विभाग नववा : ई-अंशुमान
ईदर, सं स्था न. – मुंबई इलाखा. महीकांठा एजन्सी. हे उत्तर अक्षांश २३० ६’आणि २४ २९ व पू. रे. ७२० ४५’आणि ७३ ३९’ यामध्यें वसलेलें आहे. ह्या संस्थानच्या उत्तरेस सिरोही व उदेपूर हीं संस्थानें; पूर्वेस डोंगरपूर; दक्षिणेस व पश्विमेस मुंबई इलाखा व गायकवाडचें राज्य, हीं आहेत. ह्या संस्थानाचा नैर्ॠत्येकडील भाग सपाट व वालुकामय आहे. पण इतरत्र सर्व प्रदेश सुपीक वृक्षाच्छादित, डोंगर व नद्या यांनीं व्याप्त आहे.
ह्या संस्थानचा पुर्वेतिहास बराच गमतीचा आहे. इ. सन ८९० पासून ९७० पर्यंत हे संस्थान गेहलोट अमलाखालीं होतें; नंतर सन १००० पासून १२०० पर्यंत परमार रजपूत अमलाखालीं आलें. अमरसिंग या शेवटच्या परमार राजानें हें संस्थान हाथी सोर्द या कोळ्याच्या स्वाधीन केलें. त्याच्या मुलापासून सामैत्राचा राव सोनंग यानें काबीज केलें. यानंतर बारा पिढ्यांनीं राव जगन्नाथ यास १६५६ मध्यें मुरादबक्ष या गुजराथच्या सुभेदारानें हुसकावून दिलें. सन १७२८ सालीं जोधपूरच्या राजाच्या आनंदसिंग व रायसिंगच्या या दोन बंधूनीं येथें आपली सत्ता प्रस्थापित केली. पण दमाजी गायकवाडच्या नोकरींत असलेल्या बच्चाजीं दुवाजीनें श्रीमंत पेशवे सरकारच्या वतीनें ईदर संस्थांन ताब्यांत घेतलें. पण ही स्थिति फार वेळ टिकलीं नाहीं. रायसिंगनें पुन्हां ईदर घेतलें व त्याचा पुतण्या शिवसिंग हा कारभार पाहू लागला. ह्या संस्थांनचे कांहीं भाग प्रांतेज, विजापूर जिल्हे व मोडासा बायद व हारसोल या जिल्ह्यांचा अर्धा भाग पेशव्यानीं घेतला ( पण कांहीं काळानें ते ब्रिटिश सरकारला द्यावे लागले ); व बाकीचा मुलुख गायकवाडच्या ताब्यांत गेला. मध्यंतरी बर्याच घालमेली झाल्या. गायकवाड सरकारला १८१२ सालीं ईदर व अहंमदनगर यांच्या उत्पन्नाबद्दल २४००० रुपये व ८९५० रुपये कायमचे द्यावयाचे ब्रिटिश सरकारनें ठरविलें, सन १७९१ त शिवसिंग मृत्यु पावला. व त्याच्या मागून गादीबद्यल तंटे सुरु झाले व त्यामुळें ईहर संस्थानचीं शकलें झालीं. त्याच्या एका मुलाला अहंमदनगर व दुसर्या दोन मुलांनां मोडासा व बायद हे प्रांत मिळाले. पण हीं तीन घराणीं फार दिवस टिकलीं नाहींत. सन १८४८ सालीं ब्रिटिश सरकारनें हे तिन्ही मुलुख पुन: एकत्र केले व त्यावेळेपासून नवीन घराणें सुरु झालें. ह्या संस्थानच्या अधिकार्याला महाराजा ही पदवी आहे. त्याला दत्तक घेण्याचा अधिकार आहे. व त्याला १५ तोफांची सलामी मिळते. १९०२ सालीं प्रतापसिंग ईदरच्या गादीवर बसला. हा राजा फार शूर होता. जेव्हां सर प्रतापसिंहानें १९११ सालीं जोधपूरचा राजप्रतिनिधि झाल्यावेळीं ईदरवरचा हक्क सोडला तेव्हां त्याचा मुलगा दौलतसिंह गादीवर आला. ह्या संस्थानची लोकसंख्या सन १९२१ सालीं २२६३५१ होती. शहरें व खेडेगांव मिळून ८८४ गावें होतीं. सर्वांत हिंदु लोकांची संख्या जास्त आहे; त्यानंतर मुसलमान आणि मग जैन असा संख्यानुक्रम येईल. ह्या संस्थानांतील मुख्य शहरें अहंमदगर, ईदर व वडाली हीं होत. संस्थानचें क्षेत्रफळ १६६९ चौ. मैल आहे.
ह्या संस्थानांतील जमीन सामान्यत: सुपीक आहे; पण उत्तर व ईशान्य भांगातील जमीन निकस व वालुकामय आहे. मुख्य पिकें धान्य, तीळ व उंस ही होत. येथे साबणाचे कारखाने आहेत व अहमदनगर येथें दगडाच्या खाणी आहेत व त्या खाणींतला दगड इमारतीच्या कामीं उपयोगी पडतो.
ह्या संस्थानच्या अधिपतीला पहिल्या प्रतीचा अधिकार आहे. मृत्यूची शिक्षा फर्माविण्याची सुद्धां अधिकार आहे. संस्थानचें उत्पन्न सन १९०३-०४ सालीं ६ लाख होतें. त्या त्यांपैकीं ४ लाख संस्थानाधिपतीचें व बाकीचे ज्या सरदार लोकांच्या पूर्वजांनी हल्लींच्या अधिपतीच्या मूळ पुरुषाला हें संस्थान मिळवून देण्यांत मदत केलीं त्या सरदार लोकांचें होतें. ईदरच्या महाराजाला सरदार व तालुकदार यांकडून खिचडी व इतर राजहक्कांबद्दल ५५४५७ रुपये मिळतात. उलट महाराजाकडून गायकवाडाला सालीना ३०३४० रुपये खंडणी जाते.
श ह र.– उत्तर अ. २३० ५०’, व पूर्व रे. ७३० ३’. लोकसंख्या ( १९२१ ) ६०७२. बाँबे बरोडा सें. इं. रेल्वेच्या अमदाबाद प्रांतेज फाट्यांवर हें स्टेशन लागतें.
या शहराचा इतिहास संस्थानच्याच इतिहासांत अंतर्भूग होतो. शहराला विटांची तटबंदी असून ती अद्याप फारशी मोडकळीस आली नाहीं. येथून एक मैलावर रामलेश्वराचा तलाव आहे. त्याच्या पश्चिम कांठावर ईदर राजघराण्यांतील पुरुषांचीं थडगीं आहेत. तलावाच्या बाजूला लहान लहान देवळें आहेत. एक दोन दगडी विहिरी व खोदकाम केलेल्या कांहीं घरांच्या खिडक्या यांच्याशिवाय फारसें महत्वाचें असें दुसरें कांहीं नाहीं. किल्ल्याच्या पठारावर असलेल्या ज्या दोन इमारतीकडें ताबडतोब लक्ष जातें, त्या इमारती म्हटल्या म्हणजे रणमल्लाची चौकी व `रुथी राणीनो महाल’ या होत. चांदणीचा ठाकूर सुरजमल यानें मराठयांपासून ईदरचा जरी बचाव केला तरी पण तो इतका गर्वानें फुगला होता कीं, भवानीसिंग राजपुत्राचा देखील तो अपमान करण्यास कचरत नसे. राजपुत्राला ही वर्तणूक सहन व होऊन त्यानें या ठाकुराचा वरील वाड्यांत खून केला. गडावर जातांना श्री शांतिनाथजीचे व श्री शांभवनाथजीचें अशीं दोन जैन मदंरें लागतात. हीं दोन देवळें फार प्राचीन काळची आहेत. पण कालनिर्णय करण्याकरितां कांहींच पुरावा नाहीं. येथील किल्ल्याला मागच्या बाजूनें आणीबाणीच्या प्रसंगीं पळून जाण्याला एक चोरवाट आहे. शांभवनाथजीच्या देवळापाशीं उभें राहून रुष्ट राणीच्या वाड्याकडे नजर फेंकल्यास फारच मनोहर सृष्टिसौंदर्य पहावयास मिळतें. किल्लाच्या पायथ्याशीं गुहेंत खोरवनाथ महादेवाचें पडीत देऊळ आहे. हें सरासरी ४०० वर्षांपूर्वींचें असावें असा समज आहे. याशिवाय मंकालेश्वर महादेवाचें व धानेश्वर महादेवाचें अशीं दोन आणखी देवळें आहेत. [ इं. गॅ. मु. गॅ. इंडियन ईयर बुक. ]