विभाग अकरावा : काव्य - खतें
कुचला- हें एक मध्यम आकाराचें गलनशील झाड आहे. ह्यास इंग्रजींत स्नेकवुड; लॅटिनमध्ये नक्स व्हॅमिका किंवा स्ट्रिकनाइनचें झाड व मराठींत, काजरा, कुचला, निर्मळ वगैरे नांवें आहेत. संस्कृतमध्यें ह्यास विषमुष्टि व कारस्कार हीं नांवें आहेत.
उत्तर हिंदुस्थानांत गोरखपूरचीं जंगलें, बंगाल, ओरिसा, व दक्षिण हिंदुस्थानांत मद्रास इलाख्यांत व ब्रह्मदेश सिलोनमध्यें हें आढळतें.
कुचल्याच्या बिया वाटोळ्या असून चपट्या किंवा एका बाजूनें खोलगट व दुसर्या बाजूनें फुगीर असतात. त्यांवर पांढुरकी लव असल्यामुळें त्यांचा रंग रुपेरी दिसतो. कुचल्याचीं फळें गोळा करून धुवून त्यांतील बिया काढतात व उन्हांत वाळवितात. जमिनीवर पडलेल्या बिया गोळा केल्यास त्यांना बाजारांत फारशी किंमत येत नाहीं. हिंदुस्थानांतून मुख्यत: मद्रास, मुंबई व कोचीन येथून बियांची निर्गत होते. लंडनच्या बाजारांत कुचल्याच्या बिया सामान्यत: दर हंड्रेडवेटास ६ ते १८ शिलिंग या भावानें विकतात. १९१२ सालीं ६ शिलिंग हा भाव व १९१८ त १८ शिलिंग भाव होता.
या बिया फार औषधी असून त्यांपासून स्ट्रिक्नाइन व ब्रुसाइन नांवाचे दोन महत्वाचें अल्कलॉइड तयार करतात. बियांचें तेलहि औषधी आहे. शिवाय त्यांपासून एक प्रकारचा रंगहि तयार होतो. त्यानें सुती कापडावर फिकट तपकिरी छटा येते. निलगिरीवरील डोंगरी लोक मासे मारण्याकरितां या विषाचा उपयोग करतात. कुचल्याची साल व लांकूडहि औषधी आहे. ब्रह्मदेशांत कुचल्याच्या लांकडाच्या गाड्या, शेतकीचीं आउतें व लहान लहान पेट्या करितात.
१९१८-१९ सालीं ६२१५८ हंड्रेडवेट वजनाचा १८ शिलिंग दराचा ५७६०६ पौडांचा कुचला परदेशीं रवाना झाला. कुचला इंग्लंड, बेल्जिअम, जर्मनी, हालंड, फ्रान्स वगैरे देशांत जातो. कोकोनाडा येथून तो माल परदेशीं पाठवितात.
कु च ल्या चा म द्या र्क.- एक औंस तीव्र मद्यार्क घेऊन त्यांत ४ ग्रेन स्ट्रिक्निया विरघंळू द्यावा. नंतर ब्लॅटिंगपेपरमधून गाळून घ्यावा. हा अर्क देण्याचें प्रमाण ३ पासून १० थेंबपर्यंत शक्तीप्रमाणें ठेवावें. शुद्ध केलेल्या कुचल्याचें चूर्ण अर्ध्या पासून २।। गुंजापर्यंत द्यावें. सूक्ष्म प्रमाणानें कुचला घेतल्यास (१ ग्रेनचा सोळावा भाग) कुचल्याचें सत्व हृदयास उत्तेजक व सूक्ष्म वाहिनींचा स्तंभ करणारें आहे. कुचल्याचें विषारी सत्व बियांत २ व सालींत १ या प्रमाणानें रहातें.
कु च ल्या च्या वि षा चीं ल क्ष णें- हें विष चढलें असतां बहुतकरून धनुर्वाताचीं लक्षणें होतात. विष पोटांत गेल्यापासून ५ मिनिटांपासून अर्ध्या तासाच्या आंत विषाचीं लक्षणें दिसूं लागतात. कधीं कधीं १०।२० मिनिटांच्या आंतच मृत्यु येतो. फार तर ५।६ तासपर्यंत मनुष्य वाचूं शकतो. कुचल्याची बुकी १।। मासा किंवा स्टिकनिया अर्ध्या गव्हाइतका घेतल्यानें मनुष्य मरतो. कुचल्याची बीं सालीसकट सबंध पोटांत गेल्यास तशीच शरीरास अपाय न करितां पोटांतून बाहेर पडते. कारण तिच्यावरची साल चिंवट असल्यानें ती न पचतां बाहेर पडून जाते.
औ ष धी उ प यो ग- जनावरांस जखम झाल्यास काजर्याची बीं किंवा मुळी जखमेवर उगाळून लावावी म्हणजे विकार दूर होईल.
कु त्र्या च्या वि षा व र.- कुचल्याच्या बिया तुपांत परतून त्या रोज क्रमवृद्धीनें सेवन कराव्या. संधिवात झाला तर त्याजागीं कुचल्याची बी उगाळून वर लावावी. घुशी, उंदीर कमी व्हावयास कुचल्याच्या बियांचें चूर्ण करून तें पिठांत मिसळावें व त्या पिठाच्या गोळ्या करून उंदीर खातील अशा ठिकाणीं ठेवाव्यात. बाळंत रोग, हिंवताप, जाऊन शक्ति यावयास शुद्ध केलेल्या कुचल्याच्या बियाचें चूर्ण १।२ गुंजा मधांतून द्यावें [वॅट; कॉटन. पदें.]