विभाग दहावा : क ते काव्य
कन्फ्युशिअस (इ.स.पू. ५५० किंवा ५५ ते ४७८) - चीन देशांतील एक प्राचीन ॠषि. याचा संप्रदाय मोठा आहे. कुंग हें त्याचें कुलनाम असून कनफ्यूशिअस हें 'कुंग-फु-त्झे' (आचार्य कुंग) याचें लॅटिन अपभ्रष्ट रूप आहे. हा लु संस्थानचा रहिवासी होता, पण त्याचें घराणें फार प्राचीन व सुंग जहागिरीचें होतें. कनफ्यूशिअसचा बाप शुहलिआंगहीह हा एक जिल्हाधिकारी असून धाडस व बल यांबद्दल प्रसिद्ध असे. हीहनें सत्तराव्या वर्षी पहिल्या बायकोपासून त्याला नऊ मुली व एक लंगडा लुळा मुलगा असतांहि नवीन लग्न केलें. त्या बायकोचा मुलगा तो हा ॠषि होय. हा तीन वर्षांचा असतांना बाप वारल्यामुळें याला लहानपणींच कांहीं उद्योग करून कुटुंबाला मदत करावी लागे. त्यामुळें त्याला विद्या व सर्व कला प्राप्त करून घेण्याची अनायासें संधि मिळाली. याचें लग्न १९ व्या वर्षी झाल्यानंतर की घराण्याच्या राजाच्या पदरीं त्याला हलकी नोकरी लागली. २२ व्या वर्षी कनफ्यूशिअसनें शिक्षकाचा पेषा पत्करिला. त्याचे विद्यार्थी मुळाक्षरें, बाराखड्या वगैरे शिकण्याकरितां येत नसून शुद्ध आचरण व राज्यकारभार यांचीं तत्त्वें जाणण्यासाठीं येत. तो संगीत विद्येंत प्रवीण असे. त्याची मानमान्यता लवकरच फार वाढली. वयाच्या ५२ व्या वर्षी त्याला चुंगटु शहराचा मॅजिस्ट्रेट करण्यांत आलें. त्यापूर्वी तो राजकारणांत फारसा पडत नसे. त्याचा कारभार लोकांनां फार पसंत पडला. पुढें तो बराच वाढला. त्यानें सरदारांना दडपून राजसत्ता प्रबल केली. कनफ्यूशिअसच्या कर्तबगारीनें लु संस्थानची भरभराट होत आहे असें त्सीच्या अधिकार्यांनीं पाहून त्यानीं गाणें व नाचणें यांत प्रवीण अशा सुंदर स्त्रियांचा मोठा तांडा लूमध्यें धाडून दिला, तेव्हां राजा व लोक बेहोष होऊन या ॠषीचे कोणी ऐकेनात, तेव्हां तो दुसरीकडे निघून गेला.
५६ व्या वर्षी कन्फ्यूशिअस लूच्या बाहेर पडला व तेरा वर्षांनीं तो पुन्हां परत आला. या मधल्या काळांत तो अनेक निरनिराळ्या संस्थानांतून हिंडला. त्याला आशा होती की, आपल्या ताब्यांत राज्य देणारा एखादा तरी संस्थानिक भेटेल व मग आपण जगाला उदाहरण घालून देणारें असें सर्वोत्कृष्ट राज्य बनवून दाखवूं. पण सर्व लोक त्याचा आदरसत्कार करीत असले, तरी त्याच्या मताप्रमाणें सर्वस्वी चालण्यास कोणी तयार होईना. इ.स. ४८३ मध्यें तो लूला परत आल्यावर त्याच्या शिष्यांच्या वजनात त्याला संस्थानांतील सर्वांत मोठी मानाची जागा मिळत होती, पण त्यानें ती स्वीकारली नाहीं. आपल्या शिष्यांनां उपदेश देत व वाड्मयीन कार्य करीत त्यानें आपलें राहिलेलें आयुष्य कंठिलें. मरण्यापूर्वी दोन सत्शिष्य आणि पुत्र व पत्नी यांचा त्याला वियोग झाला होता.
कनफ्यूशिअसच्या संप्रदायाचीं तत्वें व त्यांतील बरेवाईटपणा यांचें विवेचन 'बुद्धपूर्व जग' या विभागांत (उत्तरार्ध पान ५८-५९) येऊन गेलेंच आहे. त्याचा संप्रदाय धार्मिक नसून केवळ नीतिधर्म व राजधर्मविवेचक होता, हें त्या ठिकाणीं दाखविलें आहे. खुद्द कनफ्यूशिअसनें लिहिलेला असा ग्रंथ नाहीं. त्याच्या पूर्वी चीनमध्यें बरेंच वाङ्मय प्रचलित होतें.
प्राचीन सर्वमान्य ग्रंथांच्या संपादकाचें काम त्यानें अंगावर घेतलें. प्राचीन काव्यभांडारात त्याला वेनवँगचें उदात्त उदाहरण आढळून आलें. राजे व सामान्य जनसमूह यांनीं अनुकरण करण्याजोगा हा मनुष्य होता व ह्यानें उच्च प्रकारचें नैतिक ज्ञान शब्दांत गुंफिलें आहे. त्याचप्रमाणें ''याउ व शन, यू व टँग हे लोक मनुष्यें, राज्यकर्ते व विद्वान या तिन्हीं नात्यांनीं अतिशय उच्च कोटींत पडतात. या लोकांचे शब्द, ग्रंथ व ऐतिहासिक महत्व ह्यांचे भविष्यकालीन लोकांच्या कल्याणासाठीं रक्षण करणें हा आपला जीवितोद्देश आहे'' असें कन्फ्यूशिअसच्या मनांत बिंबलें होतें. गतकालावर त्याची दृष्टि विराम पावली. स्वभावतःच तो रूढमार्गवादी होता. नैतिक दुर्वर्तन, जुलूम, अपराध व सुसंप्रदायाच्या अनुरोधानें न वागणें ह्या गोष्टींचा त्याला अतिशय तिटकारा होता. ह्या उद्देशानें त्यानें प्राचीन सर्वमान्य ग्रंथांच्या संपादकाचें काम पत्करिलें. प्राक्कालीन थोर मनुष्यांचें उत्तम उदाहरण व शिक्षण जपून ठेवणें हा त्याचा मुख्य उद्देश होता.
त्याला असें आढळून आलें कीं, पांच विषयांचा त्याला ह्या कार्यांत उहापोह केला पाहिजे. ते विषय (१) इतिहास, (२) काव्य, (३) विधि, (४) गायन, व (५) शकुनविद्या हे होते.
(१) इतिहास :- रक्षण करण्याचा इतिहास खालीलप्रमाणें होता :- (अ) याउ व शन यांच्या कालचें राजकीय दिनवृत्त; काल इ.स. पूर्वी २३५६ ते २२०५. (आ) हिआ वंशाचें दिनवृत्त; काल इ.स. पूर्वी २२०५ ते १७६६. (इ) शंग वंशाचें दिनवृत्त; काल इ.स. पूर्वी १७६६ ते ११२२. (ई) चौवंशाचें दिनवृत्त; काल इ.स. पूर्वी ११२२ ते कनफ्यूशिअसचा काल.
(२) काव्य :- राजकीय अथवा दरबारी, आणि लौकिक अशा प्रकारांची कविता त्याला आढळून आली. चौकुंगनें कांहीं स्थानिक गीतें लिहिलीं. ही कविता म्हणजे पूर्वकालीन चालीरितींचीं उत्तम उदाहरणें होत.
(३) विधिपालन :- राजे, कामगार-लोक व सामान्य मनुष्यें यांकरितां नियम, तीन प्राचीन सर्वमान्य ग्रंथांत दिले आहेत. देशांतील सर्व प्राचीन संस्था व देशाचार हे यांमध्यें वर्णिले आहेत.
(४) गायन :- वर निर्दिष्ट केलेल्या तीन सर्वमान्य ग्रंथांपैकीं एकांत यज्ञगीतें दिलीं आहेत. ह्यांवरून त्या वेळचें गायन सावकाश व गंभीर होत होतें व तें चार अथवा पांच सुरांत होत होतें असें दिसतें. गायनाबरोबरच नर्तन होत असे व धार्मिक सेवेला योग्य असे आदरयुक्त विकारतरंग उत्पन्न करणें हा गायननर्तनाचा उद्देश होता.
(५) शकुनविद्या :- ह्या विषयावरील ग्रंथापैकीं एक ग्रंथ फार प्राचीन आहे. त्यांत कांहीं उत्तम नैतिक विधानें आहेत. ह्या ग्रंथांत सृष्टिविज्ञान विवेचिलें आहे. सर्व अस्तित्व समूह रूपांत आणावें, सृष्टीच्या सर्व स्वरूपाचें एका व्यापक ऐक्यांत आकलन करावें आणि दृढ व गहन विचाराच्या योगानें विद्वानाच्या ताब्यांत सर्व विश्वाला आणावें हा त्या सृष्टितत्त्वशास्त्राचा उद्देश होता. चंगयंगमधील तत्त्वशास्त्र यासारखेंच होतें. कन्फ्यूशिअसची तत्वशास्त्रविषयक मतें ज्यांत ग्रथित केली आहेत त्या ग्रंथामधील तत्वशास्त्र यासारखेंच होतें.
कन्फ्यूशिअसचे थडगें पेकिंग व शांघाय ह्यांच्या मध्यमूभीवर असून प्रत्येक शहरापासून सुमारें ४०० मैलांच्या अंतरावर आहे. ही चीन देशांतली अतिशय पवित्र जागा आहे. येथें कन्फ्यूशिअसचा वंशज रहातो, व तेथें असलेल्या प्राचीन वस्तूंचें तो संरक्षण करितो.
कन्फ्यूशिअसच्या म्हणून मानल्या जाणार्या म्हणी पुष्कळ आहेत. त्यांपैकीं कांहीं येथें दिल्यास त्याचा स्वभाव व मतें यांची थोडीशी ओळख होणार आहे.
'' श्रेष्ठ मनुष्य जें शोधतो तें त्याच्यांतच असतें; क्षुल्लक माणुस जें शोधतो तें दुसर्यांत असतें;'' ''श्रेष्ठ मनुष्य मानाचा असतो, पण तो भांडत बसत नाहीं; तो चारचौघांतला असूनहि एक पक्षीय नसतो. तो एखाद्याला केवळ त्याच्या शब्दावरून वर चढवीत नाहीं किंवा त्याच्याकरितां चांगले शब्द बाजूला सारीत नाहीं.''
''स्तुतिपाठक नसणारा गरीब मनुष्य व निगवीं श्रीमंत मनुष्य यांचा स्वभाव बर्यापैकीं म्हणतां येईल. पण गरीब असूनहि आनंदी आणि श्रीमंत असूनहि शिष्टाचाराचे नियम मानणारा यांची बरोबरी त्याच्यानें होणार नाहीं.''
''विचारानें न पचविलेली विद्या व्यर्थ श्रमाप्रमाणें होय; विद्येच्या मदतीशिवाय होणारा विचार संकटप्रद होय.'' ''उधळेपणामुळें अविनय उत्पन्न होतो व चिक्कूपणामुळें क्षुद्रवृत्ति येते. अविनयी होण्यापेक्षां क्षुद्र होणें बरें.'' ''मनुष्याला आपलीं मतें व्यापक करितां येतात; मतांना मात्र मनुष्य मोठा करितां येत नाहीं.''
''सावधगिरी बाळगणार्याच्या हातून क्वचितच चूक होते''.
(संदर्भग्रंथ - कन्फ्यूशिअस व त्याचा संप्रयास यांवर बरेच ग्रंथ आहेत त्यांपैकीं कांहीं असे :- अलेक्झांडर - कनफ्यूशिअस लंडन, १८९०; डग्लस - कन्फ्यूशिआनिझम् ऍंड ताओइझम; फेबर- डायजेस्ट ऑफ दि डाविऱ्ट्रन्स ऑफ कनफ्यू; ओल्ड - क्लासिक्स ऑफ कनफ्यू.