प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कर्णाटक (कर्नाटक) व्युत्पत्ति -  दक्षिणहिंदुस्थानांतील देश.  मनुस्मृतींत (१०.२२)  म्हटलें आहे कीं, ''झल्लो मल्लश्च राजन्यान् व्रात्यान् निच्छिविरेव च ।  नटश्च करणश्चैव खसो द्रविड एव च ॥''  यावर कुल्लुकाची व्याख्या ''क्षत्रियाद् व्रात्यात् सवर्णायां झल्ल ..... नटकरण .... द्रविडाख्या जायन्ते ।  एतानि अपि एकस्य एव नामानि ॥  सारांश व्रात्य क्षत्रियांपासून सवर्ण स्त्रीचे ठायीं जी प्रजा हाते तिला देशपरत्वें झल्ल, मल्ल, निच्छिवि, नट, करण, खस, द्रविड अशीं नांवें आहेत.  हीं एकाच संकर जातीचीं निरनिराळीं नांवें आहेत.  ज्या प्रदेशांत हे व्रात्य क्षत्रिय रहावयास गेले त्या प्रदेशांनां त्यांची नांवें मिळालीं.  करण व नट हे जेथें रहात तो करणनट - करणणट - कर्णाटक.  यास कन्नड असेंहि दुसरें नांव आहे.  तें करणणट करनणट - कन्नड असें साधतें.  असें रा. वि. का. राजवाडे म्हणतात.  (भा. इ. सं. मं. अहवाल १८३२)  ह्या देशाला कानडा, कर्नाट किंवा कर्नाटकदेश हींहि दुसरीं नांवें आहेत.

इतिहास -  या देशांत वेगवेगळ्या वंशांचे राजे होऊन गेले.  आंध्र किंवा सातवाहन, कदम्ब, पल्लव, गंग, चालुक्य, राष्ट्रकूट, चोल, होयसल, व विजयानगरचे राजे, ह्या वंशांनीं येथें वेगवेगळ्या वेळीं पूर्णत्वानें किंवा अंशत्वानें राज्य केलें. विजयानगरचे राजे १३३६ पासून येथें राज्य करूं लागले व त्यांनीं तुंगभद्रा नदीच्या खालचा सर्व प्रदेश जिंकिला.  परंतु १५६५ सालीं मुसुलमानांनीं त्यांचा पुरा मोड केला तेव्हां ते पेनुकोंड्याहून चंद्रगिरी येथें गेले व कांहीं अनगुंडी येथें राहिले.  जेव्हां मुसुलमान राजांनीं विजयानगरच्या वंशास हांकून लावून आपली सत्ता स्थापिली तेव्हां कर्नाटकचे, कर्नाटक, हैदराबाद किंवा गोवळकोंडा व कर्नाटक विजापूर असे दोन भाग केले.  ह्यावेळीं विल्कस साहेब म्हणतात 'तुंगभद्रा नदी ही कर्नाटकची उत्तरसीमा होती.'

सध्यां कारोमांडल किनार्‍यावरच्या घांटाखालच्या प्रदेशास कर्नाटक अशी संज्ञा आहे.  इंग्लिश व फ्रेंच ह्या लोकंमध्यें १८ व्या शतकांत जीं स्वसत्तास्थापनार्थ भांडणें व लढाया झाल्या त्या याच देशांत होत.  बेळगांव, धारवाड, विजापूर हे जिल्हे व उत्तर कानड्याचा भाग ह्या प्रदेशास कर्नाटक ही संज्ञा आहे.

स्थूल मानानें पाहिलें तर पूर्वेस ज्या ठिकाणीं कृष्णानदी पूर्व घाटांतून बाहेर पडते त्या जागेपासून उत्तरेस मांजेरानदीपावेतों एक रेषा काढून या दुसर्‍या बिंदूपासून गोंव्यापावेतों पुन्हां दुसरी रेषा काढली असतां त्यांच्या दक्षिणेकडील पूर्व व पश्चिम घाटांमधील जो दक्षिण हिंदुस्थानाचा भाग तो प्राचीन काळीं कर्नाटक या नांवाखालीं मोडला जात होता.  सतराव्या शतकाच्या अखेरीस मोंगलांनीं दक्षिण हिंदुस्थानांत स्वारी करून विजापूर व गोवळकोंडा हीं राज्यें खालसा केलीं तेव्हां ते या भागाबरोबर उत्तरेस गंतूरपासून दक्षिणेस कावेरी नदीपावेतों पूर्वघाट व समुद्रकिनारा यांच्यामधील जो द्रविड देशाचा भाग त्यासहि विशेष भेदाभेद न बाळगतां कर्नाटक हेंच नांव देऊं लागले.  या वेळेपासून पठारावरील, म्हणजे वास्तविक कर्नाटकास 'कर्नाटक बालेघांट' व द्रविडांतील कर्नाटकास 'कर्नाटक पैनघांट' अशीं नांवें प्रचारांत आलीं.

चोलदेश -  प्रस्तुतच्या कर्नाटकाचा पूर्वी चोलदेशामध्यें समावेश होत असे.  चोलमंडलम् असेंहि दुसरें नांव त्या प्रांतास असे.  या प्रांताचें हवापाणी उत्तम आहे.  या प्रांतावर फार प्राचीन कालापासून चोल राजे राज्य करीत होते.  यांचा खात्रीलायक असा इतिहास मुळींच उपलब्ध नाहीं.  अशोकाच्या शिलाशासनांत व रामायण, महाभारत या प्राचीन ग्रंथांतहि चोलांचा उल्लेख येतो.  पाणिनी हें नांव उल्लेखीत नाहीं, कात्यायन मात्र उल्लेखितो.  पेरिप्लुस व टालेमी यांचीहि साक्ष या कामीं मिळते.  इ.स. २१४-९०८ पर्यंत या प्रांतावर चोलांचें स्वतंत्र राज्य होतें अशी माहिती मिळते.  परंतु त्यांचा खरा इतिहास (इ.स. ९८५) राजराज चोलाच्या कारकीर्दीपर्यंत उपलब्ध नाहीं. ''स्थलपुराणा'' वरून चोल हे प्राचीन होत एवढेंच समजतें.  त्यांची पहिली राजधानी (२ रें शतक) त्रिचनापल्लीजवळील कावेरीकांठचें उरईयुर होय.  सातव्या शतकांत मल्लीकुरम् व १०।११ व्या शतकांत तंजावउर या राजधान्या होत्या.  कर्नाटक प्रांताला मालकूट असेंहि एक नांव असे.  चोल राजांचें ध्वजचित्र वाघाचें असून तें त्यांनीं कांचीच्या पल्लव राजांच्या ध्वरावरून घेतल्याचें समजतें.  ह्युएनत्संग याचें चोलमंडल हा फार लहान प्रदेश होता.  पल्लवांचे राज्य असतांना चोलमंडलाला यात्रेकरू लोक द्रविड देश असें म्हणत.  चोल राजे शिवोपासक होते.  प्राचीन चोलराजे दर्यावर्दीहि होते.  मलायापर्यंत त्यांची जहाजें व्यापारास जात.

