विभाग दहावा : क ते काव्य

कलमेश्वर - मध्यप्रांत.  नागपूर जिल्हा व तहशिलींतील एक ५७५ लोकसंख्येचें (इ.स. १९११) गांव.  उत्तर अक्षांश २१ १४' व पूर्वरेखांश ७८ २६'.  हें गांव अहीर लोकांनीं वसविलें असा समज आहे व कलम हें त्यांच्या देवांचें नांव आहे.  बख्त बुलंदच्यावेळीं आलेल्या एका हिंदू घराण्यानें येथें एक किल्ला बांधलेला आहे.  इ.स. १८६७ सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली.  इ.स. १९०३-४ सालीं तिचें ५००० रुपये उत्पन्न होतें.  यास कळमश्वेर असेंहि म्हणतात.

ज्यावेळीं अकबरखान हा पुण्यास आला होता त्यावेळीं जयसिंग राण्याबरोबर त्यानें एक लहानसें सैन्य दिलें.  त्यानें पारसेनी येथें गोंडाचा पराभव करून कलमेश्वर हें आपलें मुख्य ठिकाण केलें.  त्याच्या वंशजांनीं देशमुख या नांवाखालीं बरेच दिवस राज्य केलें आणि हल्लीं काटोल कलमेश्वराचे देशमूख आपणांस रजपूतवंशीय म्हणवितात.