विभाग अकरावा : काव्य - खतें
कैकोलन— एक कोष्टी जात. यांची एकंदर लो.सं. (१९११) ३७३२९७ आहे. बहुतेक मद्रास इलाख्यांतच आहेत. तेलगू प्रांतांत व दक्षिणेकडील सर्व जिल्ह्यांत कैकोलन जातीचे तामीळ कोष्टी राहात असून ते तेलगू भाषाच बोलतात. अशी एक दंतकथा आहे कीं, मदुरेच्या नायक राजांनां कैकोलनांचें काम पसंत न पडल्यामुळें त्यांनीं उत्तरेकडून पटनूलकारन कोष्टी आणविले; व त्यांचीच संख्या पुढें जास्त झाली. संस्कृत वीरबाहु शब्दाचा समानार्थी तामीळ शब्द कैकोलन असा आहे व वीरबाहु हाच आपला मूळ पुरुष होय अशी या जातीची समजूत आहे. कैकोलन लोकांनां सेनगुंडार म्हणजे रक्तखंजीर असें म्हणतात. व त्याविषयीं दंतकथाहि आहेत. कै म्हणजे हात व कोल म्हणजे घोटा, अशी कैकोलनची व्युत्पत्ति आहे. हातमागाच्या विविध भागांनां हे लोक देवता व ऋषी समजतात. धागा हा विष्णूच्या नाभिकमलांतून प्रथम उत्पन्न झाला, बाणा म्हणजे एक देवता, ताणा म्हणजे नारद, पावटी हा वेदमुनि, फलक म्हणजेच ब्रह्म आणि ताणा बांधण्याचा मुख्य दोर म्हणजे आदिशेष होय. अशा तर्हेच्या श्रद्धामय कल्पना मागाविषयीं कैकोलन कोष्ट्यांच्या आहेत.
कित्येक ठिकाणीं खालील पोटजाती आढळून येतात:- सोझिया, रट्टू, सिरुताली, पेरुताली, शिरपरम्, सेवायहवृत्ति, इत्यादि. बहुतेक कैकोलन शैव असून कांहीं लिंग धारण करितात व कांहीं वैष्णवहि आहेत.
या जातीच्या मुख्य पुढार्यास पेरिदानकारन् अथवा पट्टकारन् असें म्हणतात. त्यांच्या हाताखालच्या मुख्यांस ग्रामणी व उरल असें म्हणतात. कांजीवरम् येथें राहणारा त्यांचा पुढारी देणग्या स्वीकारतो व जातीसंबंधीं तंटे मिटवितो. त्यास महानाट्टन् असें म्हणतात. त्याची अनुज्ञा उल्लंघन केल्यास तो अपराध्यास जातिबहिष्कृत करितो. नट्टकट्टाद नाथनमार नांवाचा एक भिक्षुक वर्ग कैकोलन जातीस जोडलेला आहे. देशांतर करतांनां, कोठेंहि जातीचा तंटा असल्यास, सभा बोलावून व कांजीवरमच्या महानाडचे प्रतिनिधी म्हणून हजर राहून ते वादाचे निकाल कसें होतात हें पाहतात. जातिविषयक वाद संपेपर्यंत आपलें काम तहकूब ठेवण्याची पद्धति या लोकांत आहे. ते कामाक्षी देवीची उपासना करितात. वरील भिक्षुकवर्ग एका वेळूवर चढून कांहीं शकुनात्मक धार्मिक विधि व कसरती करितो. या दोन्ही गोष्टींनां एका दंतकथेचा आधार आहेसें दिसतें. नट्टकट्टाद नायनमार हे आपण वीरबाहूचे वंशज आहों असें हक्कानें प्रतिपादन करितात. कैकोलनांपेक्षां हे भिक्षुक लोक हलक्या दर्जाचे असून त्यांचा कैकोलनांशीं बेटीव्यवहार होत नाहीं. पोन्नम बालाधार व ओंटीपुली नांवाचे दोन भिक्षुक वर्गही यांत असलेले आढळून येतात.
कैकोलन जातीचे नाडू अथवा देश असे ७२ विभाग असून ४२ पश्चिमेकडील नाडू व २८ पूर्वेकडील नाडू असे मुख्य आहेत. या सर्वांत बहुधा परस्पर लग्नें होतात. सर्व नाडूंचे वरिष्ठ ४ थिसाइनाडू असतात व सर्वांत श्रेष्ठ कांजीवरमचा नाडू असतो. थिसाइ नाडूंचे चार प्रकार शिवपुरम्, धोंडिपुरम्, विरंचीपुरम् व शिवलिंगपुरम् असे आहेत. ७२ नाडूंपैकी, प्रत्येक नाडूचे किलइग्राम, पेरूरग्राम व सिथुरग्राम असे पोट प्रकार आहेत. सध्यां कांजीवरम् येथें कैकोलनचे दोन मुख्य विभाग आहेत व ते अय्यमपेट्टइ व पिलइपालयम् असे आहेत. आपला पूर्वापार कोष्ट्यांचा धंदा सोडून सध्यां कैकोलनांनीं शेती, व्यापार, गाडी हांकणें व हमालीं करणें असले धंदे स्वीकारले आहेत.
प्रत्येक कैकोलन कुटुंबातील एक मुलगी देवास वाहण्याची चाल त्यांच्यांत रूढ आहे. देवदासी जातीशी ते संबंध ठेवीत नाहीत; तथापि कांहीं समारंभाच्या प्रसंगीं ते दासींच्या घरी खुशाल जेवतात. स्टुअर्ट म्हणतो की कुटुंबाचा पुढारी जर पुत्रहीन मेला व त्यास जर मुली असल्या तर त्यांपैकीं एकीला दासी करतात. अशा दासी केलेल्या व देवांस वाहिलेल्या मुलीस नृत्य गीतहि शिकविण्यांत येतें. एका देवळांत मूर्तीसमोर त्या दासीला बसवून ब्राह्मणद्वारा तालिबंधन करण्यांत येतें व नंतर तिची मिरवणूक काढतात. जिचें देवाशीं लग्न झालें आहे अशीं एखादी दासी मृत झाल्यास देवांवरील वस्त्र व फुलें तिला अर्पण करून तिचा अंत्य विधि होईपर्यंत ते देवाची पूजा करीत नाहींत.
कांहीं कैकोलनामध्यें तिरुतालकिट्टू नांवांचा एक लग्नविधि आहे. त्यांत वरानें वधूचें तालीबंधन केलें कीं लग्न ठरलें असें मानतात. नंतर वडिल मनुष्यांनां तें लग्न मोडतां येत नाही. संतति नसेल तर स्त्रियांनां पुनर्विवाह करण्याची मुभा देण्यांत येते. या जातीविषयीं बर्याच म्हणी उपलब्ध आहेत. अंत्य विधीची त्यांच्यांत अशी एक चाल आहे की, शेवटच्या दिवशीं एक झोपडी बांधून व न्हाव्यानें आणलेल्या दगडांची तेथें रास करून त्या दगडांनांच सर्व पदार्थ समर्पण करितात. देवीची साथ येऊं नये म्हणून माणसांनीं देवीचा रथ ओढणें, आंकडे टोचून घेणें इत्यादि प्रकार त्यांच्यांत रूढ होते. [थर्स्टन]
गंगम्मा देवीप्रीत्यर्थ होणारा तिरुपति येथील वार्षिकोत्सव कैकोलन आनंदानें करितात. या उत्सवाचा विशेष स्टुअर्टच्या मताप्रमाणें असा कीं, उत्सवदिन सुरू झाल्यानंतर रोज सकाळीं व सायंकाळीं लोक कपडे बदलतात. रविवारी सकाळी दिसून येणारा मातंगी वेष पाहण्यासारखा असतो. त्यावेळी भक्त देवीपुढें नाचूं लागतो. तो रंगांत आला कीं, जिभेंत एक सळई मारून घेतो. हा वेषसमारंभ एका ब्राह्मणाकडे व महंताच्या मठांत होतो. `पीरंतालू-वेष’ नांवाचा समारंभ उत्सवाच्या अखेरीस होतो; त्यावेळीं स्त्रीवेष घेऊन एक कैकोलन जातीचा मनुष्य घोड्यावरून कुंकुम वाटीत गांवांतून फेरी मारून येतो.