चोलराजे - पहिला ऐतिहासिक राजा करिकाल यानें उदईयुर सोडून कावेरीपट्टन ही राजधानी करून कावेरी नदीस मोठमोठे बंधारे घातले.  यानें पुष्कळ वर्षे राज्य केलें; पांडय व चेर यांच्याशीं लढाया मारल्या.  याचा काल इ.स. चें दुसरें शतक होय.  याचा नातु नेदुमुदी किल्ली हा याच्यानंतर राजा झाला.  हा दुर्बळ होता.  यापुढें २।३ शतकें चोलांची सत्ता नाममात्र होती.  यावेळीं पल्लव चेर वगैरे इतर राजवंश प्रबळ झाले.  सातव्या शतकापर्यंत चोलांचें मुळींच नांव ऐकुं येत नाहीं.  पल्लवांनां (इ.स. ७४०) चालुक्यांनीं निर्जीव केल्यानें पुन्हां चोलांनीं उचल केली.  चालुक्यांच्या सैन्याला ''कर्नाटकाचें अमर्यादित सैन्य'' म्हटलें आहे (सामानगड-ताम्रपट) नवव्या शतकांत विजयालय चोलाचें नांव ऐकू येतें.  यानें ३० वर्षे राज्य केलें.  याचा पुत्र आदित्य (इ.स. ८८०-९०७) यानें अपराजित पल्लवास जिंकून त्यांचा नाश केला.  परांतक (इ.स. ९०८-४९) यानें पल्लवांनां नामशेष करून पांड्यांनां (त्यांच्या मदुरा राजधानीसह) जिंकून लंकेवर स्वारी केली.  यानें आपल्या राज्यांत सर्वत्र ग्रामपंचायती स्थापन करून प्रजेला फार सुख दिलें.  याचा पुत्र राजादित्य.  याच्यावर राष्ट्रकूट कृष्ण (तिसरा) यानें स्वारी केली, तींत तो मेला.  याच्या मागून तीन अल्पजीवि राजे गादीवर आले.  शेवटी (९८५) राजराजदेव हा राजा आला.  हा फार शूर होता.  यानें २८ वर्षे राज्य केलें.  प्रथम चेरांचें आरमार जिंकून त्यांनां मांडलिक बनविलें.  नंतर कूर्ग, पांडय, पल्लव, कोलम, कलिंग, सीलोन हे देश जिंकले.  १००६ मध्यें त्यानें मुलुखगिरी बंद केली.  त्यानें आपल्या आरमारानें लखदिव व मालदिव बेटें घेतलीं होतीं.  याची राजधानी तंजावुर (तंजावर) येथें यानें बांधलेल्या देवळांत याच्या इतिहासाचा एक शिलालेख आहे.  हा स्वतः शैव होता तरी पण बौद्ध वगैरे इतर धर्मांनां साहाय्य करीत असे याचा पुत्र राजेंद्र गंगाईकोंडा हा बापापेक्षा शूर होता.  यानें अंदमान, निकोबार व पेगु (ब्रह्मदेश) हे प्रांत काबीज केले (१०२५-२७) व बंगाल बहारच्या महिपालावर स्वार्‍या केल्या.  यानें गंगाई कोंडाचोलपुर राजधानी वसविली व आठ कोस विस्ताराचें एक मोठें तळें बांधलें.  ३० फूट उंची असलेल्या पिंडीच्या महादेवाचें उत्तम कलाकुसरीचें देऊळहि बांधलें.  याचा मुलगा राजाधिराज हा १०३५ त गादीवर आला.  याची व चालुक्यांची लढाई १०५२ त होऊन दोघांची राज्यमर्यादा तुंगभद्रा नदी ठरली.  या लढाईंत हा मेला.  याच्या मागून याचा भाऊ राजेंद्र परकेसरीवर्मा गादीवर आला.  याच्या मागून तीन नामधारी राजे झाले.  हे सर्व शेजारच्या राजांशीं भांडत असत.  चालुक्यांच्या यादवीचा फायदा घेऊन वीरराजेंद्र चोलानें सोमेश्वर (दुसरा) चालुक्यास आपली मुलगी देऊन साहाय्य केलें.  वीर राजेंद्र (१०७०) मेल्यावर त्याचा मुलगा अधिराजेंद्र हा आपल्या मेव्हण्याच्या मदतीनें गादीवर आला.  परंतु तो प्रजेस नावडता होऊन त्याचा (इ.स. १०७४) खून झाला.  येथें चोलांची औरस वंशपरंपरा खुंटली.  याला पुत्र नव्हता म्हणून भाऊबंदांपैकीं राजेंद्र हा गादीवर आला.  याचा कुलोत्तुंगहि म्हणत.  ह्याची आई गंगाई कोंडा चोलाची मुलगी होतीः व बाप वेंगीकर चालुक्य होता.  म्हणजे हा चोलांच्या मुलीचा वंश होता; अर्थात यानें चालुक्य-चोल वंश सुरू केला.  हा फार शूर व मुत्सद्दी असून यानें ४९ वर्षे राज्य केलें.  कलिंग, गंग, हे राजे त्यानें जिंकले.  त्यानें जमीनीची धारापद्धति उत्तम प्रकारें बसविली (१०८६).  याचा मुलगा विक्रम यानेंहि राज्य वाढविलें.  याच्यानंतरचे तीन राजे नाममात्र होते.  शेवटचा नांवाजण्यासारखा राजा कुलोत्तुंग (तिसरा) हा होय.  हा १२८७ त गादीवर आला.  यानें ४० वर्षे राज्य केलें.  याच्यामागून चोलांचें नांव ऐकूं येत नाहीं.  नंतर पांडय पुढें आले व पुढं मलिक काफरनें हिंदूंचा पराभव केला. (१३१०).

पुढें वारंगळ, विजयानगर व द्वारसमुद्र येथील हिंदु राजांनीं एकत्र होऊन मुसुलमानांनां हाकलून लाविलें (१३४४).  नंतर विजयानगरचें साम्राज्य कर्नाटकावर झालें.  तेथील सम्राटातर्फे नायक राजे तंजावरवर राज्य करीत होते.  त्यांची वंशावळ अशी :-  (१) शिवाप्पा (१५४९-७२), (२) अच्युतप्पा (१५७३-१६१४), (३) रघुनाथ (१६१४-६०) (४) विजयराघव (१६६०-७३) या राजांनीं इमारती, कालवे, देवळें वगैरे बांधिलीं; विद्येला उत्तेजन दिलें; ग्रंथसंग्रह केला.  विजयराघवाचें राज्य चोलनाथ नायक यानें घेतलें.  तेव्हां त्याच्या मुलानें (चेगमलनें) व्यंकोजीराजे भोंसले यांच्या सहाय्यानें आपलें राज्य परत मिळविलें.  परंतु पुढें तो नामधारी राहून भोंसले हेच तंजावरचे राजे झाले; ते १९ व्या शतकापर्यंत होतेच (तंजावर पहा).  

