परंतु महादेवानेंही अनेक समुद्रयाने जमा करून त्याचा सर्वस्वी विध्वंस केला. हेमाद्रीने हे सर्व वर्णन आपल्या 'राज्यप्रशस्तीत' दिले असून सोमेश्वरास कुकुंणेश म्हटले आहे. याप्रमाणे इ.स. १२६० साली कोंकणप्रांत देवगिरीकर प्रौढप्रताप चक्रवर्ती यादवांच्या साम्राज्याखाली गेला, तो इ.स. १३१८ पर्यंत त्यांच्याकडेच होता. शिलाहारराजे हे आपला राज्यकारभार निरनिराळ्या मंत्र्यांच्या सल्ल्याने चालवीत असत. त्यांना देवालये, तलाव वगैरे बांधण्याची फार आवड असून ते विद्येचे भोक्ते होते. यादवांनी कोंकणावर राज्य चालविण्यास आपले प्रतिनिधी नेमिले होते; त्यांना सर्वाधिकारी किंवा महाप्रधान म्हणत. अशा प्रकारचा एक अच्युत नायक नांवाचा यजुर्वेदी ब्राह्मण महाप्रधान (गव्हर्नर) इ.स. १२७२ साली कोंकणात कारभार करीत होता. सार्वभौम रामचंद्रदेव यादव याच्या या महाप्रधानांनी दिलेले दोन ताम्रपट (इ.स. १२७३ व इ.स. १२९१ चे) ठाणे जिल्ह्यात सापडले असून, भिवंडी व वसईस खुद्द रामदेवरायाचे शिलालेखही आढळले आहेत. कृष्ण कावळे हा भारद्वाजगोत्री ब्राह्मण महाप्रधान इ.स. १२९० त सर्व कोंकणप्रांतावर राज्य करीत होता. पुढे अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवरायावर स्वारी केली असता (इ.स. १२९४)त राजाने वंशरक्षणासाठी आपला दुसरा मुलगा भीमदेव (बिंबदेव) यास त्याच्याबरोबर राजगुरू पुरुषोत्तमपंत कावळे व इतर सरदार दरकदार देऊन उत्तरकोंकणात पाठविले. बिंबाख्यान व कौस्तुभचिंतामणी या ग्रंथावरून असे दिसते की भीमदेव हा अनहिलवाड्यावरून जलमार्गाने कोकणात उतरून व कृष्ण कावळ्यापासून सर्वाधिकार हस्तगत करून महिकावती (माहीम) ही आपली राजधानी करून तेथें राहिला. त्याने उत्तर कोंकणचे १५ विभाग केले होते; त्यात १६२४ खेडी होती. भीमदेवाच्या मागून प्रताप देव व त्याच्या मागून नागरदेव हे राजे झाले. नागरदेवाच्या वेळी स. १३४७ त गुजराथच्या मुसुलमान शहाचा सेनापती मलिकनाईक याने एकाएकी नागरदेवावर स्वारी केली; तीत नागरदेव व त्याची राणी मारली जाऊन उत्तरकोंकण मुसुलमानांच्या ताब्यात गेले. दक्षिण कोकणांतील शिलाहारांच्या वंशात दहा राजे होऊन त्यांनी सुमारे इ.स. ८०८ ते १००८ पर्यंत राज्य केले. ते प्रथम राष्ट्रकुटांचे व मग चालुक्यांचे आणि शेवटी देवगिरीकर यादवांचे मांडलिक होते.

मुसुलमानी अंमल— मुसुलमान कोंकणात घुसल्याचा पहिला उल्लेख १३१२ तील आहे. त्या वर्षी मलिक काफर याने दाभोळ व चेऊलवर स्वारी केली होती. पुढे इ.स. १३१८ त देवगिरी घेऊन मुबारकशहाने समुद्रकिनार्‍यावर नवे किल्ले बांधण्याचा प्रारंभ केला; व साष्टी व माहीमचे जुने किल्ले काबीज केले. कोकणात मुसुलमान जाण्यापूर्वी उत्तर कोकणात वसई, कल्याण, कर्नाळा, चौल आणि दक्षिण कोकणात दाभोळ, राजापूर व कुडाळ हे प्रांत मोडत असत. ब्राह्मणी राज्य स्थापन झाल्यानंतर (१३४७) कोंकण त्यांच्या राज्यात समाविष्ट झाले. त्यात चौल व दाभोळ हे दोन निरनिराळे प्रांत होते. याच सुमारास जव्हारचे संस्थान निर्माण होऊन दिल्लीकर मोंगलानें त्याला मान्यता दिली होती. यावेळी म्हणजे १३४७-१४०० पर्यंत जरी कोंकण हे अविंधांच्या सत्तेखाली होतें, तरी तेथें हिंदूंची कित्येक मांडलिक राज्ये होती. त्यापैकी कांही विजयानगरकरांचे व काही गोवळकोंडेकरांचे मांडलिक म्हणवीत. अर्सकिन म्हणतो की, अहंमदशहाने (गुजराथचा शहा) पंधराव्या शतकात बराच कोंकण प्रांत काबीज केला होता. त्यावेळी त्याच्या राज्यात वसई, मुंबई, दमण, दांडाराजापूर हे प्रांत व वसई, आगाशी, दाभोळ, चौल, दांडा, पनवेल, कल्याण, भिवंडी गोंवे ही शहरे प्रमुख होती असे मिरात-ई-अहमदी म्हणते. याच्या कारकीर्दीत मलिक-उल्-तुजार याने कोंकण लुटले (१४२९). माहीम (मुंबईकडील) व साष्टी ही बेटे घेतली तेव्हां त्याच्यावर वरील अहंमदशहाने खुष्कीने व जलमार्गाने सैन्य पळवून व त्याचा पराभव करून ती परत मिळविली. पुढे १४३६ त व १४५३ त ब्राह्मणी राजांनी कोंकणावर स्वार्‍या केल्या; त्यापैकी शेवटच्या स्वारीत विशाळगडच्या शिरके या आडनांवाच्या घराण्यांतील एका मराठा सरदाराने आपल्या शंकरराय नावाच्या राजाविरुद्ध मलिक-उल-तुजार यास बोलविले. वास्तविक हे वेबनावाचे सर्व ढोंग असून मुसुलमानांचा नायनाट करण्याकरीता त्यावेळच्या प्रमुख मराठ्यांनी ही युक्ती योजिली होती. शिरक्याने मलिकास सह्याद्रीच्या अत्यंत अडचणीच्या जागेत नेऊन सोडल्यानंतर पूर्वी ठरल्याप्रमाणे शंकरराय व इतर मराठे सरदारांनी त्यांच्यावर हल्ला करून त्याचा सपशेल धुव्वा उडविला. या शिरक्यांची राजधानी प्राचीन काळापासून विशाळगड व भैरवगड येथे असून त्यांच्या ताब्यात (डफच्या मते) पुण्यापासून वारणेपर्यंतचा घाटमाथा व पलीकडील कोंकण होते. वरील प्रसंगानंतर १६ वर्षे मुसुलमान भीतीने कोकणात फिरकले नाहीत. उलट शिरके हे आपल्या आरमाराच्या बळावर त्यांना भेडसावीत होते. पुढे महंमद गवान यानें १४६९ त दाभोळ व चौल येथील सैन्याच्या व आरमाराच्या मदतीने शिरक्यांवर स्वारी केली. परंतु ५ महिने विशाळगडास वेढा देऊनही तो किल्ला पाडाव झाला नाहीं, तेव्हा तो परत फिरला. मात्र दुसर्‍या वर्षी गवानने विश्वासघाताने विशाळगड घेतला. फेरिस्ता म्हणतो की यापूर्वी हा किल्ला मुसुलमानांच्या हाती लागला नव्हता. इ.स. १४७८ त दख्खनच्या चार सरकारांचे (प्रांतांचे) आठ सरकार झाले तेव्हां उत्तर कोंकणचा प्रांत जुन्नर सरकारात जोडला गेला. यानंतर लगेच गोव्याच्या सुभेदाराचा मुलगा बहादूर गिलाने याने माहीम, साष्टी, दाभोळ, वसई वगैरे कोंकणचा भाग (हा गुजराथच्या शहाचा प्रदेश होता) जिंकला (१४९०). तो एक वर्ष त्याच्या ताब्यात होता. इकडे जुन्नर प्रांताचा सुभेदार अहंमद यानेही कोकणातील बरेच किल्ले सर करून दांडाराजपुरास वेढा दिला. पण तेथें त्याची डाळ शिजली नाही. तिकडे बेदरकडे गडबड झाली.
