विभाग दहावा : क ते काव्य
कानडा दक्षिण - मद्रास इलाख्यांतील उत्तरेकडचा एक जिल्हा. उत्तरअक्षांश १२० ७' ते १३० ५९' व पूर्व रेखांश ७४० ३४' ते ७५० ४५'. क्षेत्रफळ ४०२१ चौरस मैल. दख्खनच्या दक्षिणभागांत ज्या ठिकाणी काळी जमीन आहे त्या भागास कन्नड (काळा प्रदेश) असें कानडी भाषेंतील नांव आहे. उत्तरेस मुंबई इलाखा; पूर्वेस म्हैसूर आणि कूर्ग, दक्षिणेस कूर्ग आणि मलबार; पश्चिमेस अरबी समुद्र ह्या मर्यादा होत.
परशुरामानें समुद्रापासून ही जमीन मिळविली अशी दंतकथा आहे. भूस्तरशास्त्रदृष्ट्या देखील या भागावर पूर्वी समुद्र होता असें स्पष्ट दिसतें. या भागांत नद्या पुष्कळ आहेत परंतु त्यांची लांबी नाही. पावसाळ्यांत या नद्यांनां पूर येतो. परंतु उन्हाळ्यांत त्या जवळ जवळ कोरड्याच पडतात. भूस्तरशास्त्र दृष्ट्या या भागाची योग्य पहाणी अद्यापि झाली नाही. पावसाची सरासरी १४५ इंच आहे. नारळ, सुपारी, आंबे, फणस ही झाडें विपुल आहेत. विड्यांची पानें, केळी, हळद, मिरच्या वगैरे बागाइती पिकें या भागांत होतात.
वन्य प्राणी - वाघ, चित्ता, गवा, सांबर इत्यादि. येथील हवा दमट असते. उन्हाळ्यांत नेहमी हिंवतापाची सांथ उद्भवते. पाऊस जरी पुष्कळ पडतो तरी नद्यांची पात्रें खोल असल्यामुळें या जिल्ह्यांत पुरानें फारसें नुकसान होत नाही.
इतिहास - दक्षिण कानड्याचा पूर्वेतिहास फारसा उपलब्ध नाही. कांचीच्या पल्लवांच्या राज्यांत हा भाग मोडत होता असें शिलालेखांवरून दिसते. कांची हें अर्वाचीन चिंगलपूट जिल्ह्यांतील कांजीवरम होय. या पल्लवांची राजधानी वातापी मुंबई इलाख्यांतील विजापुर जिल्ह्यांतील बदामी नांवाचें शहर होतें. यानंतर उत्तर कानड्यांतील बनवासी येथील कदंबांचें राज्य या भागावर होतें. सहाव्या शतकाच्या सुमारास चालुक्यांचा अंमल सुरू झाला. आठव्या शतकांत कदंब राजा मयूरवर्मा यानें चालुक्यांस या भागांतून हांकलून दिलें. याच्या वंशजांनी राष्ट्रकूट व नंतर कल्याणीचे पश्चिमेकडील चालुक्य यांचे मांडलिक म्हणून राज्य केले असें दिसतें. बाराव्या शतकाच्या सुमारास द्वारसमुद्राच्या म्हैसुरांतील अर्वाचीन हळेबिड - होयसल बल्लाळांनी हा प्रदेश पादाक्रांत केला. परंतु यांच्यांत आणि देवगिरी - निजाम राज्यांतील दौलताबाद-येथील यादवांच्या मध्यें आपसांत सारख्या लढाया होत असत. पुढें चवदाव्या शतकांत मुसुलमानांनीं या होयसल बल्लाळांची व यादवांची सत्ता उलथून पाडली. त्यावेळी त्या भागांतील स्थानिक राजे बहुतांशी स्वतंत्र झाले. चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धांत हा जिल्हा विजयानगरच्या राज्यांत होता. पंधराव्या शतकांत पोर्तुगीज लोक पश्चिम किनार्यावर वसाहत करूं लागले. व. इ.स. १४९८ सालीं वास्को डि गामा हा उडिपिपासून कांही अंतरावर असलेल्या एका बेटावर येऊन उतरला होता. इ.स. १५६५ साली तालीकोटच्या लढाईत विजयानगरचे राज्य लयास गेल्यावर स्थानिक जैन राज्यांस स्वातंत्र्य प्राप्त झाले. परंतु सतराव्या शतकाच्या आरंभी इक्वेरीचा लिंगायत राजा वेंकटप्पा नाईक यानें या सर्व राजांस जिंकले व सुमारें १५०-२०० वर्षे इक्वेरीच्या राजांचाच अधिकार या भागावर चालत होता. यावेळी त्यांची राजधानी बेदनुर होते.
इ. स. १७३७ साली ब्रिटिशांचा संबंध या भागाशी प्रथम आला. इ. स. १७६३ सालीं हैदरअल्लीनें बेदनूरचें राज्य खालसा केलें व मंगलोर हें आपलें आरमारी हालचाल करण्याचें ठिकाण केलें. इ. स. १७७८ सालीं इंग्लिशांनीं मंगलोर काबीज केलें. परंतु हैदरचा मोर्चा या भागाकडे वळल्यामुळें त्यांस मंगलोर सोडावें लागलें. इ. स. १७८० सालीं पुन्हां हैदराशीं लढाई सुरु झाली. त्यावेळी ब्रिटिशांनी प्रथम बराच भाग काबीज केला. परंतु टिपूनें त्या प्रांतावर स्वारी केली त्यावेळी इंग्लिशांच्या सेनापतीस शस्त्रें खालीं ठेवून त्याच्या हस्तगत व्हावें लागलें. या लढाईंत या प्रांतांतील नेटिव्ह ख्रिश्चन लोक इंग्लिशांस गुप्तपणें मदत करतात असा संशय आला. त्यावरुन त्यानें सर्व ख्रिश्चनांस हद्दपार करुन म्हैसूर येथें पाठविलें व त्या सर्वांस मुसुलमान धर्माची दीक्षा दिली. टिपू इ. स. १७९९ साली लढांईत मरण पावल्यावर या प्रांताचें लुटालुटीमुळें अत्यंत नुकसान झालें. त्या सालीं जो तह झाला त्यांत हा भाग ब्रिटिशांकडे आला. इ. स. १८३४ सालीं कुर्ग खालसा करण्यांत आलें. त्यावेळी त्यांतील कांही भाग या जिल्ह्यांत घालण्यांत आला. इ. स. १८६२ सालीं कुंडपुर तालुक्याचा उत्तरेकडील भाग मुंबई इलाख्यांत घालण्यांत आला.
ज्या भागांवर जैनांचें बरींच वर्षे स्वामित्व होतें त्या भागांत म्हणजे करकळ, मुडबिद्रि आणि येणूर वगैरे ठिकाणीं जैनांचे अवशेष पुष्कळ आहेत. हे अवशेष तीन प्रकारचे आहेत. ( १ ) बेटें-यांत मोठमोठ्या मूर्ती असून त्यांच्या भोंवती एक भींत असते. ( २ ) बस्ति-जैन देवळें. ( ३ ) स्तंभ.
उंबराच्या झाडाखालीं पुष्कळ जुनाट दगडी सर्पाकृति दिसतात. या भागांतील हिंदु देवळें फारशी मोठीं नाहींत.
या जिल्ह्याचे पांच तालुके आहेत. कुंडपुर, कासरगोड, मंगलोर, उडिपि व उप्पिनंगडि. या जिल्ह्यांतच हिंदी महासागरांतील अमिनदिवि बेटांचा अंतर्भाव होतो.
दक्षिण कानडांतील बहुतेक प्रदेश डोंगराळ व जंगलमय आहे. या कारणामुळें जरी या जिल्ह्यांत दुष्काळ पडत नाहींत तरी दर चौरस मैली लोकसंख्येचें प्रमाण बरेंच कमी आहे.
लोकसंख्या ( १९२१ ) १२४७३६८ होती. एकंदर लोकवस्तींत शेंकडा ८१ हिंदु, शेंकडा ११ मुसुलमान, शेंकडा ७ ख्रिश्चन आणि शेंकडा १ जैन यांची वस्ती आहे.
या जिल्ह्यांत तुलु, मल्याळम्, कानडी, कोंकणी या भाषा मुख्यत्वेंकरुन बोलतात. शेंकडा ७५ लोकांचा निर्वाह शेतीवर चालतो.
मु ख्य पी क - भात, सुपारी व नारळ यांच्या बागा यांत पुष्कळ आहेत. या जिल्ह्यांत एकंदर ६६२ चौरस मैल जंगल असून पैकी ४०८ चौरस मैल ' संरक्षित ' आहे. पुर्वी येथील जंगली लोक ' कुमरी ' ची लागवड करीत असत. परंतु यामुळें जंगलाचें अपरिमित नुकसान होतें म्हणून सरकारनें इ. स. १८६० सालापासून ही चाल बंद केली आहे.
मडकी व कौलें करण्यायोग्य माती या जिल्ह्यांत बर्याच ठिकाणी आढळते. मंगलोर येथील कौलांचा कारखाना सर्वत्र प्रसिद्ध आहेच. या कारखान्यासाठी माती नेत्रावती नदीच्या कांठावरील घेतात. सोनें व गार्नेट हे खनिज पदार्थ एक दोन ठिकाणीं सांपडतात. परंतु या दृष्टीनें या जिल्ह्याची पाहणी अद्यापि झाली नाहीं.
या जिल्ह्यांत कौलांचे कारखाने असून त्या कामावर पुष्कळ लोक लागलेले आहेत. त्याप्रमाणें काथ्याचे दोरहि मोठ्या प्रमाणावर तयार होतात. किनार्यावर मासे खारवण्याचा धंदा चालत असून मासे खारवणें ह्यास सरकारचा कर माफ आहे. येथून काफी, कौलें, नारळ, सुपारी, तांदुळ खारलेली मासळी, इमारती लांकूड व मसाल्याचीं द्रव्यें इत्यादी माल बाहेर जातो. मंगलोर हें या भागांतील प्रमुख बंदर असून येथून बहुतेक व्यापाराची ने आण होते. म्हैसूर संस्थानांतून चंदन आणून उडिपी तालुक्यांत त्याचें तेल काढतात.
इ. स. १९०७ सालापासून मंगलोरपर्यंत एक रेल्वेचा फांटा गेल्यामुळें मलबार व इतर मद्रास इलाखा यांतील दळणवळण बरेंच सुलभ झालें आहे.
येथें पाऊस भरपूर पडत असल्यामुळें दुष्काळाचा उपद्रव या जिल्ह्यास कधीं होत नाहीं. जमीनमहसून सुमारें २८ लाख रुपये आहे; व इतर १८ लाख आहे.