शिवाजी महाराजांनीं कर्नाटक बहुतेक पादाक्रांत केलें होतेंच.  इ.स. १७५६ त कर्नाटकांत पर्जन्य फार पडून खराबी झाली होती.  असें असतांहि पेशव्यांनीं फत्तेसिंग भोसले व रघूजी भोसले यांनां पाठवून सिरटी व कोपल परगणे काबीज केले (रा. खं. १. १०१).  पुढें विसाजीपंत बिनीवाले यांना (१७६० मार्च) कर्नाटकांत फौजेसह रवाना केलें होतें.  (कित्ता २७०).  स. १७५२ मध्यें पेशवे कर्नाटकामध्यें गेले होते.  त्या स्वारींत ''नफा किमपि न झाला.  ते प्रांतीचे नबाब वगैरे सर्व संस्थानिक निरंतर चाहातात कीं आमचा (पेशव्यांचा) जबरदस्त पाय कर्नाटकांत न पडावा.'' त्यावेळीं त्यांची फौज थोडी होती.  त्यामुळें ''पैका कसा उगवतो ?'' याप्रमाणें श्री. नानासाहेब पेशवे म्हणत होते (रा. खं. ६.३४७).  बाबूजी नाइकास कर्नाटकाचा सुभा देण्याची मसलत यावेळीं चालू होती (कित्ता ३६५).  राजारामाच्या वेळीं आबाजी सोनदेव हे कर्नाटकांत मोंगलाशीं लढत होते (रा. खं. ८.५१). स. १७७१ मध्यें त्रिंबकराव मामा कर्नाटकावर स्वारीस गेले होते.  (रा. खं. १०.४०)  इ.स. १७७३ व १७७४ मध्यें कर्नाटकांत माधवराव नीळकंठ पुरंदरे हे दोन हजार स्वारांनिशीं बंदोबस्तास होते (कित्ता ८०).  इ. १७७८ त हरिपंत फडके कर्नाटकांत स्वारीस गेले (कित्ता १३५).  स. १७८० त हैदर व पेशवे यांच्या कटकटी कर्नाटकांत होत होत्या (कित्ता १८४).  स. १७८६ त टिपूवर हरिपंत फडक्यांनीं जाऊन राजेंद्रगड घेतला (कित्ता ३३०).

कनार्टक (अर्काट) चे नबाब :-  औरंगजेबानें राजारामावर स्वारी केली, तेव्हां महाराज जिंजीस गेले.  त्यांच्यावर त्यानें सैन्य धाडून प्रथम कर्नाटक प्रांत हस्तगत केला.  औरंगाबाद हा मुख्य सुभा होता.  त्याच्या खालीं कर्नाटकाचा एक स्वतंत्र छोटा सुभा केला.  त्याची अर्काट ही राजधानी होती.  त्यामुळें तेथील सुभेदारास अर्काटचे नबाब असें नांव पडलें.  अर्काटचा पहिला नबाब झुलफिकारखान हा होय.  दक्षिणेची मोहीम चालू असतांना त्याची इ.स. १६८७ मध्यें रवानगी झाली; व १६९२ सालीं त्यास कर्नाटकचा नबाब करून दक्षिणच्या सुभेदाराच्या हाताखालीं नेमण्यांत आलें.  याच्याकडे कर्नाटकचा कारभार १७०३ पर्यंत होता.  यानंतर दाऊदखान पन्नी नामक सरदाराची कर्नाटकच्या कारभारावर नेमणूक झाली.  दाऊदखान हा खिजरखानाचा पुत्र असून त्यानें १७०८ पर्यंत कर्नाटकचा कारभार केला.  यानंतर तो दिल्लीचा मुख्य सेनापति नेमला जाऊंन त्याच्या जागीं सादतउल्लाखान हा कर्नाटकचा नबाब होऊन आला.

यापूर्वी कर्नाटकची नबाबी कोणत्याहि एका घराण्याकडे चालत आली नव्हती.  परंतु यापुढें दिल्लीच्या कारभारांतील बखेड्यामुळें कनार्टकसारख्या दूरच्या प्रांतावर नियंत्रण ठेवणें कठिण होऊन तेथील नबाबांस आपली सत्ता वंशपरंपरागत करून घेण्यास सवड मिळाली.  सादतउल्लाखानास व त्याच्या वंशजांस त्यांच्या वंशनामावरून नेवायेतेह नबाब असें नांव पडलें असून या नेवायेतेह लोकांची आठव्या शतकांतच अरबस्थानांतून हकालपट्टी होऊन ते हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्‍यावर येऊन राहिले होते असें म्हणतात.

सादतउल्ला खान -  सादतउल्लाखान हा अगीत्ती महंमदखान नामक इसमाचा मुलगा असून यास महमद सय्यद असेंहि म्हणत.  यानें आपला भाऊ गुलाम अल्लीखान याला वेलोरचा जहागीरदार केलें; हा स्वतः निपुत्रिक होता म्हणून यानें आपल्या भावाचे पुत्र दोस्तअल्ली, बाकरअल्ली, सादतअल्ली व अकबर महम्मद यांस दत्तक घेऊन त्यांपैकीं पहिल्यास त्यानें आपला वारस केलें, दुसर्‍यास वेलोरचा कारभार सांगितला व आपल्या भावाची खासगी संपत्ति या चारहि जणांस सारखी वांटून दिली.

दोस्तअल्ली -  सादतउल्लाखानाच्या मृत्यूनंतर (इ.स. १७३२) दोस्तअल्ली हा कर्नाटकचा नबाब होऊन सादतअल्लाखान खानाच्या बायकोचा भाचा गुलाम हुसेन हा त्याचा कारभारी झाला.  दोस्तअल्लीच्या कारकीर्दीत त्रिचनापल्ली कर्नाटकच्या राज्यास जोडली.  या गोष्टीचा सूड घेण्याकरितां तेथील नायकांनीं मराठ्यांची मदत मागितल्यावरून इ.स. १७४० मध्यें मराठ्यांनीं कनार्टकांत स्वारी करून पावसाळ्यापूर्वी चंद्रगिरी तालुक्यांत दामलच्या रुवु घाटांत दोस्तअल्लीवर हल्ला केला, व त्याचा पराभव करून त्यास ठार मारलें व तो व त्याचा दिवाण मीर आसद यांस कैद केलें.

