विभाग दहावा : क ते काव्य
कारंजा - वर्हाड. जिल्हा अकोला. तालुका मूर्तिजापूर. हें बरींच वर्षे तालुक्याचें मुख्य ठिकाण होतें. या गांवास म्युनिसिपालिटी आहे.
कारंजा हें गांव फार पुरातन असून तेथील किल्ला व राहिलेले चार दरवाजे पुरातनत्वाची साक्ष देतात. हें हल्ली व्यापाराचें ठिकाण असून आठवड्यांतून सहा वेळ कापसाचा बाजार भरत असून दर रविवारी त्याच जागेवर इतर सर्व जिनसांचा बाजार भरतो. इ.स. १८९५ सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली.
येथें कै. रामजी नाइक काण्णव यांचा वाडा असून तो पहाण्यालायक आहे. दवाखाना, पोलिस कचेरी, इंग्रजी मराठी शाळा, टपाल व तारघर आणि एक मोठी सराई येथें आहे. मंगरूळ रस्त्याजवळ एक सुंदर डांकबंगला आहे. येथें एक ॠषितलाव असून त्याची लांबी दोन मैल आहे. कारंज नांवाच्या ॠषीस झालेला रोग बरा करण्याकरितां अंबा देवीनें हें तळें उत्पन्न केलें अशी आख्याइका याच्याबद्दल आहे. याच ॠषीच्या नांवावरून या गांवास कारंजगांव असें नांव पडलें असें म्हणतात. गांवाच्या पूर्वेस चड्या अथवा लेंडी तलाव आहे. या पाण्यानें खरूज बरी होते असें म्हणतात. गांवामध्यें बिंदुतीर्थ नांवाचें एक चौकोनी व पायर्या असलेलें कुंड आहे. त्यांतून बेंबाळ नदीचा उगम असल्याचें मानतात.
शिवाजी महाराजांच्या वेळीं हें फार श्रीमंत गांव होतें. येथें अगणित द्रव्य पुरून ठेविलें होते. महाराजांनीं (१६७० च्या अखेरीस) येथें स्वारी केली. दोन तीन दिवस येथें मुक्काम करून मोठमोठ्या श्रीमंतांच्या घरांना खणत्या लावून पुष्कळ संपत्ति गोळा केली. शहरची संपत्ति व प्रांताची चौथाई वसूल करून महाराज परत फिरले (जेधे शकावली). जदुनाथ सरकारच्या मतें प्रतापराव गुजरानें कारंजें लुटून एक कोट रूपयांचा ऐवज नेला (शिवाजी, पा.२०७-९)
या गांवास एकेकाळी कारंजा बिबी असें म्हणत असत. कारण हा गांव त्यावेळी अहमदनगरच्या राजाच्या मुलीच्या स्त्रीधनापैकी होता. हिचें थडगें येथें आहे. नंतर या गांवास 'लाडांचा कारंजा' असें म्हणूं लागले. कारण येथें लाड आडनांवाचे लोक रहात होते. या ठिकाणीं तीन जैनमंदिरें आहे. भाद्रपद महिन्यात येथें उत्सव होतो. येथें एक कस्तुरी नांवाची हवेली आहे.
येथील लोक फार सधन असल्याबद्दल सांगतात. येथें दुसरींहि पुष्कळ देवळें आहेत. कमलाक्षी देवी, एकाक्षी देवी आणि खोलेश्वर महादेव यांची देवळें दाशरथी रामचंद्रानें बांधली असें म्हणतात. त्यांत विशेष पाहण्यासारखें कांही नाहीं. अवरंगझेबानें येथील हेमाडपंती देऊळ मोडून त्याची मशीद बनविली आहे असें दिसतें. समर्थ परंपरेंतील रोकडारामाची समाधि व मठ येथें आहे.