प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

इराण - हें पश्चिम आशिया खंडातील एक राज्य आहे. याच्या उत्तरेस कास्पियन समुद्र, रशियन ट्रॅन्सकॉकेशिया व ट्रॅन्सकास्पियन राज्य, पूर्वेस अफगाणिस्तान व बलुचिस्तान, दक्षिणेस अरबी समुद्र व इराणी आखात आणि पश्चिमेस तुर्कस्तानचा प्रदेश आहे.
             
पश्चिमसरहद्द.- आरास नदीवरील एका बिंदूपासून नैर्ऋत्य दिशेने आराराट पर्वतापर्यंत जाणारी २० मैल लांबीची एक रेषा रशियापासून इराणला अलग करते. आराराट पर्वतापासून दक्षिणेस इराणी आखातांतील शाट-एल-अरब नदीच्या मुखापर्यंत सुमारें ७०० मैलपर्यंत इराणी-तुर्की सरहद्द पसरलेली आहे; परंतु ही निश्चित केलेली नाही.

उत्तरसरहद्द - ही सरहद्द आरास नदीवरील बिंदूपासून टेजेन नदीवरील सेरॅखपर्यंत पसरली आहे.

पूर्वसरहद्द - पूर्व सरहद्द सेरॅखपासून अरबी समुद्रावरील ग्वेहेरपर्यंत सुमारें ८० मैलपर्यंत पसरलेली आहे.

दक्षिणसरहद्द - ही सरहद्द म्हणजे इराणी आखात व अरबी समुद्र यांचा ग्वेट्टेरपासून शॉट-एल-अरब नदीच्या मुखापर्यंतचा सुमारें ८८० मैल लांबीचा  समुद्रकिनारा होय. इराणी  आखाताच्या उत्तर किना-याजवळची होर्मोझ(ऑर्मझ) लाराक, किश्म, हेंगम, फुरुर, किश (कैस), दराबि, शेखशु ऐब, जेब्रिन, खरक,खाराकु (खोर्गु) ही बेटें इराणी राज्यांत मोडतात. या सरहद्दी वरचेवर अनेक कमिशनें नेमून अखेरीस निश्चित झाल्या आहेत.            

नैसर्गिक वर्णन- इराण हा देश नैसर्गिक दृष्टया एक पठार आहे. व अर्वाचीन इराण या पठाराचा  पश्चिमार्ध व्यापते. समुद्रकिनाऱ्याजवळचा प्रदेश मात्र सखल आहे. मोठया पर्वतश्रेणींना इराणी नांवें नाहीत. पश्चिमेडील अझरबैजनपासून पूर्वेस खोरासानपर्यंत ५०० मैल पसरलेल्या पर्वताच्या ओळीला असलेले एल्बूर्झ पर्वत हें नाव, इराणी लोक या पर्वताच्या फक्त ५० मैल लांबीच्या भागालाच लावतात. अझरबैंजनपासून वायव्येस बलुचिस्तानपर्यंत ८०० मैल अखंड पसरलेल्या मोठया मध्यवर्ती पर्वतश्रेणीला  ''सेंट्रल रेंज'' म्हणतां येईल. एल्व्हेंड, शुटुरुन कुह, शहान कुह, कुहिगेरा, झार्डेह कुह, कुहिकारान ही बखत्यारी प्रदेशांत व दक्षिणेस कर्मानजवळ बिदखान, लालेहझार, शाहकुह, जमालबारिझ वगैरे उंच शिखरें आहेत. खोरासानमध्यें कित्येक पर्वतांच्या ओळी आहेत. एल्बुर्झ पर्वतांत डेमाव्हेंड शिखर १८००० फूट उंच आहे. आग्नेय इराणांत कुहिबास्मन नांवाचा निद्रित ज्वालामुखी पर्वत व कुहिताफ्तान नांवाचा तीन शिखरांचा (जागृत) ज्वालामुखी पर्वत आहे.

नद्या - सीफिड रुड, हर्हाझ, गुर्गान व आट्रेक ह्या नद्या कास्पियन समुद्राला मिळतात. अजिचै,  सफिचै मुर्डिचै, जघटु व टाटा व वगैरे चौदा नद्या उर्मिया सरोवराला मिळतात. हाब्लेहरूड, जजरूड केंड, केरेज, शुरेहरूड, कारा-सु, रेझार्च, जेहरूड व कुमरुड या नद्या व कशनच्या पूर्वेच्या कवीर (खारट दलदली) मध्ये मिळतात. इस्पहानची नदी (झेंदेहरूड) गव्हखानी दलदलीला मिळते. फार्समध्ये कुर नदी आहे व डियाला, केर्खेज टायग्रीस नदीला मिळतात. अबिडीझ व कारून शाट-एल-अरबला मिळतात. जाराहि व टाब इराणी अरबस्तानचा नदीमुखाचा प्रदेश बनवितात. मांड मिनाब या नाव्य नद्या आहेत. इराणचें मोठें वाळूचें मैदान नैर्ऋत्येकडून आग्नेयेकडे उंच इराणी डोंगरपठारांत पसरलेलें आहे. याच प्रदेशांतून तीन तारांचे लोखंडी खांबावरील १९०७ मध्यें पुरें केलेलें तारायंत्र गेलेलें आहें.

भूस्तर वर्णन - इराणचा मध्य प्रदेश चतुर्थ युगांतील थरांनी व्यापलेला आहे व याच्या उत्तर, पश्चिम व दक्षिण सरहद्दीवर जुन्या खडकांचा कडा आहे.

हवा.- कास्पियन समुद्राच्या जलविभाजक क्षेत्रा खेरीज या देशांतील कोणत्याहि भागांत सालीना १३-१४ इंचांहून जास्त पाऊस पडत नाहीं. आक्टोबरपासून एप्रिलपर्यंत पडणाऱ्या पावसावर व बर्फाच्या पावसापासून पिकांचें रक्षण करण्याइतकें पिकावरील बर्फाच्छादन यांवर चांगलीं पिकें अवलंबून असतात. या देशांत नैर्ऋत्येकडून व आग्नेयेकडून वारे वाहतात.

प्राणी.- घोडे, उंट, शेळया, मेंढया, कुत्रे, मांजरे, हे प्राणी येथें पैदा होतात. सिंह, वाघ, चित्ता, लिंक्स, पिंगट अस्वल, वनगायी, डुकरें बेंजर, सायाळ, पोल-कॅट, बीझल, मार्टेन, लांडगा, कोल्हा, खोडक, ससा, जंगली गाढव, जंगली मांजर व शेळी, डोंगरी बकरा, गॅझेल व हरीण वगैरे पशू येथें सांपडतात. इराणांत पक्ष्यांच्या ४०० जाती आहेत. कास्पियन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर मासे सांपडतात.

वनस्पती.- उत्तरेकडील सखल प्रदेश व डोंगराळ प्रदेशांतील थोडीशी निवडक ठिकाणें खेरीज करून बहुतेक सर्वत्र झाडें व वनस्पती फार क्वचित आढळतात. खजुरीची व ऑलिव्ह झाडें होतात. फळांच्या जाती पुष्कळ आहेत. यूरोपांतील बहुतेक सर्व फळें या देशांत उत्पन्न होतात. उत्कृष्ट टरबुजें, द्राक्षें, जरदाळू, चेरी, मनुका, अननस ही फळें उत्पन्न होतात. येथील फळें यूरोपांतील फळांची बरोबरी करतात. भाजीपाला विपुल आहे. यूरोपांतील बहुतेक सर्व फुलें व दुर्मिळ फळें देखील आतां या देशांत उत्पन्न होतात.

क्षेत्रफळ व लोकसंख्या.- हा देश पूर्वपश्चिम ९०० मैल व दक्षिणोत्तर ७०० मैल आहे, याचें क्षेत्रफळ ६२८००० चौरस मैल आहे. यांपैकी बराच भाग वालुकामय मैदान असल्यामुळें दर चौरस मैलास १५ हून जास्त लोकांची वस्ती या देशांत आढळत नाहीं. लोकसंख्या सुमारें ९५ लक्ष ते दीड कोटी आहे. यूरोपियन लोकांची संख्या १२०० हून जास्त नाहीं. भ्रमणवृत्ति लोकांपैकी २६०००० अरब, ७२०००० तुर्क, ६७५००० कुर्द व लेक, २०७०० बलुची जिप्सी, आणि २३४००० लुरी याप्रमाणें लोकांची वस्ती आहे.

इराणांतील मुख्य शहरें.-तेहरान ३५००००, ताब्रिझ २०००००, इस्पहान ८००००, मेशद, कर्मान ६०००० वार्फुरुशा शिराझ ५००००, येझ्द ४५००, वाझ्विन, फोम, काशान, रेश्त ३५०००, हमदान, कर्मानशहा ४००००.

स्वभाव - इराणी मनुष्य शांतताप्रिय असून कोणत्याहि वस्तूंच्या अल्हादजनक स्वरूपाकडेच बहुधा त्याचें लक्ष जातें. हे लोक आतिथ्यतत्पर उपकार करणारे व परकी लोकांविषयीं प्रसन्नचित्त असतात. त्यांच्या अंगी बरेच सद्गुण वसत असतात. ते आपल्या लेकरांचे फार लाड करतात. इराणी मुलगा आपल्या आईबापांविषयी फार आदर दाखवितो, तो बापाच्या समक्ष कधीहि बसत नाही व त्यास धनी म्हणून संबोधितो. त्याच्या मनांत आईविषयीं फारच प्रेम व पूज्यभाव वसत असतो. इराणी पुत्र आपल्या आईची उपासमार कधीहि होऊं देत नाहींत, व आईची आज्ञा कायद्याप्रमाणें शिरसावंद्य मानतात. कुटुंबांत आईला व विशेषतः आजीला फारच महत्त्व असतें, आपली सासू आपणाजवळ असावी अशी इराणी जांवयाची उत्कट इच्छा असते. चुलत्याचे नातें पाश्चात्यांपेक्षां हे लोक जास्त निकट समजतात, व पित्याच्या बाजूच्या चुलत बहिणीस इराणी पुरूष आपल्या स्वाभाविक बायका समजतात.

काळे गुलाम व पुरूष दाया अथवा लाला यांनां फार मान असतो, व दूध पाजणाऱ्या दाईला दुसऱ्या आईप्रमाणें मानतात आणि तिच्या खाण्यापिण्याची आयुष्यभर तरतूद केलेली असते. इराणी लोक आपल्या नोकरांस मुलांप्रमाणें वागवितात. धनी गुलामास बच्चा म्हणून हांक मारतो व गुलाम धन्यास पिता म्हणून संबोधितो. इराणांत गुलामांनां चांगले वस्त्रप्रावरण व खाणेंपिणें देऊन अत्यल्प सायासाची कामे करावयास लावतात; बहुतकरून स्त्री गुलामांची आवडत्या पुत्रांशी लग्ने लावण्यांत येतात अथवा स्वतः मालक आपल्या राखेप्रमाणें त्यांनां बाळगतो. हे फार विश्वासू नोकर असतात. व मालकांचा पैसाअडका यांच्या ताब्यांत असून फार महत्त्वाची कामें देखील हे करीत असतात. गुलामास बंधमुक्त करून आपला चरितार्थ चालवावयास लावणें ही गुलामांस द्यावयाची कडक शिक्षा होय अशी तेथे समजूत दिसते. हबशी अथवा अबिसिनियन गुलामास फार किंमत पडते, सोमाली अथवा सुहाली गुलाम कमी काळा असून कमी किंमतीचा असतो. कोळशाच्या वर्णाचा व सर्वांत कमी किंमतीचा गुलाम देशाच्या अंतर्भागांतील बोम्बासी हा होय. बोम्बासी गुलामाची किंमत त्याच्या  शारीरिक शक्तीवर अवलंबून असते व याच्याकडून स्वयंपाकाचें काम करवितात. बाहेर देशांहून मागवितात तेव्हांच फक्त गुलामांची विक्री होते. आपल्या गुलामांशी अथवा घोडयाशी इराणी मनुष्य कधीहि क्रूरपणानें वर्तन करीत नाहीं. फारच विपन्नावस्था प्राप्त झाली तर इराणी मनुष्य स्वतःचे कपडे विकण्यास तयार होईल परंतु आपले गुलाम कधीहि विकणार नाही. हबशी बारा ते चौदा वर्षाच्या चांगल्या मुलीस ४० पौंड किंमत शिराझच्या बाजारांत द्यावी लागते, याच प्रकारच्या सोमाली मुलीची २० पौंड व बोम्बासी मुलीची किंमत १४ पौंड असते.

व्यापारी सचोटींत इराणी लोक यूरोपियनांच्या बरोबरीचे असतात. हे लोक गरिबाविषयीं दानशूर असतात. दिरंगाईपणा हें इराणी मनुष्याच्या स्वभावाचे लक्षण आहे. वारंवार स्नान करुन व कपडे धुवून इराणी लोक स्वच्छ राहतात. हे लोक आपल्या  कपडयांच्या नीटनेटकेपणाविषयीं विशेष खबरदार असतात. इराणी लोक जनावरांचे फार शौकी असतात. क्रूरपणा हा दुर्गुंण इराणी लोकांत आढळत नाही. एकांतवास, बऱ्याच मुदतीची सक्तमजूरी वगैरे शिक्षा या देशांत नाहींत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुरंगातील बहुतेक कैद्यास मुक्त करीत असल्यामुळे कोणाहि इसमास एक वर्षाहून तुरंगवास कंठण्याची क्वचितच पाळी येते.

पेहराव - इराणी लोक अंगांत मानपट्टी नसलेला, पोकळ बाह्यांच्या सुती कापडाचा सदरा घालतात. दक्षिण इराणांत या सदऱ्याच्या मानेच्या भागावर उत्तम नक्षी काम केलेलें असतें. कनिष्ठ वर्गाचे लोक निळया रंगाचा व उच्च वर्गाचे लोक आणि सेवक लोक पांढरा सदरा वापरतात.

रस्ते.- (१)तेहरान-कोम (२)तेहरान-रेश्त, (३)ताब्रिझ-जुल्फा (रशियन सरहद्द) (४) काझ्विन-हमदान,(५) मेशद-अस्काबाद, (६) कोम-सुलतानबाद . शिवाय इतर चांगले रस्तेहि या देशांत आहेत; व यांची एकंदर लांबी ९०० मैल आहे. या देशांतील बाकीचे मार्ग म्हणजे निव्वळ खेंचरांचे आहेत.

रेल्वे.- या देशांत आठ मैल रेल्वे व साडेसहा मैल ट्राम्बे रस्ता होता. इराणी आखातास मिळणाऱ्या कारून नदीतून अहवाझपर्यंत व्यापारी गलबतें चालतात.
       
डाकखातें - १८७४ पर्यंत टपालाचें काम चपर्चिबशि नांवाचा अधिकारी करीत असे. इराण सरकारच्या तैनातींतील आस्ट्रियन अधिकाऱ्यानें १८७७ मध्यें इराणांत प्रथम नियमितपणें टपाल नेण्याची पध्दति प्रचारांत आणिली. व इराणांतील मुख्य मुख्य शहरांमध्यें नियमितपणें चालणाऱ्या टपालाचें दळणवळण सुरु करण्यांत आलें. हा देश व परकी देश यांमध्ये डाक आठवडयांतून दांन वेळ व हिंदुस्थान व इराण यांच्यामध्ये आठवडयांतून एक वेळ जात असते.

तारायंत्र. - इंडोयूरोपियन टेलिग्राफ कंपनीच्या तारा यंत्राशिवाय इराणी सरकारच्या तारायंत्राचें दळणवळण ६३१२ मैलपर्यंत चालतें. एकंदर तारआफिसें १३१ आहेत.

उद्योगधंदे.- मातीची भांडी, कौलें, हत्यारें, कापड, कलाबतूचें व कशिद्याचें काम, धातूंचे काम, लांकडाचें खोदीव काम व चित्रें, हस्तलिखितें, मुलामा देणें, जावाहीर व गायनाची वाद्ये हे जिन्नस व शाली, गालीचे, लोकरी, रेशमी व सुती कापड आणि गुलाबपाणी या देशांत तयार करतात. ताब्रिझ, हमदान, सुलतानाबाद ,व कर्मान हीं शहरें उद्योग धंद्याचीं मुख्य ठिकाणें आहेत.

शेतीत उत्पन्न केलेले पदार्थ- गहूं, जंव, व तांदूळ सर्व जिल्ह्यांत पिकवितात.वाटाणे, बीन, मसूर, चणे, मका, नाचणी, हीं धान्यें देखील सर्वत्र उत्पन्न होतात. फळे उत्तम व विपुल होतात. धान्य व सुकलेली फळें बाहेर देशीं पाठवितात. ताग,तंबाखू, टुटुन नांवाचा तंबाखु,अफू व विपुल रेशीम यांची पैदास होते. गळीताचीं धान्यें, व बटाटे, कोबी व टमाटे वगैरे शाकभाज्या होतात. निरनिराळे डिंग, रंग कापूस व लोकर हे पदार्थ बाहेरदेशी रवाना होतात.

घोडे, खेंचरे व गाढव यांची निपज आतां कमी आहे. येथून पुष्कळ इमारतीलांकूड बाहेरदेशी जातें. कास्पियन समुद्रावरील  मासे धरण्याचा हक्क रशियन कंपनीला १८६८ पासून पट्टयानें देण्यांत आला आहे.  

खनिज पदार्थ - तांबे, शिसे, लोखंड, मँगनीज, जस्त, निकल, कोबल्ट हीं द्रव्यें या देशांत विपुल सापडतात. निशापुरजवळ टर्क्काइझ नांवाच्या रत्नांच्या  खाणी आहेत. मीठ, कर्पूरशिलाजित, चुना, संगमरवरी दगड, संगमरवरी दगडासारखा पांढरा दगड, शंखजिरे, कोळसा हीं द्रव्यें, या देशांत सापडतात. नैफ्था देखील या देशांत सापडतो. खाणींच्या प्रदेशापासून बाजार व बंदरे दूर असल्यामुळें व चांगले रस्ते, विपुल सरपण आणि शास्त्रीयज्ञान या गोष्टीच्या अभावामुळें या देशांतील खनिज संपत्ति मोठया प्रमाणावर खणून काढतां येत नाही.

व्यापार.-ताब्रिज, तेहरान, हमदान, व इस्पहान ही मुख्य व्यापारी ठिकाणें आहेत. बंदर अब्बास , मोहम्मेराह, व बुशायर इराणी आखातावरील व आस्तारा, एन्झेली, मेचेडिस्सार व बंदरग्वेझ ही कास्पियन समुद्रावरील मुख्य बंदरें आहेत. १८९९ मध्यें इराणी सरकारनें अझर्बैजन व कर्मानशहा प्रांतातील, व पुढल्यावर्षी इतर सर्व प्रांतातील जकात मक्त्यानें देण्याची वहिवाट बंद करुन आयात व निर्यात मालावर किंमतीच्या शेकडा ५ सरकारकर बसविला  मुहम्रा कारुन नदीप्रदेश, कुर्दिस्तान, व सिस्तन हे प्रांत व इराणी आखातावरील कांही लहान बंदरे यांच्या बाबतींत यावर्षी ढवळाढवळ केली नाही  तसेच इराणी आखातांतील मोत्यांच्या व्यापाराकडेहि पुढल्या वर्षापर्यंत लक्ष देण्यांत आलें नाहीं. १८५७ मध्यें ग्रेट ब्रिटनशीं झालेल्या व्यापारी तहानें इराणशीं होणाऱ्या ग्रेटब्रिटनच्या व्यापाराला 'विशिष्ट सवलती'  देण्यांत आल्या.  १९०२ मध्यें रशियाशीं तह होऊन १९०३ पासून रशियन मालावर नवीन जकात मुकर करण्यांत आली. याच्या अगोदरच ग्रेटब्रिटनशीं तह होऊन ब्रिटिश आयात मालावर रशियन आयात  मालाइतकीच जकात बसविण्यांत आली. एकंदर व्यापारापैकी शेकडा ५९.६ व्यापार रशियाशीं व २१.३ व्यापार ब्रिटिश राज्याशीं चालतो. त्रिबिझोंद, रेश्त व मेशद शहरांवरुन रशियाला, खोरासान व सिस्तन प्रांतांतून अफगाणिस्तान व हिंदुस्थानला, आणि कर्मानशहा प्रांतातून बगदादला व्यापारी रस्ते गेले आहेत.
कापसाचें कापड, साखर, चहा  लोंकरीचेंकापड, सुत, पेट्रोलियम, लोंकर व कापूस यांचे मिश्र जिन्नस, लोंकर, लोखंडी सामान, आगपेटया, लोखंड, पोलाद, रंग, तांदुळ, मसाले, व काचेचें सामान हे जिन्नस किंमतीच्या मानानें या देशांत येतात. व फळे , गालीचे, कापूस, मासे, तांदूळ, डिंक, लोकर, अफू, रेशमी कापड, कातडी, जनावरें रेशीम, सुताचें कापड, गहूं, जंव, औषधें व तंबाखू बाहेर देशीं रवाना होतात.

जहाजें .-या  देशांत चार मोठीं बंदरे व कित्येक लहान बंदरे आहेत. इराणी आखातांतील जहाजें इराणी सरकारचीं आहेत. कास्पियन समुद्रांत चालणारी जहाजें रशियाचीं आहेत.

नाणीं.- कान नावाचें रुप्याचें नाणें युनिट आहे. पूर्वी पूल व शाही ही तांब्याचीं नाणी चालत असत. परंतु ही नाणी बंद करुन १९०० मध्ये याच नांवाची निकलची नाणी सुरु करण्यांत आली.

राज्यपध्दति - १९०६ पर्यंत इराणची राज्यव्यवस्था मुसलमानी धर्माने घालून दिलेल्या कायद्याप्रमाणे अनियंत्रित राजसत्ताक पध्दतीची होती. शहाला लोक पैंगबराचा मुख्य प्रतिनिधि मानीत असत.  १९०६ मध्यें लोकांनी ओरड केल्यावरुन मुझफर-उद्दनिशाहनें १५६ सभासदांचें  राष्ट्रीय मंडळ (मजलिस-इ-शोरा-इ-मिल्ली) बनविण्याचा हुकूम दिला. चांगल्या वागणुकीच्या पंचवीस वर्षे वयाच्या इराणी पुरुषास हे सभासद निवडण्याचा अधिकार दिला होता. शिपाई व गुन्हेगार लोकांना मत देण्याचा अधिकार नाहीं. सभासद होण्यास इराणी भाषेच्या लेखनवाचनाचें ज्ञान व चांगली वागणूक हे गुण अवश्य होते. परकी मनुष्य, तीस वर्षांहून कमी व ७० हून जास्त वयाचा इराणी मनुष्य, सरकारी नोकरींतील, सैन्य व आरमार खात्यांतील मनुष्य व गुन्हेगार यांना सभासद होतां येत नसे. ७ आक्टोबर १९०६ रोजी हे मंडळ शहानें भरविलें. १९०७ मध्यें राज्यपध्दतीवर शहानें सही केली. या पध्दत्यन्वयें शहा शियापंथाचा असला पाहिजे. त्याचा वारस त्याच्या काजार घराण्यांतील  आईच्या पोटीं जन्मलेला वडील मुलगा अथवा त्याच्या खालचा पुरुष वारस असला पाहिजे. शहाचें खाजगी उत्पन्न ५ लक्ष तोमान (३ लक्ष पौंड) असलें पाहिजे.

कार्यकारी सत्ता सात आठ प्रधानांच्या  प्रधानमंडळाच्या  हाती असे. या प्रधानांच्या संज्ञा येणेंप्रमाणें असत.

प्रधान मंडाळाचा अध्यक्ष
व अंतर्गत कारभराचा मंत्री ,  ______ सेफाह्सालर अझम.
परराष्ट्रीय कारभाराचा मंत्री ,...    ... सारेभेद्  दौलेह.
न्यायमंत्री, ...    ...    ...,    ... अलाउल्-मुल्क.
टपाल व तारखातें यांचा मंत्री,...    ...  सरदार मन्सूर .
युध्दमंत्री, ...    ...    ...    ...... सरदार कबिर .
जमाबंदी मंत्री,...        ...       ...... यामिनोल् - मुल्क.
शिक्षणमंत्री, ...      ...        ...... मोम्ताझोल्- मुल्क.
सार्वजनिक कामांचा मंत्री, ...        ... मोचिर अझम.

देशाचे ३३ प्रांत करुन प्रत्येक प्रांताचा कारभार एका गव्हर्नर जनरलच्या हाती असे, हा मध्यवर्ती सरकारला जबाबदार असे, व याला आपल्या प्रांतातील जिल्ह्यांचा कारभार पाहाण्याकरितां लेप्टनंट गव्हर्नर नेमण्याचा आधिकार असे. गव्हर्नर-जनरल यास वली, फर्मान फर्मा इत्यादि म्हणत, व गव्हर्नर लेप्टनंट गव्हर्नर यांना हाकिम म्हणत. लेप्टनंट गव्हर्नरास नायब-अल-हुकुमाह असेहि म्हणत; लहानशा जिल्ह्याचा कारभारी असल्यास त्याला झाबित म्हणत. प्रत्येक शहरावर एक मेयर अथवा मुख्य मॅजिस्ट्रेट-कलांतर, दरोघा, अथवा बेग्लरबेगी नेमलेला असतो; शहराच्या विभागाच्या  अथवा खेडयाच्या अधिकाऱ्यास केदखोदा म्हणत.  या अधिकाऱ्यांचें मुख्य काम कर वसुल करणें असून यांची नेमणूक बहुतेक लेप्टनंट गव्हर्नर करीत. अथवा कधी कधी यांची निवडणूक नागरीक करीत. बहुतेक गव्हर्नरच्या हाताखाली एक वजीर अथवा पेष्कार असे. हा वजीर हिशेब ठेवी व राज्यकारभाराचीं चिल्हर कामे करी. गुरांचे कळप घेऊन हिंडणाऱ्या लोकांच्या  नायकांस इल्खानी, इल्बेगी, वली, सरदार, शेख, टुष्माल म्हणतात; ज्या प्रांतात यांच्या टोळया हिंडत त्या प्रांताच्या गव्हर्नराजवळ  आपल्या लोकांपासून कर वसूल करुन देण्याची जबाबदारी या नायकांवर असे.

१९०७ मे च्या एका कायद्यान्वये ग्राम व नगर कौन्सिलें निवडण्याची परवानगी दिली. या निवडणुकींत मत देण्याचा अधिकार प्रत्येक इसमास आहे, व या कौन्सिलांचा राष्ट्रीय कौन्सिलाशीं प्रत्यक्ष संबंध असतो.

१९०७ आगष्ट ३१ रोजीं रशिया व ग्रेटब्रिटन यांनी आपसांत ठराव करुन इराणांतील आपली वर्चस्व क्षेत्रें ठरविलीं, त्यांचें क्षेत्रफळ, जकातीचे उत्पन्न व लोकसंख्या  (आकडे १९१३-१४ सालांतील आहेत.) येणेप्रमाणें- ब्रिटिशक्षेत्र १३७००० चौ. मै. ६९०००० लो. सं . उत्पन्न ३८८९८ पौंड. रशियनक्षेत्र ३०५००० चौ. मै.  ६९००००० लो. सं.  उपन्न ६६८२६४ पौंड.तटस्थक्षेत्र १८८००० चौ. मै . १९१०००० लो. सं. उत्पन्न १३५१३१ पौंड.

परंतु १९१३ मध्यें सीस्तान (ब्रिटिश क्षेत्र) चें उत्पन्न खोरासान (रशियन क्षेत्र) च्या उत्पन्नांत मिळविण्यांत आलें, व तटस्थ क्षेत्रातलें उत्पन्न कर्ज व अगाऊ दिलेल्या रकमा यांबद्दल इंग्लंडजवळ तारण गहाण ठेवण्यांत  आलें. इराणमध्ये सध्या लोकानुवर्ती राजसत्ता आहे. १९२४ च्या प्रारंभी शहाला हांकलून दिल्यावर लोकसत्ता होण्याचा संभव होता पण ती प्रस्थापित झाली नाही.    
धर्म.- या देशांत सरासरी ९० लक्ष लोक शिया पंथाचे व ८ लक्ष अथवा ९ लक्ष लोक सुनी पंथाचे  मुसुलमान आहेत; ८० ते ९० हजार ख्रिस्ती, (आर्मिनियन नेस्टोरियन, ग्रीक आर्थोडॉक्स रोमन कॅथोलिक व प्रॉटेस्टंट) ३६००० यहुदी व ९००० झोरास्ट्रियन लोक आहेत.

शिक्षण.-प्राथमिक शिक्षणाच्या शाळांतून इराणी भाषा, थोडेसें आरबीचें ज्ञान व थोडेसे गणित सातपासून बारा वर्षांच्या मुलास शिकवितात. या शाळा (मकताब) असंख्य आहेत, विद्यालयें मद्रसा प्रत्येक शहरांत आहेत. येथे विद्यार्थ्याना शिक्षण, भोजन व राहणे मोफत मिळते.

अलीकडे शिक्षण खात्यांत सुधारणा होऊन सर्व शिक्षण यूरोपीय पध्दतीने दिले जाते. स्त्रीशिक्षणाचीहि वाढ झाली आहे. सध्यां सुमारें १८० शाळा आहेत. तेहरान येथे एक १८४९ मध्ये धंदेशाळा स्थापन झाली तींत बरेच यूरोपीय प्रोफसर असून त्या शाळेचा शास्त्रीय प्रगतीस बराच उपयोग झाला. एक  फ्रेंच शाळा तेहरान येथे आहे. शहानें तेहरान येथे लष्करी व पाश्चिमात्य शास्त्रीयज्ञानाच्या शिक्षणाकरितां इतर शाळा स्थापल्या आहेत. आर्मेनियन, प्रॉटेस्टंट, व रोमन कॅथोलिक मिशनें शिक्षणाच्या कामी बरीच मदत करतात.

सैन्य- १८०७ पर्यंत येथे खडे सैन्य नव्हते. नंतर काही पायदळ पलटणे (सर्बाझ) तयार करण्यांत आली. फ्रेंच, ब्रिटिश, आस्ट्रियन व रशियन लष्करी अधिकारी बोलावून त्यच्यांकडून कवाईत शिकवून सैन्य तयार करण्यांत आले. सालीनां लष्करी खर्च संस्थानच्या उत्पन्नाच्या १/३ इतका आहे. मध्यंतरी रशियाने तेहरान व ताब्रिज येथे कोसॅक रेजिमेंट तयार केल्या होत्या. त्यांत शिपायी इराणी असून अधिकारी रशियन असत हल्ली त्याचा खर्च इंग्रज चालवितात.

आरमार.-इराणी सरकारजवळ नऊ आगबोटी व पांच बोटी (लॉच) आहेत. या देशाचें आरमार फार क्षुद्र आहे, कारण एकच बोट आहे व ती जकात वसुलीच्या कामी वापरतात.