त्याचा फायदा घेऊन अहंमद याने अहमदनगर येथे निजामशाही स्थापन केली व १४९० त दांडाराजापूर घेतले. याच वेळी गिलानीनेही (मुंबई) माहीम जाळून गुजराथच्या शहाच्या आरमाराचा पराभव केला. तेव्हा महंमद बेगडागुजराथकर याने विजापूरकर व बेदरकर यांच्या मदतीने दाभोळवर स्वारी केली, त्यात त्याचे आरमार वादळात सापडून नाश पावले, परंतु सैन्यानें गिलानीशी कोल्हापुराजवळ लढाई दिली. तीत गिलानी ठार झाला. यावेळी गुजराथकर शहाच्या ताब्यात उत्तरकोंकण व ठाणे (राजधानी) होते. पण पुढे काही वर्षांनी पोर्तुगीजांनी हळूं हळूं तो प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. बहामनी राज्य मोडल्यावर कोंकणप्रांत आदिलशाही व निजामशाही यांच्यांत वाटला गेला. त्या दोहोंमधील सरहद्द सावित्री नदी होती असे म्हणतात; त्यामुळे चौल व दाभोळ ही बंदरे दोन्ही रियासतींत विभागली गेली. यावेळी कोंकणची स्थिती खालावलेली होती. ती सुधारण्याचा प्रथम प्रयत्‍न यूसुफ आदिलशहाने केला. शेतकर्‍यांच्यावरील सारा कमी करण्यात येऊन देसाई, देशपांडे व कुळकर्णी यांची वतने त्याने कायम केली. हबशी हे जंजिर्‍यांत राहावयास केव्हां आले हे निश्चित समजत नाही. ते १४९८ त आले अशी एक दंतकथा आहे. मलिकंबरच्या वेळी निजामशाहीच्या आरमारांत दोन हबशी आरमाराचे अधिकारी होते, त्यापैकी एकाच्या ताब्यात रायरी हे ठिकाण होते असे डफ म्हणतो. मुसुलमानी सैन्यांत व मोठमोठ्या हुद्द्यांच्या जागी बरेच हबशी होते. सोळाव्या शतकाच्या प्रारंभी कोंकणचे विभाग व महत्त्वाची ठिकाणे याबद्दलची माहिती पोर्तुगीज लेखांवरून पुढीलप्रमाणे आढळते :-  नागोठण्यापर्यंत गुजराथच्या शहाचा अंमल असून, श्रीवर्धन किंवा बाणकोटपर्यंत निजामशाहीचा ताबा होता आणि बाणकोटच्या दक्षिणेकडील गोव्यापर्यंतचा भाग आदिलशाहीच्या राज्यात मोडत असे. चौल व दाभोळ ही मोठी बंदरे असून ती सुरत व गोवें यांच्या बरोबरीची समजली जात. या वेळची दुसरी महत्त्वाची गांवें म्हणजे डहाणू, तारापूर, केळवेमाहीम, अगाशी, वसई, वांद्रे, माहीम, नागोठणे, श्रीवर्धन, जैतापूर व खारेपाटण ही होत. चौल व दाभोळ या मोठ्या व्यापारी पेठा असून इराण व तांबडा समुद्र यांजबरोबर त्यांचा बराच व्यापार चालत असे. हिंदुस्थानच्या किनार्‍यावरील सर्व ठिकाणचे लोक दाभोळ येथे जमत असत, असे निकितिन म्हणतो. सोळाव्या शतकांत तेथील वस्ती बरीच असून इमारती सुंदर होत्या आणि देवालये व मशिदीही बर्‍याच होत्या, असे पोर्तुगीज इतिहासकार म्हणतात. इ.स. १५४७ त तेथें तटबंदीचे दोन किल्ले होते. ते पुढे पोर्तुगीजांनी पाडून टाकले. त्यांनी गुजराथच्या शहाच्या ताब्यातील कोंकणचा बराचसा भाग हाताखाली घातल्यामुळे दिल्लीकर मोगलाला कल्याणाखेरीज महत्त्वाचा दुसरा भाग मिळाला नाही. निजामशाहीचे व फिरंग्यांचे (पोर्तुगीजांचे) बहुधा सख्य असे; आदिलशाहीची मात्र फिरंग्यांशी नेहमी कटकट होई. मलिकंबरच्या जमीनमहसुलीच्या पद्धतीने कोंकणच्या शेतकर्‍यांना पूर्वीच्या मुसुलमानी अमदानीपेक्षा जास्त सुखाचे दिवस गेले. त्याच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी हा कोकणीप्रांत आदिलशाहीत समाविष्ट झाला. त्यापूर्वीच निजामशाहीत शहाजी राजांनी उत्तरकोंकणांत स्वार्‍या करण्यास प्रारंभ केला होता व बरेचसे किल्लेही स्वतःच्या ताब्यांत आणले होते. त्यामुळे आदिलशाही व दिल्लीकर मोगल हे एक होऊन त्यांच्या मागे लागले. त्यांनी बरेच दिवस त्या दोघांनाही दाद दिली नाही. पण अखेरीस निजामशाहीतील फितुरीमुळे त्यांना स्वतंत्र सत्ता स्थापण्याचा प्रयत्‍न सोडून आदिलशाहीचे नोकर रहावे लागले. या आदिलशाहीत कोंकणची व्यवस्था पुढीलप्रमाणे होती. दाभोळ, अंजनवेल, रत्‍नागिरी व राजापूर हे प्रांत व तेथील कोट हे प्रत्यक्ष मध्यवर्ती सरकारच्या अंमलाखाली असत. याशिवाय उरलेल्या प्रांताचा कारभार देशमुखादि वतनदार हे वंशपरंपरेने पहात असत. कुडाळचे सावंत हे अशा देशमुखांत ठळक होते. दाभोळची सुभेदारी (जिल्हा) बरीच मोठी असून, तिचे मुख्य ठाणे विशाळगडजवळील प्रभानवल्ली या गावी होते; येथील ब्राह्मण सरदेसाई यांचे घराणे पुष्कळ वर्षांपासून तेथील वतनदार होते. याशिवाय आणखी दोन सुभेदार्‍या होत्या. कल्याणप्रांत (सुभेदारी) वैतरणी नदीपासून नागोठण्यापर्यंत असून तिच्यावर विजापुराहून सुभेदाराची नेमणूक होई. याशिवाय उरलेल्या सावित्रीनदीपर्यंतचा सर्व प्रदेश जंजिरेकर हबशाकडे असून त्याच्या ताब्यांत तळे, घोसाळे, रायरी हे किल्ले होते. मोंगलांचे (दिल्लीकर) व फिरंग्याचें विशेषसें तंटा भांडण होत नसे.  एकदां मोगलांनी सन १५८२ त फिरंग्याच्या दमण, डहाणु, व तारापुर या ठाण्यांवर हल्ले केले होते. परंतु अकबराच्या जनानखान्यातील एका फिरंगी नाटकशाळेच्या वजनानें त्यांच्यात लवकरच तह घडून आला असे जर्व्हिस म्हणतो (पृ. ८४). या नाटकशाळेच्या मार्फत फिरंग्यांना मोगलांकडून बराच मुलुख मिळाला असेही तो सांगतो. पुढे पुन्हा एकदा स. १६१२ त मोगलाने दमण, वसई व चौल यांना वेढा देऊन आसपासचा प्रांत उध्वस्त केला. तेव्हा फिरंग्यांनी त्यांना बराचसा नजराणा देऊन व काही प्रांत सोडून त्यांच्याशी तह केला. यापुढें मात्र त्यांचा परस्पर बेबनाव फारसा झाला नाहीं. अकबराप्रमाणेच शहाजहानने फिरंग्यांशी भांडण उकरून काढले नाही. कोकणात मुसुलमानी अवशेष फारच थोडे आहेत व तेही महत्त्वाचे नाहीत. कोकणातील बहुतेक मुसुलमान बाटलेले हिंदू असल्यानें त्यांचा पेहराव व भाषासुद्धा अर्धवट मराठी आहे. कांही मुसुलमानांत तर हिंदूंचे देव पूजेस ठेविलेले असून लग्नप्रसंगीही ते हिंदू विधी बराचसा पाळतात.

