विभाग दहावा : क ते काव्य  

कातकरी - काथकरी, काथोडी, काथोडिया, लो.सं. ९१३१९ ठाणें व कुलाबा जिल्ह्यांतील पश्चिमघाट, सुरतेभोंवतालची संस्थानें व पुणें आणि नाशिक रस्त्यांवरील सह्याद्रीचा पायथा या भागांतून हे मुख्यत्वेकरून आढळतात.  हे मूळचे भिल्ल असून ते उत्तरेंतून (गुजराथ अठ्ठाविशी) सुरत जिल्ह्यांत आले असावे असा तर्क आहे.  रामाच्या वानरसेनेपासून आपली उत्पत्ति आहे असें हे सांगतात.  त्याच्या चालीरीती, स्वरूप व धर्म हीं पहातां, ते स्थानिक राष्ट्रजातींपैकीं असून त्यांच्यावर ब्राह्मणाचे कांही संस्कार झाले नाहीत असें दिसते.  त्यांच्या भाषेमध्यें कांही भिल्ल लोकांच्या भाषेमधील शब्द आहेत.
    
यांचा मूळचा धंदा कात करण्याचा होता.  अजूनहि कांही लोक कात करतात.  धान्याचा पुरवठा संपल्यावर हे लोक जळाऊ लाकडे व मध विकून पोट भरतात व कांही ससे, हरणें, माकडें यांच्या शिकारीवर आपली उपजीविका करतात.  हे लोक रानउंदीरहि खातात.  हे चोर व लुटारू म्हणून प्रसिद्ध आहेत.
    
या लोकांचे (१) अथावर, (२) धेड किंवा ढोर, (३) सिधी, (४) सोन किंवा मराठे व (५) वरप असे पांच पोटभाग असून त्यांमध्यें बेटीव्यवहार होत नाही.
    
मराठे कातकरी लोक गाईचें मांस खात नाहीत.  गांवच्या विहिरीवर यांनां पाणी भरण्याची मनाई नाही.  कुणब्यांच्या देवळांतहि यांनां जातां येतें.  वरप हे ख्रिस्ती किंवा मुसुलमान असावे असा तर्क आहे.  धेड हे गोमांसभक्षक असल्यामुळें यांचा दर्जा सर्वात खालचा आहे.  यांच्या आडनांवांवरून यांची कुळें ठरलेली असून आडनांवें देवकांवरून ठरलेली आहेत.  मोरे, वाघमारे इत्यादि यांची देवकानुसार आडनांवें आहेत. सोन लोकांमध्यें एक आडनांवें असणार्‍या लोकांत विवाहसंबंध होत नाहीत.  मुलीची लग्नें १२ ते १५ वर्षांपर्यंत होतात.  लग्नाच्या पूर्वी एखादी स्त्री गरोदर राहिल्यास तिचें लग्न झालें तर तिला अपराधाबद्दल क्षमा मिळते, परंतु असलें लग्न पुनर्विवाहपद्धतीनें करावें लागतें.  मुलाचा बाप मुलीची मागणी करतो व मुलीबद्दल ५ रूपये 'देज' देतो.  पुनर्विवाहाची चाल यांमध्ये आहे.  परंतु विधवेला पहिल्या नवर्‍याच्या कुळांतील माणसाशी व मामें व मावस भावाशी लग्न करण्याची मनाई आहे.  जातीच्या मुख्याची संमति असल्यास घटस्फोट करतां येतो.  कातकरी बायका इतर जातीच्या माणसांनां पळवून नेत असत व अशा रीतीने पुष्कळ परजातीचीं माणसें आपल्या जातींत घेत असत.  ठाणें जिल्ह्यांत वारली, कुणबी इत्यादि उच्च जातीचे लोक ५ रुपये घेऊन यांच्या जातींत घेतले जात असत असें म्हणतात.
    
कातकरी लोक वन्यहिंदु आहेत.  'व्याघ्रदेवता' ही त्यांची मुख्य देवता असून ते कुणब्यांच्या ''गामदेव'' ''माओल्या'', ''म्हश्या'', ''चेडा'' इत्यादि देवतांची पूजा करतात.  यांमध्यें धर्मगुरू किंवा उपाध्ये नाहीत.
    
कुलाबा जिल्ह्यांत कातकरी लोकांच्या वाड्या असून त्या प्रत्येकावर एक नाईक नेमलेला असतो.  त्याची जागा परंपरागत असते;  परंतु तो निर्वंश झाल्यास दुसरा नाईक निवडला जातो.  वाडीमधील पुढारी लोकांच्या सभेंत नाईक किंवा कारभारी अध्यक्ष असून तींत मुसुलमान, ख्रिस्ती इत्यादिकांबरोबर जेवणें, बायकोनें नवर्‍याबरोबर न रहाणें इत्यादि सामाजिक प्रश्नांचा निकाल दिला जातो.  अपराधाबद्दल ५ ते २० रूपयांपर्यंत दंड होतो व तो दारु पिण्याकडे खर्चिला जातो.
    
काथोडिया - (काथवडी) कात करणारे.  हे सुरतच्या पूर्वेकडील व आग्नेयीकडील संस्थानांतून आढळतात.  त्यांच्या बोलण्यांत, मराठी व गुजराथी शब्द मिश्र असतात. आपण उत्तर कोंकणप्रांतातून गुजराथेंत आलों असें ते सांगतात.  ते काळे, आंखूड बांध्याचे व राकट चेहर्‍याचे आहेत.  काथोडिया पुरूष थोडीशी दाढी राखतात.  स्त्रिया वेण्या घालतात.  ते झोंपड्यांतून राहतात व बहुतेक सर्व प्राण्यांचें मांस खातात.  मात्र आपोआप मेलेल्या प्रांण्यांचें व घोडा, गाढव, मांजर, कुत्रा वगैरेंचें मांस खात नाहीत.  पुरूषांचा पोशाख पागोटें, धोतर व कमरेभोंवती एक उपरणें, हा होय.  ते हातांत पितळेच्या अगर चांदीच्या आंगठ्या घालतात.  स्त्रिया लुगडें नेसतात व अंगांत चोळी घालतात आणि डोक्यावर ओढण्या घेतात.  त्या कानांत बुगड्या व गळ्यांत मण्यांच्या माळा घालतात व दंडांत वेळा घालतात.  ते मजुरी करतात व कात तयार करितात.  त्यांनां अस्पृश्य मानण्यांत येतें.  काथोडिया लोक भिलदेवाची आराधना करतात.  ते आपले उपाध्येपण ब्राह्मणांना देत नाहीत.  
    
मुलांच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी पुष्कळ स्त्रिया जमून सटीची पूजा करतात, व भाताच्या देवीच्या प्रतिमा करून त्यांच्यापुढें दिवा लावतात.  मुलाचें नांव त्याचा बाप अगर आई ठेवते.  नंतर आप्तेष्टांना जेवणावळ घालतात.  त्यांच्यांत विवाहाच्या वेळी मुलामुलींचें वय सुमारें १५ वर्षाचें असते.  मुलगा विवाहास योग्य झाला म्हणजे त्याच्या घरांतील स्त्रिया मुलगी शोधून काढतात  व तिच्या बापाकडे जाऊन तिला मागणी घालतात.  त्यानें रूकार दिल्यास सर्व मंडळी दारू पितात व लग्न ठरतें.  नंतर कांही दिवसांनी मुलाचा बाप वधूला आपल्या घरीं बोलावून अहेर व ३/४ रूपये हुंडा देतो व विवाहदिवस ठरवितो.  विवाहदिवशी सकाळी वधु -  वरांनां हळद लागते.  दुपारी कमरेला तलवार लटकावून आपल्या इष्टमित्रासह वर वधूगृहीं जाण्यासाठी निघतो.  त्याच्या पुढें कोंकणा ढोलकें वाजवीत जातो.  तेथें पोहोंचल्यावर वराला बोहोल्यावर बसवून वधूचा भाऊ वधूला बोहोल्यावर आणतो, मग त्या दोघांच्या वस्त्रांनां कोंकणा गांठ देतो.  नंतर कांही वेळानें गांठ सोडल्यानंतर स्त्रिया गाणी म्हणूं लागतात व वधूला तिचा भाऊ व वराला त्याचा चुलता उचलून घेतो.  मग ते सर्व गातात व फेर धरतात.  मुलीच्या बापाला परवडल्यास तो व्याहीभोजन देतो. जेवणानंतर वर वधूला बरोबर घेऊन परत आपल्या घरी जातो.  त्यांच्यांत विधवाविवाहाची चाल असून, पुरूषांला एकाच वेळीं अनेक बायका करतां येतात.  ते प्रेताला स्नान घालून हळद फांसतात व मग त्याला चितेवर ठेवून त्याच्या तोंडांत भात घालतात व मग चितेला अग्नि लावतात.  प्रेत पूर्णपणें जळल्यावर सर्व मंडळी परत जातांना वाटेनें दारू पितात.  तिसर्‍या दिवशीं ते स्मशानांत जाऊन थोडीशी राख नदींत टाकतात, व बाकीच्या राखेचा ढिगारा करून त्यावर भात ठेवतात.  नंतर मृताच्या नांवानें लहान मुलांना जेवण घालतात.  पुढें सवड झाल्यावर ते मृताच्या नांवानें जातीला जेवण घालतात.  यापुढें मृताचें श्राद्ध वगैरे कांही एक करीत नाहींत.  यांच्यांत पंचायत ऊर्फ जातगंगा व तिचे पुढारी असतात.  यांच्यांत शिक्षणाचा अभाव आहे (मुं.ग्या.पु. ९ भा. १).
    