सफदरअल्ली -  वरील लढाईनंतर दोस्त अल्लीचा पुत्र व वारस सफदर अल्ली हा वेलोरला पळाला व त्याचा जावई चंदासाहेब हा त्रिचनापल्लीस जाऊस वेढ्यासाठीं किल्ल्यांत धान्यसामुग्रीची बेगमी करून बसला.  इकडे मराठे ठिकठिकाणाहून खंडण्या वसूल करीत हिंडू लागले.  सफदरअल्ली यास धाक पडून त्यानें मराठ्यांस खंडणी देऊन त्यांस स्वदेशी परत लावलें.  तथापि मराठे परत फिरण्यापूर्वी सफदरअल्लीनें त्यांच्या या नवीन ओळखीचा आपल्या शत्रूचा पाडाव करण्याच्या कामीं उपयोग करून घेतला.  दोस्त अल्लीला सफदरअल्लीशिवाय आणखी तीन मुली असून यापैकीं एक दोस्तअल्लीचा भाऊ बाकिरअल्ली, याच्या गुलाम मुर्तझाअल्ली या पुत्रास व दुसरी वांदीवाशच्या तकी साहेबास व तिसरी चंदासाहेब नांवाच्या दूरच्या एका नातेवाइकास दिली होती.  परंतु सदरहू चंदासाहेब याची पहिल्या बायकोची मुलगी दोस्तअल्लीचा पहिला दिवाण गुलाम हुसेन यास दिली असल्यामुळें त्याचा नेवायेतेह नबाबाशीं दोस्तअल्लीकडून व त्याच्या बायकोकडून असा दुहेरी संबंध जडून तो प्रबळ झाला.  मराठ्यांच्या स्वारीच्या वेळीं त्रिचनापल्लीचा किल्ला या चंदासाहेबाच्याच ताब्यांत होता.  १७३६ सालीं त्रिचनापल्लीची गादी रिकामी पडली तेव्हां माजी नाइकाच्या विधवा पत्‍नीनें स्वतः राज्यकारभार पाहण्याचें ठरवून चंदासाहेबाची मदत मागितली असतां चंदासाहेबानें किल्ल्यांत प्रवेश होतांच राणीस अटकेंत ठेवून किल्ला स्वतःच पटकाविला होता.  चंदासाहेब हा प्रबळ असून शिवाय लोकप्रियहि असल्यामुळें सफदरअल्ली व दिवाण मीर आसद यांस त्याचा हेवा वाटूं लागला होता.  म्हणून सफदर अल्ली यांनें मराठ्यांशीं गुप्‍त तह करून त्यांनां चंदासाहेबाचा पाडाव करण्याविषयीं विनंति केली.  मराठ्यांचा त्रिचनापल्लीवर अगोदर पासूनच डोळा असल्यामुळें त्यांनीं ही गोष्ट ताबडतोब कबूल केली.  त्यांनीं स्वदेशीं परत जाण्याचें मीष करून आपलें सैन्य थोडेसें मागें नेलें.  मराठे गेले अशा समजुतीवर चंदासाहेबानें किल्ल्यांतील धान्यसामुग्रीची विल्हेवाट लावतांच पुढील वर्षी ते पूर्वसंकेतानुरूप पुन्हां कर्नाटकांत आले व त्यांनीं २६ मार्च १७४१ रोजीं त्रिचनापल्ली काबीज करून चंदासाहेबास कैद करून सातार्‍यास नेलें.  येणेंप्रमाणें सफदरअल्लीचा एक शत्रु नाहीसा झाला तरी त्यास आपली सत्ता फार दिवस उपभोगतां आली नाहीं.  वेलोरचा सुभा, त्याचा चुलतभाऊ व मेहुणा गुलाम मुर्तझाअल्ली, हा त्यास निराळाच शत्रु उद्‍भवून त्यानें त्याचा पुढच्या वर्षी वध केला.

घराण्याचा शेवट - मुर्तझा अल्लीनें थोडे दिवस राज्यकारभार केला.  पण त्याच्या दुष्कृत्यामुळें लोकांस इतका त्वेष आला होता कीं, त्यामुळें तो भिऊन वेलोरला पळून गेला.  तेव्हां सफदरअल्लीचा पुत्र महंमद सय्यद उर्फ सादत उल्लाखान अर्काटचा नबाब झाला.  पण तोहि इ.स. १७४४ सालीं अर्काट येथें मारला गेला.  महंमद सय्यदाशिवाय सफदरअल्लीस आणखी एक मुलगा होता.  वास्तविक कर्नाटकचे नवाब हे दक्षिणच्या सुभेदाराचे अंकित असतां तेथें वाटेल तो उठतो व आपली परवानगी न घेतां नबाब होतो हें पाहून दक्षिणचा सुभेदार निजामअल्ली यास चीड आली होती.  त्यानें इ.स. १७४३ सालीं कर्नाटकांत स्वारी करून तेथील अल्पवयी नबाबाच्या वतीनें कारभार पहाण्यासाठीं महंमद अनवरुद्दीन याची नेमणूक केली.  पण या बालनबाबाचा पुढें लवकरच खून होऊन अनवरुद्दीन हा स्वतंत्रपणें कर्नाटकचा कारभार करूं लागला.

अनवरुद्दीन -  कर्नाटकांत अर्काटचे नबाब ही पदवी आज ज्या घराण्यांत चालत आहे त्या घराण्याचा मूळ पुरुष हा महंमद अनवरुद्दीनच होय.  याच्या कारकीर्दीत झालेल्या एका लढाईंत यूरोपीय लहानशा कवायती सैन्यापुढें जुन्या तर्‍हेच्या कवाईत व शिकलेल्या प्रचंड हिंदी सैन्याचें कांहीं चालत नाहीं असें निदर्शनास येऊन यूरोपीय लोकांस हिंदी राजकारणांत हात घालण्यास उत्तेजन मिळालें.  इ.स. १७४६ मध्यें फ्रेंचांनीं इंग्रजांपासून मद्रास काबीज करून तें तुमच्या स्वाधीन करतों अशा थापांनीं अनवरुद्दिनांची संमति मिळवून आपल्याच ताब्यांत ठेविलें.  तेव्हां फ्रेंचांपासून ती जाबा काबीज करण्यासाठीं अनवरुद्दीनानें आपल्या थोरल्या पुत्राच्या हाताखालीं एक मोठें सेन्य रवाना केलें.  या सैन्याची मद्रासजवळ मैलापूर येथें फ्रेंचांच्या एका लहान सैन्याशीं लढाई होऊन तींत तें नामोहरण होऊन परत फिरलें.  यानंतर अनवरुद्दीन यास माजी नबाब घराण्यांतील वारस चंदासाहेब याच्याशीं तोंड देण्याची पाळी आली.  सात वर्षे मराठ्याच्या कैदेंत काढल्यावर इ.स. १७४८ सालीं फ्रेंचांनीं याच्या प्रीत्यर्थ दंड भरल्यामुळें चंदासाहेबाची सुटका झाली, व तो मुजफरजंग व फ्रेंच यांची कुमक मिळवून १७४९ मध्यें अनवरुद्दिनावर चाल करून आला.  अनवरुद्दीन व चंदासाहेब यांची अंबूर येथें लढाई होऊन तींत अनवरुद्दीन पराभूत होऊन मारला गेला.

महंमद अल्ली व चंदा साहेब -  अनवरुद्दीनाच्या मागून कर्नाटकच्या नबाबाच्या जागेवर दोन पुरुष आपला हक्क सांगूं लागले.  एक अनवरुद्दीन याचा दासीपुत्र महंमदअल्ली व दुसरा चंदासाहेब.  अनवरुद्दीन यास माफुजखान म्हणून महंमदअल्लीहून एक वडील मुलगा होता.  पण अंबूरच्या लढाईंत तो कैद होऊन शत्रूच्या हातीं पडला.  पुढें जरी त्याची लवकरच सुटका झालीं तरी तो महंमदअल्लीविरुद्ध कधींच गेला नाहीं.  (यास मदुरेच्या सुभ्याचें काम सांगण्यांत आलें होतें).  अनवरुद्दीन या मरणानंतर महंमदअल्लीनें त्रिचनापल्लीच्या किल्ल्याचा आश्रय घेतला.  त्याचा पक्ष इंग्रजांनीं घेतला असून त्याचा प्रतिस्पर्धी जो चंदासाहेब त्याची बाजू फ्रेंचांनीं उचलून धरली होती.  चंदासाहेबानें फ्रेंचांच्या मदतीनें त्रिचनापल्लीखेरीज सर्व कर्नाटक प्रांताचा ताबा मिळविला.

इंग्रज फ्रेंचांची स्पर्धा -  येणेंप्रमाणें अर्काटच्या नबाबाच्या जागेवरील दोन हक्कदार महंमदअल्ली व चंदासाहेब यांच्यामधील भांडण हें वस्तुतः इंग्रज व फ्रेंच यांच्यामधील भांडण होऊन बसलें.  वस्तुतः १७४९ मध्यें यूरोपमध्यें एक्सलाचापेल येथें इंग्रज व फ्रेंच यांच्या दरम्यान तह होऊन त्याच्या एका कलमाअन्वयें फ्रेंचांनीं घेतलेलें मद्रास इंग्रजांस परतहि करण्यांत आलें होतें.  तथापि हिंदुस्थानांतील इंग्लिश व फ्रेंच कंपन्यांनीं आपल्या सरकारच्या संमतीवांचूनहि हिंदुस्थानांत भांडण चालू ठेविलें.  इ.स. १७५० मध्यें नासिरजंग मारला गेल्यावर त्याच्या जागीं डुप्लीनें मुजफरजंग यास हैदर बादच्या गादीवर बसवून मुजफरजंगाकडून कृष्णेपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व दक्षिण हिंदुस्थानाचें नामधारी आधिपत्य संपादन केलें.  मुजफरजंग हा याच्या पुढील सालींच मारला गेला.  तथापि त्याच्या मागून आसफजाचा तृतीय पुत्र सलाबतजंग यासहि फ्रेंचांनींच मदत करून गादीवर बसविल्यामुळें दक्षिणेंतील राजकारणांत त्यांचें वर्चस्व स्थापन झालें.  इकडे महंमदअल्लीचा समूळ पाडाव झाला तर आपल्या हातचें एक बाहुलें नष्ट होऊन कर्नाटकच्या राजाकारणांत हात घालण्यास आपणास सवड राहणार नाहीं अशा समजुतीनें इंग्रजांनीं हरप्रयत्‍न करून त्रिचनापल्ली तेवढी हातची जाऊं दिली नाहीं.