पोर्तुगीज अंमल— हिंदुस्थानचा मार्ग शोधून काढल्यानंतर पोर्तुगीज लोकांनी गोव्याच्या उत्तरेस १५०२ च्या सुमारास पहिली सफर केली असें म्हणतात. पुढे १५०८ त कांही पोर्तुगीज गलबतें लॉरेन्झो आल्मिडाच्या हाताखाली चौल येथील मुसुलमानी आरमारावर चालून गेली व त्याचा पराभव करून येथून तो दाभोळास गेला असतां तेथें निझामशाही अधिकार्‍याने त्याला व्यापाराची परवानगी दिली. मात्र गुजराथ व ईजिप्‍त येथील आरमारे एकत्र होऊन त्यांनी त्याचा पराभव केला. याप्रमाणे पोर्तुगीज लोकांना त्यांच्या पूर्वेकडील सर्व व्यापार काबीज करण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे प्रथमपासूनच शत्रू उत्पन्न झाले. कोंकणांतील चौल व दाभोळ या महत्त्वाच्या बंदरांवर त्यांचा डोळा होता. यावेळी आदिलशाही व निजामशाही यांच्यात भांडणे सुरू होती. कोंकण प्रांत त्यांच्या दोघांत विभागला गेल्याने तिकडे त्यांचा धुमाकूळ चाले व त्याचा फायदा पोर्तुगीज घेत. निजामशहाने चौल येथे त्यांना वखार घालण्याची परवानगी देऊन बंदरांत येणार्‍या जहाजांचे संरक्षण करण्याचे कामही त्यांना सांगितले. आदिलशहानें फिरंग्यांना ही सवलत दिली नसल्याने त्यांच्या ताभोळ बंदराला फिरंगी हे वारंवार त्रास देत. लुटालूट करण्याकरिता उत्तर कोंकणच्या किनार्‍यावर हल्ले चढवीत.  स. १५१७ त डीमटारोयो यानें वाड्यावर हल्ला करून तेथील मुसुलमान सुभेदाराचा पराभव केला. स. १५२९ तील एका स्वारींत त्याने नागोठणे, वसई, आगाशी ही बंदरे जाळून ठाणे, वांद्रे, कारंजे व साष्टी ही गावे काबीज केली. गुजराथच्या शहाबरोबरही यांच्या वारंवार चकमकी होत. यांचा सन १५२१ त व १५३० त असा दोन वेळा गुजराथकरांनी चौल येथे त्याचा पराभव केला. पुढे १५३३ त फिरंग्यांनी ८० जहाजे घेऊन वसईवर हल्ला करून तेथील तटबंदी पाडली व तारापूरापर्यंतची ठाणी जाळून टाकली. तेव्हा गुजराथच्या शहाने निजामशहाप्रमाणेच त्यांच्या संरक्षणाखाली आपले आरमार ठेवून त्यांना वसई देऊन टाकली. परंतु या दोघांतील स्नेह फारसा दृढ झाला नाही. पुढे १५४७ त फिरंग्यांनी आदिलशहाविरुद्ध निजामशहाशी व विजयनगरकरांशी तह केला आणि १५४८ त स्वारी करून गोवें ते श्रीवर्धन यांच्या दरम्यानची पुष्कळ गावें लुटली व जाळली. त्यांत दाभोळचें विशेष नुकसान केले. तेव्हां आदिलशहाने काही बंदरे त्यांच्या हवाली करून तह केला. तरी सुद्धां फिरंग्यांनीं तो न पाळतां त्याच्या मुलुखाची पुष्कळदा नासाडी केली. त्यांनी १५४८ मध्येंच वसई येथे एक धर्मशिक्षणाची पाठशाळा काढून आपले धर्मोपदेशक वसई, ठाणे व चौल येथे पाठविले. स. १५६० त फ्रान्सिस्कन् धर्मोपदेशकांनी कान्हेरी व मंडपेश्वर येथें रहाणार्‍या हिंदू साधु व योगी यांनां घालवून तीं ठिकाणें आपल्या ताब्यांत घेतली.  घारापुरी, कान्हेरी व मंडपेश्वर ही स्थाने हिंदू लोक पवित्र मानीत, म्हणून तेथील खोदकामाचा नाश करण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला. मंडपेश्वर येथील गुहेच्या जागी त्यांनी ख्रिस्ती देऊळ बांधले आणि साष्टी येथे जुलुमाने ख्रिस्ती केलेल्या लोकांच्या मुलांना धर्मशिक्षण देण्याकरिता एक पाठशाळा स्थापिली व तिच्या खर्चास त्या प्रांतांतील हिंदुधर्माच्या संस्थेचे पूर्वापार चालत आलेले वतनांचे उत्पन्न लावून दिले. पुढे क्रमाक्रमाने बहुतेक सर्व सत्ता या ख्रिस्ती भटांच्या हातात आली. इकडील या ख्रिस्ती धार्मिक संस्थांचे उत्पन्न इकडील फिरंगी राज्याच्या एकंदर उत्पन्नापेक्षाही जास्त झाले. गोवें येथील यांच्या धर्मविचारणी सभेची (इन्क्विझिशन) सत्ता उत्तर कोकणात सर्वत्र चालत असे. वाटेल त्या माणसाला पकडण्याचा तिला अधिकार असे. हा तिचा अधिकार इतका अमर्यादित होता की प्रसंगी त्याला लिस्बन येथील दरबारची व मुख्य धर्मविचारिणी सभेची मंजुरी मिळाल्यास खुद्द गोव्याचा फिरंगी सुभेदार (गव्हर्नर) व ख्रिस्ती जगद्‍गुरू (आर्चबिशप) यांनाही तिला पकडता येई. या अमर्यात सत्तेमुळे ख्रिस्त भटांनी पुष्कळ हिंदू लोकांस जुलुमाने बाटविलें व त्यांच्यावर अनेक अत्याचार केले. अशा बाट्या लोकांची संख्या (१८ व्या शतकांत) ६० हजारांपेक्षा जास्त होती असे म्हणतात. इ.स. १५५५ त फिरंगी सुभेदाराने हुकूम काढून वसई प्रांतांतील सार्वजनिक व खासगी देवळात हिंदूस पुजेची मनाई करून ब्राह्मणांकडून होणारे वेदपठण, होमहवन, सणांचे सार्वजनिक उत्सव वगैरे बंद केले. हिंदु लोक मूर्तिपूजा करितात कीं काय व मनाई केलेले धार्मिक विधी पाळतात की काय हे पहण्याकरितां त्यांच्या घरांच्या झडत्या घेत. त्यावेळी जर एखाद्याच्या घरांत मूर्ति सांपडली किंवा कोणी मनाई केलेला धार्मिक विधी पाळतांना आढळला तर त्या माणसाला फाशी देत आणि त्याची सारी मालमत्ता जप्‍त करून ती अर्धी पाद्री भटांस व अर्धी अशी बातमी देणारास वाटून देत. यापुढे तर इ.स. १५९४ त रोमचा पोप व पोर्तुगालचा राजा यांनी हिंदुलोकांस जुलुमानें बाटविण्याचे हुकूम पाठविले. त्यामुळे इकडील पाद्रीभटांनी अनेक देवळांचा नाश करून वसई प्रांतातील लोकांस लुटण्याचा व अनेक युक्त्या प्रयुक्त्या करून त्यांना बाटविण्याचा धूमधडाका सुरू केला. एखाद्या विहिरीत पावाचा तुकडा टाकून सबंध गावचा गांव बाटवीत असे म्हणतात. अशा प्रकारे धर्मच्छलाचा अतिरेक झाल्यामुळे सर्वत्र असंतुष्टता उत्पन्न झाली. त्यामुळे पुढे फिरंग्यांचे जे उच्चाटन या भागातून झाले, त्यास हे एक विशेष कारण होते असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. फिरंग्यांनी किनार्‍यावरील बहुतेक प्रांत १५६० पर्यंत काबीज केली. फार आंत जाण्याचा त्यांचा बेत नव्हता, कारण त्यांची आयात थोडी होत असे. यासाठी अल्बुकर्कने एक युक्ती काढली; त्याने गोव्यांतील हलक्या जातीतील बायका-मुलींना बाटवून व त्यांनां जमिनी देऊन त्यांची लग्नें आपल्या फिरंगी शिपायांबरोबर लावून दिली. या बाट्यांच्या वंशंजांचा धर्म ख्रिस्तीच बनला आणि अधिकाराच्या जागा वगैरे कारणांमुळे त्यांचा ओढाहि फिरंग्यांकडेच वळळा. या वेळी फिरंग्यांच्या ताब्यांतील प्रांतांत सुपीक भाग पुढील ठिकाणीं होता. रेवदंडा (नवे चौल), वसई व आगाशीमधील भाग वगैरे. दाभोळास त्यांची फक्त वखारच होती. इ.स. १५५६ त अशेरी व मनोर हे किल्ले त्यांनी घेऊन पुढे लवकरच पुष्कळ दिवसांपासून डोळा असलेले दमण व तारापूरचा किल्ला (व गांव) घेतला. इ.स. १५५९ त हबशांनी संजाण व तारापुरावर हल्ला केला. परंतु त्यांत त्यांचा पराभव झाला. फिरंग्यांनी १५६९ व १५८३ त दोनदा कोळी लोकां (जव्हार)वर स्वार्‍या केल्या; परंतु दोन्ही वेळा त्यांचे फार नुकसान होऊन परास्त होऊन परत यावे लागले. यावेळी ते वैतरणीच्या काठावरून घाटाच्या पायथ्यापर्यंत गेले होते असे म्हणतात. १५६० त आदिलशहा व निजामशहा एक होऊन त्यांनी फिरंग्यांवर चढाई करून गोवे व चौल येथे वेढे दिले, परंतु त्यांना यश आले नाही. रेवदंड्यास मुर्तुजा निजामशहाने वेढा दिला असता, त्याच्याच अधिकार्‍यांनी फितूर होऊन फिरंग्यांना समुद्राकडून वसईच्या सैन्याची कुमक मिळू दिल्यामुळे निजामशहाने वेढा उठविला. फिरंग्यांनी निजामशहाच्या कल्याणवर याच वेळी हल्ला चढविला होता व त्या सर्व भागात जाळपोळ व लुटालूटही केली होती. त्यामुळे या वेळी तह होऊन निजामशहा परतला; पण पुन्हां १५९२ त या दोघांत लढाई सुरू होऊन मुसुलमानांनी रेवदंड्यावर वारंवार हल्ले केले. तेव्हा फिरंग्यांनी त्यांना चौलखाडीच्या तोंडावरील कौले किल्ल्यात कोंडून त्यांचा पराभव केला व चौलखाडी ताब्यांत घेतली. यानंतर आदिलशाही व निजामशाही यांच्याकडून फिरंग्यांना विशेष त्रास झाला नाही; तथापि इ.स. १६०९ त चौलच्या मुसुलमान सुभेदाराने एक छोटेसे आरमार त्यांच्यावर पाठविले होते. इ.स. १५६० पर्यंत हिंदुस्थानात फिरंगी सत्तेची बाल्यावस्था इ. १५६०-१६०० पर्यंत तारुण्यावस्था व पुढे वृद्धावस्था झाली, असे फिरंगी इतिहासकार म्हणतात. त्यांचा उत्कर्ष जितका जलद व आश्चर्यकारक रीतीने झाला तितकाच त्यांचा र्‍हासही लवकर झाला व एखदा र्‍हासास प्रारंभ झाल्यावर त्यांची स्थिती पुन्हा सुधारली नाही. सतराव्या शतकानंतर त्यांनी चढाईचे धोरण स्वीकारल्याचे अथवा नवीन प्रदेश मिळविल्याचे ऐकण्यात नाही. आसपासच्या सत्ताधार्‍यांनीही त्यांच्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे सांप्रतचा प्रांत त्यांच्या ताब्यांत राहिला. येथपर्यंत कोंकणच्या व्यापारांत त्यांचे वर्चस्व होते. यापुढे मात्र इतर युरोपियन लोक व मलबारी चांचे यांचा त्यांना उपसर्ग होऊं लागला. इ.स. १६१५ त जहांगीर बादशहाशी त्यांनी केलेल्या तहांत दोघांनीही इंग्रज व डच यांना शत्रू समजून चाच्यांचा नाश करावा असे एक कलम होते. त्यावेळी गोव्यांच्या अधिकार्‍याची परवानगी घेतल्याशिवाय कोणालाही इराण व तुर्कस्तानच्या मार्गाने युरोपला जातां येत नसे असे म्हणतात. (डी ला व्हॅले पु. ३. पृ. ४०२-०६). डच लोकांनी नवीन वसाहती स्थापण्यापेक्षा पोर्तुगीजांच्या असलेल्या वसाहतीच काबीज करण्याकडे विशेष लक्ष घातले व ते त्यांना सोपे गेले. कारण फिरंग्यांच्या अतीशय धार्मिक छळाने हिंदूलोक त्रासून गेले होते व ते त्यांचे द्वेष्टे बनले होते. डचांनी स. १६३९ ते ४२ पर्यंत गोव्यास वेढा दिला होता. परंतु तिकडे यूरोपमध्ये त्या राष्ट्रात संधी झाल्यामुळे त्यांनी तो उठविला. या डचांनी स. १६४१ पूर्वी वेंगुर्ले येथे एक वखार उघडली होती. आदिलशहाने त्यांना आपल्या दाभोळ वगैरे बंदरातील आरमाराचें संरक्षण करण्याचे काम सांगितले होते. परंतु ते त्यांनी पत्करिले नाही. साधारणतः डच लोकांना कोकणात वसाहत करण्याची विशेष उत्सुकता वाटली नाही. स. १६६१ त फिरंग्यांनी मुंबई बेट हे इंग्रजांस (आंदण) दिले. पुढे १६६३ त डच लोकांनी फिरंग्यापासून कोचीन घेतल्यानंतर झालेल्या तहान्वये फिरंग्यांचे व्यापारी वर्चस्व समूळ नष्ट झाले; आणि डच लोकांनाही त्यानंतर इंग्रजांपुढे हार खावी लागली. कोकणात फिरंग्यांचे मुख्य अवशेष वसई व खालचे चौल (रेवदंडा) येथे आहेत. साष्टी बेटांत व वसई, रमेदी, ठाणे येथे त्यांची बरीचशी प्रार्थनामंदिरे असून ठाणे व कौले येथे त्यांनी बांधलेले किल्ले आहेत; याशिवाय अरब व चाचे आल्याची सूचना देण्याकरिता उंचवट्याच्या जागी ठिकठिकाणी त्यांनी बुरुज बांधलेले अद्यापि कायम आहेत; असला एक मोठा बुरुज मुंबईच्या मलबार टेकडीवरून दिसतो.