सोनकातकरी - हे साधारणः ठाणें जिल्ह्यांत स्थानिक झाले आहेत. भिंवडी तालुक्यांत, तांदुळ स्वच्छ करणे वगैरे निरनिराळी शेतकीची कामें हे लोक करतात त्यामुळे उदरनिर्वाहाकरितां त्यांनां दुसरीकडे जाण्याचें कारणच नसतें.  यांचा पूर्वीचा व्यवसाय खैराच्या झाडापासून कात तयार करणें हा आहे व अजूनहि कांही कातकरी हा धंदा करतात. सरकारी जंगलें राखीव झाल्यापासून यांच्या धंद्याचें क्षेत्र बरेंच आकुंचित झालें आहे.  खासगी व इनाम खेडेगावांत जो कच्चा माल मिळेल त्यावरच प्रायः यांनां अवलंबून रहावें लागतें.  हे कामानिमित्त जंगलांत गेल्यावर आपली झोंपडी फार पवित्र मानतात व सूचना दिल्याशिवाय कोणालाहि आंत येऊं देत नाहीत.  झाडकापणीस सुरूवात करण्याच्या आधी ते झाडाची पूजा करतात.  त्याचा शेंदूर फांसतात, नारळ ठेवतात आणि भक्तीनें ''कार्यांत यश येवो'' अशी प्रार्थना करतात.
    
लग्नविधि - जातीतील धर्मशील असा एखादा कातकरी प्रायः लग्नविधि चालवितो व याला ''गोतर्णी'' असें म्हणतात.  लग्नसमारंभ पांच दिवस चालतो.  लग्नाच्या दिवशी नवरामुलगा पांढरें पागोटें व धोतर नेसून मुलीच मंडपांत प्रवेश करतो.  मुलाचा बाप मुलीला हिरवें लुगडे व तांबड्या चोळीचा आहेर करतो.  मुलगी लुगडें नेसून येते व मंडपाच्या दाराशी उभ्या असलेल्या नवर्‍याच्या गळ्यांत बापानें तयार केलेली फुलांची माळ घालते व जोडपें मंडपात प्रवेश करतें.  दोघांनां एकमेकांसमोर उभें करून अंतःपट धरतात.  एका बाजूला गोतर्णी बसतो, व दुसर्‍या बाजूला जातींतील चार शिष्ट बसतात.  मुलाचा बाप चार शिष्टांनां पैसा, सुपारी, अक्षता वाटतो व शिष्ट हे जिन्नस हाती धरून बसतात.  गोतणीं घोंगडीवर विवक्षित तर्‍हेनें अक्षता मांडतो व मध्यें पैसा ठेऊन स्वतःच्या हातांतील पैसासुपारी त्यावर टाकतो.  नंतर ते शिष्टहि पैसा, सुपारी, अक्षता वगैरे गोतर्ण्याप्रमाणें घोंगडीवर टाकतात.  मग अंतःपट काढण्यांत येतो, व नवरा-नवरी मंडपाभोवती ५ प्रदक्षिणा करतात.  प्रदक्षिणा झाल्यावर नवरानवरी गोतर्ण्यानें मांडलेल्या पाटावर बसतात व जमलेले शिष्ट व इतर लोक नवरानवरीची डोकी पाटासमोर मांडलेल्या अक्षतांनां स्पर्श होईल इतकी खाली नमवितात.  इतकें झाल्यावर विवाहविधि आटपला असें समजण्यांत येतें.  नंतर जेवण देण्यांत येतें.  मुलीचें सासरचें नांव याच वेळी ठेवतात.  लग्नाच्या दुसर्‍या व तिसर्‍या दिवशी नवरामुलगा आपल्या बायकोसह आपल्या घरी जातो.  गोतर्णी व इतर शिष्टमंडळीहि बरोबर असतात.  घरी गेल्यावर मंडपांत गोतणीं दोन पाट मांडतो. व त्यापुढें बावीस तांदुळाचे ढीग मांडतो.  पाटावर बसल्यावर मुलगी उजव्या हाताचा आंगठा व डाव्या पायाचा आंगठा प्रत्येक ढिगाला लावून नवर्‍याचें प्रत्येक वेळी नांव घेते.  चवथ्या दिविशी गळ्यांतील माळा काढून टाकतात.
    
मूल जन्मल्यावर पांचवे दिवशी घरांतील वृद्ध माणसांच्या विचारानें मुलाचें नांव ठेवण्याची चाल यांच्यांत आहे.  बाळंतपणाच्या वेळी सुइणीची मदत अवश्य घेतात.  ती पांच दिवस बाळंतिणीस रोज दोन वेळां न्हाऊ घालते.  ब्राह्मणाकडून मुलाची जन्मपत्रिका करवीत नाहीत.
    
ढोरकातकरी - यांची विवाहपद्धति वेगळीच असते. लग्नाच्या दिवशी नवरा मुलगा आप्तेष्टांसह मुलीच्या घरी येतो व लग्नमंडपापासून दूर उभा रहातो.  मुलगी हाती उपरणे घेऊन बाहेर येते व तें नवर्‍याच्या गळ्याभोंवती टाकून त्याला म्हणते ''उठा नवरदेव मंडपांत या.'' असें म्हटल्यावर नवरा मंडपांत येतो.  मंडपांत पाहुणे मंडळी बसलेली असतात.  नवरानवरी आंत आल्यावर त्यांच्यामध्यें एके धोतर पसरतात व नवरानवरी त्याची टोकें अगर पदर हाती धरतात.  नवरा नवरीला ''उरेल आणि पुरेल'' असें म्हणून हाती धरलेला पदर तिच्या बाजूस टाकतो. उलट ती नवर्‍यास  'नाहीं उरेल आणि नाहीं पुरेल' असें म्हणून हातचा पदर त्याच्या बाजूस टाकते.  अशीं प्रश्नोत्तरें पांच वेळ झाल्यावर त्यांनां घोंगडीवर बसवतात. घोंगडीवर चार बाजूस चार व मध्यें एक असे पांच शिष्ट अगोदरच येऊन बसलेले असतात.
    
प्रत्येकाच्या हाती पैसा, सुपारी, विड्याची पानें व अक्षता असतात.  नवरानवरी घोंगडीवर येऊन बसण्याच्या आधी शिष्ट हांतातले जिन्नस घोंगडीवर टाकतात, व त्यावर नवरा-नवरीला बसवतात.  घेंगडीवर बसल्यावर नवरानवरी एकमेकांच्या गळ्यांत हार घालतात.  नंतर जमलेल्या पाहुणे मंडळींना दारू व जेवण देण्यांत येऊन लग्नसमारंभ आटोपतो.
    
कातकर्‍यांत अशी एक विलक्षण चाल आहे की, पटकीनें मनुष्य मेला तर पटकीची सांथ बंद होईतोंपर्यंत त्याला पुरतात व सांथ बंद झाल्यावर पुन्हां प्रेत उकरून जाळतात.  रात्रीं मयत झाल्यास दहनविधि सकाळी उरकतात.  मयताभोंवती जमून गाणेंबजावणें करून रात्र जागवतात.
    
भाद्रपद महिन्यांत, त्याचप्रमाणें शिमग्यांत व दिवाळींत मृताचें श्राद्ध करतात.  घराच्या छपरावर पिंड ठेवणें हाच प्रायः श्राद्धविधि असतो.  (मुं.गॅ.सेसन्स रिपोर्ट, एंथोवेन).