न्याय.-गव्हर्नर व त्यांचे प्रतिनिधि उर्फ म्हणजे न लिहिलेला, अथवा प्रचारांतील कायद्याप्रमाणें, व शेख-उल्-इस्लाम आणि इतर धर्मोपदेशक शार म्हणजे लिहिलेल्या अथवा ईश्वरप्रणित कायद्याप्रमाणे इन्साफ करतात. या कोर्टाची चौकशी नेहमी संक्षिप्त असते. १८८८ मध्ये एक जाहीरनामा काढून कोणीहि इसमास इत:पर कायद्याने चौकशी केल्याशिवाय शिक्षा होणार नाही व प्रत्येकास जीवित स्वातंत्र्य राहील असे शहाने जाहीर केले. पोलीस यूरोपियन पध्दतीवर बनविले आहे. शिवाय परकी गुन्हेगारांची चौकशी त्यांच्या राष्ट्रांच्या इराणांतील प्रतिनिधिकडून होते.

जमाबंदी-इराणांतील उत्पन्नाच्या बाबी (१) जमीन, गुरांचे कळप, व्यापारी, शिल्पकार यांच्यावरील कर, (२) सरकारी जमिनीवरील महसूल,(३) जकात, (४) सरकारी मक्त्यांचे भाडे या आहेत.  १९११-१२ साली उत्पन्न २०४२८५० पौंड व खर्च १६०८६०० पौंड झाला. १९१३-१४ साली उत्पन्न १४८०७७८ पौंड होते.

पेढया.-१८८९ मध्ये शहाने बॅरन ज्युलिअस डि रूटर नांवाच्या इसमास इराणची स्टेट बँक बनविण्याची परवानगी दिली. ही बँक १८८९ च्या आक्टोबरमध्ये 'इराणची इंपीरियल बँक' या नांवाने सुरु झाली. या बँकेचे मंजूर केलेले भांडवल ४० लक्ष पौंड होते, परंतु हे पुढे वाढविता येत होते. इराणी सरकारच्या परवानगीशिवाय ८ लक्ष पौंडापर्यंत किंमतीच्या नोटा काढण्याचा अधिकार या बँकेस दिला होता. बँक निघाल्यानंतर पहिली दोन वर्षेपर्यंत शेकडा ५० व नंतर शेकडा ३३ रोकड ठेव या बँकेस ठेवावी लागत असे. इराणी राज्यांतील लोखंड, तांबे, शिसें, पारा, कोळसा, पेट्रोलियम, मँगनीज, बोराक्स, व अॅसबेस्टॉस या खनिज द्रव्यांच्या खाणी खणण्याचे अगोदरच कोणासहि न दिलेले हक्क या बँकेस देण्यांत आले. १८९० च्या एप्रिलमध्ये या बँकेने न्यू ओरियंटल बँक कार्पोरेशन (लंडन) हिचा इराणांतील सर्व व्यवहार आपल्या ताब्यांत घेतला. १८९० च्या एप्रिलमध्ये स्थापन झालेल्या पर्शियन बँक ऑफ मायनिंग राईटस कारपोरेशन लिमिटेड या बँकेस खाणी खणण्याचे हक्क दिले होते. व जानेवारी १८९४ मध्ये हिचे दिवाळे निघाले. तेहरान येथे 'बँक्वे डि एस्कॉम्प्टे' नांवाची एक रशियन बँक होती हिलाच पूर्वी 'बँक्वे डेस् प्रेटस् डि पर्से' म्हणत असत. (ही रशियन स्टेट बँकेला जोडलेली होती. व हिनेंच १९०० व १९०२ मधील इराणी कर्ज जमविले होते).  तेहरान येथे एक मोठया पगाराचा  इराणांतील रशियन जमाबंदी एजंट नांवाचा अधिकारी कायमचा असे. १९०७ फेब्रुवारी  ७ रोजी नॅशनल बँक नांवाच्या एक पेढीस व १९०७ जुलै पासून तीस वर्षे मुदतीची एक जर्मन पेढी स्थापन करण्याची परवानगी दिली गेली होती, परंतु (जानेवारी १९१३ पर्यंत) यांपैकी एकहि पेढी स्थापन झाली नव्हती. इराणला रशिया व ब्रिटिश कर्ज बरेच आहे. १९१८ मध्येच ब्रिटिशांनी दीड कोटी क्रान कर्ज दिले आहे.

इतिहास.- इराणचा प्राचीन इतिहास ज्ञानकोश विभाग चवथा बध्दोत्तरजग पर्शुभारतीय संस्कृति या प्रकरणांत दिला आहे. त्या ठिकाणी सस्सन घराण्याचा अंत होऊन इराण देश अरबांच्या ताब्यांत गेल्यापर्यंतच कथासूत्र आहे.

परकी राज्यकर्ते.-पुस्सन घराण्याचा  लय झाल्यापासून तैमूरच्या मृत्यू (१४०५)  पर्यंतच्या कालास संक्रमण काल म्हणतां येईल. सॅसेनिड घराण्याचा अखेरचा पराभव झाल्यापासून इराणचे राजकारणघटक या स्वरुपाचे महत्व नाहीसे झाले, व या देशावर परकी राजे एकामागून एक होऊन गेले. या राज्यकर्त्यांनी या देशाच्या प्राचीन संस्था अथवा धर्म यांची मुळीच निगा ठेविली नाही. सुमारे दीडशे वर्षेपर्यंत या देशावर मुसुलमान खलिफांचे अधिकारी प्रथम मदिनाहून व नंतर बगदादहून कारभार चालवीत असत. यांचा मुख्य हेतु या देशांतील धर्म नष्ट करुन इराणी लोकांचे राष्ट्रीय तेज नाहीसे करण्याचा होता. या धोरणाचा परिणाम असा झाला की, इराणांतील लोकांनी मुसुलमानी धर्म अगदी वरकरणी स्वीकारला; व इराणांतील लोकांनीच उमईद खलिफांच्या जागी अब्बासी खलिफांची स्थापना केली. ही गोष्ट घडून येण्याच्या अगोदर साहसी लोक व असंतुष्ट मुसुलमान अधिकारी खलिफावर स्वारी करण्याच्या कामी इराणी लोकांचा उपयोग करुन घेत असत.व पूर्वेकडील देश काबीज करण्याकरितां इराणांत अरबी सैन्य वारंवार येत असे. पहिल्या मेरवानच्या कारकीर्दीत मोखतार नांवाच्या अधिकाऱ्याच्या हाताखाली इराणी लोकांनी कुफा शहरांत स्वातंत्र्य जाहीर केले परंतु त्यांचा लवकरच पराभव झाला. यानंतर बरीच बंडे झाली परंतु खलिफांनी ती सर्व मोडून टाकली; व अबदल मलीक (मृत्यु ७०५) याने मुसुलमानी नाणी प्रचारांत आणून व अरबी भाषा सर्व राज्यांत दत्परी भाषा करुन मुसुलमानी सत्ता मजबूत केली. नंतर खोरासानचा अरबी सुभेदार कोटीबा बिन मोस्लिम याने इराण आणखी जेरीस आणला. दुसऱ्या उमरने झकात नांवाचा कर खेरीज बाकीच्या सर्व करांची अरबी नसलेल्या मुसुलमानांनां माफी दिली. यामुळे पुष्कळ इराणी लोक इस्लामी धर्माची दीक्षा घेऊन शहरांत जाऊन राहिले व शियापंथी धर्मोपदेशकांच्या आधिपत्याखाली त्यांनी राजद्रोही संघ स्थापन केले. दुसऱ्या यजिदच्या (७२०-७२४) कारकीर्दीत खोरासन प्रातांत भयंकर बंडे झाली व हिशमच्या  (मृत्यु ७४३) वेळी ही अंदाधुंदी अब्बासी व शिया पंथी धर्मोपदेशकांच्या प्रोत्साहनानें वाढतच चालली. अखेरीस दुसऱ्या मेरवानच्या वेळी अरब नसलेल्या मुसुलमानानी अबु मोस्लिम नांवाच्या मौलानाच्या आधिपत्याखाली मोठे सैन्य जमा केले, खलिफाच्या सेनापतीस पळावयास लावले व अखेरीस मेरवानला हाकून लाविले. येणेप्रमाणे अब्बासी इराण व अरबी राज्य यांचे मालक बनले. इराणी लोकांच्या मदतीने अब्बासी खलिफांना राज्यप्राप्ति झाल्यामुळे यापुढे इराणी लोकांना त्यांचे नष्ट झालेले राष्ट्रीयत्व पुन्हां प्राप्त होऊं लागले अब्बासी हे एक इराणी घराणे होते व या लोकांनी अरबांची ज्ञातिपध्दति नष्ट करुन जुलुमाने राज्य केले. खोरासान  प्रांताचे लोक जुन्या अलिद घराण्याच्या वतीने लढले होते व अबु मोस्लिमचा खून झाल्यावर शियापंथी लोकांमध्ये अस्वस्थता पुन्हां  माजली. हरुन-अल-रशीद खलिफाच्या कारकीर्दीत खोरासानमध्ये बंड झाले व हे बंड खलिफाने स्वतः मोडले. लवकरच समरकंद येथे बंड झाले व ते बंड मोडण्यास हारुन निघाला असतां (८०९) तो तुस येथे मरण पावला. हरुनचे मुलगे अमिन व मामून यांमध्ये गादीबद्दल तंटा लागला. अमिन खलीफ झाला; परंतु ताहीरच्या मदतीने मामूनने अमिनला पदच्युत करुन ठार केले व स्वतः खलीफ बनला. ताहीरला खोरासानचा सुभेदार (८२० मध्ये) नेमण्यांत आले व याने या देशात एक स्वतंत्र घराणे स्थापिले. हें नांवाला बगदादचे अंकित असे.  ८७३ पर्यंत या घराण्याची सत्ता खोरासानवर चालत होती. मोतासिम खलिफाच्या कारकीर्दीत  मझ्दपंथी इराणी लोकांचे व बिझांशिअमच्या लोकांचे बंड व ताबरिस्तानमधील बंडे कष्टाने मोडण्यांत आली. दहावा खलीफ मोतावाक्की यांच्या कारकीर्दीत याकूब बिन लैथ अल-सफर  याने ताहिरि घराण्याचा मोड करुन सिस्तन प्रांतात सफारि घराणे स्थापिले.

कनिष्ठ घराणी.-इराणच्या बऱ्याच भागांत व सरहद्दीवरील प्रदेशांत बरीच घराणी स्थापलेली होती. ८७९-९३० पर्यंत अझबैंजन प्रांतांत साजिद घराणे राज्य करीत होते व ताबरिस्तानमध्ये ८६४-९२८ पर्यंत अलिद घराणे स्वतंत्र होते, नंतर सॅमॅनिद घराण्याने त्याचा मोड केला. या काळांत तुर्की अधिकाऱ्यांच्या सत्तेमुळे खलिफांचा झपाटयाने ऱ्हास होत होता. चौदावा अब्बासी खलिफ याने तुर्की अधिकारी काढण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. नंतर मोतामिद खलीफ झाला. याकूब सफारिद याने या खलिफावर हल्ला केला; परंतु त्याला पळावे लागले . याकूबचा भाऊ अमर याने (८७८-९००) राज्य केले; परंतु इस्मायल बिन अहमद सॅमॅनिद याने त्याला कैद केले.                                                  
                     
सॅमॅनिद घराणें : - यानंतर सफारिद घराणें (९०० ते १२२९) हें सॅमॅनिदांचे वेळी नामधारी सत्ताधीश होतें. तिसऱ्या यझ्देगर्दनंतर सॅमॅनिद याच एकटया अरब नसलेल्या इराणी घराण्यानें इराण व ट्रॅन्सॉक्सियाना या देशांवर सत्ता चालविली. याच्या कारकीर्दीत विद्या व कला यांची भरभराट झाली. अखेरीस सबक्तगीनच्या गझनवी घराण्यानें या घराण्याचा मोड केला.

मोतादिदच्या वेळीं मेसापोटेमियांतील खारिजाइट घराण्याचा मोड झाला. हें पुढें महत्त्वाचें घराणें झालें. नंतर खलीफांस उतरती कळा लागली व इराणांतील मोठया घराण्यांनी आपलें स्वातंत्र्य जाहीर केलें. काहिरच्या (मृत्यु ९३४) कारकीर्दीत इराणमध्यें बुयिद नांवाचें घराणें उदयास आलें. हें घराणें सस्सन घराण्यांतील अबु शाजा बुया नांवाच्या पुरुषापासून निघालें होतें. हा पुरुष डैलामचा नायक होता. याचा एक मुलगा इमाद-अद्दौला हा कारानचा सुभेदार, दुसरा रोकन अद्दौला हा राय व इस्पहान प्रदेशाचा व तिसरा मुलगा मोइझ अद्दौला हा कर्मान, अहवाझ व बगदाद प्रांतांचा सुभेदार झाला.

मोत्ताकी खलिफाच्या कारकीर्दीत डैलामाईट, तुर्क व हम्दानिद लोकांमध्यें एकसारखे तंटे चालू होते. बुयिद घराणें वरपांगी खलिफाची सत्ता कबूल करीत होते; पण वास्तविक त्याची सत्ता अमर्याद होती. बुयिद घराण्यानें शहाणपणानें बगदादवर राज्य केलें व निरनिराळीं लोकोपयोगी कामें करून या शहराची बरीच सुधारणा केली. इराणी आखातापासून कास्पियन समुद्रापर्यंत यांची सत्ता चालत होती. अखेरीस आपसांतील भांडणामुळें या घराण्यास उतरती कळा लागली व गझनवी घराण्यानें याचा सहज मोड केला. मध्यंतरी (९९९ मध्यें) सॅमॅनिद घराण्याचा तुर्कस्तानच्या इलेकखानांनीं नाश केला.

गझनवी घराणें : - इराणी राजकारणाचें केंद्र आतां पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलें. आतांपर्यंत वरील सत्ता बगदादच्या नामधारी खलिफांच्या हाती असे व आतांपर्यंत वर्णिलेल्या सर्व घराण्यांनां खलिफापासून सत्ता प्राप्त होत असे. गझनवी व सेल्जुक घराण्यांचा उदय झाल्यापासून खलिफांची स्वतंत्र सत्ता नाहींशीं झाली. गझनवी घराण्यानें थोडयाच अवकाशांत इराणांतील बहुतेक देश्य घराण्यांचा नाश केला. पहिला मन्सूर सॅमॅनिद आपल्या मालकाशीं भांडून अफगाणिस्तानांत जाऊन राहिला व या देशांत त्यानें एक बहुतेक स्वतंत्र असें राज्य स्थापन केलें. याचा तुर्की गुलाम अलप्तगीन हा गझनवी घराण्याचा मूळ पुरुष होता. मन्सूरच्या मागून तीन दुर्बल सुभेदार झाले. नंतर ९७७ मध्यें पूर्वी गुलाम असलेल्या सबक्तगीनच्या हातीं सत्ता गेली. सॅमॅनिद घराण्याचा तातार इलखानानें मोड केला. सबक्तगीनचा मुलगा प्रसिध्द महमूद यानें सॅमॅनिद व तातार लोकांचा पराभव करून सुलतान ही पदवी धारण केली व खोरासान, ट्रॅन्सॉक्सियाना व वायव्येकडील हिंदुस्थानचा बराच भाग या प्रदेशावर आपली सत्ता बसविली. महमूद मोठा विजयी पुरुष होता व जेथें जेथें त्यानें स्वारी केली तेथें तेथें त्यानें महंमदी धर्म स्थापन केला. महमूद विद्येचा आश्रयदाता होता. याच्या वेळीं फर्दोंसी कवीनें शहानामा (राजांचें पुस्तक) ग्रंथ लिहिला. याच्या वंशजांची सत्ता ११८७ पर्यंत चालू होती; परंतु ११५२ मध्यें त्यांचें हिंदुस्थानांतील राज्य घोरी घराण्यानें घेतलें. याच्या अगोदरच याचे इराणांतील कांहीं प्रांत सेल्जुक लोकांनीं हिरावून घेतले होते. महमूदाचा मुलगा पहिला मासउद याच्या कारकीर्दीत सेल्जुकांनीं खोरासान प्रांत घेतला. १३०७ मध्यें मर्व्ह, निशापूर हीं शहरें व पुढील अठरा वर्षांत सेल्जुकांनीं बल्ख, जॉर्जन, ताबरिस्तान, ख्वारिझम, हमदान, राइ, इस्पहान व अखेरींस बगदाद (१०५५ त) हीं ठिकाणें घेतलीं. अब्वासी खलिफ सेल्जुकांच्या संरक्षणाखालीं आले व त्यांचा बाह्यात्कारी सर्व प्रकारचा मान सेल्जुक लोक राखीत असत. सेल्जुकांचें राज्य पश्चिमेस आशियामायनर व पूर्वेस हिंदुस्थान व मध्य आशियापर्यंत पसरलेलें होतें.

तोव्रुल बेग, आल्प आर्स्लान व मलिकशहा हे पहिले तीन सेल्जुक राजे होऊन गेले. मलिक शहाच्या मरणानंतर त्याचे मुलगे बार्कियारोकू महंमद व सिंजार यांच्यामध्यें यादवी सुरू झाली. याचा परिणाम असा झाला कीं, सिंजार मरेपर्यंत (११५७) सेल्जुकांच्या खऱ्या वारसांचे हातीं नामधारी सत्ता मात्र होती व याच घराण्याच्या इतर शाखांनीं राज्याच्या निरनिराळया प्रांतांत सिरीया, रूम (आशियामायनर) कर्मान, इराक व कुर्दिस्तान यांत स्वतंत्र राज्यें स्थापन केलीं.

सेल्जुकांचे राज्य मूळचें लष्करी होतें. याची त्यांच्या स्वत:च्या अधिकाऱ्यांवर सत्ता नव्हती व तुर्की गुलामांच्या हातीं हे अधिकार देत असत. हे अधिकारी स्वामिभक्त नसत. इराणांत मोगल लोक येण्यापूर्वी फार्स प्रांतांत, तुर्की सरदार सलाघार यानें स्थापलेलें सेलघॉरि घराणें होऊन गेलें. या घराण्यांतील शेवटची राजकन्या आबिश (मृत्यु १२८७) हिचा हुलागूचा मुलगा मांगू तैमूर याशीं विवाह झाला होता.

ख्वारिझम : - ख्वारिझमच्या शहांचा मूळ पुरुष गझनीचा तुर्की गुलाम अनुष्तजिन हा होता. हा प्रथम सेलुजुक मलिक शहाचा पेला धरणारा हुजऱ्या होता. नंतर १०७७ मध्यें ख्वारिझम (खिव) चा सुभेदार झाला. नंतर ११३८ मध्यें या घराण्यांतील तिसरा पुरुष अत्सिझ यानें बंड केलें, परंतु सिंजारनें त्याचा पराभव करून त्याला हांकून लावलें, पण लवकरच तो परत आला. इल-आर्स्लान, सुलतान शहा महमूद, तुक्श (११७२-११९९), अलाएद्दिन महंमद (११९९-१२२०) व जेलालुद्दीन हे या घराण्यांतील शहा होऊन गेले. तुक्शनें खोरासान, राइ, इस्पहान हे प्रांत व अलाएद्दीननें बहुतेक सर्व इराण, बुखारा, समरकंद, ओट्रार, गझनीं हे प्रदेश जिंकले. १२३१ मध्यें शेवटचा शहाजेलालुद्दीन यास हद्दपार करण्यांत आले व येणेप्रमाणें ख्वारिझम शहांच्या राज्याचा नाश झाला.

अब्बासी खलिफ बगदाद येथें नामधारी राजे असतांना खरी सत्ता चाळीस लहान घराणीं व सहा मोठीं घराणीं यांच्या हाती होती. ८७४-१२३१ पर्यंत सॅमॅनिद, बुयीद, गझनवी, सेल्जुक, सेलघॉरि व ख्वारिझमचे शहा ही घराणीं इराणचें राज्य वस्तुत: करीत होती.

मंगोल लोक. - बाराव्या शतकाच्या अखेरच्या वर्षांत मोंगोल लोकांनी पश्चिमेकडे चाल केली व काजाकिटैचें प्राचीन राज्य जिंकून त्यांनीं ख्वारिझमच्या शहांचें राज्य घेतलें. जेंगिझखान १२७२ मध्यें मेला, व कास्पियन समुद्रापासून पिवळया समुद्रापर्यंत पसरलेलें त्याचें राज्य त्याच्या मुलांमध्यें वाटून देण्यांत आलें. इराणच्या काहीं भागाचा जगताईच्या राज्यांत व बाकीच्याचा गोल्डन होर्ड (सोनेरी टोळी) च्या प्रदेशांत समावेश होत असे. इराणचा खरा सुभेदार टुलुइ अथवा टुले होता. याचा मुलगा हुलागू अथवा हुलाकू हा इराणचा पहिला राजा झाला. हा १२५६ मध्यें गादीवर बसला. यानें इराणांतील देश्य घराणीं एकदम नाहीशीं केली व १२५८ मध्यें बगदाद घेतलें आणि अडतीसाव्या अब्बासी खलीफाचा वध करून खलीफाचा नायनाट केला. हुलागू व त्याचे वंशज यांचें राज्य उत्तरेंस जगताईच्या राज्यापासून दक्षिणेस इजिप्त पर्यंत व पश्चिमेस बिझान्शियमपासून चीनपर्यंत पसरलेलें होतें. हुलागूनें अझबैंजन प्रांतांत मराघा येथें आणली राजधानी केली व एक वेधशाळा स्थापली. याच्या सांगण्यावरून नासिरुद्दीन तुसीनें झिद्जि-इल-खानि नांवाचीं ज्योतिष शास्त्रीयं कोष्टकें केली. हुलागू १२६५ मध्यें मेला. याच्या मागून याचा मुलगा अबाघ गादीवर बसला. हा स्वभावानें शांत होता व यानें शहाणपणानें राज्य करून देशांत शांतता राखली व देशाची भरभराट केली. जेंगिझखानाच्या वंशांतील इतर मंगोल राजांचीं दोन बंडें यानें मोडली. याचा भाऊ निकुदर हा याच्या मागून १२८१ मध्यें गादीवर बसला. यानें इस्लामी धर्माची दीक्षा घेतली व ख्रिस्ती लोकांचा छळ केला. मंगोल लोक इस्लामी धर्माचा तिटकारा करीत असत. मंगोल व ख्रिस्ती लोक यांची सहाजिकपणें निकुदराविरुध्द एकी झाली व निकुदर १२८४ मध्यें मारला गेला. मंगोल नायकांनीं अवाघचा मुलगा अर्घन यास गादीवर बसविलें. याची कारकीर्द अंदाधुंदीची होती. याच्या पहिल्या दोन वजीरांचा वध करण्यांत आला. तिसरा वजीर साद अद्दौला नावांचा यहुदी वैद्य होता. याची जमाबंदी व्यवस्था फार दूरदर्शीपणाची होती. परंतु यहुदी लोकांनां यानें सरकारी नोकऱ्या जास्त दिल्यामुळे मंगोल सरदारांनीं याचा १२९१ मध्यें खून करविला. हुलागूचा नातू बैदुखान याचे बंडहि अर्घनच्या कारकिर्दीत झालें होतें. हा राजा सादच्या खुनानंतर लवकरच मेला. याच्या मागून कैख्गतु गादीवर बसला. याचा १२९५ मध्यें बैदुखानानें खून केला. अर्घनचा मुलगा गझन महमूद यानें बैदूचा खून करून गादी (१२९५-१३०४) बळकावली. गझन फार कर्तृत्वान पुरुष होता. यानें लष्करी जमाबंदी व न्यायखात्यावर कायमचे अधिकारी नेमले; नाणी, वजनें व मापें यांची कायम पध्दति ठरविली, व घोडेस्वारांकडून टपाल नेण्याची तजबीज केली. यानें इजिप्तवर जय मिळविला. १३०३ मध्यें याच्या सैन्याचा मर्ज अल सफर येथे पराभव झाला व मंगोल लोकांनीं सिरिया देशावरील हक्क सोडला. इस्लामी धर्म निश्चितपणें स्वीकारणारा पहिला मंगोल राजा अशी गझनची ऐतिहासिक ख्याति आहे. हा १३०४ मध्यें मेला. याच्या मागून याचा भाऊ उल्जैतु गादीवर बसला. तातारवरील विजयी लढाई व ताब्रिजहून सुलतानिया शहरास राजधानी नेणे या याच्या कारकिर्दीतील मुख्य गोष्टी होत. हा शियापंथी होता, हा १३१६ मध्यें मेला व याचे मागून याचा मुलगा अबुसाइद गादीवर बसला. याच्या कारकिर्दीत इजिप्तच्या मामेलुक राजांशीं निश्चित तह करण्यांत आला. याला त्याचे वजीर व सरदार यांजपासून फार त्रास झाला. अमीर हुसेनची बायको व अमीर चुपानची मुलगी बगदाद खातून हिच्या विलक्षण मोहामुळें याला फारच त्रास झाला. हा १३३५ मध्यें मेला व याच्या बरोबरच इराणांतील पहिल्या  मंगोल अथवा इलखान घराण्याचा शेवट झाला. या वेळी खरी सत्ता चुपान, हुसेन जेलैर व त्याचे धाकटा हसन व थोरला हसन नांवाचे मुलगे यांच्या हाती होती.या दोघां हसनांनीं कांहीं नामधारी राजे प्रथम गादीवर बसविले व १३४४ नंतर हसन बुझुर्ग (थोरला) हा पहिला जेलैरिदखान म्हणून गादीवर बसला.

इतर घराणी : - अबु साइदच्या वेळेपासून इराणवर पांच घराण्यांची सत्ता चालत होती. (१) जेलैरिद, (२) मोझफरिद, (३) सर्बादरिद, (४) बेनि कुर्त, (५) ज्युबानियन हीं ती घराणीं होत. याचा तैमूरच्या सैन्यानें नाश केला.

तैमूरची सत्ता इराणमध्यें १३९५ पासून त्याच्या मृत्यू (१४०५) पर्यंत अव्याहत चालत होती. त्यानें एका मागून एक विजय संपादन केले, परंतु जिंकलेले प्रांत त्याच्या कारकिर्दीत कधीच व्यवस्थित नव्हते. पराजित केलेलीं घराणीं वारंवार बंडें करीत व त्याला मंगोल लोकांच्या टोळयांचाहि बंदोबस्त करावा लागे. त्याच्या वंशजांची सत्ता इराणावर फार थोडा काळ टिकली; व शहारुख (१४०९-१४४६) व अला अद्दौला (१४४७) या राजांनंतर तैमुरी घराण्याची इराणवरील सत्ता नाहींशी झाली.

तैमूरच्या मृत्यूपासून सफाविद घराण्याचा ऱ्हास होईपर्यंत (१४०५-१७३६)

तैमूरचे वंशज (तैमुरी) व तुर्कोमन लोक (इसवी सन १४०५-१४९९). - तैमूर आपल्या वयाच्या ७० व्या वर्षी चीनवर स्वारी करण्याच्या सुमारास १४०५ मध्यें मेला. ट्रॅन्सॉक्सियाना, कॉकेशस, आस्ट्राखान, खालचा व्होल्गा प्रदेश, मेसापोटोमिया, सिरीया, आशियामायनर, अफगाणिस्तान, हिंदुस्थान या प्रदेशांशिवाय १९ व्या शतकांतील आशियांतील रशियाचा विस्तृत प्रेदश व अस्ट्राबादपासून होर्मझपर्यंतचा इराण देश या अवाढव्य प्रदेशावर तैमूरचें राज्य पसरलेलें होतें.

तैमूरच्या हयातींत त्याच्या मिरनशहा नांवाच्या तिसऱ्या मुलानें इराणच्या कांहीं भागावर राज्य केलें होतें, परंतु हा वेडा असल्यामुळें तैमूरनें गादीवरील त्याचा हक्क काढून आपल्या एका मृत पुत्राचा पुत्र पीर महंमद याला गादीचा वारस म्हणून जाहीर केलें होतें; परंतु मिरनशहाचा मुलगा खलिलशहा यानें गादी पटकावली. परंतु शादुल्मुल्क नांवाच्या राखेच्या सहवासांत पुष्कळ पैसा व काळ घालविल्यामुळें त्याला पदच्युत करून १४०८ मध्यें त्याचा चुलता शहारुख खोरासानचा सुभेदार हा गादीवर बसला व खलिलशहाला राज्यपद सोडून खोरासानचा सुभेदार व्हावें लागलें. १४०९ मध्यें खलिलशहा मरण पावला.

शहारुख हा तैमूरचा चौथा मुलगा होता. यानें अडतीस वर्षे राज्य केलें व हा शूर, उदार, आणि सुसंस्कृत राजा होता. यानें आपली गादी समरकंदहून हिरात शहरीं आणली. याच्या कारकिर्दीत हिरात व मर्व्ह या शहरांची भरभराट झाली. सर जॉन माल्कम यानें या शहाच्या दरबारच्या ऐश्वर्यांचें व यानें केलेल्या शास्त्रीय शिक्षण व विद्या यांच्या उत्कर्षाचें वर्णन केलें आहे. यानें चीनला एक वकील पाठविला होता व यानें पाठविलेला अबदुर रझ्झाक नांवाचा प्रवाशी हिंदुस्थानांत आला होता. आशियामायरनमधील कारा कुयुन अथवा 'काळी मेंढी' नांवाच्या तुर्कोमन लोकांनीं या शहाच्या ताब्यांतील तांब्रिज शहरांवर चाल केली होती. इ. स. १४४६ मध्यें शहारुख मेल्यावर त्याचा मुलगा उलूघबे त्याच्या गादीवर बसला. या शहाची विद्याकलाभेरूचि याचें नांव धारण करणाऱ्या ज्योतिषशास्त्रीय कोष्टकांवरून व्यक्त होते. शिवाय हा स्वत: कवि व विद्येचा आश्रयदाता होता. यानें समरकंद शहरीं एक विद्यालय व वेधशाळा बांधली. तैमूरशहानें कास्पियनसमुद्राच्या दक्षिणेस जिंकलेल्या प्रदेशास यानें बळकटी आणल्याचा कांहीं एक पुरावा नाहीं. याला याचा मुलगा अबदुल लतीफ यानें ठार मारलें व सहा महिन्यांनीं अबदुल लतीफला त्याच्या खुद्द शिपायांनीं ठार केलें. तैमूरच्याचं वंशांतील एक वडील पुरुष बाबर (इतिहासप्रसिध्द मोंगल बादशहा नव्हे) नंतर गादीवर बसला व थोडाकाळ राज्य करून मरण पावला. याच्या मागून मिरनशहाचा नातू अबुसाहद यानें गादीवर हक्क दाखविला. व उझबेग तातारशीं दोस्ती करून यानें बुखारा व खोरासान प्रांत घेतले व कारा कुयुन नांवाच्या तुर्कोमन लोकांवर स्वारी केली. परंतु अखेरीस उझन हसननें त्याला कैद करून १४६८ मध्यें ठार मारलें.

अबदुल लतीफ मेल्यानंतर अठरा वर्षांत घडलेल्या इराणी इतिहासांतील थोडयाशा गोष्टींच्या तारखा देणें शक्य नाहीं. अबु साइदचा वडील मुलगा सुलतान अहमद बुखारा येथें व त्याचा भाऊ उमर शेख फर्घना प्रांतांत राज्य करीत होता. उमरचा मुलगा इतिहासप्रसिध्द बाबर याला उझबेगांनीं काबूल व हिंदुस्थानकडे हांकून लावलें होतें. तैमूरचा मुलगा उमर शेख याचा पणतू सुलतान हुसेन मिर्झा यानें हिरात येथें १४८७-१५०६ पर्यंत राज्य केलें. मिर्खोंड, व रव्वादामिर नांवाचे इतिहासकार, जामि व हातिफी कवी व इतर विद्वान लोक यांचा हा शहा आश्रयदाता होता. परंतु मध्य व पश्चिम इराणवर याची कधींहि सत्ता नव्हती. इराणच्या या भागावर अबुसाइदच्या मरणानंतर आक कुयुन (पांढरी मेंढी) चा नायक उझन हसन यानें काराकुयुन (काळी मेंढी) चा नायक जहान शहा याचा पराभव व वध करून, सत्ता चालविली होती. या दोन्ही टोळयांमध्ये हाडवैर होतें. या दोन्ही टोळयांतील लोक आशियामायनरमधील रहिवाशी असून 'काळया मेंढी' च्या टोळीतील लोकांनीं व्हान येथें व 'पांढऱ्या मेंढी' च्या टोळींतील लोकांनीं डायार्बेकर येथें आपली सत्ता स्थापली होती.

उझन हसनच्या दरबारी कॅटॅरिनो झेनो, बार्बरो, व काँटॅरिनि हे व्हेनिसचे वकील आले होते. हसनने डेस्पिना नांवाच्या ग्रीक स्त्रीशीं लग्न लावलें होतें व झेनोची बायको, डेस्पिनाची पुतणी असल्यामुळें झेनोच्या चिथावणीवरून हसननें तुर्कस्तानवर स्वारी केली होती व या स्वारींचा परिणाम शहास फार घातुक झाला होता. तॉरिस (ताब्रिझ) शहर या शहाची राजधानी होती. हा शहाणा व शूर राजा होता. जुन्या इतिहासकारांनीं या शहाला अलिम्बियस, असेम्बियस, असेम्बेक, असिम्बेओ, अथवा उसन कॅसॅनो अशीं नावें दिलीं आहेत, त्यामुळें हा शहा कोणता होता हें निश्चितपणें सांगतां येत नाहीं. अकरा वर्षे राज्य करून आपल्या वयाच्या सत्तराव्या वर्षी १४७७-१४७८ मध्यें हा मेला. याच्या मागून याचा मुलगा याकूब आपल्या भावास ठार मारून गादीवर बसला, परंतु याच्या बायकोनें याला विषप्रयोग केल्यामुळें हा १४८५ मध्यें मेला.

बेबंदशाही :- याकूब नंतर गादीवर कोण बसला या विषयीं निरनिराळया लेखकांचीं निरनिराळीं मतें आहेत. झेनो म्हणतो कीं याकूबचा मुलगा अल्लामूर (अलामत, अल्वान्ते, एल-वंद व अलवंगबे असेंहि याला म्हणत) हा नंतर गादीवर बसला होता व याच्या राज्यांत इराण शिवाय डायार्बेकर व युफ्रेटीस नदी जवळील मोठया आर्मेनियाचा कांहीं भागांत या प्रदेशाचा समावेश होत असे. उलट  क्रुसिन्स्कि म्हणतो कीं, याकूब निपुत्रिक मेल्यामुळें जुलाव्हर नांवाच्या एका सरदार नातेवाईकानें गादी बळकावून तीन वर्षे राज्य केलें. याच्या मागून १४८८ मध्यें बैसिगर गादीवर बसला. यानें १४९० पर्येंत राज्य केलें. नंतर रुस्तन (रुस्तम) नांवाच्या तरुण सरदारानें सात वर्षे सत्ता चालविली. नंतर अहमद नांवाच्या कोणा पुरुषानें रुस्तमचा खून करून गादी बळकावली. याला हालहाल होऊन मृत्यु प्राप्त झाला, त्यामुळे हसनाचा चौदा वर्षे वयाचा धाकटा मुलगा अलामत याला अनायासें गादी मिळाली. अँगिओलेल्लो नांवाच्या व्हेनीसच्या प्रवाशानें लिहिलेल्या वर्णनावरून या गोष्टीस आधार मिळतो. अलामतनें शेख इस्माइल सुफी गादीवर बसेपर्यंत राज्य केलें. याच्या भावाचें नांव मुराद होतें. जुलेव्हर अथवा रुस्तम विषयी विशेष माहिती नाहीं, परंतु बैसिंगर हा उझन हसनचा समकालीन, उमर शेख फर्घना प्रांताचा राजा याचा पुतण्या होता. याकूब मेल्यानंतर अलामत गादीवर बसेपर्यंत बरीच बेबंदशाही होती, व अलामत अज्ञान असतांना बैसिंगरनें राजप्रतिनिधि या नात्यानें दोन वर्षेंपर्यंत राज्यकारभार चालविला असावा असें अनुमान करतां येतें. मार्खम म्हणतो कीं अलामत हा तैमूरच्या वंशांतील शेवटचा राजा होऊन गेला. व याला सफाविद घराण्याचा प्रसिध्द स्थापक इस्माइल सुफी यानें पदच्युत केलें.

सुफी अथवा सफाविद घराणें : - (१४९९-१७३६) सातवा इमाम मुसा याचा वंशज शेख सैफुद्दीन इझाक हा चौदाव्या शतकांत केव्हां तरीं कास्पियन समुद्राच्या नैर्ॠत्येस अर्देबिल येथें रहात होता असें म्हणतात. त्याच्या पावित्र्याची कीर्ति ऐकून तैमूर भेटीस त्याच्या घरीं गेला होता व चकित होऊन या शेखाच्या सांगण्यावरून तैमूरनें बरेच तुर्क अथवा जार्जियन कैदी सोडून दिले होते. यामुळें या लोकांची शेखवर भक्ती बसून पुढें हे लोक याच्या वंशजांच्या फार उपयोगी पडले.

याचा मुलगा साद्रुद्दिन व नातू रव्वाजा अली (हे मक्केला गेले होते व यरुशलेम येथें हे मरण पावले) हे देखील प्रसिध्द धर्मपुरुष होऊन गेले. ख्वाजा अलीचा नातू जुनैद यानें उझन हसनच्या बहिणीशीं लग्न केलें होतें व जुनैदचा मुलगा शेख हैदर यानें आपली मामेबहीण मार्था-उझन, हसन व डेस्पिना राणी यांची मुलगी हिच्याशीं विवाह केला होता. या जोडप्याला सुलतान अली इब्राहिम मिर्झा व इस्माइल (हा १४८० मध्यें जन्मला असें म्हणतात) असे तीन मुलगे झाले. शेख हैदर यानें धर्मसंबंधीं आपल्या पूर्वजाचें नांव पुढें चालविलें होतें. याच्या शिक्षणाचा परिणाम असा झाला कीं, इस्लामी जगांत अत्यंत महत्वाचा असा एक महंमदी धर्माचा पंथ निघाला. अदबिलच्या तत्ववेत्यांनीं निर्माण केलेल्या धर्मपंथाकडे इराणी लोकांच्या मनाचा कल सहज वळत असे.

याकूब शहा निपुत्रिक निवर्तला असें जे ग्रंथकार म्हणतात ते शेख हैदर सुफीचा गादीवरील हक्क कायदेशीर मानतात. पुर्चास म्हणतो कीं, 'ऐडरच्या कीर्तिचा व त्याला मिळणाऱ्या शिष्यशाखेचा हेवा वाटून खुद्द याकूबनें ऐडरचा गुप्तरीतीनें खून करविला' परंतु रुस्तमनें हा खून केला असें क्रुसिन्स्किचें म्हणणें आहे. झेनो म्हणतो कीं, शेख हैदर या धर्मभक्ताचा खून लढाईत अलामतनें केला. एका निनांवी व्यापाऱ्याच्या इराणच्या प्रवासवर्णनांत अलामतच्या सेनापतीनें लढाईंत शेख हैदरला ठार केलें असें लिहिलें आहे, व अँगिओलेल्लो प्रवाशी म्हणतो कीं, रुस्तमनें पाठविलेल्या सुलेमानबे नांवाच्या अधिकाऱ्यानें शेख हैदरला लढाईंत मारलें. इब्दतुत्तवारिखच्या आधारें माल्कम म्हणतो कीं, शिर्वानच्या सुभेदारानें शेख हैदरचा मोड करून खून केला व हैदरच्या तिन्ही मुलांनां त्यांच्या उझन हसन नांवाच्या आजाच्या याकूब नांवाच्या वंशजानें मत्सरानें फार्स प्रांतांतील इष्टखर नांवाच्या डोंगरी किल्ल्यांत कैदेंत ठेविलें. हें पुर्वासच्या म्हणण्याचें दुसरें स्पष्टीकरण आहे; फक्त व्यक्ति व विषय यांचा गोंधळ झाला आहे. झेनोनें या काळच्या गोष्टी काळजीपूर्वक नमूद करून ठेविल्या आहेत असें दिसतें. झेनोच्या आधारावरून शेख हैदरच्या मुलांपैकीं एक म्हणजे इस्माइल हा १४९२ मध्यें गिलन प्रांतांत पळून गेला. यावेळीं इस्माइलचें वय तेरा वर्षांचें होतें.

पहिला इस्माइल : - या सुफी तरुणाचें चरित्र या वेळेपासून त्याच्या राज्यारोहणपर्यंत (१४९९) फार घडामोडीचें आहे. झेनो म्हणतो कीं, वयाच्या अठराव्या वर्षी हा व्हान सरोवरांतील बेटांतून निघून आरास व कर या नद्यांमधील केंराबाख प्रदेशांतून आग्नेयमार्गानें गिलन प्रांतांत आला. या प्रदेशांत आपल्या पित्याच्या एका स्नेह्याच्या मदतीनें थोडेसें सैन्य जमवून कास्पियन समुद्रावरील बाकू व शिर्व्वान प्रांतांतील शेमाख ही शहरें यानें घेतलीं. अलामत ससैन्य आपणावर चालून येत आहे असें समजतांच यानें जेंगियन ख्रिस्ती व इतर लोक याचें सैन्य गोळा केलें. सोळा हजार लोकांच्या मदतीनें आपल्या प्रतिपक्षाचा अगदीं मोड केला व थेट ताब्रिझ शहरावर चालून गेला. हें शहर याला शरण आलें. लवकरच (१४९९) याची इराणचा शहा म्हणून द्वाही फिरविण्यांत आली.

अलामत डायार्बेकरला पळून गेला. परंतु त्याचा भाऊ मुराद हा तुर्की लोकांच्या साहाय्यानें लढाईस उद्युक्त झाला व इस्माइलनें मुरादचा ताब्रिझच्या मैदानांत पराभव केला. मुराद डायार्बेकरला पळून गेला. इस्माइल, इराक-इ-आजामि व शिराझ प्रांतांत मुरादखानावर चालून गेला. इस्मालची वाढती सत्ता पाहून मुरादचे लोक त्याला सोडून पळाले, मुरादचा पराभव झाला व कदाचित खूनहि झाला असेल. अलामतला विश्वासघातानें इस्माइलच्या हवालीं करण्यांत आलें व त्यानें अलामतचा वध केला असें म्हणतात.

इस्माइल (१५०१) ताब्रिझला परत आला व त्यानें मोठा जयोत्सव केला. १५०३ मध्यें त्यानें टायग्रीसवरील बगदाद, मोसल व जेझिरा हीं शहरें घेतलीं. पुढच्या वर्षी त्यानें गिलनप्रांतांतील एका बंडखोर राज्यकर्त्याचा बंदोबस्त केला. यानंतर १५०७ पर्यंत यानें शांततेनें काळ घालविला. सर्व ग्रंथकारांच्या आधारानें असें म्हणतां येईल की, १५०८ मध्यें शहाचें लक्ष शैबान अथवा शाहिबेगच्या खोरासानवरील स्वारीनें वेधिलें. हा उझबेग जेंगिझखानाचा वंशज असून यानें बाबरला (मोगल बादशहा) काबूलकडे हांकून लावलें होतें, नंतर यानें समरकंद, ताश्कंद, फर्घना, हिस्सार, कुंडुझ व ख्वारिझम येथें जय मिळवून मुर्घान नदी ओलांडून साराखूस प्रांतावर हा चालून आला होता. इस्माइलनें आपलें सैन्य जमवून इस्पहान येथें तळ दिला १५१० मध्यें शैबानीनें खोरासान प्रांतांवर दुसरी स्वारी करून कर्मन प्रांत उध्वस्त केला तेव्हां इस्माइलनें हे प्रांत आपले वंशपरंपरागत आहेत असें सांगून शैबानला त्यानें केलेल्या नुकसानीबद्दल जवाब विचारला. शैबाननें इस्माइलचा या प्रांतावरील हक्क कबूल केला नाही, तेव्हां इस्माइल सैन्यानिशीं चालून गेला. उझबेगांचें सैन्य लहान लहान टोळया करून देशभर पसरलें व हिरातकडे मोर्चा फिरवून पळून गेलें; शैबान मर्व्हला पळून गेला. इस्माइलनें चाल करून त्याचा पराभव केला व त्याला पकडून त्याच्या बऱ्याच अनुयायासंह त्याचा वध केला.

सेलिमशीं लढाई. - यानंतर घडलेली महत्वाची गोष्ट म्हटली म्हणजे इस्माइलनें तुर्की सुलतान पहिला सेलिम याशीं केलेलें युध्द ही होय. या युध्दचें कारण तुर्की राज्यांत पाखंडवादी मुसलमानांचा छळ होत असे या गोष्टीचें चिडून जाऊन (इस्माइल) शहानें जुना सुनी पंथ सोडणाऱ्या ४० हजार तुर्कांची कत्तल केलीं हें होय. सुलतानचें सैन्य अझबैंजन प्रांत व पश्चिम इराण या प्रदेशांवर चालून आलें. इस्माइलचें बरेंच सैन्य यावेळीं खोरासान प्रांताच्या बंदोबस्तांत गुंतलेलें होतें. इस्माइलनें शत्रूच्या सभोंवारचा प्रदेश उजाड करून शत्रूला दाणावैरणीच्या टंचाईनें जेरीस आणण्याचें युध्दधोरण स्वीकारलें. अखेरीस अझबैंजन प्रांतांच्या सरहद्दवरील खोई शहराजवळ उभय सैन्यांची गांठ पडून इराणी सैन्याचा पराभव झाला (१५१४) व सेलिम विजयोत्सवानें ताब्रिज मध्यें शिरला.

सेलिमचा ताब्रिझ शहरांत आठ दिवस मुक्काम होता. यानें येथील पुष्कळसे कुशल कारागीर पकडून कान्स्टांनिनोपलला पाठवून दिले व वसंतॠुतूंत इराणवर फिरून चाल करण्याच्या इराद्यानें कारबाग प्रांतांत हिवाळयांतील मुक्काम करण्याकरितां निघून गेला; परंतु आपल्या सैन्याच्या बेदिलीमुळें तो तुर्कस्तानला घाईनें परत गेला. या स्वारीमुळें इराणच्या शहाचा गर्व उतरून सुलतानानें डायार्बेकर कुर्दिस्तान हे प्रांत आपल्या राज्यास जोडले.

१५१४ पासून १५२४ पर्यंत इराण व तुर्कस्तान या दोन राज्यांमधील द्वेषाग्नि धुमसतच होता; परंतु म्हणण्यासारखी लढाई झाली नाहीं. इराणपेक्षां इजिप्तकडे सेलिमचें लक्ष जास्त वेधलें होतें. हा सुलतान १५१९ त मेला. या गोष्टीचा फायदा घेऊन शहानें जार्जिया प्रांत काबीज करण्याचा प्रयत्न केला; परंतु सेलीमच्या मागून गादीवर बसलेल्या सुलेमान सुलतानानें शहाचें कांहीएक चालू दिलें नाहीं. १५२४ त इस्माइल अर्देबिल येथें मरण पावला.

इस्माइलचा स्वभाव : - इराणी लोक इस्माइलच्या स्वभावाचें फार गौरवानें वर्णन करतात. इस्माइल हा एका मोठया राजघराण्याचा पाया घालणारा पुरुष असून यानें इराणी लोकांचा आवडता धर्म राष्ट्रीय धर्म केला असें इराणी लोक म्हणतात. याचे प्रजाजन याला साधु समजून याच्या नांवाचा आपल्या प्रार्थनेंत उच्चार करीत असत. इस्माइल सेनापति असतांना शिपाई चिलखतें अंगावर घालीत नसत व याच्या सैनिकांचा या नवीन धर्मासंबंधी उत्साह इतका दांडगा होंता कीं, 'शिया शिया' म्हणून हे लोक बेधडक शत्रूवर चालून जात असत.

शहा तहमास्प - इस्माइलच्या चार मुलांपैकीं सर्वांत वडील मुलगा आपल्या बापाच्या गादीवर बसला. याच्या कारकीर्दीत पुढील मुख्य गोष्टी घडल्या. खोरासान प्रांतावर उझबेगांनीं स्वारी केल्यामुळें त्यांच्या सैन्याचा (१५२७) मोड करण्यांत आला, बगदाद (१५२८) परत घेण्यांत आलें, किझिल-बाश (शामलु व तुकुलू) टोळयांमधील भांडण बदमाष लोकांची कत्तल करून (१५२९) मिटविण्यांत आलें, खोरासानमधील आणखी एक बंड मोडण्यांत आलें, हिरात शहर उझबेगांच्या वेढयांतून मुक्त करण्यांत आलें (१५३०), इराणवरील तुर्कीची स्वारी इराणांतील कडक हवामानानें मागें हटविली गेली (१५३३),सुलतान सुलेमानाने (इ.स.१५३४) शहापासून बगदाद शहर घेतलें, शहाच्या सर्वात धाकट्या भावाने बंड करून हिरात शहर घेतले त्यामुळें हिरात परत घेऊंन कंदाहारवर (१५३६) चाल करण्यांत आली, कंदाहार शहर तेथील सुभेदारानें (१५३७) बाबरशहाचा मुलगा राजपुत्र कामरान याच्या हवालीं केलें, हुमायून (पळून आलेला मोंगल बादशहा) चें आदराआतिथ्य (१५४३) करण्यांत आलें, शहाहून धाकटा असलेल्या शहाच्या इल्खास नांवाच्या भावानें तुर्कांशीं दोस्ती करून बंड केलें त्यामुळें तुर्कांशीं दोस्ती करून बंड केलें त्यामुळें तुर्कांशीं लढाई करावी लागली (१५४८) व अखेरीस जार्जिया प्रांतावर स्वारी करून हजारों लोकांनां बंदिवान करून सूड उगविण्यांत आला (१५५२).

तुर्कस्तानच्या सुलतानच्या बायेझिड नांवाच्या मुलानें बंड केलें त्याचा सुलतानाच्या सैन्यानें (१५५९) मोड केला म्हणून तो पळून शहाच्या आश्रयास येऊन राहिला.

शहानें त्याला कायमचा आश्रय देण्याचें वचन दिलें. सुलेमान सुलतानानें त्याला शहाकडून परत मागितलें व शहानें सुलतानाकडून आलेल्या लोकांबरोबर त्याला पाठवून दिलें, त्यामुळें शहा व सुलतान यांमध्यें तह घडून आला. सुनी व शियापंथांतील हाडवैरामुळें या दोन राज्यांमध्यें भांडण उपस्थित होणें शक्य होतें; परंतु यूरोपियन संस्थानांच्या कारस्थानांमुळें सुलतानानें कान्स्टांटिनोपलच्या पश्चिम व उत्तर प्रदेशांतील चढाईचें धोरण सोडून दिलें.

१५९१ मध्यें अँथोनि जेन्किन्सन इलिझाबेथ राणीचें पत्र घेऊन इंग्लिश व्यापाऱ्यांसाठीं व्यापाराचें बोलणें लावण्याकरितां इराणांत आला होता परंतु त्यापासून कांहीं एक निष्पन्न झालें नाहीं.

तहमास्प १५७६ मध्यें मरण पावला. हा शहा मध्यम बांध्याचा, जाड ओंठाचा व पिंगट रंगाचा दांडगा मनुष्य होता. हा लढवय्या होता. याला पुष्कळ संतति होती व याच्या मृत्यूंनंतर याचा पांचवा मुलगा हैदर मिर्झा यानें किझिल बाश लोकांच्या मदतीनें आपल्या नांवाची शहा म्हणून द्वाही फिरविली. परंतु तहमास्पचा चौथा मुलगा इस्माइल यानें आफशर लोकांच्या मदतीनें गादी मिळविली.

दुसरा इस्माइल : - यानें दोन वर्षें राज्य केलें. हा काझ्विन शहरांत एका हलवायाच्या घरांत मेलेला सांपडला. याच्या मृत्यूनें प्रजेस सुटका झाल्याचा आनंद झाला म्हणून त्याच्या मृत्यूच्या कारणाची विचारपूस करण्यांत आली नाहीं. याच्या मागून याचा सर्वांत वडील भाऊ महंमद मिर्झा अथवा महंमद खुदाबंद गादीवर बसला. पूर्वी याच्या शारीरिक दुर्बलतेमुळें याचा गादीवरील हक्क वगळण्यांत आला होता. यानें एका कर्तबगार प्रधानाच्या हवालीं सर्व राज्यकारभार केला होता, परंतु भित्रेपणानें यानें या प्रधानाला शत्रूच्या हवालीं केलें. याच्या कारकीर्दीत आपसांतील तंटे व बंडें झालीं, व देशाबाहेरच्या शत्रूंनीं देखील हल्ले केले होते. पूर्वेस त्याच्या सर्वांत धाकटया अब्बास नांवाच्या पुत्रानें खोरासान प्रांत ताब्यांत ठेविला होता. पश्चिमेस सुलतानच्या सैन्यानें अझर्बैंजन प्रांतावर चढाई करून ताब्रिज शहर घेतलें होतें. याचा वडील मुलगा हम्झा मिर्झा यानें बंडखोरांचें पारिपत्य करून, तुर्क लोकांची पिच्छेहाट करून त्यांना तह करावयास लाविलें;  परंतु कोणा मारेकऱ्यानें त्याचा खून केला. ही वार्ता ऐकून अब्बासचा संरक्षक मुर्शिद कुलीखान किझिलबाश लोकांचा नायक हा अब्बासला घेऊन काझ्विन शहरीं गेला. ही गोष्ट होण्याच्या दोनतीन वर्षांपूर्वी निशापुर येथील सरदारांनीं अब्बासला शहा बनविलें होतें व आतां तो खरोखरी इराणचा राजा बनला. माल्कम म्हणतो की महंमद खुदाबंद या सुमारास मरण पावला.

अब्बास दि ग्रेट : - हा शहा गादीवर बसल्याबरोबर (१५८६) खोरासन प्रांतावर उझबेगांनीं स्वारी करून ईरात शहर घेतलें व सुभेदाराचा खून करून सभोंवारचा प्रदेश जाळून पोंळून टाकला. अब्बास मेशदवर चालून गेला परंतु अंतस्थ बंडाळीमुळें त्याला काझ्विनला परत जावें लागलें. इतक्यांत शहा तेहरान येथें अत्यवस्थ आजारी पडला, त्यामुळें उझबेगांचा नायक अबदुल-उल-मुनिमखान याच्या सैन्यास लूटमार करण्यास आयतीच संधि मिळाली. सर्व राज्यांत अंदाधुंदी माजली व राज्यांत शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यास शहास फार प्रयास पडले. नंतर त्याला फार्स प्रांतांतील बंड मोडण्यास शिराजला जावें लागलें; आणि पश्चिमेकडून होणाऱ्या तुर्क लोकांच्या स्वाऱ्यांचा बंदोबस्त करावा लागला. जॉर्जियाच्या तिसऱ्या  मुरादशीं शहाला लढाई करावी लागली. १५९० मध्यें तह झाला; परंतु ताब्रिझ शहर व कास्पियन समुद्रावरील एक दोन बंदरें इराणच्या ताब्यांतून जाऊन पहिल्या तीन खलिफांची निर्भत्सना करावयाची नाहीं, ही अट इराणी लोकांस मान्य करावी लागली.

१५९७ मध्यें उझबेगांचें पारिपत्य करून शहानें त्यांच्या पासून हिरात शहर व खोरासान प्रांत परत मिळविला व याच्या सरहद्दीवर कुर्द घोडेस्वारांची वसाहत करवून शहानें या प्रांताचा बंदोबस्त केला. पूर्वेस बल्ख शहर घेतलें व दक्षिणेस इराणी आखातांतील बेहरीन बेटें, इराणच्या समुद्रकिनाऱ्याचा प्रदेश व लगतचीं बेटें व लार प्रांत इतका प्रदेश शहाच्या सेनापतींनीं काबीज केला. १६०१ मध्यें तुर्कस्थानवर स्वारी अब्बासनें नेटानें सुरू केली व तिसऱ्या महंमद सुलतानच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन गमाविलेले प्रांत एकामागून एक परत मिळविले. अखेरीस दुसऱ्या ओष्मान सुलतानानें तह करून पहिल्या इस्माइल शहाच्या वेळची इराणी राज्याची सरहद्द कबूल केली. तहमास्पच्या किल्लेदारानें मोंगल बादशहाला दिलेलें कंदाहार शहर १६०९ मध्यें परत घेण्यांत आलें.

बेचाळीस वर्षे राज्य करून वयाच्या सत्तराव्या वर्षी १६२८ मध्यें मझंदरान प्रांताच्या समुद्रकिनाऱ्यावरील फाराहाबाद येथील आवडत्या महालांत हा शहा मरण पावला. हा सर्व राजांत फार प्रसिध्द शहा असून याची कीर्ति दिगंतविख्यात होती. याच्या दरबारांत इंग्लंड, रशिया, स्पेन, पोर्तुगाल, हालंड व हिंदुस्थान या देशांचे वकील होते. आपल्या राज्यांतील ख्रिस्ती लोकांवर हा दया करीत असे व त्यांनां त्यांचा धर्म त्यानें पाळूं दिला होता. देशांतील तुर्क व उझबेग लोकांची पुंडाई मोडून शांतता स्थापणें, हितकर कायदे करणें व लोकोपयोगीं कामें करणें या गोष्टींनीं या शहाचीं कारकीर्द चिरस्मरणीय झाली आहे उंच नाक व तीक्ष्ण पाणीदार डोळे यांनीं मंडित असा याचा मनोहर चेहरा होता. हा मध्यम बांध्याहून ठेंगणा, चपळ, शिकारी व काटक होता; परंतु या विख्यात शहाच्या उज्वल कीर्तीला त्यानें केलेल्या आपल्या सुफी मिर्झा नांवाच्या वडील मुलाचा खून व दोघां धाकटया बंधूंचा छळ या गोष्टीनें काळीमा लाविली आहे. इतिहासकार म्हणतात कीं, यानें मरतेवेळीं सुफीबद्दल फार शोक केला व सुफीचा मुलगा साम मिर्झा यास आपला वारस नेमलें.

शहा सुफी  : - मृत शहाच्या आज्ञेनुसार सरदांरांनीं साम मिर्झाला शहा सुफी या नांवानें गादीवर बसविलें, त्या वेळीं याचें वय सतरा वर्षोंचें होतें. याच्या चौदा वर्षाच्या कारकीर्दीत अनेक क्रूर व अमानुष कृत्यें यानें केली. दारूच्या धुंदींत यानें आपली आई, बहीण, आवडती राणी व शहा अब्बासचा प्रख्यात सेनापति व शिराझच्या विद्यालयाचा पाया घालणारा महात्मा इमाम कुलीखान यांचा खून केला असें म्हणतात. याच्या कारकीर्दीत उझबेगांनां खोरासान मधून हांकून लावून गिलन प्रांतांतील बंड मोडण्यांत आलें ; परंतु कंदाहार शहर मोंगल बादशहाला पुन: देण्यांत आलें व सुलतान मुरादनें बगदाद शहर घेतलें. ख्रिस्ती लोकांविषयीं हा अन्यायी नव्हता. शहा सुफी १६४१ मध्यें कशन येथें मरण पावला.

दुसरा अब्बास शहा : - याच्यामागून याचा मुलगा दुसरा अब्बास गादीवर बसला. यानें वयाच्या सोळाव्या वर्षी स्वत: चाल करून कंदाहार परत घेतलें असें म्हणतात. या गोष्टीशिवाय याची इतिहासांत जास्त माहिती नाहीं. यूरोपमधील राष्ट्रांचें व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचे वकील याच्या दरबारीं होते. उझबेगांच्या आश्रित नायकांचा चांगला आदर करून यानें त्यानां शांत राखलें, तुर्कस्तानशीं सलोख्यानें राहिला, जॉर्जियाच्या राजाला बंदिवान करून यानें त्याला क्षमा केली व सर्व धर्मांनां मुभा देऊन ख्रिस्ती लोकांवर विशेष मर्जी या शहानें दाखविली. हा दारूबाज व विषयासक्त होता. आपल्या पूर्वीच्या शहाप्रमाणें आपल्या नातलगांचे डोळे तापलेल्या लोखंडानें फोडण्याऐवजीं हा बुबुळेंच बाहेर काढवीत असे. हा अडतीसाव्या वर्षी सत्तावीस वर्षे राज्य करून (१६६८) मरण पावला. याला याच्या पित्याच्याच मशिदीत कुम येथें पुरलें आहे.

सुलेमान : - अब्बासच्या मागून दुसरा शहा सुफी गादीवर बसला. यानें शहा सुलेमान या नांवानें फिरुन राज्याभिषेक करविला. हा दुर्बल, व्यसनी व क्रूर होता.  याचा समकालीन चार्डिन म्हणतो कीं, इस्पहान येथील याचा दरबार पाहून यूरोपियन राष्ट्रांचें वकील व इतर परदेशीय पाहुणे चकित झाले होते. केम्फर नांवाचा विद्वान म्हणतो कीं, हा शहाणा व धोरणी शहा होता. याच्या कारकीर्दीत उझबेगांनीं खोरासानवर फिरुन स्वारी केली. किप्चाक तातारांनीं कास्पियन समुद्रकिनारा लुटला व डच लोकांनीं किश्म बेट घेतलें. हा शहा सव्वीस वर्षे राज्य करून वयाच्या एकुणपन्नासाव्या वर्षी १६९४ मध्यें मेला.

हुसेन : - कुसिन्स्किच्या टिपणांत सुलेमानच्यामागून गादीवर बसलेल्या हुसेन शहाची भरपूर माहिती आहे. याला वडील व धाकटा असे दोन सख्खे भाऊ व अब्बास नांवाचा सावत्र भाऊ होता. पित्याच्या आज्ञेवरून वडील भावाचा वध करण्यांत आला होता व धाकटया भावास त्याच्या आईच्यां खटपटीनें लपविण्यांत आलें होतें. अब्बास हा गादीला लायक होता; परंतु शहा निवडणारे सरदार व खोजे (कंचुकी) लोक यांचा हुसेन गादीवर बसण्यांत फायदा होता म्हणून त्यांनीं (१६९४) हुसेनला शहा केलें. यानें राजवाडयांतील दारूची सर्व भांडीं फोडून दारू पिण्याची मनाई केली व आणखी इतर धर्मबंधनांवरील भक्ति यानें दाखविली. हुसेनशहा व नादीरशहा गादीवर बसेपर्यंत त्याच्यामागून झालेले शहा यांची हकीकत सर क्लेमेंट्स मार्खम याच्या वर्णनावरून घेतली आहे.

लवकरच या शहावर मुल्लांचा पगडा बसला व आपल्या उत्पत्तीचा विसर पडून यानें सुफी लोकांचा छळ सुरू केला. हा चांगल्या अंत:करणाचा पण दुर्बळ व विषयांध होता. धर्मवेडया लोकांच्या तडाक्यांतून सुटल्याबरोबर याच्याभोंवतीं जनानखान्यांतील स्त्रियांचा गराडा पडत असे व त्यांच्या कारस्थानांचा सुळसुळाट होत असे. राज्यांत सर्वत्र वीस वर्षेपर्यंत शांततेचें साम्राज्य नांदत होतें; परंतु हें सफाविद घराण्याचा नाश करणाऱ्या भविष्य काळांतील आपत्तीचें जणूं सूचकच होतें. यावेळी कंदाहार व काबूलच्या डोंगराळ प्रदेशांत काटक अफगाण लोक स्वतंत्रपणें नांदत होते. यांच्या दोन शाखा होत्या - गिझनी व काबूलचे घिलझइ लोक. कंदाहार व हिरातचे सादुझइ लोक व १७०२ मध्यें शहानवाझ अथवा गुर्जिखान नांवाचा नवीन नेमलेला सुभेदार मोठया सैन्यासह कंदाहाराला जाऊन पोहोंचला. हा हुशार व कर्तबगार पुरुष होता व कंदाहार फिरून मोगल बादशहाच्या हवालीं करण्याचा वहीम असलेल्या अफगाण लोकांचा बंदोबस्त करण्याची आज्ञा या सुभेदारास मिळाली होती. या सुभेदारानें आपल्या जाचणीनें पुष्कळ अफगाण लोकांनां नाराज केलें होतें. मिरवाइझ नांवाच्या घिलझइ नायकानें या जुलुमाविरुध्द तक्रार केल्यामुळें त्याला कैद करून इस्पहानला पाठविण्यांत आलें. हा नायक फार धूर्त होता. याला मक्केच्या यात्रेला (१७०८) जाण्याची परवानगी मिळाली. यात्रेहून परत आल्यावर त्यानें दरबारच्या लोकांचा इतका विश्वास संपादन केला कीं, त्याला स्वदेशी जाण्याची परवानगी मिळाली. कंदाहार येथें यानें एक कट करून गुर्जिखान व त्याचे लोक यांची कत्तल करून शहर काबील केलें, व शहाच्या दोन इराणी सैन्यांचा पराभव केला; पण तो १७१५ मध्यें मरण पावला. याच्या मागून याचा भाऊ मिर अबदल्ला अफगाणांचा राजा झाला, परंतु थोडयाच महिन्यांनीं मिर वाइझचा सर्वांत लहान मुलगा महमूद यानें चुलत्याचा खून करून राज्यपद मिळविलें.

इतक्यांत सादुझइ लोकांनीं हिरात शहरीं बंड करून १७१७ मध्यें आपले स्वांतत्र्य जाहीर केलें, कुर्द लोकांनीं हमदानच्या सभोंवारच्या प्रदेशावर हल्ला केला; उझबेगांनीं खोरासान उध्वस्त केला; व मस्कतच्या आरबांनीं बेहरीन बेट घेऊन बंदर अब्बासीवर चाल करण्याची धास्ती दाखविली. येणें प्रमाणें चोहोंकडून आलेल्या संकटांनीं भांबावून जाऊन शहानें इराणी आखातांतील आपला मुलूख परत मिळविण्याचा प्रयत्न केला व तो फसला.

अफगाणांची स्वारी : - या अपयशाची वार्ता इस्पहान येथें पोंहचतांच महमूदानें अफगाणांचें मोठें सैन्य घेऊन १७२१ मध्यें इराणावर स्वारी केली, व कर्मान प्रांत घेऊन इस्पहानपासून चार मजलांच्या अंतरावर येऊन थडकला. शहानें महमुदास कंदाहारला परत जाण्याबद्दल मोठी रक्कम देऊं केली परंतु त्यानें ती न जुमानतां पुढें चाल केली.

१७२२ च्या मार्चच्या ८ व्या तारखेस ५० हजार सैनिक व २४ तोफा अशा भपकेदार पोषाखाच्या इराणी सैन्यानें उन्हानें पोळलेल्या व चालून चालून थकलेल्या मूठभर अफगाण सैन्याशीं सामना केला. शहाच्या पक्षाच्या अरबांच्या वलीनें अफगाणांच्या डाव्या बगलेवर जोराचा हल्ला करून त्यांची दाणादाण केली व त्यांची छावणी लुटली. मुख्य वजीरांनें शत्रूच्यां उजव्या बगलेवर हल्ला केला, परंतु त्याची दाणादाण झाली. अफगाणांनीं लागलीच इराणी तोफा काबीज करून त्यांचा मोर्चा इराणी सैन्यावर फिरविला. त्यामुळें सर्व इराणी सैन्य लढाई सोडून पळत सुटलें. अरबांचा वली इस्पहान शहरांत पळून गेला व महमूदचा जय झाला. महमूदनें इस्पहानला वेढा घातला. अन्नाच्या तुटवडयामुळें वेढयांतील लोकांचे हाल होऊं लागले तेव्हां हुसेनशहा शरण आला. हुसेनशहानें आपल्या हातानें पिसाच्या तुऱ्याचें राजचिन्ह महमूदच्या पागोटयांत खोंवलें. महमूदनें विजयोत्सवानें इस्पहान शहरांत प्रवेश केला व राजवाडयांतील सिंहासनावर तो मोठया थाटानें आरूढ झाला. हुसेन यानें त्यावेळीं त्याला इराणचा शहा या नात्यानें सलाम केला. हुसेनचा मुलगा तहमास्प या गडबडीत अगोदरच पळून गेला होता. त्याला आपल्या पित्यानें राज्यत्याग केल्याचें समजतांच काझ्विन शहरीं त्यानें शहाची पदवी स्वत: धारण केली.

इराणांतील या धांदलीचा तुर्कस्तान व रशिया या देशांच्या राज्यकर्त्यांनी फायदा घेतला. तुर्कांनी तिफ्लिस, ताब्रिझ व हमदान हीं शहरें घेतलीं. रशियाच्या पिटर दि ग्रेटनें शिर्वान व गिलन प्रांत घेतले व अफगाण लोकांनां हांकून लावण्याच्या कामगिरीबद्दल दरबांद, बाकू,  गिलन, मझंदारन, व अस्ट्राबाद हे प्रांत रशियाला कायमचे देण्याबद्दलचा तह दुसऱ्या तहमास्पनें १७२२ मध्यें केला.

इकडे महमूदनें १७२३ मध्यें ३०० मुख्य इराणी सरदारांनां मेजवानीस बोलावून त्यांची कत्तल केली व त्यांच्या मुलांनांहि मारून टाकलें. न्नंतर त्यानें इस्पहानच्या हजारों नागरिकांनां ठार मारण्याचा सपाटा चालला. अखेरीस हें शहर बहुतेक निर्जन झालें. १७२५ मध्यें शहा सोडून राजघराण्यांतील सर्व मंडळी त्यानें राजवाडयाच्या अंगणांत जमा केली व त्यांची कत्तल उडविली. हुसेन तहमास्प व दोन मुलें फक्त या प्रसंगांतून निसटलीं असें म्हणतात. अखेरीस हा नरपिशाच्च महमूद वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी १७२५ मध्यें मेला. याचे खांदे वाटोळे असून चेहरा रुंद, नाक सपाट, दाढी विरळ, व खालीं पहाणारे तिरवे डोळे होते, मान जवळजवळ याला नव्हती.

महमूदचे मागून त्याचा चुलत भाऊ अश्राफ गादीवर बसला. हा शूर परंतु क्रूर होता. यानें पदच्युत केलेल्या शहाला मुबलक वेतन देऊन सौम्य पध्दतीनें प्रजेची मर्जी संपादण्याचा यत्न केला. १७२७ मध्यें थोडा वेळ लढाई करून यानें तुर्कांशी तह केला व सुलतानचें मुसुलमानांवरील आधिपत्य कबूल केलें. परंतु यावेळीं दुसऱ्या तहमास्पचें दैव जोरावर येऊन अफगाणांचे दिवस भरत आले होते. तहमास्पनें मंझदारन प्रांतांत लहानसें सैन्य जमविलें होतें व कजर लोकांच्या फत्तेअलिखान नांवाच्या नायकानें याचा पक्ष घेतला होता. १७२७ मध्यें नादीर कुली नांवाच्या दरोडेखोरांच्या नायकानें फत्तेअलीचा खून करून तहमास्पची मर्जी संपादन केली व स्वत: त्याच्या सैन्याचा सेनापति झाला. या गोष्टीनें भिऊन जाऊन १७२९ मध्यें अश्राफखानानें अफगाणांचें सैन्य घेऊन खोरासानवर चाल केली परंतु नादीरनें दमवान येथें त्याचा पराभव केला व इस्पहानवर चाल केली आणि शहराबाहेर अश्राफचा फिरून पराभव केला तेव्हां अश्राफ उरलेल्या सैन्यानिशीं शिराझला निघून गेला. नादीरनें शत्रूशी लगट करून त्यांचा १७३० मध्यें अगदीं मोड केला. कंदाहारकडे एकटाच पळून जात असतांना अश्राफचा बलुची दरोडेखोरांनीं खून केला. येणेंप्रमाणें नादीरच्या कर्तबगारीनें इराणची क्रूर अफगाण लोकांच्या तावडींतून सुटका झाली.

सफाविद घराण्याचा लय : - राजनिष्ठा व्यक्त करण्यापेक्षांहि नादीरची महत्वाकांक्षा जास्त होती. नालायकीच्या सबबीवर नादीरनें दुसऱ्या तहमास्प शहाला १७३२ मध्यें पदच्युत करून खोरासान प्रांतांत बंदिवान म्हणून पाठवून दिलें. व नंतर नादीरच्या मुलानें त्याचा वध केला; धूर्त नादीरनें तहमास्पच्या अज्ञान मुलाला तिसरा अब्बास म्हणून गादीवर बसविलें. हें मूल १७३६ मध्यें मेलें. नंतर नादीरनें गादी पटकावली व बहुजनसमाजानें मोघानच्या मैदानावर नादीरला इराणचा शहा म्हणून मान्य केलें. सफाविद घराण्याबरोबरच इराणांतील राष्ट्रीय राजघराण्याचा शेवट झाला.

१७२८ मधील इराणची स्थिति : - क्रुसिन्सिकीच्या ग्रंथांत १७२८ मधील इराणी राज्याचा विस्तार दाखविणारा नकाशा दिला आहे, यावरून पश्चिमेस तिफ्लिस, एरिव्हान, खोइ व बगदाद आणि पूर्वेस बल्ख व कंदाहार या शहरांचा समावेश इराणी राज्यांत होत असे; ताब्रिझ, हमदान या प्रदेशाची लांब, रुंद पश्चिमेची पट्टी 'तुर्कांनीं जिंकलेला प्रदेश' म्हणून दाखविली आहे; आस्ट्राखानपासून मझंदारनपर्यंतच्या कास्पियन समुद्राच्या सर्व पश्चिम किनाऱ्याचा 'झारनें जिंकलेला प्रदेश' असा निर्देश केला आहे ; मकरान प्रदेशाला 'स्वतंत्र लढवय्ये राष्ट्र' म्हटलें आहे. याशिवाय अफगाण लोकांच्या ताब्यांतील प्रदेश वगळला तर खुद्द इराणी राज्याचा विस्तार किती होता व हें राज्य पूर्वस्थितीप्रत आणण्याकरितां नादीरशहाला केवढा उद्योग करावा लागला या गोष्टीची सहज कल्पना होईल.

दुसऱ्या तहमास्पनें तुर्की सुलतानशी तह केल्यामुळें नादीरनें त्याला पदच्युत केलें; देशांतील लढाऊ सरदारांना पत्रें लिहून त्यांची मदत मागितली व तुर्की सुलतानाला सुभेदार या नात्यानें पत्र लिहून इराणी राज्याचा प्रदेश परत देण्याचा आग्रह केला. बगदाद शहर लढवणारा टोपाल ओथमान याचा नादीरनें पराभव करून ठार मारलें परंतु हें शहर त्याला काबीज करतां आलें नाहीं. तिफ्लिस, कार्स व एरिव्हान हीं शहरें नादीरनें परत घेतलीं.

याच वेळीं रशिया व तुर्कस्तान या देशांनीं आपसांतील वैर एका बाजूस ठेवून इराणी राज्याच्या प्रदेशांची वांटणी करण्याबद्दल १७२३ मध्यें एक तह केला. या तहान्वयें असें ठरलें कीं, अस्ट्राबाद, मझंदारन, गिलन, शिर्वानचा कांहीं भाग व दाघिस्तान हे प्रांत झारनें घ्यावें; आरास व कुर नद्यांच्या संगमापासून निघालेल्या व अर्देबिल, ताब्रिझ व हमदान या शहरांवरून कर्मानशहा शहरापर्यंत गेलेल्या रेषेनें सुलतानच्या प्रदेशाची हद्द दाखविली जावी; व हा तह मान्य केल्यास तहमास्पनें बाकीचें राज्य घ्यावें. परंतु दुर्बल इराणी राज्याला शह देणाऱ्या या दोस्त राष्ट्रांवर नादीरनें युध्दकौशल्यानें मात केली.

नादीरशहाच्या १७३६ मधील राज्यारोहणापासून १८८४ पर्यंत.

नांदीरचें राज्यारोहण : - 'नव-रोझ' म्हणजे इराणी वर्षाच्या वर्षप्रतिपदेच्या दिवशीं नादीरनें जमलेल्या सरदार व अधिकारी मंडळींना उद्देशून भाषण केलें व नंतर त्याला राजमुगूट अर्पण करण्यांत आला. सफाविद घराण्याचा गादीवरील हक्क नष्ट झाला असें समजून नादीरचा हक्क वंशपरंपरागत असावा , व सुनी पंथाप्रमाणेंच शिया पंथाच्या लोकांना पूजाअर्चा करावयास लावावीं असें ठरविण्यांत आलें दुसऱ्या दिवशीं राजा व प्रजा यांमधील हा करार मंजूर होऊन, इराणचा शहा अशी नादीरची द्वाही फिरविण्यांत आली. राज्याभिषेकं समारंभ काझ्विन येथें झाला, परंतु याची तारीख अनिश्चित आहे. काझ्विनहून नादीर इस्पहानला आला. लुटालुट करणाऱ्या लुटारू बखत्यारी नायकाचा खून करून त्यानें देशांत शांतता स्थापन करून नंतर कंदाहारवर स्वारी केली. एक वर्षभर वेढा दिल्यावर हें शहर शरण आलें. याचा मुलगा रिझा कुली यानें बल्ख शहर घेतलें व आक्सस नदी ओलांडून उझबेगांचा पराभव केला. राष्ट्रधर्म पदावरून शिया पंथाची उचलबांगडीं केल्यामुळें नादीरशहावर सुनी पंथाचे अफगाण लोक खुष झाले होते असें वाटतें. नादीरशहाला यावेळीं १६ हजार अबदाली व घिलजइ लोक आपल्या सैन्यांत भरती करतां आले.

हिंदुस्थानवरील स्वारी - हिंदुस्थानांत जाऊन राहिलेल्या कांहीं लोकांची मागणी करण्याकरितां नादीरशहा यानें मोंगल बादशहाकडे एक वकील पाठविला. परंतु कांहीं एक समाधानकारक उत्तर मिळालें नाहीं. उलट या वकीलास स्वदेशीं परत येतांना अडथळे करण्यांत आले. एवढें कारण नादीरशहास हिंदुस्थानवर स्वारी करण्यास पुरेसें झालें; व कांहीं पळालेल्या लोकांचा पाठलाग करतां करतां तो गिझनीहून काबूलला गेला. हें शहर या वेळीं दिल्लीच्या महंमदशहाच्या सुभेदाराच्या ताब्यांत होतें. हा सुभेदार नादीरशहाच्या भीतीनें पेशावरास पळून गेला. नादीरशहानें तोफांचा मारा करून (१७३८) हें शहर घेतलें. काबूलला त्या वेळीं हिंदुस्थानचें एक प्रवेशद्वार समजत असत. काबूलहून दिल्ली दरबारची कानउघाडणी करण्याकरितां नांदीरशहानें फिरून एक वकील पाठविला परंतु जलालाबादच्या सुभेदारानें त्याचा खून करून त्याच्या लोकांस परत पाठविलें. नंतर नादीशहानें जलालाबाद शहर घेतलें. व खैबर घाटाच्या मार्गानें तो पेशावरच्या मैदानांत गेला व या ठिकाणींच त्यानें मोंगल सैन्याचा प्रथम पराभव केला. या वेळेपासून हिंदुस्थानच्या स्वारीस आरंभ झाला. कर्नलच्या लढाईंत नादीरचा जय झाल्यामुळें मोंगल बादशहा शरण आला.

नादीरशहा दिल्लींत असतांना त्यानें कत्तल व लुटालूट केली ही गोष्ट इतिहासप्रसिध्द आहे. औरंगजेबाच्या नातीशीं त्यानें आपल्या एका मुलाचें लग्न लावलें व पदच्युत केलेल्या बादशहाला फिरून विधिपूर्वक गादीवर बसविलें. १७३९ मध्यें दिल्ली सोडून लाहोर-पेशावरच्या मार्गानें घाटांतून काबूलला तो गेला, व नंतर १७४० मध्यें कंदाहारहून हिरातला तो येऊन पोहोंचला. महंमदानें सिंधु नदीच्या पश्चिमेकडील सर्व प्रदेश नादीरशहास दिला. या भागांत सिंध देशाचा समावेश होत असे. मोंगल बादशहाचें प्रख्यात मयुरासन व इतर मौल्यवान वस्तु नादीरशहानें हिंदुस्थानांतून इराणांत नेल्या.

उत्तरेकडील काबीज केलेला प्रदेश : - हिरातंहूंन त्यानें बल्ख व बुखारा या शहरांकडे मोर्चा फिरविला. उझवेगांचा राज्यकर्ता अबुल फैजखान त्याला शरण आला, तेव्हां ऑक्सस नदी ही इराणी राज्य व उझबेगाचें राज्य यांमधील सरहद्द ठरवून त्यानें अबुल फैजखानास फिरून त्याच्या गादीवर बसविलें. ख्वारिझमच्या खानानें इराणी राज्यावर वारंवार स्वाऱ्या केल्या होत्या, त्याला कैद करून नादीरशहानें त्याचा वध केला. नंतर तो किलातच्या किल्ल्यास गेला व मेशद शहर त्यानें आपल्या राज्याची राजधानी केलें. उत्तरेस ऑक्सस नदीपर्यंत व पूर्वेंस सिंधुनदीपर्यंत त्यानें आपल्या राज्याचा विस्तार केला होता

पश्चिम प्रदेशांतील लढाया : - दक्षिणेस अरबी समुद्र व इराणी आखात असल्यामुळें त्याला राज्यविस्तार करण्याच्या कमी अडथळा झाला, परंतु पश्चिमेस त्याचा मार्ग खुला होता इब्राहिमखान नांवाच्या त्याच्या भावाचा खून केल्याबद्दल लेस्घियन लोकावंर प्रथम सूड उगवून नंतर तुर्कांवर स्वारी करण्याचा इरादा होता. परंतु पहिल्या गोष्टीत त्याला अपयश येऊन त्याचें बरेंच नुकसान झालें. तो कांहीं अफगाण लोकांच्या मदतीस गेला असतांना त्याच्यावर कोणी गोळी झाडून त्याला जायबंदी केलें. तेव्हां या बाबतीत आपला मुलगा रिझाकुली याचें अंग असावें अशी शंका धरून नादीरनें त्याचे डोळे काढविले. या वेळेपासून या राजाच्या शौर्यास ओहोटी लागली; व तो खिन्न, जुलमी आधि शंकेखोर बनला. तुर्क लोकांवर आनायसें एक जय मिळविल्यानें त्याची कीर्ति विशेष वाढली नाहीं व लागलीच त्यानें सुलतानाशीं तह केला या तहानें इराणचा थोडासा फायदा झाला. तुर्क लोकांशीं झालेल्या आणखी एका लढाईंत डायार्बेकरजवळ शहाच्या नासिर उल्ला मिर्झा नांवाच्या धाकटया मुलानें जय मिळविला तरी परिस्थिती विशेष बदलली नाहीं.

नादीरशहाच्या अखेरच्या दिवसांत अंतस्थ दंगेधोपे माजले. राजा खून करत असे  व प्रजाजन कट व बंडें करीत असत. कांही कायदेबाह्य ठरविलेल्या लोकांनीं या अर्धवट वेडया जुलमी राजाचा खून करण्याचा कट केला. त्याच्या संरक्षकांच्या सलाहबे नांवाच्या नायकानें हा बेत तडीस नेला (१७४७) मरते वेळी याचें वय सुमारें साठ वर्षोंचें होतें व यानें अकरा वर्षे राज्य केलें होतें. नादीरशहा उंच, पीळदार बांध्याचा, दांडगां सहा फुटांहून उंच व देखणा होता. यांचे डोळे सुंदर काळेभोर व विस्तृत होते, वर्ण तांबूस असून तोंडावर ऊन व वारा यांच्यामुळें जास्तच राकटपणा आला होता. हा दारू माफक पीत असे, साधें अन्न खात असे व प्रसंगविशेषीं फुटाणे व पाणी यांवरच आपली क्षुधा भागवीत असे.

नादीरच्या कारकीर्दीत कास्पियन समुद्राच्या द्वारें इराणशीं व्यापार खुला करण्याचा ब्रिटीश लोकांनीं प्रयत्न केला. या बाबतींत जोनास हॅन्वे व जॉन एल्टन हीं ध्यानांत ठेवण्याजोगी नांवे आहेत, पैकी हॅन्वेनें इराणची याकाळची अमूल्य हकीकत लिहून ठेवली आहे.

बेबंदशाहीचा काळ : - (नादीरशहापासून कजर घराण्यापर्यंत) नादीरशहाच्या मरणानंतर तेरा वर्षेंपर्यंत बेबंदशाही माजली होती. नादीरच्या मरणाची वार्ता कळतांच अबदाली अफगाणांचा नायक अहमदखान यानें कंदाहार घेऊन कांहीं खजीना लुटला. याच्या कर्तबगारीनें यानें अफगाणीस्तानचें स्वतंत्र राज्य स्थापलें. बख्यत्यारी लोकांचा नायक रशीद कांहीं खजीना घेऊन पहाडांत पळून गेला. नादीरचा खून करणाऱ्या कटवाल्यांनीं नादीरचा पुतण्या अलीयास गादीवर बसण्याकरितां बोलाविलें. प्रजेनें अलीचें स्वागत केलें. अलींने चुलत्याचा खून करविल्याचें कबूल केलें व लोकांना शांत करण्याकरिता त्या वर्षाचा जमीन महसूल व पुढील दोन वर्षांतील इतर कर यांची सूट दिली.

आदिलशहा म्हणजे न्यायी राजा ही पदवी धारण करून हा गादीवर बसला व यानें नादीरचे मुलगे रिझा कुली व नासर उल्ला व इतर प्रतिस्पर्धी यांची कत्तल केली. रिझाचा मुलगा शहा रुख याला त्यानें जिवंत ठेवलें. याला याचा भाऊ इब्राहीम यानें पदच्युत केलें व इब्राहिमचा शाहारुखच्या पक्षांतील लोकांनीं पराभव करून शहारुखला राजा केलें.

शहारुख : - हा राजपुत्र नादीरशहाचा नातू असून शिवाय आईकडून सफाविद शहा हुसेनचाहि नातू होता, त्यामुळें याला गादीवर बसण्याचा जास्त व कायदेशीर हक्क होता. हा शहा प्रेमळ, उदार व दिलदार मनाचा होता, पण आडदांड व आपसांत नेहमी लढणाऱ्या लोकांवर राज्य चालविण्या इतका वयस्क व खंबीर नव्हता. मेशदचा मुख्य मुल्ला मिर्झा दाऊद याचा मुलगा साइंद महंमद, याची आई सुलेमानची प्रख्यात मुलगी होती. यानें आपणांस राजा म्हणवून शहारुखला कैद केलें व त्याचे डोळे काढले. राजकीय सैन्याचा नायक युसुफ अली यानें साइद महंमदचा पराभव करून खून केला व शहारुखला फिरून गादीवर बसविलें आणि स्वत: राजप्रतिनिधी झाला. जाफर कुर्द, मिर आलम आरब वगैरे नायकांचा संघ निर्माण झाला व या संघानें युसुफ अलीचा खून करून शहारुखला फिरून कैदेंत टाकिलें. यानंतर भांडण होऊन मिर आलमला जाफरवर जय मिळाला. याच सुमारास अहमदशहा अबदाली हिरातहून इराणी खोरासान प्रांतांत आला, व मेशद काबीजकरून त्यानें मीर आलमचा वध केला, आणि अंध शहारुखला राज्य सांभाळण्याच्या कामीं मदत करण्याचें वचन स्थानिक नायकांजवळून घेऊन अहमदशहा अफगाणिस्तानांत परत गेला. परंतु यावेळेपासून हा केवळ नामधारी शहा होता व इराणवर याची कोणतीच सत्ता नव्हती.

आणखी अंदाधुंदी : - या अंदाधुंदीच्या काळांत कित्येक प्रमुख व्यक्तींनी देशाची वांटणी केली. कास्पियन समुद्राच्या आग्नेय कोपऱ्यांत कबर लोकांची वस्ती होती. या लोकांच्या अशघा शाखेचा नायक फत्ते अलीखान यानें दुसऱ्या तहमास्पचा पक्ष उचलला होता. याचा नादीरनें खून करून युकारी नांवाच्या याच लोकांच्या एका शाखेच्या इसमास आस्ट्राबादचा अधिपती नेमलें होते. तेव्हां फत्ते अलीखानाचा मुलगा महंमद आपल्या भावासह तुर्कोमन लोकांजवळ पळून गेला, व यांच्या मदतीनें त्यानें आस्ट्राबाद परत मिळविण्याचा प्रयत्न केला. नादीरशहा मेल्यावर गिलन मझंदारन व आस्ट्राबाद या प्रांताचें स्वतंत्र राज्य त्यांनें स्थापिलें. अझरबैजन प्रांतांत नादीरशहाचा सेनापति आझाद खान यानें एक राज्य स्थापिलें व बखत्यारी लोकांच्या नायकाचा भाऊ अलिमर्दान यानें इस्पहान प्रांताचा जबरीनें ताबा घेतला.

अली मर्दाननें शहा हुसेनचा पुतण्या इस्माइल यास पुढें करून स्वत: व झेंद कुर्दांचा नायक करीमखान असे दोघे इस्माइलचे वजीर बनले. शहा इस्माइलच्या हाती कांहीं एक कारभार नसून हे दोघे सर्वस्वी सत्ताधारी होते. कालांतरानें अलीमर्दानचा खून करण्यांत आला व करीम खानानें सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. आर. झी. वॉट्सननें या काळाची हकीकत येणें प्रमाणें दिली आहें : -

तिघा प्रतिस्पर्ध्यांची लढाई - करीम, आझाद व महंमद हसन यांनीं इराणची सत्ता कोणाच्या हातीं रहावयाची या प्रश्नांचा लढाईनें निकाल करण्याचें ठरविलें. करीम इस्पहानचा बंदोबस्त करून मझंदारनवर चालून गेला. मझंदारनचा अधिपति महंमद हसन यानें निकराची लढाई करून करीमचा पराभव केला, परंतु त्याला करीमचा पाठलाग करता आला नाही, कारण आझाद अफगाण गिलन प्रांतावर चालून आला होता; परंतु हसनच्या विजयाची वार्ता ऐकून तो परत गेंला. करीमनें आपले सैन्य व्यवस्थित करून अझादवर चाल केली. तेव्हां अझादनें काझ्विन शहराच्या तटबंदीच्या आश्रयानें करीमच्या सैन्याची बरीच नासाडी केली, त्यामुळे करीम इस्पहनाला परत गेला व पुढल्या वर्षी त्यानें अझादवर फिरून चाल केली, परंतु अझादचा जय होऊन त्यानें करीमचा पाठलाग केला. करीम गरमझीर म्हणजे उष्ण प्रदेशांतील अरब यांच्या आश्रयास पळून गेला.अरब लोकांनां अफगाणांचा तिटकारा वाटत असल्यामुळें त्यांनीं अझादच्या सैन्यावर हल्ला केला. तेव्हां अझाद ताब्रिझला निघून गेला. करीमनें अरबांच्या मदतीनें आपलें नुकसान भरून काढलें व इस्पहानवर चालून गेला.

इस्पाहानहून झेंद नायक करीम यानें दुसऱ्यानें चाल केली व त्याचा कजर नायक हसन यानें फिरून पराभव केला. करीम शिराझच्या किल्ल्यांत दडून बसला व हसनला त्याला हुसकून बाहेर काढतां आलें नाही, तेव्हां त्यानें आपला मोर्चा अझरबैजन प्रांताकडे फिरविला. अझादच्या अंगांत इसनचा प्रतिकार करण्याची ताकद नव्हती. हसननें या प्रांतातील महत्वाची सर्व ठाणी घेतलीं, अझादनें बगदादचा पाशा व जॉर्जियाचा झार यांची मदत मागितली. परंतु त्याला यश आलें नाहीं. नंतर हसननें करीमचा निकाल लावण्याकरितां शिराझवर फिरून चाल केली. करीमनें शिराझच्या किल्ल्याचा फिरून आश्रय धरून हसनच्या सैन्यांत द्रव्याच्या लालुचीनें फूट पाडण्याच्या युक्त्या योजल्या; शिराझच्या आसपासचा मुलुख उजाड करून हसनच्या सैन्यास दाणागोटयाचा तुटवडा पाडला. हळूहळू हसनचें सैन्य त्याला सोडून गेलें, तेव्हां तो इस्पाहानला गेला व तेथें निभाव लागतं नाही असे कळतांच नंतर मझंदारनच्या स्वत:च्या मुलखांत निघून गेला. तेव्हां करीम इस्पहानवर चालून आला व इराणांतील सर्व मुख्य शहरांवर आपला ताबा बसवून त्यानें शेख अली नांवाच्या आपल्या कसलेल्या सेनापतीची हसनचा पाठलाग करण्याकरितां रवानगी केली. हसनच्या सरदारानें बेइमानी करून मझंदारन प्रांताच्या प्रवेशद्वारांतून शत्रुसैन्याला आंत घेतलें हसनला लढाई करावी लागली व शौर्याची कमाल केली असतांहि हसनचा अगदीं मोड झाला. पळून जात असतांना हसनच्या सजातीय हाडवैऱ्यांनीं त्याचा वध केला.

यानंतर करीम खानानें खोरासान प्रांताशिवाय सर्व इराण देशावर वकील अथवा राजप्रतिनिधि या नात्यानें एकोणीस वर्षे राज्य केलें. शिराझ येथें त्यानें आपलीं राजधानीं ठेविली व आपल्या भावांच्या मदतीनें आपली सत्ता हाणून पाडण्याचा, प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक इसमाचा त्यानें बंदोबस्त केला. या झेंद नायकांची कारकीर्द न्यायी व सौम्य होती. इराणी इतिहासांत हा एक निष्कलंक पुरुष होऊन गेला.

१७७९ मध्यें शिराझ शहरीं करीमखान मरण पावला. त्यानें शिराझचा बाजार व हाफीझ कबीचें थडगें बांधले आणि सादी कवीच्या थडग्याचा जीर्णोद्वार केला. त्याचप्रमाणें त्यानें व्यापार व शेतकी या धंद्यांना उत्तेजन देऊन इराणी आखाताच्या किनाऱ्याची बरीच काळजी घेतली व आपल्या राज्यांतील आर्मिनियन लोकांच्या कल्याणाची खबरदारी बाळगली. याच्या कारकीर्दीत ब्रिटीश वखार बंदर अब्बासीहून बुशायरला नेण्यांत आली.

झाकी :- करीमच्या मृत्यूनंतर अंदाधुंदीचा काळ फिरून सुरू झाला. याचा क्रूर व खुनशी भाऊ झाकी यानें राज्यकारभार आपल्या हातीं घेतला. करीमचा दुसरा मुलगा अबुल फत्तेखान व आपला भाऊ महंमदअली यांना यानें आपले समाईक वारस नेमले. अबुल फत्तेखानच्या लोकांनीं शिराझचा किल्ला कपटानें आपल्या ताब्यांत घेतला. या झाकीला करीमच्या मृत्युमुळें दोन भयंकर शत्रू उत्पन्न झाले, त्यामुळें झाकीला आपल्या विश्वासघाताचीं फळें लवकरच चाखावीं लागलीं.

आस्ट्राबादच्या कजर लोकांच्या महंमद हसन नायकाचा मुलगा अगामहंमद याला नादीशहानें कैद केलें होतें व आदिलशहानें क्रूरपणानें छिन्नविच्छिन्न केलें होतें. हा आपल्या बापाच्या मृत्यूनंतर करीमखानास शरण गेला होता व यास शिराझमध्यें नजर कैदेत ठेविलें होतें. करीमच्या मृत्यूची बातमी ऐकतांच हा मझंदारन प्रांतांत पळून गेला व आपलें जातिबांधव एकत्र करून इराणच्या गादीबद्दल झाकीशी लढाई करण्याची त्यानें तयारी चालविली. दुसरा  शत्रू म्हटला म्हणजे झाकीचा भाऊ सादीक हा होय. यानें तुर्की सुभेदारापासून बसरा शहर जिंकून बरीच कीर्ति संपादन केली होती; व करीमच्या मृत्यूची वार्ता ऐकतांच हा आपल्या सैन्यानिशीं बसऱ्याहून शिराझवर चालून आला. झाकींनें आपला पुतण्या अली मुराद याजला निवडक सैन्यासह उत्तरेस आगा महंमदवर रवाना केलें व सादीकच्या अनुचरांचीं कुटुंबें पकडून दुसरे क्रूरपणाचे उपाय योजले; तेव्हां सादीकचे सैनिक शिराझचा वेढा उठवून सादीकला सोडून गेले, त्यामुळे सादीक कर्मान प्रांतांत पळून गेला व याठिकाणांहून त्यानें अली मुरादची मदत मागितली. ही वार्ता अलीमुरादनें आपल्या सोबत्यास कळविली, तेव्हां त्यांनीं झाकीच्या विरुध्द लढण्याचें ठरवून अलीमुरादलाच आपला धनी बनविलें. अली मुराद आगा महंमदचा पाठलाग सोडून देऊन इस्पहानला परत आला व करीमखानाच्या वडील मुलास सादीकचा वारस बनविण्याचा आपला उद्देश आहे असें दर्शवितांच इस्पहानच्या लोकांनीं अली मुरादचें संतोषानें स्वागत केलें. आपल्या पुतण्याच्या या कृत्यामुळें चिडून जाऊन झाकी शिराझहून इस्पहानवर चालून गेला; वाटेंत तो येझ्दिकास्त शहरीं थांबला व तेथील नागरिकांजवळ एक मोठी रक्कम त्यानें मागितली व त्यांनीं ती देण्याचें नाकारतांच अठरा प्रमुख नागरिकांचा त्यानें कडेलोट केला. तेव्हा एकाएकीं लोकांचा कट होऊन झाकीला ठार मारण्यांत आलें (१७७९).

अली मुराद : - झाकीच्या मृत्यूचें  वर्तमान कर्मान प्रांतांत पोंहोचताचं सादीकखान त्वरित शिराझला आला व अबुल फत्तेखानला नालायक ठरवून स्वत: राजा बनला. अली मुरादवर पाळत ठेवण्याकरितां त्यानें आपला पुत्र जाफर यास इस्पहानचा सुभेदार नेमून पाठविलें व अली नाकी नांवाच्या धाकटया मुलास रणांगणावरील सैन्याचें आधिपत्य दिलें. पण अली मुरादनें शिराझ काबीज केलें व सादीकचा वध करवून स्वत: गादीवर बसला असा अखेरचा लढाईचा निकाल झाला.

मार्खामच्या संक्षिप्त इतिहासावरून या काळापासून आगा महंमदाच्या राज्यारोहणापर्यंत घडलेल्या ठळक ठळक गोष्टींची माहिती होईल.

अली मुरादनें १७८५ पर्यंत इराणचें राज्य केलें, व आगा महंमदाचा मझंदारन प्रांतांत कित्येक वेळां पराभव करून तेहरान व सारी हीं शहरें त्यानें घेतली होतीं. तेहरानहून इस्पहानला येत असतांना हा मरण पावला. याच्या मागून सादीकचा मुलगा जाफर हा शिराझ येथें गादीवर बसला. हाजि इब्राहिम नावाचा कर्तबगार परंतु उलटया  काळजाचा मुख्य न्यायाधीश या राजांस राज्यकारभारांत मदत करीत असे. याविरूध्द कट होऊन याला विषप्रयोग करण्यांत आला व कटवाल्यांपैकीं एकजण (सय्यद मुराद) गादीवर बसला. हाजी इब्राहिमने प्रजेचे इमान झेंद राजांविषयीं कायम राखून मुरादला ठार मारविलें व जाफरचा मुलगा लतक अलीखान याला राजा बनविलें. हाजी इब्राहिम राजाचा मुख्य सल्लागार बनला. गादीवर बसतेवेळी लतफ अलींचें वय वीस वर्षांचें होतें. हा फार सुंदर, उंच, मनोहर व घोडयावर बसण्यांत पटाईत होता. हा गादीवर बसून थोडे दिवस लोटलें नाहींत तोंच आगामहंमदनें शिराझला वेढा दिला. परंतु लवकरच तो आपल्या प्रांताची राजधानी तेहरान या शहराला परत गेला. यानंतर कांहीं काळपर्यंत शांतता राहिली. नंतर १७९० मध्यें  यानें आपलें सैन्य जमवून कजर लोकांवर इस्पहान मार्गानें चाल केली परंतु हाजी इब्राहिमनें लतफ अलीविरुध्द त्याचे अधिकारी सैनिक व त्याचा शत्रू आगा महंमद यांशीं कारस्थान केलें. त्यामुळें लतफ अलींचें सर्व सैन्य त्याला सोडून गेलें, तेव्हां तो शिराझला परत आला; परंतु हाजी इब्राहिमनें शहरचें दरवाजे बंद केले. लतफ अली बुशायरला गेला तेव्हां त्यास आढळून आले कीं त्या शहराचा शेख देखील त्याच्या विरूध्द पक्षास मिळाला होता. नंतर लतफनें धैर्यानें हल्ला चढवून बुशायर शहर घेतलें व शिराझला वेढा दिला. त्याच्या शौर्यामुळें त्याला बरेच साथीदार मिळाले व १७९२ मध्यें त्यानें त्याच्यावर चालून आलेल्या एका कजर सैन्याचा देखील पराभव केला.

नंतर स्वत: आगा महंमद लतफवर चालून आला. शिराझजवळ मर्दश्त येथें त्यानें तळ दिला. काळोखांत थोडयाशा लोकासह लतफनें आगाच्या सैन्यावर हल्ला केला, त्यामुळें आगाच्या सैन्याची अगदी दाणादाण उडाली परंतु आगानें प्रसंगावधान राखून प्रभात होताच आपल्या तंबूंतून प्रात:कालची निमाज पढण्याकरितां आपल्या लोकांस ओरडून हाक मारण्यास एका अधिकाऱ्यास (मुअझिन) फर्माविलें, तेव्हां कजर सैन्य परत आलें असा झेंद घोडेस्वारांचा समज होऊन ते पळत सुटले व आगा महंमदाचा अनायासें जय झाला. यानें शिराझमध्यें प्रवेश करून विश्वास घातकी हाजी इब्राहिमला आपला वजीर नेमलें, लतफ अलीखानानें खोरासान प्रांतांतील ताब्बासच्या नायकाच्या आश्रयानें काहीं सैन्य गोळा करून फार्स प्रांतावर चाल केली, परंतु त्याचा पराभव होऊन त्याला कंदाहारला पळून जावें लागलें.

कर्मान शहर पाडाव केलें :-  १७९४ मध्यें गादी परत मिळवावयाची अथवा मारावयाचें या इराद्यानें लतफ अली इराणी हद्द ओलांडून आला व त्यानें  कर्मान शहर घेतले. आगा महंमदनें कर्मानला १७९५ मध्यें वेढा दिला. बराच वेळ निकरानें लढून शहराच्या वेशीं विश्वासघातानें उघडण्यांत आल्या. तेव्हां लतफ अलीनें तीन तासपर्यंत रस्त्यांत लढून शौर्यांची कमाल केली, परंतु कांहीं फायदा झाला नाहीं. अखेरीस तीन सोबत्यांसह कजर सैन्यांतून लढून त्याने मार्ग काढला व बाम-नर्मशीर प्रांतांत तो पळून गेला.

शत्रू निसटून गेल्यामुळे चिडून जाऊन आगानें सरसकट कत्तल करण्याचा हुकूम सोडला. २०, ००० बायका व मुलें यांनां गुलाम म्हणून विकलें व कर्मानच्या ७०,००० रहिवाशांचें डोळे काढून त्यांचा आगा महंदापुढें ढीग घालण्यांत आला.

लतफअली बाम शहरांत दडून बसला, परंतु तेथील सुभेदारानें आगाची मर्जी प्रसन्न करण्याकरितां लतफ थोडयावर स्वार होत असतांना त्याच्यावार पुष्कळ लोकांनिशीं हल्ला केला. घायाळ होऊन लतफ पकडला गेला व त्याची आगाकडे रवानगी करण्यांत आली, तेव्हां अंगावर शहारे आणण्याइतके लतफचे हाल करून त्याला आगानें ठार मारलें. लतफचे सोबती व त्याच्या घराण्यांतील सर्व इसमांची कत्तल उडविण्यांत आली, व येणेप्रमाणें इराणांतील उत्कृष्ट व कुलीन लोकांचा वध करून विजयी नराधम आगा महंमद यानें कजर घराण्याचा पाया घातला.

कैयानियन राज्यांच्या वेळेपासून चालत आलेल्या लाक लोकांच्या एका शाखेला झेंद म्हणत असत. झरथुष्ट्रानें झेंद ग्रंथाचें जतन करण्याचें काम आपल्याकडे सोंपविलें होतें असें हे लोक म्हणत. मार्खमनें लिहिलेल्या इतिहासाच्या या घराण्याविषयींच्या खंडांतील वंशवृक्षांत आठ पुरुषांची नांवें दिली आहेत. त्यांपैकी चार भाऊ होते. एका भावास फक्त एक मुलगा व दुसऱ्या भावास एक मुलगा, एक नातू व एक पणतू होता या आठांपैकी चारांची कत्तल झाली होती, एकाचे डोळें काढण्यांत आले होते व एकाचें शरीर छिन्नविच्छिन्न करण्यांत आलें होतें. एकेवेळीं एका भावाने दुसऱ्या भावास मारलें होतें व दुसऱ्या प्रसंगीं चुलत्यानें पुतण्याचें डोळे काढले होते.

कजर घराणे : - आगा महंमदासारखा दुष्ट व खुनशी, जुलमी राजा आजवर होऊन गेला नाही. परंतु यूरोप व जगांतील इतर देश यांना आपल्या राज्याविषयी बोज वाटावा अशी खबरदारी तो राखीत असे; व आपल्या पूर्व वयांत मझंदारन प्रांतांत रशियन अधिकाऱ्यांशीं वारंवार संघटण घडल्यामुळें रशियन लोकांविषयीं त्याच्या मनांत दृढ अविश्वास उत्पन्न झाला होता.

फॉर्स्टर नांवाचा प्रवाशी म्हणतो कीं, आगा महंमद हा हिंदुस्थानांतील रजपूत लोकांप्रमाणें नेहमीं सशस्त्र असणाऱ्या कजर लोकांचा नायक होता व त्याच्या आधिपत्याखालीं मझंदारन, आस्ट्राबाद हे प्रांत व खोरासान प्रांतांतींल कांहीं जिल्हे यांचा समावेश होत असे. गिलन प्रांत मात्र त्याच्या ताब्यांत नव्हता.

जॉर्जियावरील स्वारी : -  जसजसी आगाची सत्ता वाढत चालली तसतसें रशियन लोकांविषयीं वाटत असलेल्या त्याच्या द्वेषास जास्त व्यावहारिक स्वरूप प्राप्त होत चाललें. लतफ अलीवर जय मिळविल्यावर आगानें जॉर्जियावर स्वारी केली. नादीरशहाच्या मृत्यूनंतर जॉर्जियांचा वली हेराक्लियस यानें इराणचें वर्चस्व झुगारून देऊन रशियाची राणी कॅथेराईन हिच्याशीं तह केला, व तो रशियाचा अंकित बनला. आगानें हेराक्लियसला इराणचा अंकित होण्यास आज्ञा केली व त्यानें तसें करण्याचें नाकारल्यावरून ६०,००० सैन्याच्या तीन तुकडया करून आगानें एक तुकडी डागेस्तान प्रांतावर, दुसरी एरिव्हान शहरावर व तिसरी शुशा शहरावर पाठविली. जोराचा प्रतिकार झाल्यामुळें शुशाचा वेढा सोडून जागा एरिव्हानच्या सैन्यास जाऊन मिळाला व तेंहि सोडून तो पाहिल्या तुकडीस जाऊन मिळाला व गुंजा (अर्वाचीन एलिसावेत्पोल) येथें हेराक्कियसच्या सैन्याचा मोड करून त्यानें तिफ्लिस शहर घेतलें. नंतर तो विजयोत्सवानें तेहरानला परत आला व तेथें त्याला जाहिर रीतीने इराणचा शहा म्हणून राज्याभिषेक झाला. एरिव्हान शहर शरण आलें; यामुळें रशियाला लढाई करावी लागली. डरबेंट, बाकू व शुमाखी ही ठाणीं घेतली गेली, परंतु इतक्यांत रशियाची राणी मेल्यामुळें लढाई बंद पडली.

खोरासान प्रकरण : - इकडे आगाला खोरासानकडे लक्ष द्यावें लागलें. हा प्रांत शहारुखच्या ताब्यांत केवळ नांवाला होता. या प्रांताचा पूर्वेकडील भाग अफगाणांच्या ताब्यांत होता. मेशद शहरांत होणारी बंडें व या प्रांतावर होणारे परकी लोकांचे हल्ले यांचा शहारुखला बंदोबस्त करतां येत नसे. जॉर्जियावरील स्वारीवरून परत आल्यावर आगा मेशदवर चालून गेला. त्यानें जाहीर रीतीनें शिया पंथ स्वीकारला होता. लढाई न करतां आगाला मेशद शहरांत प्रवेश करतां आला. इमाम रिझाच्या थडग्याजवळ पायीं चालत जाऊन आगानें तेथें गुडघे टेकले व आपण कट्टा शिया असल्याचें दर्शविलें नंतर खजीना, व जवाहीर लपवून ठेविलें होतें ती जागा दाखवावी म्हणून शहारुखचा क्रूरपणे छळ करण्यांत आला व त्याला हद्दपार करण्यांत आलें. शहारुख दमधान येथें मरण पावला. मेशद येथें १२ हजार शिपयांची शिबंदी ठेवून सर्व खोरासान प्रांत खालसा केला.

आगा महंमदचा मृत्यू व स्वभाव : -  यानें तेहरान शहरीं आपली राजधानीं ठेविली. कास्पयिन समुद्राच्या पश्चिमेकडील आगानें जिंकलेल्या प्रदेशावर रशियन लोकांनीं फिरून स्वारी केली. १७९७ मध्यें आगाशहानें आपल्या सैन्यानिशीं आरास नदीकडे मोर्चा फिरविला. रशियन लोक निघून गेले होते, तरी त्यांनीं टॅलिश पर्यंतचा दक्षिणेकडील प्रदेश परत घेतला होता. नदी ओलांडून शुशा शहर आगानें काबीज केलें व तेथें तळ देऊन राहिला असतां त्याच्या सेवकांनींच त्याचा खून केला मरतेवेळीं याचें वय सत्तावन वर्षांचे होतें. राज्याभिषेकानंतर यानें सुमारें एक वर्षच राज्य केलें.

आदिलशहाच्या वेळीं तरुण आगाला क्रूरपणे वागविण्यांत आल्यामुळें व त्याचे शत्रू त्याला 'नपुंसक' या नावांनें चिडवीत असल्यामुळें आगाचा स्वभाव असा क्रूर झाला होता. परंतु ऐषआरामाचा कंटाळा, डामडौल न दाखविणे, व्यापाराची वृध्दी व सैनिकांनी निगा वगैरे वाखाणण्यासारखे गुण यांच्या अंगी होते, परंतु हा मेल्यावर अमानुष जुलमाबद्दलचीच कीर्ति याच्या मागे शिल्लक राहिली. दाढी नसल्यामुळें याचा चेहरा सुरकुत्या पडलेल्या एखाद्या म्हातारीप्रमाणें दिसत असें. याच्या तोंडावर आनंदाची छटा कधींहि झळकत नसे. आपल्या तोंडाकडे कोणी पाहिल्याचें त्याला कधींहि खपत नसे

फत्तेअली शहा : - आपला सख्खा भाऊ  हुसेन कुली खान याचा मुलगा फत्ते अलीशहा यानें आपल्या पश्चात गादीवर बसावें असें आगानें ठरविलें होते. आगाचा खून झाल्यावर कांहीं काळ अंदाधुंदी माजली होती. आगाच्या प्रेताची विटंबना करण्यांत आली .नवीन जिंकलेला किल्ला सोडून देऊन सैन्यांत गडबड उडाली होती; परंतु वजीर हाजी इब्राहिमनें स्वामीभक्त राहून तो मोठया सैन्यांनिशीं राजधानीवर चालून गेला व मिर्झा महंमद खानानें शिराझहून फत्तेअलीशहा येईपर्यंत तेहरानच्या वेशी बंद करून टाकिल्या. १७९८ मध्यें फत्तेअली शहाला राज्याभिषेक झाला. यानंतर बरीच बंडें झाली, पैकीं तीन मुख्य होतीं. (१) सादिक खान शकाकी नांवाच्या एका सेनापतीच्या सैन्याचा काझ्विन येथें पराभव करण्यांत आला, परंतु राजाचें जवाहिर त्याच्या ताब्यांत असल्यामुळें त्याला क्षमा करण्यांत आली. परंतु राजाची त्याजवर गैरमर्जी झाल्यावरून त्याला तुरुंगांत भिंतींत चिणून ठार मारण्यांत आलें. (२) आगाचा भाऊ हुसेन कुली खान याच्या बंडाचा आईच्या मध्यस्थीनें निकाल लावला गेला. (३) साकीखान झेंद याचा मुलगा महंमद याने बंड केलें होतें. परंतु त्याचा अनेक वेळां पराभव होऊन तो तुर्क राज्यांत पळून गेला. आगा महंमद मेशदला जाण्यापूर्वी शहारुखचा मुलगा नादीर मिर्झा अफगाणांच्या आश्रयास पळून गेला होता. त्याला फत्ते अलीनें बजाविलें असतांहि त्यानें खोरासानवर चाल केली होती. फत्ते अली निशापुर व टर्बेट हीं शहरें घेऊन मेशदला जाऊन पोंहोचला, तेव्हां नादीर मिर्झा शरण आला. नादीरच्या मुलींशी एका कजर नायकाचें लग्न लावून समेट करण्यांत आला.

रशियाशीं युध्द : - फत्ते अली शहा बत्तीसाव्या वर्षी गादीवर बसला व छतीस वर्षे राज्य करून अडुसष्ठाव्या वर्षी मरण पावला. इराणचा मुख्य उद्देश सफाविद राजांच्या वेळच्या या राज्याच्या वायव्य व ईशान्य सरहद्दी परत मिळविण्याचा होता, परंतु बलाढय यूरोपियन राष्ट्राची हद्द या राज्याच्या हद्दीस भिडलेली असल्यामुळे ही गोष्ट साध्य करणें सोपें काम नव्हतें. आपल्या कारकीर्दीच्या प्रारंभी फत्ते अलींने कास्पियन समुद्राच्या पश्चिम बाजूवर रशियाशीं लढाई केली, ही नित्याची व त्रासदायक लढाई झाली. जॉर्जिया मुसुलमानी सत्तेखालीं पुंन्हां कधींहिं येणार नव्हता हें स्पष्ट होतें. १८०० मध्यें या देशाचा झार जॉर्ज यानें रशियाचा पक्ष घेतला, परंतु याचा भाऊ अलेक्झांडर यानें या कृत्याचा निषेध केला. जनरल लॅझेरोव्हनें त्याचा पराभव केला, म्हणून इराणनें पुन्हां लढाई सुरू केली. इराणच्या सैन्याचें आधिपत्य युवराज अब्बास मिर्झा याच्या कडेस होतें व रशियन सैन्याचा सेनापति जनरल झिझियानोव्ह हा होता. एक्मियाझ्झिन येथें तीन दिवस चालणारी लढाई, रशियन सेनापतीचे एरिव्हान शहर घेण्याचे निष्फळ प्रयत्न, अब्बासची शिशाह शहरावर चाल व एरिव्हान शहर घेणें, रशियन लोकांची गिलन प्रांतावरील निरर्थक चढाई, झिझियानोव्हचा बाकूच्या इराणी सुभेदारानें केलेला खून, शुशाच्या इराणी नायकाची रशियन शिबंदीनें केलेली कत्तल वगैरे गोष्टी या युध्दांत घडल्या. रशियन लोकांनां सैन्यबल, मुबलक पैसा व तोफखाना अशा तीन गोष्टी इराण्यांपेक्षा जास्त होत्या. इराणी लोक निकरानें लढले. विजयश्री उभय पक्षांच्या गळयांत आळीपाळीनें माळ घालीत असे. शिर्वान प्रांतांत आपल्या लष्कराचा मांड मोडून अब्बास मिर्झा कांही एक प्रगति न करतां ताब्रिझला परत आला. रशियनांनी मात्र टर्बेट, बाकु, शिर्वान, शेकी, गंज, टालिश व मुगन या प्रांतांचा ताबा मिळविला. परंतु रशियन गव्हर्नर-जनरलचें तहाचें बोलणें इराणी लोकांनी मान्य केलें नाहीं.

रशियाशी इराणची लढाई पुन्हां सुरू झाली व १८१२ मध्यें इराणी दरबारांतील ब्रिटीश वकिलानें तह घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ झाला. ख्रिस्ती व लिंड्से नांवाचे ब्रिटीश अधिकारी इराणी सैन्याबरोबर होते. शत्रूंनी अचानक छापे रात्रींच्या वेळी घालून इराणी सैन्याची दाणादाण केली. ख्रिस्ती मारला गेला, लेंकोरन ठाणें इराणी लोकांनी घेतलें, परंतु रशियानें तें परत मिळविलें. इराणी दरबारांतील ब्रिटीश वकील सर जॉर्ज आउस्ले यानें गुलिस्तानचा तह १८१३ मध्यें करवून या लढाईचा निकाल लावला. इराणनें जॉर्जिया व वरील सात प्रांत व कारबाक रशियाच्या हवाली केलें.

१८२५ मध्यें अलेक्झांडर झार मेल्यावर इराण व रशियामधील ठरलेल्या सरहद्दीच्या लढयांचा निकाल लावण्यांकरितां राजपुत्र मेन्शीकोव्ह तेहरानला आला होता. परंतु त्यावेळेस रशियाच्या ताब्यांत असलेल्या एका जिल्ह्याबद्दलची इराणची मागणी कबूल न केल्यामुळे रशियन वकिलास निरोप देण्यांत आला व लढाई सुरू झाली. तालीशच्या नायकानें लेंकोरनहून रशियनांस हांकून लावून  लढाईचा ओनामा केला. यानंतर सर्वत्र इराणी लोकांचा जय झाला व शिर्वान, बाकू व शेकी प्रांतांचे वंशपरंपरागत नायक इराणी सैन्याच्या मदतीस धांवून आले; आणि शुशाचा छोटा किल्ला एवढेंच ठाणें रशियाच्या ताब्यांत राहिलें, परंतु लागलीच लढाईचें पारडें फिरलें. अब्बास मिर्झाचा पुत्र महंमद मिर्झा याचा झेझम नदीवर रशियन सैन्याने पराभव केला, अब्बासच्या सैन्याची गंज येथें धूळधाण उडविण्यांत आली; शहानें लढाई चालू ठेवण्याचे अटोकाट प्रयत्न केले, परंतु अब्बासच्या सैन्यांत फार दुफळी माजली होती. एरिव्हान व नाखिचेव्हान प्रांत व लढाईचा खर्च रशिया मागत असल्यामुळें इराणचें तहाचें बोलणें वायफळ झालें; व १८२७ मध्यें लढाई फिरून सुरू झाली. ठाणी घेणें व सोडणें असा प्रकार होतां होतां रशिनांनी इराणचीं एरिव्हान व ताब्रिझ ही शहरें घेतली. अखेरीस ब्रिटीश वकील मॅक्डोनल्ड याच्या मध्यस्थीनें तुर्कमंचैचा तह होऊन रुसो-इराणी सरहद्द मुक्रर करण्यांत आली. या तहान्वयें एरिव्हान नाखिचेव्हन प्रांत रशियास कायमचे द्यावे लागले, इराणला कास्पियन समुद्रावर लढाऊ जहाज बाळगण्याची मनाई करण्यांत आली व ३० लक्ष पौंड युध्द खर्च द्यावा लागला.

इंग्लंड, हिंदुस्थान व फ्रान्स या देशांशी इराणचा संबंध : - मुंबईच्या ब्रिटीश गव्हर्नरचें शहाला पत्र घेऊन महादी अलीखान नांवाचा इसम बुशायर येथें आला. त्याच्या पाठोपाठ हिंदुस्थानच्या गव्हर्नर-जनरलकडून कॅप्टन माल्कम नांवाचा वकील आला. यानें अफगाण व फ्रेंच लोक आणि इराणी आखातांतील व्यापार याविषयीं बोलणें लावलें. अखेरीस व्यापार व राजकारण या बाबतीत एक तह घडून आला व इराणच्या शहाकडून एक मिशन हिंदुस्थानला पाठविण्यांत आलें १८०१ मध्यें बगदादचा एक आर्मेनियन व्यापारी नेपोलियन बादशहाचीं पत्रें घेऊन आला परंतु त्यावर विश्वास ठेवला गेला नाही. पाच वर्षांनी जॉबर्ट तेहरानला आला, याच्या बरोबर इराणी वकील यूरोपांत गेला व फ्रेंच बादशहाशीं फिंकेन्स्टिन येथे तह झाला. इराणी वकील परत आल्यावर जनरल गार्डेन व आणखी कांही अधिकारी यांचें मिशन इराणी लष्करास कवाईत शिकविण्याकरितां आलें या कारणामुळें ब्रिटीश सरकारनें सर हारफोर्ड जोन्सला पाठविलें. हा मुंबईस १८०८ मध्यें येण्यापूर्वीच हिंदुस्थानच्या गव्हर्नर-जनरलनें माल्कमला इराणांत पाठविलें होतें.

सर हारफोर्ड १८०९ मध्यें इराणच्या राजधानीस जाऊस पोहोचला. या पूर्वीच, फ्रान्स व रशियामध्यें टिल्सिटचा तह झाल्यामुळें जनरल गार्डेनला बडतर्फ करण्यांत आले होतें. सर हारफोर्डनें इराणशीं तह केला. हिंदुस्थान सरकारनें या कृत्यामुळें तृप्त न होतां माल्कमला १८१० मध्यें फिरून पाठविलें. यानें कांहीं तोफा व इराणीं सैन्यास कवाईत शिकविण्याकरिता ख्रिस्ती व लिंडसे हे अधिकारी शहाच्या स्वाधीन केले. शहानें माल्कमचें स्वागत केलें; नंतर एक महिन्याने माल्कम हिंदुस्थानला परत गेला. १८११ मध्यें हारफोर्डच्या जागीं सर जॉर्ज आउस्ले हा ब्रिटीश वकील होऊन आला.

१८१४ मध्यें सर आउस्ले परत आला व मि. एलिस आणि मि. मोरिअर यांनी ग्रेटब्रिटनच्या वतीनें तेहरानचा तह केला. या तहानें इराणनें उपस्थित न करतां इराणवर परकी स्वारी झाली तर इंग्लंडनें इराणला सैन्य अथवा पैसा पुरवावा आणि इराणनें अफगाण लोकांनीं हिंदुस्थानवर स्वारी केल्यास त्यांच्यावर हल्ला करावा असें ठरलें. १८१५ पासून ग्रेटब्रिटनचा एक वकील इराणच्या दरबारी नेहमीं असतो. फत्ते अली शहाच्या कारकीर्दीत हेन्री मार्टिननें इराणांत राहून नव्या कराराचें इराणी भाषेंत भाषांतर केलें. १८२८ मध्यें रशियन वकील एम् ग्रेबायडोव्हचा तेहरान येथें खून झाला. त्यामुळें समेट घडवून आणण्याकरितां इराणच्या युवराजाचा पुत्र व इतर इराणी उमराव यांचें मिशन सेंट पिटर्सबर्गला पाठविण्यांत आलें व तह होऊन रशियाशीं दोस्ती करण्यांत आली; आणि इंग्लंडचें इराणी दरबारांतील वजन हलकें पडलें.

तुर्कस्तानशीं लढाई : - पश्चिमेस इराण व तुर्कस्तान या दोन राज्यांची सरहद्द एक होती. १८०४-१८०५ मध्यें तुर्की सुलतानानें काळया समुद्राच्या आग्नेय किनाऱ्यावरून रशियन सैन्यास इराणी सैन्यावर चाल करण्यास मार्ग खुला केला होता. शहाचा वडील मुलगा महंमद अली मिर्झा व बगदादच्या सुभेदाराचा जांवई सुलेमान पाशा यांच्यामध्यें चकमक झाली होती. १८२१ मध्यें इराणी यात्रेकरू व व्यापारी यांच्या कागाळया व सरहद्दीवरील भांडणें यामुळें परमावधी होऊन लढाई सुरू झाली. अब्बास मिर्झानें टोप्राक. कलाह व आक सराई ही तुर्कांची तटबंदीची ठाणीं घेऊन तुर्की सैन्याचा मोड केला व मुश, बिटलिस व इतर ठाणीं यांवर हल्ला चढविला. तुर्की सैन्याने दक्षिणेस इराणी सरहद्दीवर स्वारी केली. तुर्की सैन्याचा अधिपति बगदादचा पाशा याचा महंमद अली मिझानें पराभव करून बगदाद पर्यंत चाल केली. इराणी सैन्यांत पटकीचा रोग उद्भवल्यामुळें महंमद अली इराणीं सरहद्दींत परत आला व किरिडच्या घाटात मृत्युमुखी पडला. स्वत: शहा हमदानावर चाल करून आला; परंतु पटकीचा आजार सुरू झाल्यामुळें इराणी सैन्य निघून गेलें.

