विभाग दहावा : क ते काव्य
करण - ही लेखकांची एक जात आहे. १९११ सालीं हिंदुस्थानांत एकंदर करण २५५६०९ होते, पैकीं बिहार-ओरिसामध्यें १४७५११, बंगालमध्यें ५३१८६, मद्रासमध्यें ५४१०९ व वर्हाड-मध्यप्रांतांत ९६३ होते. कांहीं जुन्या ग्रंथकारांनीं यांची उत्पत्ति वैश्य बाप व शूद्र आईपासून झाल्याचें लिहिले आहे. ययातिकेसरी नांवाच्या ओरिसाच्या राजानें (इ.स. ४४७-५२६) यांस कारकुनी करण्याकरितां उत्तर हिंदुस्थानांतून आणिलें. कराणी शब्दाचा उपयोग बरेच दिवस इंग्रजी राज्यांत दुय्यम कारकुनांस करीत असत. हे लोक कायस्थाप्रमाणें चित्रगुप्तास आपला पूर्वज समजतात. यांचीं गोत्रें ऋषींच्या नांवापासूनच पडलीं आहेत. कांहीं कांहीं प्राणी देखील यांचीं देवकें झाले आहेत.
उच्च जातींत असलेले लग्नसंबंधीं सर्व प्रतिबंध व नियम यांच्या जातीस लागू आहेत. मुलींचे लग्न १० व्या वर्षी होतें, पण याहीपेक्षां उशीरा झालें तरी त्यास प्रत्यवाय नसतो. 'हस्तबंधनविधि' झाला म्हणजे लग्न होतें. वधुवरांचे हात दर्भानी बांधतात. वधू लग्न झाल्यावर सासरीं कांहीं दिवस जाते पण लौकर परत येते व ऋतुमती होईपर्यंत माहेरीच असते. हे स्वतःस स्मार्त म्हणवितात. हिंदु देवतांची पूजा करतात. यांच्यांत परमार्थ व कुंभीपतिया असे दोन पंथ आहेत. पहिल्या पंथाचे लोक फार अश्लील विधी करतात. हे लोक प्रेतांचें दहन करून त्यांची श्राद्धें करतात. कांहीं ब्राह्मण यांच्या हातची पक्की रसोई खातात. यांचा धंदा कारकून, शाळामास्तर, पटवारी व जमाखर्च लिहिण्याचा आहे. या लोकांच्या सवयी उधळपट्टीच्या आहेत. इतर अज्ञानी लोकांचा गैरवाजवी फायदा घेण्याच्या यांच्या संवयीमुळें हे कायस्थाप्रमाणेंच अप्रिय झाले आहेत.
ओरिसामध्यें क्षत्रिय, करण, खांडाईत व उढिया अशा चार जाती आहेत. त्यांमध्यें वैवाहिक सोपानपरंपरा आढळून येते. करण खांडाइतांच्या मुली करतात व क्षत्रियांस मुली देतात, आणि खांडाईत करण्यांस मुली देतात व उढियांच्या मुली करतात. (से. रि.)