मराठ्यांची कारकीर्द:- कोकणाला अलीकडील काळांत जे महत्त्व आले, ते शिवाजीमहाराजांच्या वेळी प्राप्‍त झाले. त्या सुमारास दक्षिणेस सावंतवाडी व उत्तरेस जव्हार ही (जंजिरा धरून) संस्थाने होती. महाराज हे जरी कोंकणचे रहिवासी नव्हते तरी मुसुलमानी सत्तेला तोंड देतांना सह्याद्रीची पाठ व कोंकण यांचा उपयोग करून घेतल्यास पुष्कळ फायदा होईल हे त्यांनी थोड्याच दिवसांत ताडले. त्यांचा सरदार राघोबल्लाळ याने बहुतेक कोंकण हस्तगत केले होते; व अण्णाजी दत्तो सचीव यांनी कोंकणच्या जमिनीची मोजणी करून सुव्यवस्थित धारे बसवून प्रजेस सुखी केले होते. महाराजांनी आपल्या वयाच्या २०-२१ व्या वर्षीच कोकणाकडे हालचाली सुरू केल्या. प्रथम रायरी घेऊन तेथें रायगड हा मजबूत किल्ला बांधून ती आपली राजधानी केली. नंतर कल्याणप्रांत (आदिलशहाचा) युक्तीने काबीज केला व पुढे बिरवाडी आणि लिंगाणा हे दोन किल्ले बांधले. दख्खनमधून कोंकणांत येण्याचा प्रसंग आल्यास सुरक्षित येता यावे म्हणून त्यांनीं वाई-महाड रस्त्यावर प्रतापगड बांधून औरंगझेबाकडून सर्व कोंकण ताब्यांत घेण्याच्या परवानगीच्या मिषाने १६५८ च्या सुमारास किनार्‍यावरील ओसाड किल्ले व मार्‍याच्या जागा काबीज करण्याचा सपाटा चालविला. नंतर शिद्दीच्या मुलुखावर व सावंतावरही स्वारी केली. तेव्हा सावंतांनी महाराजांशी तह केला. परंतु अखजलखानाच्या धामधुमीत सावंत हे आदिलशहास मिळून खालून त्यांनी व वरून शिद्दीने व उजवीकडून आदिलशहाने महाराजांवर चढाई केली. तेव्हा त्या सर्वांना त्यांनी नामोहरम केले; मात्र सावंत शरण आल्याने त्यांना त्यांचा प्रांत बहाल केला. पुढे सर्व कोंकणकिनार्‍याची पाहणी करून आरमार वाढविले व ते ठेवण्यास मालवण ही जागा सुरक्षित पाहून तेथें किल्ला व गोदी बांधली. नंतर सुवर्णदुर्ग, रत्‍नागिरी, जयगड, अंजनवेल, विजयदुर्ग व कुलाबा येथे कोठे नवीन किल्ले बाधले व कोठे जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती केली आणि कुलाबा येथेही आरमाराचे मुख्य ठाणे करून सिदोजी गुजर यास आरमारी सुभा सांगितला. रायगडची मात्र फार मजबुती केली. त्यामुळे तो किल्ला त्यावेळी अजिंक्य म्हणून समजला जाई. डफनें तर त्याला पौर्वात्य जिब्रालटर असे म्हटले आहे. पुढे १६६३-६४ मध्ये महाराजांनी कोंकणवर स्वार्‍या करून वेंगुर्ले जाळून लुटले व मालवणचे आरमार जमवून व स्वतः आधिपत्य स्वीकारून बार्सिलोर पर्यंत स्वारी केली व बरीच लूट मिळविली. परत येताना वारा प्रतिकूल लागल्याने आरमाराला येण्यास बराच काळ लागला, इकडे त्याच सुमारास देशावर मोगलांची स्वारी झाली तेव्हां (जयसिंगाशी) जो तह झाला त्यांत कोंकणामधील बरेचसे किल्ले महाराजांनी मोगलाला दिले. आग्र्याहून परत आपल्यानंतर पुन्हा त्यांनी कल्याणप्रांत व मोगलांचा उत्तर कोंकणांतील प्रांत हस्तगत करून इ.स. १६६८ त गोवे व जंजीरा प्रांतावर चढाई केली. माहुली किल्ल्यास मोरोपंतांनी दोन महिने वेढा देऊन तो घेतला. तेव्हा कर्नाळाही सहज हस्तगत झाला. याच वेळी मोगल व हबशी यांच्याशी महाराजांच्या बर्‍याच दर्यावर्दी लढाया झाल्या. पुढे १६७० त त्यांनी उत्तर कोकणात मोठे आरमार पाठवून पोर्तुगीजांचे एक मोठे जहाज पकडून आणिलें. शिंद्याचा डोळा दांडाराजपुरावर होता. त्यामुळे त्याने महाराजांच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन (१६७२) त्या स्थळावर हल्ला करून तेथील तटबंदी मोडून आसपासचे कांही किल्ले सर केले. या कामी त्याला मोगलांचे पाठबळ होते, म्हणून महाराजांनी आरमार देऊन मोरोपंतांना सुरतेवर पाठविले. त्याचवेळी त्यांनी वसई-डहाणूच्या भागांतील जव्हारकराकडील बरीचशी ठाणी काबीज करून फिरंग्यांचा घोडबंदर किल्लाही घेण्याचा प्रयत्‍न केला. पुढे १६५३ त शिद्दी व मोगल नागोठण्याच्या आसपासची गावे उध्वस्त करून लोकांना गुलाम करून नेत असता, महाराजांनी अचानक त्यांच्यावर सैन्य धाडून त्यांचा पुरा मोड केला. बहुधा १६६१ पासून मधून मधून महाराजांनी जंजिर्‍यास वेढा घालण्याचा उपक्रम सुरू केला होता. त्याप्रमाणे १६७५ तही घातला असता दुसरीकडेही गोव्याकडील फोंडा किल्ल्यावर त्यांनी स्वारी केली. कर्नाटकात महाराज गेले त्यावेळी सर्व कोंकणचा राज्यकारभार त्यांनी अण्णाजी दत्तो सचिवांकडे सोपविला असता त्याने जिल्ह्यानिहाय अधिकारी नेमून जमाबंदी केली; ती न्यायाच्या व समतेच्या तत्त्वावर केली होती, असे इंग्रज इतिहासकारही म्हणतात (जर्व्हिस ९३, मुंबई ग्याझे. पु. १ भा. २. ७१). या वेळीसुद्धा मराठ्यांच्या दर्यावरील हालचाली सुरूच होत्या. पुढे १६७१ त महाराजांनी मोगलांचा सुरतेपर्यंतचा प्रदेश लुटून खांदेरी बेट घेतले. त्या बेटावर इंग्रज व पोर्तुगीज हे दोघेही हक्क सांगत. इंग्रजी आरमार तेथें असताना त्याचा डोळा चुकवून मराठ्यांनी बेट घेतले. तेव्हा इंग्रज चालून असता असता मराठ्यांनी त्यांचा सर्वांचा फन्ना उडविला (मराठे व इंग्रज २८). या वेळी इंग्रजांस गुप्‍तपणे मदत करणारा शिद्दी त्यांना उघडपणे मिळाला होता. त्या दोघांनी पुष्कळ दिवस खांदेरीस वेढा दिला, परंतु त्यांचा प्रयत्‍न निष्फळ झाला; इकडे उलट १६८० च्या जानेवारीत एकदम महाराजांनी शिंद्याचे उंदेरी बेटही काबीज केले व तेथें तटबंदी बांधली. शेवटी नाइलाजाने इंग्रजांने महाराजांशी तह केला व शिंद्याला मुंबई बेटावर येऊं न देण्याचे कबूल   केले. स. १६७२ त दाभोळ व कल्याण ही गावे बरी होती, असे फ्रायर लिहितो. या वेळी वसई व राजापूर ही बंदरे भरभराटीची होती; तसेच महाड हे रायगड राजधानीजवळ असल्याने बरेच वाढून व्यापाराची मोठी पेठ बनले होते. कल्याण ते रायगडमधील प्रांताला मात्र लढायाच्या मुळे बराच उपसर्ग पोहोचे, परंतु बकीचे कोंकण सुस्थितीत होते, असे इंग्रज इतिहासकार कबूल करतात (बाँबे ग्याझे. व्हा. १ भा.र.पृ. ७३) महाराजांची जमीनमहसूलपद्धती पूर्वीच्या पद्धतीपेक्षा श्रेष्ठ प्रकारची होती; तसेच बहुतेक सर्व प्रकारच्या लोकांना लष्करात दाखल होऊन उदयास येण्याची संधी मिळे. नुसत्या किल्ले बांधण्याच्या कामावर हजारो लोक कित्येक वर्षेपर्यंत पोट भरीत. महाराजांच्या समकालीन असलेल्या ख्रिस्ती अथवा मुसुलमान राजापेक्षा ते श्रेष्ठ असून त्यांच्या कारकीर्दीत कोंकण जितके भरभराटीत होते, तितके ते ऐतिहासिक काळांत बहुधा केव्हाही नव्हते, ही गोष्ट इंग्रज इतिहासकार व काफीखान यांनीही कबूल केली आहे. कोकणातील किल्ल्यांचा व महाराजांचा बराच संबंध येत असल्याने त्यांच्याबद्दल येथे त्रोटक वर्णन सांगतो. बहुतेक सर्व किल्ले निसर्गसिद्ध सोयी पाहून बांधलेले असत. समुद्रकिनार्‍यास असलेला किल्ला जलवेष्टित कड्यावर असे. मैदानी किल्ला नदीच्या किंवा घाटांच्या जवळील एखाद्या उंच पहाडावर असे व सह्याद्रीच्या रांगेतील किल्ला त्याच्या एखाद्या दुर्गम कड्यावर किंवा सोंडेवर असे. किल्ल्यांची रचना बहुतेक सारखीच असे. भोंवती मोठा तट व तटास बरेचसे बुरुज असत. तटास बहुधा एकच वेस असून वेशीजवळील तटाचा भाग फार मजबूत असे. वेशीपाशी दोन बुरुज असून तेथून आंतील दुसर्‍या वेशीपर्यंत अरुंद, वळणावळणाने गेलेली व दोन्ही बाजूला उंच तट असलेली अशी वाट असे. त्यावेळी हल्लीप्रमाणे महांकाळी (हॉवित्झर) तोफा नसल्याने या किल्ल्यांचा फार उपयोग होई. मुख्य तटाच्या आत एक बालेकिल्ला असे व त्या भोवती शिपायांच्या कोठड्या, दारूगोळ्यांची कोठारे व पागा वगैरे असत. महाराजांनी बांधलेल्या बहुतेक किल्ल्यांत एक देवीचे व मारुतीचें अशी देवळे असत. अशा किल्ल्यांत विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, मालवण, पद्मगड, रायगड, विशाळगड वगैरे किल्ले महत्त्वाचे असून पद्मगडास महाराजांचा जहाजे बांधण्याचा कारखाना होता. कुलाबा व मालवण येथे आरमाराची मुख्य ठाणी होती. महाराजांच्या मृत्यूनंतर वाडीच्या सावंताने कर्ली नदीच्या दक्षिणेकडील मुलुख काबीज केला. परंतु संभाजीराजे गादीवर आल्यानंतर त्यांनी सावंतांनी घेतलेला प्रांत परत मिळविला. कलुशाला कोंकणच्या जमीनमहसुलीचे काम मिळाले असता त्याने काही नवीन कर बसवून मामलती मक्त्याने देण्याची रीत पाडली. खांदेरी-उंदेरीबद्दल संभाजीराजे व शिद्दी यांत पुष्कळ दिवस भांडण चालू होते. औरंगझेबाचा मुलगा अकबर हा राजे यांच्या आश्रयास आला होता. त्यामुळे औरंगझेबाने १६८२ च्या सुमारास संभाजीराजांच्या कोंकण किनार्‍यावर आरमार पाठवून धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली; पण त्यांत त्याचाच पराभव झाला. तेव्हां औरंगझेबाने पुन्हां १६८४ त बहादुरखान व सुलतान मुआझिम यांच्याबरोबर प्रचंड सैन्य (नुसते घोडदळ ४० हजार असून बाकी पुष्कळ पायदळ होते असे आर्म म्हणतो) देऊन दक्षिण कोकणात पाठविले. एवढी थोरली स्वारी दक्षिण कोकणात यापूर्वी व यानंतर क्वचितच झाली असेल. संभाजीराजांनी या स्वारीला समोरासमोर तोंड न देता गनिमी पद्धतीने लढाई सुरू ठेविली. आपण स्वतः विशाळगडी राहून शत्रूची रसद लुटून त्यांच्या एकट्या दुकट्या टोळीचा फन्ना पाडण्याचा उपक्रम सुरू केला. मुसुलमानांनीही किल्ले घेण्याच्या अवघड कामास हात घातला नाही. कारण प्रत्येक किल्ल्यावर शिबंदी वगैरे तयारी जय्यत असे. वाटेत मुसुलमानांचे बहुतेक घोडे, गुरे, ढोरे मेली व अन्नाची टंचाई फार झाली. शिवाय त्यांची सगळीकडची रसद मराठ्यांनी मारल्यामुळे त्यांना नारळ व कुडू नावाच्या अगदी हलक्या धान्यावर निर्वाह करावा लागला. सुरतेहून येणारी सामानसुमानाची व धान्याची जहाजेही मराठ्यांनी लुटली. तेव्हा मोठ्या नामोशीने काही एक कार्यसिद्धि न होता मुआझिमला परत फिरावे लागले. या संधीस फिरंग्यांनी कारंजे अशेरी व सांताक्रूस ही ठिकाणे मराठ्यांपासून घेतली. म्हणून संभाजीराजे व शहाजादा अकबर यांनी फिरंग्यांचा कल्याणजवळील मुलुख उध्वस्त करून वसईस वेढा दिला. तेव्हा त्यांनी तह केला. यापुढे तीन-चार वर्षे कोंकणात विशेष काही घडले नाही. आदिलशाही नामशेष झाल्याने तिच्या ताब्यातील कोंकण मोगलांकडे आले. संभाजीराजे यांच्या फिरंगी, हबशी व सावंत यांच्याशी नेहमी झटापटी होत असत. शेवटी इ.स. १६८९ त शिरके यांनी काही गडबड केल्यामुळे ती मोडण्यास कलुशा संगमेश्वरास गेला असता त्याच्या मदतीस म्हणून संभाजीराजे खेळण्याहून तेथें गेले त्यावेळी शेख निजामाने त्यांना दग्याने पकडून औरंगझेबाकडे पाठविले. संगमेश्वर येथे कलुशांचा वाडा होता. हल्ली त्याचा नुसता चौथरा दृष्टीस पडतो. संभाजीराजांचा शेवट झाल्यानंतर मोगलाने सात महिने वेढा देऊन शेवटी फितुरीने रायगड घेतला व येसुबाईसाहेब व शाहुराजे यांना औरंगझेबाकडे पाठविले. यापुढे रायगडचे महत्त्व नाहीसे झाले ते झालेच. या सुमारास औरंगझेबाने शिद्दीला कोंकणांतील त्याच्या प्रांताची सनद करून दिली. शिंद्याने सुवर्णदुर्ग, अंजनवेल, राजपुरी व रायगड हे किल्ले इ.स. १६९९ च्या सुमारास घेतले. परंतु मराठ्यांचे आरमार या वेळी प्रबळ झाल्याने व त्यांचा आरमाराधिपती कान्होजी आंग्रे हा असल्याने त्यांनी शिंद्याकडील बराचसा प्रांत परत मिळविला. आंग्र्यांचे मुख्य ठिकाण कुलाब्यास असून सुवर्णदुर्ग व विजयदुर्ग हे त्यांचे मुख्य सुभे होते. तेथें दारूगोळ्यांची मुख्य कोठारे, आरमारी लष्कर, जहाजे बांधण्याच्या गोद्या वगैरे असत.  या काळी मराठ्यांचे आरमार सर्व आरमारांत प्रबळ असून युरोपीय अगर मुसुलमानी कोणत्याही व्यापारी गलबतास मराठ्यांना झडती दिल्याशिवाय किनार्‍यावर फिरकता येत नसे; कान्होजीला हे यूरोपियन व मुसुलमान चळचळा कापत असत. मोगलांच्या ताब्यातील प्रांतात सामान्यतः जुलूम, पुंडाई व बेबंदशाही होती. इ.स. १६९० त काकाजी या पाळेगाराने तिकडे लुटालूट चालविली होती व शिद्दी हा इंग्रजांच्या मागें लागला होता आणि औरंगझेबाने फिरंग्याचा पिच्छा पुरविला होता. परंतु पुढे त्यांच्याकडून बंदुका घेण्याच्या अटीवर त्याने तह केला. मराठे व फिरंगी यांचेही इ.स. १६९५ त कडाक्यांचे युद्ध झाले. याच सुमारास (विशेषतः इ.स. १६९७ साली) कप्तान किड या नावाचा एक इंग्रज सर्व कोंकणभर चाचेगिरी करीत होता. तो अतिशय दुष्ट व जुलमी होता.

