विभाग दहावा : क ते काव्य
कहार - (संस्कृत :- स्कंधकार - खांद्यावर ओझीं वाहणारे). ही भोई, शेतकरी आणि मजूर यांची जात आहे. १९११ सालची लोकसंख्या १८,३८,६९८ होती. पैकीं १८३१३०५ हिंदू, व ६९५ मुसुलमान होते. संयुक्त प्रांत, बिहार-ओरिसा, बंगाल, मध्यहिंदुस्थान, वर्हाड, मध्यप्रांत या अनुक्रमानें यांची संख्या उतरती आहे. बंगालमधील कहार बहुधा शिवशक्तीची उपासना करतात. यांतील वैष्णव फार थोडे आहेत. खानी पोटजातींतील लोक कार्तिक शुद्ध सप्तमीच्या दिवशीं एक सण पाळतात. त्या दिवशीं ब्राह्मणांनां घेऊन रानांत जातात व आंवळीच्या झाडाखालीं पानें, फळें व मिठाई वाहतात. ब्राह्मणांनां जेऊं घालून नंतर आपण मद्यमिश्रित भोजन करतात. डाक, कर्ता, बंदी, गोरैया, धर्मराज, सोखा, शंभुनाथ आणि रामठाकूर या देवतांव्यतिरिक्त हे लोक दामूबीर नांवाच्या देवरूप पावलेल्या एका कहार पुरुषाची आराधना करतात. त्याला बकरीं बळी देतात. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे दामूबीर पूजेचे दिवस होत.
संयुक्तप्रांत - सर्वांत जास्त वस्ती या प्रांतांत आहे. लो. सं. (१९११) ११,१२,४२१. येथें कहारांनां महरा म्हणतात (संस्कृत महिला). कारण त्यांचा स्त्रियांच्या अंतःपुरांत प्रवेश असे. कहारांनां धीवर (मासे धरणारे) असेंहि म्हणतात. यावरूनहि त्यांच्या धंद्याची कल्पना होते. त्यांचे दुसरें नांव बेहार असें असून इंग्रजी शब्द 'बेअरर' याच्याशीं तें जुळतें.
ब्राह्मणवंशशास्त्रज्ञांच्या मताप्रमाणें कहार ही संमिश्र जात असून ती ब्राह्मण पिता व निषाद किंवा चांडाल जातीची माता यापासून झाली आहे. चर्येवरून ते अनार्य दिसतात. नोकर म्हणून उच्च वर्गांत त्यांचा समावेश झाला आहे; व बाह्यांनां स्वजातींत ते घेऊं शकतात. धुरीया कहारांची उत्पत्ति महादेवानें उत्पन्न केलेल्या धुळीपासून झाली अशी दंतकथा आहे. मगधाचा राजा जरासंध याच्यापासून बिहारचे कहार झाले अशी दंतकथा कनिंगहॅम देतो. रामाच्या सांगण्यावरून नारदानें कहार जातीचा गुरु केला म्हणून आपण ब्राह्मणांचे गुरू आहोंत असें कहार म्हणतात व कहारांच्या दंतकथांतून ही गोष्ट आढळते.
१८९१ च्या खानेसुमारीवरून कहारांच्या बर्याच पोटजाती नोंदल्या गेल्या आहेत. त्या घारूक, जइधर, खावार, महार, मलहा, बथमा, बाट धीमर, राइकवार, रावावी, सिंघरिया व तुराई या होत. या जातींवरून सध्यांची जात कशी बनली असेल ही कल्पना होते. इमिलीय, अतेरीय, मुडेरी वगैरे त्यांची गोत्रें आहेत. या पोटजातींच्या नांवांवरून व गोत्रांवरून त्यांच्या अनेक धंद्यांचा बोध होतो. या खानेसुमारीवरून पाहतां यांत हिंदूंचे ८२३ विभाग व मुसुलमानी शाखेचे २४ विभाग दिसतात. यावरून सध्या या जातींत केवढी गुंतागुंत होऊन बसली आहे याची कल्पना करतां येईल.
या लोकांची पंयायत असून सर्व लोक हजर राहतात व पंच नेमतात. या पंचायतींचीं तीन कामें असतात. विधवाविवाह झाला म्हणजे नवर्यानें तिच्या मृत नवर्याच्या कुटुंबास काय द्यावयाचें हा प्रश्न पंचायत ठरविते. कोणी चोरी किंवा व्यभिचार केला तर गुन्हेगारास बहिष्कृत करण्याचें काम पंचायतीचें असतें. पंचायतीचें तिसरें महत्त्वाचें काम म्हटलें म्हणजे मालमत्तेसंबंधीं सर्व वादांचे निकाल लावणें हें होय.
कहार पुरुषाला आपल्या नात्याच्या कोणत्याहि कुटुंबाशीं लग्नसंबंध करतां येत नाहीं. पंचायतीस सबळ कारणें दाखवून नंतर बहुपत्नीत्व स्वीकारतां येतें. आठव्या वर्षापूर्वी मुलींची व पंधरा वर्षापूर्वी मुलांची लग्नें करतात. मुळींत लग्न न झालेल्या कोणत्याहि स्त्रीबरोबर कोणासहि व्यभिचार करतां येत नाहीं. परंतु विधवेशीं किंवा परस्त्रीशीं कोणी संबंध ठेवला तर त्यास त्या विधवेच्या व त्या स्त्रीच्या नवर्याच्या कुटुंबास जेवण व पैसे द्यावे लागतात. कुमारिकेच्या लग्नाकरितां हुंडा द्यावा लागत नाहीं. सनदशीर लग्नानें झालेल्या सर्व मुलांस वारसाहक्क प्राप्त होतो. कहारांत विधवाविवाह आहे, परंतु तो पंचायतीच्या मान्यतेनें झाला पाहिजे. मृतपतीच्या धाकट्या भावाबरोबरहि विधवेला लग्न करतां येतें.
संयुक्त प्रांतांत हे लोक अद्यापि असंस्कृत स्थितींत आढळतात. तें भैरवाला एक बकरा, रोट व मद्य अर्पण करतात. महावीर किंवा हनुमान देवाला वस्त्र, जानवें आणि फुलांच्या माळा घालतात. पांचान पिराला मद्य व लहान करडूं नैवेद्यादाखल देतात. झांशीमध्यें हिंदू व मुसुलमान चालींचें एक चमत्कारिक मिश्रण झालें आहे. जेव्हां एखादा मनुष्य देवीची उपासना करावयास निघतो तेव्हां एक मुसुलमान व एक खाटिक त्याच्या बरोबर देवळात जातात. तो मुसुलमान 'कालिमा' चें आव्हान करून वघ्य पशूच्या मानेंत सुरा खुपसतो व तो खाटिक पशूचें शव स्वच्छ करून यजमान व त्याची मंडळी यांच्या स्वाधीन करतो. हे लोक कलिंगडें व शिंगाडे पिकवितात. हे शिंगाडे लावतांना सिलोमनबाबा आणि त्याचा भाऊ माधोबाबा या स्थानिक देवतांनां भजतात. कलिंगडे लावतांना घटोरियाबाबा या आणखी एका तिसर्या देवतेला भजतात. नदीच्या व तळ्याच्या कांठी यांच्याकरितां मांडव उभारतात. कारण यांचें वास्तव्य असतें त्या ठिकाणीं पीक चांगलें येतें असा समज आहे. जेव्हां हे लोक मासे मारण्याकरितां किंवा मेणे उचलण्याकरितां बाहेर पडतात तेव्हां या जातीचें आराध्यदैवत कालूकहार यांचे आव्हान करतात.
कहार जातींत मुलांची सात व मुलींची पांच नांवें ठेवतात. पण समारंभांत व नेहमीसुद्धा पहिल्याच नावाचा उपयोग केला जातो. एखाद्या मनुष्याची मुलें मेलीं तर पुढें होणार्या मुलास निंदास्पद नांव ठेवितात. तप्तमुद्रेसारखे दिव्याचे प्रकार त्यांच्यामध्यें थोडे बहुत आढळतात. किरकोळ शकुनांवर त्यांचा विश्वास नसून वैशाखांत होणार्या 'अखटी' समारंभाच्या वेळीं देवीच्या देवळांत स्त्री-पुरुष जमून नूतन वधूवरांस एकमेकांचीं नांवें घेण्यास लावितात व त्या ठिकाणीं पिकांकरितां पाऊसपाण्यासंबंधींचे अनेक शकुन पहातात.
कहार जातीचे धंदे विविध आहेत. कहार हा ओझीं नेण्याचें व पाणी आणण्याचें काम करतो; व टोपल्या विणण्याचें बुरुडकामहि करितो. पालखी वाहणें व विहिरींत बुडी मारणें हीं कामें कहारच करितात. या जातीचे लोक, चांभार व धोबी खेरीजकरून सर्व जातींच्या लोकांची भांडीं घांसतात. उलट यांचा सामाजिक दर्जा एवढा आहे कीं, कनोजी ब्राह्मणांखेरीज सर्व जातीचे लोक त्यांच्या हातचें पाणी पितात व रसई खातात. ब्राह्मण व रजपुत यांच्या हातची कच्ची रसई खातात.
मध्य प्रांतातील कहार - मध्यप्रांतांत हे पालखी वाहणारे भोई आहेत. यांची संख्या मध्यप्रांतांत २३,००० व वर्हाडांत २७,००० आहे. हे लोक पूर्वी डोल्या, पालख्या आणि मेणे उचलीत. सांप्रत यांचा हा धंदा बुडाला आहे.
यांची उत्पत्ति कोणी ब्राह्मण बाप व भंगी आई यांपासून झाली असावी असा शोध रिस्ले व हिरालाल यांनीं लाविला आहे. पण यांचा ढीमर लोकांचा बराच संबंध असावा असें वाटतें. पालखी उचलण्याचा धंदा बंद पडल्यानें घरकाम करणारे हे नौकर बनले. यांच्या बायका राजे लोकांच्या जनानखान्याच्या आंतील भागांत राजे लोकांची पालखी नेण्याचें काम करीत; व जनानखान्याचें रक्षण करण्याकरितां या बायकांचें लहान पथक तयार करीत. हैदराबादेस अजून यांचें पथक हयात आहे. म्हैसूर संस्थानांतहि यांची थोडीशी संख्या असून तेथेंहि ते ओझीं वाहण्याचेंच काम करतात.
मुंबई इलाखा - कहार अथवा बुंदेलखंडी भोई यांची संख्या येथें १९०१ सालीं ११८२ इतकी असून तींत ६४६ पुरुष व ५३६ बायकांचा समावेश झाला होता. दक्षिणेंत हे बहुतेक ठिकाणीं आढळून येतात. शिवाय अहमदाबाद, भडोच सुरत व सिंध येथेंहि यांची संख्या थोड्या प्रमाणांत आहे. आपण औरंगझेबाच्यावेळीं बुंदेलखंडांतून दक्षिणेत आलो असें हे सांगतात, व ही गोष्ट संभवनीयहि वाटते. या जातीचे ज्ञातिविवाहात्मक भेद नसून गोत्रांत तर विवाहानें पोटभेदहि नाहींत. भंडारे, गंगोळे, कचरे, लडके, लाचुरे, लिब्रे, मेहेरे, पाद्रे व सांब्रे अशीं यांचीं सर्वसाधारण आडनांवें असून एकाच आडनावांच्या लोकांचीं लग्नें होत नाहींत. आत, मावशी व मामा यांच्या मुलीशीं या ज्ञातींतील लोक लग्नें करीत नाहींत. इतरांना या जातींत प्रवेश मिळत नाहीं. दहा ते पंचवीस वर्षांपर्यंत मुलाचें लग्न करितात व वयांत येण्यापूर्वीच मुलींचीं लग्नें होतात. या लोकांत बहुपत्नीत्व रूढ आहे. परंतु बहुभर्तृत्व मात्र नाहीं. कहारांचें लग्नविधी मराठ्याप्रमाणेंच आहेत. शमीची पानें घेऊन ते देवक ठेवितात. कुंभाराच्या घरांतून एक घट मिरवीत आणून तो देवकाजवळ ठेवितात व त्याची पूजा करितात. हळदी, कन्यादानविधि व सप्तपदी वगैरे प्रकार कहारांच्या लग्नांत असतात. या जातींत विधवाविवाह मान्य असून विधवेस नवीन वस्त्र धारण करावें लागतें व नंतर तिला कुंकू लावतात. हाच समारंभ या विवाहांत विशिष्ट असतो. नवर्याला दुर्वर्तनाबद्दल बायको सोडता येते व बायकोस विधवाविवाहाप्रमाणें अन्य पति करण्यासहि मुभा असते. ही जात हिंदु धर्मापैकीं एक असून वारसासंबंधी हिंदु कायदा हे लोक पाळतात. ब्राह्मणांचे देव व खेड्यांतले देव या लोकांनां मान्य असून ते हिंदू सण पाळतात व त्यांचे उपाध्याय ब्राह्मणच असतात.
या लोकांत मृत मनुष्य विवाहित असेल तर त्यास जाळतात व अविवाहित मृत झाला तर त्यास पुरतात. कुणबी किंवा भोई लोकांप्रमाणोंच यांचे मृतासंबंधींचे सर्व विधी असतात. परंतु कुणब्यांप्रमाणें श्राद्धपक्ष भाद्रपद महिन्यांत न करतां, कहार लोक हे विधी दिवाळी किंवा माघी शिवरात्र या सुमारास करतात.
या लोकांचा पिढीजात धंदा म्हणजे पालखी वाहणें, मासे धरणें व विकणें हाच होय. कांहीं लोक भाज्या व तंबाखू पेरतात. मासे, बकरीं, मेंढ्या वगैरे प्राणी त्यांचे खाद्य असलें तरी हे लोक पक्षी खात नाहींत. ते दारू पितात. त्यांचा दर्जा भोई लोकांच्या वर असून ते कुणब्यांच्या हातचेहि खातात (क्रूक. रिस्ले व हिरालाल. एन्थोव्हेन सेन्सस रिपोर्ट)