अर्काटचा वेढा :-  इतक्यांत क्लाइव्हनें चंदासाहेबाची राजधानी जें अर्काट शहर त्यावर हल्ला करून त्रिचनापल्लीचा बचाव करण्याची धाडशी मसलत पुढें मांडली.  त्यानें फोर्ट सेंट डेव्हिडमध्यें १०० व मद्रासमध्यें ५० हून कमी लोक ठेवून बाकीचें सर्व सैन्य म्हणजे २०० सोल्जर व ३०० शिपाई घेऊन अर्काटवर चाल केली.  अर्काटचा किल्ला गोळीबार न करतां इंग्रजांच्या कबज्यांत आला.  पण हा किल्ला इतका मोडकळीस आलेला होता कीं प्रथम दर्शनीं तो लढविणें अशक्यच वाटलें.  तथापि क्लाइव्हनें व त्याच्या माणसांनीं मोठ्या झपाट्यानें कामचलाऊ तटबंदी उभी करून शत्रूस आश्चर्यचकित करून सोडलें.  अर्काट काबीज करण्याचा परिणाम क्लाइव्हच्या अपेक्षेप्रमाणें झाला.  शत्रूचें बरेंचसें सैन्य त्रिचनापल्लीचा वेढा सोडून अर्काटला आलें, व त्यानें ५३ दिवसपर्यंत (१७५१, सप्टें. २३-१४ नोव्हें.) एकसारखा अर्काटच्या किल्ल्यावर तोफांचा भडिमार चालू ठेविला, व हल्ला चढवून किल्ला काबीज करण्याचा प्रयत्‍न करून पाहिला.  पण त्यांत अपयश येऊन बरीच हानि झाल्यामुळें चंदासाहेबाचें सैन्य निराश होऊन वेढा उठवून चालतें झालें.  यानंतर लवकरच इंग्रजांस व त्यांच्या दोस्तांस अर्काटच्या पुर्वेस कावेरीपाक येथें वक इतर ठिकाणीं आणखी विजय मिळाले.  तेव्हां इ.स. १७५२ मध्यें फ्रेंचांनीं त्रिचनापल्लीचा नाद सोडून दिला.  इकडे चंदासाहेब हा तंजावरच्या राजास शरण गेला असतां महंमदअल्लीच्या चिथावणीवरून त्याचा तेथें वध करण्यांत आला.  येणेंप्रमाणें महमदअल्लीचा प्रतिस्पर्धी चंदासाहेब हा स्पर्धाक्षेत्रांतून नष्ट झाला, तरी इंग्रज व फ्रेंच यांच्यामधील लढा थांबला नाहीं.  वस्तुतः चंदासाहेब व महंमदअल्ली हे या लढ्यांत नाममात्रच होते.  खरा लढा त्या दोघांमधला नसून त्यांच्या नांवरवर चाललेल्या लढाया ही इंग्रज व फ्रेंच यांच्या दरम्यान हिंदुस्थानांत वर्चस्व स्थापण्याकरितां चाललेली स्पर्धा होती.  बुशीनें निजामाच्या दरबारीं आपलें चांगलें बस्तान बसविलें असून १७५३ मध्यें त्यानें निजामाकडून आपल्या सैन्याच्या खर्चासाठीं उत्तर सरकाराचा वसूल तोडून घेतला.  तथापि बुशीच्या या कृत्याचा डुप्लेला मधून मधून पैशाचा पुरवठा होण्यापलीकडे कांहीं उपयोग झाला नाहीं.  इ.स. १७५३ मध्यें बुशीचे आपले सर्व बेत फसले अशी पूर्ण खात्री झाली.  त्यानें एक बनावट बादशाही सनद पुढें करून आपली कर्नाटकच्या नबाबाच्या जागीं नेमणूक झाली असल्याचें मद्रासकर इंग्रजांनां भासविण्याचा प्रयत्‍न केला; पण त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं.  इंग्रज व फ्रेंच यांच्या दरम्यान यूरोपमध्यें या वेळीं सलोखा असल्यामुळें हिंदुस्थानांतील या भांडणांस त्यांच्या मायराष्ट्रांचा बिलकुल पाठिंबा नव्हता.  शेवटीं फ्रेंच सरकारनें डुप्लीस स्वदेशीं परत बोलावून हा लढा थांबविला.  पण लवकरच इ.स. १७५५ मध्यें (मे १७) सप्‍तवार्षिक युद्ध सुरू होऊन हिंदुस्थानांतील इंग्रज व फ्रेंच वसाहतकारांत राजरोसपणें झगडा सुरु झाला.  इ.स. १७५७ मध्यें अर्काट पुन्हां फ्रेंचांनीं घेतलें.  परंतु हिंदुस्थानांतून इंग्रजांस हांकून लावण्यासाठीं फ्रेंच सरकारनें रवाना केलेला सेनापति लाली हा १७५८ च्या एप्रिलपर्यंत पांदीचरी येथें दाखल झाला नाहीं.  तोंपर्यंत इंग्रजांनीं बंगालमध्यें आपलें बस्तान चांगलेंच बसवून घेतलें होतें.  त्यांतच पुन्हां पांदीचरी येथील फ्रेंच अधिकार्‍यांच्या मत्सराची भर पडल्यामुळें लालीचें काम अतिशय कठीण होऊन बसलें.  तथापि लालीनें पहिल्या धडाक्यासरशी फोर्ट सेंट डेव्हिड व दुसरीं कित्येक किरकोळ स्थळें हस्तगत करून घेतलीं व (स. १७५८) मद्रासवर हल्ला चढविला.  पण पांदीचरीच्या अधिकार्‍याकडून त्यास मदत न मिळाल्यामुळें त्याच्या सैन्याची उपासमार होऊं लागून तें बेलगामी बनलें.  अशा सैन्याकडून इंग्रजांचीं ठाणीं काबीज करणें अशक्यप्राय होतें.  त्यांतहि पुढें ब्रिटिश आरमार येऊन दाखल झालें.  तेव्हां लालीला मद्रास घेण्याचा नाद सोडून देणें भाग पडलें.  अशा स्थितींत सर आयर कूट यानें १७६० सालीं मोठें सैन्य जमवून त्यास वांदीवाश येथें लढाई देण्यास भाग पाडून त्याचा पूर्ण पराजय केला.  यानंतर लाली पांदीचरी येथें गेला, व तें ठिकाण त्यानें मे १७६० पासून ता. १६ जानेवारी १७६१ पर्यंत लढविलें.  पण अखेरीस अन्नाच्या अभवीं त्यास शत्रूस शरण जाण्याशिवाय गत्यंतर राहिलें नाहीं.  वेढ्याच्या अखेरीस किल्ल्यांत इतकें दुर्भिक्ष झालें होतें कीं, बाजारांत कुत्रें २४ रुपयांस विकलें जाऊं लागलें !  लालीनें फोर्टसेंट डेव्हिड घेतलें तेव्हां रहिवाशांस निघून जाण्यास तीन दिवसांची मुदत देऊन तें स्थळ जमीनदोस्त करून टाकलें होतें.  त्याचा सर्व वचपा इंग्रजांनीं आतां पांदीचरीवर काढला.  त्यांनी तेथील रहिवाशांस निघून जाण्यासाठीं तीन महिन्यांची मुदत देऊन त्या शहराची तटबंदी आंतील बहुतेक इमारतीसुद्धा जमीन दोस्त करून टाकली.

यानंतर इंग्रजांनीं फ्रेंचांपासून जिंजी, थिआगुर, माही वगैरें स्थळें भराभर काबीज करून १७६१ च्या आरंभास त्यांच्याकडे कलिकत व सुरत येथील वखारींशिवाय कांहीं राहूं दिलें नाहीं.

बंगालमधील फ्रेंचांची वसाहत चंद्रनगर ही क्लाइव्ह व वॉटसन यांनीं १७५७ सालींच हस्तगत करून घेतली होती; व इ.स. १७५८-५९ मध्यें राजमहेंद्रीच्या हिंदु राजाच्या विनवणीवरून कर्नल फोर्ड याच्या सैन्यानें राजमहेंद्रीपासून ४० मैलांवर कुंडूर येथें फ्रेंच सैन्याचा पराभव करून व मच्छलीपट्टण घेऊन निजामाकडून ज्यांचा वसूल बुशीला मिळला होता ते उत्तरसरकारामधील (गंतूरखेरीज)  बरेच जिल्हेहि आपल्या कबजांत घेतले होते.

अशा रीतीनें फ्रेंचांचा हिंदुस्थानांत सर्व बाजूंनीं पाडाव झाला असतां १७६३ सालीं पारिसचा तह होऊन सप्‍तवार्षिक युद्धाचा शेवट झाला.  या तहानें जरी पांदीचरी फ्रेंचांनां परत करण्यांत आली तरी अतःपर त्यांची हिंदुस्थानांत कांहीं किंमत उरली नाहीं.

कर्नाटकांत इंग्रज म्हैसूरकरांचें युद्ध -  कर्नाटकच्या नबाबांस एकट्या इंग्रज फ्रेंचांच्या स्पर्धेचाच परिणाम भोगावा लागला असें नाहीं.  इंग्रजांनीं या नबाबांस आपल्या स्वतःच्या राजकारणांत याहूनहि अधिक गुरफटून घेतलें.  इ.स. १७६५ सालीं इंग्रज, निजाम व मराठे या तिघंनीं मिळून हेदराच्या मुलुखावर स्वारी करण्याचा आपसांत ठराव केला; पण निजाम व मराठे या दोघांनीं पुढं अंग काढून घेतल्यामुळें इ.स. १७६७ सालीं इंग्रजांस हैदराशीं एकटें लढण्याची पाळी येऊन जिला ''पहिलें म्हैसूर युद्ध '' म्हणतात तें उपस्थित झालें.  या युद्धांत आरंभींच हैदरानें अंबूरला वेढा घातला.  पण इंग्रजांचें सैन्य येतांच तो वेढा उठवून कावेरीपाकला गेला.  त्याच वर्षी इंग्रजांनीं चंगम व त्रिनोमाली येथें हैदरावर दोन जय मिळविले.  पण या युद्धाच्या वेळीं इंग्रजांची अवस्था एकंदरींत शोचनीयच होती व शेवटीं जेव्हां १७६९ सालीं हैदर ६००० स्वार घेऊन मद्रासच्या वेशीशीं अचानक येऊन ठेपला तेव्हां तेथील इंग्रज अधिकारी गर्भगळित होऊन त्यांनीं हैदराशीं परस्परांनीं परस्परांचीं ठिकाणें व कैदी परत करावे व परस्परांच्या शत्रूंविरुद्ध परस्परांस मदत करावी या अटीवर तह केला.  या तहांतील अटींप्रमाणें, हैदरावर थोरल्या माधवराव पेशव्यांनीं स्वारी केली असतां इंग्रज त्याच्या मदतीस जाण्यास कचरल्यामुळेंच हैदराचा इंग्रजांवर दांत राहून ''दुसरें म्हैसूर युद्ध'' उपस्थित झालें.

तात्पर्य चंदासाहेबाच्या मरणापूर्वी जरी इंग्रज व फ्रेंच यांमधील युद्ध महंमदअल्लीकरितां झालें असें म्हणतां आलें तरी १७५२ नंतर त्यास तसें कांहीं कारण दिसत नाहीं.  पहिलें म्हैसूर युद्ध हें तर शुद्ध इंग्रजांच्या राजकारणाचाच परिणाम होता.  या युद्धाबद्दल इंग्रज महंमदअल्लीपासून कसा काय मोबदला घेत गेले तें स्पष्ट कळत नाहीं.  यावेळीं कर्नाटकांत दोनहाती कारभार चालू होता असें सांगण्यांत येतें.  पण तो दोन-हाती कारभार बंगालप्रमाणें नव्हता.  महंमदअल्लीला इंग्रजांनीं राजा म्हणून मान्य केलें असून त्याच्या राज्याचा वसूल त्याचेच अधिकारी गोळा करीत होते.  इंग्रज हे आपणांस त्याचे केवळ दोस्त किंवा त्याच्या वतीनें व त्याच्या नांवावर काम करणारे फौजबंद नोकर म्हणवीत असत.  यावेळीं मद्रास कौन्सिलच्या असें ध्यानांत आलें कीं, निजाम, हैदर व मराठे या प्रबळ शेजार्‍यांपासून आपण कर्नाटकचें रक्षण करण्यास पुढें आल्याशिवाय कर्नाटक शत्रूच्या स्वार्‍यांपासून मुक्त होणार नाहीं.  नबाबाच्या नोकरींतील बाजारबुणग्यांवर इंग्रजांचा विश्वास नसल्यामुळें त्यांनीं आपलें सैन्य वाढविलें व त्याचा खर्च मात्र (वरील कारण दाखवून) महंमदअल्लीकडून भागविला जाण्याची ते अपेक्षा करूं लागले.  तेव्हां त्यासाठीं नबाबानें इंग्रजांस मद्रासच्या नजीक कांहीं जहागीर दिली,  पण तिचा वसूल अद्याप नबाबाचे अधिकारीच करीत होते.  महंमदअल्ली याच्याकडे नेहमीं इंग्रजांची बाकी राही तर उलटपक्षीं मद्रास सरकारास पैशाची नेहमीं गरज असे.  महंमदअल्ली नेमस्तपणानें राहिला असता व आपला कारभार त्यानें स्वतः पाहिला असता तर हें कर्ज फेडणें कठिण नव्हतें.  पण त्या दोहोंपैकीं एकहि गोष्ट त्यास करतां आली नाहीं.  रकमेकरितां त्याच्या माणें टुमणें लावलें कीं त्यानें कोणाजवळून तरी पैसे उसने घेऊन ती भरावी.  एखाद्या जिल्ह्याचा वसूल स्वतःकडे लावून घेऊन कर्ज देणार्‍या लोकांची महमदअल्लीजवळ मुळींच वाण नव्हती.  महंमदअल्लीच्या या सावकारांमध्यें पॉल बेनफील्ड नांवाच्या कंपनीच्याच एका नोकराचा प्रामुख्यानें उल्लेख केला पाहिजे.  हा सावकारीवर इतका गबर झाला होता कीं, त्याची रहाण्याची ऐट खास गव्हर्नराहूनहि अधिक होती.  त्याची बायको लंडनच्या उद्यानांतून आपल्या ऐटबाज गाडींतन हिंडू फिरूं लागली कीं सर्व लोक तिच्याकडे टकमक पहात रहात.

या सावकारांची मिजास मोठी लक्षांत ठेवण्यासारखी आहे.  इ.स. १७७३ मध्यें इंग्लिशांनीं नबाबाच्या सांगण्यावरून तंजावर घेऊन तेथील राजाला पदच्युत केलें.  कोर्ट ऑफ डायरेक्टर्सनां या गोष्टीचा फार राग आला.  कारण तंजावरचा राजा हा तहानें आपला आश्रित झाला आहे असें ते समजत होते.  लॉर्ड पिगॉट नांवाचा कंपनीचा एक वृद्ध नोकर हा मद्रासचा माजी गव्हर्नर होता.  त्यास तंजावरच्या राजास पुन्हां त्याच्या गादीवर बसविण्याचा हुकूम करून त्यांनीं रवाना केलें.  पण पॉल बेनफील्ड हा मी अर्काटच्या नबाबास तंजावरच्या वसुलाच्या तारणावर मोठी रक्कम कर्जाऊ दिली आहे अशी सबब सांगून हरकत घेऊं लागला.  तेव्हां गव्हर्नर आदिकरून राजाचे पक्षपाती व अर्काटच्या नबाबाचे पक्षपाती यांच्या दरम्यान कौन्सिलमध्यें रणें माजलीं.  अखेर लॉर्ड पिगॉटला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी पकडून तुरुंगांत टाकलें व तेथें तो पुढें आठ महिन्यांनीं मरण पावला (१७७७).  तेव्हां दोन्हीहि पक्ष शांत झाले.  कोर्ट ऑफ डायरेक्टर्सनीं याची चौकशी करण्याचा हुकूम केला; पण त्यापासून कांहीं निष्पन्न झालें नाहीं.

