विभाग नववा : ई-अंशुमान
उखामंडळ – बडोदा संस्थान. अरमेळी प्रांताचा एक तालुका. हा बडोदे संस्थानाच्या अगदीं पश्चिमेकडील भागांत आहे. क्षेत्रफळ २७२ चौ. मै. लोकसंख्या (१९११) २१७४०. उखामंडळ हें गायकवाड सरकारच्या ताब्यांत सन १८१७ मध्यें आलें. येथील मूळचे रहिवाशी वाघेर लोक. यांनीं मध्यंतरी जरा बंडाळी माजविली होती. पण बडोदें सरकारनें ती सैन्य पाठवून मोडली. या तालुक्यांत मुख्य गांव म्हणजे द्वारका हें पुराणप्रसिद्ध क्षेत्र होय. शिवाय इतर ४३ खेडीं आहेत.
हा प्रदेश म्हणजे रुक्ष सपाट जमीन आहे. समुद्रकांठचा प्रदेश रेताड असून इतरत्र सर्वसाधारण पीक होतें. मुख्य पीक म्हणजे बाजरी, ज्वारी वगैरे. पाऊस फार कमी पडतो. येथें मीठ सांपडतें पण तें बाहेर गांवीं पाठविण्यास सरकारची मनाई आहे.