प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कला -  या शब्दाचा धात्वर्थ आज अनिश्चित आहे.

शब्दाचा व्यापक अर्थ -  प्राचीन काळीं हिंदुस्थानांत ज्या ज्या कांहीं गोष्टींत कौशल्य दिसून येत असें त्या गोष्टी कलाविषयक समजत आणि त्या वस्तूंतलें कौशल्य व्यक्त करणें ती त्या वस्तूची कला होय असें समजत.  चित्रांमध्यें कौशल्य ती चित्रकला, गाण्यामध्यें कौशल्य ती गायनकला आणि नृत्याविषयक कौशल्य ती नृत्यकला.  फुलांचे गालिचे करणें हीं पुष्पास्तरणकला; अंगास उट्या वगैरे लावावयास येणें ही कौतुमारकला व अशा तर्‍हेनें व्यवहारांतल्या प्रत्येक गोष्टी करण्यामध्यें कौशल्य आहो अशा तर्‍हेची कल्पना त्यांस येऊन अनेक गोष्टीस त्यांनीं कला म्हटलें आहे.  व्यवहाराच्या प्रत्येक गोष्टीमध्यें कौशल्य लागतेंच.  त्यामुळें प्रत्येक गोष्ट या दृष्टीनें कलाविषय होय.  आणि या दृष्टीनें जर आपण कलेचें व्यापक स्वरूप लिहावयास लागलों तर जगांतील सर्व श्रमविभागाचा साकल्यानें इतिहासच दिला पाहिजे आणि त्यामध्यें कौशल्य कसें आलें व आणतां येतें हें दाखविलें पाहिजे.  परंतु असल्या तर्‍हेच्या सर्वव्यापी विषयास प्रस्तुत लेखांत जागा नाहीं.  कां कीं, अनेक क्रिया निरनिराळ्या धंद्यांच्या व कृतीच्या विवेचनासाठीं स्वतंत्र लेखांचा विषय झाल्या आहेत.  मुद्रणकला, संगीत, काव्य, नृत्य, नाट्य वगैरे विषयांवर स्वतंत्र लेख असल्यामुळें त्यांचे विवेचन येथें नको.  प्रस्तुत लेखामध्यें कांहीं क्रियासमुच्चयबोधक माहिती व कलाविषयक तात्विक विवेचन केलें म्हणजे झालें.

कलेचें तात्विक विवेचन करावयाचें म्हणजे प्रत्येक बाबतींत लालित्य कसें उत्पन्न करतां येतें हें सांगावयाचें नव्हे; कां कीं प्रत्येक धंद्यांत लालित्य उत्पन्न करण्याचीं त्या त्या धंद्याचीं विशिष्ट तत्वें असतात.  तर वस्तु मोहक करतांना ज्या मानसिक किंवा इंद्रियविषयक गुणधर्मांची जाणीव कलावेत्ता दाखवितो त्या गुणधर्मांचें विवेचन करणें.  यालाच सौंदर्यशास्त्राचेंहि विवेचन म्हणतां येईल.

तात्विक विवेचन समजण्यासाठीं ज्या भावांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून आपण विवेचन करतों त्यांचेंहि विहंगमावलोकन अवश्य होतें.  विशिष्टावरून सामान्याकडे जाण्याच्या पद्धतीचा अवलंब करून आपण कलेची विषयव्यापकता व कालव्यापकत्व आणि प्रदेशव्यापकत्व ही व्यापकत्वें लक्षांत घेऊन विशिष्ट कलावरून भावरूप ज्ञात होणारी कला म्हणजे काय या तात्विक चर्चेकडे वळूं.

कला या शब्दाचें विषयव्यापकत्व प्राचीन भारतीयांच्या मतें बरेंच होतें.  हें दाखविण्यासाठीं नेहेमीं चौसष्ट कला असे शब्द वापरीत होते.  त्या चौसष्ट कला म्हणजे कोणत्या याविषयीं निश्चित मत असलेलें दिसत नाहीं.  शुक्रनीतींत एक यादी आहे तर भागवतांत दुसरीच आहे.  शिवाय कलांची संख्या नेहेमीं चौसष्टाच समजली जाई असेंहि नाहीं.  तिसर्‍या विभागांत प्रास्तरसंस्कृतीचा विकास होण्यापूर्वीच मनुष्यप्राण्याचें देशोदेशीं भ्रमण झालें हें सांगितलें आहे.  आणि प्राचीन भारतीयांच्या वैदिक शब्दांवरून व्यक्त होणारा संस्कृतिविकास दिला आहे.  जरा नंतरचा काल घेऊन संस्कृतिविकास देण्यासाठीं वेदविद्या ग्रंथांत (पृ. ११९ व पुढें) श्रौतकर्माशीं संबद्ध असलेला कलाविकास वर्णन केलाच आहे.  अग्निमंथन, कृषि, खाटकाचें काम, हजामत करणें, दारू तयार करणें, स्वयंपाक करणें, सोनारकाम, सुतारकाम, कुंभारकाम, चांभारकाम, कोष्टीकाम, लोहारकाम, शिवणकाम, पशुपालन, सोमक्रय, सोम कुटणें, गवंडीकाम, दळण, कांडण, दोर्‍या वळणें, गवत कापणें, लांकडें तोडणें, रथ वापरणें, खड्डे करणें, संगीत, वाद्यें तयार करणें व वापरणे, नृत्य व इतर करमणुकीच्या गोष्टी या श्रौत कर्माशीं कशा संबद्ध असतात, हें दिलें आहे.  चाणक्याच्या अर्थशास्त्राचा काल घेतला तर तेव्हां राज्यव्यवहारशास्त्र बरेंच वाढलेलें दिसतें; आणि इतर लौकिक क्रियाहि पुष्कळच विकास पावलेल्या दिसतात.  अग्निपुराण आणि शुक्रनीती यांसारखे ग्रंथ बर्‍याच उत्तरकालाचे बोधक आहेत आपण या कालांतील कलासमुच्चय घेऊं.  शुक्रनीतीतील कलांची यादी दिली पुढें आहे.  तींत १ ते ७ हें गांधर्व कलासप्‍तक, ८ ते १७ हें आयुर्वेद कलादशक व १८ ते २२ हें धनुर्वेद कलापंचक आहे.

१   साभिनय वर्तन.
२   वाद्यकरण व वादन.
३   वस्त्रालंकारसंधान.
४   अनेकरूपाविर्भाव कृतिज्ञान.
५   शय्यास्तरणसंयोगपुष्पादिग्रथन.
६   द्यूतादि क्रीडानुरंजन.
७   अनेकासनंसधानयुक्त रति.
८   मकरंदासव मद्यकृति.
९   शल्यगूढाहृति शिराव्रणव्यथ.
१०  हिंग्वादि संयोगादन्नपचन.
११  वृक्षादि प्रसवारोपपालनकृति.
१२  पाषाण धात्वादिदृति भस्मीकरण.
१३  इक्षुविकारादि कृतिज्ञान.
१४  धात्वौषधिसंयोगक्रियाज्ञान.
१५  धांतुसांकर्यपार्थक्यकरण.
१६  धात्वादिसंयोगापूर्वविज्ञान.
१७  क्षारनिष्कासनज्ञान.
१८  पदन्यासपूर्वक शस्त्रसंधानविक्षेप.
१९  संध्याघाताकृष्टि भेदयुक्त मल्लयुद्ध.
२०  बाहुयुद्धनिपीडन व प्रतिक्रिया.
२१  यंत्रद्यस्त्रनिपातन व्यूहरचना.
२२  गजाश्वरथगत्या युद्धसंयोजन.
२३  विधासनमुद्रा देवतातोषण.
२४  सारथ्य गजाश्वादिशिक्षा.
२५  मृत्तिकाभाण्डक्रिया.
२६  काष्ठभांडक्रिया.
२७  पाषाणभाण्डक्रिया.
२८  धातुभांडक्रिया.
२९  चित्राद्यालेखन.
३०  तडागवापीप्रासाद समरभूमिरचना.
३१  घटीयंत्रवाद्यादिक्रिया.
३२  वस्त्ररंजन.
३३  जलवायवाग्निसंयोगी विरोधक्रिया.
३४  नौकारथादि यानकृतिज्ञान.
३५  सूत्रादि रज्जुकरणविज्ञान.
३६  अनेकतंतुसंयोगपटबंध.
३७  रत्‍नवेधादिज्ञान.
३८  स्वर्गादियाथात्म्यविज्ञान.
३९  कृत्रिम स्वर्णरत्‍नादिक्रियाज्ञान.
४०  स्वर्णाद्यलंकारकृति.
४१  लेपादि सत्कृति.
४२  चर्मभार्दवादि क्रिया.
४३  दुग्धदोहादि घृतांतविज्ञान.
४४  कंचुकसीवन.
४५  बाव्हादि जलतरण.
४६  गृहभाण्डादिमार्जन.
४७  वस्त्रसम्मार्जन.
४८  क्षुरकर्म.
४९  तिलमांसादि स्नेहनिष्कासन.
५०  पशुचर्माङग निर्हारक्रिया.
५१  सीराद्यादिकर्षण.
५२  वृक्षाद्यारोहण.
५३  मनोनुकूलसेवाकृतिज्ञान.
५४  वेणुतृणादिपात्रकृतिज्ञान.
५५  काचपात्रादिकरण विज्ञान.
५६  जलसेचन संहरणादि.
५७  लोहशस्त्रास्त्रकृतिज्ञान.
५८  गजाश्ववृषभोष्ट्रपल्याणक्रिया.
५९  शिशुसंरक्षणधारणक्रीडनज्ञान.
६०  अपराधी सुयुक्त ताडनज्ञान.
६१  नानादेशीय वर्णसुलेखन.
६२  तांबूलरक्षादि कृतिज्ञान.
६३  आदान.
६४  प्रतिदान.

हावभावसहित नृत्य करणें ही कला आहे; त्याचप्रमाणें अनेक प्रकारचीं वाद्यें तयार करणें व तीं वाजविणें ह्या ज्ञानाचा कलेंतच अंतर्भाव होतो.

स्त्रीपुरुषादिकांनीं सुशोभित दिसेल अशा रीतीनें वस्त्रें परिधान करणें व अलंकार घालणें ही देखील कलाच आहे; व निरनिराळ्या प्रकारचीं हुबेहुब सोंगें आणणें ह्या गोष्टीला कलाच म्हणतात.

उत्तम बिछाना घालणें, त्यावर चांगल्या रीतीनें आस्तरणें पसरणें, फुलाच्या माळा गुंफणें ह्या कलाच होत.  आणि द्यूतादि खेळांनीं मनोरंजन करण्याची कलाच आहे.

निरनिराळ्या प्रकारचीं आसनें व संधानें ह्यांसह रतिक्रिडेचें ज्ञान असणें ही कलाच असून ह्यावर दिलेल्या कलासप्‍तकास गांधर्ववेदामध्यें स्थान मिळालें आहे.

फुलांतून मध गोळा करणें; मद्यें, आसवें इत्यादि तयार करण्याची कलाच असून क्लेश न होतील अशा रीतीनें शल्योद्धार व शिरांवरच्या व्रणांचा नाश करणें ह्या गोष्टी कलाच आहेत.

हिंग वगैरेसारख्या पदार्थांनीं अन्न पचविण्याची कलाच असून वृक्षलतादिकांनां फलपुष्पांचा बहार आणण्याच्या कृतीस कलाच म्हणतात.

पाषाण, निरनिराळ्या धातू यांचें चूर्ण व त्यांपासून भस्म तयार करणें, त्याचप्रमाणें उंसापासून गूळ, (साखर) इत्यादि तयार करणें ह्या ज्ञानास कलाच म्हणतात.

विविध धातु व औषधी यांचें बेमालुम मिश्रण तयार करणे, त्याचप्रमाणें मिश्रधातूंचें पूर्ण पृथक्करण करणें ह्या कलाच आहेत.

विविध धातूंचें मिश्रण करणें, त्याचप्रमाणें द्रव्यातून क्षार निराळे काढणें ह्या कलाच असून एकंदर हें कलादशक आयुर्वेदशास्त्रांत अंतर्भूत होतें.

पायांच्या चालीनुरूप शस्त्रसंधान व फेक करणें ही कलाच असून सांध्यावर अघात करणें किंवा आकर्षण करणें ह्या योगानें केलेलें मल्लयुद्ध कलाच आहे.

मल्लांनीं शस्त्ररहित बाहुयुद्ध करावयाचें तें मुष्टिप्रहारांनीं.  परंतु अशा युद्धांत मृत झालेल्यास त्या जगांत यश नाहीं व स्वर्गप्राप्‍तीहि नाहीं.

शत्रूच्या बलाचा व गर्वाचा अंत करणारें युद्ध कोणास कीर्ति होणार नाहीं ?  म्हणून बाहुयुद्ध हें प्राणांचा नाश होईपर्यंत करावें.

स्वतः होऊन केलेलें, प्रतिकाराकरितां केलेलें.  निरनिराळ्या प्रकारचे अतिभयंकर बाहुप्रहार, त्याचप्रमाणें शत्रूला उत्तम प्रकारें खालीं पाडणें व त्याजवर आघात करणें, त्याचप्रमाणें निरवधानपणांत शत्रूला लोळविणें इत्यादि गोष्टींनीं त्रास देणें व त्यांचा प्रतिकार करणें ह्या कलाच आहेत.

रोखलेल्या प्रदेशांत निरनिराळीं युद्धयंत्रे, अस्त्रें पाडणें त्याचप्रमाणें रणवाद्यांच्या विशिष्ट आवाजावरून विशिष्ट प्रकारची व्यूहरचना करणें ही कलाच आहे.

हत्ती, घोडे, रथ इत्यादिकांच्या गत्यनुरूप युद्धाची योजना करणें ही कलाच असून, एकंदर हें कलापंचक धनुर्वेद शास्त्रांत अंतर्भूत झालें आहे.

विविध आसनें, मुद्रा इत्यादींनीं देवतां संतुष्ट करणें, त्याचप्रमाणें सारथ्यकर्म, हत्ती घोड्यांनां चालां शिकविणें ह्या कलाच आहेत.

मातीचीं, लाकडाचीं, दगडाचीं व धातूंचीं उत्तम भांडीं तयार करणें, त्याचप्रमाणें चित्रें काढणें ह्या कलाच होत.  ह्या चार कला मुद्दाम निराळ्या सांगितल्या.

तळीं, विहिरी, राजवाडे बांधणें, सपाट प्रदेश करणें या कलाच असून, घटीयंत्रें व वाद्यें तयार करणें यांनां कलाच म्हणतात.

कमीजास्त प्रमाणांत रंगांचें मिश्रण तयार करून कपडे रंगविणें, त्याचप्रमाणें जल, वायु, अग्नि, ह्यांचा संयोग व विरोध म्हणजे वाफेची यंत्रें करणें ह्या कलाच आहेत.

जहाजें, रथ, वाहनें बांधणें त्याचप्रमाणें बारीक सूत व मोठे दोर करणें ह्या कलाच होत.

अनेक धाग्यांचें वस्त्र विणणें, त्याचप्रमाणें रत्‍नास चांगली भोकें पाडणें ह्या कलाच आहेत.

सोनें वगैरेंची योग्य परीक्षा होणें, बनावट सोनें, रत्नें इत्यादि तयार करणें ह्या कलाच आहेत.

सुवर्णालंकार घडविणें, व ते अलंकार निरनिराळ्या लेपांनीं तेजस्वी करणें, त्याचप्रमाणें कातडीस मऊपणा आणणें ह्या कलाच होत.

पशूंची कातडीं काढणें व त्यांच्या दुधाची धारेपासून ते तुपापर्यंत क्रिया करणें ह्या कलाच होत.

कपडे शिवणें, जलामध्यें बाहुबलावर तरून पोहणें ही कलाच आहे.

घरांतील भांडी स्वच्छ घासणें, त्याचप्रमाणें वस्त्रें स्वच्छ धुणें, स्मश्रू करणें ह्या कलाच होत.

तीळ वगैरेंतून तेल व मांसातून चरबी गाळणें, नांगराचा फाळ ओढून धरणें, झाडावर चढणें ह्या कलाच होत.

एखाद्याची मर्जीनुरूप सेवा करण्याचें ज्ञान, त्याचप्रमाणें वेळू, गवत, वेत इत्यादिकांचीं भांडीं तयार करण्याची विद्या कलाच होय.

कांचेची भांडीं तयार करण्याचें ज्ञान कलाच आहे.  त्याचप्रमाणें पाणी शिंपडणें व पाण्याला वळण देणें ह्या कलाच होत.

लोखंड, पोलाद यांची शस्त्रास्त्रें तयार करणें, हत्ती, घोडे, बैल इत्यादिकांवर झुली चढविणें ह्या कलाच होत.

शिशुसंरक्षण, धारण क्रीडन ह्या कलाच असून अपराध्यास योग्य ताडन करणें ही कलाच आहे.

निरनिराळ्या देशांतील भाषा उत्तम रीतीनें लिहिणें, त्याचप्रमाणें तांबूल भक्षण करणें ह्या कलाच होत.

ताबडतोब क्रिया करणें यास 'आदान' व सावकास क्रिया करणें यास 'प्रतिपादन' म्हणतात.  कलांमध्यें हे दोन गुण आहेत, त्यावरून ह्या दोन कला होतात.

ह्या चौसष्ट कला संक्षेपानें सांगितल्या.  प्रत्येक मनुष्य ज्या ज्या कलेंत निष्णात असेल त्यानें त्या त्या कलेंतच आपलें कौशल्य खर्चावें.

या कलांमध्यें कांहीं कला म्हणजे धंदेच होत व त्या कलेचे वाहक म्हणजे विशिष्ट धंद्यांतील लोक.  सद्‍गृहस्थ व सुगृहिणी यांस भूषण म्हणून शोभणार्‍या अशा कित्येक कला वरच्या यादींत दिसून येतील. आतां दुसर्‍या एका यादीकडे पाहूं.