इंग्रज म्हैसुरकरांचें पुन्हां युद्ध -  इंग्रजांनीं हैदरचा विश्वासघात करून म्हैसुरच्या दुसर्‍या युद्धाचें बीस कसें पेरून ठेविलें होतें हें मागें दाखविलेंच आहे.  या युद्धास इ.स. १७८० मध्यें तोंड लागून हैदरानें कर्नाटकावर स्वारी केली.  ज्या कारणामुळें युद्धाला प्रत्यक्ष सुरुवात झाली त्याचा कर्नाटकच्या नबाबाशीं अर्थाअर्थी कांहीं एक संबंध नव्हता.  यूरोपमध्यें इंग्रज व फ्रेंच यांच्या दरम्यान युद्ध सुरु झाल्याचे ऐकून इकडे हिंदुस्थानांत इंग्रजांनीं फ्रेंचांची पांदीचरी हस्तगत करून ते त्यांची पश्चिम किनार्‍यावरील माही काबीज करण्यास निघाले.  माहीवर स्वारी करण्यांत आपण हैदराशीं भांडण उकरून काढीत आहों हें इंग्रज जाणून होते.  कारण मराठ्यांनीं स्वारी केली तेव्हां इंग्रजांकडून मदत मिळण्याची निराशा झाल्यावर हैदरानें फ्रेंचांशीं संधान बांधिलें होतें.  व त्यांच्याकडून त्यास मदत मिळण्याची आशा होती.  फ्रेंचांच्या शिपायांनां गलबतांतून उतरून हैदराचा मदतीस येण्यास पश्चिम किनार्‍यावर माही हे एकटेंच बंदर होतें.  असें हें बंदर फ्रेंचांच्या ताब्यांतून जावें हें हैदरास न आवडल्यामुळें त्यानें इंग्रजांस निर्वाणीचा खलिता पाठविला होता.

या युद्धांत इंग्रजांस प्रथमपासूनच अपयश येण्यास सुरुवात झाली.  आरंभींच १७८० च्या सप्टेंबर महिन्यांत पोलिलूर येथें कर्नल बेलीच्या ४००० लोकांच्या तुकडीचा फन्ना उडविण्यांत आला.  अशा रीतीनें मद्रासकर इंग्रज पेंचांत आले; तेव्हां त्यांनीं महंमद अल्लीशीं बोलणें लावून त्याच्याकडून युद्ध चालू असेपर्यंत त्याच्या राज्याच्या एकंदर वसुलाची व्यवस्था आपल्याकडे घेतली.  इंग्रजांनीं नबाबास त्याच्या खाजगी खर्चासाठीं एकंदर वसुलींचा फक्त षष्ठांश द्यावा असें ठरलें होतें.  बेलीच्या पराभवानंतर एक वर्षानें बरोबर त्याच दिवशीं व त्याच ठिकाणीं इंग्रजांनीं हैदरावर विजय संपादन केला व पुन्हां शोलिंघर येथेंहि त्यावर दुसरा जय मिळविला; पण एकंदरींत हैदराच्या चपळ रिसाल्यापुढें त्यांनां टिकाव धरणें कठिणच जाऊं लागलें.  १७८२ सालीं टिपूनें कर्नल ब्रेथवेटच्या २००० शिपायांच्या सैन्याचा तंजावर जिल्ह्यांत धुव्वा उडवून इंग्रजांवर दुसरा मोठा विजय मिळविला.  अशा अडचणीच्या स्थितींत इंग्रज असतांना यूरोपमध्यें इंग्रज व फ्रेंच यांच्या दरम्यान तह झाल्याची वार्ता त्यांनां कळली.  तेव्हां त्यांचा जीव खाली पडला.  फ्रेंचांनीं युद्धांतून अंग काढल्यामुळें १७८४ च्या मार्च महिन्यांत शेवटीं टिपूनें इंग्रजांशीं परस्परांनीं परस्परांचा काबीज केलेला मुलूख व कैदी परत करावे या अटीवर तह केला.

कर्नाटकचें राज्य खालसा -  वरीलप्रमाणें इंग्रजांनीं आतांपर्यंत कर्नाटकच्या नबाबाची बहुतेक सत्ता तत्त्वतः आटोपली असून नबाब हे त्यांनां अजागलस्तनाप्रमाणें भारभूत वाटूं लागले होते.  म्हणून नबाबाचें राज्य रीतसरपणें खालसा करण्यास संधि केव्हां मिळेल याची ते वाट पहात बसले.  इ.स. १८०१ च्या जुलै महिन्यांत कर्नाटकचा नबाब उमदत-उल-उमरा मरण पावला.  तेव्हां त्यांनां ही संधि मिळाली.  त्याच महिन्याच्या २७ व्या तारखेस गव्हर्नर जनरलनें असें जाहीर केलें कीं, श्रीरंगपट्टण येथें जे कागदपत्र सांपडले त्यांत १७९५ सालीं दिवंगत झालेल्या महंमद अल्लीचा व त्याच्या नंतर गादीवर बसलेला त्याचा पुत्र उमदत-उल''उमरा याचा गुप्‍त पत्रव्यवहार आढळून आला असल्यामुळें ते ब्रिटिश सरकारचे शत्रू ठरतात.  अतएव त्यांचें राज्य खालसा करण्यांत येत आहे.  तथापि बरीच वाटाघाट झाल्यावर महंमद अल्लीचा नातू अझम-उद्दौला याच्याकडे नबाब ही नामधारी पदवी कायम ठेवण्यांत आली.

नबाब पदवीची फारकत -  वर सांगितल्याप्रमाणें कर्नाटकचें राज्य खालसा करूनच इंग्रजांचें समाधान झालें नाहीं तर नबाब या नामधारी पदवीनें लोकांच्या मनावर नबाबाच्या सत्तेविषयीं होणारा परिणामहि त्यांना दिवसानुदिवस जाचक होऊं लागला.

इ. स. १८५५ मध्यें कर्नाटकचा नामधारी नबाब गुलाम घोसखान हा मरण पावला, तेव्हां इंग्रजांनीं त्या जागेच्या अधिकारासंबंधीं व नेमणुकीसंबंधीं फेरविचार करण्यास चांगली संधि मिळाली.  इंग्लंडमध्यें व हिंदुस्थानांत चौकशी करतां जबाबदार अधिकार्‍यांची अशी खात्री झाली कीं, नबाब ही पदवी अर्ध्यामुर्ध्या राजसत्तेची उद्बोधक असली तरी १८०१ सालापासून अर्काटचे नबाब ती केवळ वैयक्तिक बहुमानाचा हुद्दा म्हणूनच धारण करीत आले आहेत; म्हणून प्रस्तुत नबाबाच्या मरणानंतर सरकार तो हुद्दा तसाच पुढें चालविण्यास बिलकुल बांधलेलें नाहीं.  तेव्हां मद्राससरकार व लॉर्ड डलहौसी यांनीं एकमतानें नबाबाचा हुद्दा रद्द करण्याचें ठरविलें !  हल्लीं नबाबांच्या वंशजास अर्काटचा राजा हा हुद्दा असून मद्रास इलाख्यांतील तो पहिल्या प्रतीचा सरदार गणला जातो.  त्यांची वंशावळ पुढें दिली आहे  :-

        

   (संदर्भग्रंथ :-  डफ; स्मिथ, आयंगार; विल्की; इं. ग्या. मनुस्मति; रा. खं. इ.).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .