विभाग दहावा : क ते काव्य
काबूल नदी - ही हिंदुस्थानच्या वायव्येस असून अफगाणिस्तानांत युनई खिंडीजवळ व काबूल शहराच्या पश्चिमेस सुमारें ४० मैलांवर उगम पावते. उ.अ. ३४० २१' व पू.रे. ६८० २०' ओ. हीस पुष्कळ लहान लहान नद्या मिळतात. डोंगराळ प्रदेशांतून वहात असल्यामुळें हीस खळखळ फार आहे व जलालाबादेजवळ उत्तरेकडून कुनर नदी मिळाल्यावर काबूल नदीला उतार नाहीं. ही नदी मिचनी किल्ल्याजवळ ब्रिटिश मुलुखांत शिरते. येथें हिला दोन फांटे फुटतात. यांपैकी उत्तरेकडे वहाणार्या फांट्यास अदेझई व दक्षिणेकडील फांट्यास नगूमान अशीं नांवें आहेत. हे फांटे दहा मैलांवर पुन्हां एकत्र होतात व अटकजवळ अखेरीस ही सिंधु नदीस मिळते.
काबुल नदीच्या बेसुट तीरावर सिमसन यास एक विहार व विहार-मालिका सांपडली. रेव्हरंड स्विनर्टन यासही हदा येथें तसाच शोध लागला आहे. ही बुद्ध लोकांनीं बांधलेलीं निदान उपयोगांत आणलेली असावीं याबद्दल संशय नाहीं.(इं.अॅं.पु. ८, पृ. ८२, मार्च १८७९).