राजाराम महाराजांनी कोकणात सुव्यवस्था लावण्याचा प्रयत्‍न केला; परंतु शिद्दी व मोगल यांच्या स्वार्‍यांमुळे व देशांत स्वस्थता नसल्याने त्याचा विशेष उपयोग झाला नाही. फिरंग्याच्या अंगी स्वतःचा मुलुख सांभाळण्याची ताकद नव्हती. शिंद्याला आपल्या प्रजेच्या हालअपेष्टांची दाद नसे. यामुळे त्याच्या प्रांतांत व्यापार मंदावला. त्यावेळचा एक उल्लेख असा आढळतो की, मुंबईहून निर्गत होणार्‍या मालावर इंग्रज शे. ५ टक्के, ठाण्यास फिरंगी शे. ८ टक्के व कल्याणास मोगल आपल्या लहरीप्रमाणे वाटेल तशी जकात वसूल करीत. शाहू महाराज देशी आल्यावर व रांगण्यावर चालून गेल्यावर ताराबाई या मालवणास जाऊन राहिल्या होत्या. यावेळी कान्होजी आंग्रे फार प्रबळ होता. त्याने सर्व युरोपियनांचा नक्षा पार उतरून टाकला होता. मुंबई ते सावंतवाडीपर्यंतचे सारे कोंकण त्याच्या ताब्यात होते. तो प्रथम शाहूराजे यांच्या विरुद्ध होता. परंतु पुढे इ.स. १७१३ त पेशव्यांनी त्या दोघांचा समेट करून दिला. त्यावेळी कान्होजीला सरखेल का किताब व बराच सरंजाम मिळाला. लागलीच तो व बाळाजी विश्वनाथ यांनी मिळून शिद्दीवर स्वारी करून त्याने बळकाविलेला सारा मुलुख सोडविला. इंग्रजाने कान्होजीविरुद्ध इ.स. १७१७ च्या एप्रिलात विजयदुर्गास वेढा घातला. त्यावेळी इंग्रजांचे आरमार मोठे करोल होते. त्यावर १४८ तोफा व व्हिक्टरी, रिव्हेंज, हंटर अशी याच स्वारीसाठी २ वर्षे खपून बांधलेली मजबूत लढाऊ जहाजे व सुसज्जित असे ६ हजार सैन्य होते. परंतु कान्होजीने त्याचा खरपूस समाचार घेतला. तेव्हां त्याच्या मार्‍यापुढे "नामोहरम होऊन (इंग्रजांस) मुठीत नाक घेऊन आरमारासह मुंबईस परत यावे लागले" (सरदेसाई. मरा. रिया. मध्य विभा. पृ. ६५). पुढे पुन्हां प्रचंड तयारी करून फिरंग्यांची मदत घेऊन इ.स. १७२१ त इंग्रज कुलाब्यावर चालून आला. "परंतु पूर्वीप्रमाणेच त्यास याही प्रसंगी हार खावी लागली. कान्होजी आंग्रे जिवंत असेपर्यंत या पाश्चात्यांचा शिरकाव पश्चिम किनार्‍यावर झाला नाही'' (कित्ता). स. १७२० साली मराठ्यांचे स्वराज्य दिल्लीकर मोगलाने कबूल केल्यामुळे कोंकणचा समावेश स्वराज्यात झाला आणि त्यापुढे मुसुलमानांची त्यावर सत्ता उरली नाही. मराठ्यांचे निरनिराळे अधिकारी कोंकणचे निरनिराळे सुभे पाडून त्यांवर नेमण्यांत आले. कोल्हापूर व सातारा या राज्यांची वाटणी झाली. त्यांत विजयदुर्गच्या दक्षिणेकडील कोंकण कोल्हापूरकरांच्या ताब्यात गेले. कान्होजी आंग्रे यावेळी वारला असल्याने व त्याच्या मुलांत तंटे सुरू झाल्यामुळे, त्याच्या प्रांतांत अव्यवस्था माजली. इ.स. १७३३ त मराठ्यांनी शिद्दीवर स्वारी केली तेव्हा शिंद्याचा व इंग्रजाचा दोस्तीचा तह झाला. एकंदर मराठी साम्राज्याविरुद्ध हा तह केला नव्हता. बाह्यात्कारी मराठ्यांपासून शिंद्याचें संरक्षण करणें असा त्यांत हेतू दर्शविला होता खरा; परंतु शिंद्यांच्या मुलुखांतून गोमांस बिनहरकत आपणांस मिळावे (कारण आसपासच्या हिंदुराजांच्या राज्यांतून ते मिळणे अशक्य होते) हा त्यांत इंग्रजांचा अंतस्थ हेतू असावा. यानंतर शिंद्यांच्या घरात तंटे सुरू झाले. त्याचा फायदा घेऊन पेशव्यांनी रायगड, तळे, घोसाळे वगैरे गेलेला बराच मुलुख परत मिळविला. यावेळी इतर शत्रू नाहीसे होऊन फक्त फिरंगी काय ते उरले होते; त्यांना नामोहरम करून सर्व कोंकण मराठी साम्राज्याखाली आणण्याची संदी आली होती व तिचा फायदा पेशव्यांनी घेतलाही. फिरंग्यावर हल्ला करण्यास कारणेही भरपूर होती; ते मराठ्यांची वारंवार आगळीक करीत, आंग्र्याच्या घरगुती भांडणांत हात घालीत आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या ताब्यांतील व मराठी हद्दीतील हिंदुलोकांवर जुलूम करून त्यांना बाटवीत आणि गावांची जाळपोळ व लुटालूट करीत. या सर्व कारणांमुळे पेशव्यांनी त्यांची खोड मोडण्याच्या प्रयत्‍नास यावेळी हात घातला. इ.स. १७३९ पूर्वी ८।१० वर्षे मराठी दरबारांत फिरंग्यापासून वसई व साष्टी प्रांत काबीज करण्याचे खलबत चालू होते, असे उपलब्ध पुराव्यावरून दिसते. रा. ब. पु. बा. जोशी आपल्या लेखांत म्हणतात की, "मालाड परगण्याचे सरदेसाई व सरदेशमुख अंताजी रघुनाथ कावळे यांनी फिरंग्यांचा धर्मच्छलांचे गार्‍हाणे थेट पेशवे व शाहूमहारजा यांच्या कानी घातले होते. वसई प्रांत काबीज केल्यास आपण मदत करण्यास तयार आहों, असे या कावळ्यांनी थोरल्या बाजीरावसाहेबांना कबूल केले होते. स. १७२९ साली श्रीमंतांनी अंताजीपंतांशी खलबत सुरू केले. पुढे चिमाजी आप्पांनी अंताजीस कळविले की, "अवघा प्रसंग तुम्ही आणून दिला आहे. कार्यही कर्तव्य आहेच.'' परंतु त्यावेळी श्रीमंत दुसरीकडे गुंतल्याने हे काम झाले नाही; ते १७३७ त फुरसत सापडल्यावर त्यांनी हाती घेतले." त्यावर्षी आप्पासाहेब यांनी साष्टीवर स्वारी करून घोडबंदर व वसईची खाडी काबीज करून ठाणेही घेतले. तेव्हां मराठे हे मुंबईवरहि चालून येतील अशी भीती वाटून इंग्रजांनी फिरंग्यांच्या अनुमतीने वांद्र्याचा किल्ला पाडला. त्यांनी फिरंग्यास दारूगोळ्याची व सैन्याचीही मदत केली. परंतु मराठ्यांपुढे तिचा उपयोग झाला नाही. पुढे १७३९ चे जानेवारीत आप्पासाहेब हे सेनापती होऊन फिरंग्यांवर चालून आले व त्यांनी एका सपाट्यात डहाणू, केळवे, शिरगांव, तारापूर, खत्तलवाडा ही ठाणी किल्ल्यासुद्धा जिंकली. ते पाहून वेसावा व धारावी येथील किल्लेदारांनी शरण येऊन ते किल्ले आप्पासाहेबांच्या हवाली केले. या वेळी उत्तरेस नादिरशहावर चालून जाण्यास श्री. नानासाहेबांनी आप्पांना बोलाविले होते; परंतु त्यांनी इकडे वसईस वेढा दिला असल्याने ते तिकडे गेले नाहीत; मध्ये वेढा १७ फेब्रुवारी १७३९ स बसला. तेव्हा फिरंग्याने इंग्रजांची मदत मागितली; परंतु मदत पाठविण्यास इंग्रजांची छाती झाली नाही. समुद्राकडील बाजू मानाजी आंग्र्याने रोखून धरली व जमिनीवरून सर्व बाजूने आप्पांचा वेढा बसला. त्यामुळे फिरंग्यांची उपासमार होऊन त्यांनी किल्ला १६ मे रोजी मराठ्यांच्या हवाली केला. तेव्हा मुंबईचा इंग्रज फार भ्याला व त्याने आपले वकील कॅ. गॉर्डन यास शाहूमहाराजांकडे व कॅ. इंचबर्ड याला चिमाजीआप्पाकडे स्नेहयाचना करण्यास पाठविले. त्यावेळी तह होऊन असे ठरले की, इंग्रजाने फिरंग्यास मदत करू नये. मराठ्यांस दारूगोळ्याचा पुरवठा करावा; त्यांच्या गलबतांस माहीम व वांद्रे येथील दर्यांत बिनहरकत येऊ द्यावे वगैरे. मराठ्यांनी यावेळी डहाणू, तारापूर व वसई येथील किल्ल्यांची डागडुजी करून केळवे येथे नवीन किल्ला बांधला. येथून फिरंग्यांची उत्तर कोकणातील सर्व सत्ता मावळली. पुढल्याच वर्षी (१७४०) मानाजी आंग्र्याने त्यांच्या आरमाराचा नाश केला व इ.स. १७४१ त खंडोजी माणकराने चौल घेतले; तेव्हा सारा फिरंगी गोव्यास पळून गेला. बहुतेक सारे कोंकण (शिद्दी व जव्हारकर सोडून) मराठ्यांच्या ताब्यात आले. शिद्याचा प्रांत अगदीच थोडा व जव्हारकराचा सारा डोंगराळ होता म्हणून मराठ्यांनी तिकडे लक्ष दिले नाही. यापुढील काळ शांततेचा व भरभराटीचा गेला. मराठ्यांनी प्रजेच्या संरक्षणाची चांगली व्यवस्था ठेविली होती. (बाँबे ग्या. पृ. ९७ व्हॉ. १ भा. २) फिरंग्यांनी ज्याप्रमाणे हिंदूंचा धार्मिक छळ केला, त्याप्रमाणे मराठ्यांनी मुसुलमान व ख्रिस्ती प्रजेचा छळ केला नाही. एवढेच नव्हे तर उलट त्यांच्या देवस्थानांना इनामेही दिली. याबद्दल इंग्रज इतिहासकारांनी प्रशंसोद्‍गार काढले आहेत. पुढे इ.स. १७६० त रामाजीपंत (कोंकणचे) सर सुभेदार यांनी फिरंग्यांच्या मदतीने जंजिर्‍यास वेढा दिला, तेव्हा इंग्रजाने शिंद्यास मदत केली; इतक्यांत पानिपत झाल्यामुळे पंतांनी वेढा उठविला. इ.स. १७६६ मध्ये इंग्रजानें साष्टी वगैरे बेटें घेण्याचा प्रयत्‍न चालविला, परंतु थोरल्या माधवरावांच्या अखेरपर्यंत त्यांच्या हुषारीमुळे तो सफल झाला नाही. इंग्रजाने १७७१ मध्ये पुण्यास वकील पाठवून, मुंबईला धान्य पुरवठ्याकिरता साष्टी बेट व कंपनीची जहाजे बांधण्याच्या कामास लांकूड पाहिजे म्हणून वसई आम्हांस द्यावी असे बोलणें लावलें. पण ते चार वर्षे तसेच लोंबकळत राहिले. इ.स. १७७४ त फिरंग्यांनी साष्टी घेण्यासाठी मोठी तयारी केली. तेव्हां मुंबईजवळ दुसरे कोणीही युरोपियन राहूं नयेत म्हणून इंग्रजाने ६०० गोरे व १२०० हिंदी सैन्य ठाणे किल्ल्यावर पाठविले. किल्ल्यांत मराठे फक्त ५०० च होते, पण त्यांनी इंग्रजाचे १०० गोरे पहिल्याच दिवशी ठार केले व निकराची लढाई दिली. अखेर कांही दिवसांनी उपासमारीने त्यांनी किल्ला सोडला. थोड्या काळानें वेसाव्याचा किल्लाहि इंग्रजानें घेतला. पुढे तर रघुनाथराव दादा यांनी भाऊबंदकी माजवून १७७५ च्या मार्चांत सुरतेच्या तहान्वये वसई व साष्टी इंग्रजास देऊन टाकिली. परंतु पुन्हां १७८२ त सालबाईच्या तहाप्रमाणे साष्टी, घारापुरी व करंजा यांशिवाय वसई आदिकरून सर्व प्रांत इंग्रजानें मराठ्यांना परत दिला. मध्यंतरी १७७६ त तोतयाचे बंड माजले. तो रत्‍नागिरीच्या किल्ल्यांतून सुटून मोठ्या सैन्यानिशी कोंकणातील २० किल्ले हस्तगत करून बोरघाटावर आला. तेथें कारभार्‍यांनी पाठविलेल्या सैन्याने त्याचा पराभव केला तेव्हा तो पळून गेला. त्याला मिळण्यासाठी दादासाहेब हे सुरतेहून निघाले. परंतु वरील बातमी समजतांच ते तारापुरावरून दर्याने मुंबईस गेले. पुढे १७७८ त इंग्रजांनी दादासाहेबांचा पक्ष घेऊन त्यांच्याकडून वसई व खांदेरी उपटली व ते पुण्यावर चालून गेले; परंतु त्यांचा वडगावांस पुरा मोड झाला. अखेर हो नाही करितां करतां सालबाईच्या तहात वर सांगितल्याप्रमाणे इंग्रजांस वसई प्रांत ओकावा लागला. यापुढे सुमारे ३५ वर्षे कोंकणच्या राज्यकारभारात फरक झाला नाही. जव्हारकराचा बराचसा मुलुख मात्र मराठ्यांनी घेतला. विशाळगडास बंड झाल्याने सन १७७७ त कोल्हापूरकरांनी मालवण घेतले. वाडीकरांवर १७८३ त स्वारी केली. पुढे सन १७८६ त कोकणात (कोल्हापूरकरांच्या प्रांतांत) बंड उद्‍भवल्याने कोल्हापूरकरांनी वेंगुर्ले, निवती, विशाळगड इत्यादी ठिकाणांवर हल्ले केले. तेव्हां सावंताने फिरंग्याची मदत घेऊन वेंगुर्ले व निवती ही गावे परत मिळविली; आणि शिंद्याच्या मध्यस्थीने इतर प्रांतही परत मिळविला. यानंतर इसवी सन १८०३-१२ पर्यंत सावंत व कोल्हापूरकर यांच्यात नेहमी कटकटी चालू होत्या. पुढे १८१२ त कोल्हापूरकर व पेशवे यांच्यामध्ये झालेल्या तहाचा फायदा घेऊन इंग्रजाने कोल्हापूरकरांकडून मालवण व सावंतांकडून वेंगुर्ले घेऊन तेथें आपली फौज ठेविली. तथापि त्या मुलुखाच्या वसुलावर पेशवे, कोल्हापूरकर, सावंत, बावडेकर यांचे निरनिराळे हक्क होते. इकडे १८०२ मध्ये होळकराने पुण्यावर स्वारी केल्याने रावबाजी हे महाडास व तेथून चौलास आणि तेथून इंग्रजांच्या मदतीने वसईस गेले. ते तेथें गेल्याबरोबर इंग्रजाने कर्नल क्लोज व एल्फिन्स्टन यांना तेथें पाठवून श्रीमंतांशी तह केला (३१ डिसेंबर १८०२). या तहानेच श्रीमंतांचे स्वातंत्र्य नष्ट झाले. मात्र या तहाने कोंकणच्या वाटणीत फरक झाला नाही. इ.स. १८१७ त कोकणात पेंढार्‍यांचा दंगा उसळला. या वर्षाच्या जूनमध्ये पेशव्यांचा व इंग्रजांचा तह होऊन त्या तहान्वये इंग्रजास सर्व उत्तर कोंकण मिळाले. पावसाळ्यानंतर रावबाजींनी कोळी-भिल्ल- रामोशांकरवी कल्याणावर हल्ला करवून बोरघांट घेतला व सह्याद्रीतील सर्व घाट रोखले. त्यामुळे पुण्याच्या (रेसिडेंट) इंग्रजाचा मुंबईस बातमी पाठविणे ती बाणकोटवरून पाठवावी लागे. रावबाजींनी पुढे कोथळा घेतला; परंतु इंग्रजाने तो व अवचितगडादि इतर किल्ले घेतले. याच सुमारास पंतसचिव हे इंग्रजाला शरण गेले. ता. १० मे १८१८ रोजी रायगड पडला व सप्टेंबरअखेर कोंकण इंग्रजाने घेतले. चिमाजीआप्पा हे त्यांच्या हाती लागले. त्यांस त्यांनी वसई, ठाणे येथे प्रथम ठेवून नंतर काशीस रवाना केले. पेशवाई गेल्यावर इंग्रजाने पेशव्यांच्या मांडलिक संस्थानांशी (कोकणातील) स्वतंत्रपणे तह करून त्यांचे हक्क निश्चित केले. सावंतवाडीकरापासून मालवण ते पोर्तुगीज सरहद्दीपर्यंतचा प्रांत घेतला. इ.स. १८२२ त आंग्रे हे मांडलिक बनले; परंतु १८४० त संस्थानिक निपुत्रिक वारल्यामुळे त्याचे संस्थान खालसा केले. याप्रमाणे यावेळी सर्व कोंकण इंग्रजांनी हस्तगत केले.

उत्तर कोंकणांतील लोकवस्ती— रा.ब.पु.बा. जोशी आपल्या लेखात म्हणतात, "या भागात मूळचे रहिवासी म्हणजे आगरी, कोळी (डोंगरी व दर्यावर्दी), वारली, कातकरी व ठाकूर हे होत. कुणब्यांत वैरी, कोकणी, मराठे व चौशेळे हे जुने आहेत. पूर्वी सांगितल्याप्रमाणे कोकणावर मौर्य, क्षत्रप, आंध्रभृत्य, पश्चिमचालुक्य, राष्ट्रकूट, उत्तर चालुक्य, शिलाहार, यादव वगैरे राजघराणी झाली; तेव्हां या प्रत्येक घराण्याबरोबर महाराष्ट्र, गुजराथ व मद्रास इकडील लोकही कोकणात आले. इ.स. १३४७ त मुसुलमानी सत्ता झाल्यावर गुजराथेतून बरेचसे मुसुलमान खाली उतरले; तत्पूर्वी थोडेफार अरब आले होते. या अर्वाचीन मुसुलमानांना कोकणी मुसुलमान असे म्हणतात; ते मराठीच बोलतात. सातव्या शतकांत इराणच्या यझ्दगर्दराजाचा पराभव अरबांनी केल्यामुळे तेथील पारशी लोक संजाण, तारापूर, ठाणे, नवसारी इकडे येऊन राहिले. नंतर फिरंगी आले व त्यांनी आपली संख्या हिंदूंना बाटवून जास्त वाढविली. कोकणात पूर्वी कानडी भाषा बोलली जात असे. शिलाहार हे मूळचे द्रविड देशातील असल्याने त्यांच्या संसर्गाने कानडी भाषा इकडे आली असावी. यांच्या वेळेस कांही कायस्थ प्रभूंची वस्ती इकडे झाल्याचे प्राचीन लेखावरून आढळते. ब्राह्मणांत सामवेदी व गोवर्धन हे प्राचीन रहिवासी होत; चिंचणी, सोपार्‍याकडील काही इनाम जमिनी शातवाहनांनी या ब्राह्मणांना दान केल्या होत्या. त्यांचे पुरोहित कात्यायनसूत्री शुक्लयजुर्वेदी होते. यादव राजवटीत माध्यंदिन यजुर्वेदी ब्राह्मण, सोमवंशी क्षत्रिय व पाठारे प्रभू हे इकडे आले. देवगिरीकर या नांवाचे यजुर्वेदी ब्राह्मण पुरोहित असत. इ.स. १२८० च्या सुमारास कृष्ण नावाचा यजुर्वेदी ब्राह्मण उत्तरकोंकणचा महाप्रधान (गव्हर्नर) असल्याचे मागे सांगितलेच आहे. पुढे भीमदेवाने माहीमकडे स्वतंत्र सत्ता स्थापिली. तेव्हा पुरुषोत्तम कावळे हा यजुर्वेदी ब्राह्मण पुरोहित इकडे आला होता; त्याच्या बरोबर आलेल्या ब्राह्मणांचेच वंशज हल्लीच्या मुंबई बेटांत आढळणारे यजुर्वेदी ब्राह्मण होत. इ.स. १७३९ तील अंताजी रघुनाथ हा वरील कावळे घराण्यांतील होय. याने पेशव्यांना मदत केल्याने त्याची मालाडची जहागीर फिरंग्याने जप्‍त केली होती. पुढे पेशव्यांनी ती त्याला दिली नाही असे म्हणतात. यानंतर पळशीकर ब्राह्मण व कोंकणस्थ ब्राह्मण यांच्यात अग्निहोत्रासंबंधी भांडणतंटे सुरू झाले व पेशव्यांनी तो तंटा निकालासाठी नाशिकास पाठविला असता तेथें पळशीकरांसारखा निकाल झाला. परंतु पळशीकरांच्या अन्यायी लोकांना शिक्षा न झाल्यामुळे ते मुंबईस इंग्रजांच्या आश्रयास गेले. या कालापासून वसई व साष्टी प्रांती राहणार्‍या पळशीकरांना पळशे या नांवाने त्यांचे प्रतिस्पर्धी लोक संबोधू लागले. हे सर्व लोक माध्यंदिन शाखी शुक्लयजुर्वेदी असून त्यांच्याकडे उत्तर कोकणातील ज्योतिष व पौरोहित्य वंशपरंपरेने चालू आहे. सोमवंशी क्षत्रियांचे पूर्वज हे भीमदेव यादवांबरोबर आपल्या मूळच्या देवगिरी (पैठण) प्रांतातून इकडे आले. यांना पांचकळशी असेही एक नाव आहे. हे नाव लग्नात वराच्या चौरंगास असलेल्या पाच कळसांवरून निघाले असे काही म्हणतात परंतु हे नाव पंच-कुल-वंशी या शब्दत्रयांपासून साधलें गेलें असावे, असे रा.ब.पु.बा. जोशी हे म्हणतात. प्राचीन काळी क्षत्रियराजाच्या दरबारात निरनिराळ्या खात्यांचे पाच प्रधान असत. त्यांनाच पंचकुळ म्हणत. या लोकांची वस्ती मुंबई, साष्टी, वसई, माहीम, उरण इकडे फार असून त्यांच्यात वसईकर, साष्टीकर, उरणकर असे अनेक पोटभेद पडले आहेत. यांच्या प्रमाणेच पाठारे प्रभू लोकांचीहि वस्ती मुंबई, माहीम, साष्टी, ठाणे, वसई इकडे आढळते. त्यांना पाताणे किंवा पैठणीप्रभू असेही म्हणतात. पाठारे हे नाव जातिवाचक नसून (रा.ब.पु.बा. जोशी यांच्या मते) जातिसूचक असावे. पाठेर हा शब्द प्रतिहार या संस्कृत शब्दापासून निघाला आहे. (प्रतिहार = पदिहार=  पाठारा) पुराणांतरी प्रतिहार शब्द परिहार- परिहर असा आढळतो. प्राचीन इतिहासांतील प्रतिहार राजे पराक्रमी असून त्यांची चार घराणी होती. पैकी कनोजचे घराणे मुख्य होते. त्या घराण्याचा संस्थापक नागभट्ट असून त्याने इ.स.च्या ९ व्या शतकात हर्षाच्या चक्रायुध नावाच्या वंशजाचा पराभव करून आपली सत्ता स्थापिली. या घराण्यातील महेंद्रपाल हा फार पराक्रमी राजा झाला होता. त्याच्या पदरी राजशेखर कवी होता; हा महाराष्ट्रीय यजुर्वेदी ब्राह्मण होता. या घराण्यातील शेवटचा राजा राज्यपाल. याचा गझनीकर महंमदाने १०१८ त पराभव केला व राजधानीतील लोकांची कत्तल केली; त्यावेळी तेथील प्रजा पळाली. बहुधा याच सुमारास प्रतिहार किंवा पाठारे यांचे पूर्वज कनोजहून देवगिरीकर यादवांच्या आश्रयास पैठणप्रांती आले असावेत. पाताणे हा पैठणे या शब्दाचा अपभ्रंश होय. (असे रा.ब. जोशी म्हणतात.) सह्याद्रीखंडातही 'पैठणे पत्तने शप्त्वा मया कोपवशात्किल। पाठारीया: प्रसिद्धा ये पैठणाख्या भवंतु ते।।'' असा उल्लेख आहे. पाताण्यांबरोबर पैठणहून आलेल्या कावळे आदिकरून यजुर्वेद्यांनाही पैठणकर म्हणत असत. गोव्याच्या सुभेदाराचा मुलगा बहादुर गेलानी याने स. १४९० त साष्टीकडील काही ब्राह्मणांस ज्या सनदा दिल्या आहेत त्यात त्यांना पैठणकर असेच म्हटले आहे. काहींचे म्हणणे की, पाठारे हे गुजराथेतून आले असावेत. परंतु हे म्हणणे टिकण्यासारखे नाही, कारण त्यास सबळ आधार नाही." (या लेखात रा.ब.पु.बा. जोशी यांनी आमच्याकडे पाठविलेल्या लेखांतील घेतलेला भाग अवतरणचिन्हांकित आहे.)

[संदर्भग्रंथ:- वि.ज्ञा.वि.पु. २१ अं. १-२; पु. २२. पृ. ९९; बृहत्सं.; राजतरं. रघुवंश; महावंशो; भारतवर्षीय भूवर्णन; शिकंदरी भाषांतर; कौस्तुभचिंतामणि; मराठे व इंग्रज; डफ; एशि. रिसर्चेस. व्हा. १५; हीरेन-व्हॉ. २; टॉड. पृ. १८७; स्मिथ- व्हॉ. १-२; बॉम्बे ग्याझे. व्हॉ. १३, १४ आणि १६; भा. २, ३; एलफिन्स्टन-१६६; रॉबर्टसन- ३८; बर्ड- हिस्टरी गुजराथ; इंपी ग्याझे. व्हॉ. १५: इलिअट. व्हॉ. १, ७; यूल-क्याथे १ : जर्व्हिस- कोंकण; ब्रिग्ज-व्हॉ. २, ३, ४; रासमाला-१; अर्सकिन व्हॉ. २; सदर अदालत रिपोर्ट १८१५; केर-व्हॉ ८: हॉग, १; ऑर्म; एचिसन; ट्रीडीज- फॉरेस्ट सिलेक्शन्स. व्हॉ १ भा. १, २, ३; डॉ. जोशी- अर्ली हिस्टरी बॉम्बे; एड्वर्डस- राइज् ऑफ बॉम्बे; अर्किआलॉ. सर्व्हे रिपोर्ट व्हॉ. ३, ९; इंडि. अँटि व्हॉ. ५, ७, ८; फ्लीट. डिनॅस्टिज्- कानडी; फॉरेस्ट-ऑफि. रायटिंग्ज)

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .