विभाग अकरावा : काव्य - खतें
कैवर्त जात— (केवट पहा) यांची वस्ती बंगाल, बिहार, ओरिसा व आसाम या प्रांतांतून आहे. सर्वात जास्त बंगाल्यांत आहे.
इतिहास— बंगालच्या पाल राजांपैकी दुसरा महिपाल गादीवर आला असतां (१९८०) त्यानें आपल्या भावांना कैदेंत टाकून प्रजेवर जुलूम केला, त्यामुळे प्रजेनें दिव्य किंवा दिव्योक या चासी-कैवर्त (केवट) जातींच्या मुख्य नायकाच्या प्रमुखत्वाखाली बंड केलें. या सुमारास उत्तर बंगल्यांत ही कैवर्त जात शूरपणामुळे प्रख्यात झाली होती. बंडखोरांनीं महिपालास ठार मारून देश काबीज केला. दिव्योकाच्या नंतर त्याचा मुलगा भीम हा राजा झाला. पुढें महिपालाचा भाऊ रामपाल यानें राष्ट्रकूटांची मदत घेऊन भीमावर स्वारी केली, तींत भीम मेला व पालांच्या राज्यावर पुन्हां रामपाल राजा आला (१०८४). पुढें बल्लाळसेन यानें याच कैवर्तांच्या मदतीनें उत्तर बंगाल काबीज केला. व त्यांची सुधारणाही केली. (११७१)
[एपि. इंडि. २. ३५५; संध्याकरांचें रामचरित; हरप्रसाद- मॉ. बुद्धिझम अॅन्ड फॉ. ओरिसा स्मिथ :- प्रा. हिं.]
कैवर्त लोकांची उत्पत्ति शोधण्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत असें रिसले साहेबांचें मत आहे. परंतु हे लोक बंगालचे मूळचे रहिवासी असून बिहारमधील केवट लोक यांच्याच पैकीं असावे असें हें साहेब म्हणतात. कामरूपमध्यें केवट व कैवर्त हीं नावें सारखींच समजलीं जातात. कैवर्त लोकांचे धंद्यावरून चासी व जलिया असें दोन पोटभेद झाले आहेत. १९११ च्या खानेसुमारीत एकंदर जलिया कैवर्त ३,७५,९३६ व चासी कैवर्त २२,३१,२१८ होते. अवर्गीकृत कैवर्त १०,४८,०६ नमूद केले आहेत.
चासी कैवर्त शेतकरी असून जलिया मासे धरण्याचा व विकण्याचा धंदा करितात. या दोन वर्गांत लग्नसंबंध किंवा अन्नव्यवहार हा मुळींच होत नाहीं.
सुशिक्षित व सुधारक चासी कैवर्ताची गणना महिष्य या नांवाखालीं होते. हे स्वतः विक्रीचा धंदा करीत नाहींत. त्यामुळें महिष्य व जुन्या पद्धतीचे चासी कैवर्त यांत खिंड पडत चालली आहे. महिष्यानें चासी कैवर्ताशी लग्नसंबंध केला, तर त्याला वाळींत टाकितात. जलिया कैवर्ताशी संबंध घडवून आणण्याची तर गोष्टच बोलावयास नको. कारण महिष्य त्यांनां फारच हलक्या जातीचे व मासेविके म्हणून समजतात. जलिया कैवर्तांतही सध्या सुधारणा दिसत आहे. थोडा सुशिक्षित जलिया आपणाला चासी म्हणवितो व इतर जलियांशी संबंध ठेवीत नाही. बंगाल्यांत आणखी एक हलवा (हलिया) दास जात असून तिच्यातील लोकांनी आपणाला महिष्य म्हणवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु काही तंटे बखेडे झाल्यावर हलवादास जातीच्या लोकांनी तो प्रयत्न सोडून दिला. पूर्व बंगालांत असा मतभेद नसून कैवर्तकांचे फक्त वर दिलेले दोनच पोटभाग आहेत. [सेन्सस रिपोर्ट, १९११ पु. ५]