चौसष्ट कला -  १ गीतं (गायन), २ वाद्यं (वादनकला), ३ नृत्यं (नाच), ४ नाटयं (सोंग घेणें), ५ आलेख्यं (लिहणें वगैरे), ६ विशेषकच्छेद्यं (निशाण मारणें), ७ तंडुलकुसुमबलिप्रकार : (तांदूळ व फुलें ह्यांच्या तर्‍हतर्‍हेच्या आकृती करणें), ८ पुष्पास्तरणं (फुलाचे गालीचे घालणें), ९ दशनवसनांगरागा : (दांत निरनिराळ्या रंगांनीं सुशोभित करणें, वस्त्रावर वेलबुट्टी काढणें व अंग गोंदणें वगैरे), १० मणिभूमिकाकर्मं (त्रिकोण, चतुष्कोण इत्यादि आकृतींनीं जमिनीवर मण्यांची रचना करणें), ११ शयनरचनं (नानाप्रकारच्या शय्या जेथल्या तेथें ठेवणें), १२ उदकवाद्यं (जलतरंगासारखीं वाद्यें तयार करणें, वाजविणें वगैरे), १३ चित्रयोग (मातीचीं चित्रें तयार करणें), १४ माल्यग्रथनविकल्पाः (फुलांचे हार, तुरे गजरे इत्यादि तयार करणें), १५ शेखरकपीडयोजनं (मुकुट वगैरे शोभिवंत करणें), १६ नेपथ्यप्रयोगाः (पडद्याच्या आंत सोंग देणें), १७ कर्णपत्रभंगः (कानांवर कोंवळ्या कोंवळ्या पाकळ्या ठेवणें), १८ सुगंधयुक्तिः (सुवासिक पदार्थ तयार करणें), १९ भूषणयोजनं (सुवर्णादिकांचे दागिने करणें), २० ऐर्देजालं (जादुगिरी), २१ कौचुमारयोगः (अंगास उट्या वगैरे लावणें), २२ हस्तलाघवं (हातचलाखी), २३ चित्रशाकापूपभक्ष्यविकारक्रिया (नाना तर्‍हेच्या भाज्या व पक्वान्नें तयार करणें), २४ पानकरसरागासवयोजनं (नाना तर्‍हेचीं पेयें करणें, तर्‍हतर्‍हेच्या रसांची पुटें देणें, पदार्थांवर निरनिराळे रंग देणें व मद्य तयार करणें), २५ सूचिवायकर्म (शिवणें), २६ सूत्रक्रीडा (बाहुल्या नाचवणें, भोंवरे फिरविणें वगैरे), २७ वीणाडमरुकवाद्यानि (वीणा वगैरे वाद्यें वाजविणें), २८ प्रहेलिका (उखाणे जिंकणें), २९ प्रतिमाला (भेंड्या लावणें, ३० (दुर्वाचकयोगः (कठोरवर्णमिश्रित श्लोक पठण), ३१ वाचनं (पुस्तक वाचणें), ३२ नाटकाख्यायिकादर्शनं (नाटकें, प्रहसनें करून दाखविणें), ३३ काव्यसमस्यापूरणं (दुसर्‍यांनीं दिलेला अपूर्ण श्लोक पुरा करणें), ३४ पट्टिकावेत्रवानविकल्पः (वेताच्या वस्तू करणे), ३५ तक्षकर्माणि (कातर काम, जाळ्या वगैरे), ३६ तक्षणं (सुतारकाम), ३७ वास्तुविद्या (घर बांधणे), ३८ रौप्यरत्‍नपरीक्षा (रुपें व रत्नें ह्यांची परीक्षा करणें), ३९ धातुवादः (अशोधित धातु शुद्ध करणें), ४० मणिरागज्ञानं (रत्‍नांनां रंग देणें), ४१ आकरज्ञानं (खाणी कशा व कोठें सांपडतील तें सांगणें), ४२ वृक्षायुर्योगवेदः (वृक्षांचें आयुष्य वाढविण्याचा योग), ४३ मेषकुक्कुटलावक युद्धविधिः (बकरें, कुकुटकुंभे व लावी पक्षी यांच्या झोंब्या लावणें, ४४ शुकसारिकाप्रलापनं (शुक, मैना इत्यादिकांनां बोलण्यास शिकविणें), ४५ उत्सादनं (पतंग उडविणें), ४६ केशमार्जनकौशलं (वेणी घालणें), ४७ अक्षरमुष्टिकाकथनं (मनांतील अक्षरें सांगणें, मुठीमध्यें कोणता पदार्थ आहे हें सांगणें), ४८ म्लेछितकुतर्कविकल्पाः (करपल्लवी, नेत्रपल्लवी वगैरे भाषांची योजना करणें), ४९ देशभाषाज्ञानं (देशभाषा जाणणें), ५० पुष्पशकटिका निर्मितिज्ञानं (बागबगीचे वगैरे करणें), ५१ यंत्रमातृका धारणमातृका (रहाट, ओझीं उचलून नेण्याकरितां केलेलीं यंत्रें वगैरे), ५२ संवाच्यं (वर्क्तृत्व), ५३ मानसीकाव्यक्रिया (न बोलतां मनांतल्या मनांत काव्यें रचणें), ५४ अभिधानकोशः (अनेक कोशांचें ज्ञान), ५५ छंदोज्ञानं (छंदःशास्त्राची माहिती), ५६ क्रियाविकल्पः (चमत्कार करून दाखविणें), ५७ छलितक योगः (खुषमस्करीपणा), ५८ वस्त्रगोपनानि (वस्त्रें नेहमीं नवी राहतील अशा युक्तीनें ठेवणें), ५९ द्यूतविशेषः (जुगार), ६० आकर्षक्रीडा (मल्लयुद्ध), ६१ बालक्रीडनकानि (लहान मुलांचीं खेळणीं), ६२ वैनायिकी विद्याज्ञनं (विघ्नें नाहींशीं करण्याची युक्ति) आणि ६४ वैतालिकी विद्याज्ञानं (भूतपिशाच्चादिकांचें ज्ञान).  (वात्स्यायन कामसूत्र व टीका)

वर दिलेल्या यादीवरून प्राचीन काळचा कलाविषयक झालेला व्यवहारसमुच्चय लक्षांत येईल.  या उपर्युक्त कलांपैकीं कोणकोणत्या कलांवर आज वाङ्‌मय उपलब्ध आहे याची पद्धतशीर चौकशी करण्याचे प्रयत्‍न अलीकडे बरेचसे झाले आहेत.  तथापि याविषयीं चांगलेंसें वाङ्‌मय आज जमलें आहे असें म्हणतां येत नाहीं.  संगीत, नृत्य व नाट्य या विषयांवर वाङ्‌मय पुष्कळच आहे; पण चित्रकलेवर संस्कृत वाङ्‌मय अस्तित्वांत नाहीं म्हटल्यास चालेल.  घरें बांधणें, शहरें वसविणें इत्यादि वास्तुशिल्पावर वाङ्‌मय आहे.  परंतु ज्या शिल्पांचा विकास केवळ वैयक्तिक शिक्षणानेंच होतो तीं शिल्पें फारशीं वाङ्‌मय प्रवर्तू शकत नाहींत.  आणि यामुळें अनेक कलांविषयीं वाङ्‌मय सांपडणें शक्य नाहीं अशी आमची समजूत आहे.

प्राचीन कलेचें विवेचन ग्रांथिक उतार्‍यांचा उपयोग केल्यानेंच संपत नाहीं.  प्राचीन कलाविषयक वाङ्‌मय जरी अपुरें असलें तरी प्राचीन कलेच्या आश्रयभूत झालेल्या वस्तूंचा अभ्यास करून आज कलाविषयक वाङ्‌मय पुष्कळच वाढलें आहे.

शब्दाचा नियमित अर्थ -  कलाविषयक विवेचन अलीकडे यूरोपीय वाङ्‌मयानुसारी  झालें आहे.  आणि 'आर्ट' या शब्दांत यूरोपीय जो अर्थ घालीत असतील त्याप्रमाणें कलेचें म्हणजे आर्टचें विवेचन करूं लागले आहेत.  त्या संप्रदायानुसार आजचे लेखक कलाविषयक प्रश्नांचा विचार करतांनां मंडनविषयक कला, चित्रकलाविषयक कला व नृत्यसंगीतादि मनास उत्तेजन कला यांसच कला या शब्दानें सुचवितात.  आणि कलेचें विवेचन करतांना या गोष्टींचें विवेचन करतात किंवा जें त्यांस कांहीं तात्विक लिहाययाचें असेल तें विशेषेंकरून या कलांस उद्देशून लिहितात.  निरनिराळें राष्ट्रांत निरनिराळ्या मंडनपद्धती विकासल्या आहेत.  आणि नृत्यसंगीतादि कामें एकमेकांपासून भिन्न दिसूं लागतात असें पाहून कलेचें देशवार किंवा संस्कृतिवार वर्गीकरण करूं लागतात.  पुष्कळदां कला विशिष्ट कामांचा आश्रय पहाते.  उदा. बौद्धसंप्रदाय हा कलेस अनेक कारणांमुळें उत्तेजक झाला तसा ख्रिस्ती संप्रदायहि कलेस उत्तेजक झाला.  त्यामुळें कलेचें वर्गीकरण करतांनां कधीं कधीं ख्रिस्ती कला व बौद्ध कला अशा तर्‍हेचें वर्गीकरण केलेलें दिसतें.

कलेच्या इतिहासांत साधारणतः ''वास्तुसौदर्यशास्त्र'' ''मूर्तिकर्म'' ''खोदनकौशल्य'' ''चित्रकला'' ''संगीत'' ''नृत्य'' यांचा समावेश करतातच, पण सोनाराच्या कला, मूल्यवान रत्‍नांवर नकशी काढणें, त्याप्रमाणें मातीचीं व धातूचीं भांडीं वगैरे करण्यांतील कारागिरी इत्यादि गोष्टींचा कलेची पहाणी करतांना उल्लेख करण्याचा परिपाठ आहे.  त्याप्रमाणें कशिदा उर्फ ''सूचिशिल्प'', ''भित्तिभूषणार्थ'' पडद्यावरील कामें उर्फ ट्यापेस्ट्री, गालिचे, टेबलाची कव्हरें व पुस्तकांचीं कव्हरें यांत दिसून येणारी कला ही कलेच्या पहाणीच्या कक्षेंत किंवा इतिहासकक्षेंत घेण्याची पद्धति आहे.  कलेचा अत्यंत व्यापक अर्थ घेतला तर त्यांत वाङ्‌मयविषयक कौशल्यहि अंतर्भूत होईल.

विषयव्यापकत्व प्रथमतः अधिक मोठें धरलें जाऊन नंतर तें अधिक नियमित झालें.  आणि चित्रसंगीतनृत्यांदीशीं समक्षेत्री झालें.  या क्रियेचें कारण पहावयास आपणांस यूरोपच्या वैचारिक इतिहासाकडे पाहिलें पाहिजे.  पण आपणांस त्या भानगडींत पडण्याचें कारण नाहीं.  कां कीं, आपली जिज्ञासा सध्यां शब्देतिहासविषयक नसून वस्तुविषयक आहे.

कलेचें प्रदेश व्यापकत्व -  कलेच्या नियमित अर्थानें तिचें प्रदेशव्यापकत्व आणि कालव्यापकत्व आतां लक्षांत घेऊं.  असें करावयाचें म्हणजे प्रत्येक संस्कृतींतील कलाविषयक प्रगति द्यावयाची.  सर्व देशांचे कलाविकास मिळून आजची जागतिक कला झालेली आहे.  आणि सर्व कला मिळून एक जागतिक कलासंप्रदाय निर्माण होणेंहि आज अशक्य नाहीं.

कलांचे जे अनेकविध प्रकार आहेत त्यांच्या विकासाकडे लक्ष दिलें असतां असें दिसून येतें कीं ते विकास धार्मिक कल्पना, ऐतिहासिक वृत्तें आणि आर्थिक स्थिति यांच्या विकासाशीं बरेच संलग्न आहेत.  प्रत्येक संस्कृतीनें जागतिक कलेवर आपली छाप ठेवलेलीच आहे.  आणि निरनिराळ्या देशांच्या आणि कालांच्या कलांमध्यें कालस्थलदर्शक भिन्न रेषा स्पष्टपणें उमटलेल्या दिसून येत नाहींत.  जेतें राष्ट्र जितराष्ट्राच्या कलेचे व कौशल्याचे अवशेष आत्मगौरवासाठीं उपयोजिते.  जेता आपले कलाविषयक नवे प्रकार जित राष्ट्रांत आणण्याचें सोडून देतो असेंहि नाहीं.  तो आपलें वैशिष्टय राखतोच आणि त्यामुळें एखाद्या देशांतील राजकीय परिवर्तनाबरोबर त्या देशाच्या कलेंत भिन्नता व सातत्य हीं दोन्हीं दिसून येतात.  कलेमध्यें देवघेव आणि मिश्रण हीं उत्पन्न होण्यास राज्यक्रांतीच कारण असते असें नाहीं तर दळणवळणाच्या पद्धतींत सुधारणा झाली म्हणजेहि कलेमध्यें वैविध्य येतें.  शिवाय सुसंस्कृत राष्ट्रें जेव्हां विहंगमदृष्टीनें सर्व जग अवलोकूं लागतात तेव्हां त्यांनां स्वतःचीच विविधत्वाची आवड तृप्‍त करण्यासाठीं इतरांच्या कलेकडे अवलोकन करून तींतील इष्टभाग घेणें प्राप्‍त होतें.  अलीकडे पाश्चात्य जगांत पौरस्त्य देशांच्या कलेकडे विशेष लक्ष लागूं लागलें आहे आणि आफ्रिका व पोलनिशिआसारख्या प्रदेशांतील लोकांच्या वन्य संस्कृतींतहि आढळून येणारी कला पाश्चात्यांस विचारविषय झाली आहे.

वास्तुशिल्प, ईजिप्‍त :-  सुमारें इ.स. पूर्वी ३००० पासून ईजिप्‍तमध्यें हें शिल्प अति उच्च दर्जाला पोहोंचले होतें.  पिरॅमिड म्हणजे राजाचें शव ठेवण्याकरितां घडीव दगडांच्या केलेल्या कृत्रिम टेंकड्या अलौकिक म्हणतां येतील.  केरो शहराजवळ गीझे येथें सर्वांत मोठे तीन पिरॅमिड आहेत.  ईजिप्‍तच्या कलोकर्त्षाचा दुसरा काळ (सुमारें इ.स. पू. २०००) ''ओबोलिक्स'' नांवानें प्रसिद्ध अशा मनोर्‍याच्या जातीच्या स्मारकांचा होय.  हेलीओपोलीस येथें अशा तर्‍हेचा एक मोठा निमुळता अत्यंत प्रसिद्ध स्तंभ आहे.  इ.स. पूर्वी १६ ते १३ वें शतक या काळांत थीबीज येथें विशेषतः (लुक्झॉर आणि कर्णक येथील भव्य) देवळांतून अत्युच्च अशी शिल्पाची प्रगति दिसून येते.  देवळांचे खांब कमल, पापीयरस किंवा ताडपत्र यांसारख्या आकाराचे असत.

बाबिलोनिया व असुरिया :-  बाबिलोनियांतील चौथरे असलेलें बेलचें देऊळ मोठमोठ्या पिरॅमिडांनांहि मागें टाकीत असलें पाहिजे.  पण आज त्यांचा थोडासाच अवशेष उरला आहे.  असुरियांत नेबूचाडनेझर (सुमारे इ.स. पू. ६००) याच्या राजवाड्याचे अवशेष आहेत.  या शिल्पाची परंपरा मीड (मेदा) आणि इराणी या लोकांनीं रंगीत व चकचकीत विटांच्या गालिच्यासारख्या नक्षीची भर घालून कायम ठेविली.  आपल्या वास्तुशिल्पांत ज्यू लोकांनीं ईजिप्‍त आणि मेसापोटोमिया येथील शिल्पांची मदत घेतली होती असें वाटतें.

ग्रीक वास्तुशिल्प :-  ग्रीकांच्या वास्तुशिल्पांत संगमरवरी दगडांचा बराच उपयोग केला जात असून, खांबाचे दोन मुख्य प्रकार विशेष प्रचारांत आले.  एक डोरिक - साधी घडण, आणि दुसरा आयोनिक - जास्त मेहनतीची घडण.  पुढें कॉरिथियन स्तंभ तसेंच कॅरियाटिड म्हणजे स्तंभाऐवजीं योजिलेली स्त्रीमूर्ति यांचा प्रचार सुरू झाला.  पेरिक्लीसच्या काळीं (इ.स.पू. ४९५ ते ४३९) अथेन्स शहरीं वास्तुशिल्प कळसास पोहोंचलें होतें असें म्हणण्यास हरकत नाहीं.  उदा. अॅक्रोपोलीस टेंकडीवरील देवळें, प्रसिद्ध ऑलिंपिक खेळांच्या जागेवरच्या इमारती होत.  ख्रि. पू. ४ थ्या शतकांत मॅसिडोनियाच्या वर्चस्वाबरोबर पौरस्त्य वळणाचा प्रादुर्भाव झाला.  देवळांबरोबरच राजवाडे व नाटकगृहें यांकडे लक्ष पुरविण्यांत आले.

रोमन वास्तुशिल्प :-  हें अंशतः ग्रीक शिल्पावर अवलंबून होतें.  प्रत्येक वस्तूमध्यें तिच्या उपयुक्ततेकडे अधिक लक्ष देणार्‍या लोकांनां ग्रीक शिल्प जेव्हां अवगत झालें तेव्हां रोमनांनीं उपयुक्ततेवर भर दिला.  रिपब्लिकच्या शेवटीं शेवटीं मात्र मूळचा साधेपणा जाऊन उधळेपणाचा डामडौल त्यांत दिसूं लागला.  ख्रि. पू. पहिल्या शतकांत मोठमोठीं नाटकगृहें व अर्धवर्तुलाकार रंगशाला बांधल्या गेल्या.  इतर विशेष प्रकार म्हणजे 'विजयाची कमान' (ट्राइंफल आर्च - अलीकडे पुष्कळ यूरोपीय शहरांतून अशीं बांधतात), व्यापारी दिवाणखाने (बॅसिलिका), रोमन स्नानगृहें (थर्मस), आणि विस्तृत अशीं रहाण्याची घरें.  प्राचीन ख्रिस्ती वास्तुशिल्पानें बॅसिलिकाचा चर्चच्या कामीं उपयोग केला.

बायझंटाइन वास्तुशिल्प  :-  जस्टिनिअन (इसवी सन १५२७-१५६५) आणि कॉन्स्टंटाईन यांच्या अमदानींत या शिल्पांचा उत्कर्ष झाला.  वर घुमट असलेली मध्यें चौक ठेवलेली इमारत ही या शिल्पाची लोकप्रिय पद्धत म्हणतां येईल.  खांबांच्या वरचा नक्षीदार व बांकदार भाग या कॉरिथियन धाटणीचा पुढला प्रकार होय.  वेस्टमिनस्टर येथील रोमन कॅथोलिक कॅथिड्रल बांधतांना (चालू शतकाच्या आरंभी) वायझंटाईन पद्धत अनुकारण्यांत आली.

मुसुलमानी वास्तुशिल्प  :-  यामध्यें मशिदींना घुमट, उंच व बारीक मनोरे आणि खांब आढळतात.  बाहेरून या मशिदी साध्या दाखविण्यांत येतात.  तरी अंतर्भाग फार मेहनतीनें व खर्चानें सजविण्याकडे नेहमीं मुसुलमानांचा कल दिसून येतो.  उदा. मक्केंतील काबा, येरुशलेम येथील उमरची मशीद, दमास्कस येथील खलीफ वालीदची मशीद आणि केरो येथील मशिदी.  यांचें वैशिष्टय म्हणजे नालाच्या आकाराच्या अणकुचीदार कमानी.  १३ व्या शतकांत यूरोपवर सुद्धा या इस्लामी वास्तुशिल्पाचा परिणाम झाला आणि स्पेनमधील मूर लोकांच्या इमारती, विशेषतः ग्रानाडा येथील आल्हामब्रा (विलासमहाल) हा परिणाम अत्युत्कृष्ट दर्शवितात.