उत्तरेस असाच एक रोग उद्भवल्यामुळें अब्बासची प्रगति थांबली व लढाई बंद पडली. चार महिन्यानंतर एरिव्हानच्या सरदारानें अर्झरूमच्या रस्त्यावरील एक तुर्की लष्करी ठाणें घेतलें व अब्बासनें आपल्याहि पेक्षां मोठया तुर्की सैन्याचा अगदीं मोड केला. अब्बास अर्झरूमच्या पाशाशीं तहाचें बोलणें लावून इराणी हद्दींत निघून आला. परंतु बगदादमध्यें कांहीं गडबड असल्यामुळें दीडवर्षपर्यंत हें बोलणें लांबणीवर पडलें. अखेरीस १८२३ मध्यें अर्झरूमच्या तहानें या लढाईचा शेवट लागला. इराणी प्रवाशी व यात्रेकरू यांपासून बळजबरीनें कर वसूल करणें, राजघराण्यांतील व इतर कुलीन स्त्रियांचा मक्केच्या यात्रेला जातांना होणारा अपमान, बेकायदेशीर जकात वसुली व कुर्द दरोडेखोरांनां शिक्षा न देणें या लढाई उपस्थित करणाऱ्या गोष्टी पुन्हां घडून येऊं नयेत अशी व्यवस्था या तहानें करण्यात आली.

अफगाण प्रकरण : - इराणी राज्याच्या पूर्वसरहद्दीबद्दल अफगाण लोकांशीं इराणला लढाई करावी लागली; परंतु अफगाण लोक रशियन लोकांप्रमाणें चिकाटीचे नव्हते किंवा तुर्कांप्रमाणें उच्छृंखल दोस्तहि नव्हते. बलाबलाच्या मानानें इराणी लोकांप्रमाणें जरी अफगाण लोक होते, तरी त्यांना व्यवहारज्ञान व अनुभव नव्हता. शिवाय राष्ट्राभिमान व स्वदेशभक्ति या दोन गुणांचा लोप होऊन अफगाणिस्तानांतील राजघराण्यांत फूट झाली होती.

नादीरच्या वंशांतील हद्दपार केलेल्या शहा रूखचा पुत्र नादीर मिर्झा याच्या बंडामुळें शहाचें लक्ष खोरासान प्रांताकडे वेधलें होतें हे अगोदरच सांगितले आहे. व इराणी शिबंदीमुळें जरी मेशदमध्यें तात्पुरती शांतता प्रस्थापित झाली होती तरी नादीर मिर्झाविषयी फिरून कागाळया आल्या होत्या. हात तोडणें, जीभ कापणें वगैरे घोर उपायांनीं याचा बंदोबस्त करण्यांत आला. अफगाण लोकांनीं नादीर मिर्झाचा पक्ष कधींहि नेटानें उचलून धरला नव्हता किंवा खोरासान प्रांतावरील इराणच्या शहाच्या स्वामित्वाचा कधींहि स्पष्टपणे प्रतिकार केला नव्हता असें आढळून येतें. परंतु नादीरच्या मृत्युपासून इराणी राज्याचा नांवाला एक प्रांत याशिवाय इराणचा या प्रांतावर कधींहि जास्त पगडा नव्हता. १८३० मध्यें रशियाच्या सल्ल्यानें इराणी शहानें आपल्या राज्याच्या पूर्वेकडील सर्व बंडखोर नायकांचा बंदोबस्त करण्याकरितां मोठें सैन्य जमविलें. येझ्द व कर्मानवर हल्ला करून खोरासानमध्यें प्रवेश करण्यांत आला. अब्बासच्या सैन्यानें बरीच निकाराची लढाई करून व प्राणहानि सोसून कूचान, सेराखस वगैरे कित्येक किल्ले व ठाणीं काबीज केली. व स्वारीचा इष्ट हेतु बहुतेक तडीस नेला.

तैमूर शहाचा मुलगा हाज्जी फिरुझुद्दिन हा १८००-१८१६ पर्यंत अव्याहतपणें हिरात शहरावर राज्य करीत होता हा व याचा भाऊ महमूद फत्तेअली शाहाच्या राज्यारोहणापासून इराणी छत्राखाली होते. इराण हिरातवर नादरिशहाच्या राज्याचा भाग म्हणून हक्क दाखवीत असे आणि खंडणी अथवा उडवाउडवींचीं उत्तरें देऊन प्रसंग निभवून नेण्यांत येत असे. यावेळीं जेव्हां इराणी सैन्यानें हिरातवर चाल केली तेव्हां फिरुझुद्दिननें आपला भाऊ काबूलचा शहा महमूद याची मदत मागितली व त्यानें फत्तेखान बरकझइ नांवाच्या विख्यात वजीराला पाठवून दिलें. या वजीरानें कारवाईनें किल्ला व शहर आपल्या कबज्यांत घेऊन इराणी सैन्यास इराणी हद्दीत हांकून लावलें. मुस्तफाखानानें तात्पुरता हिरातचा कबजा घेतला होता, त्याच्या विनंतीवरून १८२४ मध्यें इराणी सैन्य हिरातवर पाठविलें होतें, परंतु लांच देऊन हें सैन्य परत पाठविण्यात आलें. यानंतर आठ नऊ वर्षांनी अब्बास मिर्झानें मेशेदमध्ये असतांना हिरातच्या यार महंमद खानास समेट करण्याकरितां बोलावलें होतें. परंतु त्याचा कांहीं एक परिणाम न होता अब्बासचा पुत्र महंमद मिर्झा यानें इराणी सैन्यासह हिरातवर चाल केली परंतु अब्बासच्या मृत्युमुळें महंमद मिर्झा मेशदला परत आला.

फत्तेअली शाहाचें कुटुंब मोठें होतें. यानें आपला दुसरा मुलगा अब्बास मिर्झा यास गादीचा वारस नेमलें होतें. हा पित्याच्या हयातींत वारल्यामुळें अब्बासचा मुलगा महंमद मिर्झा याला शहानें आपला वारस नेमलें होतें.

महंमदशहा : -हा शहा १८३४ मध्यें गादीवर बसला. यावेळीं याचे वय अठ्ठावींस वर्षांचें होतें. साडे तेरा वर्षे राज्य करून हा बेचाळीसाव्या वर्षी मरण पावला. तेहरान व शिराझ प्रांताचे सुभेदार अनुक्रमें अली मिर्झा व हसन अली मिर्झा यांनीं इराणच्या तख्तावर हक्क दाखविला होता, ब्रिटीश वकील सर जॉन कॅम्प्बेल व कर्नल बेथ्युन यांच्या साहाय्यानें या दोन्ही बंडखोरांचें पारिपत्य करण्यांत आले व नंतर शहाचा राज्याभिषेक जाहीर रीतीनें झाला.  मुख्य वजीराला गळा दाबून मारणें, तेहरान शररांत प्लेग व महामारी रोगांचा उपद्रव या गोष्टी या शहाच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी घडल्या.

हिरातवरील स्वारी : - हाजी मिर्झा अघाशीं नांवाच्या एरिव्हानच्या रहिवाशास त्याच्या विद्वतेच्या कीर्तीमुळें इराणचा वजीर करण्यांत आलें. रशियन वकील कौंट सायमोनिकनें या वजीराला हिरात व खोरासान प्रदेशावर स्वारी करण्यास प्रोत्साहन दिलें परंतु या लढाईस आणखी बरीच कारणें झाली. अब्बास मिर्झानें नेस्तनाबूद केलेल्या नायकांनीं फिरून बंड केलें होतें. फत्तेअली शहाला दिलेलीं वचनें वजीर यार महंमद व कामरान शहा यांनीं मोडली होतीं व इराणच्या स्वामित्वाखालचा सीस्तान प्रांतहि त्यांनीं घेतला होता. अफगाण लोकांचा स्वर्तत्र राज्यपध्दतीचा हक्क  शहाने नामंजूर केला व कंदाहार आणि गझनी प्रांतावर जुन्या सफाविद घराण्याचा राज्याचे प्रांत म्हणून हक्क दाखविला. हिरातच्या सादुझइविरुध्द मदत देण्याचे वचन, कंदाहाराच्या बरकझइ नायकांनी तेहरानला मिशन पाठवून शहाला कळविलें याच सुमारास शहाची कर्माननें कांहीं आगळीक केली त्यामुळे इंग्लिश वकीलाच्या सल्ल्याविरुध्द शहानें लढाई पुकारली.

१८३६ मध्यें इराणी सैन्याचा तळ आस्ट्राबाद जवळ पडला. अन्नाचा तुटवडा सैन्यास फार भांसू लागला. पगार व भरपूर अन्न न मिळाल्यामुळें सैन्यांत बेदिली पसरली. तुर्कोमन लोकांनां त्यांच्या एका मजबूत ठाण्यांतुन हांकून लावण्यांत आलें, परंतु त्यांचा पूर्ण बंदोबस्त मुळींच करतां आला नाहीं. हिरातच्या लोकांनी खंडणी देण्याचें कबूल केले व ही गोष्ट शहास पसंत नसेल तर त्यानें खुशाल स्वारी करावी असा निरोप शहास पाठविला. शहानें शाहरुड येथें लष्करी कौन्सिल भरविलें व त्यांत असें ठरलें की, राजधानीला परत जाऊन पुढल्या वर्षी फिरुन स्वारी करावी. शहा सैन्यास रजा देऊन तेहरानला परत आला, १८३६ मध्यें ब्रिटीश वकीलानें हिरातच्या स्वारीचा नाद सोडण्याचा शहास फिरुन सल्ला दिला. परंतु तो न ऐकूण शहानें १८३६ मध्यें हिरातप्रांतावर चाल करून हिरात शहराला वेढा दिला.

हिरातचा वेढा : - हा वेढा दहा महिनेपर्यं चालला होता. एम्. नील या ब्रिटीश वकीलानें हिरातचे लाक व शहा यांमध्यें तडजोड करण्याचा बराच प्रयत्न केला पण तो फसला. एम्. नील निघून गेल्यावर रशियन वकीलाच्या चिथावणीमुळें शहाच्या सैन्यानें पांच ठिकाणीं हल्ला केला. व एका ठिकाणी त्याचा जय झाला असता परंतु ब्रिटीश सैन्यानें हिरातला केलेल्या मदतींमुळें इराणी सैन्यास हार खावी लागली. कर्नल स्टोडार्टनें ''ब्रिटीश सरकारला यांत ढवळाढवळ करावी लागेल'' अशी धमकी शहास दिल्यामुळें शहा वेढा उठवून निघून गेला. ब्रिटीश मध्यस्थांच्या मार्फत या भांडणाचा निकाल लावला जाईल या स्टोडार्टच्या उत्तरानें प्रसंग निभावून नेला.

महंमद शहाच्या कारकीर्दीतील महत्वाची गोष्ट म्हटली म्हणजे हिरातचा वेडा होय. ब्रिटीश सरकारशीं नवीन तंटे, आगाखान महालतीचें बंड, तुर्कस्तानशीं उपस्थित झालेली कुरापत, खोरासानचा सुभेदार व शहाचा मामा असफद्दौला यानें बंड केल्यामुळें त्याला हद्दपार करणें, त्याच्या मुलाचें बंड व मोड आणि बाबीपंथाचें बंड या गोष्टी शहाच्या उरलेल्या कारकीर्दीत घडल्या.

इंग्लंडशीं बखेडा : - ब्रिटीश सरकारनें इराणजवळून अफगाण लोकांशीं झालेल्या लढाईंत फाराहू व सब्झेवार हीं जिंकलेलीं ठाणीं सोडून देणें व ब्रिटीश वकिलातीच्या जासुदास केलेल्या अडथळयाबद्दल भरपाई या मागण्या केल्या. एम. नीलनें या मागण्यांचा निकाल लावण्याकरितां कांहीं वेळ दिला व त्या मुदतींत इराणकडून समाधानकारक जबाब न मिळाल्यामुळें राजकारणसंबंध तोडून ब्रिटीश अधिकाऱ्यांस हिंदुस्थानला पाठवून दिलें व आपल्या मिशनच्या लोकांसह अर्झरूमला निघून गेला. इराणनें एम. नीलवर कांहीं आरोप ठेवून त्यांचें समर्थन करण्याकरितां इंग्लंडला एक वकील मुद्दाम पाठविला. शिवाय इराणच्या वतीनें ब्रिटीश सरकारचें मन यूरोपांतील इतर राष्ट्रांच्या प्रधानमंडळांकडून वळविण्याचा देखील प्रयत्न करण्यांत आला. १८३९ मध्यें इराणी वकील व ब्रिटीश परराष्ट्रीय प्रधान यांची मुलाखत होऊन इराण सरकाराजवळून ब्रिटीश सरकारनें केलेल्या मागण्या तपशीलवार सांगण्यात आल्या, व बराच काळ लोटल्यावर इराणनें या सर्व मागण्या मान्य करून देऊनहि टाकल्या.

१८४१ मध्यें तेहरानला जॉन एम. नीलचें नवीन मिशन पाठवून राजकीय संबंध फिरून सुरू करण्यांत आलें. शहानें या मिशनचे फार मन:पूर्वक स्वागत कलें व उलट ब्रिटीश सरकारनें हिंदुस्थानांतील ब्रिटीश सैन्यानें काबीज केलेलें खाराक  बेट इराणला मोकळें करून दिलें. काउंट सायमोनिक व इतर रशियन अधिकारी यांनीं हिरात शहरीं केलेल्या उलाढालीबद्दल यूरोपांत बराच पत्र व्यवहार ब्रिटीश व रशियन सरकारांमध्यें झाला व अखेरीस रशियानें इराण सरकारची चूक व ब्रिटीश सरकारच्या मागण्या रास्त असें आपलें मत दिलें व कंदाहारहून आपला एजंट परत बोलावून अफगाण लोकांशीं व्यापाराशिवाय कोणत्याहि प्रकारचा राजकीय संबंध न ठेवण्याचें ठरविलें.

सरहद्दीसंबंधीं तुर्कस्तानशीं लढा उपस्थित झाला, परंतु हें प्रकरण आंग्लो-रशियन कमिशनरच्या मध्यस्थीवर सोंपविण्यात आलें. याच शहाच्या कारकीर्दीत इराणांत आफ्रिकेहून गुलाम आणण्याच्या पध्दतीस आला घालण्यांत आला व इंग्लंशीं व्यापारी तह करण्यांत आला.

महंमदशहा १८४८ मध्यें दु:साध्य रोगानें मरण पावला. याला इराणच्या शहांचीं थडगीं असलेल्या कुम शहरीं पुरण्यांत आलें. हा ठेंगणा व लठ्ठ असून याचा चेहरा प्रेक्षणीय व नाक गरुडासारखें होतें.

नासिरुद्दिन शहा:- महंमदशहाच्या मरणाच्या वेळीं, युवराज नासिरुद्दिन अझबैंजन प्रांताचा सुभेदार असल्यामुळें ताब्रिझ शहरीं होता. ब्रिटीश वकीलानें रशियन वकिलांशीं संगनमत करून शहाच्या अत्यवस्थ स्थितींत नासिरुद्दिनला मुद्दाम जासूद पाठवून तेहरानला बोलाविलें. तरी माजी शहाच्या मृत्यूनंतर नवीन शहा गादीवर बसेपर्यंत लोटलेला सहा आठवडयांचा काळ फार अंदाधुंदीचा होता. वजीर हाजी मिर्झा आघाशीं राजवाडयांत दडून बसला. हद्दपार केलेल्या असफउद्दौल्याचा साथींदार मिर्झा आगाखान यास राजधानींतील लोकांनीं परत बोलाविलें. राजधानींत राज्यक्रांति सुरू होऊन येझ्द प्रातांत लुटालूट चालू होती. तेहरानचा सुभेदार राजपुत्र अली मिर्झा याच्या मुलानें काझ्वीनला गादी मिळविण्याकरितां बंड केलें, परंतु त्याचा पूर्ण मोड झाला. १८४८ सप्टेंबर २ रोजी मध्यरात्री शहाला अभिषेक झाला.  यावेळीं मेशद येथें एक बंड जोरानें चालू होतें.

या शहाच्या कारकीर्दीत बंड, (१) खोरासान प्रांतांतील बंड, (२) बाबी लोकांचें बंड, (३) अभिरुनिझामचें पतन, व (४) इंग्लंडशीं लढाई या चार गोष्टी मुख्यत्वेंकरून घडल्या.

खोरासान प्रांतांतीलं बंड -:  मुख्य वजीराच्या जागेबद्दल हाजी मिर्झा अघाशीचा प्रतिस्पर्धी यास बंड केल्यामुळें हद्दपार करण्यांत आलें होतें व त्याच्या मुलानें तुर्कोमन लोकांचा आश्रय घेतला होता हें अगोदरच सांगितलें आहे. महंमदशहाच्या मरणापूर्वी चार महिने अगोदर हा परत आला  व यानें मेशद काबीज करून तेथील इराणी सुभेदार हिरातचा यार महंमद या शहाच्या लोकांस परत जावयास लावलें. नासिरुद्दिनच्या मुराद मिर्झा नांवाच्या चुलत्यानें अठरा महिने वेढा दिल्यावर हा बंडखोर शरण आला, नंतर तो व त्याचा भाऊ यांचा वध करण्यांत आला आणि मुराद मिर्झाला खोरासानचा सुभेदार नेमण्यांत आलें.

बाबी पंथ : - बाबीपंथाचा मुख्य शिराझचा मिर्झा अली महंमद याचें चरित्र व बाबी लोकांचीं चळवळ याविषयीं माहिती बाबीपंथ यांवरील स्वतंत्र लेखांत दिली आहे.  [बाबीपंथ पहा.] १८५० मध्यें या मुख्याचा वध करण्यांत आला. तरी त्याच्या अनुयायांनीं राज्यक्रांतिकारक धर्मप्रसार सुरूच ठेविला. १८५२ मध्यें तेहरानच्या आसपास शहा घोडयावर बसून चालला असतांना चार बाबी लोकांनीं हल्ला करून व एकानें पिस्तुल झाडून थोडींशी दुखापत केली. यानंतर चाळीस इसमांचा कट उघडकीस येऊन यांपैकीं दहांस देहांत शासन व इतरांस कडक शिक्षा देण्यांत आल्या.

मिर्झा टाकीचें वतन : - मिर्झा टाकी अभिरुन्निझाम, अथवा मुख्य सेनापति हा इराणांतील स्वत:चे हिमतीवर उदयास आलेला एक उत्तम गृहस्थ होता. महंमदशहाचा भाऊ बहराम मिर्झा याच्या आचाऱ्याचा हा मुलगा होता. राज्यांतील उच्च व महत्वाच्या जागेवर काम करून यानें बरीच संपत्ति मिळविली होती. नासिरुद्दिनशहानें याला आपला मुख्य वजीर केलें होतें. हा प्रामाणिक, दीर्घोद्योगी व उदार होता दुर्दैंवेकरून याच्यावर राजमातेचा विश्वास नव्हता, यामुळें टाकीच्या शत्रूंनां बरेंच फावलें व अखेरीस या लोकांच्या कानभरणीमुळें शहाचें मन टाकीविरुध्द कलुषित झालें. राजसत्ता आपल्या हातीं घेण्याचा याच्यावर आरोप लादण्यांत आला, सैन्यावरील याचें वजन घातुक समजण्यांत आलें. १८५१ मध्यें टाकीला वजीरीपदावरून काढून टाकून मिर्झा आगाखान यास मुख्य वजीर नेमण्यांत आलें. कर्नल शीलच्या मध्यस्थीवरून यानें कशान प्रांताच्या सुभेदारीची जागा स्वीकारली, परंतु चाळीस दिवसांनींच त्याचा वध करण्याचा हुकूम सोडण्यांत आला; हें अगोदरच ताडून टाकीनें आत्महत्या केली.

इंग्लंडशीं लढाई :- रशियापेक्षां सुनीपंथी तुर्कस्तान शियापंथी इराणचे कट्टे शत्रू होतें. १८४१-१८५६ या काळांत इंग्लंड व इराणमध्यें बरेंच सख्य होतें. अफगाणिस्तानांत १८४२ मध्यें यार महंमद वजीरानें आपला धनी कामरान यास तुरुंगांत गळा दाबून ठार केलें व स्वत: हिरात येथें राज्य करूं लागला. हा १८५१ मध्यें मेल्यावर याच्या मागून याचा मुलगा साइद महंमद हिरातचा अधिपति झाला. हा लवकरच इराणच्या फायद्याच्या कारस्थानांत सामील झाला. अब्बास कुली नांवाच्या इसमानें असफ उद्दौल्याचा मुलगा मेशदचा बंडखोर याचा विश्वासघात केला होता. या अब्बास कुलीस साइद महंमदनें हिरातचा किल्ला काबीज करूं देऊन शहाचें सैन्य धुरियानमध्यें ठेवूं दिलें. कर्नल शीलने कान उघाडणी करतांच अब्बास कुलीस परत बोलावून हिरात प्रकरणांत ढवळाढवळ करण्याचें इराणी सरकारनें सोडून दिलें. १८५५ मध्यें कामरानचा पुतण्या महंमद युसुफ सादुझेइ यानें साईदला ठार करून हिरात काबीज केलें. याच सुमारास कंदाहारचा कोहन दिलखान या नांवाचा एक नायक मरण पावला, व काबूलच्या दोस्त महंमदनें हें शहर आपल्या राज्यास जोडलें. कोहनचे कांहीं नातेवाईक शहाच्या आश्रयास पळून आले व शहानें कांहीं नातेवाईक शहाच्या आश्रयास पळून आले व शहानें त्यांचे गाऱ्हाणें कानावर घेऊन, इराणवर स्वारी होण्याचें घाटत आहे असे जाहीर करून मेशदच्या गव्हर्नरास हिरात काबीज करण्यास फर्माविलें. ब्रिटीश वकिलाचें बोलणें वायफळ होऊन १८५६ मध्यें इराणवर स्वारी पुकारण्यांत आलीं.

गव्हर्नर-जनरलनें पाठविलेल्या सैन्यानें खारक  बेट व बुशायर बंदर काबीज करून रिशीदचा किल्ला हल्ला करून घेतला. मुंबई सरकारनें जनरल आउट्रामच्या हाताखालीं पाठविलेलें सैन्य दाखल झाल्यावर बोराझानवर चाल करण्यांत आली व खुशाब, मुहम्रा व कारून नदी या ठिकाणी झटापटी होऊन या स्वारीचा  तर्फे अनुकूल असा शेवट झाला. ता ५ एप्रिल १८५७ रोजीं पॅरीस येथे तह झाल्याची वार्ता येऊन दाखल झाली व बुशायर येथें तहाच्या अटी जुन्या होईपर्यंत थोडेसें ब्रिटीश सैन्य ठेवून जनरल आउट्राम हिंदुस्थानला बाकीच्या सैन्यासह परत आला. हिरातसंबंधीं पूर्वीप्रमाणेच अटी ठरविण्यांत येऊन, ब्रिटीश मिशनच्या केलेल्या उपमर्दाबद्दल इराणला माफी मागावी लागली व इराणी आखातांतील गुलामांचा व्यापार बंद करण्यांत आला.

आंग्लो इंडियन तारखात्याची लाईन : - इंग्लंड व हिंदुस्थान यांच्यामध्यें तारेचें दळणवळण सुरू करण्याकरितां इराणांत तारायंत्र स्थापण्याचें बोलणे १८६२ मध्यें लावण्यांत आलें, व ब्रिटीश वकीलानें या बाबतींत एक करार केला. तीन वर्षांनीं ब्रिटीश वकील व इराणी परराष्ट्रीय प्रधान यांनीं याच खांबांवरून दुसरी तार चालविण्याची परवानगी देणाऱ्या तहावर सही केली. बुशायर व कराची यांमध्यें मकरान समुद्रकिनाऱ्यावरून व बुशायर बगदाद यांच्यामध्यें तेहरान मार्गानें दळणवळण सुरू झालें. आशियांतील तुर्कस्तानमधील तारेच्या अव्यवस्थेमुळें, इंडोयुरोपियन तारायंत्राची तार रशियामधून काळया समुद्राच्या पूर्वकिनाऱ्यानें लंडनहून तेहरानर्यंत सुरू करण्यांत आली व इराणांतील खुष्कीवरील बुशायर-कराची यांमधील बंदरांतील तारांचा संबंध या मार्गाशीं जोडून या तारेचें काम १८७२ पासून उत्तम चालले आहे.

सीस्तान मिशन इंग्लंडहून १८७० मध्यें तेहरान शहरीं येऊन दाखल झालें, व येथून बलुचिस्तानकडें गेलें. इराण व कलात संस्थानें यांमधील उभय पक्षास संमत अशी सरहद्द ठरवावयाची होती. परंतु अफगाण कमीशनर व इराणी कमीशनर यांचें एकमत न झाल्यामुळें मध्यस्थानें सीस्तानच्या पाहणीवरून घेतलेल्या टिपणांवरून स्वत:चा निकाल १८७२ मध्ये तेहरान येथें जाहीर केला. इराण व कलात सरकारांनीं परपराष्ट्रीय कारभाराच्या ब्रिटीश स्टेट-सेक्रेटरीकडे केलेल्या अपीलांत मध्यस्थाचाच निकाल मंजूर करण्यांत आला; व तो उभयपक्षांनीं मान्य केला.

नासिरुद्दिनशहानें १८७३ व १८७९ यावर्षी यूरोपांत प्रवास केला. पहिल्या प्रसंगीं तो फक्त इंग्लंडलाच गेला. या वेळीं शहाच्या बरोबर मुख्य वजीर मिर्झा हुसेनखान होता. दुसऱ्यावेळीं शहा रशिया, जर्मनी, फ्रान्स व आस्ट्रिया या देशांत जाऊन आला.

इराणची १८८४-१९०१ पर्यंतची स्थिति : - अरब खलाशीं व इंग्लिश दर्यावर्दी अधिकारी यांनीं युक्त अशा दोन तीन आगबोटींचा ताफा इराणी आखातांत तयार करण्याची कल्पना शहानें १८६५ मध्यें सुचविली; परंतु बेहरीन बेटांचें स्वातंत्र्य व मोत्यें काढण्याचा उद्योग यांस हा काफिल विघातक होईल या सबबीवर ही कल्पना ब्रिटीश सरकारनें खोडून काढली. सर्व बंदरांत व विशेषत: लहान बंदरांत चालणाऱ्या चोरटया व्यापाराचा बंदोबस्त केल्यास इराणचें जकातींचें उत्पन्न बरेंच वाढेल असें अधिकाऱ्यांच्या निदर्शंनास पंधरा सोळा वर्षांनी आणल्यावर १८८३ मध्यें शहानें दरवर्षी एक या रीतीनें चार पांच बोटी खरेदी करण्याचें ठरविलें. एका प्रसिध्द जर्मन कंपनीचें टेंडर पसंत ठरून सुसा व पर्सिपोलिस या नांवाच्या दोन आगबोटी ३२००० पौंड खर्च करून १८८५ मध्यें तयार करवून इराणी आखांतांत आणल्या. इराणांतील ब्रिटीश वकिलाच्या सांगण्यावरून तेहरानपासून कारून नदीपर्यंत गाडयांच्या सोईचा रस्ता व अहवाझपर्यंत कारून नदीवर चालणाऱ्या जहाजांचा बंदोबस्त ठेवण्याकरितां एक लहानंशी आगबोट बांधण्याचें शहानें ठरविलें. इराणी आखातांत या आगबोटी काम करण्यास तयार झाल्याबरोबर, आखातांतील जकातीचा मक्ता असलेल्या लोकांनीं पर्सिपोलिस बोटीचा खर्च देण्याचें नाकारलें व कारून नदीवर चालणाऱ्या जहाजांवरील जकातीच्या उत्पन्नावर आपला वंशपरंपरागत हक्क आहे या सबबीवर मुहम्राच्या सुभेदारानें या बाबतींत ढवळाढवळ करण्यास इराणी सरकारास हरकत केली. शेवटीं पर्सिपोलिस बोट बुशायर बंदरांत व सुसा बोट मुहम्राजवळ कुजत पडली व कारून नदीमार्ग खुला करणे व अहवाझपासून तेहरानर्यंत रस्ता बांधणें हा बेतहि सोडून देण्यांत आला.

तेहरान-मेशद शहरांमधील तारेच्या दळणवळणाच्या मार्गात १८७५ मध्यें बरेच अडथळे करण्यांत आल्यामुळें या मार्गाची देखरेख व काम मेशद येथील इंग्लिश सिग्नलर व इन्स्पेक्टर यांच्या स्वाधीन ठेवण्याचे ठरलें व हिंदुस्थान सरकारनें या बाबतींत सालीना २० हजार रु. पर्यंतचा खर्च स्वत: सोसण्याचें कबूल केलें. जास्क येथील ब्रिटीश टेलिग्राफ सेटलमेंट व १८६८ आणि १८७२ मधील इराणांतून यूरोप व हिंदुस्थान यांमध्यें स्थापिलेलें तारेचें दळणवळण या बाबींबद्दल इराणी व ब्रिटीश या सरकारांमध्यें १८८७ चा ठराव होऊन प्रथम या कररांची मुदत १९०५ पर्यंत ठरविण्यांत आली व नंतर ही मुदत १९२५ पर्यंत वाढविण्यांत आली आहे.

अफगाणिस्तानच्या शेरअल्लीचा मुलगा अयुबखान हा १८८१ मध्यें इराणच्या आश्रयास येऊन राहिल्यामुळें ग्रेट ब्रिटन व इराण यांमधील १८८४ च्या ठरावान्वयें सालीना ८ हजार पौंडाचें पेन्शन देऊन अयुबखानास तेहरान मध्यें अटकबंद करून ठेविलें होतें. यानें १८८७ मध्यें तेथून निसटून अमीर अबुल रहमान विरुध्द अफगाण प्रदेशांत बंड करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फसला व नंतर तो मेशद येथील ब्रिटीश कान्सल जनरलला शरण आला. त्याला बगदाद मार्गानें तुर्की सरहद्दीवरून बंदोबस्तानें हिंदुस्थानांत रवाना करण्यांत आलें. रशियन दोस्तांनां खूष करण्याकरितां अयुबखानाच्या निसटून जाण्याकडे इराणी परपराष्ट्रीय प्रधान याह्याखान मुशिरद्दौला यानें दुर्लक्ष्य केल्याचें समजून आल्यावरून त्यास बडतर्फ करण्यांत आलें.

१८८७ मध्यें सर हेनरी ड्रुमंड वुल्फ याची इराणच्या मंत्र्याच्या जागी नेमणूक झाली. याच्या सांगण्यावरून शहानें १८८८ मध्यें जाहीरनामा काढून आपल्या प्रजाजनांस त्यांच्या जीवित व संपत्तीबद्दल  सुरक्षितपणाचें आश्वासन दिलें व अहवाझपर्यंतचा कारून नदीचा मार्ग व्यापारी दळणवळणाच्या सोईकरितां खुला केला. १८८४ पासून मुख्य प्रधान असलेल्या अमिनेस्सुलतान यास मुख्य वजीर नेमिलें. याच वर्षी तेहरानपासून शहा-अदुबल-अझम पर्यंतची ५॥ मैल लांबींचीं बेल्जियम कंपनीच्या ताब्यांतील इराणी रेल्वे सुरू करण्यांत आली. १८८९ मध्यें बॅरन ज्युलियस डि रूटरला इराणी सरकारी पेढी स्थापून नोटा काढण्याचा मक्ता व लोखंड, तांबें, शिसें, पारा, कोळसा, पेट्रोलियम, मँगनीज, बोरॅक्स (सोहागी) व अॅसबेस्टास या खनीज द्रव्यांच्या सबंध इराणांतील (अगोदरच न दिलेल्या) खाणी खोदण्याचा हक्क देण्यांत आला. ही पर्शियन इराणी सरकारी पेढी १८८९ सप्टेंबर २ च्या ब्रिटीश बादशाही सनदेंनें स्थापन होऊन हिनें  'इंपीरियल बँक ऑफ पर्शिया' या नांवानें इराणांत व्यापार सुरू केला. पांच वर्षेपर्यंत इराणांत कोणत्याच रेल्वेसंबंधी सवलती देण्यांत येणार नाहीत असा शहाचा लेखी करार १८८९ मध्यें रशियन मंत्र्यास मिळाला. हा करार बदलून इराणांतील सर्व रेल्वेस १८९० मध्यें मनाई करण्यांत आलीं.

शहाचें १८८९ मधील यूरोपांत तिसरें प्रयाण.:- स. १८८९ मध्यें शहा तिसऱ्यांदा यूरोपांत गेला. इंग्लंड मध्यें एक महिना राहून मुख्य दरबारांत जाऊन शहा परत आला. या खेपेस सर डुमंड हा शहाच्या बरोबर होता. १८९० मध्यें इराणी सरकारनें ब्रिटीश भांडवलवाल्यांस तंबाखूचा मक्ता दिला. इंग्लंडमध्यें असतांनां शहानें वाईट सल्ला ऐकून एका इराणी मनुष्यास इराणांतील 'लॉटरीचा' मक्ता दिला. यानें हा मक्ता ४० हजार पौंडास एका ब्रिटीश कंपनीला विकला. शहानें पुढें हा मक्ता रद्द केला परंतु ब्रिटीश कंपनीला नुकसान भरपाई मिळाली नाहीं, त्यामुळें बराच काळपर्येंत लंडनच्या हुंडयाच्या बाजारांत इराणच्या दतीची किंमत कमी झाली. तंबाखूच्या मक्त्याविरूध्द तेहरानमध्यें बंड झाल्यामुळें हा मक्ता इराणी सरकारनें १८९२ मध्यें रद्द केला व शेंकडा ६ टक्क्यांचें ५ लक्ष पौंडाचें कर्ज इंपीरियल बँकेपासून घेऊन तंबाखूच्या मक्तेदारास नुकसानभरपाई देण्यांत आली व १९०० मध्यें शेंकडा ५ टक्क्यांचें रशियन कर्ज बँकेचें कर्ज फेडण्यांत आलें.

१८७२ पासून ग्रेटब्रिटनच्या दरबारी असलेल्या माल्कम खान निजाम-उल-मुल्क नांवाच्या इराणी सरकारच्या प्रतिनिधीस परत बोलावून त्याच्या जागीं टिफ्लिसचा कान्सल जनरल मिर्झा महंमद अलीखान याची नेमणूक १८८९ मध्यें करण्यांत आली. १८९० मध्यें अहवाझपासून तेहरानपर्यंतचा रस्ता बांधण्याचा बेत पुन्हां हातीं घेऊन इंपीरियल बँकेला कांहीं सवलती देण्यांत आल्या व १८९३ पर्यंत काम चालू ठेवण्यांत आलें. याच वर्षी इंपीरियल बँकेचें इराणांतील खाणी खणण्याच्या कामाचे हक्क पर्शियन ''बँक मायनिंग राइट्स कॉर्पोरेशन'' ला देण्यांत आले. दळणवळणाचे मार्ग नसल्यामुळें माल नेण्या आणण्याचा खर्च विशेष येत असे, व खनिज पदार्थांच्या प्रदेशांत पाणी व सर्पण यांचा तुटवडा असल्यामुळें या कार्पोरेशनला किफायत पडत नसे, म्हणून बरेंच भांडवल खर्च करून १८९४ मध्यें या कार्पोरेशनला आपला रोजगार बंद करावा लागला.

केट ग्रीनफील्ड प्रकरण : - केट ग्रीनफिल्ड नांवाच्या इंग्लिश मुलीला तिच्या आईच्या घरांतून एका कुर्दाने बळजबरीनें पळवून नेलें व ब्रिटीश अधिकाऱ्यांनीं ती मुलगी परत मागितली असतां परत न करतां हा कुर्द सौजबुलाघ येथें पळून गेला व तेथें तुर्की अधिकाऱ्यांनीं त्याचें संरक्षण केलें. यामुळें बराच गोंधळ माजला होता; परंतु 'स्वसंतोषानें आईचें घर सोडून मी कुर्दाची बायको झाल्यें' असें त्या मुलीनें ब्रिटीश अधिकाऱ्यांस स्पष्ट कळविल्यावरून हा लढा मिटला.

१८९२ त तेहरान शहरांत व त्याच्या आसपास पटकीची सांथ जोरानें उद्भवली व सुमारें शेंकडा आठ लोक मृत्युमुखीं पडलें. १८९३ त हा रोग पुन: उद्भवला; परंतु विशेष प्राणहानि झाली नाही. १८९३ त इराणनें रशियास फिरुझा नांवाचा महत्वाचा जिल्हा व बाबा डुर्माझ व लुफ्ताबादमधील खोरासानच्या उत्तर हद्दीवरील प्रदेश देऊन अझबैंजनच्या सरहद्दीवरील रुक्ष प्रदेशाची पट्टी व हिस्सार खेडें घेतलें.

फ्रेंच लोकांनां पुराणवस्तु संशोधनांसंबंधी दिलेले हक्क : -१८९५ त एक फर्मान काढून फ्रेंच सरकारास इराणांतील वस्तूंचा शोध लावण्याची परवानगी दिली. शोधलेल्या वस्तूंपैकीं सोनें, रुपें व जवाहिरांच्या वस्तूंखेरीज बाकीच्या वस्तूंचा निम्मा भाग फ्रेंच सरकारास देण्याचें ठरलें व इराणी सरकारच्या वांटयाच्या निम्या वस्तू इराणी सरकार विकीत असल्यास त्या विकत घेण्याचा प्रथम हक्कहि फ्रेंच सरकारास देण्याचें ठरलें. १८९७ त एम. जे. डि मॉर्गनच्या मिशननें या कामास सुरवात केली.

शहाचा खून (१८९६) : - ता. १ मे १८९६ रोजीं शहा-अबदुल आझिमच्या मशिदींत निमाज पडत असतांना कर्मानच्या मिर्झा रेझा नांवाच्या एका क्षुल्लक व्यापाऱ्यानें नासिरुद्दिन शहाचा खून केला. या मारेकऱ्यास कमालुद्दिन नांवाच्या अफगाण शेखानें कान्स्टांटिनोपल येथें चिथावणी दिली होती. कमालुद्दिन मरण पावला व मिर्झा रेझाला १८९६ आगस्ट १२ रोजीं फांशी देण्यांत आलें. हा शहा आणखी पांच दिवस वांचला असता तर शहाच्या कारकीर्दीच्या पन्नासाव्या वर्षास सुरूवात झाली असती. याच्यामागून मुझफरुद्दिन (जन्म मार्च २५१ सन ८५३) हा तक्तावर बसला (१८९६).

नाण्यांची आपत्ति : - तीन चार वर्षांत तांब्याचें नाणें वाजवीपेक्षां जास्त झाल्यामुळें गरीब लोकांची व चिल्हर व्यापाऱ्यांची फार दैन्यावस्था झाली. मांसाचा भाव कमी करण्याकरितां प्राचीन काळापासून चालत आलेला मांसावरील कर काढून टाकण्यांत आला. सरकारी अधिकारी लुच्चेगिरीनें फाजील तांब्याचें नाणें स्वस्त दरानें विकत घेऊन महाग असलेल्या ठिकाणीं विकीत असत, त्यामुळें इंपीरियल बँकेला जबर किंमत देऊन जास्त असलेलें तांब्याचें नाणें विकत घ्यावें लागलें व त्यामुळें सरकारचें अतोनात नुकसान झालें व ही आपत्ति १८९९ त नाहींशी झाली. किंमत वाढविण्याच्या इराद्यानें व्यापारी मांसाची एकदम खरेदी करीत त्यामुळें मांसावरील कर काढून टाकला असतांना देखील मांस स्वस्त झालें नाहीं.

प्रधानांच्या नेमणुका (१८९६ ते ९८) : - १८९६ त मुख्य वजीर अमिनेस्सुलतान व बडे बडे इराणी अधिकारी यांचें वांकडे आल्यामुळें अमिनेस्सुलतानास अझबैंजन प्रांताचा मुख्य कारभारी करून पाठविण्यांत आलें. शहानें अमिनेस्सुलतानाच्या प्रतिस्पर्ध्यांचें मंत्रिमंडल बनविलें; परंतु राज्याच्या कारभाराचें काम शिल्लक पडून अंतर्गत राज्यकारभाराचें खातें फारच अव्यवस्थित झालें. शहानें अमिनेस्सुलतानास परत बोलावून मुख्य वजीर नेमिलें व (१८९८) नास्त्रुलमुल्क यास जमाबंदीचा प्रधान नेमिलें. यानें हिशेब ठेवण्याची साधी पध्दति, अंदाजपत्रक करणें, महसूलखात्याची पुनर्रचना, जमीन महसुलीची नवीन जमाबंदी वगैरे सुधारणा पुढें आणल्या; परंतु अधिकाऱ्यांच्या अडथळल्यामुळें त्या अपुऱ्या राहिल्या.

१८९७ त इंग्लिश तारखात्याचा इन्स्पेक्टर इ. ग्रेव्हस याचा बलुची लोकांनीं खून केला. बऱ्याच मोठया प्रदेशांत बंड झालें, त्यामुळें कर्मान प्रांताच्या सरसुभेदाराच्या हाताखालीं सैन्य पाठवून १९९८ त कॅनॉक ठाणें हस्तगत करण्यांत आलें व शांतता स्थापन करण्यांत आली. एका खुनी इसमास जास्क येथें फांशी देण्यांत आलें.

१८९८ मधील ब्रिटीश कर्जाबद्दलचें अपुरें बोलणें : - १८९८ च्या प्रारंभीं शहाच्या वैद्यांनीं शहास जर्मनी अथवा फ्रान्समधील खनिज पाण्याचा उपयोग रोग दुरुस्तीबद्दल सुचविला. यूरोपांत या कामाकरितां जाण्यापूर्वी राज्यकारभारच्या खर्चाकरितां, सैन्याचा थकलेला पगार देण्याकरितां व कर्जफेडीकरितां पैशाची गरज पडली. यूरोपांत कर्ज मिळविण्याचे प्रयत्न करण्यांत आले; परंतु कर्ज न मिळतां इराणची पत मात्र गेली. लंडनच्या भांडवलवाल्यांनीं इराणी आखातांतील बंदरें व फार्स प्रांत या प्रदेशांतील जकातीच्या तारणावर शेंकडा ५ टक्क्याचे १२५० हजार पौंड कर्ज देण्याचें कबूल केलें. या भांडवलवाल्यांनीं या प्रदेशांतील जकातीच्या नाक्यांवर रोकडीचें काम (कॅशर) करण्याकरितां स्वत: चे लोक ठेवण्याची अट घातली. ही अट मान्य करून अमिनद्दौला या मुख्य वजीरानें कर्मानशाह व बुशायरच्या जकातीवसूलीच्या तारणावर ५०,००० पौंड कर्ज काढलें. इतर प्रधानांकडून फार अडथळा झाल्यामुळें याने आपल्या जागेचा राजिनामा दिला. परराष्ट्रीय कारभाराचा प्रधान मुशिनखान हा नंतर प्रधानमंडळाचा मुख्य झाला व त्यानें कर्जाबद्दल फिरून बोलणें लावलें; परंतु त्याला यश आलें नाहीं. शिवाय या वेळेस इराणी सरकारानें पूर्वीच्याच तारणावर पूर्वीच्या दुप्पट कर्जाची मागणी केली. यामुळें कर्जाचें बोलणें फिसकटलें. अमिनेस्सुलतानला फिरून मुख्य वजीर नेमण्यांत आलें. याच्या अतिशय लोकप्रियतेमुळें व पेढयांजवळून तात्पुरतें अगाऊ कर्ज मिळाल्यामुळें पैशाची अडचण तात्पुरतीं भागविण्यांत आली. यानें तिघां बेल्जियनांची जकातीचे अधिकारी म्हणून नेमणूक केली व जकातीच्या मक्त्यांची पध्दत मोडून जकातखातें दुरुस्त करण्याबद्दलची माहिती मिळविली आणि १८९९ त अझबैंजन व कर्मानशाह प्रातांतील जकातीचीं नाकीं बेल्जियन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेविलीं. या प्रयोगाचा परिणाम फार कायदेशीर दिसून आला. त्यामुळें इराणी सरकारनें जकातीच्या मक्त्यांची पध्दत मोडून राज्यांतील सर्व जकातीनाक्यांवर बेल्जियन जकातीअधिकाऱ्यांची नेमणूक १९०० मध्यें केली.

लंडनकडून कर्जाचें अनुकूल बोलणे न निघाल्यामुळें व शहास यूरोपांत जाण्याची अत्यावश्यकता भासल्यामुळें शहानें फर्मान काढून रशियन पेढीवाल्यांस कर्ज उभारण्याची परवानगी दिली. यानंतर लंडनच्या भांडवलवाल्यांचे कर्ज देण्याचें बोलणें अमान्य करण्यांत आलें.

१९०० मधील रशियन कर्ज : - फार्स परगण्यांतील व इराणी आखातांतील बंदराची जकात खेरीज करून इराणांतील बाकीच्या सर्व जकातीउत्पन्नाच्या तारणावर ५ टक्कें दराचें २४०० हजार पौंडाचें कर्ज देण्याची रशियन सरकारनें परवानगी दिली. वसुलाचें हप्ते व व्याज यांची रक्कम थकल्यास मात्र जकातीनाक्यांचा बंदोबस्त बँकेच्या स्वाधीन करण्याचें ठरलें. या कर्जाची शेंकडा ८५ रक्कम इराणला मिळाली व रोखे घेणारांस रशिया सरकारनें हमी दिली. रोकड तात्काळ तेहरान शहरीं येऊन पोहोंचली. थकलेलें देणें देऊन टाकून १८९२ च्या शेंकडा ६ टक्क्यांच्या लंडन कर्जाच्या शिलकी देण्याचीहि फेड करण्यांत आली.

शहाचें यूरोपांत प्रयाण (१९०० व १९०२) : - १२ एप्रिल १९०० रोजीं मुख्य वजीर व मोठा लवाजमा बरोबर घेऊन शहा यूरोपच्या प्रवासास गेला राज्यकारभार त्याचा दुसरा मुलगा मलिक मन्सूर मिर्झा शुआ-इस-सुलतानेह याच्या स्वाधीन करण्यांत आला होता. कॉन्ट्रेक्सेव्हिल येथें एक महिना मुक्काम करून शहा सेंटपीटर्सबर्ग (पेट्रोग्राडला-लेनिनग्राड) ला गेला व तेथून पारिसला परत आला. येथून लंडनला जाण्याचा त्याचा इरादा होता; परंतु इटलीचा राजा व सॅक्स कोबुर्ग-गोथाचा डयूक यांच्या मृत्युमुळें बरेच दरबार दुखवटयांत होते म्हणून इंग्लंड, जर्मनी व इटली या देशांत जाण्याचा बेत रहित करण्यांत आला. आगस्ट २ (१९००) रोजीं पारिस शहरांत शहाचा खून करण्याचा प्रयत्न एका अराजकानें केला.

रूसोब्रिटीश स्पर्धा (१९०२-१९०७) व इराणीं राज्यक्रांति (१९०६-१९०९) : - १९०२ मध्यें मझप्फरूद्दनिशहा मुख्य यूरोपियन राजधान्यांच्या शहरीं पुन्हां गेला, व आगस्टमध्यें सातव्या एडवर्ड बादशहानें पोर्टस्मथ येथें शहाचे स्वागत केलें. नंतर व्हायकाउंट डाउनच्या अध्यक्षतेखालीं एक मिशन पाठवून शहाला १९०३ मध्यें ऑडर ऑफ गार्टरचें सदस्यत्व देण्यांत आलें. एका आठवडयानें इराण व ग्रेटब्रिटन यांमध्यें एक व्यापारी तह करण्यांत आला. त्यामुळें जकातखात्यांत कित्येक सुधारणा करून उभयदेशांस हितावह अशा अटी ठरविण्यांत आल्या आणि १८५७ च्या करारान्वयें मालाच्या किंमतीवर शेंकडा ५ टक्के कर घेण्याऐवजीं नियमित कर आयात व निर्गत मालांवर बसविण्यांत आले. १९०२ मध्यें झालेल्या रूसो-इराणी तहानें झालेलें ब्रिटीश व्यापाराचें व हिंदुस्थानच्या चहाच्या व्यापाराचें नुकसान या  तहान्वयें कांहीं अंशीं भरून काढलें. १८९९-१९०३ रशियन बँकेनें इराणला ४०,००,००० पौंड कर्ज दिलें होतें, पैकीं निम्मी रक्कम शहाला त्याच्या खर्चाकरितां दिली होती. ताब्रिझपासून तेहरान पर्यंत (१९०२) व ताब्रिझपासून काझ्विनपर्यंत (१९०३) रस्ते बांधण्याचा हक्क रशियन सवलतीदारांस दिला होता; व रशियन बँकेच्या शाखा सीस्तान प्रांतांत उघडयांत आल्या होत्या. इराणी आखातांत फक्त रशिया व ग्रेटब्रिटनमधील स्पर्धा विकोपास जाण्याचा संभव होता. ग्रेटब्रिटनला या आखातांतील व्यापाराचा बहुतेक मक्ता होता; व या आखातांत (खडक वगैरे दाखविण्याकरितां) तरते शंकू ठेवणें, दिव्यांची व पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करण्याची हमी ग्रेटब्रिटनकडे होती.  परराष्ट्रीय प्रधान लॉर्ड लॅन्सडाऊन यांनीं लॉर्डांच्या सभेंत बोलून दाखविलें कीं, कोणतेंहि परराष्ट्र इराणी आखाताच्या किनाऱ्यावर जबरदस्तीनें वर्चस्व स्थापण्याचा  प्रयत्न करील तर त्याचा ग्रेटब्रिटन शक्य त्या सर्व उपायांनी प्रतिकार करील. १९०३ मध्ये हिंदुस्थानचा व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन कराचीहून इराणी आखातांत गेला. याच्या जहाजाबरोबर चार क्रूझरे होतीं; परंतु बुशायर येथें फार्सच्या इराणी सुभेदारानें राजकारणाच्या शिस्तीचा भंग केल्यामुळें किनाऱ्यावर न उतरतां लॉर्ड कर्झन परत आला व हें राजकारण संपलें. इकडे रशियाचें व्यापारी व सांपत्तिक वजन इराणांत वाढतच चाललें; १९०४ मध्यें इराणनें पाठविलेल्या एका खास मिशनची झारनें मुलाखत घेतली; व १९०५ मे मध्ये स्वत: शहा सेंटपीटर्सबर्ग व व्हिएन्ना येथील दरबारांस भेट देण्याकरितां यूरोपांत गेला.

१९०२ तें १९०५ चें सीस्तान मिशन : - अफगाणिस्तान व सीस्तान या देशांमधील सरहद्दीबद्दल भांडण १९०२ मध्यें उपस्थित झालें होतें. हेल्मंड नदीच्या प्रवाहाच्या रोखानें काढलेल्या रेषेनें – हिलाच गोल्डस्मिड रेषा म्हणतात. - या देशांमधील सरहद्द १८७०-१८७२ च्या मिशननें ठरविली होती; परंतु १८७२ व १९०२ मधील काळांत हेल्मंड नदीचा प्रवाह बराच पश्चिम वाहिनी झाला होता; व सरहद्दीच्या कांहीं एक खुणा उभारलेल्या नसल्यामुळें एका रुंद पट्टीबद्दल भांडण लागलें. नदीचें जुनें पात्र हीच खरी हद्द असें इराणी लोकांचें म्हणणें होतें परंतु अफगाण लोक म्हणत कीं नवीन पात्र हीच खरी सरहद्द होय. १८५७ च्या तहान्वयें उभय पक्षांनीं या लढयाचा निवाडा ग्रेटब्रिटनच्या मध्यस्थीवर सोंपविला; व इराण सरकारचें म्हणणें खरें ठरवून १९०५ मध्यें कर्नल मॅकूमोहन यानें निकाल दिला.

ब्रिटीश व्यापारी मिशनें :- वायव्य इराणांतील बाजारांचीं स्थळें व व्यापारी रस्ते यांची पहाणी करून रिपोर्ट  करण्याकरितां १९०३ मध्यें बोर्ड ऑफ ट्रेडनें पाठविलेल्या मॅक्लिन कमिशनला मिळालेल्या यशामुळें, इराणच्या दक्षिण भागांत अशाच प्रकारचें एक मिशन उत्तर हिंदुस्थानांतील व्यापारी चेंबर, बंगाल व्यापारी चेंबर व हिंदुस्थानी चहावर कर बसविणारी (टी सेस) कंपनी यांनीं पाठविलें. सदर रिपोर्ट १९०६ मध्यें प्रसिध्द झाला. पाहणी केलेल्या प्रदेशांत सुधारलेली राज्यपध्दति नसल्यामुळें एक रुसो-ब्रिटीश तह करून इराणचीं वर्चस्वक्षेत्रें निश्चित करावीं असा मुख उपाय या रिपोर्टात सुचविला आहे.

१९०७ मधील रुसोब्रिटीश तह : - रुसोजपानी युध्दामुळें उत्पन्न झालेली राजकीय परिस्थिति व खुद्द इराणची अंतस्थ नाजूक स्थिति या गोष्टीमुळें ग्रेटब्रिटन व रशिया या दोघां प्रतिस्पर्ध्यामध्यें हा तह १९०७ मध्यें घडून आला. इराणसंबंधीं याचीं मुख्य कलमें येणें प्रमाणें होतीं : -  (१) कास्त्रिशिरिन पासून इस्पहान, येझ्द व काखवरून रशियन, इराणी व अफगाण प्रदेशांच्या सरहद्दींच्या मिलाफाच्या ठिकाणापर्यंत काढलेल्या रेषेच्या उत्तरेस कोणत्याहि प्रकारचा राजकीय अथवा व्यापारी हक्क स्वत: न मिळविण्याचें, व रशियन सरकार अथवा रशियन इसम यास असली कोणतीहि सवलत मिळविण्याच्या कामांत अडथळा न करण्याचें ग्रेटब्रिटननें कबूल केलें; (२) अफगाण सरहद्दीपासून गाझिक, बिर्जेंड, कर्मान, व बंदर अब्बासी या ठिकाणावरून काढलेल्या रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेशासंबंधीं अशाच प्रकारचें वचन रशियानें ग्रेटब्रिटनला दिलें; (३) वर सांगितलेल्या दोन रेषांमधील प्रदेश तटस्थ मानला जाऊन दोन्हीं राष्ट्रांस त्यांमध्यें हक्क संपादन करण्याची मुभा असावी; (४) इराणांतील कोणत्याहि भागांत सध्यां उपभोगित असलेल्या सर्व सवलती चालू ठेवाव्या; (५) तहावर सही करण्यापूर्वी इराण आपल्या कर्जाची फेड करणार नाहीं तर ग्रेटब्रिटन व रशिया यांनीं आपापल्या वर्चस्वक्षेत्रांतील इराणी करांच्या वसुलीवर ताबा ठेवण्याचा हक्क आपल्या स्वाधीन राखून ठेविला. या तहाबरोबरच ब्रिटीश परराष्ट्रीय सेक्रेटरी ऑफ स्टेटचें एक पत्र प्रसिध्द करण्यांत आलें व त्यांत असें म्हटलें होतें कीं, (१) इराणी आखातास हा तह लागू पडणार नाहीं, (२) रशियानें ग्रेट ब्रिटनचे या आखातावरील विशिष्ट हितसंबंध कबूल केले आहेत व (३) या हितसंबंधाचें रक्षण ग्रेटब्रिटननें पूर्ववत करावें.

इराणी राज्यपध्दति : -  ग्लीडोवे-न्यूकामेनच्या रिपोर्टामुळें व येझ्दमधील बाबी उर्फ बाहाई (पहा) लोकांच्या (१९०३) कत्तलीमुळें इराणमध्यें असंतोष फार माजला होता. १९०५ मध्यें रशियांतील राज्यक्रांतिकारक पक्षाच्या उदाहरणानें प्रेरित होऊन या असंतुष्ट इराणी लोकांनीं प्रातिनिधिक राजकीय संस्थांबद्दल मागणी केली. १९०६ आगस्ट ५ रोजीं शहानें एक फर्मान काढून सर्व लोकांच्या प्रतिनिधीचें एक राष्ट्रीय सल्लागार मंडळ (मज्लिस) बसविण्याचें ठरविलें. या मजलिसची निवडणूक कायदेशीर रीतीनें होऊन ही खुद्द शहाच्या हातानें १९०६ ऑक्टोबर ७ रोजीं उघडण्यांत आली. १९०७ च्या जानेवारी महिन्यांत मुझप्फरुद्दिन शहा मरण पावला व याच्यामागून याचा वडील मुलगा महंमद अली मिर्झा गादीवर बसला. नवीन राज्यपध्दतीस मान देण्याचें वचन याने आपल्या प्रजाननांस १९०७ फेब्रुवारीच्या ११ तारखेस जाहीर रीतीनें कळविलें.

राज्यक्रांति : - नोव्हेंबर १२ रोजीं शहानें मजलिस मध्यें हजर राहून आपल्या वचनाची पुनरावृत्ति केली; परंतु दिसेंबरमध्यें तेहरानमध्यें एक बंड होऊन राजकीय आणीबाणीचा प्रसंग येऊन ठेपला; यावेळीं शहाचें सैन्य नि:शस्त्र प्रजाननांवर पाठविलें हातें. यावरून मजलिसनें एक जाहीर पत्रक काढून शहाचा नवीन राज्यपध्दति मोडण्याचा विचार आहे असें यूरोपांतील बलाढय राष्ट्रांस कळविलें व त्यांनां मध्यस्थी करण्याची मागणी केली. तेहरानमधील ब्रिटीश व रशियन वकीलांनीं नवीन पध्दति कायम राखण्याचा महंमद अलीस आग्रह केला, तेव्हां लष्करी मंत्र्याच्या ताब्यांत सर्व सैन्य ठेवण्याचें कबूल करून मजलिसच्या मागण्या मान्य करण्याचें वचन महंमद अलींनें मजलिसला निरोपानें कळविलें. यामुळें पसरलेली अस्वस्थता कांहीं वेळ थांबली, परंतु राजपक्ष व राष्ट्रीयपक्ष एकमेकांविरुध्द गुप्त कारस्थानें करूं लागले व १९०८ फेब्रुवारीमध्यें शहा तेहरानमधून मोटार मध्यें बसून चालला असतांना त्याच्या मोटारीखालीं दोन बांबगोळयांचा स्फोट झाला; शहास मात्र इजा झाली नाहीं. जूनमध्यें संशयास्पद दरबारी मंडळीला घालवून देण्याचा आग्रह मजलिसनें शहास केला. शहानें ही गोष्ट मान्य करून स्वत: तेहरान सोडून गेला, नंतर कोसॅक नांवाच्या राजकीय शरीरसंरक्षक पलटणीची राष्ट्रीयपक्षाच्या लोकांशीं एकदम झटापट होऊन मजलिस सभागृहावर सरबत्ती करण्यांत आली. मजलिसनें या प्रश्नाची वाटाघाट करण्याकरितां कमिशनरची नेमणूक केली. तेव्हां शहानें एक जाहीरनामा काढून मजलिस बरखास्त केली व लष्करी लोकांस तेहरानमध्यें बंदोबस्त राखण्याचा हुकूम केला. स्वत: निवडलेल्या चाळीस सभासदांचें एक सल्लागार मंडळ या मजलिसच्या ऐवजी नेमण्या वाहिबेत शहानें केला, परंतु ग्रेटब्रिटन या रशिया यांच्या आग्रहावरून हा विचार सोडून देऊन त्यानें जाहीर निवडणूक करण्याचा हुकूम सोडला. मध्यतंरीं प्रांतांमध्यें अंत:कलह सुरू झाले, कुर्द दरोडेखोरांनीं ताब्रिझजवळची बरींच खेडी लुटलीं. ट्रान्सकाकेशियाच्या सरहद्दीवरील रशियन शिपायांवर इराणी बंडखोरांनीं हल्ला केल्यामुळें रशियन सरकारानें नुकसानभरपाई मागितली. ही न दिल्यामुळें रशियन सैन्यानें कित्येक इराणी खेडीं जाळून टाकलीं. ही गोष्ट व कोसॅकांचा हल्ला यांवरून रशिया राजपक्षास मदत करीत आहे अशी राष्ट्रीय पक्षांनें ओरड केली होती. तेव्हां १९०९ मध्यें एक रशियन सैन्याची तुकडी ताब्रिझला राष्ट्रीय पक्षाच्या वतीनें ढवळाढवळ करण्याकरितां रशियानें पाठविली. हे सैन्य येतांच शहाच्या सैन्याने ताब्रिझचा वेढा उठविला. याच वर्षी जानेवारी महिन्यांत राज्यक्रांतीचा वणवा इस्पहान शहरांत पसरला, तेथें बखत्यारी लोक राष्ट्रीय पक्षास मिळाले व त्यांनीं राजपक्षाच्या इस्पहानच्या सुभेदारास काढून टाकून तेहरानवर चाल केली. मे व जून महिन्यांत राज्यपध्दती पाळण्याबद्दल जाहीरनामे शहानें काढले व सर्व राजकीय गुन्हेगारांस माफी करण्याचें शहानें वचन दिलें; परंतु त्याला राष्ट्रीय व बखत्यारी पक्षांच्या संयुक्त सैन्यास थांबवितां आलें नाहीं. या सैन्यानें जुलै १३ रोजीं तेहरानमध्यें प्रवेश केला. रस्त्यांत निकरांचें युध्द करून कोसॅक बंडखोरांना सामील झाले, व शहा जुलै १५ रोजीं रशियन वकिलातींत जाऊन राहिला. या कृत्याचा राज्यत्याग असा अर्थ करण्यांत आला. याच दिवशीं राष्ट्रीय  कौन्सिलची बैठक होऊन महंमद अलीचा तेरा वर्षाचा मुलगा सुलतान अहमद मिर्झा यास गादीचा वारस निवडण्यांत आलें. कजर लोकांचा नायक आसाद-उल-मुल्क यास राज्यप्रतिनिधि नेमण्यांत आलें. १९०९ सप्टेंबर ९ रोजी पदच्युत केलेल्या शहास रशियन कोसॅक व हिंदु स्वार यांच्या बंदोबस्तांत क्रिमियामध्यें हद्दपारीत दिवस कंठण्यास पाठविण्यांत आलें. नोव्हेंबर १५ रोजीं शहानें नवीन निवडलेली मजलिस विधिपूर्वक भरविली.

अर्वाचीन इतिहास : -१९०९ सालामध्यें इराणांत नवीनच मनु सुरू झाला. एकतंत्री शहानें इराणचें स्वामित्व सोडून दिलें होतें व त्यामुळें त्याच्या कारकीर्दीतील गैर व्यवस्था जाऊन हळू हळू सुधारणा होत चालली होती. ग्रेट ब्रिटन व रशिया यांनीं इराणाविषयी सहानुभूतीचें वर्तन ठेवलें होतें व रशियानें तर इराणमधून आपलें सैन्याहि काढून घेण्यास सुरुवात केली होती. अशा रीतीनें इराणला आपल्या कारभारांत सुधारणा करून दाखविण्याची चांगली संधि प्राप्त झाली होती. प्रथम प्रथम तशी सुधारणा होण्याचीं चिन्हेंहि दिसूं लागलीं होतीं; पण याच वेळीं राजकारणांत जहाल व मवाळपक्ष उपस्थित होऊन जहालपक्षानें आपल्या ताब्यांत सर्व सूत्रें घेतलीं. धर्मयुध्दांत भाग घेणाऱ्या  शिपायांनां जास्त पगार देण्यासाठीं ग्रेटब्रिटन व रशियाकडून कर्ज काढण्याच्या बाबतींत दोन्ही पक्षांमध्यें खडाजंगी वादविवाद होऊन जहालपक्षानें आपलें म्हणणें खरें केलें, त्यामुळें सिपहदर व त्याच्या मवाळपक्षाला राजीनामा देणें भाग पडलें व सरदार इ असद यानें आपलें मंत्रिमंडळ तयार केलें; पण याहि पक्षांत अधिकाराच्या जागेसंबंधांत दुफळी माजली व त्यामुळें जिकडे तिकडे अनास्था उत्पन्न झाली. याच सुमारास रशियन वकील पसेक हा आपल्या संरक्षक लोकांसह शिराजला जात असतां त्याच्यावर डोंगरी जातींनीं हल्ला केला. पुढें कांहीं महिन्यांनीं याच जातींनी ब्रिटीश वकीलावर हल्ला करण्यास कमी केलें नाहीं. फार्सच्या मुख्य अधिकाऱ्यालाहि दहशत घालण्यांत आली. पदच्युत झालेल्या शहाचे अनुयायी यांनीं अर्देबिल येथील गव्हर्नरला हांकलून लावलें. ब्रिटीशांच्या व्यापारालाहि धोका पोहोंचण्याचा संभव दिसूं लागला, त्यामुळें ब्रिटीश वकीलानें पर्शियाला चांगलीच तंबी देण्याचें ठरविलें.

इकडे १९१० त नसीर एल मुल्क याला रीजंट म्हणून निवडण्यांत आलें व सिपहदर हा पुन: प्रधान मंत्रि झाला. याच सुमारास पदभ्रष्ट शहानें तेहरानवर स्वारी केली व त्याचबरोबरच सलर एद दौले यानेंहि कर्मानशाह येथून आपला मोर्चा राजधानीकडे वळविला; पण पदभ्रष्ट शहाच्या सैन्याचा पराभव झाल्यामुळें त्याला रशियांत पळून जाणें भाग पडलें.

महायुध्द सुरू होण्याच्यापूर्वी म्हणजे सन १९१३ त इराणची परिस्थिति हलाखीची होती. रशियानें उत्तरेकडे आपलें बस्तान बसविण्याची खटपट चालविली होती. ग्रेटब्रिटन हें रशियाशीं तहनाम्यानें बांधलें गेलें होतें, तरी आंतून इराणला शक्य होईल तें सहाय्य करीत होतें.  दक्षिण इराणांतील फार्स व कर्मन या प्रांतांत तर अंदाधुंदी माजलेली होती. फार्सच्या गव्हर्नर जनरलच्या सभेला न जुमानतां कशगई जातीच्या लोकांनीं बंडाळी माजविली होती. कर्मन प्रांतांत तोच प्रकार चालला होता. इराणच्या सरकारी खजिन्यांत मुबलक सैन्य उभारण्याला तर पुरेसा निधि नव्हता. शेवटीं फार्सचा गव्हर्नर जनरल मुखबिरएस सुलतानी याला एक हजार सैन्य उभारण्याकरितां ग्रेटब्रिटननें जवळ जवळ सव्वा लक्ष पौंड कर्ज दिलें व रशियानेंहि तितकीच मदत केली.

महायुध्द सुरू होण्यापूर्वीची इराणची ही स्थिति होती. ग्रेटब्रिटन व रशिया याशिवाय तिसऱ्या एका सत्तेनें आपला शिरकाव करण्याचा यत्न दहा पंधरा वर्षांपासून चालू ठेविला होता.  ती सत्ता म्हणजे जर्मनी होय. जर्मनीने १८९२-९३ पासूनच इराणमध्ये आपला पाय रोवण्याचा प्रयत्न चालविला होता व खुद्द राजधानीच्या शहरांतच जर्मनांनीं एक कॉलेजहि स्थापन केलें होतें. १८९६ त एका जर्मन कंपनींनें लिंगेह येथें मोत्याचा व्यापार सुरू केला. सन १८९७ त बुशायर येथें जर्मनीनें आपली वकीलात स्थापन केली. तीन वर्षांनंतर जर्मनीनें कुवेट येथें बगदाद रेल्वेची मुख्य इमारत बांधण्यासाठी जागा घेण्याचें ठरविलें; पण ग्रेट ब्रिटननें जर्मनीचा कावा ओळखून त्या प्रयत्नाला खो घातला. पुढें मोहमेराह येथें जर्मन वसाहत करण्याचाहि त्यांनीं प्रयत्न केला; पण तोहि प्रयत्न ब्रिटननें साधूं दिला नाहीं, तरीं पण निराश न होतां १९०६ त इराणच्या आखातांत प्रवास करण्यासाठी हँबर्ग, अमेरिका सर्व्हिस जर्मनीनें सुरू केली. अशा रीतीनें जर्मनीनें इराणमध्यें हळू हळू आपला जम बसविण्यास सुरुवात केली होती.

सन १९१४ त रीजंटची मुदत संपून सज्ञान झालेला शहा इराणच्या राज्यावर बसतो न नसतो तोंच जागतिक महायुध्दाला सुरूवात झाली. लगेच शहानें आपली मजलिस बोलावून तिच्या संमतीनें इराण या युध्दांत तटस्थ रहाणें फारच कठिण होतें. शिवाय इराणांतील सरदार लोक  ज्या पक्षाकडून अधिक पैसे मिळतील त्या बाजूला जाण्यास तयार होते. इराणांतील लोकांचा तुर्कोंकडे ओढा असून ब्रिटीश व रशियन लोकांशीं त्याचें पटत नव्हतें.

महायुध्दाच्या आरंभीं इराण हें महायुध्दाचें एक महत्वाचें केंद्र होणार ही गोष्ट कोणाला खरी देखील वाटली नसती; पण तसें होणें अपरिहार्य होतें. इराणची हीन स्थिति ध्यानांत घेऊन तुर्कस्तान व इराणच्या सरहद्दीवरील महत्वाचा वाटा तुर्कस्तान व रशिया यांनीं महायुध्दपूर्वीच बळकावल्या होत्या. युध्दाला सुरवात होतांच रशियानें इराणच्या वायव्येला असलेल्या अझरबैजन प्रांतांत चढाई करून तुर्कांनां गचांडी देण्याचा प्रयत्न केला. तुर्कांनींहि कुर्द जातीच्या साहाय्यानें ताब्रिझ वर चाल करून तें आपल्या ताब्यांत घेतलें; पण लगेच त्यांनां तें सोडणें भाग पडलें. सन १९१५ सालीं सरकॅमिश येथें तुर्कांचा रशियानें पराजय केला व उर्मिया शहर काबीज केलें.

अवदान बेटांत अँग्लो पर्शियन कंपनीच्या मोठमोठया तेलाच्या कंपन्या होत्या. तुर्कांनी युध्दाला सुरवात करण्यापूर्वीच हिंदुस्थान सरकारनें या तेलाच्या कंपन्याचें संरक्षण करण्याकरितां एक पलटण तेथें पाठविण्याची तजवीज करून ठेवली होती. या पलटणीनें तुर्की सैन्याचा सहिल येथें पराभव करून बसरा आपल्या ताब्यांत घेतलें; पण तेलाच्या कारखान्यांचें अशा रीतीनें संरक्षण झालें, तरी तेलाच्या खाणींचा अद्यापि बंदोबस्त झाला नव्हताच. या खाणींपासून मोठमोठया नळाच्यावाटे तेल एके ठिकाणीं सांठवून ठेवण्यांत येत होतें. या नळया फोडून शत्रूनें बरेंच नुकसान केलें; पण पुढें ब्रिटीश सैन्यानें, तेथें सैन्य पाठवून या भागांतून तुर्की सैन्याला हांकलून लावलें.

इराण व अफगाणिस्तान आपल्या बाजूला ओढून घेऊन सर्व इस्लामी जग आपल्या बाजूचें करून घेण्यासाठीं जर्मनीनें आपली पराकाष्ठा केली. आपले हेर ठिकठिकाणी पाठवून या देशांतील प्रमुख लोकांनां मनमुराद पैसे चारून त्यांनां आपल्याकडे ओढण्याचें काम जर्मनीनें सूरू केलें; पण त्यांत जर्मनीला यश आलें नाहीं.

शन १९१६ त पश्चिम इराणमध्यें तुर्कस्थान व रशिया यांच्यामध्यें पुष्कळ झटापटी झाल्या व त्यांत कधी तुर्कस्तानला जय तर कधी रशियाला जय असा प्रकार चालू होता; पण या सालाच्या अखेरीस तुर्कस्तानच्या सैन्यानें रशियाला कर्मनशाह व इमदानमधून हांकलून लावलें. ही स्थिति पाहून इराणी सैन्याचा साहाय्यानें दक्षिण इराणमध्यें बंदोबस्त ठेवण्याचा ब्रिटननें निश्चय केला, त्याप्रमाणें पर्सी साइक्सच्या हाताखालीं सैन्य  उभारण्यांत येऊन त्या सैन्याने बंदर अबास हे आपल्या ताब्यांत घेतलें. कवामच्या सहाय्यानें फार्समधील बंडाळीहि मोडली गेली. अशी स्थिति प्राप्त झाल्यामुळें जर्मनांना मागें हटणें भाग पडलें. हस्पहानवर तुर्कस्तानची फौज चाल करून येणार, अशी बातमी समजतांच ब्रिटीश व इराणी सैन्य त्याचें संरक्षण करण्यासाठीं निघालें पण इस्पहानवर तुर्कांनीं स्वारी केलीच नाही.

अशा रीतीनें १९१७ त दक्षिण इराणमध्यें शांतता होते न होते तोंच दुसरीकडून एक अकल्पितच संकट उद्भवलें. फेब्रुआरी, मार्च महिन्यांत बगदाद ब्रिटिशांच्या ताब्यात होतें. तुर्कांची सत्ता दक्षिण इराणमधून नाहींशीं झाली होती; पण याच वेळेस रशियांत राज्यक्रांतीनें डोकें वर काढलें होतें, झारला पदच्युत करून झारशाही नष्ट करण्याचा रशियनांनी आपला हट्ट पुरा केला होता. रशियानें दोस्त राष्ट्रांचा पक्ष सोडला होता व तो आपल्याच अंतस्थ धामधुमीची व्यवस्था लावण्यांत चूर झाला होता. रशियाचा जोर अशा रीतीनें ढिला पडल्यामुळें अझबैजन प्रांत व तसेंच जार्जिया व आर्मेनिया प्रांत यांनीं आपलें स्वातंत्र्य जाहीर केलें, यामुळें जर्मनीला व तुर्कस्तानला पुन: धीर आला. अशी परिस्थिति पाहून ब्रिटिशांनीं डन्स्टरवेले याला इराणमधील लोकमत अजमावून रशियन लोकांनां व शत्रूंना हांकून लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी पाठविलें. डन्स्टरवेलेनें बरीच खटपट केली व त्यांत त्याला बरेंच यश आलें. ब्रिटिश सैन्यानें वाकू शहर आपल्या ताब्यांत घेतलें.

शन १९१८ च्या पहिल्या महिन्यामध्यें ब्रिटिश सरकारनें आपल्या प्रदेशांतून सैन्य काढून न्यावें व अशा रीतीनें इराणला आपल्या मताप्रमाणें सुधारणा घडवून आणण्याला संधि द्यावी असें इराणनें ब्रिटिश सरकारला कळविलें; पण ब्रिटिशांनीं जें कर्ज द्यावयाचें कबूल केलें तें मात्र इराणनें स्वीकारावयाचें कबूल केलें. कर्ज देऊन इराणला आपल्या बाजूला ठेवण्याचा ब्रिटिशांचा डाव होता. ब्रिटिश लोक सैन्य काढून घेत नाहींत हें पहातांच त्यानां हांकलून लावण्यासाठी सोलाह नांवाच्या काशगाई जातीच्या नायकाच्या आधिपत्याखालीं एक कट करण्यांत आला. या कटवाल्या पुढाऱ्यानें आपल्या सैन्यानिशीं शिराझवर हल्ला करण्याचा बेत केला; पण हा बेत फुटल्यामुळें सिध्दीस गेला नाहीं. तरी पण सोलाहनें ब्रिटिशांविरुध्द बंड पुकारलें. दोन्हीं सैन्यांमध्यें मधून मधून झटापटीं होत असत. शेवटीं ब्रिटिश इंडियन सैन्याचें आस्ते आस्ते पाऊल पुढें पडूं लागलें. काशगाई जातीच्या मुल्लांनीं ब्रिटिशांविरुध्द शिराझच्या लोकांनां चिथावण्याचा प्रयत्न केला. या चिथावणीला भुलून शिराझच्या रहिवाशांनीं ब्रिटिशांच्या बाजूचे असल्याबद्दल ज्या लोकांचा त्यांनां संशय आला होता, त्या त्या लोकांनां कापून टाकण्यास सुरवात केली, पण ब्रिटिशांनीं शिराझच्या आसपासच नाकेबंदी करून टाकल्यामुळें या लोकांचें कांहीच चाललें नाहीं. ब्रिटिशांनीं सोलाहच्या जागीं दुसऱ्याला त्या प्रांतांचा सुभेदार नेमलें. पुढें १९१८ च्या आक्टोबर महिन्यामध्यें काशगाई लोकांचा ब्रिटिशांनीं पूर्ण मोड केला.

१९१९ साली शांततापरिषदेपुढें आपलें म्हणणें मांडण्याकरितां, इराणचें प्रतिनिधिमंडळ पॅरिस येथें रवाना झालें इराणला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, ब्रिटिशांनीं जिंकलेला मुलूख इराणला परत मिळाला पाहिजे व महायुध्दांत इराणच्या प्रदेशाचें जें नुकसान झाले हातें त्याची भरपाई झाली पाहिजे असें इराणचें म्हणणें होतें. १९०७ च्या अँग्लोरशियन तहानें इराण यापुढें बांधला जाणार नाहीं हें इराणचें म्हणणें ग्रेटब्रिटननें कबूल केलें पण, इराणची अंतर्व्यवस्था नीट लागेतोपर्यंत, आपली फौज उठवण्याचें मात्र ग्रेटब्रिटननें नाकारलें. या इराणी शिष्टमंडळास, परिषदेपुढें आपलें म्हणणें मांडावयाला परवानगीसुध्दां मिळाली नाहीं. यामुळें इराणनें दुसऱ्या एका नवीन प्रतिनिधीला पाठवून सुप्रीम कौन्सिलपुढें आपलें म्हणणें मांडण्याचें ठरविलें.

सन १९१९ च्या एप्रिल मे महिन्यामध्यें इंग्लंड व इराण मध्यें बरीच भवति व भवति होऊन, तेहरान येथे दोन्ही पक्षांमध्यें तहनामा घडून आला. या तहनाम्यान्वयें ब्रिटिशांनीं इराणचें स्वातंत्र्य कबूल केलें व इराणशीं सख्यत्व ठेवावयाचे आश्वासन दिलें. इराणच्या राज्यकारभारांत जी जी कांहीं मदत लागेल, ती ती देण्याचेहि ब्रिटिशांनीं कबूल केलें. याशिवाय इराणच्या राज्यव्यवस्थेसाठीं व सुरक्षिततेसाठीं, जितके सैन्य व दारूगोळा जरूर आहे असें लष्करी तज्ज्ञ ठरवितील, तितके सैन्य व दारूगोळा नेहमीं तयार रहावा यासाठीं शक्य ती मदत ब्रिटिशांनीं द्यावी असें ठरविण्यांत आलें. तसेंच, इराणमध्यें सुधारणा घडवून आणण्यासाठीं जे कांहीं द्रव्य लागेल तें योग्य जामिनावर, ब्रिटिशांनीं द्यावयाचें ठरलें. याशिवाय दळणवळण व व्यापार सुरक्षित तऱ्हेनें सुरू होण्यासाठी, निरनिराळया रेल्वे तयार करण्याच्या कामांत भरपूर सहाय्य करण्याचेंहि ब्रिटिशांनीं आश्वासन दिलें.

वरील  तहनाम्याप्रमाणें जवळ जवळ ६० हजार सैन्य उभारावयाचें ठरलें. सैन्याची देखरेख व व्यवस्था कशी ठेवावी यांसंबंधी सल्ला देण्याकरितां एका इंग्लिश अधिकाऱ्याची नेमणूक करण्यांत आली सैन्याचें अधिपत्य मात्र इराणी अधिकाऱ्याकडे देण्यांत आलें. मे १९२० मध्यें  बोल्शेविक आरमारानें, एन्झेलीवर तोफांचा भडिमार सुरू केला व रेश्त शहर काबीज केलें. एन्झेली येथील ब्रिटिश तुकडीनें पळ काढला; त्यामुळें तेहरानमध्यें हाहाकार उडाला. पण थोडक्याच काळांत ब्रिटिशांनीं कोसॅक स्वारांच्या व इराणी शिपायांच्या साहाय्यानें बोल्शेविक लोकांनां हांकलून लावले पुन्हां १९२१ सालीं बोल्शेव्हिाकांनीं, गिलन प्रांतांमध्ये  चढाई करण्याचा प्रयत्न केला. पण ब्रिटिशांचें सैन्य  त्या ठिकाणी असल्यामुळें बोल्शेव्हिकांचें कांहीच चाललें नाहीं.

अँग्लोपर्शियन तहान्वयें इराणच्या जमाबंदीच्या बाबतींत सल्ला देण्याकरतां, एक ब्रिटिश फडणवीस नेमण्यांत आला निरनिराळया खात्यांत सुधारणा करण्यासाठी इराणला पूर्वीपासूनच ब्रिटन व रशिया यांनीं कर्ज दिले होतें. पण अँग्लो-पर्शियन तहानंतर, ब्रिटननें वीस लक्ष जादा कर्ज देऊं केलें.

इ. स. १९२१-१९२४ : - गेल्या तीन वर्षांच्या म्हणजे मे १९२१ पासून मे १९२४ पर्यंतचा वर्तमानाचा आढावा येणेंप्रमाणें देतां येईल. या काळांत मंत्रिमंडळांत वारंवार बदल होत असे.'' अँग्लोपर्शियन अग्रीमेंट'' सोडून देणें (१९२१ मध्यें सोडून दिलें) इंग्रजांशीं संबंध तोडणें, स्वीडन फ्रान्स आणि अमेरिका यांस इराणच्या कारभारांत लक्ष देण्यास उत्तेजन देणें आणि बोल्शेव्हिाकांच्या तावडींत इराणांस सांपडूं देणें इत्यादि राजनीतीचीं अंगें दृग्गोचर झालीं. एप्रिल १९२१ मध्यें सोव्हिअट सरकारचा प्रतिनिधि गोल्डस्टीन हा मोठया इतमामासह तेहेरान येथें दाखल झाला. आणि इराण व रशियाचा तहनामा झाला होता तरी रशिअन फौज इराणांतून हलविली गेली नव्हती. ते १९२१ मध्यें झैसैयद उद्दीनच्या मंत्रिमंडळाच्या जागीं क्वाम-एस-सुलतान यांचें मंत्रिमंडळ आलें. १९२२ मध्यें मोशिरएद दौलाचें मंत्रिमंडळ आलें. पुन्हा त्याच्या नंतर थोडक्याच दिवसांनी क्काम-एस-सुलतानचे मंत्रिमंडळ आले पण पुन्हा जानेवारी १९२३ मध्यें तें मंत्रिमंडळ गेलें आणि मोशेवार-एल्-मामलेक (हा १९१७-१८ मध्यें पूर्वी प्रधानपदावर होतांच) चें मंत्रिमंडळ आले. पुन्हां सहामहिन्यांत मोहोर-उद्दौला हा अधिकारारूढ झाला पण त्याचा अधिकार दोन अडीच महिनेच होता. १९२३ च्या आक्टोबरमध्यें लष्करी खात्याचा मंत्री असलेला सरदार सेपाह हा मुख्य प्रधान झाला. या वेळेस  मात्र लोकांस जोरदार माणसें अधिकारारुढ असावींत असें वाटत होतें. सेपाहची सत्ता १९२४ च्या एप्रिल ७ पर्यंत टिकली आणि त्या दिवशीं जरी त्याला अधिकारत्याग करावा लागला तरी त्यानें कांहीं सहकारी बदलले तेव्हां तो सातदिवसांनीं पुन्हां प्रधान झाला. या अधिकारावर असलेल्या मंडळींच्या अस्थिरतेमुळें इराणच्या इभ्रतीविषयीं बाहेरदेशीं लौकिक बराच कमी झाला. आणि देशांत देखील सुधारणा करण्यास फारसें झालें नाहीं. लुरिस्तानांतील बंडाळी देखील १९२३ पर्यंत मोडतां आली नाहीं. इकडे लोक राज्यावरील अनेक प्रधान वारंवार बदलीत होते, तेव्हां शहानें जर जोरदारपणा दाखविला असता तर बराच उपयोग झाला असतां पण शहाला यूरोपाच्या सफरींचा नाद लागला. पूर्वेकडील देशांतील राजे रजवाडे यूरोपांत गेल्यामुळें त्यांची दृष्टि व्यापक होते आणि त्यांस अनेक प्रकारच्या सुधारणा करतां येतात अशी अपेक्षा असते पण त्यांचा असाहि परिणाम होतो कीं, त्यांना परदेशी जाऊन राहण्याची चट लागते आणि देशांतील राज्यव्यवस्थेकडे त्यांचे दुर्लक्ष होऊं लागतें. शहाच्या सफरीमुळें असाच परिणाम झाला आणि लोकांत क्षोभ उत्पन्न होऊं लागला १९२४ च्या प्रारंभीं ज्या वेळेस '' मजलिस'' (पार्लमेंट) युवराजानें उघडली. तेव्हां राजसत्ताविरोधी मंडळीनीं आपली इच्छा तेहरानमध्यें अधिक स्पष्टपणें नजरेस आणणें सुरू केलें. त्यावेळेस प्रागतिक उर्फ लोकसत्तावादी पक्ष मजलिसमध्यें जोरांत होता तो पक्ष आणि समाजसत्तावादी पक्ष यांनीं असें ठरविलें कीं, इराण हें लोकसत्तात्मक राष्ट्र करावें, पण या कार्यास धर्माधिकारीं आणि जनता यांचा तीव्र विरोध दिसून आल्यामुळें राजसत्ता नष्ट न करतां शहास पदच्युत करून त्याच्या दोन वर्षांच्या मुलास राज्याधिकारी ठरविलें आणि तोपर्यंत अधिकार राजप्रतिनिधीनें चालवावा असें ठरलें.

या कालांत ब्रिटीश साम्राज्याविषयीं इराणांत काय प्रकारची वृत्ती होती हें लक्षांत घेण्याजोगें आहे. इराणांत सुधारण्यासाठी पैसा हवा होता आणि त्यांतल्यात्यांत इराणच्या शहाच्या वाढत्या खासगी खर्चालाहि बाहेरचें कर्ज काढण्याची आवश्यकता उत्पन्न झाली. यामुळे भांडवलवाल्या राष्ट्रांस आपले हातपाय इराणांत पसरण्यास संधि मिळाली. १९२१ मध्यें इंग्लंड व इराण यांच्यामध्यें एक ठराव झाला होता. त्या ठरावाप्रमाणें इंग्लंडनें इराणच्या जमाबंदीची पुनर्घंटना करावी आणि इराणास जोरदार राष्ट्रीय फौज निर्माण करण्यास मदत करावी आणि अंतर्गत दळणवळण आणि व्यापार यांच्या वृध्दीस मदत करावी आणि तीन कोट रुपये कर्ज इराणास त्याच्या अंतर्गत आणि जकातीच्या वसुलाच्या तारणावर द्यावें इत्यादि अटी होत्या, परंतु हा ठराव इराणच्या पार्लमेंटनें फेटाळून लावला आणि अमेरिकन सल्लागार बोलावले. या अमेरिकन सल्लागारांची कर्तबगारी अजून दिसावयाची आहे. या वेळेस ब्रिटनविरुध्द जें लोकमत झालें त्याचें कारण मेसापोटेमियांतील घडामोडी होत. मेसापोटेमियांमधील इराणी शियापंथी उपदेशक घालवून दिलें गेलें आणि त्यामुळें इंग्रजी मालावर बहिष्कार घालण्याची चळवळ तेहरानमध्यें (जुलै १९२३) सुरू झाली.

बोल्शेविक चळवळ : -  १९२२  च्या मे महिन्यांत प्रथमच कर्मन व शिराज येथें रशियन वकिलाती स्थापन झाल्या. १९२३ च्या जुलईंत रशियानें इराणच्या मागणीप्रमाणें व्हेन्स्टोर्ग रशियन कंपनीचा व्यापारी मक्ता रद्द करण्याचे नाकारिलें. इराणी व्यापार वाढविण्यासाठी ब्रिटिशांविरुध्द चळवळ सुरू करण्यांत आलीं. बोल्शेबिझमची प्रशंसा होऊं लागली व रशियन कान्सलनीं ब्रिटिश मालांवर इराणकडून बहिष्कार घालण्याविषयीं खटपट चालविली. पण जेव्हां रशियन सरकारानें निजनी नोव्हगोरोड जत्रेच्या प्रसंगी (१९२३) उत्तरेकडील इराणी व्यापाऱ्यांनां भयंकर कर देण्यास व रोकड इराणांत परत न नेण्यास भाग पडिले, तेव्हां ते रशियाच्या विश्वासघातकी, वर्तनाविषयी ओरड करुं लागले.
 
वर्तमान पत्रे व त्यांचे धोरण. - १९२१ सालापासून इराणी वर्तमानपत्रांनी सरकारी नोकरीत असलेल्या यूरोपियन अधिकाऱ्यांवर टीकेचा मारा सुरु केला. सरकारी खात्यांतून फक्त इराणी नोकर नेमावेत असा त्यांचा आग्रह असे. 'इत्तेहाद (एकी) पत्र रशियनध्देष्टे होते; 'हाघी हात  (सत्य) पुष्कळ सरदारांची नालस्ती करी;  'इराण अझद (स्वतंत्र इराण) आंग्लो इराणी तहाच्या विरुध्द असे; 'शाफक सोरख (रक्तउषा) युवराजाने केलेल्या पैशाच्या मागणीमुळे रागावलेलें होते, ' इरामझद’ ब्रिटिशांचे वर्चस्व रशियाच्या वर्चस्वा इतकेच वाईट आहे असे प्रतिपादी. १९२२ च्या सप्टेंबर महिन्यांत इराण सरकाराने पुष्कळ पत्रे त्यांतील ब्रिटिशांविरुध्द लेखांमुळे बंद पाडली. युध्द मंत्र्यावर कडक टीका केल्यामुळे लष्करी तुकडीने जुलै १९२३ त 'वथन’ वर छापा घातला.

तेलावर कर्ज काढण्याचें आंग्ल धोरण. - नवीन सरकारनें पर्शियन ऑईल कंपनीला पूर्वी उत्तर इराणांतील तेला संबंधी दिलेल्या कांही सवलती काढून घेतल्या व १९२२ च्या जानेवारींत अमेरिकन स्टॅन्डर्ड ऑइल कंपनीला पुष्कळ सवलती दिल्या. तेलाच्या उत्पन्नावर इराण सरकारला २ लक्ष पौड  रक्कम १९२२ च्या मार्च महिन्यांत उसनवार मिळाली. जून महिन्यांत एक कोटी डॉलर कर्ज देण्याच्या बोलीवर एका अमेरिकन कंपनीस बऱ्याच सवलती इराणला देतां आल्या.

येज्दच्या सुलतानानें एका ब्रिटिश कंपनीला इराणच्या आखाताच्या किनाऱ्यावर असणाऱ्या हासा प्रांतांतल्या ४०००० मैलांइतक्या प्रदेशांत तेलाच्या सवलती दिल्या (जून १९२३).

गुलामांचा व्यापार - ओमान आखाताच्या किनाऱ्यावर बटिने येथील एलसद जातीचे लोक इराणांतून गूलाम आणून व्यापार करितात अशा अर्थाचा पुरावा १९२३ च्या मार्च महिन्यांत ब्रिटिश पार्लमेंट पुढें आला होता.

इराणची भषा व वाङ्मय यांकरितां फारसी भाषा व वाङ्मय पहा.

[संदर्भग्रंथ. - अॅडर्सन-माय वाँडरिग्स इन पार्शिया; साइक्स-ऑन ए साइड सॅडल थ्रू पर्शिया; वर्झी-पीप्स इंटु पर्शिया; मालकम-स्केचेस ऑफ पर्शिया; चार्डिन-ट्रॅव्हल्स थ्रू पर्शिया (३ भाग); नाइट-ट्रॅव्हल्स इन पर्शिया (भाग ३) बॅसेट-पर्शिया दि लँड ऑफ दि इमाम्स; ब्लॅनफर्ड-ईस्टर्न पर्शिया (लंडन १८७६) मोल्टन-अलीं रिलीजियस पोएट्री ऑफ पर्शिया ; गाल्डिवन- पर्शियन क्लॉसिक्स (इंग्रजी भाषांतर २ भाग) स्मिथ- आर्ट ऑफ पर्शिया: फ्रेझर-हिस्टॉरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह अकाउंट ऑफ पर्शिया; स्टीव्हन्स-हिस्टरी ऑफ पर्शिया (२ भाग;) सायकीज-हिस्ट्री ऑफ पर्शिया; (दुसरी आवुत्ति १९२१); प्रो. ब्रॉऊन- दि पर्शियन रेव्होल्यूशन (१९१०); पिगॉट-एन्शंट अँड मॉडर्न पर्शिया; बेंजामिन पर्शिया (स्टोरी ऑफ नेशन्स); जॅक्सन-पर्शिया पास्ट अँड प्रेझेंट (१९०६);बार्कर-लेटर्स फ्रॉम पर्शिया अँड इंडिया-१८५७-१८५९; कर्झन -पर्शिया अँड दि पर्शियन क्कश्चन, (दोन भाग); डायरी ऑफ दि शहा ऑफ पर्शिया डयूरिंग हिज टूर इन युरोप (१८७३), (भाषांतरकार-रेड हॉऊस्) ; फ्रेझर पर्शिया अँड टर्की इन रिव्होल्ट); हॉल-एन्शंट हिस्टरी ऑफ दि निअर ईस्ट (१९१३ ; डन्स्टरव्हिले दि अॅडव्हेंचर्स ऑफ डन्स्टरफोर्स (१९२०)]

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .