विभाग दहावा : क ते काव्य
कांदा - यास इंग्रजींत ओनियन, लॅटिनमध्यें अलिअम, मराठींत कांदा, हिंदीत प्याज, संस्कृतमध्यें पलांडु, गुजराथींत कान्दो, कानडींत उळळे गड्डे इत्यादि नांवे आहेत.
हिंदुस्थानांत कांदा सर्वत्र पिकतो. कांद्याचे गड्डे जमिनींत येतात. कांद्याचा रोपा सुमारें हातभार उंच वाढतो. तो सरळ असून त्याच्या पाती बारीक नळ्यांसारख्या असतात. कांद्याचें बीं काळें असून बंदुकीच्या दारुप्रमाणें दिसतें. कांद्यामधून देंठ निघतो तो कोंवळा असतांना त्याची भाजी करितात. कांद्यांत तीन जाती आहेत पांढरा, तांबडा व पिवळा, यांपैकी तांबडा कांदा जासत तिखट असतो. पांढर्या कांद्याची लागवड कोंकणपट्टीत जास्त असून बहुतकरून तांबडा कांदा देशावर जास्त पिकतो. पिंवळ्या कांद्याची लागवड जुजबी असते. मद्रास व मुंबई इलाख्यांत व बिहार प्रांतांत कांदा विशेष पिकतो. कांद्याची निर्गत विशेषेंकरून सिलोन व स्टेटलमेंटस वगैरेकडे फार होते. कांद्याच्या स्वतंत्र निर्गतीचे आंकडे उपलब्ध नसून ते ''ताजा भाजीपाला'' या सदराखाली मोडतात इ.स. १९१३/१४ सालीं मद्रास इलाख्यांतून १६,४५,५५२ रूपयांचे कांदे बाहेर रवाना झाले असून सन १९१४/१५ साली मुंबईतून त्यांची निर्गत पांच लक्ष रूपयांची झाली. १९१४ पासून १९२० पर्यंत लढाई चालू असताना लाखों रुपयांचा कांदा रणक्षेत्रावर लढाऊ लोकांकरिता गेला.
कांदा बागाइतांत करितात, त्याला साधारण खोल व निचर्याची जमीन लागते. धारवाड जिल्ह्यांत मात्र कांही काळ्या जमीनींत खरिपांत कांद्याचें पीक घेतात. बीं पाभरीनें दर एकरीं सुमारें चार पौंड प्रमाणे पेरितात. या पिकाचा फेरपालट बटाटे, भुईमूग, बाजरी, मूग, उडीद वगैरे पिकांशी करितात. कांद्याचें पीक स्वतंत्र घेतात, तथापि धारवाड जिल्ह्यांत कांद्याबरोबर धने टाकण्याची चाल आहे. फळझाडाच्या नवीन लागणीनंतर पहिलीं दोन तीन वर्षे बागेमध्ये कांद्याचें पीक घेतात. कांद्याची लागवड केव्हांहि व कोणत्याहि ॠतूंत वर्षभर करितां येते. परंतू त्याची लागवड हिंवाळ्यांत करण्याची जास्त वहिवाट आहे.
ला ग ण. जमीन सुमारें नऊ इंच खोल नांगरावी, नंतर कुळवून ढेंकळें फोडून बारीक भुसभुशीत करावी. दर एकरीं शेणखत अगर सोनखत वीस पंचवीस गाड्या द्यावें. याशिवाय दर एकरीं अमोनियमसल्फेटचें वरखत तीन चारशें पौंड दिल्यास फायदा होतो असे अनुभवास आले आहे.
कांद्याचें रोपहि मिरचीप्रमाणे तरव्यांत पेरुन तयार करावें लागते. याकरितां तरवा चांगला खतावून त्यांत सुमारें दोन गुंठ्यामागें दहाबारा पौंड बीं टाकावें म्हणजे एक एकर जमिनीस रोप पुरें होईल. या रोपास कांही दिवस पावेतों रोज सकाळसंध्याकाळ पाणी द्यावें लागतें व पुढे दोन दिवसानीं दिलें असतां पुरें होतें. रोप पांच सहा आठवड्यांत सुमारे सहा इंच उंच वाढतें व लावण्यास योग्य होतें. रोप नऊ इंचांपेक्षां जास्त उंच वाढल्यास वरचें शेंढे खुडावे लागतात. कांद्याची लागण करण्यापूर्वी बी दीड महिना आधीं टाकिलें पाहिजे, म्हणजे सप्टेंबरांत बीं टाकिल्यास नोंब्हेंबरात रोप तयार होतें. लागण करण्यापूर्वी सपाट वाफे करावे अगर १५ इंचांच्या अंतरानें सर्या पाडून आडवे पाट १९ फुटांवर पाडून सर्या व वाफे करावे व नंतर वाफ्यांत पाणी सोडावें. सरीच्या दोन्ही कुशीला चार इंच अंतराने रोपें लावावीं. दुसरें पाणी चवथ्या दिवशीं द्यावें व तिसरें पांचव्या दिवशी द्यावें. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणें सात ते दहा दिवसांच्या अंतरानें पाणी देत जावें. कांद्याला दोन,तीन खुरपण्या द्याव्या लागतात. चार महिन्यानंतर कांही झाडांनां फुलगोंडे येऊं लागतात, ते काढून टाकावे सुमारें पांच महिन्यांनी पाती पिंवळ्या होऊन पडूं लागतात. त्या पडूं लागल्या म्हणजे कांदे काढण्यास तयार झाले म्हणून समजावें. कांदे उपटल्यानंतर त्यांच्या मुळ्या व शेंडे कापून कढावे म्हणजे कांदे विकण्यास तयार झाले. धारवाड जिल्ह्यामध्यें पावसाळी कांदे नोव्हेंबरांत तयार होतांत व हिंवाळी पीक मार्च एप्रिल महिन्यांत तयार होतें. धारवाड जिल्ह्यांत खरीप पिकाचें उत्पन्न दर एकरी सरासरी ५००० पौंड, देशावरील हिंवाळी पिकाचें (मध्यम काळ्या जमिनींतील) उप्तन्न२०,००० ते ३०,००० पौंड, देशावरील हलक्या जमीनीतील उत्पन्न १०००० पौंड पर्यंत असतें. दर एकरी खर्च सरासरी १२५ रूपये पर्यंत येतो. कांदा हा रोज लागणार्या खाद्यपदार्थांपैकी आहे. तो पौष्टिक व औषधि आहे. औषधांत पांढर्या कांद्याचा जास्त उपयोग करितात. कांद्याचें पोटीस करतात व बियांचें तेल काढतात.
कांद्याच्या पिकावर 'थ्रिप' नांवाची कीड पडतें. तिजवर राळ पाण्यात मिसळून शिंपडली असतां ती कमी पडते. कांद्याचा माल एकाच वेळीं बाजारांत आल्यानें भाव चांगला येत नाहीं, म्हणून तो साठवून ठेवणें फायदेशीर आहे. कोरड्या, थंड व हवाशीर अशा जागेंत कांदे विशेष नुकसान न होता साठवून ठेवितां येतात. कांदे साठविण्याच्या जागा गवताच्या छपरीच्या केलेल्या असतात व छपरीच्या भिंती कांबट्याच्या करितात, यामुळें त्यांत हवा चांगली खेळते. वरचेवर सोलणी करून सडके नासके कांदे निवडून काढावे लागतात. ढीग जितका पातळ असेल त्यामानानें कुबटणें (कुजकी घाण मारणें) व सडणें कमी होतें. याकरितां शिड्यांवर जवळ जवळ मजले करून त्यांवर कांदे साठविल्यास जागा कमी लागून कमी खर्चांत कांदे चांगले राहूं शकतात. उत्तरकोकणांत कांद्यांच्या वेण्या बांधून त्या टांगून ठेवितात. तीन चार महिने कांदे ठेविल्यास शेकडा २०/२५ भाग तूट येते.
कांद्याचें बी धरण्याकरितां निवडक कांदे घेऊन आक्टोबर नोव्हेंबर महिन्यांत खतावलेल्या जमिनींत (सबंध गड्डे अगर मुळाकडील अर्धा भाग) अठरा चौरस इंच अंतराने लावावे. प्रत्येक गड्डयांतून बरेचसे फुलांचे गोंडे येऊन सुमारें पांच महिन्यांत बीं तयार होतें. पाणी देणें, खुरपणे वगैरे मेहनत लागेल तशी करावी. एका एकरांत सुमारें दोनशें पौंड बीं तयार होतें, व एक पौंडाची किंमत आठ ते बारा आणे पर्यंत येते.
फोरकाय व व्हाक्विलियन या दोन विद्वानांनी कांद्याचे तेल काढून त्याचें रसायनशास्त्राच्या साहाय्यानें पृथक्करण केलें, तेव्हां त्यांत खालील पदार्थ आढळले. गंधक, अल्बूमेन, साखर, फास्फेरिक अॅसिड, चिक्कण पदार्थ, चुना व लिगनिन. कांद्यांचे तेल फार लवकर उडून जातें. तें उत्तेजक, मूत्रवृद्धिकारक व कफादि मलनाशक आहे. ज्वर, उदर-रोग, पडसें व खोकला यांवर कांदा फार गुणकारी आहे. तसेंच मुखरोगावर हा उपयोगी पडतो. गळवावर कांदा उकडून त्याचें पोटीस बांधावें. अपस्मार, फेंपरें यानें मनुष्य बेशुद्ध झाला तर कांदा फोडून हुंगावयास देतात. नाकांतून रक्त वाहूं लागलें असतांहि कांदा फोडून हुंगतात.
(संदर्भग्रंथ - वाट; पदे; मुंबई टाईम्स (३ मे १९१५), दुथी-फील्ड अॅंड गार्डन क्राप्स, मोलिसन - टेक्सटबुक इंडि., अॅंग्रिकल्चर ३.२११).