ग्रीक आणि रोमन देवस्थानें हें ख्रिस्ती चर्चचे पाये बनले व पुढें याच चर्चांच्या मशिदी झाल्या हें लक्षांत ठेवण्याजोंगें आहे.

रोमान्स :-  ही संज्ञा ११ व्या व १२ व्या शतकांतील कलेला लावितात.  सुंदर दर्शनी भागांचीं देवळें या कालांत निर्माण झालीं.  संक्रमणकालांत कमानींच्या निरनिराळ्या तर्‍हा प्रचारांत आल्या आणि क्रुसेड मोहिमांनीं पौरस्त्य वळणांचा शिरकाव करून दिला.  इटलींत सुद्धां बायझंटाईन वळण दिसतें.  उदाहरणार्थ व्हेनीस येथील सेंटमार्कचा घुमट व कमान घ्या.  यांत पौरस्त्य वळण नाहीं असें कोण म्हणेल ?

गॉथिक वास्तुशिल्प :-  १२ व्या शतकांत उत्तरफ्रान्सांत याची उत्पत्ति होऊन इंग्लंड व जर्मनी या देशांत तें पसरलें.  याचीं वैशिष्टयें :-  अणकुचीदार कमानी, कमानींच्या कोपर्‍यांतून साधुसंतांच्या मूर्ती आणि प्रवेशद्वारावर गुलाबपुष्पाकृति खिडक्या, उदा. - कोलोन येथील देवळें.  पॅरिसचें ''नात्र दाम'' व र्‍हीम्स येथील कंथीड्रल हीं होत.  यूरोपांतील श्रीमंत व्यापारी शहरांनीं या धाटणीचे टाऊनहॉल, गिल्डहॉल बांधिले आहेत (ब्रूजेस, ब्रन्स्विक, डँझिग, लुबेक इ.) पुढील काळांतील गॉथिक वळण मिलान कॅथिड्रलमध्यें दिसून येतें.

रेनॅसन्स वास्तुशिल्प :-  १५ व्या शतकांत क्लासिकल (अभिजात) शिल्पाच्या पुनरुज्जीवनास हें नांव देतात.  या कालांत रोम व फ्लॉरेन्स येथें सुंदर राजवाडे व इमारती बांधण्यांत आल्या.  १६ व्या शतकांत जर्मन किल्ले बांधलें.  जेसुइट लोकांच्या धार्मिक उत्साहाप्रमाणें एक चमत्कारिक वळण पडून (१६००-१८००) अतिशयोक्तिप्रचुर असे परिणाम दिसून आले.  उदा. व्हर्सेलिस राजवाड्यांतील अतिशायित स्वरूपी नक्षीकाम.  फूल, पक्षी आणि शिंपले यांच्या नक्षीनें अंतर्भाग मढविण्याची १८ व्या शतकांतील फ्रेंच फॅशन ''रोकोको'' वळण म्हणून प्रसिद्ध आहे.

आधुनिक वास्तुशिल्प :-  १९ व्या शतकांत खेड्यांतील बंगले, पदार्थसंग्रहालयें आणि पूल यासारख्या सार्वजनिक उपयुक्ततेच्या इमारतींच्या बाबतींत इंग्लंडचा वर नंबर लागेल.  आणि चालू शतकांत पोस्ट ऑफिसें व रेल्वेचीं स्टेशनें शोभिवंत करण्याकडे बराचसा कल दिसून येतो.

मूर्तिशिल्प  :-  शिल्पकार ज्या पदार्थाची मूर्ति घडवितो तो पदार्थ स्थानिक खनिज संपत्तीप्रमाणें व हवामानाप्रमाणें निरनिराळ्या असूं शकतो.  कारण ज्या कलेचीं सर्व कामें शाश्वत रहावीं या दृष्टीनें केलेलीं असतात.  संगमरवरी दगड आणि ब्राँझ हे शिल्पकारांचे सर्वांत जास्त आवडीचे पदार्थ व त्यांच्या खालोखाल लांकूड आणि हस्तिदंत म्हणतां येईल.  ग्रीक आणि रोमन लोक संगमरवरी दगड वापरीत आणि दगडी पुतळ्यांनां मेण फांसून त्यांवर सोनें व रंग चढवीत.  हल्लीचें पुतळे पाहिले तर फटफटीत पांढरे असतात.  उत्तरप्रदेशांतून उघड्या जागेंत ठेवावयाच्या पुतळ्यांनां ब्राँझ अधिक पसंत करितात.  कारण हवेनें संगमरवरी दगड लवकर बिघडतो.  पण धातूवर थोड्याच दिवसांत चढणारा गंज, त्याचा दृष्टीस दिसणारा कठिणपणा कमी करून अधिक आल्हाददायक परिणाम घडवून आणितो.  बहुधा संगमरवरी दगड स्त्रीमूर्तीकरितां व ब्राँझ काटक पुरुषी आकृतीकरितां योजीत.  हल्लींच्या काळीं ब्राँझ ठोकून तयार करण्यापेक्षां ओतून तयार करण्याची जास्त उपयुक्त पद्धत निघाली आहे.  लोखंड आणि जस्त हीं जास्त महागाईच्या ब्राँझच्या ऐवजीं आज उपयोजिण्यांत येतात.  पदार्थसंग्रहालयांत सुप्रसिद्ध शिल्पकारांच्या कृतींचे नमुने ठेवण्यासाठीं प्लॅटरच्या मूर्ती करतात.

शिल्पाचे विषय मुख्यतः एकाकी किंवा सामुदायिक मानवाकृती आणि उच्च प्राणी होत.  पण निसर्ग हा विषय कधींच नसतो.  कारण तो चित्रकाराला काढतां येण्याइतका स्थिर नसतो.  मूर्तीचें ध्यान व मुद्रेवरील भावदिग्दर्शन शिल्पकाराचें कौशल्य दाखवितात.  मूर्ति, सबंध आकृति किंवा नुसता उठाव (रिलिफ) दिग्दर्शित करते.  ज्या शिल्पांत योग्य प्रमाणाच्या निम्म्यापेक्षां कमी भाग वर आलेला असतो त्यास 'बास्रिलीफ' किंवा बाह्यगोलशिल्प व ज्यांत निम्यापेक्षां जास्त आलेला असतो त्यास 'हॉटरिलीफ' म्हणतात.

ईजिप्शियन मूर्तिशिल्प :-  पुतळ्याखेरीज ज्यांत आकृतीचा कांहीं भाग पृष्ठभागांत गेलेला दिसतो पण ज्यांनां आकारक्षमता आलेली असते असे खोल गेलेले बासरिलीफ (कोइलानाग्लिफ) करण्यांत ईजिप्‍तमधील लोक फार पटाईत होते.  अशा तर्‍हेच्या यथार्थदर्शक रिलीफमध्यें प्रतिष्ठित मुद्रा धारण करणारे प्राचीन राजे त्या देशांतील कारागिरांनीं दाखविले आहेत.  या प्रकारचें प्राचीन शिल्पकाम शेतांतील व घरगुती देखावे दाखविण्यासाठींहि उपयोजिलें आहे.

बाबिलोनियन व असुरियन मूर्तिशिल्प :-  यांत राज्यकर्त्यांच्या आयुष्यांतील प्रसंग, तसेंच सिंह आणि बैल यांच्या विलक्षण मूर्ती व पंख असून डोकीं जनावरांची पण धडं माणसांचीं असे प्राणी दाखविणारे चित्रसमुदाय सांपडलेले आहेत.

ग्रीक मूर्तिशिल्प :-  या शिल्पांत प्राचीन ग्रीक लोक इतर सर्व राष्ट्रांपेक्षां जास्त पुढें होते.  शिल्पशास्त्राच्या इतिहासाच्या दृष्टीनें महत्त्वाचे असे ग्रीकमूर्तिशिल्पांत दोन मुद्दे आहेत.  ग्रीक कलेवर झालेला मूळ पौरस्त्य परिणाम हा एक व आजतागाईत आधुनिक यूरोपखंडावर या कलेला ठेवतां आलेलें वर्चस्व हा दुसरा.  ग्रीसपासून आजच्या जगानें आनुवंशिक पद्धतीनें मिळविलेलीं सौंदर्यशास्त्रध्येयें व प्राचीन जागा खणण्यांत आजचें सरकार खर्च करीत असलेला पैसा हीं ग्रीक शिल्पानें यूरोपला किती जबरदस्त मिठी मारली आहे याचें प्रत्यंतर आणून देण्यास पुरेशीं आहेत.

ग्रीक समाजांत समतेचें तत्व खेळत होतें.  व्यक्तीचा दर्जा कायतो सर्व जमातींतील एक सभासद एवढाच होता, त्यामुळें व्यक्तीचे देव्हारे माजण्याची शक्यता कमी असे.  या गोष्टीचा परिणाम कलेवर झालाच.  ग्रीकांच्या मूर्तिशिल्पांत मानवी व्यक्तींपेक्षा देव आणि वीरपुरुष यांनांच प्रतिमेय बनविण्यांत आलें आहे.  देव हा एक पूर्णावस्थेंस पोहोंचलेला मनुष्य म्हणून दाखविण्यांत येई.  म्हणून या एकांगी (प्रोफाईल) ग्रीक चित्राला बहुतेक मान्यता मिळत गेलेली आहे.  क्वचित एखाद्या प्रसंगीं लोकोपयोगी गुणांबद्दल बक्षीस म्हणून व्यक्तींचे पुतळे घडविले जात.

ख्रि.पू. ६ व्या व ७ व्या शतकांतील शिल्पांचे अवशेष अद्याप आहेत.  मायरॉननें तयार केलेला ''चक्र फेकणारा'' हा ब्राँझ पुतळा व पायांतील कांटा काढणारा मुलगा हे ख्रि. पू. ५ व्या शतकांतील आहेत.  जेव्हां ग्रीकांनीं इराणी लोकांवर विजय मिळविला तो या कलेचा दुसरा काळ म्हणता येईल.  या काळांतील फिडियस हा एक प्रसिद्ध शिल्पकार होता.  या काळांतील पार्थिनॉन शिल्पाचा बराच मोठा भाग १९ व्या शतकाच्या आरंभीं लॉर्ड एल्जीननें लंडनला आणला आहे मृत मनुष्याची प्रतिमा एका स्तंभावर (स्टेला) कोरून तो बसवून साधें थडगें बांधावयाची पद्धत यावेळीं प्रचलित होती.  ख्रि. पू. ४ थ्या शतकापासून अलेक्झांडर या मृत्यूपर्यंत या शिल्पकलेचा तिसरा काळ धरितात.  या काळीं तिचा शुद्धपणा व स्वातंत्र्य नाहीसें झाले.  ४ थ्या काळांत (अलेक्झांडरच्या मृत्यूपासून ग्रीस रोमन लोकांच्या ताब्यांत जाईपर्यंत) कला ही राजदरबारची बटीक बनून नटवेपणा जास्त करूं लागली.  यावेळच्या सुप्रसिद्ध ग्रीक पुतळ्यांतील कांहीं पुढें दिलेले आहेत :-  रोम येथील व्हॅटिकनमधील लाओकून गट, लाओकूनवर अपोलो देवाचा कोप होऊन देवानें पाठविलेले दोन सर्प लाओकून व त्याचे दोन मुलगे यांनां जबर मिठी मारून बसले आहेत.  या मूर्तिसंघांत दुःख व निराशा उत्तम प्रकारें प्रतिबिंबित झाली आहे.  मिलोची व्हिनस ही एक दुसरी प्रसिद्ध मूर्ति आहे.  १८२० मध्यें एका शेतकर्‍यानें मिलोज बेटांत हा पुतळा खणून काढल्यावरून तिला हें नांव मिळालें आहे.

रोमन मूर्तिशिल्प -  ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकांत हें भरभराटीस येऊन जास्त वैय्यक्तिक बनलें.  यांत बादशहांच्या त्यांनां पुष्कळ वेळां देवताविशेषणें दिलेल्या मूर्ती आहेत.  ऐतिहासिक प्रसंगहि यांत कोरले आहेत.  यावेळीं पूर्वजांचे पुतळे घरांत बाळगण्याची चाल असे.  एका चित्रांत अनेक मूर्ती गर्दी करून राहिलेल्याहि दिसतात.  प्रेताच्या दगडी पेटीवर मृत्यु, संयोग व वियोग यांचीं कथानकें काढून दाखविलेलीं असतात.

कामेओ -  कामेओ म्हणजे रंगीत पृष्ठावर उठावदार लघुचित्रें.  हीं व हस्तिदंतावर इतर खोदकाम करण्यांत रोमन लोकांचा हातखंडा असे.  दोन प्रसिद्ध कामिओ आज उपलब्ध आहेत.  एकांत (९/८ इंच) रोमाशेजारी आपण ज्युपिटर म्हणून आगस्टस सिंहासनाधिष्ठि आहे आणि दुसरा कामेओ (१०/१२ इंच) जर्मानिकसचा विजय दर्शवितो.

मध्ययुगांतील मूर्तिशिल्प :-  ख्रिस्ती मूर्तीशिल्पाच्या प्रथमावस्थेंत (इसवी सनाची पहिलीं कांहीं शतकें) शवपेटिकांवर कांहीं आकृती काढलेल्या व बायबलमधील कांहीं प्रसंग उठविलेले दिसतात.  रोमन लोकांचे लहान हस्तिदंती फलक पवित्र लेखनाकरितां पुस्तकाचें मलपृष्ठ म्हणून ख्रिस्ती अमदानींत उपयोग केले जात.  त्यापुढें ख्रिस्ताच्या आयुष्यांतील प्रसंग दिग्दर्शित करूं लागले.  बायझन्टाईन कारागीर सुद्धा हस्तिदंतावर खोदकाम करण्यांत फार कुशल असत.  मध्ययुगाच्या अंतिम काळांत उत्तर युरोपमध्यें चर्चच्या सेवेसच केवळ मूर्तिशिल्प वाहिलेलें होतें असें म्हणतां येईल.  फ्रान्समधील क्रुनिच्या मठाधिकार्‍यांच्या वर्तनांत दिसून येणारी ११ व्या शतकांतील सन्यस्त वृत्ति किंवा सोंवळेपणा हा प्राचीन पुराणांतील चित्रांनां दुराचारी व अपवित्र म्हणून नांवें ठेऊं लागला.  सद्‍गुण आणि दुर्गुण, देवळें, प्रेषिते व्यक्ती इत्यादिकांच्या प्रतिमा करण्याचा कल त्या वेळीं दिसून येत होता.  बाप्तिस्याची पात्रें आणि देवळांतील कोनाडे, मूर्तीनीं शोभिवंत केलेले असत. व समाधीवरहि उठावदार ब्राँझचे पत्रे बसविण्यांत येत.  १३ व्या शतकांत जर्मनी आणि बर्गंडी हे देश या कलेचीं मोठीं केंद्रें म्हणून प्रसिद्ध असत.  इंग्लंडमधील समाधीवरचीं पितळी खोदकामें, मध्यें त्याचप्रमाणें पितळी स्मारकें फार अप्रतिम आहेत.  उदाहरणार्थ वेस्टमिन्स्टर अॅबेमधील तिसरा हेन्री आणि राणी एलिनॉर यांचीं स्मारकें पहा.

रेनॅसन्स उर्फ उद्धारकालीन मूर्तिशिल्प :-  (१) इटाली :-  यावेळीं संसारांतील वास्तविक दृश्ये व वैयक्तिक प्रतिमा यांकडे कल असे.  लॉरेन्झ धि बर्टी यानें तेवीस वर्षे खपून केलेलीं लॉरेन्झमधील बाप्तिस्माशालेच्या पूर्व दरवाजावरील बायबलमधील दृश्यें मिचेल आन्जलोच्या मतें नंदनवनाच्या दरवाजावर शोभतील अशींच आहेत.  टस्कनींतील देवळें हेराकोट्टा मूर्तिंनी मंडित आहेत.  कुमारी मेरी येशूच्या शवावर शोकाश्रू ढाळीत आहे हा प्रसंग फार लोकप्रिय असे.  मिचेल आंजेलोनें तयार केलेला मोझेसचा भव्य पुतळा विशेष प्रसिद्ध आहे.  या वेळचा बेन व्हेन्युटो सेलिनी (१५०० ते ७२) सोनारकामांत अत्यंत निष्णात असे. (२) यूरोपांतील इतर देश :- लांकडावरील खोदकामांत जर्मनीचा पहिला नंबर असे.  मऊ व लवचिक असें लिंबाचें लाकूड या कामीं उपयोगी पडे.  वेदी, त्यावरील पडदे, शहराच्या चौकांतील कारंजें अशीं या लांकडाचीं कामें होत,  न्यूर्नबर्ग हें या कलेचें प्रसिद्ध केंद्र होतें.

आधुनिक यूरोपीय मूर्तिशिल्प -  सतराव्या व अठराव्या शतकांत देखील आकृती व वस्त्रें भूषणें या बाबी वास्तविक आयुष्याला अनुरूप अशाच करण्याचा उद्देश दिसून येतो.  याचीं उत्तम उदाहरणें म्हणजे पॅरिसमधील रिचेल्यूची समाधी (आडवी पडलेली मूर्ति व शोक करणार्‍या स्त्रीमूर्ती), बर्लिनमधील घोड्यावर बसलेला ग्रेट एलेक्टरचा पुतळा.  १९ साव्या शतकांत इटालीचा मूर्तिकार क्यानोव्हान (१७५७-१८५२) यानें मूर्तिशिल्पाला शुद्ध वळण लाविलें.  त्यानें केलेल्या पुतळ्यांपैकी जॉर्जवाशिंग्टनचा पुतळा होय (हा पुतळा वाशिंग्टन येथें आगीनें खराब झाला).  जॉन फ्लॅक्झमन (१७५५-१८२६) याची नेल्सनची समाधी, पिट वगैरेंचे पुतळे हीं कामें आहेत.  थोरवाल्डसेन (१७७०-१८४४) हा डेनमार्कचा मूर्तिकार होता.  यानें पुतळ्यांतून व लहान लहान उठावदार चित्रांतून ग्रीक पौराणिक कथा पुढें मांडल्या आहेत.  यावेळीं सुप्रसिद्ध कारागिरांसाठीं फ्रान्स व जर्मनी हे देशहि नांवाजलेले होते.  जर्मनीचा-शॅडो (१७६४-१८६०) व राऊच (१७७७-१८५७) यांचीं कामें बर्लिनजवळच्या मशिदींतील राणी ल्यूइसे हिचें संगमरवरी दगडी थडगें, बर्लिनमधील, भोंवतांली सरदार जमा झाले आहेत असा फ्रेडरिक दि ग्रेटचा मोठा पुतळा; आणि बेगस याचे (जन्म १८३१) - बर्लिन येथील मोठ्या मेहेनतीने केलेले पुतळे हे शिल्पकार व शिल्पकामें नांवाजण्यासारखीं होऊन गेलीं.  १९ साव्या शतकांच्या अखेरीस पहिल्या वुइल्यम बादशहाचें स्मारक म्हणून अनेक पुतळे उभारले गेले.  फ्रान्समध्यें रॉडिन हा शिल्पकार व बार्थोलोमो (जन्म १८४८). चें पॅरिसजवळील पेरे लाज स्मशानभूमींतील मृत्यूचे, सामर्थ्य दर्शविणारें स्मारक प्रसिद्ध आहे.  ग्रेटब्रिटनमध्यें जर्मन स्मारकाप्रमाणें अति मोठ्या प्रमाणावर असलेलीं स्मारकें फार नाहींत.  नेल्सन कॉलम (लंडन) हा पॅरिस येथील स्तंभाप्रमाणें एक मोठा कॉरिन्थियन् स्तंभ आहे.  १९ व्या शतकांतील लंडनच्या पुतळ्यांत नांवाजण्यासारखे कांहीं नाहीं.  पण पुढील शतकांत थोडा सुधारणा झालेली दिसते (उदाहरणार्थ 'पिटरपॅन, आर्थर सुलिव्हानचें स्मारक इत्यादि लहान लहान पुतळे).  १९१८ पासून युद्धस्मारकांची जरूरी भासल्यामुळें ब्रिटिश मूर्तिशिल्पाला मोठें उत्तेजन मिळाल्यासारखें दिसत आहे.  इंग्लंडमध्यें आश्रयार्थ झालेल्या बेलजियन् लोकांनीं नजर केलेला स्मारकसमुदाय फार कौशल्ययुक्त आहे.  दुसरें असेंच ह्यदयंगम युद्धस्मारक म्हणजे रिकाम्या खोगिराचें होय (१९२४).  हर्बट हेसेलटाईन आणि सर एडवर्ड ल्युटिन्स यांनीं कॅव्हिलरि (घोडदळ) क्लबाकरितां तयार केलेला हा अनारोहित अश्व आहे.

