विभाग दहावा : क ते काव्य
कादंबरी - हा शब्द आपल्याकडे बाणभट्टाच्या कादंबरी या अदभुत कथेवरून रूढ झाला तथापि याची रूढता अलीकडील आहे. गोष्टी, कथा इत्यादि शब्द पूर्वीपासून होतेच. मराठीतील कथावाङ्मय हें नवीन नसून त्याची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. आणि मराठींतील पहिलें कथावाङ्मय संस्कृत कथावाङ्मयाच्या रूपांतरांनी निर्माण होऊन पुढें त्यावर पाश्चात्य संस्कार झाले. त्यामुळें प्रथमतः संस्कृत व प्राचीन प्राकृत कथावाङ्मय, त्यानंतर पाश्चात्य कथावाङ्मय व शेवटी मराठी कथावाङ्मय अशी निवेदनपरंपरा लावली तर ती अधिक स्वाभाविक होईल. प्रथमतः संस्कृत कथावाङ्मयाकडे वळूं.
यांत ''पौराण'' किंवा ''ऐतिहासिक'' आख्यानवाङ्मयाकडे दुर्लक्ष करून इतर वाङ्मयाकडेसच मोर्चा फिरविला पाहिजे (इतिहास पहा).
कथा वाङ्मय - भारतीयांच्या बुद्धींतून ज्या वाङ्मयेतिहासाच्या दृष्टीनें अतिशय मौलयवान गोष्टी निघाल्या त्यामध्यें गांधर्वकथा, कल्पित नीतिकथा व वृत्तांतपर कथा यांना स्थान द्यावें लागेल. इतर सुधारलेल्या लोकांपेक्षा भारतीयांमध्यें त्यांना फारच लवकर वाङ्मयीन दर्जा प्राप्त झाला. बौद्ध व जैन धर्मग्रंथांमध्यें त्यांनी महत्वाचें स्थान पटकावलें, एवढेंच नव्हे तर भारतीय काव्यकलेंतील इतर कोणत्याहि शाखेपेक्षां त्यांचें महत्व अधिक आहे असें मत प्रो. विंटरनिझ्झनें आपल्या भारतीय वाङ्मयेतिहासांत व्यक्त केलें आहे. गांधर्वकथेंत आश्चर्यकारक गुंतागुतीच्या मांडणीत आढळणारें कल्पनासातत्य, नीतिकथेंतील गंभीर व हास्यजनक प्रसंगांना लागणारें सुभाषित, विनोद व वृत्तांतकथा, तशीच अदभुत रम्यकथा आणि कादंबर्या यांतील नवीन व अफाट साधानसंपत्ति, ही सारी प्राचीन भारतीय कथावाङ्मयांत दिसून येतात. महाकाव्य आणि नाट्यवाङ्मय यांत कथावाङ्मयाइतकी विविधता दिसत नाही. एकस्वरूपी पात्रें घालण्याची भारतीय काव्याच्या इतर शाखांतून आढळून येणारी विशेष प्रवृत्ति या वाङ्मयांत आपणांस आढळत नाही. ज्यांच्या ठिकाणी व्यक्तिशः निरनिराळी लक्षणें आहेत अशा लोकांशी कथावाङ्मयांत आपली गांठ पडते. सद्भुणी राजे, धीरोदात्त पुरुष, सुंदर व सुस्वभावी राजकन्या आणि आदरार्ह आचार्य याच व्यक्ती केवळ महाकाव्य आणि नाट्य या वाङ्मयांतल्या प्रमाणें आपणांस या वाङ्मयांत आढळत नसून शेतकरी, कारागीर, व्यापारी, जुगारी, जादुगार, ठक तसेंच आत्मज्ञानी ब्राह्मण, ढोंगी बैरागी, वेश्या आणि वारांगना इत्यादि समाजांतील इतर अनेक दर्जाचे लोक आपण या कथावाङ्मयांत पाहतो. कित्येक निरनिराळ्या स्वभावांची पात्रें आपणांस प्राण्यांच्या कथामधून देखील आढळतात. जागतिक वाङ्मयांत स्थान या दृष्टीनें ऐतिहासिक महत्वाची एक गोष्ट म्हटली म्हणजे कोणत्याहि भारतीय काव्याच्या शाखेनें बाह्य वाङ्मयावर याच्याइतका परिणाम केला नाही, किंवा दुसरी कोणतीहि शाखा जागतिक वाङ्मयाला याच्याइतकी महत्वाची म्हणून वाटली नाही. भारतीय कथा एका लोकसमूहापासून दुसर्या लोकसमूहाकडे इतक्या लवकर भटकत गेल्या की, आपणाला यूरोप आणि आशियाखंडांतील बहुतेक सर्व प्रदेशांतून, इतकेंच नव्हे तर आफ्रिकन लोकांतहि त्या अंशरूपानें आढळतात. व याविषयी अतिशय आश्चर्य वाटतें. पुष्कळशा त्रुटित कथा हिंदुस्थानांतून इतर राष्ट्रांत व्यापारी व प्रवाशी यांच्या द्वारें तोंडोतोडी गेल्या असें केवळ नसून सबंधच्या सबंध हिंदी ग्रंथ भाषांतरांच्या द्वारें सामान्य व सार्वराष्ट्रीय मालमत्तेप्रमाणे बनले आहेत. कांही काळ तर असें समजण्यांत येत असे की, सर्व गांधर्वकथांचे उत्पत्तिस्थान आपला हिंदुस्थान देश आहे ! सार्वलौकिक कथांच्या ऐतिहासिक अभ्यासाच्या प्रगतीमुळें हा समज खोटा ठरूं पहात आहे. तरी अतिविसदृश लोकांतील पुष्कळशा गांधर्वकथा हिंदुस्थानांतूनच गेल्या आहेत यांत शंका नाही. भारतीय वाङ्मयांत कथावाङ्मय निर्माण होण्याच्या पुष्कळ आधी लोकांच्या तोंडी अनेक प्रकारच्या गोष्टी व धार्मिक किंवा साधारण शिक्षकांनी उपदेशाकरितां रचलेल्या थोड्याफार कल्पितकथा असत. गांधर्वकथा, प्रहसनें, आख्यायिका व गोष्टी त्याचप्रमाणें निरनिराळ्या ठिकाणी वाङ्मयीन ग्रंथांतून गोंविल्या गेलेल्या कल्पित कथा, या सर्व वाङ्मयांतील गोष्टींचे कांही अंशी उगम व कांही अंशी प्रतिकृती म्हणण्यास हरकत नाही. उत्पादक वर्ग व प्रयोजन या दोन्ही बाबतींत, पौराणिककथा व गांधर्वकथा यांत भेद आहे. गांधर्वकथा करमणुकीसाठी असून पुराणकथेचा उद्देश एखादें धार्मिक सत्य पटवून देण्याचा असे. गांधर्वकथा प्रामुख्यानें लौकिक उगमाची असून तिला वाङ्मयांत प्रवेश होण्यापूर्वी व तिचें प्राकृत वाङ्मयांत देखील अस्तित्व येण्यापूर्वी बराच काळ ती लोकांत प्रचलित होती. उलट नीतिकथेचें मूळ अस्तित्व वाङ्मयांत असून पहिल्यापासून संस्कृत काव्यांत तिचा अंतर्भाव होत असे. प्राण्यांच्या गांधर्वकथा जेव्हां म्हणीशी किंवा नीतिपर सूक्तांशी जोडण्यांत आल्या त्यावेळी कदाचित प्राण्यासंबंधी नीतिकथा प्रचलित असणेंहि शक्य आहे. पुष्कळ म्हणीतून थोडक्यांत नीतिकथा गोविलेली दिसते. आपल्या कथाग्रंथांतून पुष्कळवेळा गोष्टीच्या शिरोभागी त्यांची नांवें म्हणून अशा म्हणी योजीत. याच कारणामुळें भारतीयांच्या नीतिपर पद्यांचा एक महत्वाचा भाग म्हणून म्हणींच्या संग्रहाकडे पाहण्यांत येतें.
कथावाङ्मय हें गद्य व पद्य यांचे मिश्रण होऊन तयार झालें आहे. गद्यभागांत कांही उपदेशपर म्हणी व कांही गांधर्वकथा व नीतिकथा आहेत. अगदी अलीकडचे कथाग्रंथ सबंधच्यासबंध पद्यांत रचलेले आपणास आढळतात. सबंध गद्यांत लिहिलेले ग्रंथ फार कमी. अद्भुतरम्य कथांतून कांही थोडी पद्यें मधून मधून घातलेलीं असत.
सर्वांत प्राचीन अशा गांधर्वकथा व वृत्तांतपर कथा मुख्य वाङ्मयांत नसून त्यांचा उगम श्रौतस्मार्त वाड्मयात शोधणें फारसें फायदेशीर होणार नाही. वैदिक ग्रंथांतून आढळणार्या कांही गांधर्वकथा, वैदिकपुराणकथा व आख्यायिका यासंबंधीच्या काव्यांत मोडतील व त्याचप्रमाणें उपनिषदांत दिसून येणार्या थोड्याशा प्राणिकथा कल्पितनीति कथांच्या सदरांत पडण्यासारख्या नाहींत असें विंटरनिझ्झ समजतो ''आपणाला हा पांढरा कुत्रा सुक्ते गाऊन अन्न मिळवून देईल या आशेनें त्याच्या भोवती इतर कुत्रे जमले आहेत.'' ही कथां दोन हंसकांच्या संभाषणावरून धर्मनिष्ठ रैक्वाकडे जातीचें गेलेलें लक्ष, किंवा सत्यकामाला एक बैल, एक हंस, एक पाणबुडा पक्षी यांपासून एकामागून एक मिळालेले बोध यांच्या कथांस नीतिपर कल्पित कथावाङ्मयांत विंटरनिझ्झ नाही.
भारतीय वाङ्मयांतील अति जुनाट नीतिकथा महाभारतात सापडतील. भरहूत स्तूपावरील चित्रांवरून ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकांत कल्पित नीतिकथा हिंदुस्थानांत होत्या असें सिद्ध होतें. पतंजलीच्या काळांतील पुरावा त्याच्या 'काकतालीयम' 'अजाकृपाणीयम' इत्यादि शब्दरूपांवरून मिळतो. उपलब्ध असणारें भारतीय कथावाङ्मय पुढीप्रमाणें वर्गीकृत होईल :-
(१) धार्मिक किंवा अन्य कारणांकरितां रचिलेल्या मोठ्या कथासमूहाचे घटक म्हणूनच केवळ ज्या आपणाला माहीत आहेत, पण ज्या अगदी आरंभी केवळ तोंडातोंडी पुढें चालत आल्या असें गांधर्वकथा, वृत्तान्त आणि प्रहसनें यांचें वाङ्मय प्रथम उल्लेखिलें पाहिजे. ही वृत्तें प्रथम संस्कृतांत नसून स्थानिक भाषांतून लिहिली गेली असावीत.
(२) एक किंवा जास्त धार्मिक चळवळींकरितां तयार केलेले कथासमूह, यांत जातकें आणि इतर बौद्ध व जैन कथाग्रंथ येतात. हा महत्वाचा वर्ग होय.
(३) राजकीय ज्ञान व जगाची माहिती देण्याच्या इराद्यानें संस्कृतात रचलेली पंचतंत्रासारखी पुस्तकें.
(४) ज्यांत मधूनमधून गोष्टी घातल्या आहेत अशी अद्भुतरम्य कथेच्या स्वरूपांत केवळ मनोरंजनाकरितां रचलेले वृत्तान्तपर ग्रंथ. उदाहरणार्थ, बृहतकथा व त्याच्या पुढील आवृत्ति, वेतालपंचविंशति शुकसप्तति, इत्यादि. प्रथम ही पुस्तकें प्राकृतांत व नंतर संस्कृतांत झाली.
(५) संस्कृत गद्य कादंबर्या व अद्भुतरम्यकथा. उदाहरणार्थ, दशकुमारचरित, वासवदत्ता, कादंबरी वगैरे.
शेवटल्या तीन वर्गांतील ग्रंथ हे समुच्चयात्मक नसून स्वतंत्र ग्रंथ होत. त्यांच्या कर्त्यांनी पहिल्या दोन वर्गांकडून कांही अंशी कथाविषय मिळविले असतील तरी पण नवीन ग्रंथ निर्माण करण्याच्या बुद्धीनें त्यांनी पदरच्या बर्याच कल्पना घातल्या आहेत. 'गोष्टींत गोष्ट' घालण्याची पद्धत अशा वृत्तान्त ग्रंथांतून सार्वत्रिक व लोकप्रिय दिसते. एका कथेच्या चौकटीत अनेक लहान मोठ्या गोष्टी बसविल्या असून पुन्हां यांतील प्रत्येक गोष्ट एक किंवा अधिक गोष्टींनां चौकट म्हणून असते. पण भारतीय कथाग्रंथांच्या सर्व प्रकारातून गांधर्वकथा, कल्पित नीतिकथा व वृत्तान्तपरकथा एकमेकींच्यावळ जवळ ठेवलेल्या आपण पाहतो. केवळ मानवी अवस्थासंबंधीच्या गोष्टीमधूनसुद्धां अमानुष प्राण्यांच्या आश्चर्यकारक गांधर्वकथा त्याचप्रमाणें मनुष्यगुणारोपित प्राणिकथा आपणास एकसारख्या आढळून येतात. ज्या ठिकाणी शिक्षणाचें कार्य करावयाचें असेल त्या ठिकाणी नीतिकथा व ज्या ठिकाणी केवळ मनोरंजनाचेंच कार्य असतें त्या ठिकाणी गांधर्वकथा प्रामुख्यानें पुढें असतात. म्हणून नीतिकथा गांधर्वकथेपेक्षां लौकिककथाश्रयी कमी असतात. एखादें राजकीय तत्व किंवा व्यावहारिक शहाणपण शिकविण्यार्या गोष्टी व नीतिकथा बहुधा कविनिर्मित असतात, व त्यांस खर्या अर्थानें लोकप्रिय म्हणता येणार नाहीत. मात्र कालांतरानें पंचतंत्र किंवा ईसापच्या गोष्टी यांप्रमाणें त्या लोकांना आवडूं लागतील. याच्या उलट गोष्ट गांधर्वकथांची आहे. धार्मिक कल्पना आणि पुराणकथा, लोकांची जादूविद्या व गोष्टी सांगणार्या स्त्रीपुरूषांचे कल्पनातरंग यांपासून म्हणजे प्रत्यक्ष लोकात्म्यापासून गांधर्वकथेचा जन्म झाल्यानें गंधर्वकथा बहुधा लोकप्रिय असते. संस्कृत भाषेंत सर्व प्रकारच्या वृत्तांतपर गोष्टींनां आख्यायिका, कथा ही नांवे आहेत. जरी काव्यशास्त्रांत आख्यायिका व कथा याच्यांतील भेद दाखविण्याचे प्रयत्न झाले आहेत तरी त्यांच्या उपयोगासंबंधी शास्त्रकारांत एकमत नाही.
पंचतंत्र - थिओडर, बेन्फे आणि हरटेल यांनी पंचतंत्राचा इतिहास हुडकून काढला आहे. अर्थशास्त्र किंवा नीतिशास्त्र यांत आढळणारे व्यावहारिक शाहणपण व शासन शास्त्राची तत्वें, ही कल्पित नीतिकथा व न्यायसूत्रें यांच्याद्वारें शिकविण्याचा पंचतंत्राचा मूळ हेतू होता. आरंभी राजपुत्रांकरितां एक ग्रंथमालिका तयार करण्याचा कर्त्यांचा उद्देश दिसतो. पण पुढें सर्व दर्ज्यांच्या तरूणांकरितां म्हणून हें पुस्तक प्रचारांत आलें. याच्या मागाहूनच्या प्रतीतून शुद्ध नैतिक कथा घुसडण्यांत आलेल्या दिसतात. मूळप्रत जरी उपलब्ध नाहीं, तरी पांच जुन्या प्रती सापडल्या आहेत. पैकी एक काश्मीरांतील असून दुसरी इ.स. ५७० च्या सुमाराची पेहेलवी भाषेंतील आहे, आणखी एक दक्षिण हिंदुस्थानांत सापडलेली आहे. एकमेकांशी पुष्कळ अंशी जुळणार्या या पाच प्रतीपैकी ''तंत्राख्यायिक'' नांवाची काश्मिरी हस्तलिखित प्रत मूळ ग्रंथाशी बरीचशी जुळती दिसते. त्यांतील पांडित्यदर्शक गद्यसंस्कृत आणि पद्यभागांचें कृत्रिम छंद, ही पाहतां असें वाटतें की हा लौकिक कथांचा समूह नसून एखाद्या क्रुशल कवीनें रचिलेला ग्रंथ आहे. यांतील विषय जुने असले तरी स्वरूप नवें आहे. तंत्राख्यायिकांचा बौद्धसंप्रदायाशीं कांही एक संबंध आढळून येत नाही. तथापि कर्त्याचा नैतिक दृष्टिकोन अगदी निराळा आहे. कुटुंबवत्सलाचें सद्भुण, आतिथ्य व मित्रांमधील एकनिष्ठपणा प्रशंसिली असली तरी, राजा आणि योद्धा ह्यांचे नीतिधर्म विशिष्ट असून बौद्ध संप्रदायाशी ते जुळत नाहीत. राजा योद्धा हे अहिंसेनें बांधले गेले नाहींत; व त्यांनी शरणागताला आश्रय मात्र द्यावा.
तंत्राख्यायिक संशोधिलें जाण्यापूर्वी हिंदुस्थानांतल्या वायव्य भागांतील प्रत अतिशय लोकप्रिय असून यूरोप खंडांत देखील तिचा सर्वत्र प्रसार झाला होता. इ.स. ९ व्या किंवा १० व्या शतकाच्या उत्तरार्धांत एखाद्या जैनानें ही प्रत तयार केली असावी. हींत नीतिकथा जास्त असून मूळ ग्रंथांत नाहीत अशा अनेक गांधर्वकथाहि घुसडल्या आहेत. त्यांतील कोष्ट्याची गोष्ट विशेष प्रसिद्ध आहे. त्यानें राजकन्या मिळविण्याकरितां विष्णूचें सोंग घेतलें. पण शेवटी विष्णूनें त्याच्या देहांत शिरून राजाच्या गर्वामुळें उत्पन्न झालेला युद्धप्रसंग टाळला. मुत्सद्देगिरीसबंधी अनेक वचनें या प्रतींत आहेत. बाराव्या शतकाच्या अखेरीस पूर्णभेद नांवाच्या एका जैन यतीनें तिच्यावर बरेच परिश्रम करून दुसरी एक प्रत रचिली. या दोन जैन प्रती हिंदुस्थानांत सर्वत्र पसरलेल्या असून संस्कृत व देशी भाषांतूनहि प्रती तयार झाल्या आहेत. १६५९-६० त मेघविजय नांवाच्या जैन यतीनें या नवीन प्रतीपैकी एकीची मुलांनां शिकविण्याला उपयोगी पडावी म्हणून नवी संक्षिप्त रचना केली. तिचें नांव पंचाख्यानोद्धार असें होतें. भारतीय आणि ग्रीक नीतिकाव्य यांतील संबंध निश्चित करण्याच्या कामी या पुस्तकांत नवीन घातलेल्या गांधर्व कथा फार महत्वाच्या आहेत. या प्रतीचें वैशिष्टय म्हणून दिसणार्या रत्नपालाच्या कथा जैन दंतकथा आहेत तरी कांही अंशी सामान्य हिंदु कथांवर त्यांची उभारणी झाली आहे.
हितोपदेश - (इ.स. ९ वें ते १४ वें शतक यांमधील काळ) हा कथासमूह अधिक अर्वाचीन असून त्याचा कर्ता जो नारायण यानें पंचतंत्र व ''दुसरा एक ग्रंथ'' यावरून हा हितोपदेश तयार केला आहे. याचे चार अध्याय असून त्यांत अनुक्रमें मित्रलाभ, सुहृदभेद, विग्रह व संधि असे चार विषय प्रतिपादिले आहेत. यांतील लढाई करणारे प्राणी घुबडे किंवा कावळे नसून एक हंस व एक मोर आहे. कल्पित नीतिकथांतून सुद्धां या पुस्तकाचें राजकीय स्वरूप झांकत नाही. यूरोपीय भाषेंतून याची अनेक भाषांतरें असून अल्बेरूणी यास एक हिंदी भाषांतर माहीत होते.
जागतिक वाङ्मय आणि पंचतंत्र - इ.स. ६ व्या शतकांत पेहलवींत, नंतर सिरियन भाषेंत पंचतंत्राचें भाषांतर झालें. ''कालील आणि दिम्र'' या नांवाचे अरबी भाषंतर ८ व्या शतकांत पुढें आलें. दहाव्या किंवा ११ व्या शतकांत अरबींतून ग्रीक भाषेंत, नंतर इटालियन, लॅटिन, जर्मन, आणि स्लाव्ह या भाषांतून भाषांतरे निघाली. १२ व्या शतकाच्या आरंभी रब्बी जेएल याचें हिब्रू भाषांतर व या हिब्रूची इतर भाषांतरे होऊन १४८३ पासून जर्मन वाङ्मयावर त्याचा परिणाम होत गेला. जर्मन भाषांतरांची डॅनिश, आईसलंडिक व डच भाषांत भाषांतरें निघाली. १३ व्या शतकांत एक दुसरें हिब्रू भाषांतर होऊन सर्व यूरोपभर या भारतीय कथांचा फैलाव झाला. सर्व मध्ययुगांत यूरोपीय कथालेखकांच्या रचनांतून यांचे मागमूस आढळतात. ज्या कथा फार दूरवर फिरून इतर देशांतून रुजल्या त्या पुढील होत - एक ब्राह्मण आपल्या मुलाला मुंगसानें मारलें अशा समजुतीवर त्या प्राण्याला मारतो, वास्तविक मुंगसानें एका सापास मारुन ब्राह्मणाच्या मुलाचा जीव वांचविला असतो. दुसरा एक ब्राह्मण आपल्या पिष्टपात्रापासून येणार्या उत्पन्नाचा अजमास करून हवेंत भावी सौख्याच्या इमारती बांधतो, पण त्यांचे भांडे त्याच्याच हातून फुटून पीठ सांडून जातें. एक पक्षी (टिटवी) आपल्या आंगावर आकाश कोसळूं नये म्हणून आपला एक पाय वर उचलून घेतो इ.
भारतीय व ग्रीक कल्पित नीतिकथांतील संबंध बरोबर निश्चित करतां येत नाही. सर्वांत प्राचीन भारतीय नीतिकथा ख्रिस्तपूर्व ४ थ्या किंवा ५ व्या शतकांतल्या होत असें अनुमानानें सांगतां येईल. कांही थोड्या कथा मात्र ख्रिस्तपूर्व ३ र्या शतकांतल्याच असें नक्की सांगता येतें. ग्रीक नीतिकथांचा आरंभ हेसीऑईडपासून धरतां येतो. ख्रिस्तपूर्व ५ व्या आणि ६ व्या शतकांत ईसापमुळें ग्रीक प्राणिकथा कळसास पोहोंचली. तथापि पुढें बराच काळपर्यंत ग्रीक नीतिकथा वाङ्मयाची एक विशिष्ट शाखा म्हणून प्रगत झाली नाही. जेव्हां हिंदुस्थान आणि ग्रीस यांच्यांत बौद्धिक दळणवळण सुरू झालें तेव्हां कथांचीहि प्रत्यक्ष देवघेव झाली असावी, असें म्हणण्यास काही हरकत नाही.
बृहतकथा - भारतीय कथावाङ्मयांतील अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे बृहत्कथा होय. इ.स. ३ र्या शतकांत किंवा थोडा काल अगोदर गुणाढ्यानें हा ग्रंथ रचिला. यांत उदयन राजा आणि त्याचा मुलगा नरवाहनदत्त यांची धाडशी कृत्यें वर्णिली आहेत. गुणाढ्य ही खरी व्यक्ति असली तरी त्याच्या चरित्राविषयी कांही एक माहिती नाही. तो शातवाहन राजाचा मंत्री होता. या आख्यायिकेंत ऐतिहासिक तथ्य नाही. त्याचें जन्मस्थान म्हणून समजलें जाणारें प्रतिष्ठान शहर दक्षिणेंतील नसून बहुधा उत्तरहिंदुस्थानांतील असावें असें मत विंटरनिझ्झ व्यक्त करतो पण त्यासंबंधाने आम्हांस समाधान वाटत नाही. गुणाढ्याचा हा ग्रंथ पैशाची भाषेंत आहे. त्याच्या दोन प्रती आहेत. काश्मिरी प्रतींत क्षेमेंद्राची बृहतकथामंजरी व सोमदेवाचें कथासरितसागर हे दोन पद्यपाठ येतात. आणि नेपाळी प्रतीत बुधस्वामिकृत ''बृहतकथाश्लोकसंग्रह'' हें अर्धवट असें एकच पुस्तक आहे. बुधस्वामीच्या ग्रंथांत ग्रीक कारागिरांचा जो उल्लेख आहे त्यावरून हा बहुधा ख्रिस्ती शकाच्या पहिल्या शतकांत रचिला गेला असावा असें दिसते. हा ग्रंथ अर्धवट आहे हे आपले दुर्देव होय. कारण फारच थोड्या भारतीय ग्रंथांतून आढळणारी विनोदी वृत्ति आणि संसाराचा आशाजनक आलोक यांत दिसतो. लोकांची रहाणी, जैनांची रहाणी व शिल्पी वर्गाचें चरित्र ही यांत अतिशय स्पष्टपणें दाखविलीं आहेत.
क्षेमेंद्राची बृहतकथामंजरी इ.स. १०३७ च्या सुमारास लिहिली गेली असावी. क्षेमेंद्राचा उद्देश मूळ ग्रंथाचा बराच संक्षेप करण्याचा होता. पण त्यानें कांही ठिकाणी अर्थबोध होणार नाही इतका जरी संक्षेप केला आहे तरी श्रृंगारिक प्रसंग व धार्मिक भाग फार पाल्हाळ करून दिला आहे. क्षेमेंद्राच्या ग्रंथीच्या मागून सुमारें ३० वर्षानीं, म्हणजे १०६३ आणि १०८१ यांमधील काळांत, सोमदेवाचा कथासरितसागर रचिला गेला आहे. हाहि ग्रंथ काव्याच्या दृष्टीनें बराच महत्वाचा आहे. दोघांहि कवींचा आधारग्रंथ एकच, पण सोमदेवाची भाषा बरीच प्रौढ असून, कुशल व जोरदार अशा उत्तम उत्तम भारतीय कवीमध्यें तो एक गणला जातो. सुमारें ३५० नवीन गोष्टी ज्या यांत घातल्या आहेत त्या मुख्य कथाभागाहून जास्त मनोवधक आहेत. त्यामध्यें मूढ व शठ यांच्या कांही थोड्या गोष्टी आपणांस आढळतात. उदा. मूलदेव आणि त्याचा शहाणा मुलगा ही माणसें ज्यांत देवांनां फसवितात अशा गोष्टी आणि दुराचारी बायकांच्या गोष्टी वगैरे. हिंदुस्थानांतील धार्मिक परिस्थिति व स्त्रियांचा दर्जा यासंबंधी बरीचशी माहिती करून देणारा हा ग्रंथ म्हणता येईल.
वेताळ पंचविशतिका - हा भाग बृहतकथेच्या काश्मिरी प्रतीत आहे. पण शिवदास व जंभलदत्त यांखेरीज सोमदेव आणि क्षेमेंद्र यांचे वेताळ पंचविंशतिकेवरचे पाठ आपणापुढें आहेत. यांतील गोष्टी बौद्ध किंवा जैन नसून सामान्य निवृत्तिपर वाङ्मयांतील आहेत. जादूविद्या त्यात बरीचशी बोकाळलेली दिसते. जादूविद्या हस्तगत करण्याच्या कामी विक्रमसेन राजाला मदत देणार्या वेताळानें या गोष्टी सांगितल्या आहेत.
सिंहासनद्वात्रिशिका - हा वेताळपंचविशतिकेप्रमाणें पण मागाहून रचिलेला असा राजा विक्रमासंबंधी बत्तीस गोष्टीचा समूह आहे. याच्या अनेक पाठांपैकी जो एक जैन पाठ आहे त्याला जैननीतितत्वांचें तिखटमीठ लाविलें असून प्रत्येक गोष्टीच्या शेवटी एका पद्यांत गोष्टीचें ताप्तर्य दिलेलें असते. हें पुस्तक ११ व्या शतकाच्या अगोदचें असूं शकणार नाही.
भारतीय लोकप्रिय वाङ्मयांतील आवडत्या गोष्टीमध्यें ''माधवानल-कामकंदला-कथा'' ही एक होय. भट्ट विद्याधर याच्या आनंद नांवाच्या शिष्यानें एक ब्राह्मण व एक नर्तिका यांची ही प्रेमकथा लिहिली आहे. ही गद्यकथा करूणरसपूर्ण आहे. विक्रमादित्याची कीर्ती वर्णन करणारा आणखी पद्यकथासमूह म्हणजे 'विक्रमोदय' होय. यांत शुकरूपांत कुशल न्यायाधिश म्हणून राजाला दाखविलें आहे. अनंताचें 'वरीचरित्र' हें चोपडें शक्तिकुमाराच्या शालिवाहन राजप्रतिनिधीचा सहकारी जो शुद्रक त्याची धाडशी कृत्यें वर्णन करते. आकारांत महाकाव्यासारखें हें दिसत असलें तरी त्याचें अंतरंग वृत्तांतमय आहे.
शुकसप्तति - प्रभावती नांवाच्या एका दुराचारी स्त्रीला एका पोपटानें सांगितलेल्या ७० गोष्टींचे हें पुस्तक अर्वाचीन असून त्यांतील बहुतेक गोष्टी बायकांविषयी आहेत. चौदाव्या शतकाच्या आरंभी फारशीत याचे भाषांतर झालें. याच्याच एका श्लोकाबद्ध तरजुम्याचें नांव ''दिनालापनिकशुकसप्तति'' असें आहे. सिंदबादची अरबी गोष्ट पुष्कळ अंशाने शुकसप्ततीशी संबंद्ध दिसते. पण ''अरबीसुरस कथा'' (अरेबियन नाईटस) हिंदी उगमाच्या आहेत की नाहीत याविषयी जबरदस्त शंका आहे. मूळ हिंदी गोष्टीची नक्कल म्हणून एखाद्या फारशी कवीनेंहि हा ग्रंथ रचला असावा.
अर्वाचीन काळांतील कांही संस्कृत वृत्तांतग्रंथ देशी भाषातून भाषांतरलेले असावेत. उदाहरणार्थ, 'भारतकद्वात्रिशिका' यांत भिक्षा मागणार्या जतींच्या किंवा भारतकांच्या गोष्टी व शिवदासकृत कथार्णव यांत चोरांच्या गोष्टी आहेत, हरिभद्रकृत धूर्ताख्यान यांत महाभारत आणि रामायण यांतील कथांची प्राकृतांत टर उडविली आहे, पुरूषपरीक्षा - कर्ताविद्यापति (१४ वें शतक), यांत पुरूषाचे गुण सांगणार्या ४४ नैतिक कथा आहेत.
वृत्तांतग्रंथांमध्यें ऐतिहासिक पुरूषांच्या आख्यायिका सांगणारे ग्रंथहि घेतले पाहिजेत. मेरुतुंगाचे 'प्रबंधचिंतामणी' राजशेखराचें 'प्रबंधकोश', बल्लाळाचें भोजप्रबंध' ही पुस्तके या वर्गांत येतील.
कृत्रिम अदभुतरम्यकथा - संस्कृत गद्य काव्यातील विषय गांधर्वकथांतील विषयांसारखेच असतात. दंडीच्या दशकुमारचरितांत दहा राजपुत्रांची धाडशी कृत्यें सांगितलेली आहेत. एक कळवंतीण एका ॠषीला कशी मूर्ख बनवून सोडिते, यासारख्या कपटाच्या व अप्रामाणिक लोकांच्या आयुष्यक्रमावर मजेदार प्रकाश पाडणार्या गोष्टी यांत आल्या आहेत. कळवंतिणीचा पेशा ईश्वरनिर्मित असून राजाश्रयानें त्या रहातात असें यांत दाखविलें आहे.
सुबंधूच्या वासवदत्तेचा (इ.स. ६ वें किंवा ७ वें शतक) भासाच्या याच नांवाच्या नाटकाशी कांही एक संबंध नाही. वासवदत्ता व कंदर्पकेतु यांची ही प्रेमकथा असून या काव्यप्रबंधाची उच्च अलंकारिक भाषा मुळींच भाषांतर करण्याजोगी नाही. इ.स. ६०६ ते ६४८ या काळांत होऊन गेलेल्या बाणभट्टानें हर्षचरित्र व कादंबरी या दोन अद्भुत रम्य कथा लिहिल्या. हर्षाच्या वेळची राजकीय व धार्मिक परिस्थिति दाखविणारी 'हर्षचरित' ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. कादंबरी ही प्रेमकथा बापाच्या मृत्यूमुळें अपुरी राहिली होती ती त्याचा मुलगा भूषणभट्ट यानें पुरी केली. कादंबरी आणि चंद्रापीड यांच्यामध्यें प्रथमदृष्टिपातानें उत्पन्न झालेलें प्रेम हींत वर्णिले असून त्यावेळच्या शैवपंथीय लोकांच्या धार्मिक आयुष्यक्रमावर हिनें बराच प्रकाश पडतो.
भारतीय व ग्रीक अद्भुत कथांचा परस्परसंबंध :- वासवदत्ता आणि कादंबरी या जातीच्या कादंबर्यातून स्वतंत्र भारतीय वैशिष्ठय दिसून येते असल्यानें भारतीय कादंबर्यांच्या आधीं जन्म पावलेल्या ग्रीक कादंबर्यांचा त्यांवर परिणाम झाला असेल हें संभवनीय दिसत नाही. वनस्पतीमधील प्रेम व विवाह दाखविण्याची गोष्ट मात्र दोघांचा पुष्कळच सारखेपणा दाखविते.
चंपु : - गद्य आणि पद्यभाग एकत्र जोडून एक ग्रंथांत करण्याच्या या प्रकाराला काव्याची एक विशिष्ट शाखा म्हणता येईल. चंपूमध्यें गद्य आणि पद्य यांचे हेतू एकच असतात. या रचनेचीं जुनीं उदाहरणें म्हणजे बौद्धाजातकमाला, राजा समुद्रगुप्तावरील हरिसेनांची प्रशस्ति (सुमारें इ.स. ३४५) ही होत. अतिशय सुप्रसिद्ध चंपु म्हणजे त्रिविक्रमभट्टाचा नलचंपु किंवा दमयंतीकथा होय. शिवाय भोजराजाचा रामायणचंपु आणि अनंताचा भारतचंपु. सोळाव्या शतकांतील अकबराच्या कारकीर्दीत पारिजातहरणचंपु आणि मंदार मरंदचंपु हे लिहिले गेले. त्याच शतकांत नारायणभट्टानें स्वाहासुधाकरचंपु व १८ व्या शतकांत शंकरकवीनें शंकरचेतोविलासचंपु रचिला. या शेवटल्या चंपूंत चेतसिंह राजाचे पराक्रम वर्णिले आहेत.
पश्चिमात्य कादंबरीसंबंधाचें वाङ्मय - हा साहित्याचा प्रकार पाश्चात्यांत चांगलाच वाढला असून, यांत कर्त्याच्या समकालीन भूतकालीन समाजाच्या स्वभावाचें व चालीरीतीचें सूक्ष्म निरीक्षण करून, त्यावरून बनविलेल्या खर्या किंवा काल्पनिक कथानकांचा समावेश होतो. या कथानकांस ऐतिहासिक प्रसंगांची अगर समाजाच्या निरनिराळ्या अनुभवांची जोड कांही एका प्रमाणांत असावी लागतें हा साहित्यसेवेचा प्रकार पश्चिमेकडेहि बहुशः अर्वाचीनच आहे. देशांत स्वास्थ्य नांदलें असतां हें वाङ्मय निर्मित होतें. यापासून समाजांत धार्मिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इत्यादि सुधारणांची भावना व (कांही एका परिणामापर्यंत ) तिच्या अनुरोधानें प्रयत्न होऊं शकतो, म्हणजे समाजसुधारणेच्या अनेक अंगांपैकी हेंहि एक छोटेसें अंग होय. करमणूक करणें, सृष्टीच्या गूढ तत्वांचा व नियमांचा जेणेंकरून सहज बोध होईल अशी रचना करणें हा सुद्धां कादंबरीचा एक हेतु असतो. पूर्वी या प्रकारचें साहित्य कोणत्याहि देशांत कमीच होतें. यूरोपमध्यें १८ व्या शतकांतनंतर लेखकांनी या कामी प्रयत्न केला व १९ व्या शतकांत साहित्यांतील ही एक महत्वाची गोष्ट आहे असें मानण्यांत येऊं लागलें. कादंबर्या लिहिण्यास साधारण प्रतीची बुद्धि लागते असें कांहीचें म्हणणें आहे, परंतु समाजावर जेणेंकरून परिणाम होऊन कांही तरी कार्य घडविण्याची ज्यांस इच्छा असेल अशा कादंबर्यांच्या लेखकांची बुद्धि मात्र बर्याच उच्च कोटीतील असावी लागते. प्रख्यात कवीचे काव्य व प्रख्यात लेखकांची कादंबरी यांत वस्तुतः भेद नाही. परंतु अशा दर्जाच्या कादंबर्या थोड्या निपजतात.
प्राचीन - यूरोपमध्यें शिकंदराच्या वेळेपासून या वाङ्मयास प्रारंभ झाला असें ठोकळरीत्या मानितात. ख्रि.पू. दुसर्या शतकांत आरिस्टीडी यानें सहा भागांची जी ''मिलेसीआका'' नांवाची गोष्ट लिहिली आहे, तीच यूरोपांतील पहिली कादंबरी असें म्हणतात. इच्यांत त्यावेळच्या समाजाच्या प्रणयकथा विनोदी व लोषात्मक भाषेंत दिल्या होत्या. यूरोपांत ल्युसिअन (ख्रि.पू. २ रें शतक), हेलिओडोरस (ख्रि. ४ थें शतक), लाँगस (६ वें शतक), वगैरे प्राचीन कादंबरीकार झाले; पैकी, लाँगस याच्या कादंबर्या म्हणजे उपलब्ध प्राचीन ग्रीक कादंबरीवाङ्मयाचा एक खासा नमुना होय; 'डाफनी' आणि 'चलोई' या त्याच्या मुख्य नवलकथा असून त्यांत तत्कालीन धनगरी समाजाचें दृश्य पहावयास सांपडतें. लॅटिन भाषेंतील अप्युलीअसची सुप्रसिद्ध कादंबरी ''सुवर्णगर्दभ'' अशा अर्थाच्या नांवाची आहे. रोमनसाम्राज्यकालांत गद्य वाङ्मय सुरू झालें; परंतु त्यांत कादंबर्यानीं कितपत भाग घेतला होता तें नक्की समजत नाही. मात्र श्लेषात्मक पद्धतीचा या वेळी प्रचार झाल्याचें आढळून येतें. पेट्रोनिअसच्या 'सत्रिकन' कादंबरींत ही पद्धति अनुसरली असून शिवाय तत्कालीन समाजाच्या चालीरीतीचें सूक्ष्म व काळजीपूर्वक केलेलें परीक्षणहि तींत गोविलें आहे.
इटली '' अर्वाचीन कादंबर्याच्या जनकत्वाचा मान यूरोपांत उत्तर-इटलीला आहे. तेराव्या शतकांत इलनेव्हेलिनो या नांवाच्या नवलकथा येथें उत्पन्न झाल्या (इंग्रजी नॉव्हेल हा शब्द ल्याटीन नॉव्हेलस-नोव्हस म्हणजे नवीन (संस्कृत नव, नवल)या धातूपासून निघालेला आहे). या गोष्टीत स्त्रीदाक्षिण्य, पौराणिक गोष्टी, नीति, अनीति वगैरे गुणावगुणांच्या आधारें कथा सांगितलेल्या आहेत. तसेंच त्या वेळच्या समाजाचीं, बायकांविषयींची, उपाध्यायवर्गविषयक, शेतकर्यासंबंधाची व इतर चालीरीतींची दिग्दर्शक मतें यांत आलेली आहेत. पहिला इटालियन कादंबरीकार, फ्रांसिस्को बार्बेरिनो (१३४८) हा असून, याची प्रख्यात कादंबरी डॉ.क्युमेंटिद अमूर ही होय. यानंतर बोक्याचियो, सच्चेही, फिओरेंटिनी, (यानें ५० कादंबर्या लिहिल्या असून, प्रख्यात शेक्सपिरनें आपल्या ''व्हेनिसचा व्यापारी'' या नाटकास याच्या एका कादंबरीचा आधार घेतला होता), मॉसुशिओ हा दक्षिण इटलीचा रहिवासी असून अतिशय स्वतंत्र बुद्धीचा होता. याच्या कादंबर्यांत मत्सरी नवरे, जारिणी स्त्रिया व व्यभिचारी उपाध्ये यांची चरित्रें रंगविलेली आहेत. कॉर्नझनो, ब्रेव्हिओ व बँडिलो हे प्रख्यात कादंबरीकार होऊन गेले. पैकी सर्व इटालियन कादंबरीकारांत शेवटचा बँडिलो हा श्रेष्ठ होऊन गेला. याच्या कादंबर्यांची यूरोपांतील सर्व भाषांतून भाषांतरें झाली आहेत. याच्या नंतर नांवाजलेला इटालियन कादंबरीलेखक असा झालाच नाही. यानंतर १८ व्या शतकांत जर्मन कादंबरीलेखनाच्या धर्तीवर इकडे कादंबर्या होऊं लागल्या. या कालांतील प्रख्यात व लोकप्रिय लेखक मन्झोनी (१८७३), व्हर्गा व सेराओ (१८५६) हे होत.
