विभाग दहावा : क ते काव्य

कलियुगवर्ष -  कलियुग संवत् (वर्ष) व भारतीयुद्ध संवत् हीं दोन्हीं एकच आहेत अशी एक समजूत आहे.  परंतु ती बरोबर दिसत नाहीं.  कारण भारतीयुद्धानंतर धर्माचें राज्यारोहण झालें त्यावेळीं कलियुगसंवत् सुरू झालें असलें पाहिजे.  कांहींच्या मतें कलियुगास प्रारंभ झाल्यानंतर युद्ध झालें असें आहे.  युद्धानंतर ५१ वर्षांनीं कृष्ण निजधामास गेले व त्यावेळीं कलियुगास प्रारंभ झाला असेंहि एके ठिकाणीं सांपडतें.  सारांश अगदीं नक्की काळ असा अद्यापि निश्चित झाला नाहीं.  तरी पण या बाबतींत ऐहोळचा शिलालेख प्रमाण धरण्यास हरकत नसावी.  तेथें शालिवाहनशकाचें व भारतीय युद्धसंवताचें अशीं दोन्हीहि वर्षे दिलीं आहेत.  त्यावरून शालिवाहन शकापूर्वी ३१७९ या वर्षी (ख्रि. पू. ३१०२ ता. १८ फेब्रुवारी) भारतीय युद्ध झालें व तद्‍नंतर थोडक्याच दिवसांनीं कलियुग संवत् सुरू झालें.  सामान्य हिंदुजनसमूह भारतीयुद्ध, कलियुगारंभ, व परीक्षित जन्म जवळ जवळ मानून त्यांचा काल वरील (शकपूर्व ३१७९) धरितात.  याबद्दल जास्त माहिती ज्ञा. को. प्र. खं. वि. ५ वा पृ. १०६-७ वर पहा. (इं. अॅं. पु. ४०; वैद्य - म. भा. ३)