चित्रकला साधनें, पद्धती व संबद्धकला -  जरी चित्रकला फक्त दोन प्रमाणांनीं नियमित आहे तरी शिल्पकलेपेक्षां तींत विषयांची बरीच विविधता आहे.  रेषाविषयक यथार्थदर्शन चित्रलेखनाचे नियम पाळले असतां मागच्या अंतराची उणीव भरून येते.  प्रकाश आणि छाया यांच्या परिणामांवरून शरीराकृति दिसते व शेवटीं रंग दिल्यानें चित्राला पूर्णता येते.  तांबडा, पिवळा आणि निळा या मूळ रंगांखेरीज काळा (प्रकाशाभाव) व पांढरा (प्रकाशाची पूर्ण चकाकी) या गोष्टी प्राचीन लोक जमेत धरीत.

चित्रंकलेंत (१) आकृतिलेखन, (२) एक पृष्ठावरील किंवा साधी चित्रकला आणि (३) म्यूरल किंवा भिंतीवरची चित्रकला यांचा समावेश होतो.

साधनें (१) आकृतिलेखन :-  पेन्सिल आणि कोळसा ही रूपरेषांकरितां योजितात.  शेवटचें चित्र काढण्यापूर्वी मोठ्या कामांत अनेकदां रूपरेषा काढिल्या जातात.  रंगीत खडूंनीं कोरड्या रंगाचीं चित्रें काढून त्यांवर पुढें गोंदाचें पाणी देतात.  याला पेस्टल 'ड्राइंग' म्हणतात.  वॉटरकलर (पाणरंग) आकृतिलेखन :-  यांत प्रथम मध किंवा डिंक यांत रंग तयार करून नंतर त्यांत पाणी ओततात.  मध्ययुगांत हस्तलिखितग्रंथांमध्यें अशा तर्‍हेचीं बरीच लहानलहान रंगीत चित्रें आहेत.

(२)  साधी चित्रकला :-  सोळाव्या शतकापासून मध्ययुगांत योजिल्या जाणार्‍या लांकडी फलकांऐवजीं (कॅन्व्हस) कापड आलें.  कॅन्व्हस हें जास्त टिकाऊ व मोठ्या प्रमाणावर होणार्‍या कामाला उपयोगी असतें.  प्रथम वॉर्निश रंग लावण्यांत येतात.  त्यानंतर खास रंग वर देतात.  पहिले रंग व मागाहूनचे रंग एकमेकांत मिसळून चांगले दिसतात व शेवटीं हे रंग वाळल्यानंतर बारचें वॉर्निश देतात.  त्यामुळें मूळ चित्र उठावदार दिसतें व त्याचें संरक्षणहि होतें.  इटालियन चित्रकार टेंपेरा (राळेसारख्या पदार्थाशीं मिसळलेले) रंग उपयोगांत आणीत.  सोनेरी व निळ्या रंगाचा पृष्ठभाग त्यांनां फार आवडे.  यथार्थदर्शक चित्रांचीं जेव्हां आवड उत्पन्न झाली तेव्हां वरील पृष्ठभागाऐवजी दृष्टिपातांतल्या प्रदेशांसारखे रंग देण्यांत येऊं लागले.  १५ व्या शतकांत नेदर्लंडमध्यें जे तेलाचे रंग करण्यांत येत त्यांच्यांत सुधारणा झाल्यानंतर त्यांचा सर्वत्र उपयोग होऊं लागला.

(३) म्यूरल चित्रकला :-  प्राचीनकाळीं निरनिराळ्या रंगांचे दगड, कांचा वगैरे एकत्र जोडून (मोसाइक तर्‍हा) जमीन सुशोभित करीत (पाँपि आणि हरक्युलॅनीयन यांचें अवशेष पहा).  म्यूरल चित्रकलेचे दोन प्रकार असत.  एक अलसेक्को (कोरड्या जागेवर) आणि दुसरा अल्फेस्को (ओल्या जागेवर).  इटलींत १४ व्या शतकापासून दुसरा प्रकार जास्त रूढ झाला; तथापि त्यांत एक अडचण अशी होती कीं, हें काम थोडें थोडें करावें लागे.  यावर उपाय म्हणून १९ साव्या शतकाच्या मध्यांत 'स्टिरिओक्रोमची' पद्धत निघाली.  हींत कोरड्या जागेवर रंग द्यावयाचे पण नंतर विरघळणारी विवर्ण कांच त्यांच्यांत मुरवून त्यांचें सरंक्षण करावयाचे असा प्रकार असतो.  एनॅमल (कांचमिना) चित्रकला :-  बायझानटाईन कलेंत सोन्याच्या पातळ पट्टया सभोंवताली बसवून त्यांमधील फटी रंगीत एनॅमलनें भरून काढीत.  नंतर उष्णता लावून तें एनॅमल वितळवीत.  पाश्चात्य सोनार तांब्याची ताटें सोन्यानें मढवून त्यांच्या खबदडीतून एनॅमल भरीत.  चिनीमातीच्या भांड्यावरील चित्रकला :-  अठराव्या शतकांत ही कला चीन जपानमधून यूरोपांत गेली.  हीं भांडीं वरचेवर तापवून त्यांवर चकचकीत रंग चढवीत.  कांच-चित्रकला :-  मध्ययुगांत अशा प्रकारची 'मोसाइक' तर्‍हा होती.  पण पंधराव्या सोळाव्या शतकांत फ्रान्स आणि स्वित्झर्लंड आणि १९ व्या शतकांत जर्मनीमध्यें या कलेची प्रगति झाली.  आजकाल सारवलेल्या कांचेची पद्धत (रंगी व बेरंगी कांचेच्या थरांचें मिश्रण करण्याची) सर्वत्र आहे.  सर्व यूरोपभर अद्यापि शाळा, कॉलेजें, देवळें इत्यादि इमारतींच्या खिडक्या चित्रित कांचेच्या असतात.

चित्रकलेशी संबद्ध अशा कला -  (१) या कला कोरीवकाम, (२) लांकडाचें साचे व (३) शिलालेखन या होत.

(१) कोरीवकाम :-  १४५० च्या सुमारास जर्मनीमध्ये तांब्याच्या पत्र्यावर खोदकाम करण्याची कला निघाली.  ही पद्धत १६०० च्या सुमारास हेन्डरिक गॉल्डझिअस नांवाच्या एका जर्मन कारागिरानें पूर्णत्वास आणली.  पत्र्यावर रेघा पाडण्यास खोदण्याचें किंवा खुणा पाडण्याचें हत्यार योजितात.  नंतर सल्फ्युरिक किंवा नैट्रिक अॅसिडनें या खुणा स्पष्ट करितात.  या खोदकामाचे बरेच प्रकार आहेत.  एका प्रकारांत (स्टिपल) रेषांऐवजी टिंबे कोरतात.  दुसर्‍यांत पत्र्याचा कांहीं भाग खडबडीत करून एका विशिष्ट हत्यारानें उच्चभाग गुळगुळीत करितात.  व याप्रमाणें प्रकाश व छाया साधतात.

(२)  लांकडी ठसे :-  ही एक जर्मन कला आहे.  १४ व्या शतकापासून साधुसंतांचीं चित्रें व खेळण्याचे पत्ते याच्या करितां ही कला उपयोगी पडे.  खोदकाम पुढें आल्यापासून ही कला उपयोगी पडे.  खोदकाम पुढें आल्यापासून ही पाठीमागें पडली; पण नुकताच हिचा पुनरुदय होऊं लागला आहे.

(३)  शिलालेखन :-  अलॉइस सेनेफेल्डर (मृत्यु इ.स. १८३४) यानें म्यूनिच येथें ही कला शोधून काढिली.  प्रकाश आणि छाया यांचें सम्मेलन यांत दिसत असलें तरी रेखाकलेंतील उठाव यांत नाहीं म्हटल्यास चालेल.

प्राचीन यूरोपीयन चित्रकला :-  निरनिराळ्या विषयांवरचीं मोठीं चित्रें आणि चित्रित भांडीं यांमध्यें प्राचीन ग्रीक अति प्रवीण असत.  एट्रुस्कन लोकांनीं काढलेल्या म्युरल (भित्ति) चित्रांतून रोजच्या रहाणींतील गोष्टी असतात.  रोमनांचीं ओल्या गिलाव्यावर काढलेलीं चित्रें (फ्रेस्को) जुन्या ग्रीक चित्राबरहुकुम दिसतात.  नेपल्सच्या पदार्थसंग्रहालयांत याचीं अनेक उदाहरणें सांपडतील.  तिसर्‍या आणि चवथ्या शतकांतील स्मशानभूमींत दिसणार्‍या प्राचीन ख्रिस्ती म्यूरल चित्रकलेंत 'गुराख्याच्या वेशांतील ख्रिस्त' यांसारखीं चित्रें आहेत; पण जेव्हां ख्रिस्ती धर्माला राजमान्यता मिळाली तेव्हां चित्रकलेलाहि अधिक वाव मिळाला.  पांचव्या शतकांत शुभवर्तमानोपदेशकांनां देवदूत, गरुड, बैल किंवा सिंह या स्वरूपांत बसविलेलें आढळतें.  पुढील शतकांत इटली मार्गानें बायंझनशिअमहून पौरस्त्य वळण या कलेंत शिरलें.  ख्रिस्ती देवळांतील पूर्वीचा सणावाराचा पांढरा झगा जाऊन त्यावेएजीं बायझनटाईन पद्धतीचा रंगीत व भपकेदार पेहराव आला.

लघुप्रमाण चित्रकला :-  नवव्या व दहाव्या शतकांतल्या बायझन्टाईन कलेंत, त्याचप्रमाणें आयरिश.  अॅग्लोसॅक्सन आणि फ्रँकिश कलेंत ही पोटकला विशेष सुधारलेली होत  यूरोपांतील मठांतून पवित्र ग्रंथ सचित्र लिहिण्याची पद्धत होती.  बाराव्या शतकापासून पुढें काव्य, तत्वज्ञान या विषयांवरील क्लासिकल (अभिजात) हस्तलिखित ग्रंथहि तसेच होऊं लागले.  पॅरिसचे चित्रकार या कलेंत निष्णात होते.  तरी कल्पकतां व तजेला जर्मन कारागिरांत जास्त असे.  चित्रित कांचेच्या खिडक्यांचीं कामें करण्यांत फ्रान्स देशहि वाकबगार असे.

उत्तरमध्ययुगीन चित्रकला :-  इसवीसन तेराव्या शतकापासून इटलीमध्यें चित्रकला फारच जोमावली.  गायोटो (१२७६-१३३६) चित्रकारानें बायझनटाइन परंपरा मोडण्याचें श्रेय मिळविलें.  पंधराव्या शतकांत इटालियन चित्रकला पाहिल्यास फ्रेस्को चित्रकलेची अधिकाधिक मागणी उत्तर प्रदेशांतल्यापेक्षां इटलींत विशेष असल्यानें या देशामध्यें चित्रकलेची बरीच प्रगति झाली.  तसेंच केवळ हातानें चित्रें काढण्याची पद्धत पडली, यथार्थदर्शनचित्रलेखनाचा काळजीपूर्वक अभ्यास सुरू झाला, आणि सृष्टीची प्रतिमा यथार्थ व उत्तम काढतां येऊं लागली.  मोठ्या लोकांच्या आश्रयामुळें फ्लॉरेन्स शहरांत या कलेला अनुकूल वातावरण मिळालें.  बायबलमधील विषय चितारी सुंदर सृष्टिप्रदेशांत चितारूं लागले.  यांपैकी कांहीं चितारी फ्रा अॅंजेलिको आणि फ्रा फिलीप्पो लिप्पी (दोघेहि भिक्षू), बोटीसेली, अॅंड्रिया मँटेग्ना आणि गिओव्हनी बेलेनी (हा शेवटला चितारी तेलाच्या रंगाचें नवीन काम हातीं घेणारा पहिलाच होय) हे होत.  

सोळाव्या शतकांतील इटालियन चित्रकला - पहिल्या प्रतीचे अनेक चित्रकार इटलीला लाभले होते.  उ. लिओनार्डो डा व्हिन्सी (१४५२-१५१९) हा बहुकलाकोविद असून याची मिलान येथील सेंट मेरिआ मठामधील 'दि लास्ट सपर' हें फ्रेस्को चित्र; शिवाय 'मोन्ना लिसा' हें प्रतिमाचित्र हीं अप्रतिम आहेत.  मिचल एन्जेलो यानें रोममधील सिक्स्टाईन चॅपेलची आंतील बाजू पौराणिक फ्रेस्को चित्रांनीं सुशोभित केली.  अॅड्रीया डेल सार्टो हा रंगाचा उत्तम मिलाफ करण्यांत प्रसिद्ध आहे.  राफेल सांती (१४८३-१५२०) याला पोपनें व्हॅटिकनच्या दिवाणखान्यांत फ्रेस्को रंगविण्याच्या कामावर नेमलें होतें.  ईश्वरज्ञान, काव्य, तत्वज्ञान, न्यायशास्त्र, हीं ध्वनित करणारीं चित्रें व या विषयावरील जगाच्या इतिहासांतील प्रसंग राफेलला काढावयाचे होते.  त्याचें 'सिक्स टाईन मॅडोना' (जीजस् आणि मेरी मेघसंचार करीत आहेत असा देखावा) हा फारच लोकप्रिय आहे.  कॅरिजिओ (१४९४-१५३४) यानें वैषयिक चैन आणि ब्रह्मानंद यांतील भावना दर्शविल्या आहेत.  स्पष्टास्पष्ट प्रकाशाचा यानें विशेषतः 'होलीनाईट' मध्यें उपयोग केला आहे.  व्हेनेशियन चितारी रंगामधील सौंदर्य व मार्दव उठविण्याच्या कामीं कुशल असत.  टिझिअन, गिओर्जिओने आणि पामा वेच्छिओ (१५ वें शतक), व टिंटोरेटो आणि पाओलो व्हेरोनेसे (१६ वें शतक) हे तत्कालीन सुप्रसिद्ध चितार्‍यांपैकीं होत.  

१५ व १६ व्या शतकांतील उत्तरेकडील चित्रकला :-  जर्मन आणि फ्लेमिश चितार्‍यांनीं बायबलमधील देखावे आपल्या नजरेंतील प्रदेशांत व पोषाखांत आणून ठेवले.  उत्तरदेशांतील स्वातंत्र्यविन्मुख रूढिप्रियतेमुळें इटालियनांनीं चित्रकलेंतील आकृतिलेखनांत जें प्राविण्य मिळविलें तें यांनां मिळवितां आले नाहीं.  औदीच्य चित्रकला जोरदार दिसते.  तरी यथार्थदर्शनांत वांकडी व बेडौल आहे.  उंची साटिन आणि किनखाब चित्रित करण्याकडे यांचा ओढा दिसून येतो.  डयूरर एकदां म्हणाला कीं, व्हेनिसमध्यें मी आपला धनी असतों.  पण स्वदेशी येऊनहि खुशामत्या बनतों.  तथापि औदीच्य कला दक्षिणेपेक्षां जास्त वैयक्तिक व लोकानुवर्ती असते.  ज्याप्रमाणें तेलाच्या रंगाच्या फ्लेमिश शोधामुळें चित्रकलेला उत्तेजन मिळालें त्याप्रमाणेंच नेदर्लंडमधील बर्गंडीअन राजसत्ता व उत्कर्ष यामुळें मिळालें.  आलब्रेट डयूरर (१४७१-१५२८) याच्या लांकडी ठशाच्या चित्रांत चांगली कल्पना व विनोद दिसून येतो.  मॅक्सिमिलिअन बादशहानें डयूररला चांगला आश्रय दिला.  मोठा व धाकटा हालबेअन यांनीं मॅडोनची चित्रें रंगविलीं.  यापैकीं धाकटा आठव्या हेन्रीच्या दरबारीं चित्रकार म्हणून राहिला होता.

आधुनिक यूरोपीय चित्रकला :-  सोळाव्या शतकांत केवळ इटली व नेदर्लंड्स यांतच नव्हे तर स्पेन, फ्रान्स, आणि इंग्लंड या देशांतहि चित्रकलेचा बराच उत्कर्ष झाला.  रेफर्मेशनचा द्विविध परिणाम झाला.  (१) जुन्या परंपरेपासून सुटून चित्रकलेचा ऐतिहासिक चित्रें, दृष्टिपथांतील देखावे, प्राणी व वनस्पतिसृष्टि यांसारख्या विषयांकडे लक्ष पोहोंचवितां आलें.  या सर्व चित्रांत यथार्थतेवर मुख्य भर दिसून येतो.  (२) लोकांच्या मनावरील आपलें जुनें वर्चस्व पुनः मिळविण्याच्या कामीं कलेचा उपयोग करण्यास कॅथोलिक संप्रदाय उत्सुक झाला.

सोळाव्या शतकाच्या शेवटीं इटालियन चित्रकलेचा र्‍हास होऊं लागला पण पुढील शतकांत बोलोना येथें तिचें गुईडो रेनी (१५७५-१६४२) आणि सॉक्टोररोसा यांच्या हांतून पुनरुज्जीवन झालें.  सतराव्या शतकांत स्पॅनिश चित्रकला ही स्वतंत्र कला बनली.  सेविले हें तिचें केंद्र होतें.  संन्यस्तवृत्ति आणि ज्वलत्भक्ति यांवर हिची उभारणी असून प्रकाश आणि छाया यांचा परिणाम उदासीनतादर्शक असाच होई.  व्हेलस क्वेज डी सिल्व्हा (१५९९-१६६०), याचीं हलक्या राहणीची दृश्यें,) म्युरिलो (१६१७-१६८२) याचीं हलक्या राहणीचीं दृश्य, व नंतर कुमारी मेरीसारखीं धार्मिक कल्पनेचीं चित्रें या कालांतील प्रमुख होत.

सतराव्या आणि आठराव्या शतकामध्यें नेदर्लंडस् मध्ये उत्तम नैसर्गिक चित्रें काढलीं जात.  ब्राबंट (फ्लेमिश) संप्रदायाचे प्रचारक म्हणजे पिटर पॉल रूबेन्स हा एक नैसर्गिक व धार्मिक अशी बरींचशीं चित्रें काढणारा चितारी आणि इंग्लंडच्या पहिल्या चार्लसच्या दरबारीं चित्रकार म्हणून राहिलेला त्याचा शिष्य व्हॉन डिक हे होत.  यावेळीं हॉलंड प्रॉटेस्टंट राष्ट्र बनल्यामुळें मॅडोना आणि साधुसंत हे चित्रकारविषय नाहींसे झाले; आणि कलेचा सृष्टिसौंदर्य व प्रतिमालेखन यांकडे ओढा वाढत गेला. फ्रान्स हॉल, रेंर्ब्रांन्ट रुइस, डेल कुइप इत्यादि या वर्गांतील चित्रकार होत.

जर्मनींत १८ व्या शतकाच्या अखेरीला ग्रीकसौंदर्यकल्पनेचें पुनरुज्जीवन झालें, १९ व्या शतकाच्या आरंभीं झालेल्या युद्धामुळें धार्मिक भावना बळावून 'क्लासिकल' चित्रसंप्रदायाविरुद्ध लोकांचा कल बनला.  'नाझारीन' नांवाचा एक चित्रकार संघ चौदाव्या शतकांतील चित्रकलेचा अभ्यास करण्याकरितां मुद्दाम रोमला गेला.  बव्हेरियाच्या पहिल्या लुडविक राजानें कलेला उत्तेजन दिलें व म्युनिच हें एक कलाकेंद्र होऊन राहिलें.  काव्यें, जर्मन पुराणकथा आणि फेरीदेवतांच्या गोष्टी हे चित्रकलेचे विषय बनले.  इतिहास आणि काव्यांतील वीणागीतें यांना प्राधान्य देणारे डयुसेलडोर्फ हें आणखी एक केंद्र बनलें.  आजकालच्या विषयांनां फाटा देणार्‍या या गोष्टींचा प्रतिकार म्हणून कीं काय यथार्थता पुढें सरली.  लेनबॅच, वर्नर आणि अडोल्फ मेन्झेल हे चित्रकार लढायांची चित्रें व तसबिरा काढूं लागले.  सूर्यप्रकाशामुळें सृष्टीला आलेलें सौंदर्य दाखविण्याचा मॅक्स लेबरमेन यानें प्रयत्‍न केला.  आधुनिक परमध्येयासक्तीचा उद्देश पूर्वीची परंपरा बाजूला सारून नवी सृष्टी उत्पन्न करण्याचा आहे.  हल्लींच्या आयुष्यांतील भावना दिग्दर्शित करावयाच्या व जुन्या पौराणिक कथा सुद्धां नवीन रूपांत मांडावयाच्या.  आर्नाल्ड बॉक्लिन (१८२७-९१), हॅन्स थोमा, उहदे वगैरे या संप्रदायांतील चित्रकार होत.

दृष्टीच्या टापूंतला प्रदेश रंगविण्यांत फ्रान्सचा हातखंडा आहे.  चौदाव्या लुईच्या अमदानींत चार्लस लीब्रन हा दरबारी चितारी होता.  ग्रयूझे (१७२५-१८०५) यानें नैतिक चित्रांशिवाय मुलींच्या सुंदर प्रतिमा काढल्या.  फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळीं 'क्लासिकल' पद्धत प्रचारांत होती.  रोमन प्रजासत्ताक राज्य यावेळीं फ्रान्सचें परमध्येय बनलें असल्याकारणानें प्रजासत्ताक कारभारांतील सद्गुण प्रशंसापूर्वक पुढें मांडण्याचें कलेचें काम असे.  यानंतर रोमँटिक प्रकाराकडे कलेचा कल वळला व इतिहासांतील करुणाजनक प्रसंग रंगविण्यांत येऊं लागले.  अर्नेस्ट मिसॉनियर (१८१५-१८९१) यानें लष्करी विषय घेतले व शेतकर्‍यांचीं चित्रें जीन फ्रँकॉइस मिलेट (१८१४-७५) काढूं लागला.  पण यामुळें वस्तुस्थितींतील अगदीं उघडे नागडे व निष्ठुर असे प्रसंगहि काढण्यांत येऊं लागले.  कोर्बेट (१०१९-७७) याचीं चित्रें अशा धर्तीचीं आहेत.  सृष्टिविषयक इंग्लिश चित्रकलेचा फ्रेंच लोकांवर परिणाम झाला.

रोसा बानव्ह्यूर (१८२२-९९) हा प्राण्यांची चित्रें काढूं लागला.  वस्तूंवर प्रकाश, वातावरण इत्यादिकांचे परिणाम उठावदार करण्याकडे आजची प्रवृत्ति दिसते.  या संप्रदायाचे चित्रकार मानेट मोनेट, लिपेज हे होत.  भ्रष्ट आयुष्याचे वाईट परिणाम दाखविणारीं होगार्थची नैतिक चित्रें १८ व्या शतकांत पुढें आल्यापासून इंग्लंडांतील आधुनिक चित्रकलेचा स्वतंत्र मनु सुरू झाला.  तसबिरीमध्यें यथार्थता हा गुण असल्यामुळें ब्रिटिश कला या बाबतींत बरीच सरसावली.  या वर्गांतील प्रसिद्ध चित्रकार जोशुआ रोनाल्ड (१७२३-९२) व त्याचें विशेषतः 'हेड्स ऑफ एन्जल्स (देवदूतांचीं शिरें) हें, थॉमस गेन्स बरो (१७२७-८८) यांचीं, 'दि ब्ल्यू बॉय' (नील बालक) आणि 'सरा सिडॉन्स' या नटीची तसबीर, त्याचप्रमाणें त्याचीं नैसर्गिक दृश्यांचीं चित्रें व थॉमस लॉरेन्स (१७६९-१८३०), तसेच अलीकडील शानॉन, हरकोमर इत्यादि कवी ध्यानांत ठेवण्यासारखें आहेत.  इतर विशिष्ट विषय म्हटले म्हणजे प्राणिविषयक चित्रें (एडविन लँड सीर १८०२-७३), रोजच्या राहणींतील देखावे आणि ऐतिहासिक प्रसंग (बेंजामिन वेस्ट १७३८-१८२० इत्यादि होत.  जमिनीवरील आणि समुद्रावरील देखाव्यांचीं चित्रें काढण्याला प्रथम यावेळी इंग्लंडात सुरुवात झाली.  विल्यम टर्नर (१७७५-१८५१) हा पाण्यावरील धुक्याचा देखावा सुंदर रीतीनें दाखवितो.  त्याची चित्रें काही थोडीशी अस्पष्ट पण एकंदरींत फारच परिणामकारक आहेत.  स्पष्ट रूपरेषेंपेक्षा नैसर्गिक देखाव्यांत प्रकाश आणि छाया यांचे परिणाम विशेष दाखविण्याकडे जॉन कॉन्स्टेबल (१७७६-१८३७) याचें लक्ष्य असें.

पूर्वीची परंपरा सर्व बाजूला सारून पंधराव्या शतकांतल्या प्रमाणें निसर्गसत्यतेकडे परत वळण्याकरितां १८४८ त रॉनोटी (१८२८-८२), होलमंड हंट (जन्म १८२७) आणि जॉन एव्हेरेट मिलाइस (१८२९-९६) यांनी राफेल पूर्वभ्रातृसंघ (प्री-राफेलाईट ब्रदरहुड) स्थापिला.  राफेल रोमला गेल्यावेळेपासून या निसर्गसत्यतेचा लोप झाला अशी त्यांची समजूत होती.  केवळ पृथकभावाची सौंदर्यमूर्ति त्यांनां पाहिजे होती असें नव्हें तर काव्यमय भावना व कल्पना सुंदर रीतीनें त्यांनां पुढें मांडावयाच्या होत्या.  हंटनें आपले विषय बायबल आणि कीटच्या कविता; यामधून, रॉनेटीनें डॉन्टेच्या ग्रंथांतून आणि मिलाईसनें बायबल आणि मध्ययुगीन 'शिव्हलरींतून' निवडले.  बर्न जोन्स (१८३३-९८) यानें हाच मार्ग अनुसरून सोनेरी केसांनीं मंडित अशा कायमच्या ठशाचा स्त्रीमुखवटा काढला.  अद्यापिहि सर फ्रेडरिक लेटन आणि त्याचा शिष्य पॉयटर आल्मा टाडेमा आणि अल्बंट मूर यासारखे चित्रकार प्राचीन क्लासिकल विषय पसंत करितात.  कांहीं श्रेष्ठ कल्पना (आशा, प्रेम आणि जीवित, प्रेम आणि मृत्यु या सारखी) दाखविणार्‍या रूपकात्मक प्रतिमा वॉट्स (१८१८-१९०४) नें काढल्या होत्या.

विसाव्या शतकांत व्हिस्लरनें नवीन पद्धति सुरू करण्याचा धडा घातला.  तो व मेलव्हिले, जॉन लॅव्हेरी, गुर्थी यासारखे ग्लासगोचे चितारी यांनीं यथार्थतेविरुद्ध रंगसंयोगांची मोहीम काढली.  वाईली आणि फ्रँक ब्रांगावन यांची नौकानयन व व्यापार यासंबंधीं देखाव्यांची चित्रें, लॉ थँग्यूचे नयनगोचर देखावे हीं लक्ष्यांत घेण्यासारखीं कामें आहेत.  ब्रिटन रिव्हिएरी आणि क्लॉसेन ही सर्व विसाव्या शतकाची गमकें आहेत.  कांहीं चित्रें तर थोड्याशा रेघा किंवा रंगाचे लपेटे यांनींच भरलेलीं असतात.  लोकांच्या रोजच्या रहाणींत कलेचा प्रवेश करून देण्यचा इंग्लंडचा प्रयत्‍न आहे.  मॉरीस, ग्रेफेन हॅगेन व इतर चित्रकार हे रेल्वे कंपन्यांकरितां मोठ्या जाहिराती काढून देण्यांत गर्क आहेत.  या गोष्टीमुळें हळूहळू शहरांतील रस्ते सुंदर दिसूं लागतील.  जपानी चित्रकलेसंबंधींहि आवड उत्पन्न होऊं लागली आहे व आजचें साम्राज्यप्रदर्शन (१९२४) हिंदी कलेविषयीं आवड उत्पन्न केल्याशिवाय रहाणार नाहीं असा भरंवसा वाटतो.

संगीतकला -  वारा किंवा तारा या साधनांनीं काढलेल्या ध्वनीमुळें जें सौंदर्यविष्करण होतें त्यास संगीतकला असें म्हणावें.  ही कला कांहीं अंशीं स्वतंत्र कला म्हणून व कांहीं अंशीं नाट्य आणि काव्य या भगिनीला संबद्ध अशी उदयास आली आहे.  पाश्चात्य देशांत आर्चेस्ट्रा किंवा केरस यांतील एकतानेमुळें उत्पन्न होणारी सौंदर्यभावना एकामागून एक निघणार्‍या सुखदाक अशा शुद्ध आलापाबरोबरच वृद्धिंगत झाली.

प्राचीन संगीत :-  हिब्रू लोकांत तुतारी, सतार व झिथर हीं वाद्यें असत.  धार्मिक उपासनेचें पावित्र्य प्रवृद्ध करण्याचें संगीताचें काम आहे असें ते समजत.  प्राचीन ग्रीकांचा उद्देश आत्म्याची एकतानता करण्याकडे व उच्च व सुंदर गोष्टीकडे माणसांचा ओढा लावण्याकडे असे.  काव्य आणि संगीत या कलांना बहिणीबहिणी समजतात.  एकतानतेपेक्षां आलाप व लय जास्त महत्वाचे मानीत; आणि अर्वाचीन स्वराष्ट्रकप्रमाणपद्धति ग्रीक पद्धतीवरच बसविली आहे.  नाट्यांतील भावनाप्रधान भागाच्या जोडीला पावा आणि सिथारा हीं वाद्यें योजीत.  जेव्हां पात्रांनां नाट्यभाग शोकपूर्ण वठवावयाचा असे तेव्हां कोरस योजीत.  ख्रि. पू. पांचव्या शतकांत अलेक्झांड्रिया हें एक संगीत कलेचें केंद्र बनलें, त्यानंतर रोम; पण रोममध्यें वैषयिक सुखाकरितांच संगीताचें संवर्धन करण्यांत आलें.  प्रत्यक्ष गुलाम किंवा स्वतंत्र झालेले गुलाम, हेंच फक्त हिची आराधना करीत.

मध्ययुगीन संगीत :-  मिलानच्या बिशप अॅम्ब्रोशिअसची गीतें (इ.स. ५ वें शतक) व सहाव्या शतकांतील ग्रेगरी गीतें या पासूनच पुढें चर्चमधील स्तोत्रें निघालीं.  आजच्या यूरोपियन नोटेशनचें मूळ अकराव्या शतकांतल्या इटलींत सांपडतें.  १२०० च्या सुमारास जर्मनींत त्याला पूर्णता लाभली.  प्रॉव्हेन्स आणि जर्मनी येथील ट्रुबाडूर हे फिरते कवी आणि पुढील काळांतील मीस्टर (शहरव्यापारीसंघाचे) गायक यांनीं संगीताला काव्यापेक्षा कमी प्रतीचा दर्जा आणून दिला.  पण लौकिक गीतांमुळें आलापांना जास्त स्वतंत्र स्वरूप आलें.

आधुनिक संगीत :-  प्रॉटेस्टँटिझम म्हणून पाडण्याकरितां रोमन कॅथोलिक चर्चनें मोठ्या आनंदानें संगीताची मदत घेतली.  इटलीचें अतिशय सुंदर असें धार्मिक संगीत निर्माण केलें.  उलट सतराव्या व अठराव्या शतकांत प्रॉटेस्टँटिझमनें स्तोत्रें आणि संगीत संतकथानकें पुढें आणलीं.  फ्लॉरेन्समध्यें द्वंद्वगीतरूपासहित संगीत नाट्य निर्माण झालें.  जर्मन संगीतांत रोमँटिक भावना कायम ठेवून पौराणिक 'क्लासिकल' (अभिजात) कथांऐवजीं लौकिक कथानकें घातल्यामुळें त्याचा फ्रान्स आणि इटली या देशांवरहि परिणाम झाला.  ऑपेरा, मोझार्टचे स्वरमेळ आणि बिथोव्हेनचे ग्रंथ यानंतर श्चूबर्ट, श्चूमन आणि मेंडेलसोहन यांचीं पदें, वेबरचें ऑपेरा आणि चॉपिनची पद्यरचना पुढें सरसावली.  गायनकलेंतील परिभाषा इटालियनांनीं पूर्ण केली.  सोळाव्या शतकांत जर्मनीनें आजचें व्हायोलीन शोधून काढलें; आणि अठराव्या शतकांत इटली आणि जर्मनी यांनीं स्वतंत्रपणें पियानो वाद्य तयार केलें.

व्हेनिसमधील सेंट मार्कच्या वादकांनीं बाजा रूढ केला.  नवीन रोमँटिक संगीताचा उद्देश केवळ विकार प्रदर्शित करण्याचाच नसून कृति, शब्द व विचार हींहि दिग्दर्शित करण्याचा आहे.  एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांतील रिचर्ड वाग्नरचे ऑपेरा जर्मन पुराणकथासंबंधीं असून ऑपेरा मध्यें शब्द आणि संगीत यांची अतिनिकट एकतानता त्यांनीं करून दिली आहे.  लिस्ट आणि ब्राहॅम्स हे आपल्या असंबद्ध काव्यामुळें प्रसिद्ध आहेत.  गौनाड आणि बिझेट यांचे इटालियन ऑपेरा व फ्रेंच ऑपेरा यूरोपखंडभर लोकप्रिय असून अत्युत्कृष्ट पोषाख, देखावे यांनी समजून ते रंगभूमीवर करण्यांत येतात.  स्लाव संगीत मोठें गमतीचें असतें.  आधुनिक इंग्लिश संगीत, बाल्फे, एल्गर आणि अर्थर सुलिव्हॉन यांचें होय.  संगीत नाटकाचें अलीकडचें स्वरूप म्हणजे संगीत प्रहसन होय; अशा नाटकांत (कथानक प्लॉट) महत्त्वाचा नसून गाणी आणि कोरस या योगानें तें उठावदार करितात.  इंग्लंडमधील लौकिक गीतांचा विषय बहुधा समुद्रांसंबंधीं असतो.  स्कॉटलंड आणि आयर्लंडच्या लौकिक गीतांत त्यांचें वैशिष्टय कायम असतें.  अशा प्रकारचीं आयरिश गीतें सुस्वर व बहुतेक उदासीनतेचीं असतात.

नाट्यकला :-  प्राचीन ग्रीक आणि रोमन लोकांनीं उपयोजिलेली ही कला अर्वाचीन यूरोपखंडांत ईस्टर व नाताळ यासारख्या सणांतून दाखविल्या जाणार्‍या धार्मिक किंवा अद्‍भुत नाटकांच्या उत्पतीपासून सुरू झाली.  या कलेंत इटली, फ्रान्स आणि जर्मनी यांनीं प्रावीण्य मिळविलें आहे व एकोणिसाव्या, विसाव्या शतकांत ज्यू लोकांनीं आपल्यातील प्रसिद्ध नट आणि नटी यांनां या कलेला वाहून तींत भर घातली आहे.  शेक्सपियरच्या नाटकानें नाट्यकलेवर अतिशय वर्चस्व बसविलें आहे असें दिसतें; कारण बहुतेक प्रसिद्ध नाट्यकुशलांनीं आपल्या आयुष्यांत केव्हांतरी शेक्सपियरच्या पात्रांनां आपल्या स्वतंत्र पद्धतीनें रंगविलें आहे.  यूरोपखंडांतील फ्रान्स खेरीजकरून बहुतेक सर्व देशांत इंग्लंडांतल्यापेक्षांहि जास्त उत्साहानें शेक्सपीयरचीं नाटकें करितात.  फ्रान्स मात्र मोलिअर व रासाईन या सारख्यांचीं आनंद-शोक पर्यवसायीं नाटकें पसंत करतो.  आजकाल मूळ नाटक (मिरॅकल-अद्‍भुत धार्मिक नाट्य) याकडे लोकांची प्रवृत्ति दिसते.  त्याहूनहि अलीकडची प्रवृत्ति म्हणजे कायनोमॅटोग्राफची होय.  पहिल्या प्रतीचे नट देखील या पडद्यावरील नाटकांतून कामें करतात.