फ्रान्समध्यें १४ व्या शतकांपर्यत पौराणिक कथांवरच मुख्य भर होता. त्यानंतर इटलीच्या कादंबर्यांची भाषांतरें व त्याच्या आधारें रचलेल्या गोष्टी प्रचारांत आल्या. या वेळचा सेल म्हणून एक लेखक होऊन गेला. पंधराव्या व सोळाव्या शतकाच्या अर्धापर्यंत फ्रान्समध्यें काल्पनिक साध्या गद्यगोष्टी प्रचारांत होत्या. त्या वेळचे बोनाव्हेंचूर, बेरोआल्दे हे लेखक होत. राबेले हा पहिला फ्रेंच ऐतिहासिक कादंबरीलेखक होय. इ.स.१६१० मध्यें उर्फे यानें पहिली प्रेमविषयक कादंबरी लिहिली. हीत प्रत्येक पात्राचा स्वभाव उत्तम तर्हेनें उठवलेला आढळतो. गॉम्बरव्हिल (१६७४) व गाँबेल्ड यांच्या कादंबर्यांत धाडस, भावनोत्कटता वगैरे गुण आढळतात /स्कुडेरी (१७००) नांवाची एक स्त्रीहि नांवाजलेली लेखिका झाली. इनें मनुष्यस्वभावाचें चित्र रेखाटलेलें आहे. तिच्याचसारखी फायेट नांवाची दुसरी एक लेखिका (सार्या यूरोपांत प्रख्यात अशी) होऊन गेली. तिनें निसर्गाचा परामर्श घेऊन आपल्या वेळच्या उमरावांच्या स्थितीरीतीचें वर्णन केलेलें आहे. फाँटेन, फेनेलन, लेसेज (हा विनोदी), मॅरिव्हो (मानवीवृत्ति व ऊर्मीचा अभ्यासक) वगैरे प्रसिद्ध फ्रेंच लेखक झाले. व्होल्टेरच्या कथा व वरील लेखकांच्या कादंबर्या यांचा मात्र एकाच वर्गात समावेश होऊ शकत नाही. त्याच्या कथा श्लेषात्मक फार. इंग्रजी लेखकांची छाप डिडेरो रूसो वगैरे लेखकांवर पडलेली आढळते. पुढें पुढें मात्र ज्यांच्या वाचनानें लोखांच्या मनांत चांगल्या भावना जेणेंकरून उत्पन्न होऊन वाढीला लागतील अशा गोष्टी प्रेमविषयक कथा - फ्रान्समध्यें रचण्यांत आल्या पेरीच्या कादंबर्यांत नैतिक गुणांचा ठसा जास्त दिसतो. इ.स. १८३० नंतर निवळ काल्पनिक कादंबर्यास सुरूवात झाली. प्रख्यात लेखक अलेक्झांडर डूमास यानें वॉल्टर स्कॉटचा कित्ता उचलला होता. याच्या कादंबर्यांत सर्वत्र धाडस हेंच प्रामुख्यानें आढळतें. फ्लाबेर यानें काल्पनिक व व्यावहारिक या परस्परविरूद्ध गुणांचा मेळ उत्तम तर्हेनें आपल्या कादंबर्यांत बसविला आहे (स. १८५६), झोला हाहि प्रख्यात लेखक होऊन गेला. यांशिवाय ह्यूगो, झोला मापासां हे गेल्या शतककांतील प्रसिद्ध कादंबरीकार होत.
इंग्लंड - पहिली नवलकथा स. १४७० तर मॅलोरी यानें लिहिली; तत्पूर्वी ग्रीक गोष्टींचीं निवळ भाषांतरें होत असत. मनुष्यस्वभावाचें चित्र मॅलेरीच्या गोष्टींत चांगलें उतरलें आहे. परंतु त्याला गद्यापेक्षां पद्यच म्हणणें शोभते. इटलीपासूनच ही कला इंग्लंडनें घेतली आहे. स. १५६० पासून पुढें ४०।५० वर्षे इटालियन कादंबर्याचींच भाषांतरें इंग्रजींत होत असत. प्रेमविषयक पण ज्यांत उत्कटत्वाचा गुण नाही; अशा कादंबर्या लिहिणार्यांच्या वर्गात लिनी, ग्रीन, डिकिन्सन, लॉज, नाश वगैरे लेखक येतात. एलिझबेथच्या काळी गायकी व नाट्य विषयक पद्यवाङ्मय जास्त होतें. गद्य (विनोदी गद्य) वाङ्मयाचा त्यावेळी शुकशुकाट होता. त्यावेळीं फ्रान्सच्या कादंबर्याचें वाचन इंग्लंडांत जारीनें होई. नांवाजलेला पहिला इंग्रजी कादंबरीकार म्हणजे रिचर्डसन (१७६०) हा होय. कादंबरीलेखकानें तरूणांची नीतिमत्ता सुधारतां येईल या हेतूनें त्यानें या कामीं हात घातला होता. याच वेळी स्मॉलेट म्हणून एक विनोदी लेखक होऊन गेला. याच्या गोष्टीत सत्यत्त्वापेक्षां अद्भुतता जास्त असे. या सुमारचा दुसरा फील्डिंग म्हणून लेखक होता. त्यानें तत्कालीन भोंदूपणावर हत्यार उचललें होते. टॉम जोन्स ही याची कादंबरी याच मासल्याची आहे. धार्मिक प्रवचनांनी कादंबरीचें स्वरूप कसें देतां येतें हे डॉ. जान्सननें (१७५९) आपल्या रासेलसमध्यें चांगले दाखविलें आहे. तर व्हिकार ऑफ वेकफील्डमध्यें गोल्डिस्मिथनें (१७६६) सौम्य विनोद व सहज साधेपणा यांसह तत्कालीन स्थितीचें चित्र वठविलें आहे. यापुढील ३०।४० वर्षांत नावाजण्यासारख्या कादंबर्या झाल्या नाहीत. मात्र होरेस वॉलपोल म्हणून साधारण नांव घेण्यासारखा एक लेखक यावेळी होऊन गेला. वरील स्थिति १९ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत होती. यानंतर मात्र मानसशास्त्राच्या अनुरोधानें व ऐतिहासिक व्यक्तींच्या गुणावगुणास अनुलक्षून कादंबरीलेखन सुरू झालें. या प्रकारचे दोन प्रख्यात लेखक म्हणजे जेन ऑस्टेन (सेन्स अॅंड सेन्सि बिलिटी याची कत्री) व वाल्टर स्कॉट (वेव्हर्ले कांदबरी मालेचा कर्ता) हे होत. या वेळेपासून कादंबरीलेखनास एक निराळीच दिशा लागली. यापुढील प्रख्यात लेखक म्हणजे चार्लस डिकन्स (१८७०) होय. यानें आपल्या शोधक बुद्धीनें कादंबरीलेखनास पुन्हां दुसरेंच एक वळण लाविलें (याची पिकविक पेपर्स ही कादंबरी याची उत्कृष्ट साक्ष आहे.) या वेळचे दुसरे प्रसिद्ध लेखक म्हणजे थ्याकरे, इलिअट, मिसेस गास्केल हे होत. या मंडळीनें भूतदया आणि सामाजिक व नैतिक सुधारणांचा हव्यास धरून लेखन केलें. समाजांतील अन्याय व दुःखें ही नाहींशी कशीं होतील यांकडे (आयुष्य म्हणजे मजा आहे, आनंद आहे ही भावना थोडीशी एकीकडे ठेवूनहि) यांनी जास्त लक्ष घातलें. यानंतरच्या १९ व्या शतकांतील उत्तरार्धांतील किंग्स्ले, रीड, मेरिडिथ वगैरे लेखकांनी जें वळण कादंबरीलेखनास लाविलें तेंच हल्ली चालूं आहे. हल्लीचें प्रसिद्ध कादंबरीकार किपलिग होत. (आंग्लोइंडियन वाङ्मय पहा) गार्विसच्या कादंबर्याहि लोकप्रिय आहेत.
स्पेन - १५ व्या शतकांत बखरींच्या रूपानें गद्यवाङ्मय सुरू झाले. सोळाव्या शतकांत कादंबरीलेखनाची नुसती भूमिका तयार झाली होती. अमेरिकेच्या शोधामुळें या वेळीं अद्भुत गोष्टीचा बराच सुळसुळाट झाला. यानंतर धाडशी व विनोदी वाङ्मय उत्पन्न झालें. यावेळची कादंबरी 'डायाना' ही वरील गुणांचीच दर्शक होती. त्यामुळे ती त्यावेळी सार्या यूरोपमध्यें आवडती झाली, हिचा कर्ता व दुसरी प्रसिद्ध कादंबरी 'डॉन क्विक्झो इचा कर्ता एकच (माँटिमर नांवाचा) होता. या दुसर्या कादंबरीनें सार्या कादंबरी लेखनास एक स्वतंत्रच दिशा लाविली. त्या कादंबर्यांत सर्वत्र आढळणार्या स्त्रीदाक्षिण्यविषयक प्रणयी कथांचा नायनाट व्हावा या उद्देशानें लेखकानें ही कादंबरी लिहिण्यास घेतली; परंतु त्याचा उलटा परिणाम होऊन कादंबरीस लागणार्या सर्व विषयांचें जणूं काय ही (कादंबरी) एक मायपोटच होऊन बसली. यूरोपांत शौर्यविषयक लाट, कादंबर्याच्या रूपानें जर कोणी प्रथम पसरविली असेल तर स्पेनच्या एका हीटा नांवाच्या शिपाई लेखकानें होय. (इ.स. १६००). शोधक व उपजत बुद्धीची अशी सेसिला बोहल ड फाबर नांवाची लेखिका नुकतीच (१८७०) होऊन गेली. त्यानंतरचे लेखक साधारण प्रतीचे आहेत.
