विभाग दहावा : क ते काव्य
काटवा पोटविभाग - बंगाल प्रांतांत बरद्वान जिल्ह्याच्या ईशान्येस एक पोटविभाग. क्षेत्रफळ ४४१ चौरस मैल. जमीन सपाट आहे व पूर्वेस भागीरथीच्या किनार्यावरील जमीन दलदलीची आहे. लोकसंख्या (१९११) २६१४६३ असून दर चौरस मैलास ६१६ इतकें प्रमाण पडतें. या पोटविभागांत काटवा व दैनहाट हीं दोन गांवें व ३७१ खेडीं आहेत. आग्रादीप व दादिया येथें दरवर्षी मोठ्या जत्रा भरतात. टसर नावाचें रेशिम काढणें हा येथील महत्वाचा धंदा आहे.
गांव - बंगाल प्रांतांत बरद्वान जिल्ह्यांतील याच नांवाच्या पोटविभागाचें मुख्य ठिकाण. हें गांव भागीरथी आणि अजय या नद्यांच्या संगमावर वसलेलें आहे. लोकसंख्या (१९११) ६९०४. मुरादाबाद येथें पूर्वी बंगालची राजधानी असतांना काटवा गांव मुरादाबादेचें नाक समजलें जात असे. येथें एक किल्ला आहे. येथेंच अलिवर्दीखानानें मराठ्यांचा पराभव केला. येथें चैतन्य महाराजानी संसाराचा त्याग करून तपस्व्याचें व्रत धारण केलें म्हणून वैष्णव लोक या स्थानास पवित्र मानतात. पूर्वी येथें आगबोटी जात येत असत; परंतु भागीरथीमध्यें गाळ बसून नदी उथळ झाल्यामुळें आतां आगबोटी चालत नाहींत. ईस्ट इंडिया रेल्वे निघाल्यापासून येथील व्यापार फारच मंदावला आहे. हुगळीपासून येथपर्यंत एक रेल्वेचा फांटा तयार करण्याचें ठरलें आहे.
१८६९ सालीं येथें म्युनिसीपालिटी स्थापन झाली. येथें एक लहानसा तुरुंगहि आहे.