भारतीय कलेवर अभ्यास आज बराच झाला आहे.  आणि त्यावरील बरेंच विवेचन ज्ञानकोशांत द्यावयाचें आहे आणि यासाठीं विषयप्रशस्तिपरच कांहीं वाक्यें लिहितों.  भारतीय नाट्य, भारतीय नृत्य, भारतीय मूर्तिशिल्प, भारतीय शिलाशिल्प उर्फ खोदकाम, भारतीय धातुशिल्प, भारतीय गृहमंडनशास्त्र, भारतीय चित्रकला, भारतीय संगीत, भारतीय वास्तुशिल्प, हीं सर्व गृहमंडनशिल्प, चित्रकला, धातुशिल्प, नाट्यनृत्य, मूर्तिशिल्प, शिलाशिल्प, इत्यादि सदरांत येतील.

भारतीय कलेमध्यें अनेक शाखा आहेत.  निरनिराळे शासकवर्ग अपापली भिन्न कला प्रचारांत आणूं लागले.  त्याचप्रमाणें भारतीय हिंदु कला जावा, सुमात्रा, इकडे पसरली.  या सर्वांचा परामर्ष त्या त्या देशावरील लेखांत घेतला जाईलच.  कलेविषयीं तात्विक विवेचन मात्र जितकें व्यापक, सूक्ष्म व पृथक्करणशक्तीनें मिश्रित असलें पाहिजे तितकें झालेलें दिसत नाहीं.  अस्तित्वांत असलेल्या विविध कलांतून कलात्व शोधावें व तें पुढें मांडावें अशा तर्‍हेची ओरड पुष्कळ झाली आहे.  परंतु एकाच देशांतील सौंदर्यविषय झालेल्या अनेक वस्तू व अनेक देशांतील व अनेक संस्कृतींतील कलाविषय झालेल्या सर्व वस्तू लक्षांत घेतल्या म्हणजे कलात्व शोधणार्‍यांची बुद्धि थोडीबहुत गुंग होते.

उपयोग साहित्य व कला -  कलात्वसंशोधकांनीं आद्य म्हणजे प्राकृतिक कलेची व्याख्या अशी केली आहे कीं, कला म्हणजे उपयुक्तता या गुणाखेरीज इतर असलेला गुण.  याचा अर्थ असा नाहीं कीं कला उपयोगी नाहीं.  त्यांचें म्हणणें असें कीं एखाद्या वस्तूचा विशिष्ट किंवा प्राकृतिक उपयोग आहे.  तो उपयोग साध्य करण्याशिवाय त्या वस्तूस अधिक आकर्षक बनविणें हें कलेचें ध्येय आहे.  उदा. पंख्याचा प्राकृतिक उपयोग वारा घेणें; पण नुसता कामचलाऊ पंखा न वापरतां अनेक तऱ्हांनीं शोभिवंत असा पंखा केला कीं जो सुंदर स्त्रीच्या हातांत शोभेल, तर तो पंखा कलायुक्त होय.  व त्या पंख्यांत पंखेपणा खेरीज ज्या इतर गोष्टी आकर्षणार्थ घातल्या असतील त्या कला होत; व पंखेपणा व त्या गोष्टी मिळून पंखा तयार करणें ही कला होते.

परंतु संगीताविषयीं ही विचारपद्धति कशी लागू पडेल ?  प्रसंगानुरूप संगीत निरनिराळें होईल, त्याप्रमाणें प्रसंगानुरूप पंखे निरनिराळे होतील.  तर वस्तूचा उपयोग ही कलेची निकषशिला नव्हे असें म्हणतां येणार नाहीं.  तथापि उपयोग आणि शोभा ही दोन तत्वें कलाविषयक विचारांत उपयोगीं पडणार नाहींत असें नाहीं.

ज्या कलांचा मानवी गरजा किंवा सोयी भागविण्याच्या कामीं मुख्य उपयोग होत नसून ज्या केवळ मनुष्याच्या मनांतील सौंदर्यप्रेमास काय त्या पोषक असतात अशा कलांनां ललितकला म्हणण्याचा प्रघात आहे.  आतां कांहीं कला दोन्हीहि कार्ये करूं शकतात; तरी त्यांची ललितकलांतच गणना केली जाते.  उदाहरणार्थ शिल्पकला.  या कलेच्या योगानें आश्रयनिवासादि गरजा भागत असल्यामुळें तिची उपयुक्त अथवा यांत्रिक कलांमध्यें मोजदाद करावयास पाहिजे.  तथापि शिल्पकलेचीं भव्य कामें, इमारती वगैरे व त्यांची मजबुती, निरनिराळ्या भागांतील सुव्यवस्थित, एकजीवि व प्रमाणशीर मांडणी, त्यांची भपकेदार रंगसफेती, चित्रविचित्र नकशीकाम या सर्वांच्या योगानें मनावर होणारा परिणाम व आनंद लक्षांत घेऊन या कलेला ललितकला म्हणण्याचीच विशेष प्रवृत्ति आहे.  उलटपक्षी, सौंदर्यप्रियता या शब्दाचा कितीहि व्यापक अर्थ केला तरी त्यांत हास्यजनक चित्रें व विद्रुप आकृती यांच्या आवडीचा समावेश होणें शक्य नाहीं.  तरीहि तसल्या कुरूप, भयानक, बीभत्स अशा आकृती काढणें या कलेचा ललितकलांत अन्तर्भाव करतात.  तेव्हां सामान्यतः ललितकला या नांवामध्यें सुखदायक अशा सर्व कलांचा समावेश करण्यास हरकत नाहीं; मग त्यांत उपयुक्तता असो वा नसो.

कृत्रिमता व कला -  व्यावहारिक भाषेमध्यें कृत्रिम गोष्टी व नैसर्गिक गोष्टी असा जो आपण भेद करतों तद्‍नुसार कृत्रिम गोष्टी किंवा कला यांत फक्त मनुष्यकृत वस्तूंचा समावेश होतो.  आणि नैसर्गिक गोष्टीमध्यें मनुष्यप्राण्यांतील व जगांतील जीं जीं कार्ये मनुष्ययत्‍नांवांचून आपोआप उर्फ सृष्टिनियमानें होत असतात त्यांचा समावेश होतो.  तेव्हां कला म्हणजे आपण मानवी प्राणी पूर्वविचारांतीं विशिष्ट उद्देश मनांत धरून जी कृति किंवा करामत करतों ती होय.  अर्थात हीच कलेची सामान्य व्याख्या ललितकलांनांहि लागू आहे.  यावरून कला म्हटली म्हणजे तेथें पूर्वविचार हा असलाच पाहिजे हें स्पष्ट होतें.  शेले कवीनें आपल्या कवितेंत एके ठिकाणीं स्कायलार्कच्या गाण्याला 'पूर्वविचाररहित असलेली करामत' असें म्हटलें असलें तरी त्याच कवितेंत पुढें त्यानें स्कायलार्कच्या व कवीच्या गाण्यांतील नैसर्गिक व कृत्रिम हा फरक स्पष्टपणें कबूल केलेला आहे.  आपणहि नैसर्गिक क्क्तृत्वाला, वागणुकीतील भारदस्तपणाला किंवा मोहकपणाला आणि स्वभावांतील व वर्तनांतील अशाच कित्येक गोड गोष्टींनां ललितकलांमध्यें गणीत नाहीं.  कारण यांपैकीं पुष्कळ गोष्टी जरी बालपणांतील संवयीनें किंवा आनुवंशिक संस्कारानें प्राप्‍त होणार्‍या असल्या तरी त्या अंगामध्यें पूर्ण मुरून नैसर्गिक स्फूर्तीनें होऊं लागल्यावाचून त्यांत खरी व पुरी मजा येत नाहीं.  ललितकलाभिज्ञ पंडितांनीं मनुष्याच्या वागणुकींतील मोहक गुणांचा जरी तत्वाखातर ललितकलांत समावेश केला असला तरी मनुष्याच्या संवयींतील अनेक गोष्टी पूर्ण परिणतीअंतीं नैसर्गिक अशाच भासूं लागतात हें नाकबूल करतां येत नाहीं.  उलटपक्षीं उत्तम पोषाख करणें ही गोष्ट पूर्वविचाराशिवाय कदापीहि होऊं शकणार नाहीं.  म्हणून तिला कलाच म्हटलें पाहिजे.

कर्तृभोक्तृफ्सौख्य -  तेव्हां एकंदर कलांचीं अर्थात ललितकलांचीं कार्ये पूर्वविचारानें होत असतात, आणि प्रत्यक्ष ललित कलाकुशलाला तिच्या प्रक्रिये (उपयोगा) पासून विशेष प्रकारचें सुख प्रत्यक्ष अनुभवावयास सांपडतें, आणि इतर प्रेक्षक किंवा श्रोतृजनांनां सुख मिळतें.  वरील विधानावरून हें स्पष्ट दिसतें कीं, मानवी समाजामध्यें ललितकलाकुशलांचा एक स्वतंत्र वर्ग असून त्यांपासून सुख मिळविणारांचा दुसरा निराळा वर्ग असतो.  आपली ही भाषा आधुनिक सुधारलेल्या समजांस बरोबर लागू पडण्यासारखी आहे.  त्यांत अर्थशास्त्रांतील भाषेंत बोलावयाचें म्हणजे उत्पादक व ग्राहक असे दोन वर्ग असतात.  पण प्रथमावस्थेंतील समाजांनां मात्र हा नियम लागू पडत नाहीं.  तसेंच कोणत्याहि कलेची प्राथमिक अवस्था पाहिली तर तेथेंहि उत्पादक व ग्राहक उर्फ कलाकर्ता व भोक्ता असे निरनिराळे इसम नसतात.  उदाहरणार्थ नाट्यकला घ्या; या कलेचा मूळ आरंभ लहान मुलांच्या अनुकरणचेष्टांत आढळतो आणि मुलें असले नाटकी हावभाव किंवा उच्चार करतांना प्रेक्षकांची अपेक्षा केव्हांहि करीत नाहींत.  खोदकामांतील आद्यप्रवर्तक हा इतिहासपूर्व कालांतील कोणी गुहावासी इसम असला पाहिजे व त्यानें प्रथम शिकारींत सांपडलेल्या प्राण्यांचीं चित्रें केवळ स्वतःच्या करमणुकीखातर खोदून ठेवण्याचा उद्योग केला असला पाहिजे.  मूळ शिल्पकारहि प्राचीन काळीं राहुटींत किंवा झोपडींत राहणार्‍या रानटी लोकांतील असून त्यानें प्रथम आपली राहुटी किंवा झोंपडी स्वतःच्या दृष्टीला रुचेल अशा तर्‍हेनें उभारण्यांत आपलें कौशल्य प्रगट केलें असलें पाहिजे.  या आद्यजनकांच्या मनांत स्वतःशिवाय इतर जनांनां संतोषित करण्याची इच्छा असेल असें म्हणवत नाहीं.  नृत्य व गायनाच्या आद्यप्रेमीं इसमानें प्रथम एकट्यानेंच आनंदाच्या भरांत आपल्या पूज्य देवतेला आळवितांना किंवा एखादा विजयोत्सव साजरा करतांना किंवा केवळ तालस्वरविषयक अन्तःस्फूर्तीनें टाळ्या वाजविण्यास आणि पाय नाचविण्यास किंवा नियमित सूर काढण्यास आरंभ केला असला पाहिजे.  पुढें त्याच्या टोळींतील कित्येक इसम केवळ प्रेक्षक म्हणून जमूं लागले असावेत.  पोषाख व शृंगार यांच्या बाबतींतहि प्रथम आरंभ कवड्या व पिसें यांनीं स्वशरीर विभूषित करणार्‍या रानटी इसमानें केलेला असून त्याच्या मनांत मात्र आत्मसुखाच्या इच्छेबरोबर स्वतःच्या स्त्रीला मोहविण्याचा व तसेंच स्वजातिबांधवांनां दिपविण्याचा किंवा खिजविण्याचाहि उद्देश असला पाहिजे.  ललितकलांवरील अलीकडील लेखकांची प्रवृत्ति निराळी असून सदरहू कलांचा उगम आत्म व स्वयंस्फूर्ति यांत नसून स्वसमाजबांधवां सुखविण्याच्या मानवी इच्छेंत आहे असें ते प्रस्थापित करूं पहात आहेत.  या वादाचा निर्णय कसाहि लागला तरी एक गोष्ट अगदीं स्पष्ट आहे कीं, वरील सर्व ललितकलांच्या बाबतींत ज्या कृतीनें प्रत्यक्ष कलाकारास आनंद होतो, तिनेंच इतरांनांहि होतो.  यामुळें समाजाच्या वाढीबरोबर त्यांत ललितकलाभिज्ञ लोक व त्यांचे प्रेक्षक असे दोन स्वतंत्र वर्ग निर्माण होऊं लागतात.  त्यांत ज्या इसमांना विवक्षित कलेपासून सुतरांसुखप्राप्ति होतेसें वाटतें ते लोक तिचे अभ्यासक व प्रवर्तक बनतात.  व स्वतःच्या नैपुण्यानें ते इतरांनां सुखवीत असतात.  शिवाय असले चित्रकार, शिल्पकार किंवा खोदकाम करणारे स्वतःच्या कृतीनीं स्वतःचेंहि मनरंजन करूं शकतात.  गायक किंवा वादक स्वतःच्या मधुरालापांत स्वतःच तल्लीन होत असतात; कवीहि स्वयंविरचित कवनें मोठ्या प्रेमानें किंवा मार्मिकपणानें वाचीत असतात.  शिवाय प्रेक्षकांपैकीं कित्येक सतत प्रेक्षणानें किंवा श्रवणानें स्वतःच कलाकुशल बनूं शकतात; ही गोष्ट महत्वाची आहे.  

निरपेक्ष आनंद -  ललितकलांमध्यें जे विशेष गुण आहेत त्यांपैकीं एक महत्वाचा गुण असा आहे कीं, त्याचा प्रत्यक्ष उपयोग किंवा आवश्यकता कांहीएक नसतांहि त्या अस्तित्वांत असूं शकतात.  म्हणजे पूर्वी अरिस्टॉटलनें म्हटलें आहे
त्याप्रमाणें या कलांपासून होणारें सुख हितनिरपेक्ष असतें.  त्याचा अर्थ असा कीं, या सुखापासून मनुष्याच्या शरीरपोषणाला मदत होत नाहीं किंवा त्याच्या संपत्तींत भर पडत नाहीं.  हें सुख अनुभवणार्‍या मनुष्याला इतरांपेक्षां कोणताहि अधिक फायदा होत नाहीं, किंवा त्याची योग्यता अधिक वाढत नाहीं; तसेंच हें कोणा एकट्या व्यक्तीलाच घेतां येतें इतरांनां घेतां येत नाहीं असेंहि नाहीं.  उदाहरणार्थ, एखाद्या सुंदर इमारतीचें दर्शनसुख कोणा विशिष्ट व्यक्तीलाच अनुभवितां येतें असें नाहीं.  त्या शहरांतील सर्व रहिवाशांनां व भविष्यकालीन सर्व पिढ्यांतील प्रेक्षकांनां तें मिळूं शकण्यासारखें असतें.  तीच गोष्ट कोणत्याहि सुंदर चित्राची किंवा पुतळ्याची आहे.  त्याचें दर्शनसुख सर्वांनां सारखें लाभूं शकतें.  फार तर त्याचा कबजा मालकीच्या नात्यानें एखाद्याच व्यक्तीला मिळून त्याबद्दल त्याला प्रौढी मिरवितां येईल.  संगीत पद्यांचा किंवा कवीच्या काव्याचा प्रकारहि तसाच आहे.  सार्वकालीन सर्व वाचकांनां त्यांतील कल्पनांचा व भावनांचा आस्वाद सारखाच घ्यावयास सांपडतो.  ललितकलांशीं सादृश्य असलेल्या इतर कलांमध्यें वरील गुण नसतात.  उदाहरणार्थ, जिव्हा व घ्राण यांनां सुखविणार्‍या गोष्टीची ललितकलांत गणती करीत नाहींत.  याचें कारण नेत्र व कर्ण हीं अखिल ज्ञानग्राही अतएव उच्च दर्जाचीं इंद्रियें असून घ्राण व जिव्हा हलक्या प्रतीची आहेत, असें कित्येक सांगतात.  पण वास्तविक कारण असें दिसतें कीं, रुचिगंधविषयक सुखें वैयक्तिक स्वरूपाचीं असून तद्विषयक पदार्थांचा सर्वांनां सर्वकाळ सारखाच उपभोग घेतां येईल अशी व्यवस्था करणें शक्य नसतें.  शिवाय रुचिगंधयुक्त अशा सर्व खाद्यपेयपदार्थांचा मनुष्याचा शरीरपोषणाकडे प्रत्यक्ष उपयोग होत असल्याकारणानें तज्जन्य सुखाला ललितकलाजन्य सुख असें म्हणतां येणार नाहीं. व तद्विषयक कौशल्याला ललितकला म्हणतां येत नाहीं.  आतां ह्या कनिष्ठ सुखापासून अत्युच्च सुखाकडे म्हणजे प्रेमाचे हाव भाव चेष्टा यांपासून प्रेमविषयीभूत व्यक्तीला होणार्‍या सुखाकडे वळूं.  प्रेमविषयक सुखाचा अनुभव सौंदर्यजन्यच आहे यांत शंका नाहीं.  तरी पण या सुखाला कलाजन्य म्हणतां येत नाहीं.  प्रेमप्रेरित कृतीचें कलाजन्य सुख अनुभविणें असल्यास आपणास नाट्यगृहांत जाऊन तेथें अगदीं तिर्‍हाईत व्यक्तींनीं केलेले प्रेमाचे केवळ कृत्रिम हावभाव पहावे लागतात.  याचें कारण उघडच आहे कीं येथेंहि कृत्रिम व स्वाभाविक गोष्टींतील भेदाचाच प्रश्न आहे.  कारण प्रेमाचा खरा अनुभव ही गोष्ट कृत्रिम कलासाध्य नसून तिचा मानवी जीविताशीं व स्वभावाशीं प्रत्यक्ष संबंध आहे.  त्यांत मानवी आशा, निराशा, मनोविकार इत्यादि अनेक गोष्टी येतात.  उलटपक्षी खरें प्रेम नसतां केवळ प्रेमभावांचें प्रदर्शन करणें हा कृत्रिम कलेचा विषय बनतो.  तेथें प्रेक्षकाच्या वैयक्तिक भावनांचा अगर मनोविकारांचा संबंध नसल्यामुळें त्याला होणार्‍या निरपेक्ष सुखाचा ललितकलाजन्य सुखांत अन्तर्भाव होतो.  तात्पर्य जेथें प्रेमीजनाला 'माझें' म्हणून वैयक्तिक मालकी गाजविण्याला, आत्मप्रौढीला, स्वाभिमानाला वाव असतो तेथें त्याच्या सुखाला ललितकलाजन्य म्हणतां येत नाहीं.  येणेंप्रमाणें अगदीं नीच दर्जापासून उच्च दर्जाच्या सुखापर्यंत जेथें जेथें वैयक्तिक फायद्याचा किंवा मालकीचा संबंध पोहचूं शकतो येथें तत्सुखदायी कलेचा ललितकलांत अन्तर्भाव करणें शक्य नाहीं.  ललितकलाजन्य सुख हें केवळ मनोमय व पूर्णपणें अन्यहितनिरपेक्ष असतें.  सदरहू व्याख्येवर अलीकडील लेखक असा एक आक्षेप घेत असतात कीं कोणत्याहि प्रेक्षकाचें किंवा श्रोत्याचेयं ललितकलाजन्य सुख अगदींच स्वहितशून्य असतें असें नाहीं.  उदाहरणार्थ, एखादा नाट्यप्रयोग पहात असतांना नायकाच्या अंगच्या गुणावलोकनानें प्रेक्षकाच्या आत्मीय गुणविकासास मदत होत असते.  या आक्षेपाला उत्तर येवढेंच कीं, वरील फायदा वैयक्तिक नसून सर्व प्रेक्षकांनां सारखाच मिळत असतो.

कला व तीस नियमबद्ध करण्याची शक्यता -  आतां प्रत्यक्ष ललितकलावान इसमाच्या मनाची स्थिती व रचना कशी असते या मुद्याचा विचार करूं.  ललितकलेतर उपयुक्त कलांतील कुशलता संपादण्याकरितां त्या कलांचे नियम शिकून ते अंगवळणी पडण्याकरितां जरूर तितका अभ्यास केला म्हणजे भागतें; परंतु ललितकलांचें तसें नाहीं.  ललितकलांतील प्रवीणता नुसत्या नियमज्ञानानें व अभ्यासानें फारच अल्प प्राप्‍त होऊं शकते.  ललितकलाभ्यासकाला सदरहू गोष्टीशिवाय आणखी खुद्द स्वतःच्या अंगच्या मनोरचनेवर व बुद्धिसामर्थ्यावर अथवा कल्पनाचातुर्यावर विशेष अवलंबून राहावें लागतें.  हें बुद्धिसामर्थ्य म्हणजे उपजत ज्ञान, पूर्वस्मृति, आवड, भावना, स्वयंस्फूर्ति वगैरे मानवी देहांतील अनेक जन्मसिद्ध गोष्टी होत.  ललितकलानैपुण्यप्राप्‍तीच्या मार्गांतील ही जी अडचण आहे ती त्या कलांच्या उपयुक्तताराहित्याचाच एक परिणाम आहे.  कोणतीहि उपयुक्त गोष्ट म्हटली म्हणजे तिला निश्चित स्वरूप असतें व तें प्राप्‍त करण्याचा उत्तम मार्गहि निश्चित असाच असतो.  कोणत्याहि उपयुक्त कलेंतील कौशल्य म्हणजे विवक्षित कार्यनिष्पत्तीकरितां लागणार्‍या नियमकृतीचें उत्तम ज्ञान संपादणें हें होय.  उदा. शेतकरी, यांत्रिक, सुतार, गवंडी किंवा विणकरी कोणीहि घ्या; या लोकांनां ठराविक गोष्टी ठराविक मार्गानें करण्याचें कौशल्य प्राप्‍त करावयाचें असतें.  कित्येकवेळां पूर्वापार चालत आलेल्या पद्धतींत सुधारणा करण्याकरितां अक्कल खर्च करावी लागते.  पण एखाद्यानें ती सुधारणा केली कीं, इतरांनां तिचें ज्ञान सहज करून देतां येतें.  ललितकलांचें मात्र तसें नाहीं.  बीथॉव्हेननें संगीतशास्त्राच्या अनेक अज्ञात प्रदेशांवर जे विजय मिळविले, किंवा रेब्रँटनें औदासिन्याचे, क्लेशाचे किंवा हिडिसपणाचे प्रसंग चित्रांत हुबेहूब जे रेखाटले त्या त्यांच्या कौशल्याबद्दलचे नियम ठरविणें कोणाला शक्य नाहीं; किंवा तसल्या कांहीं नियमांचा नुसता अभ्यास करून मूळ कलावंतांतील (त्यांचें) नैपुण्य संपादन करणें शक्य नाहीं.  ललितकलाकारांच्या व सामान्य कारागिरांच्या कर्तृत्वांत हा जो मोठा फरक आहे त्याचें कारण हेंच कीं, सामान्य कारागिरांच्या सर्व कृती उपयुक्त अतएव निश्चित व नियमबद्ध असतात.  उलट ललितकलाकुशलांच्या कृतींत निश्चित उपयुक्तता नसते व म्हणून ती साध्य करण्याचे नियमबद्ध मार्गहि नसतात.  त्यांनां आपलें कसब दाखविण्यांस फार मोठें क्षेत्र मोकळें असतें.  स्वतःच्या कलेंतील अनेक चमत्कार व ते दाखविण्याचे नानाविध मार्ग त्यांच्या पुढें असतात; व ही सर्व करामत त्यांच्या उपजत अक्कलहुषारीवर अवलंबून असते.  संगीत कवनें करणाराला तर सर्वांहून अधिक स्वातंत्र्य मिळतें.  संगीताच्या अवघड चाली शिकून नंतर कोणत्या प्रकारचा ग्रंथ करावयाचा तें एकदां ठरविल्यावरहि मनोविकार जागृत करणार्‍या हजारों प्रकारच्या सुरांचेयं एकीकरण व अनुसंधान ठरविण्यास त्याला सर्व नादब्रह्म मोकळेंच असतें; व त्याच्या काव्यकृतीची किंमत कर्त्याच्या नैसर्गिक गुणसमुच्चयावर अवलंबून असते.  ही अभिजात देणगी आहे; शिक्षणानें संपादन करण्यांतली ही गोष्ट नाहीं, किंवा एकानें दुसर्‍याला सांगण्यांतलीहि नाहीं.  संगीत कलेचा व्यावहारिक उपयोग नाहीं व तिला कोणतेंहि मूर्त स्वरूप देतां येत नाहीं, या दोन कारणामुळें तिला सर्व श्रेष्ठ ललितकला किंवा कलांची कला असें म्हणतात.  शिल्पकलेला वरच्यापेक्षां निम्मीं स्वतंत्रता मिळते.  नैसर्गिक पदार्थांची प्रतिकृति करणें इतकेंच शिल्पकलेचें ध्येय नव्हे; तें काम खोदकला करते.  रेषा, रंग, प्रकाश व छाया साधे किंवा सुशोभित पृष्ठभाग वगैरे बाबतींत पूर्ण स्वातंत्र्य असतें पण जरूरीप्रमाणें जागेची बांधणी करणें शिवाय जड पदार्थांचे वजन, आधार, आकर्षण, प्रतिरोध वगैरे अनेक गुणधर्म विचारांत घेऊन त्याप्रमाणें काम करणारा कारागीर निम्मा परतंत्र बनतो.  शिवाय शिल्पकाराला, चित्रकाराला व कबीला आपापल्या कलेंतील जरूर त्या वस्तुस्थितीची व सामान्य नियमांची माहिती लागत असते.  उदाहरणार्थ खोदकाम करणारास मनुष्यदेहाच्या बाह्य रचनेची व त्याचप्रमाणें चल व अचल स्थितींत होणार्‍या अन्तर्गत रचनेची माहिती असावयास पाहिजे व घन पदार्थाला तसला आकार देण्याच्या बाबतींतील सर्व नियममार्ग अवगत पाहिजेत.  चित्रकाराला नैसर्गिक गोष्टींची व देखाव्यांची माहिती अधिक विस्तृत असावयास पाहिजे व सपाट पृष्ठभागावर त्या गोष्टी चित्रित करण्यासंबंधाचे नियम परिचित पाहिजेत.  कवीला तर सर्व गोष्टीं (नैसर्गिक, शारिरिक व मानसिक व्यापार) केवळ शब्दचित्रांत उतरवावयाच्या असल्यामुळें त्याला अनेक गोष्टींचे फार व्यापक ज्ञान असावयास पाहिजे.  कोणत्याहि कलावानाला त्याच्या कलेंतील नियम, पद्धती, प्रमाणें आणि इतर अपरिस्फुटित गोष्टी यांचें जें ज्ञान मिळवावयाचें असतें तितक्या सर्व बाबतींत प्रेक्षकालाहि ज्ञान मिळवून कलावंताच्या कृतीवर मत देतां येण्यासारखें असतें.  परंतु कलावानाच्या कृतींतील अत्यंत महत्वाचा भाग, मुख्य गुण किंवा खरी बहार ज्यांत असते त्या गोष्टी, नियमाच्या पलीकडल्या असतात व त्या प्रेक्षकाच्या परीक्षणाच्याहि बाहेरच्या असतात.  या बहारीच्या प्रदेशांत कलावंत कल्पनेच्या भरार्‍या जितक्या उंच मारील व त्या प्रत्यक्ष कृतीत उतरवील तितका त्याचा गुण अधिक समजला जातो व त्याची चहा अधिक होते.

यांत्रिक वाढ आणि कला -  यासंबंधानें दुसरा एक साहजिक असा प्रश्न उद्‍भवतो कीं, यांत्रिक कलेच्या वाढीचा व प्रगतीचा ललितकलांवर कितपत परिणाम होईल.  हल्लींच्या चालू युगांत जगाची महत्वाची व्यवहारोपयोगी खटपट यांत्रिक शोधांची वाढ करून यंत्रसहाय्यानें बनणार्‍या पदार्थांची अधिकाधिक भरती करण्याकरतां चालू आहे.  या शोधांपैकी ज्यांचा केवळ उपयुक्त गोष्टी निर्माण करण्याकडे किंवा कोणत्याहि प्रकारें मनाला आनंद न देणारे पदार्थ करण्याकडे उपयोग होतो, त्या शोधांशीं प्रस्तुत आपणास कांहींहि कर्तव्य नाहीं.  परंतु मनाला सुख देणारे गुणधर्म ज्यांच्यामध्यें आहेत असे पुष्कळ पदार्थ आहेत व त्या पदार्थांतील सुखदायी गुणधर्म यंत्रांच्या सहाय्यानें उत्पन्न झालेले असतात.  आतां या बाबतींत ज्या प्रयत्‍नानें किंवा बुद्धिकौशल्यानें तें यंत्र निर्माण करण्यांत आलें त्याला ललितकला हें नांव देतां येत नाहीं, कारण त्या यंत्राचा केवळ एक जातीचे अनेक पदार्थ निर्माण करण्याकडे उपयोग व्हावयाचा असतो.  उदाहरणार्थ, ठशावरून छापील प्रती काढण्याचा साधा प्रेस घ्या, किंवा सतरंज्या, पडदे वगैरे कपडे विणण्याचे अत्यंत गुंतागुंतीचे माग घ्या.  या दोन्ही बाबतींत यांत्रिक कार्याव्यतिरिक्त जो एक कार्यभाग असतो त्यांत ललितकलेचा कांहीं अंश येतो.  ठशांवरून यंत्रानें छापील प्रती काढण्याची क्रिया वगळल्यास मूळ ठसा तयार करणार्‍या शिल्पकाराच्या कामाचा ललितकलेंतच अन्तर्भाव होतो.  तसेंच मागावर कपडा विणण्याची कृति वगळल्यास प्रत्यक्ष कपड्याचा नमुना तयार करणाराच्या किंवा त्यांत सुधारणा करणाराच्या करामतीला ललितकला असेंच म्हटलें पाहिजे.  ठशावरील खोदून केलेला मूळ नमुना किंवा डिझाईन व सतरंजीवरील वेलबुट्टी वगैरे देखावे नयनानंददायी होतील असें करणें हा केवळ ललितकलेचा भाग आहे.  कपड्यांत किंवा कोणत्याहि पदार्थांत उपयुक्ततेव्यतिरिक्त नुसती शोभा म्हणून कांहीं असतेच.  सर्व यांत्रिक व उपयुक्त कलांच्या पदार्थांत सौंदर्य आणण्याचा जो भाग ती ललितकलाच होय.

दुसरा प्रश्न असा कीं, निरनिराळीं अत्यंत गुंतागुंतीचीं पण अत्यंत उत्तम काम पार पाडणारी यंत्रें मूळ शोधून काढणाराच्या कसबाला ललितकला म्हणतां येईल कीं नाहीं ?  हा शोधकहि एखाद्या शिल्पकाराप्रमाणें किंवा संगीतज्ञाप्रमाणें आपला सर्व विचार, प्रयत्‍न व बुद्धि आपलें यंत्र शक्य तितकें उत्कृष्ट करण्याकडे खर्च करीत असतो.  तथापि त्याला ललितकलाभिज्ञ असें म्हणतां येत नाहीं.  कारण या शोधकापुढें कांहीं विशिष्ट व व्यवहारोपयोगी कार्य करावयाचें असतें.  त्याच्या कल्पनाशक्तीला पूर्ण स्वातंत्र्य नसतें.  विशिष्ट कार्य करणारें अगदीं उत्तम यंत्र केल्याबद्दल तो स्तुतीस पात्र असला तरी त्याच्या कसबाला ललितकला म्हणतां येत नाहीं.  तथापि यंत्राचे निरनिराळे भाग प्रमाणशीर, व्यवस्थित करण्यांत व एकंदर यंत्र सुंदर बनविण्यांत लागणार्‍या कौशल्याचा ललितकलेंत समावेश करावयास हरकत नाहीं.

कला ही खेल कल्पना होय -  वरील विषयांवर बंद करून पुन्हां मूळ विवेचनांतील आणखी एका मुद्याकडे वळूं.  तो मुद्दा ललितकलांच्या स्वरूपासंबंधाचाच असून तो असा कीं, ललितकलांतील कामें आवश्यक म्हणून कोणी करीत नसून केवळ आवड म्हणून करतात.  मनुष्यांतील उर्वरित कार्यप्रवृत्तीला कांहीं क्षेत्र लागत असतें आणि ललितकलांतर्गत व्यवसाय आनंददायी असल्यामुळें तो ते करीत सुटतो.  तेव्हां ललितकला म्हणजे मानवजातीचा केवळ खेळ आहे.  जीवोत्पत्तिस्थित्यादि कार्ये चालवूनहि अवशेष राहणारी मनुष्यमात्रांतील जी शक्ति तिला बाहेर पडण्यास मोकळा मार्ग लागत असतो.  या शक्तीचेंच ललितकला हें कार्य होय.  याप्रमाणें ललितकलांनां वैकल्पिक व अनवश्यक कार्य ठरविणें, त्यांना मनुष्यप्राण्याची लीला किंवा खेळ म्हणणें म्हणजे प्रथमारंभीं प्रतिपादिलेल्या त्यांच्यातील अनुपयुक्ततेच्या किंवा अनावश्यकतेच्या मुद्याचाच अनुवाद करण्यासारखें आहे.  ललितकलांचें हें स्वरूप जरी खरें असलें तरी तें व्यक्त करण्याची रीत व त्यावरून प्रस्थापित केले गेलेले अगणित सिद्धांत याचें येथें थोडक्यांत दिग्दर्शन करणें जरूर आहे.

खेल कल्पनेचें इंग्लंडात प्राधान्य -  इंग्लंडमध्यें मानसशास्त्रज्ञांनीं ललितकलांविषयीची ही खेळाची कल्पना आधारास घेऊन मनुष्यप्राण्यांतील उर्वरित शक्तीच्या कार्याचें मूळ स्वरूप म्हणून लहान मुलांची नैसर्गिक आरडाओरड व धावपळ विचारांत घेतली आहे; व नंतर मानवी देहाला उपयुक्ततारहित अशीं जीं सुखें अनुभवितां येतात, त्यांची मोजदाद केली आहे.  त्यात दृगिंद्रिय व श्रोत्रोंद्रिय याच्या द्वारां मिळणारीं सुखें प्रमुख असून शिवाय त्यांत विचारसंगतिन्यायानें कल्पनानुमानजन्यादि सुखांची भर पडते.  विदूषकी नकला व वस्तुस्थितीची हुबेहुब नक्कल यांमुळें होणारीं सुखें वरील प्रकारचींच होत.  वरील बालचेष्टितानांच पुढें प्रौढपणी व विशेषतः सुधारलेल्या समाजांत कसें सुसंस्कृत स्वरूप मिळत जातें, याचें वर्णन वरील शास्त्रज्ञांनीं केलें आहे.  त्यांत हर्बर्ट स्पेन्सर हा प्रमुख आहे.

तसेंच प्राचीन तत्ववेत्ता प्लेटो हा अर्वाचीन कवि शिलर या दोघांच्याहि मतें ललितकलान्तर्गत कृती या लीलाप्राय आहेत; पण या समानमतापासून त्यांनीं काढलेले निष्कर्ष फार भिन्नभिन्न आहेत.  प्लेटोची विचारसरणी अशी कीं, इहलोकांतील नित्य अनुभवाच्या गोष्टी खर्‍या, सत्य नसून तो मूळ सत्तत्वांचा छायारूप मायिक देखावा आहे.  मूळ सत्तत्वें केवळ मनोगम्य आहेत,  तेव्हां ललितकलांच्या कृती म्हणजे ऐहिक देखाव्यांचें प्रतिबिंब किंवा छायेची पडछाया होय व यामुळें त्यांच्यांत सत्याचा अंश फारच अल्प असतो; या विशिष्ट मतामुळें प्लेटोला वैद्यक, शेतकी किंवा चांभारकी या धंद्यांचेंहि, त्यांत व्यावहारिक उपयुक्तता असल्यामुळें ललितकलापेक्षां अधिक महत्व वाटतें.  तो म्हणतो, ललितकला अगदीं कुचकामाच्या, त्यांत उपयुक्तता नाहीं व सत्यहि नाहीं; त्यांच्यापेक्षां यांत्रिक कलांची किंमत, (त्यांच्यांत उपयुक्तता असल्यामुळें) अधिक आहे.