जर्मनीमध्यें या कलेचा उदय उशीरा झाला. त्यांचा पहिला कादंबरीकार ग्रिमेलशौसेन हा १६७५ त होता. याची कादंबरी लढाईंतील शौर्यविषयक गोष्टींची होती. पुढें १८ व्या शतकांतील कादंबर्यांत प्रणयाचा भरणा जास्त आढळतो. खरा स्वतंत्र लेखक म्हणजे गोएटे होय. त्याची प्रसिद्ध कादंबरी "तरुण वेरथरची दु:खे" ही होय हिचें मराठी भाषांतर प्रसिद्ध करण्यास डॉ. गुणे यांनी सुरूवात केली होती. दुसरा एक योहान पॉल (१८२५) म्हणून उत्कृष्ट लेखक झाला. परंतु त्याच्या सार्या कादंबर्या प्रेमविषयक असल्यामुळें सगळ्या यूरोपांतील तत्कालीन प्रणयी कथांवर याचीच छाप बसलेली आढळते. यापुढील चांगले लेखक म्हणजे गस्टाव्ह फ्रेताग, अलेक्सीस, फॉन्टेन, एबर्स वगैरे होत. यानंतर म्हणजे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धांत जर्मनींत नांवाजलेला कादंबरीकार झाला नाही.
रशियांत मात्र या कलेंत नेहमी शोधकबुद्धि व स्वतंत्रपणा आढळतो. गोगोल यानें पूर्वीची रीत मोडून स्लाव लोकांच्या मनोवृत्ति ज्यांत अंतर्भूत होतील अशा कादंबर्या लिहिणें सुरू केलें (१८६४). त्यानंतर दया, दाक्षिण्य व वैराग्य यानी मिश्रित कादंबर्या रशियांत प्रसृत झाल्या. यांचे लेखक गोंचरोर, डोस्टौव्हस्की, पिसेम्स्की, टुर्गिव्ह व कौंट टॉल्स्टॉय हे होत. या लेखकांचें वजन सर्वत्र जगांत पडलें. यांनी दाखविलेला मार्ग कादंबरीलेखनांत अगदी नवीनच होता. सध्यांचा प्रसिद्ध कादंबरीकार मक्झिम गॉर्की होय.
आशियांत फार पूर्वीपासून कादंबरीलेखन (ओबडधोबड स्वरूपांत ) होतें. चीनमधील पहिला कादंबरीकार ली कुआनचंग हा १३ व्या शतकांत होऊन गेला. याच्या कथांत लढाया अगर वाटसरूंची धाडसाचीं प्रवासवृत्तें येतात. नैतिक गुणांचा परिपोष झालेली 'दोन बहरी वृक्ष' नांवाची एक कादंबरी अति उत्तम असून ती १७ व्या शतकांत लिहिलेली आहे. याच वेळची 'लालमहालचें स्वप्न' ही कादंबरी सार्या चिनी कादंबर्यांत पहिल्या प्रतीची होय असें समजतात. इच्यांत चिनी समाजाचें उत्तम दृश्य आढळतें. जपानांत १० व्या शतकांत बखरींस सुरूवात झाली. जपानी कादंबरीलेखकाचा प्रथम मान मुरासाकी शिकिबु या बाईस आहे. ही कादंबरी इ.स. १००४ मध्यें रचली असल्यानें तिला हिंदुस्थानखेरीज सार्या जगांतील पहिली कादंबरी असें म्हणण्यास मुळींच हरकत नाही. यानंतर ५।६ शतकें या बाजूचा प्रयत्न फारसा झालेला दिसत नाही. पुढें सतराव्या शतकांत शौकाकु यानें विनोदी गोष्टी रचून कादंबरीलेखनास पुन्हां सुरूवात केली. जिशो व किसेकी हेहि प्रख्यात जपानी कादंबरीकार झाले. जपानमध्यें वास्तविक कादंबर्या लिहिण्याचा प्रघात वाढत आहे. ''होतोतो गिसु'' या कादंबरीचें इंग्रजी भाषांतर (नामिको) हें पुष्कळांस अर्वाचीन जपानची चांगली माहिती देईल.
कादंबर्यांचें मूळ करमणुकीच्या दंतकथांत व आजीबाईंच्या कावळ्याचिमण्यांच्या गोष्टींत आहे. त्यांनां सत्याची, मानवी स्वभावनिरीक्षणाची, समाजस्वरूपाविष्करणाची जोड मिळत मिळत हल्लीचें रूप मिळालें आहे. हल्ली जगावर एकहि असा सुशिक्षित इसम सांपडणार नाही की, ज्यानें या नाहीं त्या रूपानें एकसुद्धां कादंबरी वाचली नसेल. स्त्रियांनां व मुलांनां लिहितांवाचतां आल्यानें पूर्वीपेक्षां कादंबर्या जास्त उत्पन्न होऊं लागल्या आहेत. पाश्चिमात्य देशांत तर ''फक्त मुलांसाठी'' गोष्टी लिहिणारे अनेक लोक असून अशांनी या कलेवर बराच पैसाहि मिळविला आहे. सामान्य कादंबरीलेखकांचें लक्ष लोकांत चांगली अभिरूचि उत्पन्न व्हावी याकडे फारसें नसून द्रव्याकडे असतें. त्यामुळें उदभवणार्या हजारो कादंबर्यांत सदभिरूचीच्या व चांगलें वळण लावणार्या कादंबर्या अति अल्प असतात; लेखकवर्गांतहि फारसे अभिजात लोक नसून सटरफटरांचाच भरणा जास्त असतो. कादंबरी म्हटली म्हणजे माणसाचें व समाजाचें चित्र होय. मात्र ते यथावस्तू चित्र पाहिजे. आतां त्याला जास्त खुमारी येण्यास रंगाच्या दोन चार छटा कमीजास्त असल्यास हरकत नाही; त्यामुळें मूळ स्वरूपांत मात्र फरक होता कामा नये. अशा कामी उत्कृष्ट चित्रकार लागतो. कादंबर्यांचें रास्त परीक्षण कोणी करीत नसल्यानें वाईट व हलक्या दर्ज्याच्या कादंबर्यांचा बराच सुळसुळाट फार होतो. भावी कादंबर्या उत्कृष्ट पाहिजे असतील तर वर दर्शविलेले दोष टाळणें भाग आहे. कोंवळ्या वयाच्या मुलांमुलींनी प्रेमविषयक पाचकळ कादंबर्या वाचल्या असतां त्याचा परिणाम त्यांच्यावर व हळूहळू एकंदर समाजावरहि कसा अनिष्ट होतो याबद्दल पाश्चात्य विद्वानहि साक्ष देत आहेत. (इंटरनॅशनल लायब्ररी ऑफ फेमस लिटरेचर.पु.१४ पहा). सारांश, समाज व राष्ट्र जेणेंकरून अधोगतीच्या मार्गास लागणार नाहीं असलें वाङ्मय (अर्थात त्यांत कादंबर्याहि) देशाला उपकारक असतें.
मराठी कादंबर्या :- यांची जागतिक कादंबरीसारस्वताशी तुलना करून रा.वि.का. राजवाडे यांनी जे विचार व्यक्त केले आहेत ते बरेच मार्मिक आहेत म्हणून त्यांचा सारांश येथें देतों.
मराठींतील कादंबरीमय सारस्वत हें (१) लहान गोष्टी, (२) अद्भत कथा व (३) वस्तुस्थित्यादर्शक कथानके या तीन घटकांनी बनलेलें आहे. म्हणजे इसाबनीति, बाळमित्र, पंचोपाख्यान, वेताळपंचविशी वगैरे लहान लहान गोष्टींचा प्रथम उदय झाला; नंतर मुक्तामाला, मंजुघोषा, विचित्रपुरी वगैरे अद्भुत कथा जन्मास आल्या आणि शेवटी आजकालच्या गोष्टी, पण लक्षांत कोण घेतो, नारायणराव आणि गोदावरी, शिरस्तेदार, वेणू, वाईकर भटजी, वगैरे वस्तुस्थित्यादर्शक किंवा वास्तविक कथानकें लिहिलीं गेली, अशी आपल्या इकडील कादंबर्यांची तीन पायर्यांची परंपरा आहे. कादंबर्यांचे ऐतिहासिक म्हणून एक निराळें सदर काढीत असतात. परंतु तसें करण्याचें कांही एक कारण नाही नाही तर नैतिक, शास्त्रीय, प्रावासिक, प्रेमळ, राजकीय वगैरे असंख्य वर्ग करणें जरूर पडेल व तें अशास्त्र होय असें राजवाडे समजतात. प्रथम ज्या लहान गोष्टी प्रसिद्ध झाल्या त्यांतच अद्भुत व वास्तविक असे दोन प्रकार होते. त्याच दोन प्रकारांचा पुढें परिपोष होऊन, एका प्रकारापासून अद्भुत कादंबर्यांचा व दुसर्या प्रकारापासून वास्तविक कथानकांचा प्रादुर्भाव झाला. त्यापैकी बर्याच अद्भुत कादंबर्या व वास्तविक कथानकें वास्तविक गोष्टींप्रमाणेंच परभाषेंतील ग्रंथांची रूपान्तरें, भाषान्तरें किंवा सूचनान्तरें आहेत. तथापि तीं टाकाऊ आहेत असें कोणी समजूं नये. मात्र स्वतःच्या कमाईच्या फळांत जी गोडी आहे ती उसन्यांत कशी यावी ?
स्वतंत्र ग्रंथांपैकी अद्भुत ग्रंथांत मुक्तामाला, रत्नप्रभा, मंजुघोषा व वास्तविकांपैकी आजकालच्या गोष्टी, पण लक्षांत कोण घेतो ? वेणु, नारायणराव व गोदावरी हे प्रारंभीचे ग्रंथ होत. वास्तविकसृष्टींतील अपूर्णता अद्भुतसृष्टींत पूर्णतेप्रत पोहोंचलेली आढळते. शास्त्रीयवाङ्मयाबाहेरचा प्रदेश म्हणजे अद्भुताच्या अत्यंत उत्कट विहाराचें स्थल होय. पश्चिमेकडील बायबल, संतचरित्रें, प्लेटोचे ग्रंथ व आपणा कडील महाभारतांतील गोष्टी, संतचरित्रें पुराणें हे अद्भुताचे नमुने आहेत. परंतु या धर्मांतर्गत अद्भुत कथांचा पगडा हजारों लोकांच्या नित्यक्रमावर बेसुमार असलेला सर्वश्रुत आहे.
बालोपयोगी अद्भुत कथा सर्व राष्ट्रांत प्रचलित आहेत. तसेंच ज्या ज्या शक्तीला समाजावरती आपला अम्मल बसावा अशी इच्छा उत्पन्न झाली, त्या त्या शक्तीला अद्भुत कादंबरीचें साहाय्य अतोनात झालें आहे. उदाहरणार्थ शनिमहात्म्याचें फलज्योतिषाला, सत्यनारायणाचें नीतिज्ञाला, गजेंद्रमोक्षादिकांचे धर्मप्रसारकाला, ख्रिस्तानें तारलेल्या आत्म्यांच्या कथा किरिस्तावाला इ.
मुक्तामाला, मंजुघोषा वगैरे अद्भत कादंबर्या लिहिण्यांत मनोरंजनाशिवाय दुसरा हेतु आढळत नाहीं. पुढें विचित्रपुरी व त्यासारख्याच गार्गांचुआ, पांटाग्रूएल, डॉन किझोट या कादंबर्या अद्भुत पेहरावांत पण अद्भुत कादंबर्या व त्यांतील अद्भुत वीर यांची टर उडविण्याच्या हेतूनें लिहिलेल्या आहेत.
वास्तविकाची स्फूर्ति मराठी लेखकांनां प्रायः इंग्रजीपासून मिळालेली आहे. इंग्लिश मासिकांतून वगैरे ज्या हप्त्याहप्त्यांनीं येणार्या कादंबर्या आहेत त्या नामांकित नसून सरासरीच असतात. अर्थात त्यांचें अनुकरण करणार्या इकडील कादंबर्यांची योग्यता त्यांहूनहि कमीच असणार. यूरोपांतील कादंबर्यांचे व्यक्तिविषयक व समाजविषयक असे दोन भाग पडतात. वैयक्तिक कादंबर्यांत वैयक्तिक विकारांच्या संकोचविकोसांचें चित्र काढलेलें असतें. यांतील कांही केवळ खुशालचंद अशा स्त्रीपुरूषांच्या करमणुकीचे विषय होत. यांस इंग्रजीत 'सोसायटी नॉव्हेल' म्हणतात. उलट गोल्डस्मिथ, फील्डिंग, स्मॉलेट, स्कॉट, थॅकरे, डिकन्स, इलियट यांच्या व्यक्तिविषयक कादंबर्यांत देशप्रीति, लोकोपकार, वात्सल्य, प्रेमबंधन वगैरे उदात्त भावनांची चिकित्सा असते. यांनी अशी अनेक पात्रें निर्माण केली आहेत कीं त्यांची ओळख इंग्रजी जाणणार्या बहुतेक लोकांनां झाली आहे. गोल्डस्मिथचा व्हिकार, स्मॉलेटचा अंकल टोबी, फील्डिंगचा ऑलवर्दी, स्कॉटचा आयव्हॅनो, डिकन्सचा पिकविक, इलियटची रोमोला वगैरे पात्रें प्रसिद्ध आहेत. यांच्याच तोडीला बाल्झाक, डयूमास वगैरे फ्रेंच कादंबरीकार बसविले पाहिजेत. पण कोंवळी पोरें व धणधकट जवान यांमधील अंतरासारखें या दोहोंत अंतर आहे.
आणीबाणीचे प्रसंग आले म्हणजे महत्वाचे उद्भार बाहेर पडतात असा सिद्धान्त आहे. व यास अनुसरून वाङ्मय म्हणजे रामदास व मुदल यांचें रामायण, विशेषतः त्यांतील युद्धकांड हे महाराष्ट्रांतील ग्रंथ व टॉमस पेन याचा कॉमनसेन्स (सारासार विचार) हा निबंध, व मिसेस स्टौची ''अंकल टॉम्स केबिन'' नांवाची कादंबरी इत्यादि प्रकारचें होय. उलट इंग्लंडचे सध्याचे विचार साम्राज्याकडे वळल्यामुळें सामाजिक, धार्मिक, राजकीय वगैरे गोष्टींच्या सुधारणेकडे लक्ष देण्यास त्याला अवकाश नाही. अर्थात इंग्लंडांतील ग्रंथकारहि त्यासंबंधी कळकळीनें लिहीत नाहीत. एक ग्रंथकर्ता मात्र इंग्लंडचें हृदय जाणतो आणि तो जगतप्रसिद्ध रुड्यार्ड किल्पिंग हा होय. त्यानें इंग्लंडच्या मनांतल्या मनोगतांचें प्रदर्शन यथास्थित केलें आहे. व्हिक्टर ह्यूगोची 'ला मिझराब्ल' किंवा झोलाची 'पारिस' ही कादंबरी घेतली म्हणजे फ्रेंच समाजाच्या पोटांत कोणता वडवाग्नि पेट घेतो आहे ते कळतें. रशियांतील तरूण पिढींतील लोकांच्या मतांची रचना कौंट टॉलस्टाूय यांच्या कादंबर्यांच्या सेवनानें झाली आहे एवढें सांगितलें म्हणजे राष्ट्ररचनेंतील याच्या ग्रंथांचें कार्य कळून येईल. टॉलस्टॉय, झोला, ह्यूगो यांनी लिहिलेल्या कांदबर्यांच्या तोडीची इंग्रजी भाषेंत एकहि कादंबरी नाही. जगांतील सर्व राष्ट्रांत प्रसिद्ध अशा निरनिराळ्या भाषांतील कांदबर्यांची गणना केली तर इंग्लंडांतील दोन, तीन व अमेरिकेंतील एकच कांदबरीचा यांत समावेश करावा लागेल. 'पिलग्रिम्स प्रोग्रेस', 'गलिव्हर्स ट्रॅव्हल्स', 'रॉबिन्सन क्रुसो' व 'अंकल टॉम्स केबिन' या त्या चार कांदबर्या होत.
अर्वाचीन मराठी कांदबरीकारांत स्वतंत्र रचना करणारे ग्रंथकार रा. हरि नारायण आपटे होत. यांचे ग्रंथ इंग्रजी 'सोसायटी नॉव्हेल्स' च्या वरच्या दर्जाचे पण डिकन्स, थॅकरेच्या तोडीचे नाहीत. ह्यूगो, टॉलस्टॉय, झोला यांच्या पासून तर ते फारच दूर आहेत. यांनी शंकरमामंजी, महाशब्दे, प्रो. ड्यांडी, शंखध्वनि, फेअरब्रेन वगैरे कांही नामांकित पात्रें निर्माण केली आहेत. रा. ओककृत शिरस्तेदार ही कादंबरी सांगोपांग उठवून लिहिली असती तर चांगली वठली असती. रा. आपटे यांची स्फूर्ति कित्येक इंग्रजी कांदबरीकारांच्या ग्रंथांवरून झालेली दिसते; व त्यांच्या अद्भुत व वास्तविक यासंबंधीच्या कल्पना किंचित अस्पष्ट आहेत. त्यामुळें त्यांची कृति जितकी ठळक निपजावी तितकी निपजली नाहीं. यूरोपांतील कांदबरीकार एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा किंवा विचाराचा अतिशयानें निष्कर्ष काढणें हें आपल्या कलेचें बीज समजतात व साक्षात संसाराच्या सुखदुःखांची वर्णनें ते अद्भुत शब्दांनी करतात, म्हणून त्यांस वास्तविक ही संज्ञा लाविली जाते. उलट जें जसें असते तें तसेंच वठवावयाचें असा 'रिआलिस्टिक' अथवा वास्तविक याचा अर्थ रा. आपटे समजतात. तथापि अलीकडील तीस चाळीस वर्षांतील वास्तविक कांदबरीकारांत हे फारच मोठ्या योग्यतेचे आहेत.
भाषांतरित व रूपान्तरित ग्रंथांतील गुणांचें सर्व श्रेय मूळ ग्रंथकाराकडे जातें. व भाषांतर अगर रूपांतर गचाळ उतरल्यास भाषांतरकार दोषास मात्र धनी होतो. याकरितां स्वतंत्र कृति करणेंच श्रेयस्कर; तथापि मनोरंजनाचे रा. मित्र व कांदबरीकल्पद्भुमाचे चितळे यांची भाषा बरी असते.
बाळमित्राचें भाषांतर करणार्या छत्र्यांपासून तो मोठमोठ्या वास्तविक कांदबर्या लिहिणार्या आपट्यांपर्यंत वास्तविक कादंबरीची मजल कोठपर्यंत आली व ही लहानशी मजल गांठण्यास किती वर्षे लागली याचा विचार केला म्हणजे टॉलस्टॉयपर्यंत जाण्याला किती युगें लागतील ते हरी जाणें. समाधानाची बाब एवढीच कीं पाऊल पुढें आहे, मागें नाही.
प्रस्तुत कालीं सहृदय असे शिकलेले लोक उच्च प्रतीच्या यूरोपियन कादंबर्या वाचण्यांत गुंग झालेले दिसतात. या लोकांनां मराठी कादंबर्या वाचण्याला जो लावील व त्या वाचल्या नाहींत तर उत्कृष्ट विचारांनां आपण मुकूं असें जो त्यांनां भासवील तोच उत्कृष्ट कादंबरीकाराच्या पदवीला पात्र होईल.
लोक कादंबर्या फार वाचतात म्हणून नाकें मुरडणार्या व हाकाटी करणार्या कित्येक लोकांनां आपला प्रतिस्पर्धी किती जुनाट व केवढा बलाढ्य आहे याचा यथास्थित अंदाज झालेला नसतो असेंच म्हणावें लागतें. हा जर अंदाज त्यांनां होईल तर याचें सहाय्य घेणें जास्त हिताचें आहे हें त्यांच्या ध्यानांत येईल. समाजांत अमुक एका मताचा प्रसार व्हावा अशी इच्छा उत्पन्न झाली म्हणजे सरस्वतीच्या या मांडलिकाला ही इच्छा अंमलांत आणण्याची विनंति केली असतां ती तो खुशीनें मान्य करील. लहान मुलांनां पशुपक्षांच्या गोष्टी सांगून त्यांच्या मनांत युक्ति व साहस यांचें बीजारोपण करील, स्त्रीजनांनां संसारसुखाची गुरुकिल्ली पढवील, तरुणांनां राष्ट्रीय महत्वाकांक्षेचें रहस्य कळवील, आणि वृद्धांनां आयुष्याच्या इतिकर्तव्यतेचें दिग्दर्शन करील, आणि इतकेंहि करून तें कसें व केव्हां केलें हें कोणाला समजून देणार नाहीं, अशी या मयासुराची करणी आहे. युधिष्ठिराप्रमाणें ती ज्या लोकांनां लाधली ते धन्य होत. (संकीर्ण लेखसंग्रह)
मराठीमधील कादंबर्यांची संख्या आज सुमारें दीड हजार आहे. सुमारें दीडएकशें अदभुत कादंबर्या, दोनशें ऐतिहासिक कादंबर्या व उरलेल्यापैकीं बर्याचशा सामाजिक कादंबर्या, व बरेंचसें बाह्य वाङ्मय किंवा भाषांतरवजा कादंबर्या, इतका मराठींतील कादंबर्यांच्या स्वरूपाचा वाङ्मयसंभार आहे. आपल्या शेजारच्या भाषांतून देखील मराठींत कादंबर्या आल्याच आहेत. प्रसिद्ध गुजराथी कादंबर्यांची भाषांतरें म्हटली म्हणजे ''करण वाघेला'', ''सरस्वती चंद्रा'' चे दोन भाग व हिंद आणि ब्रिटानिया हीं होत. सुमारें दीडदोनशें बंगाली कादंबर्यांचीं भाषांतरें झालीं आहेत. हिंदीतूनहि थोड्याबहुत कादंबर्या मराठीत आल्या आहेतच. परंतु इतर देशी भाषांतून फारसें कादंबरीवाङ्मय मराठीत आलें नाही. गोष्टींच्या बाबतीत पहातां हिंदुस्थानच्या शेजारच्या देशांतील कांही गोष्टी आल्या आहेतच. उदा. फारसीतून आलेला कथासमुच्चय. तथापि या समुच्चयापैकी प्रत्यक्ष फारसीतून किती आला व इंग्रजीमार्फत किती आला याविषयी संशय आहे. किरकोळ गोष्टी व कादंबर्या या जर एकत्र केल्या तर मराठींतील कथावाङ्मय जवळ जवळ दुप्पट होईल. म्हणजे सुमारें सात हजार लेखनामें त्याखाली येतील. देशी कादंबर्यांच्या एकंदर वाङ्मयाकडे साकल्यानें आपण पाहूं लागलों तर आपणांस असें दिसून येईल की बंगाली व मराठी कादंबर्यांच्या स्वरूपामध्यें बराचसा फरक दिसून येतो. बंगाली कादंबर्यांत नर्मवाक्यें, गोजिरवाण्या गोष्टी, अपूर्ण होणारे प्रेमसंबंध, सत्प्रेमाबद्दलहि पश्चाताप व वेड्या आत्महत्या यांची रेलचेल दिसते. याशिवाय बंगाली वाचकास लांबलचक कादंबरी खपत नसून पुस्तक लहान पाहिजे, व तें देखील हृदयांत कल्लोळ करून सोडणारें पाहिजे असें बंगाली कादंबर्यांच्या धाटणीवरून दिसतें व त्या बाबतीत अर्वाचीन बंगाली कादंबरीवाङ्मय इव्हान टर्गिनिव्ह यांच्या संप्रदायाच्या रशियन कादंबर्यांशेजारी चांगले बसेल. वास्तविक स्थितीच्या कष्टमय नीरसतेमुळें, वास्तविक कादंबरी न लिहितां स्वच्छंदानें काल्पनिक परिस्थितींत विहार करण्याची प्रवृत्ति रशियन लोकांत जशी दृष्टीस पडते, तशी ती अधिकच तीव्रपणें बंगाली वाङ्मयांत दृष्टीस पडते आणि त्यामुळें बंगाली वाङ्मयांस न लपण्यासारखे वैशिष्ट्य प्राप्त झालें आहे. बंगालीची भाषांतरें जरी मराठींत पुष्कळ झाली आहेत तरी त्यांचे अनुकरण मराठींत मुळींच झालें नाही असें म्हटलें तरी चालेल. मराठींत यूरोपांतील द्वीपकल्पीय भाषांतील ग्रंथाचेंहि फारसें अनुकरण होत नाही. महाराष्ट्रीय कादंबरीकारांस द्वीपकल्पीय भाषा जरी फारशा येत नसल्या तरी त्या वाङ्मयाशी त्यांचा इंग्रजीमार्फत परिचय आहेच. तथापि त्यांच्या कादंबर्यांची भाषांतरें फारशी नाहीत. फ्रेंचमधील मोलिअरची प्रहसनें बरीचशी मराठीत अवतरली गेली आहेत. फ्रेंच कादंबर्यांची भाषांतरें फारशी झाली नाहीत. अमात्य दुहिता, तीन शिलेदार वगैरे पुस्तकें ही द्वीपकल्पीय वाङ्मयाकडे इकडील लेखकवर्गाचें लक्ष्य थोडेसें वळलें होतें असें दाखवितात. मराठीमध्यें कादंबरीलेखनाच्याकडे लागलेला काल फार थोडका आहे, आणि वेणू, नारायणराव आणि गोदावरी व शिरस्तेदार या कादंबर्या वगळल्या असतां वस्तुस्थितिविषयक कादंबर्या लिहिण्याकडे लक्ष बरेंच उशीरां लागलेलें आहे. सामाजिक कादंबर्यांच्या काळास सुरूवात तीस वर्षांपूर्वीच झाली असें म्हणण्यास हरकत नाहीं व यांत प्रामुख्य मिळविलेले ग्रंथकार एकदोनच म्हणतां येतील. हरि नारायण आपटे व बाळकृष्ण संतुराम गडकरी हे दोन लेखक वगळले असतां सामाजिक कादंबर्यांच्या कर्त्यांमध्यें अभिमानानें नाव घेण्याजोग्या दुसर्या कोणत्याहि व्यक्ती नाहींत असें म्हणावें लागतें. वामन मल्हार जोशी व सी.के. दामले हेहि बर्या प्रकारच्या सामाजिक कादंबर्याचे लेखक आहेत. ऐतिहासिक कादंबर्यांमध्ये देखील आपट्यांच्या कादंबर्यास अग्रस्थान दिलें पाहिजे. कादंबर्यामध्यें नाटकांपेक्षां प्राप्ति बरीच कमी होत असल्यामुळें मराठीतील लेखनकुशल वर्ग छापखान्याकडे न धावतां नाटकगृहाकडे धावला असें दिसून येईल.
उच्च स्वरूपाच्या कादंबर्यांच्या अभावावरून महाराष्ट्रांतील रचनाकौशल्य हीन प्रकारचें आहे असें धरतां यावयाचें नाही. कां कीं, नाटकांच्या घटनेंत रचनाकौशल्य उत्तम प्रकारें दिसून आलें आहे. महाराष्ट्रीय सामाजिक आयुष्याचीच अंगें अत्यंत नियमित असल्यामुळें त्यांचा कादंबरीवर परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. साक्षर वर्गाचा आयुष्यक्रम तेवढाच चित्रिण्याची खटपट कादंबर्यांत दिसते. व्यापारी वर्ग, दूरच्या वसाहतींत जाऊन पैसे मिळविणारा वर्ग हे आपल्याकडे नाहीत. तसेंच गलेलठ्ठ जमीनदारहि नाहींत. त्यामुळें डॉक्टर, वकील व सरकारी नोकर व मधून मधून जहागीरदार यांच्यापलीकडे कादंबरीकारांचा वर्ग वळला नाहीं. दुसरी एक गोष्ट म्हटली म्हणजे स्त्रियांचें चांचल्य दाखविण्यार्या कादंबर्या व नाटकें महाराष्ट्रीय अभिरूचीस रूचत नसल्यामुळें महाराष्ट्रीय कादंबरीस बरेंच नियंत्रण उत्पन्न झालें आहे. आणि त्यामुळें लेखकाच्या आश्चर्योत्पादन कौशल्यास बंध अस्तित्वांत आहेत.
कादंबरीकार व त्यांच्या कादंबर्या यांच्या नांवांची येथे जत्री देण्याचें प्रयोजन नाही. ती वाङ्मयसूची चाळली असतांना सापडेल.
(संदर्भग्रंथ - संस्कृत व प्राकृत कादंबर्यांचे डॉ. बिंटरनिझ्झनें आपल्या भारतीय वाङ्मयेतिहाच्या ग्रंथमालिकूंत (पु. ३) फारच सुंदर व संक्षिप्त विवेचन दिलें आहे. पाश्चात्य कथावाङ्मयाचा थोडक्यांत इतिहास ब्रिटानिकेनें 'नॉव्हेल' या लेखांत दिलाच आहे. डनलॉपनें तीन खंडांत कादंबर्यांचा संपूर्ण इतिहास गोंविला आहे. रा. विश्वनाथपंत राजवाडे यांनी आपल्या संकीर्णलेखंसग्रहांत मराठी कादंबर्यांची झडती तर घेतली आहेच पण त्याशिवाय कादंबरी वाङ्मयाचें तात्विक विवेचन व कार्यक्षेत्र पाश्चात्य कादंबर्याची उदाहरणें घेऊन आपल्या नेहमीच्या सडेतोड भाषेंत त्यांनी दिलें आहे. विविधज्ञानविस्ताराच्या ४८ व्या पुस्तकांत रा.ल.ज. खरे यांनी जी 'मराठी वाङ्मयाची गेल्या शंभर वर्षांतील वाढ' तीन लेखांकांत दिली आहे तींत मराठी कादंबर्यांचे गुणदोष वर्णिले आहेत. विस्ताराच्या ज्युबिली निबंधांवलींत (ग्रंथ १, उत्तरार्थ) 'मराठी कथात्मक वाङ्मय' नांवाचा रा.ना.के. बेहेरे यांचा एक लेख आहे. तोहि वाचनीय आहे. यावरील कांही ग्रंथांवरून या वाङ्मयाची चांगली कल्पना येण्यास हरकत नाहीं. यूरोपीय प्रत्येक भाषेंत कादंबर्यांच्या वाङ्मयसूची अनेक आहेत. मराठींतील कादंबर्यांची व गोष्टीची विस्तृत यादी महाराष्ट्रीय वाङ्मयसूचींत दिली आहे तीत ७ हजारांवर नांवनिशी आहे.)