विभाग दहावा : क ते काव्य
कावेरीपाक - मद्रास इलाख्यांत उत्तर अर्काट जिल्ह्यांत वालाजापेट तालुक्यांतील एक गांव. हें १७५२ साली क्लाइव्हने राजासाहेब आणि फ्रेंच यांवर मिळविलेल्या जयाबद्दल प्रसिद्ध आहे. येथें एक लहानसा किल्लाहि होता. पण तो आतां पाडून टाकण्यांत आला आहे येथें एक तळें असून त्याच्या बंधार्याची लांबी ४ मैल आहे. या तळ्यांत रानबदकें व पाणकोंबडें विपुल आहेत. तलावांत पाणी नेहमीं असतें पण दिवसेंदिवस गाळ सांठून तळें उथळ होत चाललें आहे.