खेल कल्पने विरुद्ध मत -  उलटपक्षी शिलरनें निराळ्या युगांत निराळ्या विचारपद्धतींचा अवलंब करून प्लेटोच्या अगदीं तंतोतंत विरुद्ध असें अनुमान काढलें; तें असें कीं, मानवी लीलेच्या या ललितकलांच्या प्रांतांत मानवानें मिळविलेलें प्रभुत्व हें अत्यंत उदात्त स्वरूपाचें असून तें मानवास भूषणास्पद आहे.  शिलरची विचारपद्धति कँटच्या धर्तीचीच आहे.  तो म्हणतो, मनुष्याचा आत्मा दोन जगतांमध्यें सांपडलेला असतो.  एक शारीरिक किंवा इंद्रियवासनात्मक जग व दुसरें नैतिक किंवा संकल्पात्मक जग होय.  पैकी इंद्रियवासनात्मक जगांत आत्म्यावर बाह्य दडपण पडून तो वासनांकित होत असतो; व नैतिक जगांत अन्तर्गत दडपण पडत असतें.  मनुष्य इंद्रियविकारांनां बळी पडतो त्यावेळीं अगदीं हतबुद्ध, मूढ बनतो परंतु ज्यावेळीं तो आपलें इच्छास्वातंत्र्य गाजवून नैतिक नियम पाळतो, त्यावेळीं तो खरा प्रवृत्तिपर योगी बनतो.  याप्रमाणें मनुष्यांतील पाशवी वृत्तीचें व नैतिक प्रवृत्तींचें द्वंद्वयुद्ध सतत सुरू असतें.  तेव्हां प्रश्न असा कीं या दोन्ही वृत्तींना सामोपचारानें एकत्र नांदतां कसें येईल, किंवा असें ठिकाण किंवा विषय नाहींच काय ?  याचें उत्तर असें कीं तशी जागा आहे.  वरील दोन जगांच्या मध्यें तिसरें जग असून, त्या मध्यवर्ती प्रदेशांशीं नित्य जीवनक्रमांतील आवश्यक गोष्टींचा संबंध नसतो किंवा नैतिक विचारहि तेथें उद्‍भवत नाहींत.  हें कार्यक्षेत्र म्हणजे मनुष्यमात्रांतील लीलाप्रवृत्तीचें क्षेत्र होय.  नित्यव्यवहारांतील आवश्यक गोष्टींच्या मानानें ह्या लीला निरुपद्रवी असून मानवाच्या खुषीवर त्या अवलंबून असतात, आणि त्या आवश्यकता व कर्तव्य या दोहोंच्याहि पलीकडल्या असतात.  या प्रकारच्या कार्यक्षेत्रांत मनुष्याला आपलें सामर्थ्यसर्वस्व खर्च करण्यास सवड असूनहि त्यापासून अनिष्ठनिष्पत्ति होण्याचा संभव बिलकुल नसतो.  या कार्यक्षेत्रांत इंद्रियात्मक व संकल्पात्मक अशा दोन्ही प्रकारच्या शक्तींना परिपूर्ण व आत्यंतिक समाधान मिळविण्यास एकत्र जागा असते.  बाह्यवस्तूंचा उपभोग घेण्याची प्रवृत्ति व त्यांच्यावर प्रभुत्व चालविण्याची प्रवृत्ति या दोहोंचा या ठिकाणीं मिलाफ झालेला असतो.  सहजलीला म्हणून प्रकृतिद्रव्याला तुम्हीं कोणतेंहि रूप दिलें तरी त्यांत दोघांचा विरोध होण्यास जागा नसते.  याप्रमाणें जडात्मक जग व स्वरूपात्मक जग यांचें ऐक्य जेथें होतें तेंच सौंदर्यात्मक जग होय !  स्वतःमधील लीलाप्रवृत्यनुसार कृति करावयास लागलें कीं, सौंदर्यविषयक क्षेत्रांत प्रवेश होत असतो, व त्यांतून ललितकलांचा उगम होतो.  या बाबतींत शिलरचे स्वतःचे शब्द पुढीलप्रमाणें आहेत; ''एकीकडे नैसर्गिक शक्तींचें बलाढ्य साम्राज्य व दुसरीकडे नैतिक शक्तींचें पवित्र साम्राज्य; याच्या मध्यभागीं सौंदर्यप्रवृत्तिनिर्मित तिसरें एक साम्राज्य असतें, हेंच लीलामय गोष्टीचें आनंददायी साम्राज्य होय.  या साम्राज्यांत मनुष्य शारीरिक व नैतिक या दोन्हीहि बंधनांपासून मुक्त होत्साता स्वैर संचार करूं शकतो.''  याप्रमाणें शिलर कवीनें कँटच्या तत्वज्ञानविषयक मतांच्या आधारेंच आपली स्वतःची सौंदर्यशास्त्रविषयक उपपत्ति लावून ललितकलेला त्यानें मानवजातीची अत्यन्त उच्च व नमुनेदार कृति ठरविली आहे, कारण त्यातच मानवाला आपलें सर्वस्व प्रकट करतो येतें.  ''मनुष्य लीलामय बनतो तेव्हांच तो खरा खरा मनुष्य या नांवाला पात्र होतो.''  ''सौंदर्यमय असेल त्याच्याशींच मनुष्यानें फक्त लीला करावी व मनुष्यानें लीला करणें ती सौंदर्यमयाशीचं फक्त करावी'' ''सदभिरुचि व सौंदर्यप्रेम यांविषयींचें शिक्षण देण्याचा मुख्य हेतु हा आहे कीं, इंद्रियांची प्रवृत्ति व आत्म्याची प्रवृत्ति यांच्यामध्यें विरोध उत्पन्न न होतां अत्यंत ऐक्य उत्पन्न व्हावें.''  नंतर शिलरनें ललितकलांचा इतर कलांवर कसा परिणाम होतो, ललितकलांच्या व्यवसायामुळें मनुष्यमात्राला इंद्रियवासना व नैतिक भावना यांचें द्वंद्व कसें कमी करतां किंवा सर्वस्वी टाळतां येतें, व स्वसमाजाच्या उपयोगीं पडून स्वतःचें आयुष्य सुखासमाधानानें कसे घालवितां येतें याचें विवेचन केलें आहे.

शिलरच्या या ललितककलाविषयक व्यापक व उत्साहजनक उपपत्तीसंबंधानें विशेष विस्तारपूर्वक लिहिण्याचें कारण असें कीं, यूरोपमध्यें बहुतेक गेल्या शतकभर ही उपपत्ति अत्यंत उच्च दर्जाची म्हणून विद्वन्मान्य झाली होती, व अद्यापहि तिचें महत्व बरेंच कायम आहे.  मानवी आत्म्याला नैसर्गिक व नैतिक बंधनविरहित स्वछंद संचार करण्याचें क्षेत्र, किंवा वस्तुमात्राच्या व्यावहारिक उपयुक्ततेचा विचार काडीमात्र न करतां चाहील तें स्वरूप देण्याचें क्षेत्र, अशी ललितकलांची त्यानें जी अत्यंत व्यापक व्याख्या केली आहे, ती कोणत्याहि उन्नत व सुसंस्कृत समाजाला ग्राह्य होण्यासारखी आहे.  उपयुक्तताराहित्य व कर्तव्यातीतत्व हे ललितकलांतील दोन्हीहि मुख्य मुद्दे त्यानें स्पष्टपणें पुढें मांडले आहेत.  या जगामध्यें मानवी प्राण्यांनां फायद्याचा प्रश्न सर्वस्वी बाजूला ठेवून केवळ आपसांत यत्किंचितहि कलह न होतां सुखानुभव घेण्याची जागा, ही ललितकलांविषयींची दृष्टीहि त्यानें योग्य रीतीनें विचारांत घेतली आहे, ललितकलाजन्य देखाव्यांना व करमणुकींना योग्य तेंच उच्च स्थान त्यानें दिलें आहे; कारण या ललितकलांच्या साहाय्यानें आयुष्यांतील व सृष्टिक्रमांतील क्षणभंगुर आनंदाचे विषय चिरकाल टिकणारे बनविले आहेत; कारण प्रत्यक्ष अस्तित्वांत असलेल्या गोष्टींतील अपूर्णता व अस्पष्टता या दोषांमुळें मनाला वाटणारें असमाधान दूर करण्याकरता कल्पना व प्रतिभासामर्थ्यानें स्पष्ट व अव्यंग वस्तूंच्या प्रतिमा मनुष्यप्राण्याला आपल्या आवडी व हेतूप्रमाणें ललितकलांच्या क्षेत्रांतच निर्माण करतां येतात.  पण शिलरच्या उपपत्तींत जो मोठा दोष राहून गेला आहे तो हा कीं, मानवी लीलेच्या प्रकारांपैकीं ललितकला कोणत्या व त्यानां कला कां म्हणावें हें त्यानें दाखविलें नाहीं.  उदाहरणार्थ, दृगिद्रियांनां संतोषविणार्‍या चित्रकला व नृत्यकला, श्रोतेंद्रियाला संतोषविणारी संगीतकला व मनाला अनेकांगांनीं रंजविणारी काव्यकला यांमध्यें आणि खेळाच्या किंवा करमणुकीच्या इतर प्रकारांमध्यें फरक काय तो त्यानें स्पष्ट करून सांगितला नाहीं.  शिकारीची गोष्ट घ्या.  या करमणुकीच्या प्रकारांतहि पूर्वचिंतित कौशल्य बरेंच लागत असतें व शिकार करणारांनांहि कलाभिज्ञांप्रमाणें सुखप्राप्ति होत असते.  आतां कोणी म्हणेल कीं, शिकार ही आज जरी केवळ करमणुकीचें साधन बनली आहे तरी प्राचीन रानटी समाजाला ती उपजीविकासाधन या नात्यानें अत्यंत आवश्यक होती.  व त्याकरितां तिला ललितकला म्हणतां येत नाहीं.  पण हीं विचारसरणी लागू केल्यास प्रत्येक ललितकला प्राथमिक समाजावस्थेंतील उपयुक्त क्रियेचें परिणत व उन्नत स्वरूप होय असें दाखवितां येईल.  तथापि शिकारीला ललितकला न लेखण्याचीं कारणें अशीं कीं, शिकारीपासून शिकार्‍यालाच फक्त सुख होतें; उलट त्याच्या व्यवसायामुळें त्याच्या सावजावर तर प्राणसंकटच ओढवून आत्यंतिक दुःख होतें व शिकार्‍याबरोबरच्या प्रेक्षकांनां त्याचें कौशल्य पाहून एकपक्षीं सुख, तर त्या सावजांची प्राणांतिक अवस्था पाहून दुसर्‍या पक्षीं दुःख वाटण्याचा संभव असतो.  म्हणून तिला ललितकला म्हणतां येत नाहीं.  आतां ज्या शारीरिक शक्तीच्या खेळांपासून व प्रयोगांपासून कोणलाहि इजा न होतां हजारों प्रेक्षकांनां आनंद होतो त्या खेळांची ललितकलांत गणना होईल कीं नाहीं ?  ह्या ठिकाणीं फरक असा आहे कीं, सदरहू प्रकारच्या खेळांत व सामन्यांत कृत्रिमपणा मुळींच नसून खरी सत्यता फार आहे.  प्रत्येक सामनेवाल्याला खरे श्रम करावे लागतात व निकालाबद्दल अनिश्चितता असते; त्यामुळें जयापजयाबद्दल खेळगड्यांत व प्रेक्षकांतहि आतुरता व चिंता उत्पन्न होत असते.  उदाहरणार्थ एखाद्या इनाम लावून होत असलेल्या दोन मल्लांच्या कुस्तीचा प्रसंग व हॅम्लेटनाटकांतील द्वंद्वयुद्धाचा देखावा पहात असतां प्रेक्षकांची चित्तवृत्ति अगदीं भिन्न असते.  एक खरा लौकिकाचा व द्रव्यलाभाचा प्रश्न आहे व दुसरा केवळ नाटकी प्रकार आहे.  हा भेद प्रेक्षक जाणत असतो व त्यामुळें दोहोंतील सुखदुःखानुभवांत फरक पडतो.  दुसरें असें कीं, शारीरिक खेळांत अंतिम साध्य हें निश्चित व उपयुक्त असतें.  शिवाय शरीरसामर्थ्यवाढीचा प्रत्यक्ष व्यावहारिक उपयोग असतो.  तथापि सँडोप्रमाणें किंवा प्राचीन रोमन लोकांमप्रमाणें पीळदार, सुंदर शरीर बनविणें एवढाच हेतु असल्यास त्या कलेला ललितकला म्हणावें असा कांहींचा आग्रह आहे.

शिलरच्या मीमांसेवरील उपरिनिर्दिष्ट आक्षेप सोडून दिले तरी इंद्रियवासना व विवेकबुद्धि यामधील विरोधाचें कँटचें तत्वहि अलीकडे पुष्कळांना पटत नाहीसें झालें असल्यामुळें शिलरच्या उपपत्तीचा पायाच ढांसळूं लागला आहे.  मानवी प्राण्यांत लीलप्रवृत्ति असते असें कबूल केलें तरी तिच्यापासूनच सर्व ललितकलांचा उगम झाला आहे हें मत अलीकडील ऐतिहासिक व मानुष्यक शास्त्रीय शोधांमुळें आग्रह्य ठरत चाललें आहे.  त्या पुराव्यावरून ललितकलोत्पत्तीचीं कारणें अनेक आहेत व त्यांपैकीं लीलाप्रवृत्ति हें एक आहे व दुसरें अनुकरणप्रवृत्ति हें आहे असें ठरत आहे.  या दोन प्रवृत्ती मनुष्यांत व इतर प्राण्यांत मूळारंभापासून असून त्या स्वसंरक्षणाला उपयुक्त व आवश्यक अशा आहेत (प्रो. कार्लग्रूस याचे शोध या बाबतींत निर्णयात्मक आहेत).  मानवांतील तिसरी उपजत प्रवृत्ति म्हणजे घडलेल्या गोष्टींची स्मृति शब्दद्वारें किंवा इतर हस्तक्रियाद्वारें चिरकाल जागृत ठेवण्याची इच्छा होय.  अनुकरणप्रवृत्ति व स्मारकेच्छा या दोहोंचा संबंध निकट असून ललितकलांचा मूळ उगम स्मारकेच्छेंत असून अनुकरणप्रवृत्ति हें केवळ साधन आहे असें म्हटलें तरी चालेल.  तात्पर्य, लीला, नक्कल व स्मृति या तीन प्रवृत्तींपासून सर्व ललितकलांची उत्पत्ति असून या तिन्ही मूळ उपयुक्ततापोषकच आहेत.  उदाहरणार्थ प्राचीन काळांतील रानटी मनुष्याचें शरीरविभूषण हें स्त्रीजातीला आकर्षिण्याकरतां, गुहेवरील पशुपक्ष्यांचें चित्रलेखन माहिती पुरविण्याकरतां किंवा मूर्ती, देवालयें इत्यादि शिल्पकाम मृत पितरांचें स्मारक करण्याकरितां असे.  वरील व्यवसायांनां विक्षित उन्नतिपथ आक्रमिल्यानंतर ललितकलांचें स्वरूप येत असतें.  तें स्वरूप येण्यापूर्वी मानवांतील आणखी एक प्रवृत्ति कार्यकारी व्हावी लागते.  ती प्रवृत्ति भावनाप्रदर्शनाची होय.  या प्रवृत्तीचा जोर आहारनिद्रादि प्रवृत्तींच्या खालोखाल आहे.  त्या योगानें मनांतील विकार नाचून, ओरडून व टाळ्या वाजवून व्यक्त करण्यास मनुष्य प्रवृत्त होत असतो.  याप्रमाणें हृदयांत उद्‍भवलेली प्रबल भावना तालसुरावर नाचून, गाऊन व्यक्त करण्यास मानव समर्थ झाला कीं तो रानटी अवस्थेंतून निघून नर्तक, गायक इत्यादि कलावंतांच्या उन्नत वर्गांत मोडूं लागतो.  तसेंच विविध प्रकारच्या रंगीत आकृती काढणारा चित्रकार म्हणून गणला जाऊं लागतो.

वरील विवेचनावरून हें दिसून येईल कीं, उपयुक्ततेची दृष्टि बाजूला ठेऊन केवळ मनोरंजनाखातर कित्येक गोष्टी करण्याची मनुष्याची उन्नतावस्थेंतील मूळ प्रवृत्ति स्नायु, नेत्र, कर्ण, मेंदु इत्यादि इंद्रियांच्या स्वाभाविक व्यापारांपासून परिणत झालेली आहे.  हृदयांतील भावना इंद्रियव्यापारांच्या द्वारें व्यक्त करून त्यांपासून आनंदानुभव घेण्याइतकी मानव जातीची प्रगति झाली कीं, ललितकलांनां आरंभ होतो.  येणेंप्रमाणें मानुष्यकशास्त्रीय शोधांवरून लागत असलेली ललितकलांची उपपत्ति इतर कोणत्याहि उपपत्तीपेक्षां अधिक ग्राह्य होण्यासारखी असल्यामुळें तद्‍नुसार 'ललितकला' या शब्दाची व्याख्या अधिक विस्तृत करून दिली पाहिजे, ती पुढें दिल्याप्रमाणें :-

ललितकला म्हणजे भावना व्यक्त व उद्दीपित करण्याकरतां स्वतंत्रपणें व विचारपूर्वक, तालबद्ध गति किंवा ध्वनी किंवा नियमबद्ध आकृती काढण्याचे नियम पाळून केलेली, आणि प्रत्यक्ष उपयोगाची दृष्टि न ठेवतां केवळ चिरकालिक व निरपेक्ष आनंद पुष्कळांना प्राप्‍त करून देण्याकरितां अधिकाधिक उत्तम केलेली मनुष्याची प्रत्येक कृति होय.

कला आणि :  मानसशास्त्र याविषयीं वरील विचार म्हणजे याविषयांवरचा शेवटचा शब्द नव्हे.  दिलेलें विवेचन आमच्या मतें याविषयांवर अत्यंत अव्यवस्थित व अनमान धपक्याचें आणि अशास्त्रीय आहे.  तथापि तें दिलें याचें कारण मोठमोठीं विचारी माणसें या विषयावर विचार करून कोणत्या मर्यादेप्रत पोंचलीं हें या विवेचनावरून बोधलें जाईल.  ज्याप्रमाणें मनोधर्मांचें सूक्ष्म पृथक्करण करून भारतीय आचार्यांनीं केलेलें साहित्य शास्त्रामागें आहे त्याप्रमाणेंच सौंदर्यशास्त्राचें आणि कला विषयत्वाचें पृथक्करण करून जेव्हां नियम उत्पन्न होईल तेव्हां कलाविवेचन शास्त्रीय मार्गास लागलें असें आम्हांस वाटेल.  कलाशास्त्राचा विकास करणें हें भावी जगाचें काम आहे.  याचा आजपर्यंतचा विचार अत्यंत अपूर्ण आहे.  त्याच्या केवल दिग्दर्शनापलीकडे आम्हांस जास्त जातां येत नाहीं.

(संदर्भग्रंथ -   कलेंतील वास्तुशिल्प, संगीत यांसारख्या पोटविषयावरील संदर्भग्रंथ त्या त्या लेखांत सांपडतील.  कांहीं सामान्य ग्रंथ पुढीलप्रमाणें :-  बुचर - आरिस्टॉटल्स थिअरी ऑफ पोएट्री ऍंड फाईन आर्टस्. ब्राऊन-फाईन आर्ट्स.  क्ले - दि ऑरिजिन ऑफ दि सेन्स ऑफ ब्यूटी.  रीनाच दि स्टोरी ऑफ आर्ट थ्रू दि एजेस.  बाल्फोर-दि एव्होल्यूशन ऑफ डेकोरेटिव्ह आर्ट.  हाडॉन-एव्होल्यूशन इन् आर्ट.  ए.रि.ए. मधील 'आर्ट' हा लेख).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .