प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

इतिहासशास्त्र - या विषयावर अनेक प्रकारचे विवेचन करणें प्राप्त होते. प्राचीन भारंतात ''इतिहास'' या शब्दाचा  अर्थ व प्राचीन इतिहासवाङ्मय हा एक महत्वाचा विषय आहे. याशिवाय आज आपण ज्यास इतिहासशास्त्र म्हणतों त्याची प्राचीनांस कितपत कल्पना होती; आणि ती कल्पना पुढें मुसुलमान व इंग्रज यांच्या संपर्कानें विकसित होत होत आजचे इतिहास स्वरुप कसें तयार होत गेलें हे सांगितले पाहिजे. आणि इतिहास शास्त्राचें आजचें स्वरुप काय हेंहि सांगितले पाहिजे. प्राचीनांच्या इतिहासशास्त्राची कल्पना ''बुध्दपूर्वजग'' याच्या पहिल्या प्रकरणांत स्पष्टपणें मांडलीच आहे.

श ब्दा चा प्रा ची न अ र्थ - इतिहास शब्दाची व्युत्पत्ति 'इति ह आस' असें हें होते' अशी आहे. त्याचा अर्थ पुरावृत्त (अमरकोश १.४.६.) म्हणजे मागें घडलेली गोष्ट असा आहे. उत्तरकालीन संस्कृत वाड्.मयांत इतिहास याचा ''दंतकथा'' ''गोष्ट'' असा साधा अर्थ होऊ लागला. आणि आख्यान, आख्यायिका, कथा इत्यादि प्रतिशब्द त्याबद्दल वापरण्यांत येऊं लागले. परंतु इतिहास म्हणजे ज्यामध्यें धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ कसे साधावे त्याबद्दलचा उपदेश केलेला असून तत्संबध्द गोष्ट सांगितली आहे असा प्राचीन काळचा वृत्तांत होय; ही सविस्तर  व्याख्या मान्य केली तर इतिहास हा कथेच्या रुपानें केलेला उपदेशच होय असे म्हटलें पाहिजे. आणि हाच अर्थ खरा असल्याचें मानण्यास संस्कृत वाङमयांत भरपूर पुरावा मिळतो. आश्वलायन गृह्यसुत्रांत (४.६.६) असें सांगितले आहे की, जेव्हा एखादा इसम मरण पावतो. तेव्हा त्याचें इष्टमित्र एकत्र बसून प्रसिध्द पुरुषांच्या गोष्टी सांगतात, व त्याच वेळी मनावर चांगला परिणाम करणारे इतिहास आणि पुराणे त्यांना सांगण्यांत येतात. कौटिल्याच्या अर्थशास्त्रांत (अर्थशास्त्र १.५, १०.१४. पासून पुढें असें सांगितले आहे की, राजाने आपला नित्याचा कार्यक्रम म्हणून रोज इतिहास ऐकत जावा म्हणजे त्या योगानें त्याचे शिक्षण पुरें होते. तसेंच इतिवृत्त आणि पुराण यांचा उपयोग करुन प्रधानानें राजाला चुकीच्या मार्गापासून परावृत्त करुन चांगल्या मार्गाला लावावें. (अर्थशास्त्र ५.६ २५५).

महाभारत ह्या ग्रंथाला इतिहास महापुण्य (मोठया महत्वाचा इतिहास) असें म्हटले आहे. आणि त्यामधील पुण्यकथांचा वारंवार उल्लेख करण्यांत येतो. महाभारतांत पुष्कळ इतिहास सांगितलेले आहेत. त्यांमध्ये ऐतिहासिक माहिती पेक्षां उपदेशात्मक भागालाच विशेष महत्व असतें. महाभारतांत ''हे ॠषीहो, हा संशय माझ्या ह्दयांत शल्याप्रमाणें रुतून बसला आहे तो इतिहासकथनानें काढून टाका; एवढीच माझी सर्वांत मोठी इच्छा आहे.'' अशा प्रकारचे उल्लेख वारंवार येतात. कौटिल्यानें इतिहास हा एक समुदायवायक अर्थानें वापरला आहे व त्यांत पुराण, इतिवृत्त, आख्यायिका, उदाहरण, धर्मशास्त्र व अर्थशास्त्र इतक्यांचा समावेश केला आहे. परंतु या सहा प्रकारच्या निरनिराळया ग्रंथापैकी प्रत्येकाचा अर्थ काय हें नक्की समजणें कठीण आहे. पुराण म्हणजे दंतकथांचा संग्रह व इतिहास म्हणजे ऐतिहासिक गोष्टीचा संग्रह असें याकोबी सारख्या पंडितांचे मत आहे. तसेंच आख्यायिका म्हणजे गद्य कथानक आणि उदाहरण म्हणजे नैतिक उपदेशपर भाग होय.

वरील उदाहरणांवरुन असें दिसून येईल की, इतिहास हा संस्कृत वाङमयांमध्ये एक ग्रंथप्रकार होता. खुद्द महाभारताला सर्व इतिहासांतील अत्यंत श्रेष्ठ इतिहास असें म्हटलें आहे. तात्पर्य इतिहास अथवा इतिहासवेद या नावाचा ग्रंथसमुदाय प्राचीन हिंदुस्थानांत अस्तित्वांत होता असे मानण्यास सबळ पुरावा आहे. अश्वमेध यज्ञाच्या वर्णनांत असें सांगितलेले आहे की, हा यज्ञ चालू असता होत्याच्या समोर रोज एकएक विशिष्ट जीवकोटी आणून उभी केली आहे असे धरीत व तो तिला उद्देशून निरनिराळया ग्रंथातले उपदेशपर भाग म्हणून दाखवी. या क्रमानुसार पहिल्या दिवशी वैवस्वत मनु हा राजा आणि मानव प्राणी ही त्याची प्रजा यांनां होत्यापुढें आणण्यांत आलें व होत्यानें त्यांना उद्देशून ॠग्वेदांत कांही ॠचा म्हटल्या. दुसऱ्या दिवशी वैवस्वत यम आणि पितर हे होत्यापुढे आले आणि यजुर्वेदांतला कांही भाग त्यांच्यापुढें म्हणण्यांत आला तिसऱ्या दिवशी वरुण आदित्य व गंधर्व आणि अर्थवण वेदाचा काही भाग; चौथ्या दिवशी सोम, वैष्णव आणि अप्सरा आणि अंगिरसाचा कांही भाग; पांचव्या दिवशी अर्बुद काद्रवेय व सर्प, आणि सर्पविद्येचा कांही भाग; सहाव्या दिवशी कुबेर, वैश्रवण व रक्षस, आणि देवजनविद्येचा (रक्षोविद्या किंवा पिशाचविद्या हिचा) कांही भाग; सातव्या दिवशी असित, धान्य व असूर आणि माया (असुरविद्या) आठव्या दिवशी मत्स्य समद व जलचर प्राणी आणि इतिहासवेदापैकी एक इतिहास नवव्या दिवशी तार्क्ष्यं, वैपश्यत व पक्षी आणि पुराणवेदांपैकी एक पुराण; आणि दहाव्या दिवशी धर्म, इंद्र व देव आणि सामवेदांतला कांही भाग; या प्रमाणें अनुक्रम सांगितलेली आहे, सदर्हू वर्णनांत ॠक, यजूष, अथर्वण अंगिरस, सर्पविद्या, देवजनविद्या, माया (असुरविद्या), इतिहास पुराण आणि सामवेद इतक्या निरनिराळया प्रकारच्या ग्रंथाचा उल्लेख आढळतो. अशाच प्रकारच्या याद्या वैदिक वाङमयांत निरनिराळया ठिकाणी आढळतात. (उदा.अथर्ववेद १५.६.३ बृहदारण्यक उपनिषद. २४. १० ४.१= ४.१) २; तैतिरीय आरण्यक २.९ आश्वालायन गृह्यसूत्र ३.३.१ या सर्व प्राचीन याद्यामध्यें 'इतिहास' हा शब्द 'पुराण' या शब्दाच्या बरोबर आलेला आढळतो. इतकेंच नव्हें तर कांही ठिकाणी त्यांचा द्वंद्व समास केलेला असतो. अशा याद्यांमध्ये इतिहासपुराण हे शब्द चार वेदांच्या नावानंतर लगेंच दिलेले असतात. हें त्याचें स्थानहि लक्षांत घेण्यासारखे आहे; शिवाय छांदोग्य उपनिषदांत (६.१.२ व ४; २; ७.१ ''इतिहासपुराण: पंचमो वेदाना वेदः'' म्हणजे इतिहास-पुराण हा पांचावा वेद आहे असें म्हटले आहे.

या वैदिक वाङमयांतल्या उल्लेखावरुन इतिहास व पुराण या नांवाचे स्वतंत्र ग्रंथ अस्तित्वांत होते हे निर्विवाद सिध्द होते. शिवाय कौटिल्याच्या अर्थशास्त्रांतील उल्लेखावरुन ख्रि.पू. तिसऱ्या शतकांत हा इतिहासवेद अस्तित्वांत होता. असें ठरते (अर्थशास्त्र १.३.७९)

महाभारतांत इतिहासवेद किंवा पुराणवेद असे शब्द पुष्कळ ठिकाणी आलेले आहेत. यावरुन महाभारत ग्रंथ रचनेच्या काली इतिहासपुराण नामक ग्रंथाना महत्व होते हे स्पष्ट दिसतें.

या प्राचीन इतिहासपुराण नामक ग्रंथाचे अवशेष संस्कृत वाङमयांतल्या दुसऱ्या एका भागांत ब्राह्मण ग्रंथातल्या दंतकथा आणि कल्पित गोष्टी या रुपानें उरलेले आहेत. आणि विशेषतः अर्थवाद म्हणजे टीपात्मक भाग या सदराखाली ते येतात असें इ. सीग या पाश्चात्य विद्वानाचें मत आहे. यास्काचार्याच्या निरुक्तावरुन असें दिसून येते की, ऐतिहासिक या नावांच्या वैदिक ग्रंथाचा अर्थ सांगणारा एक पंडित वर्ग होता. हा वर्ग वेदमंत्राचा अर्थ लावण्याच्या कामी इतिहासग्रंथाचा उपयोग करीत असे. शिवाय यास्कार्यानेहि कित्येक मंत्राना लहान लहान कथात्मक भाग जोडून दिले आहेत; त्यांना तो इतिहास किंवा आख्यान असें नांव देतो. या यास्कार्याच्या कथात्मक भागांचें ब्राह्मण ग्रंथाशी बरेंच साद्दश्य आहे. शिवाय अशा प्रकारचे इतिहास गृहदेवता; ॠग्वेदाच्या अनुक्रमणी आणि मध्ययुगांतील देवराज दुर्ग, सद्गुरुशिष्य आणि विशेषतः सायण यांच्या भाष्यग्रंथात आढळतात; कारण या अलीकडल्या काळांत सुध्दां वेदमंत्राचा अर्थ देतांना निदान असेल तर प्रथम द्यावें व नंतर नेहमीचे शाब्दिक विवरण द्यावें, असा प्रचार पडलेला होता. (उदा. निरुक्त १.५ यावरील दुर्गाची टीका)

इ ति हा स  वा ङम य  आ णि  वे दा र्थ. - ब्राह्मणग्रंथामध्यें आणि वेदांवर भाष्य लिहितांना इतिहासाचा उपयोग करणें योग्य आहे काय असा प्रश्न उद्भवतो. या प्रश्नाचे उत्तर जेथे जेथे इतिहासग्रंथाचा उपयोग करण्यांत आलेला आहे तें प्रत्येक स्थळ तपासून दिले पाहिजे. वैदिक मंत्राचें कर्ते आणि इतिहासग्रंथाचे कर्ते यांची दंतकथाविषयक व कल्पितकथाविषयक मतें व कल्पना जरी बहूतांशी सारख्याच होत्या तरी इतिहासपुराण ग्रंथाच्या गाथा आणि वैदिक मंत्राच्या गाथा यांच्यामध्ये बराच महत्वाचा फरक असला पाहिजे. आणि असा महत्वाचा फरक जेथे असेल त्या ठिकाणी वैदिक मंत्राचा अर्थ सांगतांना इतिहासग्रंथांतला उतारा देणे धोक्याचे होय असे इ. सीज याचें मत आहे. उदाहरणार्थ, राजसूयांत होता राजाला जी शुनःशेपाची कथा सांगत असे ती ॠग्वेदाच्या ब्राह्मणांत योग्य रीतीनेंच योजिली आहे. कारण ती राजसूयांत सामान्यतः येणाऱ्या अंजस्डवाचा अर्थवाद म्हणून असे. पण ब्राह्मणकारांनी ही गोष्ट ॠग्वेदाच्या सर्व शुनःशेपीय सूक्तांतून जी ओविलेली आहे, ती निःसंशय चुकीची  म्हणतां येईल, कारण शुनःशेपाला यूपाला बांधून पुढे सोडून दिल्याची कथा ॠग्वेदांत (१ २४.१२-१३; ५२.७) फारच त्रोटक आलेली आहे. तसेच पुरुरवस आणि उर्वशी यांची ब्राह्मणांतून (शतपथ ११.५.१; काठक १.८.१० मैत्रेयी १.६.१२) आलेली कथा अति योग्य आहे असें म्हणतां येईल. कारण अग्निमंथनकाली विशिष्ट समिधांचा उपयोग करण्यावेळचा तो अर्थवाद आहे. पण ही कथा आनंदपर्यवसायी असेल तरच ठीक. कारण ॠग्वेदांत (१.९५) ती शोकपर्यवसायी दिसते. तेव्हा ब्राह्मणकारांनी आपल्या इतिहासाला पाहिजे तेवढाच कथेचा भाग घेऊन बाकीचा टाकून दिला आहे.

शेवटी या ठिकाणी असें सांगितले पाहिजे की, वैदिक सूक्त आणि इतिहास यांच्यामधील संबंध हा अद्यापि वैदिक भाषाशास्त्रामध्ये वादाचा विषय म्हणून शिल्लक आहे. ई.विडिशने असे अनुमान केले आहे की, पुरुरवा आणि उर्वशी हे काव्य (ॠग्वेद १०.९५) मूळ कथानकापासून तुटकलेला पद्यखंड आहे. ओल्डनबर्गने ही कल्पना उचलून आणखी अशी जोड दिली की, अनेक ॠग्वेदसूक्तांतून पद्यभागामध्यें संदर्भाकरितां व मजकूर एकजीव करण्याकरितां गद्यकथानकें निःसंशय घातली असली पाहिजेत. गद्यामध्यें उत्तम उत्तम भागांतून विशेषतः  भाषणें  आणि संवाद असलेल्या ठिकाणी पदें घालण्याची चाल प्राचीन हिंदुस्थानांत रुढ होती. अशा सुंदर मांडणीच्या कथानकाला आख्यान असे नांव ओल्डनबर्ग देतो. उदाहरणार्थ, शुनःशेप-आख्यान, ओल्डनबर्गचे असेंहि म्हणणें आहे की, केवळ पद्यभाग शिकण्याकडे व शिकविण्याकडे लोकांचा ओढा असल्याकारणनें कथानकांचा गर्भ जो गद्यभाग त्यांत कथेकऱ्यांच्या एकामागून एक झालेल्या पिढयांतून पुष्कळशी ढवळाढवळ झाली असावी किंवा तो अजिबात नष्ट झाला. असावा सारांश ओल्डनवर्गच्या मतें ॠग्वेदाच्या आख्यानसूक्तांनी पुढील काळी जोडलेला गद्यसंदर्भ जुन्या परंपरेचा नसून थोडासाच खरा अतएव टाकाऊ असा आहे. हा ओल्डनबर्गचा सिध्दंत पिशेल, गेल्डनर, सीग इत्यादी बहुतेक सर्व पंडितांनां पटला; वरील तीन पंडितांचें इतकेच म्हणणें होतें की, ॠग्वेदाला भारतीय इतिहास परंपरेचे असणारे बरेचसे महत्व विसरुन चालावयाचें नाही.

याच्या उलट सिल्हांलेव्ही असें प्रतिपादितो की, ॠग्वेदांतील बहुतेक संवादसूक्ते काव्याच्या द्दष्टीने इतकी सुंदर व सुबोध आहेत की, त्याना जोडण्याकरितां एखादें कथानक आवश्यक आहे असें नाही. नुसतें वाचूनहि एक प्रकारचा नाटयालोक द्दष्टीपुढें उभा राहतो. म्याक्समुल्लरलाहि ॠग्वेदांतील १.१६५ वें सूक्त हे नाटयमय आहे असे वाटले.

जेव्हर्टेल यानेंहि स्वतंत्रपणे ओल्डनबर्गचें वरील आख्यानमत खोडून काढले. आहे. त्याच्या मते ॠग्वेदांतील सर्व संवादसूक्ते नाटयगीते आहेत; त्यांचे प्रयोग कधी कधी यज्ञोत्सवांतून केले जात. भारतीय नाटयाचें आद्य स्वरुप त्यांत आपल्याला पहावयास मिळते. व्हॉनश्रोडर याच्याहि पुढे जाऊन असें विवरण करतो की, ही सर्व सूक्ते विधिविषयक नाटये होत.

विंटरनीज या दोन्हीमधला मार्ग आक्रमून असा सिध्दांत मांडतो की, ॠग्वेदांतील संवादसूक्ते सर्वच एकसारखी नाहीत. त्यांतील काही लावण्यासारखी असून त्यांतील गोष्टी पद्यात्मक संभाषणात सांगितलेल्या आहेत व कांही ठिकाणीच फक्त गद्यसंदर्भाची जरुरी लागते. कांही गद्यपद्य कथानकांचा गद्य भाग नाहीसा होऊन अवशिष्ट राहिलेली पद्यखंडे आहेत, तर कांही विधिविषयक नाटयांतील कोरस सद्दश भाग म्हणता येईल.

ए. बी. कीथ असा निर्णय देतो की, वरील दोन्ही सिध्दांत खरे मानण्याला लायक पुरावें नाहीत. प्राचीन वैदिक वाङमयात ओल्डनबर्ग म्हणतो त्याप्रमाणे गद्यपद्यात्मक आख्यानाचा कोठेंहि मागमूस नाही. त्याचप्रमाणें यज्ञोत्सवाच्या वेळची उत्तरात्मक नाटयगीतें किंवा विधिविषयक नाटयें यांचाहि पत्ता लागत नाही व हर्टेल आणि व्हॉन श्रोडर यांची अनुमानें बरोबर आहेत, असें धरुन चालले तरी वेदांच्या विधिवाङमयांत त्याचा ठाव ठिकाण नाही याची वाट काय? तेव्हां कीथचें म्हणणे असें की, अद्याप वादाचा निकाल लागण्यासाठी समाधानकारक तोड पुढे आलेली नाही. या विषयावर आतांपर्यंत वर सांगितलेली अनुमानें झाली. पुढचें व शेवटचें गेल्डनरचें अनुमान असे आहे की, ''ब्यालड'' या शब्दाचा गोएटे ज्याप्रमाणे व्यापक अर्थ करतो तसा केल्यास प्रस्तुत सूक्ते त्याखाली येतील. अशा लावण्यांना संयोजक गद्यभागाची जरुरी नसून त्या स्वतःच सुबोध असतात. कारण कवीनें उपयोजिलेला विषय स्वतंत्र त्याच्या डोक्यांतला नसून एखाद्या सुप्रसिध्द कथानकांतील असतो. गेल्डनेरची ही कल्पना फार सुंदर आहे. कारण अस्तित्वांत नसलेल्या संयोजक गद्याची मदत न घेतां सूक्तांचे विवरण तिनें होत. तथापि वरील कल्पनेनें मुख्य प्रश्नाला फारच थोडी मदत झालेली आहे व तो प्रश्न म्हणजे अशा सूक्तांचा अर्थ समजण्याचा होय. कारण ज्यांना प्राचीन कथानकें म्हणजे प्राचीन इतिहास माहीत आहेत, त्यांनांच काय तो अशा ॠग्वेदमंत्राचा अर्थ लागेल.

येथपर्यंत इतिहासाच्या प्राचीन कल्पनेसंबंधानें विवरण झाले. प्राचीनांचा इतिहासापासून कांही बोध व्हावा असा जरी आग्रह असला तरी त्यांची इतिहासाची खरी शास्त्रीय कल्पना पुसट झाली नव्हती हे ''बुध्दपूर्व जगा'' च्या पहिल्या प्रकरणावरुन स्पष्ट होईल. व त्यांत असेंहि दिसून येईल की स्मृती कोणत्याप्रकारची जतन करावी, जगद्विवर्तापासून कोणते नियम निघतात, घडामोडीचा कार्यकारण संबंध काय हे प्राचीन इतिहासकारांचे महत्वाचे विचारविषय होते.

प्राचीनांच्या इतिहासशास्त्रापासून हल्लीच्या इतिहासशास्त्रापर्यंत वैचारिक प्रगति दाखविण्यासाठी आधुनिक इतिहास शास्त्र प्रथम दिले पाहिजे.

अ र्वा ची न  इ ति हा स शा स्त्र  इ ति हा स सा ध नां चा  शो ध  सं ग्र ह व सू चि, स्मारक शोध - गतकालीन माणसांच्या कृत्यांचे व विचारांचे जे अवशेष त्यांस स्मारक म्हणावें. ही स्मारकेच इतिहासाची साधनें आहेत. यांची जागा दुसऱ्या कशानेंहि भरुन काढणे शक्य नाही. जेथे स्मारकांचा अभाव तेथे इतिहासाचाहि अभावच असावयाचा म्हणूनच स्मारकांचा शोध व त्यांचा संग्रह हा इतिहासशास्त्राचा ओनामा आहे. गतकालची स्मारके, मग ते ग्रंथ अगर चिरजीवि उर्फ अंकित लेख असोत, अगर चित्रें असोत, ती हुडकून काढणें ही एक कला आहे. तीस आपण स्मारकशोधन म्हणूं.

स्मा र क सं ग्र ह. - शक्य तितका प्रयत्न करुन सर्व स्मारकांचा संग्रह प्रथम केला पाहिजे. एखादें जरी स्मारक सुटलें तरी इतिहासकाराचें तितकेंच काम लंगडे झाले असे समजावे. जे आपणांस सांपडले असेल ते महत्वाचें आणि सांपडलें नसेल ते कमी महत्वाचे असलें पाहिजे अशी मनाची फसवणूक करुन घेऊ नये. स्मारकांस अलीकडे ‘साधने’ हा शब्द महाराष्ट्रात प्रचारांत आला आहे.

प्र त्य क्ष स्मृ ति सं ग्र ह व स्मा र क सं ग्र हः- ऐतिहासिक महत्वाचा वृत्तांत जर कोणी डोळयांनी पाहिला असला तर त्यांस प्रत्यक्ष भेटून तो लिहून ठेवणे अवश्य आहे. एक दोन पिढयांतील वृत्तांताची साधनें मिळविण्यास ही पध्दति लावता येईल. इतिहासलेखनास घेतलेला काल जर फार प्राचीन असला, आणि त्यासंबंधी दंतकथाहि उपलब्ध नसल्या, तर उपलब्ध होतील तितकी सर्व स्मारकें जमा केली पाहिजेत. होता होईतो असा संग्रह सार्वजनिक असला पाहिजे. हें काम सार्वजनिक संस्थानी केले असलें म्हणजे सर्व स्मारकें एकें ठिकाणी सांपडतील व कोणासहि त्यांचा उपयोग करुन घेतां येईल, व अप्रसिध्द अशा लेखांचा निर्भयपणे आधार देतां येईल.

सू ची क र ण. - ही साधने एकत्र केल्यानंतर शास्त्रीय पध्दतीने त्याची तपशीलवार सूचि करावी. सूची तयार करणें हे काम सोपे नव्हे. साधनाची यादी करावी, तीत प्रत्येक लेखाचे अगर इतिहाससाधनाचें सूचक वर्णन असावें व ते सहज सांपडण्यासारख्या अनुक्रमानें व्यवस्थित रीतीने मांडून ठेवावे हें सूचीकाराचें काम होय. हे काम कसलेल्या सूचीकारांपासूनच व्हावे. सूचीकार बनण्यास योग्य पूर्व तयारी म्हणजे बऱ्याचशा साधनांच्या अंतरंगाची माहिती आगाऊ मिळविणे व लक्षांत ठेवणें साधनांचा देशभर जर व्यवस्थित शोध मोठया प्रमाणावर केला तर थोडक्या अवकाशांत पुष्कळ लेखांचा पत्ता लागेल. 'इतिहास व ऐतिहासिक' (धुळे) याच्या पहिल्याच अंकांत रा. राजवाडे यांनी भारतीय इतिहास संशोधनाचें क्षेत्र किती मोठे आहे, आणि प्रत्येक जिल्ह्यांत काय करतां येण्यासारखें आहे व किमी काम अजून व्हावयाचें आहे याची मोजदाद दिली आहे. हिंदुस्थानसरकारनें प्राचीन वस्तुविषयक पहाणी (आर्किर्आॅलॉजिकल सर्व्हे) केली तिच्या योगानें साधन संशोधनाचें पुष्कळ चांगले कार्य झाले. पण झालेले कार्य, आपले पुढे काम राहिले आहे किती, याचीच साक्ष देईल. साधनसंग्रह होऊन सूचीकारानें निरनिराळया द्दष्टीने साधनाची निरनिराळी वर्गीकरणे करावयास हवीत. साहित्य जमा झाले आणि तें उपयोग करण्याची पूर्वतयारी झाली म्हणजे इतिहाससंशोधनशास्त्रांतील अभ्यासकास आपलें कार्यक्षेत्र ठरवून टाकणें सोपें पडेल.

स ह का री शा स्त्रें. - एकदां विषय हाती घेतला म्हणजे मग एखाद्या संशोधकाने पूर्व साहित्याची जुळवाजुळव केली असली तर ती तपासून पहाणें हे पहिले काम आहे. जर चिकित्सक पध्दतीनें जुळवाजुळव झाली नसली तर ती अभ्यासकांने स्वतः केली पाहिजे. जुळवाजुळव करण्याचें काम इतकें कठीण आहे की ते चोख रीतीनें करण्यास इतिहासोपयोगी  विचारपध्दति व इतिहासविषयाच्या क्षेत्राची कल्पना या सद्रोष असतां कामा नयेत. इतिहास लेखनाला उपयोगी पडणारी ज्ञानें कोणती याचा विचार करुं.

(१)प्रथमतः इतिहासकारास प्राचीन लिपिविद्या चांगली आली पाहिजे व चिरजीवि लिखाणे (शिलालेख व ताम्रपट) वाचण्याची संवय लागली पाहिजें. प्राचीन लिपीतील लेख व शिलालेख ताम्रपट इ. चिंरजीवि लिखाणें प्राचीन लिपिशास्त्राच्या साहाय्यानें वाचतां येऊं लागल्यावर जुन्या भाषांचा उत्तम परिचय अवश्य आहे. नाहीतर लिखाणांचा अर्थ समजणार नाही किंवा त्यांत ढोबळ  चुका तरी होतील. उदाहरणार्थ ''कर्तया कुंतल शातकर्णिः शातवाहनो महादेवी मलयवती जघान'' हें  वात्स्यायनाच्या कामसूत्रांतील विधान घ्या. डॉ. सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी यांतील ''कर्तरी'' शब्दाचा कातरी असा अर्थ केला आहे. त्यांतील चूक रा. राजवाडे यांनी दाखविली आहे. पुष्कळ लिखाणे धड संस्कृतहि नाहींत, व प्राकृतहि नाहीत. भाषांच्या अपभ्रष्ट स्वरुपांत लिहिली आहेत, व त्यांतहि अनेक प्रकारच्या लिपी आढळतात. ती वाचण्यास लिपीच्या निरनिराळया काळीं झालेल्या फेरबदलाची माहिती म्हणजे भाषाविषयक, लिपिविषयक, ऐतिहासिक ज्ञान उर्फ भाषाशास्त्राचें नियम हे अवगत पाहिजेत. कारण जुन्या लेखांतल्या शब्दांचा सरळ अर्थ लावण्याची पूर्व तयारी या दोन शास्त्रांच्या अभ्यासानें होते. लिखाणें वाचतां जरी आली तरी त्यांत लिहिलेल्या मजकूराची सत्यता तोलून पहाणें अवश्य आहे, म्हणून लिखाणांची उत्पत्ति कशी झाली व ती अस्तित्वांत आणणारावर कितीसा विश्वास ठेवणे योग्य आहे, हे ठरवावयास हवे. हें न ठरविल्यामुळे घोटाळे होतात उदाहरणार्थ रावबहादुर वाड यांनी जी रोजनिशी प्रसिध्द केली तींत तिच्या उत्पत्तिसंबंधाने चौकशी करावयास दुर्लक्ष करुन तिच्या विश्वसनीयतेसंबधानें स्वतःस व वाचकांस फसविलें आणि त्यामुळें ते रा.राजवाडे यांच्या प्रखरटीकेस [रा.खं.८ उ.प. प्रस्तावना] पात्र झाले.

लिखाणांची सत्यता ठरविण्यास विचारशक्तीस पुराव्याची तपासणी करण्याची तालीम मिळाली असली पाहिजे व पुष्कळशी माहितीहि पाहिजे. कांकी माहीती सूचक होते. पुष्कळशी माहिती नसली तर आजच्या पुराव्यावरुन प्राचीन काळासंबधानें अनेक संभवनीय गोष्टीची कल्पना करुन, त्यानंतर त्यांपैकी प्रत्येकीच्या शक्याशक्यतेविषयी विचार करतां येतो, तसें करण्यास मुद्दे मनांतच येणार नाहीत, मागे झालेल्या संशोधनासंबंधी सर्व शोध पुराव्यासकट ठाऊक हवेत. निरनिराळया काळी समाजाच्या शासनसंस्थेत व चालीरीतींत कसकसे फरक होत गेले, यांची खडान्खडा माहिती हवी, व पूर्वीच्या संशोधनांनी ज्या लिखाणांवरुन आपली पुस्तकें लिहिली, त्या लिखाणांचे परीक्षण करण्यांतच प्रथम कौशल्य प्राप्त करावयास हवें.

या मानसिक प्रक्रियेतून इतिहाससंशोधक गेला तरच त्याला खरी अगर बनावट लिखाणें तात्काळ शोधून काढण्याचें काम करतां येईल.

अभ्यासकानें संशोधनकविषयक उपयुक्त अनुभवाचा संचय झाला आहे त्यांशी परिचय करुन घेतला पाहिजे. पूर्वी या विषयांत परिश्रम होऊन परीक्षणाचे जे सूक्ष्म नियम ठरवून टाकले गेले आहेत व त्यांपासून अवश्यमेव निघणारे निष्कर्षहि नमूद करुन ठेवले गेले आहेत, त्यांशी परिचय असल्याशिवाय कसे चालणार या नियमसंग्रहास ''गतलेखबोधशास्त्र'' (डिप्लोमॅटिक्स) म्हणतात. लिखाणें किंवा शिलालेख यांचे वाचन भाषाशास्त्र, म्हणजे प्राचीन भाषेला आधुनिक भाषेचें स्वरुप येईपर्यंत तिची होत गेलेली स्थित्यंतरें, बक्षिसपत्रें, परवानें, सनदा इत्यादिकांचा अर्थ लावण्याकरितां तयार झालेले लेखबोधशास्त्र, या सर्वांचा इतिहासकारास प्रथम परिचय पाहिजे.

(३) कालमापन विद्या - इतिहासकारास निरनिराळया शकांचा इतिहास आणि त्या त्या शकाप्रमाणें तिथिवार काढतां येईल इतकें तरी ज्योतिषाचें ज्ञान असणें अवश्य आहे. यानंतर (४) वाङमयाच्या इतिहासाची माहिती देखील अवश्य आहे. तसेंच (५) पुराणवस्तु संशोधन व त्यालाच आनुषंगिक असें (६) वास्तुसौंदर्यशास्त्र (७) शिल्पकला, (८) चित्रकला, (९) शस्त्रे, (१०) पोषाक, (११) भांडी, (१२) नाणी, (१३) पदकें (१४) कुलचिन्हें, यांची कालानुक्रमानें माहिती अवश्य आहे.

परंतु वर सांगितलेल्या सर्व ज्ञानास ''सहकारी शास्त्रे'' हें नाव बरोबर लागू पडत नाही. कारण त्यांत असें एकहि शास्त्र नाही की जें प्रत्येक इतिहाससंशोधकास सारखेंच उपयोगी पडेल. इतिहाससंशोधकानें आपलें कार्यक्षेत्र रेखले म्हणजे त्यास वरच्यापैकी कोणते ज्ञान आपणांस पूर्णपणें अवगत हवें, कोणते साधारणपणें ठाऊक हवें व कोणतें पुस्तकांच्या द्वारानें वेळेवर मिविळता येईल हे ठरविण्यास सोपे जाईल. कोणत्या ज्ञानाची कोठें किती जरुर लागेल याविषयी ठराविक नियम घालून देतां येणार नाहीत.

तथापि एवढे मात्र निर्विवाद आहे की नवशिक्या इतिहासंशोधकाची बुध्दि सुसंस्कृत असली पाहिजे व लिखाणांचा अर्थ समजण्यास व त्यांचे सूक्ष्म परीक्षण करण्यास लागणारें ज्ञानहि त्यानें संपादन केले असले पाहिजे. इतिहाससंबध्द विषयांचे अज्ञान त्यास अगदी अक्षम्य आहे. कारण ज्यांनी आपलें बरेंच आयुष्य लिखाणें वाचून त्यांचा अर्थ लावण्यांत घालविले असल्यामुळें स्वानुभवानें दुसऱ्यास न देतां येण्यासारखे ज्ञान परिश्रमपूर्वक प्राप्त करुन घेतलें असतें, त्यांस कोणत्याहि नव्या लिखाणांचा अर्थ इतरांपेक्षा फारच जलद लावतां येत असला तरी देखील त्यांच्या हातून चुका होतातच. कित्येक लोकांच्या द्दष्टीतून महत्वाची लिखाणें वगळली जातात. तर कित्येक भाषाशास्त्रज्ञांच्या लाडक्या कल्पना त्यांच्या संशोधनात शिरतात. म्हणून प्राचीन इतिहाससंशोधकास आपली पूर्व तयारी जितकी कसून करावी लागेल तितकी अर्वाचीन इतिहासाच्या अभ्यासकास करावी लागणार नाही. अलीकडे संशोधनविषयक त्याच प्रश्नाचा अभ्यास निरनिराळया देशांतील तज्ज्ञ पंडित करुं लागल्यामुळे इंग्लिश, जर्मन, इटालियन व फ्रेंच या प्रमुख भाषाचें ज्ञान मात्र प्रत्येक इतिहाससंशोधकास अवश्यक होत चाललें आहे.

ऐ ति हा सि क ज्ञा ना चे सा मा न्य स्व रु प. - लिखाणे ही पूर्वी घडलेल्या हकीकतीचे अवशेष आहेत. जुंन्या हकीकती दोन प्रकारें जाणतां येतात. त्या घडत असतांना ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिले असेल त्यांच्या कथनानें किंवा त्या हकीकतींच्या अवशेषांच्या अभ्यासानें ऐतिहासिक वृत्तांताचे ज्ञान नेहमी अप्रत्यक्ष पुराव्यानेंच होत असल्यामुळे, ''ऐतिहासिक भूशास्त्र'' खेरीज करुन इतर भौतिक शास्त्रांत स्वीकारलेली प्रत्यक्ष निरिक्षणात्मक पध्दति इतिहासांत उपयोगी पडत नाही.

प्राचीन वृत्तान्तांची स्मारके दोन प्रकारची असतात. लेण्याप्रमाणे जुन्या हकीकतीचे वास्तुविषयक अवशेष, व वर्णनांच्या किंवा बखरीच्या रुपांत असलेले लेखात्मक अवशेष, या दोनप्रकारापैकी पहिल्या प्रकारच्या अवशेषावरुन ऐतिहासिक सत्य शोधून काढणे कांही अशी सोपे असतें. कारण जगांतील घडामोडी व कार्यक्रम या विषयीचें नियम ठाऊक असले म्हणजे इमारती वगैरचें अस्तित्व प्रयोजन स्पष्ट करता येते. परंतु लिखाणामध्यें दिलेल्या माहितीच्या सत्यासत्यतेविषयी प्रश्न उद्भुत होतो, याशिवाय लिखाणाच्या उत्पादकाच्या मनावर झालेल्या तात्कालिक परिणामांची नोंद तें नसून तें त्या परिणामाचें फक्त व्यंजक चिन्ह असल्यामुळें त्याचा अर्थ लावतांना लेखकाच्या मनाची परिस्थिती व धोरण ही सर्व उपलब्ध असलेल्या फारच थोडक्या साहित्यापासून काढावी लागतात, व म्हणून हे सांकेतिक अवशेष ऐतिहासिक सत्य चाळून काढण्यास मूर्त अवशेषापेक्षा बरेच कठीण असतात. या अवशेषाचा व त्यांत उद्दोशिलेल्या ऐतिहासिक वृत्तांचा बिनचुक संबंध ताडण्याकरिता त्यांचा मूळ कर्ता कोणकोणत्या मानसिक परिस्थितीतून गेला होता हे आपल्या कल्पना शक्तीनें काढून त्यावरुन अनुमानाच्या साहाय्यानें मूळ वृत्तान्तापर्यंत उडी घ्यावयास हवी. या प्रकारच्या अडचणीमुळे लिखाणांचा अर्थ लावणें हा इतिहासंशोधन शास्त्रांतील महत्वाचा भाग झाला आहे.

 बा ह्य चि कि त्सा व अं त रं ग प री क्ष ण. -एखादा जुना ग्रंथ हाती घेतला म्हणजे (१) तो निर्माण झाल्यापासून आतांपर्यत त्याच्या स्वरुपांत काय फरक झाला, व त्यांत बदल झाला असल्यास त्याचें मूळ स्वरुप काय होतें, हें ठरवून त्या पत्रास मूळ स्वरुपांत आणावयास हवें व (२) तो निर्माण कसा झाला हेंहि शोधावयास हवे. या प्रक्रियेस “बाह्य चिकित्सा” म्हणतात. “अंतरंगपरीक्षण” ही ''बाह्यचिकित्सेच्या पुढची पायदी आहे. लेखाचा कर्ता कोणकोणत्या मानसिक परिस्थितीतून खात्रीने गेला असला पाहिजे हें मानसशास्त्राच्या व्यावहारिक अनुभवानें ठरवावें. शिवाय त्या लेखावरुन (१) लिहिणाराचा उद्देश काय होता? (२) लिहिलेल्या हकीकतीवर त्याचा विश्वास होता काय?  आणि (३) त्यानें ज्या गोष्टीवर विश्वास ठेवला त्यांवर विश्वास ठेवणें त्यास योग्य होते काय? या तीन प्रश्नांची उत्तरे मिळवावयाची व त्या लिखाणाच्या मूळ लेखकाच्या प्रत्यक्ष ज्ञानाची मीमांसा करावयाची, हें अंतरंग परीक्षणाचें प्रयोजन आहे. लेखकांचें अवलोकन जितकें सूक्ष्म व तंतोतंत असेल त्यावरच त्याचें ऐतिहासिक द्दष्टया महत्व अवलंबून राहते. अंतरंगपरिक्षण करणें म्हणजे एक तऱ्हेने अन्यावलोकन मूलक दोष काढून टाकणे होय.

प रा व लं बी अ व लो क ना मु ळे उ त्प न्न हो णा ऱ्या अ ड च णी - रसायनशास्त्रांतील संशोधकास ज्या प्रमाणें आपल्या विषयांतील चमत्कार प्रत्यक्ष पाहतां येतात त्याप्रमाणें इतिहाससंशोधकास येत नाहीत. ज्या लिखाणांचा उपयोग करावयाचा त्यांचे कर्ते बहुधां सूक्ष्म परीक्षक किंवा निरीक्षक नसल्यामुळें, लेखकाच्या (१) योग्यतेबद्दल (२) परिस्थितीबद्दल व (३) सत्यप्रेमाबद्दल म्हणजे लेखक अडाणी होता काय, सत्य ज्ञात होण्यास अशक्य अशा काली अगर स्थली होता काय, आणि सत्य लिहिण्याचा त्याचा उद्देश होता काय याविषयी यथायोग्य कल्पना बसवून लिखाणांतील ग्राह्य भाग कोणता व त्याज्य कोणता हें इतिहास संशोधकास ठरवावें लागतें. भौतिक शास्त्रांमध्यें पध्दतशीर अवलोकन करुन तें काळजीपूर्वक लिहून ठेवलें जात असल्या कारणानें त्यांतील संशोधकांस ज्याप्रमाणें इतर मंडळीच्या सामुग्रीचा प्रत्यक्ष निरीक्षणाऐवजी उपयोग करितां येतो, त्याप्रमाणें इतिहासकारास करितां येत नाही, प्रयोगशाळा झाडणाऱ्या माणसाकडून रसायनसंशोधकास जी माहिती मिळणें शक्य आहे. तितकीच व त्याच किंमतीची माहिती इतिहासकारास उपलब्ध लिखाणांपासून मिळते. व याच उकिरडयांतून त्याला आपली रत्नें निवडून काढावी लागतात म्हणून इतिहाससंशोधकानें लिखाणांतून सत्याची निवड फारच काळजीपूर्वक केली पाहिजे.

चिकित्सकपणा, शंकेखोरपणा व परीक्षणाची सूक्ष्मता या गोष्टी मनुष्यास स्वभावतःच नको असतात. दुसरा जें सांगेल तें ऐकून स्वतःच्या चिकित्सकपणानें त्यास ताडून न पाहतां प्रसंगविशेषी जाणून किंवा न जाणून त्यास तिखटमीठ लावून, आपणच ती गोष्ट स्वतः प्रत्यक्ष पाहिली आहे असें स्वरुप देऊन ते पसरावयाचें असें अनेक लोक करितात. आपणच स्वतः रोज कर्णोपकर्णी ऐकलेल्या कितीतरी गोष्टीच्या सत्यासत्यतेचा विचार न करितां त्या खऱ्या मानीत नाही काय? म्हणून इतिहाससंशोधकाने प्रथम आपल्या मनाची ही विश्वास ठेवण्याची प्रवृत्ति निर्दयपणाची मोडून चिकित्सक झालें पाहिजे. एखादा लेख ज्या व्यक्तीचा म्हणून समजला जातो त्या व्यक्तीचा तो असला तरी जशाचा तसाच तो आपल्या हाती आला असेल काय, ज्याचा तो लेख म्हटविला जातो त्यानेंच तो लिहिला असेल काय, की त्याच्या नांवाने दुसऱ्यानें कोणी दडपून दिला, त्या लेखांत केलेली विधानें बरोबर आहेत काय, त्या लेखकास त्या विधानासंबधी सत्य माहीत असणें शक्य होते काय, त्यास सत्य ठाऊक असलें तरी सांगण्याची त्याची इच्छा होती काय, पक्षवृत्तीमुळें किंवा आत्महितार्थ तो सांगत आहे काय? या सर्व गोष्टीचा विचार करुन विश्वास ठेवण्याच्या प्रवृत्तीस आळा घातला पाहिजे.

मू ल पा ठ सं शो ध न. - लिखाणास आद्यलेखकाच्या प्रत्यक्षावलोकनास नोंदीचे स्वरुप देण्याकरितां प्रथम त्या लिखाणाचें मूलस्वरुप काय होतें हे शोधून काढलें पाहिजे. कालिदास, भवभूति इत्यादी प्राचीन कवीचे ग्रंथ किंवा दुसरे कोणतेंहि जुनें लिखाण घेतलें तर आपणांस असें आढळून येईल की हे लेख मूल हस्तलिखित प्रतीच्या नकला करुन व या नकलांच्याहि पुढे वारंवार नकला करीत जाऊन आजपावेतों जतन करुन ठेवतां आले. जी लिखाणें शतकेंच्या शतकें निरनिराळया नकला करणारांकडून हातोहात लिहिली गेली त्यांत व लिखाणकर्त्याच्या मूळ हस्तलिखितांत फरक पडल्यास नवल तें काय? कारण आज खुद्द लेखकाची हस्तलिखित प्रत उपलब्ध असली तरी देखील तिजवरुन छापलेला ग्रंथ तिच्या बरहुकूम कधीच होत नाही. म्हणून कोणत्याहि लिखाणाचा उपयोग करुन घेण्यापूर्वी, त्याच्या निरनिराळया प्रतीचा अभ्यास करून त्याला त्याचें मूलस्वरुप आणून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे केलें नाही तर नकला करणाऱ्यांच्या चुकांमुळें किंवा लबाडीमुळे लिखाणाचा अर्थ विपर्यास होऊन मूळ लेखकाचा उद्देश आपल्या ध्यानांत येणार नाही.

पाठशुध्दीकरितां हाती घेतलेले लिखाण आद्यलेखकाची हस्तलिखित प्रतच असली तर मग कांहीच भानगड नसते. अशा वेळी मूळ लिखाण जसेच्या तसेच लिहून काढणें एवढेंच काय तें आपलें काम असतें. परंतु कसलेल्या संशोधकांच्या हातून देखील बिनचूक नक्कल होत नाही हे लक्षांत ठेऊन नक्कल करण्याचें काम मोठया दक्षतेनें केले पाहिजे.

मूळ हरवले असून त्याच्या प्रती उपलब्ध असल्या तर त्यांचे पाठसंशोधन कसें करावे हे पाहण्यापूर्वी पाठांत फरक होण्याची कारणें काय असतात याचा विचार करुं. [अ] कित्येक नकला करणारें कांही स्वार्थमूलक उद्देश  साधण्याकरितां लबाडीने मूळ पाठ बदलतात. [आ] पुष्कळ वेळां हे पाठभेद नक्कल करणाऱ्याच्या बुध्दिदोषांमुळे होत असतात. ऐतिहासिक द्दष्टया शुध्द पाठ म्हणजे व्याकरणद्दष्टया शुध्द पाठ नव्हे. कोणचीहि पत्रें प्रसिध्द करतांना संपादकाकडून व्याकरणद्दष्टया शुध्दिकरण म्हणजे ऐतिहासिक द्दष्टया अशुध्दिकरण होतें. अर्धवट शिकलेल्या लोकांकडे नक्कल करण्याची पाळी आली म्हणजे ते अपरिचित दिसणारा पाठ चुकीचा समजून त्याची दुरुस्ती करतात, किंवा एकनाथाने ज्ञानेश्वरीसंबंधात केले त्याप्रमाणें कांही लेखक जुन्या लेखांस प्रचलित भाषेचें स्वरुप देण्याकरितां त्यांचे मूळ पाठ बिघडवितात [इ] कधी कधी मूळ बिनचुक न वाचल्यामुळें किंवा न ऐकल्यामुळें आकस्मिक चुका घडून येतात यांपैकी लबाडीनें व बुध्दिदोषानें झालेले पाठभेद दुरुस्त करणें व कित्येक वेळा तर शोधून काढणें देखील फार कठिण असतें. ओळीच्या ओळीच गळाल्या असल्या तर ती आकस्मिक चूक सुधारणें देखील आटोक्याबाहेरचें असते परंतु आकस्मिक चुकांची साधारण उदाहरणें म्हटली म्हणजे अर्थाचा, शब्दाचा किंवा अक्षराचा घोंटाळा होणें, मागचे शब्द पुढें किंवा मागची अक्षरें पुढे लिहिली जाणें, अक्षरांची किंवा शब्दांची द्विरुक्ति होणें, जो शब्द दोनदां लिहावयाचा तो एकदांच लिहिणे, विरामाच्या चुका करणें ही किंवा असल्याच प्रकारची दुसरी असतात. या चुका दुरुस्त करण्याकरितां त्या त्या भाषांचे व लिपीचें ज्ञान आणि अर्थात, अक्षरांत व शब्दांत कसकसें घोंटाळे होतात व त्याचप्रमाणें विशिष्ट काळांतील विशिष्ट वर्गाचें लेखक प्रती तयार करतांना कोणकोणत्या चुका करीत असत या गोष्टी अवगत असल्या पाहिजे आज ''आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही'' अशी स्थिति आहे. कांकी, भारतीय पाठसंशोधकांनी आपले अनुभव लिहून ठेवले नाहीत व तद्विषयक ज्ञानसंचय झाला नाही. लिखाणांची पाठशुध्दि करीत असतांना दुसरी एक गोष्ट लक्षांत ठेवावी की, कधी कधी ज्यांचा सहज अर्थ लागू शकतो अशा पाठांविषयी देखील आपणांस शंका येते किंवा लिखाणांतील दुर्बोध पाठांच्या ऐवजी एखादा धाडसाचा पाठ घालण्याचा मोह होतो; म्हणून प्रत्येक वेळी मूळांतील पाठ नमूद करण्यास कधीहि विसरुं नये.

मूळ हस्तलिखित हरवले असून त्याच्या अनेक परस्परभिन्न प्रती उपलब्ध असल्यास त्यांवरुन लिखाण कसें तयार करावयाचें ते पाहूं. अशा स्थितीत जी प्रत प्रथम हाती लागेल तिच्या अनुरोधानें चालणें तर वाईटच, परंतु सर्वांत जुन्या प्रतीला विश्वसनीय मागणे देखील तितकेंच अविचाराचें आहे हे विसरतां कामा नये. कारण जूनी प्रत मूळ हस्तलिखील हरवल्यामुळे त्याच्या नकलेवरुन केली असून नवी प्रत मात्र तें सापडल्यामुळे खास त्यावरुनच केली नसेल कशावरुन? त्याचप्रमाणे सर्व उपलब्ध प्रतीची योग्यता सारखीच नसल्याकारणानें, अधिक प्रतीत सांपडणारा पाठ खरा मानणें देखील सर्वथैव चुकीचे आहे. उपलब्ध असलेल्या वीस प्रतीपैकी एकोणवीस जर बाकी राहिलेल्या विसाव्या प्रतीवरुनच उतरविलेल्या असल्या तर त्या एकोणवीसहि प्रतींस ऐतिहासिक द्दष्टया कांहीच महत्व नाही. म्हणून स्वतंत्र प्रती शोधून काढण्याकरितां सारख्या चुका कोणत्या प्रतीत झाल्या आहेत हे पहावे. या सर्व प्रती तशाच चुका असणाऱ्या दुसऱ्या एका प्रतीवरुन केलेल्या असल्या पाहिजेत; यास्तव संशोधकानें ती अनेक प्रतीस मूळ झालेली नकलेची प्रत ठेऊन तिजवरुन केलेल्या सर्व प्रती टाकून द्याव्यात. अशा प्रकारे छाननी केल्यावर आपल्याजवळ मूळ हस्तलिखिताच्या प्रती किंवा हरवलेल्या प्रतींवरुन तयार केलेल्या दुय्यम प्रकारच्या प्रतीच शिल्लक राहतील. या दुय्यम प्रकारच्या प्रतींपैकी कोणत्या एकाच वर्गांतील आहेत हे ठरविण्याकरिता पुन्हां आपणांस चुकांची तुलना करण्याच्या पध्दतीचाच अवलंब केला पाहिजे. या रीतीने सर्व प्रतीचा वंशवृक्ष तयार केला असता आपणांस त्यांचे सापेक्ष महत्व कळून येईल, व निरनिराळया वर्गांतील प्रतीच्या पाठांची तुलना करुन मूळ पाठ काढतां येईल. त्यांच्या पाठांमध्ये फरक असल्यास त्यांपैकी कोणता चांगला हें विचार करुन ठरवावें, व त्या सर्वांवरुन एखादा विचित्रच पाठ निघत असला तर तेथे कोणता पाठ जममो हे अंदाजानें काढून तो घाला. मूळ हस्तलिखितावरुन केलेल्या जितक्या स्वतंत्र प्रती उपलब्ध असतील तितकें हें काम बरेंच कठीण असल्यामुळे त्यांत चुका होण्याचा पुष्कळ संभव असतो. म्हणून पाठसंशोधकानें निरनिराळया प्रकारचें सर्व पाठ आपल्या टिपणांत देत जावे, म्हणजे एखाद्या वेळी वाचकांकडून चुकीची दुरुस्ती होऊं शकते.

अशा  प्रकारच्या पाठशोधनानें प्रत्येक ठिकाणी उत्कृष्ट पाठ मिळाला नाही तरी अपभ्रष्ट पाठ निराळे काढून लिखाणांतील कोणता भाग संशयास्पद आहे हे ठरविता येतें. या योगानें नवीन अशी काहीच माहिती मिळविता येणार नाही हें उघड आहे. मूळ हस्तलिखित सुरक्षित असल्यास या खटाटोपाची गरजच पडणार नाही. परंतु ते उपलब्ध नसल्यास मात्र याशिवाय दुसरा तरणोपाय नसतो.

पाठविषयक संशोधनाकडे आपल्या देशांत पध्दतशीर लक्ष लागण्यास सुरुवात अलीकडेच झाली आहे. हस्तलिखितांचा शोध करुन मूळ पाठ शोधण्याकडे होणारा आपल्याकडील मोठा प्रयत्न म्हणजे महाभारतासंबंधानें होय. पाठसंशोधनांसंबधानें कार्य झालें आहे हे महत्वाच्या ग्रंथावर जेव्हां लेख येतील तेव्हां त्यांत स्पष्ट केलेले असेल.

क र्तृ त्व सं शो ध न. - लिखाणाचें आद्य स्वरुप समजल्यानंतर त्याचें अंतरंगपरिक्षण ही पुढची पायरी होय. लिखांणातील हकीकत कितपत विश्वसनीय आहे हे ठरविण्याकरितां, त्यांतील वृत्तांत (१) लेखकाच्या आयुष्यांतच घडला होता किंवा नाही. (२) त्यांचे वसतिस्थान जेथें ती गोष्ट घडली त्या स्थळांपासून फार लांब तर नव्हतें, व (३) लेखकास त्या गोष्टीचें निरिक्षण करण्यास कांही अडचणी तर नव्हत्या ना; या तीन गोष्टीसंबधी माहिती असणें अवश्य आहे. यावरुन हे स्पष्ट होते. की लिखाणाचा कर्ता ठाऊक नसल्यास तें अगदी निरुपयोगी होईल. म्हणून पाठशोधनानंतर लिखाणाच्या कर्त्याचा, स्थळाचा व काळाचा शोध केला पाहिजे. जुन्या लिखाणांवर पुष्कळ वेळां कर्त्याचें नावं दिलेले नसते, किंवा असलें तरी ते खरे असण्याचा संभव नसतो. कारण टाकाऊ पुस्तकास महत्व आणण्याकरिता त्यावर प्रसिध्द ग्रंथकाराचें नांव घालतात. आपल्या अनेक स्मृतीची कथा याच प्रकारची आहे. एखाद्या व्यक्तीची कीर्ति वाढविण्यासाठी उत्तम ग्रंथ तिच्या नांवानें प्रसिध्द करणें, या व यासारख्याच दुसऱ्या कित्येक उद्देशाने प्रेरित होऊन खऱ्या लेखकाशिवाया दुसऱ्या कोणाचें तरी नांव लिखाणावर घातलेले असते. म्हणून लिखाणावर कर्त्याचें नांव असो किंवा नसो तत्संबधी शंका येण्यास जागा असल्यास त्याचा वास्तविक लेखक कोण होता हें अगोदर निश्चित केलें पाहिजे.

परंतु ज्या लिखाणांचे कर्ते खात्रीपूर्वक ठाऊक असतील त्यांविषयीहि शंका काढून कर्तृत्वशोधनपध्दतीचा दुरुपयोग कसा करावा हें कर्तृत्वशोधनानें कळत नसून त्या योगानें खोटी माहिती देऊन फसविणारे अविश्वसनीय लेखक काय ते निवडून काढतां येतात. पाठशोधनाप्रमाणेंच कर्तृत्वशोधन हें इतिहासकाराचें मुख्य कार्य नसून ती त्याची ध्येयसंपादनाची प्रथम पायरी व अवश्य साधन मात्र आहे.

क र्तृ त्व सं शो ध ना चें ए क उ दा ह रण. - 'ज्योतिर्विदाभरण' नामक पुस्तकाचा कर्ता कालिदास नामक ज्योतिषी आपल्या पुस्तकाच्या २२ वया अध्यायांत आपण विक्रमाचे समकालीन आहो व विक्रमाच्या नऊ रत्नांतील कविकुलशिरोमणि कालिदास ते आपणच असें दाखविण्याचा प्रयत्न करितो. (अध्याय २२ श्लोक, ८,९, १२, १३, १७, १९, २०, हा ग्रंथ कलियुग संवत् ३०६८ (वि. सं २४) मध्यें रचिला. (अध्याय २२, श्लोक २१) असें या ग्रंथात म्हटलें आहे. परंतु शालिवाहन शकांतून ४४५ वजा करुन बाकीस ६० नें भागिले की अयनांश निघतात. असें यांत म्हटलें असल्यामुळे त्यानें दिलेला काल चूक ठरतो. (१९।१८) ऐद्रयोगाचा तिसरा अंश गत असतां रविचंद्र क्रांतिसाम्य होतें असें यांत आहे. यावरुन त्याचा काल सुमारें इ.स.१२४२ ठरतो, (शं.बा. दीक्षितकृत भारतीय ज्योतिःशास्त्र पा. ४७६) [प्राचीन लिपिमाला पान १६९ (द्वितीयावृत्ति)] असें काढले आहे.

का ल शो ध न. - ग्रंथकर्त्याचा निश्चय करण्याकरितां लिखाणांतील मजकुराचें पृथःकरण करुन (१) त्यांतील अक्षर, (२) शब्दांची रुपें, व सरकारी कागद असल्यास (३) मायन्याची पध्दति, कोणत्या काळांतील आहे हें पहावें, ह्यांत वर्णन केलेल्या कांही गोष्टीचा काळ कर्त्याच्या हाती न पडलेल्या लिखाणांवरुन आपणांस समजला असल्यास (४) कर्त्यानें आपल्या लिखाणांत उल्लेखिलेल्या गोष्टीपैकी सर्वांत अलीकडची गोष्ट कोणती आहे व (५) तिच्यानंतर लागलीच घडलेल्या कोणत्या गोष्टीचा त्यानें उल्लेख करावयास हवा असून तो केला नाही. हे पाहून आपणांस ते लिखाण केव्हां लिहिले गेले हे स्थूलमानानें काढतां येईल.

लिखाणांतील मतांचे काळजीपूर्वक परिक्षण केले असतां कर्त्याचा स्वभाव, परिस्थिती, समाजांतील दर्जा इत्यादी गोष्टीसंबंधी अनुमान बांधता येईल. कित्येक वेळा ज्यांचे लेखक आपणास माहीत आहेत अशा लिखाणांतील वाक्यांची परीक्षणास घेतलेल्या लिखाणांतील वाक्यांशी तुलना केली असतां बनावट लिखाण तात्काळ ओळखून काढतां येते. व या परीक्षित लिखाणांमध्ये आलेल्या आपल्या लिखाणांतील अवतरणांवरुन तत्संबंधी व त्याच्या कर्त्यासंबंधी उल्लेखांवरुन व कधी कधी तर अशा उल्लेखाच्या अभावावरुन आपली अनुमानें बरोबर आहेत किंवा नाही हें ठरविता येते.

क र्तृ त्व शो ध नां त उ त्त र का ली न क्षे पां चे अ व ग म न. - कित्येक वेळां असें घडून येतें की, लिखाणांतील वाक्यांच्या अर्थपूर्णतेकरितां, किंवा त्याच्या भाषेस सौंदर्य आणण्यासाठी किंवा विशिष्ट भागावर जोर देण्यास्तव, इतरांकडून मुळामध्यें कांही नवीन भाग घालण्यांत येतो, तर कधी कधी पुराणांसारख्या कांही लिखाणांतील हकीकत निरनिराळया कर्त्यांकडून पुढे चालविण्यांत येते. अशा ठिकाणी या प्रक्षिप्त भागांचें व जोड पुरवण्यांचे कर्तृत्व मूळ लिखाणाच्या कर्त्यावरच न लादण्याची खबरदारी घेतली पाहिजे. लिखाणांतील मूळपाठ शोधून काढीत असतांनाच यांपैकी बरेचसे प्रक्षिप्त भाग व जोड पुरवण्या उघडकीस येतात. पण उपलब्ध असलेल्या सर्व प्रती एखाद्या प्रक्षेपित प्रती वरुनच केल्या असल्या तर मात्र, लिखाणामध्यें अथपासून इतिपावेतो भाषासाद्दश्य, विचारसाद्दश्य, आणि परस्परविरोधी विधानांचा व असंबध्द कल्पनांचा अभाव, या गोष्टी आहेत किंवा नाहीत याचा शोध करुन प्रक्षिप्त भाग निवडून काढले पाहिजेत.

क र्तृ त्व आ णि चौ र्य यां चें पृ थ क्क र ण. - एखाद्या लिखाणाचा कर्ता, स्थळ व काळ यांसंबधी माहिती मिळविली म्हणजे कर्तृत्वविषयक सर्व शोध पूर्ण होत नाही. प्राचीन काळच्या ग्रंथकर्त्यांनां मूळ पुस्तकाचा नामनिर्देंशहि न करिता दुसऱ्याच्या ग्रंथांतील माहिती चोरुन घेऊन आपल्या लेखांत देण्याची संवय होती म्हणून लिखाणाच्या कर्त्यानें कोणकोणत्या पुस्तकाचा उपयोग केला होता  हे याच ठिकाणी निश्चित करणें अवश्य आहे. कारण 'अ' व 'ब' या दोन लिखाणांत 'क' तून कांही माहिती घेतील असल्यास या तीनहि लिखाणांतील विधानाचा कर्ता एकच असल्यामुळें तदंतर्गत विधानें तीन ठिकाणी सांपडली एवढयाच कारणावरुन विश्वसनीय मानली तर ते साफ चुकीचें होईल. याकरिता एकाच गोष्टीची दोन लिखाणांतील वर्णने जशीच्या तशीच व सारख्याच भाषेत असली तर त्यांपैकी एकांतील वर्णन दुसऱ्यांतून घेतलेले, किंवा त्या दोहोंतीलहि वर्णनें तिसऱ्याच एखाद्या लिखाणांतून घेतलेली असली पाहिजेत असे समजावें. एका लेखकाच्या नेहमी होणाऱ्या चुका दुसऱ्याच्या लेखनांत आढळून आल्यास त्या दोघांपैकी कोणी कोणाची चोरी केली हें देखील सहज काढतां येते.

तथापि हें काम नेहमीच दिसते तितके सोपें मात्र नसते. समजा 'अ' लिखाणांत 'ब' मधून माहिती घेतली असून 'क' मध्यें पहिल्या दोन्हीहि लिखाणांचा उपयोग केलेला आहे. तीन किंवा अधिक लिखाणांची याप्रमाणें गुंतागुंत झाली असते तेव्हा मूळ माहिती कोणत्या लिखाणांतील होती हें ठरविणे बरेंच कठिण जातें. परंतु बहुतेक सर्व लिखाणें उपलब्ध असल्यास, काळजीपूर्वेक परीक्षणानें उपलब्ध नसलेल्या लिखाणांतील मजकूराचें अनुमान ज्यांतील माहिती अनुपलब्ध लिखाणांवरुन घेतली असेल, त्या उपलब्ध लिखाणांवरुन काढून आपणांस त्या सर्वांची एक वंशावळ तयार करितां येते. उदाहरणार्थ 'ल्यूक व म्याथ्यू' यांची शुभवर्तमानांत एका अज्ञात ग्रंथावरुन मजकूर घेतला आहे हें त्या ग्रंथाची आज चिकित्सा करतां त्याचें स्वरुप सहज समजण्याजोगे आहे.

अशा रीतीने कर्तृत्वसंशोधन करीत असतां, जी लिखाणें उपलब्ध असलेल्या दुसऱ्या एखाद्या लिखाणावरुन लिहिलेली असतात, त्यांची योग्यता मूळ लिखाणाइतकीच किंबहुना थोडी कमीच असल्यामुळें त्यांना बाजूस सारतां येते, व ज्यांनी मूळांमध्ये काल्पनिक तपशीलाची भर घातली असेल ती अगदीच अविश्वनीय म्हणून टाकून देतां येतात. लिखाणांचें वर सांगितल्याप्रमाणें संशोधन करुन व त्यांत घेतलेली दुसऱ्या लेखांतील अवतरणें मोठया अक्षरांत देऊन जर कोणी ती लिखाणें छापवून काढील तर त्यांचा इतिहासकारास बराच उपयोगी होईल.

उ प ल ब्ध सा मु ग्री चें व र्गी क र ण क र ण्या ची प ध्द ति - उपलब्ध असलेली सर्व लिखाणे गोळा करुन त्याचें मूलपाठसंशोधन व कर्तृत्वसंशोधन संपविल्यावर त्यावरुन इतिहास रचण्यापूर्वी त्याचें पध्दतशीर वर्गीकरण केल्याशिवाय आपणांस थोडया श्रमांत उत्तम काम करितां येणार नाही. ऐतिहासिक साधनांचे वर्गीकरण करण्याच्या आज पावेतो उपयोगांत आणलेल्या निरनिराळया पध्दती म्हटल्या म्हणजेः-(१) लिखाणे वांचून काढीत असतांना केवळ स्मरणशक्तीवर भंरवसा ठेवून टिपणे वगैरे कांही न घेता मागाहून इतिहास लिहून काढावयाचा. चांगली स्मरणशक्ति असलेल्या विद्वानांच्या हातून देखील या पध्दतीनें केलेल्या कामांत अनेक चुका रहातात असा अनुभव असल्यामुळें तिचा संशोधकानें अवलंब करुं नये, (२) लिखाणें वाचीत असताना स्मरणवहीत एका मागून  एक टिपणें घेत जावयाची ही दुसरी पध्दति आहे. परंतु या स्मरणवहींतून कोणत्याहि एका विषयांसंबधी माहिती गोळा करावयाची झाल्यास प्रत्येक वेळी सर्व वही वाचून काढावी लागत असल्याकारणानें या पध्दतीनें वेळेचा बराच अपव्यय होतो. (३) प्रत्येक विषयाकरितां आपल्या स्मरणवहीत वेगवेगळे खाते उघडून, वाचतांनां ज्या त्या विषयासंबंधी ज्याच्या त्याच्या खात्यांत लिहावयाची ही तिसरी पध्दति कांही अंशी बरी आहे. पण याप्रमाणे होत गेलेल्या प्रत्येक लिखाणांतील नोंदीचा क्रम आपणांस हवा तसा असणार नाही, व एकदा केलेलें वर्गीकरण निराळ्याच रीतीनें करावयाचे झाल्यास फार त्रास पडेल. (४) या सर्वांपेक्षा उत्तम पध्दति म्हटली ''चिठ्ठीपध्दति'' होय. चिठ्ठीपध्दति म्हणजे प्रत्येक लिखाणाची टिप्पणें वेगवेगळया कागदाच्या तुकडयावर लिहून त्यावर त्याच्या मूळासंबंधी संपूर्ण माहिती द्यावयाची ही होय. या योगानें एका विषयासंबधी सर्व माहिती एकेठिकाणी आणतां येते. व मागाहून मिळालेली माहिती योग्य ठिकाणी अंतर्भूत करितां येते इतकेच नव्हे, तर उपलब्ध लिखाणांचे निरनिराळया रीतीनें वर्गीकरण करणें सुलभ होते किंवा एकदां केलेले वर्गीकरण बदलावयाचे असल्यास फारसा त्रास पडत नाही. जेव्हा एकच लिखाण अनेक द्दष्टीनें महत्वाचें असल्यामुळे निरनिराळया वर्गांत जाऊं शकतें तेव्हां त्यांतील माहिती अलग चिठ्ठयांवर लिहून प्रत्येक वर्गांत घालतां येते. अशा प्रकारच्या प्रत्येक चिठ्ठीवर मूळासंबंधी तोच तोच तपशील लिहावा लागत असल्यामुळें आरंभी काम थोडेंसें वाढेल खरें; परंतु त्या योगें पुढे बरीच सोय व्हावयाची असल्याकारणानें हा त्रास सोसला पाहिजे. या पध्दतींतील दुसरा दोष म्हटला म्हणजे लिहिलेल्या चिठ्ठयांपैकी एखादी चिठ्ठी हरवल्यास बराच घोंटाळा होण्याचा संभव असतो. परंतु तो टाळण्याकरिता सर्व चिठ्ठया जाड कागदाच्या व सारख्या करुन वर्गीकरण झाल्याबरोबर त्या मुद्दाम तयार केलेंल्या लिफाफ्यांत किंवा खणात आवरुन ठेवल्या म्हणजे झाले. वर्गीकरणाचें हे काम अगदी क्षुल्लक दिसतें तरी तें व्यवस्थेशीर रीतीने करण्याची संवय ठेवल्यास तिचा इतिहासरचनेच्या कामावर बराच चांगला परिणाम होऊं शकतो.

व र्गी क र ण त त्त्वा न्वे ष ण, प्राचीन लेखसंग्रह. - आतां पावेतों सांगितल्याप्रमाणे उपलब्ध लिखाणाचें संशोधन करुन त्यांचा एके ठिकाणी संग्रह केला तर इतिहासरचनेच्या कामास फार उपयोगी पडेल. अशा प्रकारच्या प्राचीन लेखसंग्रहामध्ये कालानुक्रमानें सर्व लिखाणे लाऊन ठेवणें हा उत्तम पक्ष आहे. परंतु कित्येक वेळां लिखाणांवर त्यांचा काळ दिलेला नसतो, किंवा तत्संबधी नीट शोधहि लागत नाही. अशा वेळी ताग्रपट, शिलालेख इ. एके ठिकाणची लिखाणें परस्परावर प्रकाश पाडण्यास फार उपयोगी पडत असल्यामुळें ती स्थलानुक्रमानें लाऊन ठेवावी. उपरोक्त दोन्हीपैकी एकाहि रीतीनें लिखाणे लाऊन ठेवतां येत नसल्यास ती त्याच्या आद्याक्षरांच्या वर्णानुक्रमानें लाऊन ठेविली पाहिजेत. पोवाडे, आख्यानें व यांसारख्या दुसऱ्या लिखाणांकरिता ही योजना उपयोगी पडते. लिखाणांची विषयवार वर्गवारी प्राचीनलेखसंग्रहासारख्या पुस्तकांमध्ये कधीहि सोयीची होत नाही. कारण तिच्याविषयी कांही ठराविक नियम घालून देणे शक्य नसल्यामुळें अमुक एक लिखाण कोणत्या वर्गांत घालावें हे निश्चित ठरवितां येत नाही, व त्यामुळे वर्गवारीची ही पध्दति ज्या ग्रंथामध्ये स्वीकारलेली असतें, त्यामध्यें विशिष्ट लिखाण शोधून काढण्यांस फार त्रास पडेल. याशिवाय एकच लिखाण निरनिराळया वर्गांत जाऊं शकत असल्याकारणानें त्याची अनेकवेळा पुनरावृत्ति होण्याचाहि संभव असतो. म्हणून आरंभी दिलेल्या तिहीपैकी कोणत्या तरी एका रीतीनें लिखाणें लाऊन शेवटी निरनिराळया प्रकारची सूचिपत्रें जोडावी म्हणजे झाले, अशा रीतीने ग्रंथ तयार झाला म्हणजे त्यावरुन (होळकरासंबंधी लिखाणें, मुसलमानांच्या कारकीर्दीतील माळव्यांची लिखाणें, मराठयांची जमाबंदी पध्दति, इत्यादी) वाटेल त्या प्रकारानें लिखाणाचें वर्गीकरण करुन इष्ट विषयासंबंधी माहिती प्रसिध्द करिता येईल.

लिखाणांची विषयवार रचना प्राचीनलेखसंग्रहास जरी अगदी नि पयोगी असली, तरी विशिष्ट विषयावर लेख लिहूं इच्छिणाऱ्या माणसास तिच्याहून अधिक सोयीची व उपयुक्त अशी कोणतीही वर्गीकरणपध्दति नाही. हिचें स्वरुप लेखकानें निवडलेल्या विषयावर व तत्ससंबंधी त्यानें तयार केलेल्या योजनेंवरच सर्वस्वी अवलंबून असल्यामुळे तिजसंबंधी कांही ठराविक असे सामान्य नियम घालून देता येत नाहीत. तथापि प्रत्येक इतिहाससंशोधकानें वर्गीकरण करीत असतांना आपल्या चिठ्ठीवर शक्य असेल तेथे लिखाणाच्या काळाचा उल्लेख करणें व प्रत्येक चिठ्ठीस कांही तरी ठराविक मथळा योजणें अवश्य आहे, आणि त्याचप्रमाणे सर्व मूळ लिखाणांची यादी करुन निरनिराळया प्रकारच्या सूची तयार करण्याचीहि त्यानें संवय ठेविली पाहिजे, हे नियम मात्र सर्वांस सारखेच लागू पडतील.

बा ह्यां ग चि कि त्सा व इ ति हा स सं शो ध न. - मूल पाठ संशोधन, कर्तृत्वशोधन, लेखसंग्रहण व वर्गीकरण या निरनिराळया क्रियांचा बाह्यांगचिकित्सेंत समावेश होतो. बाह्यांगचिकित्सा केल्याशिवाय लिखांणावरुन 'इतिहास' लिहिणेच शक्य नाही. परंतु बाह्यांगचिकित्सा हे कांही इतिहासकारांचें ध्येय नसून त्यांचे खरे काय यापुढेंच आहे उपरिनिर्दिष्ट संशोधन करुन बाह्यांगचिकित्सकांनी प्राचीन लेखसंग्रह अगोदरच करुन ठेवला असला तर या गोष्टी पुन्हां करण्याची कांहीच आवश्यकता नाही. लिखाणाचा अर्थ लाऊन कर्त्यानें दिलेली हकीकत कितपत विश्वसनीय व यथार्थ आहे हे काढण्याकरिता करावें लागणारें मानसिक परीक्षणच इतिहासकाराचें मुख्य काम आहे. मूळ लेख तपासल्याशिवाय खरा इतिहास लिहितां येत नाही. या म्हणण्यांत जरी कांही तथ्य असले तरी बाह्यांग चिकित्सेंत सर्वे बाह्यांगचिकित्सेंतील सर्व र्किया आमूलांत स्वतः करुन जर कोणी इतिहास लिहूं म्हणेल तर त्याजकडून तें काम नव्याण्णव हिश्यांनी शेवटास जाणार नाही म्हणून समजावें. म्हणून इतिहासशास्त्रांत श्रमविभागणी होऊन बाह्यपरीक्षणाचें काम बाह्यांगचिकित्सांनी, व अंतःपरीक्षण करुन इतिहासरचनेंचे काम इतिहासकारांनी आपल्याकडे घेतलें पाहिजे.

परंतु येथे  एक गोष्ट ध्यानांत ठेविली पाहिजे की, बाह्यचिकित्सेचें काम केवळ इतिहासरचनेकरितांच करावयाचे असल्यामुळें, बाह्यांगचिकित्सक व इतिहासकार यांनी आपसांत सहकारित्व ठेऊन, पहिल्यानें आपल्या मेहनतीचा दुसऱ्यास चांगल्या रीतीनें उपयोग करुन घेतां येईल अशा रीतीनें काम केलें पाहिजे, व दुसऱ्यानें पहिल्याच्या परिश्रमाचा पूर्ण उपयोग करुन घेण्यांत हयगय न केली पाहिजे; दोन्हीहि कामें एकानेंच करण्यांत तत्त्वतः जरी काही हरकत नसली तरी; बाह्यांगचिकित्सकानें इतिहासरचनेचे काम केले तर तें चांगले साधते असे कांही नसल्यामुळें अशा रीतीने श्रमविभागणी केल्यापासून कांही तंटा होत नाही. उलटपक्षी तसें करणे व्यवहारात फार सोयीचें पडतें;  कारण बाह्यांगचिकित्सेस लागणारी मेहनत हाती घेतलेल्या विषयाच्या प्रमाणांत केव्हांच नसते, व त्यामुळे इष्ट विषयावर लिहावयास लागणारीं ऐतिहासिक साधनें अगदी वाईट स्थितीत असली तर मनुष्यास आपल्या अल्प वयोमर्यादेंत तें काम शेवटास नेता येत नाही. शिवाय बाह्यचिकित्सेचें काम एकदां करुं लागलें म्हणजे कांही मंडळीस त्यातच गोडी लागते, व मग ते पुढच्या भानगडीत पडत नाहीत. इतिहासरचनेच्या भानगडीत न पडता बाह्यांगचिकित्सकांनी आपलें सर्वस्व बाह्यचिकित्सेसच वाहून घेतलें तर त्यापासूनच फार फायदा होईल. एकाच प्रकारचें काम पुष्कळ दिवस करीत राहिल्यानें मनुष्यास त्या कामांत बरेंच कौशल्य प्राप्त होते. मूलपाठसंशोधनाचें काम ज्यांने कित्येक दिवसपर्यंत केलें आहे त्यास शुध्द पाठ आपोआप सुचूं लागतात, व प्राचीन लेखसंग्रहाच्या कामास वाहिलेल्या लोकांस त्याचें काम जितकें अल्पावकाशात व चांगल्या रीतीनें करितां येईल तितकें एखाद्या त्रयस्थ माणसास करितां येणार नाही. फार तर काय बाह्यचिकित्सेच्या कामांतच आणखी श्रम विभागणी होऊन त्यांतील निरनिराळया भागांत निरनिराळया विद्वानांनी नैपुण्य संपादन करणें अवश्य आहे. कारण इतिहासाची रुपरेखा एकदां आखली गेल्यावर त्यामध्यें जी प्रगति व्हावयाची ती तपशीलाची अधिकाधीक सूक्ष्म माहिती मिळवूनच होणें शक्य आहे, व हें काम विशेष व्यासंगी माणसांशिवाय इतरांकडून होणे शक्य नाही. परंतु विद्वानांनी विशेष व्यासंगच ठेवण्याचें महत्वाचे कारण म्हटले म्हणजे माणसांतील रुचिवैचित्र्य होय. मनुष्याच्या प्रवृत्ती एखाद्या विषयाच्या अध्ययनाच्या प्रतिकूल असल्यास त्याला आपल्या अभ्यांसात अपयश हे ठरलेलेंच याकरितांच मनुष्यानें आपल्या आवडीनावडीप्रमाणें विषयाची निवड करावी म्हणजे त्याच्या हातून काम चांगले होईल.

आतां आपण बाह्यांगचिकित्सकाच्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत याचा विचार करुं. बाह्यांगचिकित्सक होऊं इच्छिणारास प्रथमतः त्या कामाची आवड असली पाहिजे हे उघड आहे. कुशाग्र बुध्दीच्या माणसास बाह्यांगचिकित्सेचें इमाली काम आवडत नसले तरी, मनुष्यास  निसर्गतःच असलेल्या संग्रह करण्याच्या व कोंडी सोडविण्याच्या आवडीचा विकास होण्यास या कामांत पूर्ण अवकाश असल्यामुळे, अलैकिक बुध्दीचे थोडे लोक खेरीज करुन बहुधा प्रत्येकास अभ्यासानें हे काम आवडूं लागतें. चंचल बुध्दीच्या माणसांपासून दीर्घोद्योगी माणसापर्यंत प्रत्येकास बाह्यचिकित्सेंत आपल्या योग्यतेप्रमाणे कोडी सापडून, आत्मपरिश्रमानें लावलेल्या शोधामुळे होणारा आनंद कोणालाहि अनुभविता येत असल्या कारणानें एकदां मनुष्य या कामांत पडला की त्यास त्याची गोडी लागूं लागते. साधारणतः असे होते की अंत:परिक्षण, इतिहासरचना इत्यादी कठीण कामें करण्यास लागणारी अलैकिक बुध्दि नसली, परंतु इतिहासविषयक अभ्यास करण्याची तर इच्छा असली म्हणजे मनुष्य बाह्यचिकित्सेचें यांत्रिक काम हाती घेतो. पण उत्तम बाह्यांगचिकित्सक होण्याकरितां केवळ आवड असूनच काम भागत नाही. कारण कांही माणसांस आपलें मन एकाग्र करिता येत नसल्यामुळे ज्या गोष्टीचे त्यांना स्मरण नसतें त्या ते कल्पनाशक्तीनें भरुन काढण्याचा प्रयत्न करीत असतां अनेक चुका करितात. व त्यामुळे आवश्यक बुध्दिमत्ता, शिक्षण व आवड असूनहि ते या कामास नालायक ठरतात. बुध्दीच्या समतोलपणाबरोबरच धिम्मेपणा हाहि गुण बाह्यांगचिकित्सकांत असला पाहिजे. नाहीतर घाईमुळे त्याच्या शोधांत अनेक चुका राहून दुसऱ्या कोणास ते फिरुन तपासून पाहण्याचे परिश्रम करावें लागतील. वर सांगितलेल्या गुणांशिवाय, निश्चय दीर्घोद्योग, पूर्वग्रहाभाव, दूरदर्शीपणा, व्यवस्थितपणा व यथार्थ अनुमानें काढता येण्याजोगी कल्पनाशक्ति हे गुण ज्या प्रमाणांत त्याच्या अंगी असतील त्याच प्रमाणांत त्याला आपल्या उद्योगांत यश येईल.

बा ह्य चि कि त्स का च्या अं गी ये णा रे दु र्गु ण. - बाह्य चिकित्सेच्या कामात पडलेल्या माणसामध्ये मुख्यतः तीन दुर्गण शिरण्याचा संभव असतो. (१) बाह्य चिकित्सकास चुका न होऊं देण्याबद्दल जी खबरदारी घ्यावी लागते तिचा परिणाम पुढें असा होतो की, एवढी काळजी घेऊन देखील आपल्या कामांत चुका राहिल्याने त्याला मागाहून आढळून आलें म्हणजे त्याच्या मनास धक्का बसतो. व तो आपल्या कामांत इतकी फाजील दक्षता घेऊं लागतो की, पुढें पुढें त्याच्या हातून जवळ जवळ कांहीच काम होत नाही. (२)संवयीने बाह्य चिकित्सकाचा स्वभाव संशयी होऊं लागतो की, मग त्याला जेथे शंका घ्यावयास नको तेथे देखील शंका येऊं लागते. पाठसंशोधनकार्याच्या प्रगतीबरोबरच या दुर्गुणाचाहि विकास होण्याचा पुष्कळ संभव असतो. कारण लवकरच असा काळ येईल की, जेव्हां जुनी सर्व लिखाणें तपासून झाल्यामुळें पाठसंशोधनाचें काम संपुष्टांत येईल; पण हे पाठसंशोधक त्या वेळी देखील आपली लेखणी खाली न ठेवतां शुध्द पाठांवरच आपली कुऱ्हाड चालवून पाहूं लागतील. (३) या कामामुळें मनुष्याच्या अंगी येणारा तिसरा दोष म्हटला म्हणजे कामाच्या गोडी मुळें लिखाणाच्या उपयुक्ततेचा विचार देखील न करतां तो त्याच्या संशोधनात त्याच्या उपयुक्ततेच्या प्रमाणाबाहेर काळाचा व वेळेचा अपव्यय करुं लागतो. कोणत्या लिखाणाचा केव्हां कसा उपयोग होईल, हें अगोदर निश्चित करतां येत नाही, ही गोष्ट जरी खरी असली तरी बाह्यांगपरीक्षकाचें काम केवळ इतिहासाकरितांच असल्यामुळे त्यांने आज इतिहासकारांनां कोणत्या लिखाणांची आवश्यकता आहे, याचा नीट विचार करुनच आपलें काम केलें पाहिजे आपल्या अंतिम ध्येयावर लक्ष ठेवून जर संशोधक आपलें काम करतील तर आज प्रत्येक शास्त्रांत हल्लीपेक्षा किती तरी अधिक काम होत जाईल. हा दोष घालविण्याकरितां अवश्य असलेली इतिहासकोविदांची अद्यापपर्यंत चांगलीशी संघटना पाश्चात्य देशांतहि झालेली नाही.

एकमेकांचे दोषविष्करण करीत असतांना तीव्र भाषा वापरुन बाह्यांगचिकित्सक आपला मत्सरीपणा प्रगट करतात, असा त्यावर आणखी एक आरोप आहे; परंतु येथे हे लक्षांत ठेविलें पाहिजे की, सौम्य किंवा कडक भाषा वापरणे हें केवळ मनुष्यस्वभावावरच अवलंबून असून तो बाह्यचिकित्सेचें काम केल्यामुळें उत्पन्न होणारा दोष आहे, असें बिलकुल म्हणतां येत नाहीं. शिवाय बहुतेक बाह्यचिकित्सकांच्या वादविवादांत कडक भाषा वापरली जात असते. याचें कारण ते एकमेकांचा मत्सर करतात हें नसून, केवळ सत्याच्या चाडीमुळेंच ते तसें करण्यास प्रवृत्त होतात. याचा परिणामहि इष्ट तोच झाला आहे व आतां काळजीपूर्वक अभ्यास न करंता चुकीचें विधान  प्रसिध्द करण्यास कोणीहि सहसा धजत नाही.

लि खा णां चा अ र्थ ला व ण्या चें प्र यो ज न व पृ थ क्क र ण प ध्द ति. - लेखकांनी आपली माहिती कसकशी मिळविली व लिखाणांतील शब्द त्यांनी कोणत्या अर्थी वापरलें हें आपणांस ठाऊक नसल्यामुळें संशोधित लिखाणांतील कांहीहि माहिती स्वीकारण्यापूर्वी अंतःपरीक्षण नांवाच्या दुसऱ्याच एका क्रियेतून आपणांस जावें लागतें. एखाद्या गोष्टीचें निरीक्षण झाल्यापासून ती लिखाणांत नमूद केली जाईपर्यंत कर्त्याच्या ज्या ज्या कांही मानसिक क्रिया झाल्या असतील त्यांचा अभ्यास करुन लिखाणांतील विधानांची यथार्थता निश्चित करणें हे अंतःपरीक्षणाचें काम आहे. याकरितां (१) प्रथमतः लिखाणांतील मजकुराचें पृथक्करण करुन लेखकाच्या मनांत लिखाणांत कोणत्या गोष्टी व्यक्त करावयाच्या होत्या हे ठरविले पाहिजे व नंतर (२) लिखाणाच्या परिस्थितीचें पृथक्करण करुन त्यांतील विधानें कितपत यथार्थ आहेत हें शोधून काढलें पाहिजे. लेखकाच्या मताप्रमाणें होणारा लिखाणाचा अर्थ काढण्यापूर्वीच त्यांतील विधानांच्या सत्यासत्यतेचा विचार करणे केव्हांहि इष्ट होणार नाही आणि तो अर्थ काढणें सोपें नाही. कारण लेख जुन्या काळचा असला म्हणजे त्या वेळच्या व हल्लीच्या भाषेंत, विचारांत फरक पडला असल्याकारणानें लेखकाच्या मनांतील अर्थ आपल्या अर्थापेक्षा पुष्कळ अंशी भिन्न असण्याचा संभव असतो जेव्हां एखाद्या शब्दापासून किंवा वाक्यापासून अनेक अर्थ निघूं शकतात, तेव्हां तर अर्वाचीन लेखांच्या बाबतीत देखील कित्येक वेळां कर्त्याच्या मनांतील अर्थ ठरविणे तितकेंच कठीण होतें. शिवाय मनुष्य थोडा जरी बेसावध राहिला कीं, त्याला आपले स्वतःचेच विचार त्या लेखांत दिसूं लागतात व मग तो पुढचा मागचा संदर्भ न पाहता इष्ट तेवढेच शब्द किंवा वाक्यें घेऊन लेखाचा भलताच अर्थ करितो.

यासाठी इतिहासरचनेकरितां लिखाणांतील कोणती माहिती घ्यावयाची हें ठरविण्यापूर्वी त्या लिखाणाचा अर्थच नीट समजून घेतला पाहिजे म्हणून प्रत्येक लिखाणांत व्यक्त केलेल्या लेखकाच्या सर्व कल्पना कागदावर अशा रीतीनें लिहून काढाव्या की, त्यांवरुन सर्व लिखाणाचा मतलब ध्यानांत येऊन लेखकाचा उद्देश व मतेंहि समजूं शकतील. एखाद्या वेळी लिखांणातील पृथःकृत सर्व कल्पना चिठ्ठीवर न लिहितां त्यांपैकी अवश्य तेवढेच मुद्दे फक्त घेतले तरी चालते; परंतु आपल्याच विचाराचें प्रतिबिंब आपणांस लिखाणांत दिसूं नये म्हणून अगोदर सर्व लिखाणाचें निदान मनांत तरी पृथक्करण करुन मग त्यांतील निवडक मुद्दे चिठ्ठीवर लिहावे;

श ब्दा र्थ नि श्च य क रु न लि खा णां चा श ब्द श: अ र्थ ला व णे. - प्रत्यासत्तिन्याय, लिखाणांतील कल्पनांचें पृथक्करण करतांना आधी त्यांतील वाक्यांचा शब्दश: अर्थ काय होतो तें पाहून नंतर त्यांच्या खऱ्या अर्थाकडे वळावे. (१) भाषेंत नेहमीं एकसारखा बदल होत असल्यामुळें त्याच शब्दाचा निरनिराळया काळी निरनिराळा अर्थ होतो, म्हणून लिखाणांतील प्रत्येक शब्दास व्यवहारांतील ठराविक अर्थ देणे कधीहि युक्त होणार नाही. उदाहरणार्थ, ''कल्पना''  या शब्दाचा संस्कृतमध्यें अर्थ योजना व कृति असा आहे; पण मराठींत समजूत आणि प्रसंगी असत्य समजूत असाहि आहे. विशिष्ट काळामध्ये एखाद्या शब्दाचा किंवा वाक्यप्रचाराचा काय अर्थ होत होता, हें काढण्याकरितां ज्या वाक्यांत तो शब्द किंवा वाक्प्रचार वापरला असेल ती सर्व गोळा करावीं म्हणजे त्यांत निदान एक तरी वाक्य असें आढळून येईल की, ज्यांत मागच्या पुढच्या संदर्भावरुन त्या शब्दाचा किंवा वाक्यप्रचाराचा अर्थ अगदी उघड होईल. लिखाण मृत भाषेंत लिहिलेले असल्यास त्यांतील भाषासौंदर्याकरितां किंवा विशिष्ट अर्थी योजलेले शब्द ओळखून काढण्याविषयीं खबरदारी घेतली पाहिजे. (२) याशिवाय स्थलभेदाप्रमाणेंहि भाषेंत बदल होत असल्यामुळें त्या त्या देशाच्या भाषेचें ज्ञान करुन घेणें अवश्य आहे. निरनिराळया ग्रंथकारांनी (३) एकच शब्द निरनिराळया अर्थी वापरला असतो, इतकेंच नव्हे तर (४) एकाच ग्रंथकाराच्या पुस्तकांत देखील त्याच शब्दाचा भिन्न भिन्न अर्थी उपयोग केलेला असतो, म्हणून प्रत्येक ग्रंथकर्त्याच्या भाषेशी परिचय करून घेतला पाहीजे व मागचापुढचा संदर्भ पाहूनच प्रत्येक शब्दाचा अर्थ ठरविला पाहिजे. व्यवहारांत जुन्या लिखाणांतील सर्वच शब्दांचा वर सांगितलेल्या रीतीने अर्थ ठरवावा लागत नाही. कारण ज्यांच्या अर्थात बदल होऊं शकत नाही असे भाषेंत कित्येक शब्द असतात आणि वाक्यप्रचारांतील घटक शब्दांचा अर्थ कालांतरानें बदलला तरी त्यांच्या स्वतःच्या अर्थात फेरफार होत नाही. म्हणून ज्यांचे अर्थांतर होऊं शकतें असे जे सामाजिक वर्ग, संस्था, चालीरीती आणि रोजच्या व्यवहारांतील वस्तु यांचे वाचक शब्द तेच फक्त विशिष्ट देशांत, विशिष्ट काळीं, विशिष्ट ग्रंथकारांच्या लेखनांत, कोणत्या अर्थी वापरले जात होतें, हे काढले म्हणजे झालें.

स त्या र्था न्वे ष ण (ले ख का भि प्री ग्र ह ण). - वर सांगितल्याप्रमाणें लिखाणांचा शब्दश: अर्थ लावला तरी लेखकाच्या मनांतील विचारांचा आपणांस बोध होत नाही.  भाषेमध्यें व्याजोक्ति, अन्योक्ति, ध्वनि, लक्षणा, इत्यादी अनेक अलंकारांचा उपयोग केला जात असल्याकारणानें मूलार्थ दुर्बोध करणाऱ्या या सर्व कवची फोडून खरा अर्थ काढावा लागतो. सरकारी कागदपत्र, सनदा, ऐतिहासिक गोष्टी व दुसरी जीं जीं कांही लिखाणे मुख्यतः लोकांनां समजण्याकरितांच लिहिलेली असतात त्यांमध्ये असले अलंकार घालून लेखक स्वतःस दुर्बोध करुन घेणार नाही. पंरतु इतिहाससंशोधकास ज्या सामुग्रीचा उपयोग करुन घ्यावयाचा असतो तींत, खासगी पत्रें, धार्मिक ग्रंथ इत्यादी मर्म जाणणाऱ्या विशिष्ट व्यक्तीकरितांच लिहिलेल्या लिखाणांचा पुष्कळसा भरणा असल्यामुळें असल्या कागदपत्रांत ज्या ज्या ठिकाणी शब्दश: अर्थ बरोबर जुळत नाही त्या त्या ठिकाणी कांही तरी अलंकारिक उपयोग आहे असें समजावें. लिखाणांतील शब्दांचे अर्थ काढण्याकरितां स्वीकारलेल्या पध्दतीचेंच येथेंहि अवलंबन करावें, व त्याच प्रकारची निरनिराळी वाक्यें गोळा करुन त्यांपैकी एखाद्या वाक्यांत केवळ संदर्भावरुन त्या अलंकाराचा अर्थ स्पष्ट होत असल्यास पहावें. परंतु अशा रीतीनें झालेली अर्थ निष्पत्ति निश्चित स्वरुपाची नसल्यामुळें या अनुमति अर्थावरुन कोणतेहि सिध्दांत काढूं नयेत.

लि खा णां ती ल प्र त्ये क वि धा ना चें य था र्थ त्व त पा स ण्या चें प्र यो ज न - लेखकार्थबोध झाला म्हणजे ऐतिहासिक गोष्टीचें वास्तविक ज्ञान होत नसून, त्या योगे फक्त लेखकाच्या मनांत त्या गोष्टी वाचकांस कोणत्या स्वरुपांत दाखवावयाच्या होत्या एवढेंच काय तें कळतें. कारण स्वार्थ साधण्याच्या उद्देशानें किंवा कांही अन्य परिस्थितीमुळे निरीक्षणानें एखाद्या लेखकास जें ज्ञान प्राप्त झालें असेल तेंच लिखाणांत व्यक्त न करितां त्याने लबाडी करुन त्यास कांही निराळेंच स्वरुप दिलें असेल; किंवा त्याची निरिक्षण पध्दतीच सदोष असल्यामुळें त्याच्या निरीक्षणांत चुका राहून त्यास वास्तविक गोष्टीचा यथार्थ बोधच झाला नसेल शिवाय उपरोक्त परिस्थितीचा एका लिखाणांतील सर्वच विधानावर सारखाच परिणाम होणे संभवनीय नसल्यामुळे व तसेच सर्वच निरीक्षणांत त्याच चुका होणेंहि तितकेंच असंभवनीय असल्याकारणानें लेखकांचे किंवा लिखाणांचें विश्वसनीय व अश्वसनीय असें दोन वर्ग न करितां किंवा बाह्यांग परीक्षणांत अस्सल म्हणून ठरलेल्या लिखाणांतील सर्वच विधानें खरी न मानतां, लिखाणांतील प्रत्येक विधानाची यथार्थता तपासून पाहिली पाहिजे.

परस्परविरोधी विधाने जुन्या कागदपत्रांत पदोपदी आढळून येत असल्यामुळें उपरिनिर्दिष्ट परीक्षणाची आवश्यकता कोणासहि सहज दिसून येईल. पण मनुष्य स्वभावतःच इतका श्रध्दाळू असतो की केवळ भाषेच्या शैलीमुळे एखाद्या लिखाणावर त्याचा पूर्ण विश्वास बसतो, किंवा एखाद्या गोष्टीचा बारिक सारिक तपशील दिला असला म्हणजे तसली विधानें काल्पनिक असणें असंभवनीय आहे असें त्यास वाटूं लागते. परंतु उत्तम वक्ते, सुप्रसिध्द नट, किंवा ज्यांचा जन्मच खोटे बोलण्यांत गेला; अशा माणसांच्या खोटया गोष्टी खऱ्या प्रमाणे वर्णन करण्यांत हातखंडा असतो, व बारिक सारिक तपशील कल्पनेनें लिहिता येणे शक्य नसले तरी एका गोष्टीचा तपशील दुसरीला लावणें अगदी सोपें असते; म्हणून अशा स्थितीत देखील लिखाणांच्या प्रत्येक वाक्यांतील विधानांचे पृथक्करण करुन त्यांतील प्रत्येकास आपल्या तत्वीनकषग्रावाच्या कसोटीस लाऊन पाहण्याचें काम संशोधकानें टाळणे त्यास अगदी अक्षम्य होईल. त्यासाठी प्रत्येक विधानाच्या यथार्थतेविषयी कांही पुरावा मिळाल्याशिवाय ते विश्वसनीय मानावयाचेंच नाही अशी त्यानें आपल्या मनाची प्रवृत्ति ठेवावी. नवशिक्या संशोधकास या सर्व क्रिया पृथक पृथक कराव्या लागणार असल्यामुळे आरंभी आरंभी त्याचें काम फार सावकाश होईल; पण एकदां संवय झाली म्हणजे पृथक्करणाच्या व परीक्षणाच्या क्रिया एकसमयावच्छेदे करुन होऊं लांगतील इतकेच नव्हेतर, लिखाणाची भाषा दुर्बोध नसल्यास या दोन्हीहि क्रिया लेखकार्थ ग्रहणा बरोबरच करितां येतात.

ले ख का च्या नि री क्ष ण नि वे द नां ती ल स त्त्या ला पा चें सं शो ध न. - वर सांगितलेच आहे की वास्तविक गोष्टीचा बोध होण्याकरिता (१) लेखकानें स्वतःस निरिक्षणानें जें ज्ञान प्राप्त झालें होते, ते जसेंच्या तसेंच लिखाणांत व्यक्त केले किंवा नाही, आणि (२) लेखकांस वास्तविक गोष्टीचें यथार्थ ज्ञानच झालें होते किंवा नाही, या दोन गोष्टी आपणांस निश्चित केल्या पाहिजेत. कर्तृत्व शोधन करीत असतां, लेखकाच्या परिस्थितीविषयी व त्याच्या स्वभावाविषयी जी कांही माहिती आपणांस मिळाली असेंल तीत अभ्यासानें तत्संबंधी आणखी माहितीची व मनुष्य स्वभावाच्या सामान्य ज्ञानाची भर घालून, तिच्या मदतीनें (१) प्रस्तुत लेखांत लबाडी करण्यास लेखकांस कांही प्रयोजन होतें काय हें अगोदर पहावें, व मग (२) प्रत्येक विधान घेऊन त्यामध्यें लेखकाकडून वस्तुविपर्यास करुन दाखविण्यास लेखक ज्या कारणामुळें प्रवृत्त होतो ती पुढे दिली आहेत. (१) ज्या गोष्टीमध्यें लेखकाचे हितसंबंध गुंतलेले असतात, तत्संबंधी विधानांत वस्तुविपर्यास केला जाण्याचा संभव असतो. अशी विधानें निवडून काढतांना खुद्द लेखकाच्याआवडी व ध्येयें शोधून त्याला स्वतःला कोणत्या गोष्टीत आपलें हितसंबंध असल्याचें वाटत होते हे ठरविलें पाहिजे. एखाद्या गोष्टींत लेखकाचें व्यक्तिविषयक हित नसले तरी तो आपल्या इष्टमित्रांकरितां देखील खोटे लिहिण्यास प्रवृत्त होईल हेंहि येथे विसरता कामा नये. (२) जेव्हां लेखकांस आपला लेख चालत आलेल्या रुढीप्रमाणें किंवा ठराविक नियमांस धरुन लिहावा लागतो, तेव्हा आनुषंगिक गोष्टीसंबंधानें खोटी विधानें केली जाण्याचा संभव असतो. असल्या प्रकारचा वस्तुविपर्यास सरकारी अहवालांत नेहमी द्दष्टोत्पत्तीस येतो. (३) राष्ट्रें, पक्ष, संस्था, कुंटुंबे व माणसें इत्यादिकांविषयी प्रत्येक लेखकाचे कांहीना काही तरी अनुकूल किंवा प्रतिकूल ग्रह झालेले असतात व त्यामुळे त्यांची तत्संबंधी विधानें कधी कधी तर त्याला न कळत देखील पूर्वग्रहानें दूषित होतात. (४) केवळ प्रौढी मिरविण्याकरितां देखील लेखकाच्या हातून खोटी विधानें होतात, व म्हणून लेखकांस कोणत्या गोष्टीत प्रौढी वाटत होती हें शोधून काढावें, आपण आहोत त्यापेक्षां मोठे दिसावे ही इच्छा मात्र मनुष्यमात्रांत असल्यामुळे, लेखकाने ज्यांत स्वतःची किंवा इष्टमित्रांची फाजिल बढाई केली असेल त्या विधानांवर विश्वास ठेऊं नये (५) शिष्टाचारदि कित्येक गोष्टी मनुष्य समाजास संतुष्ट ठेवण्याकरितां किंवा त्याचें मन न दुखविण्याकरितांच करीत असल्याकारणाने, लेखकानें कोणत्या समाजाकरितां तो लेख लिहिला होता व त्या समाजाचे शिष्टाचार व नीतिविषयक मतें काय होती हें ठरविलें म्हणजे लिखाणांतील शिष्टाचारमूलक व त्यासारख्या अन्य विधानांनी आपली फसवणूक होणार नाही. (६) बहुतेक लेखक लोकरंजनाच्या हेतूनें प्रेरित होऊन, भाषेस सौष्ठव आणण्याकरितां वस्तुविपर्यास करीत असल्याकारणानें नांवाजलेल्या लेखकाच्या किंवा उत्तम भाषेत लिहिलेल्या लेखावर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ति सोडून नाटकी किंवा ह्दयंगम वर्णनें अविश्वसनीय समजली पाहिजेत. हा दोष दफ्तरी लेखांत बहुथा आढळून येत नाही;परंतु इतिहासकाराचें लेख बहुश: वाङयस्वरुपीच असल्याकारणानें इतर वाङ्मयात्मक ग्रंथाप्रमाणें ते देखील या दोषापासून सुटलेले नसतात. या दोषाचें स्वरुप लेखकाच्या व तत्कालीन समाजाच्या रुचीवर अवलंबून असल्यामुळें त्यांचा अभ्यास करणें अवश्य असतें.

ले ख का च्या नि री क्ष ण ज न्य ज्ञा ना च्या य था र्थ ते वि ष यी चि कि त्सा. - यापुढें दुसरें काम म्हटलें म्हणजे प्रत्येक विधानाच्या बाबतीत लेखकाचें निरीक्षण बरोबर होऊन त्यास स्वतःसच वर्णित गोष्टीचें यथार्थ ज्ञान झालें होते किंवा नाही हे लेखकासंबंधी व लिखाणांसंबधी आपणांस असलेल्या माहितीवरुन निश्चित करावयाचे हें आहे. या ठिकाणीहि पूर्वीप्रमाणेच अगोदर लिखाणासंबधी समुच्चयात्मक विचार करुन, नंतर प्रत्येक विधानाचें यथार्थत्व तपासलें पाहिजे, या परिस्थितीमध्यें लेखकाकडून निरीक्षणाच्या कामात कशा चुका होऊं शकतात हें पाहूं.

(१) प्रत्यक्ष निरीक्षणावांचून लिहिलेली कोणतीहि माहिती विश्वसनीय समजावयाची नाही हा एक सर्वसामान्य नियम प्रत्येक संशोधकानें लक्षात ठेवला पाहिजे. परंतु कित्येक वेळा बाह्य परिस्थिति निरीक्षणास अनुकूल असूनहि द्दष्टिभ्रम, चुका व पूर्वग्रह यासारख्या अंतःस्थकारणांमुळें लेखकाचें निरीक्षण सदोष राहतें, म्हणून पहिले दोन दोष लेखकाच्या प्रत्येक निरीक्षणांत आढळून येतात काय याचा शोध करावा, व त्याचप्रमाणे त्याचे कोणकोणत्या गोष्टीसंबंधी कसे कसे पूर्वग्रह झाले होते हे निश्चित करावें. याशिवाय उत्तराचें स्वरुप बहुश: प्रश्नावरुनच ठरत असल्याकारणानें लिखाणांतील माहिती एखाद्या प्रश्नाच्या जबाबादाखल लिहिलेली असल्यास, लेखकानें कोणत्या प्रश्नांचें उत्तर म्हणून ती माहिती लिहिली होती, व त्या प्रश्नानें त्याच्या मनांत कोणत्या भावना उत्पन्न झाल्या होत्या याचा देखील विचार करावा. (२) लेखकाची परिस्थितीच यथार्थ निरीक्षणास अनुकूल नसली तर तशा स्थितीत झालेल्या निरीक्षणामध्यें अनेक चुका राहण्याचा संभव असल्यामुळे, जेथून नीट दिसूं शकेल अशा ठिकाणी तो होता किंवा नाही, अन्य कार्यांत गुंतल्याकारणानें त्याच्या निरीक्षणांत व्यत्यय तर येत नव्हताना निरीक्षण करावयाच्या गोष्टीविषयी लेखकास गोडी नसल्यानें त्याचें दुर्लक्ष झाले होते काय, निरीक्षणीय गोष्टी समजण्याइतका अनुभव किंवा बुध्दि त्यांत होती किंवा नाही, निरनिराळया निरीक्षित गोष्टीत त्याने घोटाळा तर केला नाहींना, व सर्वोत महत्वाची गोष्ट म्हटली म्हणजे निरीक्षण झाल्याबरोबर त्यानें त्याचे टांचण केलें किंवा नाही, या सर्व बाबींचा नीट विचार केला पाहिजे. (३) प्रत्यक्ष निरीक्षण करतां येणें शक्य असूनहि आळसानें किंवा निष्काळजीपणानें, केवळ पूर्वज्ञात कार्यक्रमावरुनच कित्येक वेळां लेखकांकडून सभावगैरेंचा अहवाल कल्पनेनें लिहिला जात असल्याकारणानें अगदीच ठराविक पध्दतीप्रमाणें वठराविक भाषेंत लिहिलेले लेख अविश्वसनीय समजावे. (४) खासगी गोष्टीसंबंधी माहिती, निरीक्षणजन्य असूं शकत नसल्यामुळे ती विश्वसनीय नसते. त्याचप्रमाणें चालीरीतीचें, मनुष्यस्वभावाचें, महायुध्दाचें किंवा यासारखे दुसरें कोणतीहि समुच्चयात्मक वर्णन घेतले तरी तें  फार झालें तर निरनिराळया निरीक्षणजन्य माहितीवरुन सिध्दांत काढूनच केलेले असावयाचें; याकरिता अशावेळी लेखकाजवळ सिध्दांत काढण्यास पुरेशी सामुग्री होती किंवा नाही, व त्याला उपलब्ध सामुग्रीवरुन यथार्थ सिध्दांत काढतां येत होते किंवा नाही या दोन गोष्टीचा शोध केला पाहिजे.

उ स न्या वि धा नां ची ग्रा ह्या ग्रा ह्य चि कि त्सा. - एखाद्या विधानांतील माहिती लेखकानें स्वतःच्या निरीक्षणावरुन लिहिली नसल्यास, ज्यानें आत्मनिरिक्षणानें ती प्रथम प्रसिध्द केली  असेल त्याचें निरीक्षण दोषरहित होते किंवा नव्हतें व त्यापासून प्रस्तुत लेखकापर्यंत ती ज्या ज्या मध्यस्थांच्या द्वारांनी आली त्यांनी तिच्या स्वरुंपात बदल करण्याचा संभव होता काय, हे ठरविले पाहिजें. परंतु लिखाणांच्या अभावांमुळें व्यवहारांत इतिहाससंशोधकास मूळ निरीक्षकापर्यंत क्कचितच पोहोंचता येत असल्या कारणानें, अनेक विधानें निनांवीच राहतात. व म्हणून अशा वेळी असलें निनांवी विधान  ज्या काळात केले गेले असेल त्या काळांत तद्विधानांतर्गत गोष्टींच्या निरीक्षणांत चुका होत असत काय, व तत्कालीन तसली विधानें पूर्वग्रहानें दूषित होण्याचा संभव होता काय हें पाहण्याशिवाय अधिक असें कांहीच करतां येत नाही. या निनांवी विधानांचा बराच मोठा भाग परंपरागत गोष्टीनी भरलेला असतो. या गोष्टी लेखनाच्या द्वारानें पिढयानुपिढया चालत येतात, किंवा केवळ आख्यायिकादि दंतकथांच्या रुपानेंच अस्तित्वांत असतात.

यांपैकी दंतकथास्वरुपी परंपरागत विधानें तत्काली लोकांत तसली विधाने लिहून ठेवण्याची रीत होती किंवा नाही यांच्या परीक्षणानें ओळखून काढून, ती अविश्वसनीय म्हणून टाकून दिली पाहिजेंत. कारण कोणत्याहि माहितीची विश्सनीयता ती मूळ निरीक्षकाचें निरीक्षण जितके तंतोतंत व्यक्त करीत असेल त्यावरच अवलंबून असते. परंतु दंतकथातील माहिती कित्येक मध्यस्थांच्या द्वारांनी चालत आली असल्यामुळे तींत पुष्कळ बदल झाला असण्याचा संभव असतो, व मध्यस्थविषयक आपल्या अज्ञानामुळे त्या फेरफाराचें स्वरुप निश्चित करण्यास आपणांजवळ साधन नसतें. या दंतकथांपासून ऐतिहासिक गोष्टीचा बोध होत नसला तर तत्कालीन लोकांच्या कल्पनांचें ज्ञान त्यांवरुन आपणासं होऊं शकते.

जी परंपरागत विधानें लेखनद्वारा आलेली असतात ती मूळास कितपत धरुन आहेत हे पाहिले म्हणजे त्यांची विश्वसनीयता ठरवितां येते. मूळ उपलब्ध असल्यास याचा शोध कर्तृत्वसंशोधनांतच लागतो. परंतु तें गहाळ झालें असेल तेव्हा लेखकांस विशिष्ट विधानांतील माहिती असणें शक्य होतें काय, आणि त्याला मूळांत बदल करण्याची खोड होती काय, व असल्यास तो कोणत्या प्रकारचा फेरफार करीत असे याचा शोध केला पाहिजे. एखादे विधान भाषाद्दष्टीनें एकंदर लिखाणाशीं विसंगत असल्यामुळे जितके मूळावरुन जसेंच्या तसेंच घेतलेले दिसेल तितकी त्याची विश्वसनीयता अधिक समजावी.

परंतु विश्वसनीयता तपासतांना प्रत्येक पुराव्यांतील दोष पाहून सर्वच पुरावा बाजूला वगळणें हेंच इतिहासचिकित्सकांचे प्रधान कर्तव्य नाही. तर असत्यांतूनहि सत्य काढून माहितीच्या अभावानें अंकित असलेले क्षेत्र माहितीचें युक्त करणें हें त्याचें प्रधान कर्तव्य आहे, नाहीतर प्रत्येक पुराव्यांतील सदोषता दाखवून तो पुरावा वगळण्यास उपदेशिणे अगदी सोपे आहे, हें होतकरु चिकित्सकानें लक्षांत ठेवले पाहिजे. पुष्कळ वेळां लिखाणांतील अनेक विधानांच्या मूळ निराक्षकांच्या स्थलकालपरिस्थितीचा कांहीच पत्ता लागत नाही. असली विधानें भौतिकशास्त्रज्ञ कवडीमोल समजून टाकून देत असले तरी इतिहासकारास त्यांचा उपयोग करुन घेतां येतो. कारण इतिहासाच्या वाचकांची जिज्ञासा ढोबळ ढोबळ गोष्टीनीच तृप्त होऊं शकत असल्यामुळें सूक्ष्म गोष्टींच्या ज्ञानास आवश्यक असणारे निरीक्षणविषयक कडक नियम निरीक्षकानें पाळले नसले तरी त्याच्या निरीक्षणनिवेदनावरुन उपरोक्त ठळक ठळक गोष्टीचा बोध सहज होऊं शकतो. म्हणून निनांवी विधानापैकी देखील जी चुकीची किंवा असत्य असण्याचा संभव नसतो ती इतिहासकारास आपल्या उपयोगीसाठी निवडून घेतां येतात. या सदरांत कोणती विधानें येऊ शकतात याचें दिग्दर्शन खाली केले आहे. (१) पुढे दिलेल्या तीन प्रकारच्या विधानाच्या बाबतीत वस्तुविषर्यास करुन लेखकाचा काही फायदा होत नसल्यामुळे, किंवा तसें केले असता लबाडी उघडकीस येऊं शकत असल्यामुळें ती खोटी असण्याचा संभव नसतो. [अ] एखादें विधान, लेखकाची मतें, हितसंबंध, वृथाभिमान व वाङ्मयविषयक अभिरुचि यांना प्रतिकूल असल्यास त्यांत लबाडी असणें संभवनीय नसतें. परंतु या ठिकाणी लेखकाच्या हितसंबंधादि गोष्टीविषयी आपल्या स्वतःवरुन अनुमान काढल्यास आपले सिध्दांत सदोष राहण्याची भीति असते. जिच्या सत्यासत्यतेची चौकशी तत्कालीन लोकांकडून केली जाण्याचा संभव असून जिची शहानिशा त्यांना सहज करुन घेतां आली असती अशा माहितीसंबंधी असत्य विधान करण्यास लबाडी उघडकीस येण्याच्या भीतीनें लेखक सहसा प्रवृत्त होणार नाही. परंतु या भीतीचा आपल्या वाचकवर्गास ओळखणाऱ्या सुसंस्कृत आत्मसंयमी माणसावर जितका परिणाम होतो, तितका असंस्कृत मनाच्या विकारवश माणसावर होत नाही हे लक्षांत ठेवलें पाहिजे [इ] वर्णित गोष्ट लेखकाच्या द्दष्टीनें बिनमहत्वाची असते तेव्हां तत्संबंधी असत्य विधान करण्याचा त्याला मोह होण्यास कांहीच कारण नसतें. अगदी काल्पनिक कथा लिहिणाऱ्या लेखकास सुध्दां आपलें कथानक कांही वास्तविक गोष्टीच्या चौकटीत बसवूनच तयार करावें लागतें. त्या गोष्टी लेखकास व त्याच्या वाचकवर्गास परिचित असल्यामुळे महत्वाच्या नसल्या तरी , आपणांस त्यांपासून उपयुक्त माहिती गोळा करितां येते. (२) जी गोष्ट बराच काळ अस्तित्वांत असते, जी अनेक माणसांच्या निदर्शनास येऊं शकतें, व जिचें वरवर पाहणाऱ्याच्यांहि सहज ध्यानांत येण्याइतकें स्थूल वर्णन दिलें असतें अशा ढळढळीत दिसणाऱ्या गोष्टीसंबंधी माहितींत चुका होणें शक्य नसतें (३) ज्या गोष्टीत लेखकाचा विश्वास नसतो, ज्या त्याला दुर्बोध असतात किंवा ज्या त्याच्या मताविरुध्द असतात त्या लिहिणें भाग झाल्याशिवाय तो लिहिणार नाही.

सू क्ष्म प री क्ष णा च्या पू र्वो क्त वि वि ध क्रि यां चा व्य व हा रां त सं क्षे प त: उ प यो ग क र ण्या ची री ति. - आतां आपण येथपर्यंत वर्णन केलेल्या विविध क्रियाचा व्यवहारांत उपयो करण्याची संक्षिप्त पध्दति काय आहे तें पाहूं. प्रथमतः बाह्यपरीक्षण करीत असतांनाच लेखक व लिखाण यासंबंधी शक्य तितकी माहिती गोळा करावी, व आतांच सांगितलेल्या रीतीनें तिच्या सत्यासत्यतेच्या कसोटया मनांत आणून ती मनांत नीट बिंबवून ठेवावी. यानंतर लिखाण परीक्षणार्थ हाती घ्यावें. त्याची भाषा दुर्बोध असल्यास प्रथम ते लेखकार्यावबोध करुन घेण्यासाठी वाचून नंतर मग तदंतर्गत विधानांचें सत्यान्वेषण करण्याकरितां त्याचें परीक्षण करावें. परंतु लिखाणाचा अर्थ सुगम असला तर पहिल्याच वाचनांत त्यांतील विधानांचे परीक्षण करुन त्यांतील फक्त वादग्रस्त वाक्येंच मागून अभ्यास करण्यास्तव वेगळी काढून ठेवावी. या परीक्षणांत लिखाणांतील प्रत्येक विधान घेऊन, लेखक व लिखाण याविषयी मिळविलेल्या आपल्या पूर्व माहितीवरुन चुका व लबाडी होण्याच्या पूर्वोक्त करणांच्या अनुरोधानें त्याची यथार्थता निश्चित करावी.

अशा रीतीने आपणांस उपलब्ध लिखांणापासून पूर्वकालीन कित्येक वास्तविक गोष्टी व कल्पना हाती लागतील, व त्यांपैकी प्रत्येक कितपत संभवनीय आहे याचेंहि ज्ञान होईल.

इ ति हा स सं घ ट ने क रि तां सं शो धि त क ल्प नां ची नि व ड. - सूक्ष्म परीक्षणापासून काढलेल्या कल्पनांचा इतिहास संघटनेकडे उपयोग करुन घेण्याकरितां त्यांतील उपयुक्त कल्पनांची निवड कशी करावी हें आपण पाहूं. या कल्पनांचा उद्भव कोणच्याना कोणाच्या तरी मनांतून झालेला असतो. परंतु मनुष्याच्या मनांतील सर्व कल्पना नेहमी वस्तुस्थितीवरुनच घेतल्या जात असल्यामुळे, त्यांच्या मूळांशी असलेल्या गोष्टीना अस्तित्व असलें पाहिजें हे उघड आहे, म्हणून नाटकें, कादंबऱ्या, काव्यें, इत्यादी वाङ्मयात्मक ग्रंथातील कल्पनांचा अभ्यास करुन देखील त्यांचा पुढे दिलेल्या विशिष्ट मर्यादेच्या आंत प्राचीन कालासंबधी माहिती गोळा करण्याच्या कामी उपयोग करुन घेतला असतां तें वावगें होणार नाही (१) नीति, ललितकला इत्यादी गोष्टीसंबंधी कल्पना कर्त्याच्या समकालीन सर्व समाजास लागू करणें केव्हांहि रास्त होणार नाही. असल्याप्रकारच्या सामाजिक बाबतीतील कल्पनाविषयी लिखाणांतील कल्पना फार  झालें तर कर्त्याचे तत्संबधी विचार प्रगट करीत असतील. (२) भौतिक पदार्थांची वर्णनें देखील कल्पनेनेंच केली असण्याचा संभव असल्यामुळे, त्या कल्पानांची मूलभूत तत्वें हुडकून काढून केवळ त्यांचें अस्तित्व गृहीत धरले पाहीजे. एखद्या कवीनें सुवर्णकपाटांचे वर्णन केलें असले तर त्यावरून सुवर्ण व कपाटे यांचेच अस्तित्व फक्त सिध्द होते. (३) याप्रमाणें एखाद्या कल्पनेंचे किंवा पदार्थाचें अस्तित्व सिध्द झालें तरी त्याची व्याप्ति सर्वसामान्य होती असे म्हणता येणार नाही. (४) पुन्हां या पदार्थाचे किंवा कल्पनांचें अस्तित्व कोणत्या काळी व कोणत्या देशांत होते हेंहि नक्की ठरविता येत नाही. कारण प्राचीन काळांतील किंवा परदेशांतील लोकांपासून कल्पना घेऊन कर्त्यानें तिचा स्वतः उपयोग करणें ही कांही संभवनीय गोष्ट नाही.

तुटपुंजी माहिती उपलब्ध असलेल्या काळासंबधी विचार करीत असतांना ज्या उघड शिक्षणाच्या साध्या गोष्टीचें कर्त्यानें विचार न करतां वर्णन केले असेल तीहि व्यवहारांत खरी मानून चालावयास कांही हरकत नाही. अगदी उघड उघड दिसणाऱ्या साध्या गोष्टीची वर्णने कर्त्याला न कळत त्याच्या लेखणीतून यथातथ्य उतरत असततात.

सं शो धि त वि धा नां ची य था र्थ ता.- सूक्ष्म परीक्षणानें लिखाणांतून विधानांची यथार्थता नेहमी डळमळीतच असते. यांपैकी प्रत्येक विधानांची सत्यता कमीअधिक प्रमाणांत संभवनीय आहे. एवढेंच काय तें आपणांस बिनधोक सांगता येईल. लिखाणांतील विधानें प्रत्यक्ष निरीक्षण करुन ताबडतोब असंदिग्ध भाषेत लिहून ठेवली जात नसल्यामुळें त्याचें यथार्थत्व सिध्द करण्याकरितां दुसऱ्या समर्थनपर विधानांची फार जरुरी असतें. म्हणून लहान लहान चिठयांचा उपयोग करुन एकच प्रकारची सर्व विधानें एके ठिकाणी येतील असें त्याचें वर्गीकरण करावें तें झाल्यानंतर (१) एखाद्या गोष्टीविषयी एकच विधान उपलब्ध असल्यास त्याचा कोणत्याहि प्रकारें उपयोग करुन घेऊं नये; फार झालें तर निरीक्षकाच्या नांवासह त्याचा उल्लेख मात्र करावा. (२) दोन किंवा अधिक विधानें परस्परविरोधी आहेत असें आढळून येऊन ती एकाच गोष्टीसंबंधी आहेत अशी आपली पूर्ण खात्री झाली तर, [अ] त्यांपैकी सर्वच संशयात्मक असल्यास किंवा [आ] अनेक संशयात्मक विधानें एकमेकांशी जुळत असून, ती ज्याविषयी संशय घ्यावयास जागा नाही अशा एकाच विधानाविरुध्द असल्यास, ती सर्व त्याज्य समजावी; परंतु [इ] परस्परविरोधी दोन विधानांपैकी एक संशयात्मक, व दुसरें यथार्थ असणें पुष्कळ अंशी संभवनीय असल्यास दुसरें ग्रहण करावें.

इतिहाससंशोधकानें विधानांच्या साम्याचें परीक्षण करीत असतांना फक्त स्वतंत्र निरीक्षणानें केलेली विधानेच जमेस धरावी. सामाजिक हकीकतीतील तपशिलाच्या विविधत्वामुळे, व त्याचें निरीक्षण करण्याचा द्दष्टिकोन माणसागणिक भिन्न असल्यामुळे दोन विधानांचा तपशील अनुक्रमानें जुळला तर ती स्वतंत्र निरीक्षणनें केलेली नाहीत असें साफ समजावें. भिन्न भिन्न प्रकारच्या, भिन्न भिन्न लेखकांनी, भिन्न भिन्न परिस्थितीत, भिन्न भिन्न लिखाणांत, नमूद केलेली निरीक्षणेंच स्वतंत्रपणें केली गेली होती असें खात्रीपूर्वक म्हणतां येते. म्हणून इतिहाससंशोधकानें हे लक्षांत ठेविले पाहिजे की, प्राचीन काळासंबंधी एकमेकांशी तपशीलवार जुळणाऱ्या हकीकती खऱ्या विश्वसनीय नसून, थोडक्याच बाबीत मधून मधून दिसून येणारे साम्य विधानांची विश्वसनीयता प्रगट करतें.

सु सं ग ति आ णि स त्य ता. - या अनुमानांपासून सुसंगत हकीकत तयार करितां आली तर त्यांच्यासंबंधी वाटत असलेला व्यक्तिविषयक संशय पार मावळून जाऊन; सुसंबध्दतेमुळे येणारा निश्चितपणा त्या हकीकतीला प्राप्त होतो. एखाद्या राजाच्या प्रवासवर्णनांतील तारखा व स्थळें परस्पराशी विसंगत नसली व त्यापासून प्रवास वर्णनाची सुसंगत हकीकत आपणांस तयार करितां आली तर, प्रत्येक स्थळाच्या तारखेच्या सत्यतेबद्दल आपणांस खात्री वाटूं लागते. किंवा एखाद्या संस्थेच्या अथवा रुढीच्या वर्णनांतील सर्व विधानें सुसंगत असली तर त्यांवरुन तयार केलेल्या हकीकतीच्या सत्यतेबद्दल आपणांस संशय येणार नाही.

ऐ ति हा सि क वि धा नां चा इ त र शा स्त्रां ती ल सि ध्दां तां शी वि रो ध दि सू न आ ल्या स का य क  रा वें - भौतिक शास्त्रांच्या सिध्दांतांविरुध्द असलेल्या लिखांणातील गोष्टीवर कोणीहि इतिहाससंशोधकानें विश्वास ठेऊं नयें चमत्कारांवर विश्वास ठेवण्याकडे माणसाची इतकी प्रवृत्ति असते की, जुन्या कागदपत्रांत भुताखेतांच्या अस्तित्वाबद्दल जितका पुरावा सांपडतो तितका समुद्रगुप्तासारख्या एखाद्या ऐतिहासिक पुरुषाच्या अस्तित्वाबद्दलहि सांपडणार नाही. असें असलें तरी इतिहाससंशोधकांनें भुताखेतांसंबंधी गोष्टी टाकून देऊन समुद्रगुप्ताचेंच अस्तित्व कबूल केले पाहिजे. त्याने आपल्या शोधामुळे भौतिकशास्त्रांत क्रांति घडवून आणण्याच्या भरीस पडूं नये. कारण भौतिक शास्त्रांतील ज्ञान प्रत्यक्ष अनुभवानें मिळविलेले असते; परंतु इतिहासांतील माहिती अप्रत्यक्ष ज्ञानानें मिळविली जात असल्यामुळें त्याचा दर्जा नेहमी कमीच रहाणार. भौतिक शास्त्रांमध्ये क्रान्ति घडून येणें असंभवनीय आहे असें नाही; परंतु तज्ज्ञांनीच घडवून आणली पाहिजे. इतिहाससंशोधकास या बाबतीत हात घालतां येत नाही. उलटपक्षी त्यानेंच पूर्वी झालेल्या शास्त्रीय शोधांचा, आपल्या लिखांणाचा अर्थ लावण्याकडे व आपल्या शोधांची यथार्थतातपासून पाहण्याकडे उपयोग करुन घेतला पाहिजे. इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र, इत्यादी अपूर्णावस्थेंत असलेल्या शास्त्रांच्या सिध्दांताविरुध्द जर ऐतिहासिक परीक्षणांत कांही आढळून आलें, तर या शास्त्रांतील संस्थापित झालेली जुनी तत्वें चूक ठरविण्यास आपल्याजवळ सबळ पुरावा असल्याखेरीज इतिहाससंशोधकानें तें मान्य करुं नये.

इ ति हा स र च ने च्या सा मु ग्री चें स्व रु प. - इतिहाससंशोधकानें इतिहासरचनेकरितां निवडून काढलेल्या वस्तुस्थितिदर्शक पृथकूकृत विधानांपासून सुसंगत इतिहास तयार करणें हें इतिहासकाराचें काम आहे. परंतु इतिहासरचनेचे काम सर्वस्वी उपलब्ध सामुग्रीवरच अवलंबून असल्यामुळें ते ठराविक नमुन्यावरहुकूम करणें शक्य नसते ही गोष्ट इतिहासमीमांमसकांनी ध्यानांत ठेवावी. ऐतिहासिक प्राचीन वस्तु क्रिया व हेतू व अर्वाचिन वस्तुक्रिया हे परस्पर भिन्न नाहीत असें गृहीत धरुन आपण त्याची कल्पना करीत असतो. या गृहीत साद्दश्याच्या अभावी प्राचीन लिखाणांचा बोध होणें केवळ अशक्य आहे. परंतु आपणांस ज्या प्राचीन गोष्टीची कल्पना करावयाची असते त्याचें आधुनिक गोष्टीशी पूर्ण साद्दश्य नसल्यामुळे इतिहासांत अनेक चुका होण्यास जागा राहते. भौतिक शास्त्राच्या परिभाषेतील प्रत्येक शब्दाची पूर्ण व्याख्या केली असल्याकारणाने त्यात चुका होण्याचा संभव नसतो; परंतु हा नियम व्यावहारिक भाषेच्या शब्दासंबंधी पाळला जात नसल्यामुळें व विशेषतः एखादा शब्द जितका अद्दश्य अशा मानसिक कल्पनांचे ज्ञान करुन देण्यास योजिला असेल तितका त्याचा अर्थ अनिश्चित राहात असल्यामुळें कल्पनामूलक ऐतिहासिक ज्ञानांत चुका होण्याची भीति विशेष असते.

परंतु इतिहासरकारास तर अशी कल्पना केल्याशिवाय दुसरा तरणोपायच नसतो. व म्हणून कोणत्याहि गोष्टीची सामुग्री लिखाणांतील वाक्यांचे पृथक्करण करुन मिळवली असल्याकारणानें इतिहासकाराच्या हाती शेकडो तुटक तुटक, लहान लहान विधानेंच काय ती येत असतात, व तीहि अगदी अस्ताव्यस्त स्थितीत असतात. या ऐतिहासिक विधानांतील विशेषत्व म्हटले म्हणजेः-(१) एकाच लिखाणांतून हस्ताक्षर, भाषा, लिपी, व्यक्तिविषयक मतें, ऐतिहासिक प्रसंग, इत्यादी परस्परभिन्न गोष्टीविषयी माहिती मिळत असल्यामुळें या विधानास विविधत्व आलें असतें; (२) सामाजिक चालीसारख्या सामान्य विधानापासून तो एखाद्या व्यक्तिच्या तोंडून निघालेल्या शब्दासारख्या तुटक विधानापर्यंत निरनिराळया दर्जाची सामान्य विधानें या सामुग्रीत आढळून येतात; (३) प्रत्येक विधान विशिष्ट स्थल व काल यांनी मर्यादित असल्यामुळे इतिहासकारास भिन्न भिन्न ठिकाणच्या व भिन्न भिन्न काळांतील विधानांचा पृथक पृथक अभ्यास करावा लागतो; आणि यांपैकी प्रत्येक विधानाची सत्यता कमी अधिक प्रमाणांत निश्चित झालेली असते. याप्रमाणे भिन्न भिन्न ठिकाणच्या भिन्न भिन्न काळांतील कमीअधिक प्रमाणांत व सामान्य असलेल्या विजातीय विधानांच्या असंबध्द अणुरेणूंचा इतिहासकारास उपयोग करुन घ्यावयाचा असल्याकारणानें नमुन्यावर हुकूम काम होणे शक्य नाही पण या कामास पध्दत नाही असेहि नाही. सजातीय विधानें वेगळी काढून त्यांचे सोइस्कर वर्गीकरण कसें करावयाचें हे निश्चित करणे अवश्य आहे. संशोधित विधानांपासून (१) प्राणी, भौतिक पदार्थ, (२) मानवी कृत्यें आणि (३) त्यांचे हेतू व पूर्व कल्पना या तीन प्रकारच्या वास्तविक गोष्टीचें ज्ञान होऊं शकतें. यांपैकी भौतिक वस्तु व प्राणी यांचे ज्ञान मूळ लेखकास जरी निरीक्षणानें झालें असलें तरी, आपणांस तर त्याच्या अनुभवाची कल्पना स्वानुभवांतील वस्तूवरुन करावी लागते. त्याचप्रमाणें प्राक्कालीन मानवी कृत्याचेंहि लेखकांचे ज्ञान नीरिक्षणजन्य असतें तरी आपणांस ऐतिहासिक कृत्यांची व्यवहारांतील तत्सम माणसांच्या कृत्यावरुन कल्पना करण्याशिवाय गत्यंतर नसतें. मानवी कृत्यांचे हेतु व कृत्यें करणाऱ्यांच्या त्याविषयी पूर्वकल्पना या दोन्हीहि गोष्टीचें ज्ञान प्रत्यक्ष तत्कालीन निरीक्षणावरुन करता येत नसून त्याची कल्पना मनुष्यस्वभावाच्या ज्ञानावरुनच करावी लागते. लिखाणापासून यासंबधी मिळविण्याची माहिती तीन प्रकारची असते. (१) लेखकानें दिलेले स्वतःचेच हेतू अथवा पूर्व कल्पना, (२) लेखकानें दिलेले स्वतःच्या समकालीन माणसाचे हेतु अथवा पूर्वकल्पना, आणि (३) लिखाणांतील कृत्यांचे आपणच आपल्या स्वतःवरुन काढलेले हेतू अथवा पूर्व कल्पना.

यावरुन एक गोष्ट उघड होते की, बहुतेक प्राचीन गोष्टी विषयी आपले ज्ञान भौतिक शास्त्रांतील गोष्टीप्रमाणे निरीक्षणात्मक नसून केवळ कल्पनामूलच असते. चित्र काढीत असतां त्यांत पुष्कळशा काल्पनिक भागाचा समावेश होतोच. याकरितां इतिहासकारानें इतिहासाची जुळवणी करीत असतां या चित्रांतील लिखाणांतून घेतलेल्या सत्यांशाचेच फक्त ग्रहण केले पाहिजे. उदाहरणार्थ, श्रीहर्षाच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धांतील बुध्दाच्या मूर्तीच्या मिरवणूकीचे चित्र डोळयापुढे आणतांना चिनी प्रवाशाच्या वर्णनांतून यथार्थ म्हणून घेतलेल्या भागाशिवाय दुसऱ्या कित्येक गोष्टी त्यांत घालाव्या लागतील. परंतु इतिहासांत हा भाग घालतांना केवळ सत्यांशाचाच उपयोग केला पाहिजे. चित्राच्या पूर्णतेसाठी उसन्या घेतलेल्या दुसऱ्या कोणत्याहि गोष्टींस इतिहासांत थारा देता कामा नयें.

इ ति हा स र च ने च्या का मां ती ल मु ख्य अ ड च णी व त्यां व र उ पा य - यावरुन असें दिसून येईल की, भौतिक वस्तूंचे थोडेसे अवशेष खेरीज करुन बाकीच्या कोणत्याहि प्राक्कालीन गोष्टीचें जें कल्पनाचित्र लिखाण वाचीत असतांनाच त्यांतील तटपुंज्या माहितीवरुन आपल्या अंतश्चक्षूंपुढें नकळत उभे राहतें तें बहुतांशी अर्वाचीन कल्पनांनी रेखाटलेले असतें. पण प्रत्येक प्राचीन गोष्ट अर्वाचीन गोष्टीप्रमाणे नव्हती इतकेच नव्हे तर या दोहोंतील वैषम्याच्या अभ्यासानेंच इतिहासात मनोरंजकता येत असल्यामुळें, लिखाणांत द्दश्य होणाऱ्या एखाद्या गोष्टीच्या बर्णनपर माहितीतील निरनिराळया मुद्याच्या स्वानुभावावरुन केलेल्या कल्पनांचे एकिकरण करुन, आपण मूळ गोष्टीचें  शक्य तितकें हूबेहूब चित्र आपल्या डोळयासमोर आणण्याचा प्रयत्न करावा.

व्यवहारांतील आपले निरीक्षण नेहमी व्यक्तिविषयकच असल्या कारणाने लिखाणांतील निरीक्षणात्मक माहितीहि व्यक्तिविषयकच असते; व म्हणून परस्परसंबंध कळण्याकरितां जी परिस्थित्यात्मक व समुच्चयात्मक कल्पना मनुष्यास असावी लागतें ती आपणांस झालेली नसतें. यामुळें आपल्या अनुभवावरुन समाजाचें किंवा त्याच्या विकासाचें किंवा अंशात्मक अवस्थेचें एक कल्पनाचित्र तयार करुन त्याच्या चौकटीत लिखाणांतील संशोधित माहिती अंर्तभूत करण्याशिवाय गत्यंतर नसतें. प्राचीन काळची वस्तुस्थिती आपणांस प्रत्यक्ष पाहता येणें शक्य नसल्यामुळें त्या काळांतील विवक्षित गोष्टी कोणत्या परिस्थितीत घडल्या होत्या याविषयी बरोबर कल्पना येण्याकरितां आपणांस हल्लीच्या समाजाचें किंवा विकासाचें किंवा कार्यक्रमाचें निरीक्षण करुन त्यासारख्या गोष्टी आज कोणत्या परिस्थितीत घडत आहेत हें पाहिले पाहिजे. प्राचीन व अर्वाचीन गोष्टी यांमध्ये वैषम्य असण्याचा पुष्कळ संभव असला तरी मनुष्याची शरीरघटना व मनोरचना निश्चित असल्यानें हे सर्व फरक कांही विशिष्ट मर्यादेच्या आंतच घडून येत असतात म्हणून मनुष्याच्या जीवनक्रमांत ज्या सर्वसामान्य गोष्टीची आपण अपेक्षा करतो त्यांची एक यादी तयार केली असतां ती संशोधित विधानांची स्वाभाविक वर्गवारी करण्यास उपयोगी पडेल.

प्रत्येक समाजाच्या किंवा व्यक्तीच्या आयुष्यांत अनपेक्षित असे जे शेकडों प्रसंग येतात त्यांचा पूर्वोक्त सर्वसामान्य गोष्टीमध्यें समावेश होऊं शकत नाही तरी त्यांचा अभ्यास केल्याशिवाय इतिहासकारास प्राचीन काळचें चित्र रंगविता येणें शक्य नसल्यामुळें लिखाणाचें वाचन चालले असतांनाच त्या गोष्टीचें पूर्ण ज्ञान होण्यास जे मुद्दे आवश्यक म्हणून सुचतील ते टिपून ठेऊन व आपल्या अनुभवांतील तत्सदृश गोष्टींच्या विवेचनांत जे मुद्दे देण्यांत येतात. त्यांचहि अभ्यास करुन आपणांस आणखी कोणते मुद्दे देण्याची आवश्यकता आहे ते ठरवून त्यांची यादी केली म्हणजे त्या वास्तविक गोष्टीचें वर्गीकरण कसें करावयाचें याची योजना तयार होईल.

याप्रमाणें इतिहासरचनेकरितां आपणांस कोणकोणत्या गोष्टीसंबधी माहिती अवश्य आहे हे प्रस्तुत समाजाच्या अवलोकनानें ठरवून व त्यांची यादी करुन प्रत्येक गोष्टीविषयी लिखणांतील संशोधित विधानांतून काय माहिती मिळूं शकते असा प्रश्न विचारीत गेले म्हणजे सजातीय विधानें एके ठिकाणी येऊन सर्व संशोधित विधानांचे संगतवार वर्गीकरण होईल.

इ ति हा स र च ने च्या का र्या ची रु प रे खा - पूर्वोक्त विवेचनावरुन इतिहासरचनेच्या कार्याची रुपरेखा साधारणतः पुढे दिल्याप्रमाणे आपणास आखता येईलः-

१ प्रथमतः प्रत्येक संशोधित गोष्टीचें तिच्या निरनिराळया भागाशी साम्य असणाऱ्या ज्या ज्या कांही गोष्टी आपणांस आपल्या सभोवताली दिसतील त्या सर्वांचें एकीकरण करुन हुबेहुब कल्पनाचित्र तयार करावें. हें काम लिखाण वाचीत असतांनाच नकळत माणसाकडून होत असल्यामुळें त्यांत चुका होऊ न देण्याकरितां  कोणती काळजी घेतली पाहिजे याचें पूर्वीच दिग्दर्शन केले आहे.
२ यानंतर प्रस्तुत समाजाच्या अवलोकनावरुन ज्या सामान्य गोष्टीची आपण प्राचीन समाजांतहि अपेक्षा करितो त्यापैकी प्रत्येकासंबंधी आपणांस जी काय माहिती मिळूं शकते ती वेगळी काढली असतां सजातीय गोष्टीचें निरनिराळे विभाग होऊन सर्व संशोधित विधानें पध्दतशीर रचली जातील.

३ याप्रमाणें रचलेल्या संशोधित विधानांत ऐतिहासिक माहितीच्या अभावामुळें बराच लहानमोठी खिडारें राहिलेली आढळून येतील; त्यांपैकी कांही ज्ञात गोष्टीवरुन अनुमानानें भरुन काढून तर्कशास्त्राच्या मदतीने ऐतिहासिक माहितीत भर टाकण्याचा प्रयत्न करावा.

४ यानंतरचे कार्य म्हटले म्हणजे आपण जुळविलेली सर्व माहिती बीजगणितांतील सूत्रवत् सिध्दांताप्रमाणे संकलित करुन निरनिराळया गोष्टीचें परस्पर संबंध व सामान्य गुणधर्म दाखवावयाचे हें आहे. एवढे झाले म्हणजे इतिहासरचनेंचे काम पूर्ण होते.

५ परंतु ऐतिहासिक ज्ञान स्वभावतःच क्लिष्ट व अफाट असल्यामुळे आपला ग्रंथ वाचकवर्गास सुबोध करण्याकरितां चांगलीशी विवरणपध्दति शोधून काढली पाहिजे.

मागें सांगितलेल्या सर्व क्रियांची मीमांसा जरी इतक्या स्पष्टपणें करिता येते तरी व्यवहारातं ऐतिहासिक ग्रंथ बहुष:सदोष राहिलेले आढळून येतात. याचें कारण असें आहे की, ऐतिहासिक साधनांच्या शोधापासून इतिहासरचना संपूर्ण होईपर्यंत इतके काम असतें की एका माणसाच्शा हातून ते चांगल्या रीतींने पार पडणें अशक्यच असतें. परंतु इतिहासशास्त्रात बाह्यचिकित्सेच्या कामाशिवाय इतरन्न कोठेंहि श्रमविभागणी होऊन प्रत्येकाचे कार्यक्षेत्र आखले गेले नसल्यानें ऐेतिहासिक विषयावर पुस्तक लिहिणाऱ्यास दुसऱ्याच्या ग्रंथातील कोणती माहिती विश्वसनीय समजून गृहीत धरावयाची हे कळत नाही, व त्यामुळे त्याच्या ग्रंथात अनेक दोष राहतात. या करिता असें करावे की दुसऱ्या ग्रंथातील कोणतेहि सिध्दांत गृहीत धरुन न चालता एखाद्या लिखाणांप्रमाणेच त्याचेहि संशोधन करुन, मूळ माहिती वरुन ग्रंथकर्त्यानें प्रत्येक वेळी बरोबर सिध्दांत काढले आहेत किंवा नाही हें पहात जावें. असें केल्यानें आमूलांत संशोधन करुन ग्रंथ लिहिण्यास लागणाऱ्या बऱ्याच वेळाची काटकसर होऊन आपल्या ग्रंथात दोष राहण्याचा संभवहि पुष्कळ कमी असतो.

सं शो धि त वि धा नां च्या व र्गी क र णां ची यो ज ना. - लिखणांतून काढलेली सर्व विधानें मनुष्यासंबंधीच असल्यानें त्याच्या सर्वसामान्य व्यापरांची पुढें दिल्याप्रमाणें एक यादी तयार करुन प्रत्येक व्यापारासंबधी सामुग्रीतील माहिती वेगळी काढली असतां सर्व सजातीय विधानें एकेठिकाणी येतील.

(अ) भौतिक परिस्थितिः - (१) शरीर विषयक माहिती-शरीर वर्णन, तत्संबंधी आंकडे; (२) भूगोलविषयक परिस्थिति नैसर्गिक, कृत्रिम. (आ) बौध्दिक चालीः-(१) भाषा, (२) कला, (३) शास्त्रे, (४) तत्वज्ञान व नीति, (५) परमार्थ विषयक समजुती; (इ) व्यावहारिक चालीः-(१) भौतिक जीवनक्रम-अन्न, पोषाख व भूषणें, वसतिगृहे; (२) खासगी आयुष्यक्रम कालक्रमण, सामाजिक समारंभ, करमणुकीची साधने; (ई) आर्थिक चालीः-(१) अर्थोत्पादन शेतकी, खनीजद्रव्ये, (२) उद्योगधंदे (३) व्यापार, (४) अर्थ विभागणी; समाज संस्था (१) कुंटुबे (रचना व आर्थिक संघटना) (२) शिक्षण, (३) सामाजिक वर्ग; (उ) सार्वजनिकसंस्था-(१) राजकीय संस्था सत्ताधीश, राज्यकारभार, लोकांनी निवडलेल्या अधिकाऱ्यांच्या संस्था; (२) सांप्रदायिक संस्था, (३) आंतर्राष्ट्रीय संस्था-राजकारण, युध्द, व्यापार, खासगी कायदे.

वरील यादीप्रमाणे वर्गीकरण झाल्यावर प्रत्येक सदरांतील गोष्टीचें स्थलविषयक व कालविषयक वर्गीकरणे केली असतां त्यावरुन आपणांस निरनिराळया देशांतील अथवा काळांतील त्या त्या मानवी व्यापारांचा इतिहास लिहिण्यास साधनें मिळून, निरनिराळया प्रकारची माहिती प्रसिध्द करितां येईल.

याप्रमाणें वर्गीकरण झालेल्या गोष्टी कोणत्या क्रमाने कथन करावयाच्या हे आपल्या विवरणपध्दतीवर अवलंबून राहील. एका काळांतील सर्व गोष्टी एकेठिकाणी द्यावयाच्या किंवा एका देशाविषयी सर्व माहिती एकत्र द्यावयाची किंवा गोष्टीच्या स्वरुपावरुन त्यांचा ऐतिहासिक क्रम ठरवावयाचा, यापैकी कोणत्या तरी एकाच पध्दतीचा स्वीकार करुन इतिहासांत चालत नाही. म्हणून, यांतील एकीस प्रमुखत्व देऊन दुसऱ्या दोन्हीचा सोयीप्रमाणें उपयोग करावा.

सा मा न्य वै य क्ति क कृ त्यें. - कांही वैयक्तिक कृत्यांचे परस्परांशी इतके साद्दश्य दिसून येतें की, त्यांच्या समुच्चयास आपण ''संस्था'' असें नांव देतों. राजकीय इतिहासाखेरीज करुन इतिहासाच्या बहुतेक सर्व विशेष अंगातील कृत्यांत असें सामान्य स्वरुप द्दष्टोत्पत्तीस येते; परंतु राजकीय इतिहासांतील राजकर्त्यांच्या परस्पर भिन्न कृत्यांत मात्र असे सामान्य तत्व शोधून काढणें फार कठिण असतें. मानवी संस्कृतीचा अभ्यास करणें, हें जरी इतिहासाचें मुख्य ध्येय असलें तरी सर्व वैयक्तिक कृत्यें एकत्र करुन त्यांतील सामान्यत्व पथक् केल्यावरहि पूर्वोक्त राजकीय इतिहासांतील जी कांही कृत्यें शिल्लक राहतील त्यांना वगळलें असतां बाकीचा इतिहास नीट समजूं शकत नसल्यानें इतिहासकारांस ती टाकतां येत नाहीत व म्हणूनच मानवी संस्कृतीच्या इतिहासाबरोबरच लढाया वगैरे राजे लोकांच्या वैयक्तिक कृत्यांचीहि आपणास गरज असते.

मा न वी सं व यी, चा ली व सं स्था. - मागें दिलेल्या कोष्ठकावरुन आपणांस कोणत्या मानवी संस्थाचा सवयीचा चालीचा व रीतीभातीचा इतिहास लिहितां येतों हें उघड दिसून येईल. अशा प्रकारचा एखादा इतिहास लिहिण्याकरितां ती संस्था कोणत्या व्यक्तीमध्ये रुढ होती हें अगोदर नीट ध्यानांत आणावें. कारण एखाद्या भाषेचा अभ्यास करण्याकरितां जर आपण कांही विशिष्ट व्यक्तीचा समूह घेतला तर कलेच्या अभ्यासार्थ आपणांस तोच समूह घेता येणार नाही. मराठी भाषा बोलणारांचा समाज घेतला की त्यांतील कांही व्यक्तीवरुन सर्वांची राजकीय मते पारमार्थिक कल्पना इत्यादी निरनिराळया गोष्टीसंबधी सिध्दांत काढण्याकडे जी माणसाची नैसर्गिक प्रवृत्ति असते तिला आपण बळी न पडले पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हटली म्हणजे:- समजा आपण मराठी भाषेचा इतिहास लिहिण्याकरितां ती भाषा बोलणाऱ्यांचा समाज घेतला, तरी देखील त्यांतील सर्व व्यक्तीच्या भाषेत आपणांस पुर्ण साद्दश्य आढळून येणार नाही. नागपूर, खानदेश व कोंकण या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषांमध्ये आपसांत थोडाबहुत फरक आढळून येईलच. उलटपक्षी हिंदी, बंगाली वगैरे कांही भाषांचे परस्परांशी कमी अधिक प्रमाणांत साद्दश्यहि आढळून आल्यावांचून राहणार नाही.

याकरितां कोणताहि समूह घेतला की त्याचे पोटविभाग कोणते आहेत,  व तो स्वतः कोणत्या मोठया समूहाचा पोटभाग आहे याचाहि विचार करणे प्राप्त आहे.

अशा रीतीने भाषा, कला इत्यादी संस्थांचा म्हणजे आचरणपरंपरेचा व कर्तृत्वपरंपरेचा अभ्यास करण्यास फारसा त्रास पडत नाही. विशिष्ट चाल काय होती, तिला प्रचारांत कोणी आणलें व तिचा पुढे स्वीकार करणारे कोण होते किंवा पूर्वगत सद्दश चालीची ही विकृति होय इतक्या गोष्टी निश्चित केल्या म्हणजे काम भागतें. परंतु सामाजिक किंवा राजकीय संस्थांची गोष्ट अगदी निराळी असते. या जरी संवयीने मनुष्यास परिपाठांतल्या वाटूं लागतात तरी त्या केवळ स्वेच्छेनें होत नसतात. यांतील सामाजिक किंवा आर्थिक संस्थाचा अभ्यास करतांना त्यांच्या श्रमविभागणीचें व वर्गविभागणीचें तत्व काय होते, ते विभाग कोणते होते, त्यांत कोणत्या व्यक्तीना घेण्यांत येत असे व त्यांचे परस्पर संबंध काय होते, हें शोधून काढावें लागतें. राजकीय संस्थाच्या बाबतीत पुढें दिल्याप्रमाणें आणखी दोन प्रकारची माहिती पाहिजे. (१) प्रथमतः सत्ता कोणाच्या हाती होती, व ती विभागली गेली असल्यास, या अधिकार विभागणीचा अभ्यास करुन, स्थानिक, मध्यवर्ति व वरिष्ठ सरकाराविषयी आपणांस काय माहिती मिळूं शकते हें पाहून नंतर प्रत्येक अधिकारीवर्गांतील जागा कोणाला दिल्या असत, त्यांचे नेमून दिलेले अधिकार काय होते व त्याच्या हातात वास्तविक सत्ता किती होती याचा शोध करावा. (२) त्याचप्रमाणें त्यांच्या कामकाजाचे नियम कोणत्या स्वरुपांत होते, व काय होते; नियमांचा व्यवहारांत उपयोग करण्याची वहिवाट काय होती, आणि त्यांचा दुरुपयोग कितपत केला जात असें हे देखील शोधून काढावें.

एका समाजासंबंधी सर्व माहिती मिळविली म्हणजे त्याचा इतर समकालीन समाजांत दर्जा काय होता हें ठरविण्यासाठी सार्वराष्ट्रीय संस्थाचा अभ्यास करुन या सर्व समाजांत कोणकोणत्या रीती अगर संस्था सामान्य होत्या व त्यांचे आपसांतील दळणवळणासंबंधी खासगी  नियम काय होते हेंहि  पहावें.

मा न वी सं स्था च्या उ त्क्रां ती चा अ भ्या स व त्यां त वै य क्ति क कृ त्यां चें स्था न. - वर दर्शविल्याप्रमाणें अभ्यास केला असतां अमुक एक वेळी एखाद्या समाजाची स्थिति काय होती हे ध्यानांत येईल; परंतु मनुष्याच्या संस्था हळूहळू बदलत जाऊन शेवटी त्यांचे इतके रुपांतर होते की, त्या मूळ संस्थाहून अगदी भिन्न वाटूं लागतात. प्रत्येक मानवी संस्थांची याप्रमाणें विकास अगर उत्क्रांती होते व याचाच इतिहासांत अभ्यास करावयाचा असतो. याकरिता मागें दिलेल्या कोष्ठकांतील प्रत्येक बाबीत उत्क्रांति काय झाली हे पहात गेले पाहिजे. असें करताना अगोदर कोणत्या गोष्टीच्या उत्क्रांतीचा आपणांस अभ्यास करावयाचा आहे हे नीट ठरवून मग ती किती काळांत झाली, तिच्यांतील निरनिराळया अवस्था काय होत्या व तो कोणत्या साधनांनी घडून आली या सर्वाविषयी विचार केला पाहिजे.

शास्त्रीयद्दष्टया पाहिले तर समाजांमध्ये प्रत्येक रीतीची, पध्दतीची किंवा संस्थेची नेहमी एकाच दिशेनं उत्क्रांति व्हावयास पाहिजे व असें झाले असते, तर निरनिराळया समाजांचा पृथक् इतिहास लिहिण्याची गरजच पडली नसती; परंतु समाजाच्या आयुष्यांत यद्दच्छेनें जे कांही विविध प्रसंग येत असतात त्यावरुन या उत्क्रांत्याना भिन्न भिन्न वळण लागत असल्यामुळे आपणास समाजाच्या आयुष्यात वैचित्र्य आढळून येते व म्हणूनच या प्रसंगाचा अभ्यास केला नाही, तर समाजाचा इतिहास दुर्बोध होईल. हिंदुस्थानच्या  इतिहासांत मुसुलमानांच्या स्वारीच्या नामनिर्देशहि केला नाही, तर भाषा, रुढी इत्यादी गोष्टीनां आज जें निराळे वळण लागले आहे त्याचा खुलासा कसा होईल?

एखाद्या अनुकरणीय किंवा सत्ताधारी व्यक्तीच्या क्षुद्र कृत्यांचाहि सामाजिक उत्क्रांतीवर परिणाम होऊं शकत असल्याकारणानें कोणत्याहि ऐतिहासिक कृत्याचें महत्व त्यायोगे सामाजिक उत्क्रांतीवर जितक्या कमीअधिक प्रमाणांत परिणाम झाला असेल त्यावरुनच ठरवावें. अशी महत्वाची सर्व कृत्यें निवडून घेतली म्हणजे ती कालानुक्रमानें लावून ज्या ज्या ठिकाणी त्यांचा परिणाम घडून आला असेल त्या त्या ठिकाणी घालावी.

याप्रमाणे इतिहासाच्या निरनिराळया अंगाची रचना झाल्यावर त्यावरुन आपणास सामान्य इतिहास लिहितां येईल. मागें आपणास मनुष्याच्या भिन्न भिन्न रीतीमध्यें जी उत्क्रांती झालेली आढळून आली यांचे कारण खास मनुष्यांतच उत्क्रांति होत होती हे होय. ज्या प्रसंगामुळे मनुष्याच्या उत्क्रांतीस चालन मिळत असतें, त्याचा परिणाम कमीअधिक प्रमाणांत त्याच्या प्रत्येक संस्थेवर झाल्याशिवाय रहात नाही. याकरिता ज्या प्रसंगाचा सर्व संस्थाच्या उत्क्रांतीवर प्रामुख्याने परिणाम झाला असेल, ते शोधून काढून त्यांचा सामान्य इतिहासांत समावेश करण्यांत यावा व त्यायोगें मनुष्याची सर्वांगांमध्ये उत्क्रांति कसकशी होत गेली हे दाखविण्यांत यावें.

उपरोक्त विवेचनावरुन मानवी संस्कृतीच्या इतिहांसात वैयक्तिक कृत्यांचा परिणाम किती व कसा होतो व म्हणून या वैयक्तिक कृत्यांची देखील इतिहासांत कशी आवश्यकता असते हे दिसून येईल.

 ऐ ति हा सि क ग्रं था चे भा ग पा ड ण्या ची प ध्द ति - ऐतिहासिक गोष्टीचा अभ्यास करीत असतांना त्याचे निरनिराळे भाग पाडण्याची चाल बरीच पुरातन असून ती उपयुक्तहि आहे. जेव्हा इतिहासाच्या एखाद्या विशिष्ट अंगावर ग्रंथ लिहावयाचा असेल तेव्हा ज्या प्रसंगामुळें ती संवय अस्तित्वांत आली असेल किंवा तींत दृश्य रुपांतर झाले असेल त्यावरुन प्रत्येक काळाचा आदि किंवा अंत ठरवावा. सामान्य इतिहास लिहित असतांना ज्या प्रसंगामुळें इतिहासाच्या निरनिराळया शाखांतील उत्क्रांतीवर द्दश्य परिणाम घडून आला असेल त्यावरुन ही कालमर्यादा निश्चित करावी. याच पध्दतीने आपणांस या भागांचेहि पुनः पोटभाग पाडतां येतील.

अ नु प ल ब्ध मा हि ती वि ष यी अ नु मा न. - संशोधित विधानावरुन मागें दर्शविलेली सर्व माहिती मिळूं शकत नसल्यामुळे कित्येक प्रकारची माहिती आपणांस विदित विधानांवरुन अनुमानानें काढावी लागते. ही क्रिया करीत असतांना पुढे सांगितल्याप्रमाणें सावधगिरी ठेवून अनुमानें काढली तर अशा रीतीनें आपणांस ठाऊक असलेल्या माहितींत आणखी भर टाकता येईल. (१) लिखाणाचें पृथक्करण करीत असतांना ही अनुमानें काढू नयें. (२) अनुमित माहिती कोणती व लिखाणांतून काढलेली माहिती कोणती याचा आपल्या लेखकांत स्पष्ट उल्लेख असावा (३) नकळत निघणाऱ्या अनुमानांत चुका होत असतात म्हणून आपण कोणत्या गोष्टीवरुन अनुमान काढतों व तें काय काढतों, हे प्रत्येक वेळी स्पष्ट ध्यानांत आणीत जावें. (४) एखादें अनुमान खात्रीलायक नसल्यास त्याचा इतर निश्चित अनुमानांत समावेश करु नये. (५) चुकीच्या अनुमानशृंख लेवर आपण पुन्हां पुन्हां विचार करु लागलो म्हणजे परिचयानें आपणांस ती अधिकाधिक बरोबर वाटूं लागते ही गोष्ट ध्यानांत ठेवावी.

अनुमान काढण्याच्या दोन तऱ्हा आहेत. (१) उपलब्ध लिखाणांत एखाद्या गोष्टीचा उल्लेख सापडंला नाही म्हणजे त्यावरुन ती गोष्ट घडली नव्हती, असें अनुमान काढावयाचें ही पहिली तर्हा आहे; परंतु लेखकाने कदाचीत ती गोष्ट पाहिली नसेल किंवा पाहूनहि त्याला ती लिहून ठेवण्याइतकी महत्वाची वाटली नसेल किंवा त्यानें ती लिहून ठेवली असूनहि तें लिखाणच गहाळ झालें असेल. एवढया गोष्टी संभवनीय असल्यानें ज्या लिखाणांत त्या गोष्टीचा उल्लेख साहजिकपणे व्हावयास हवा त्यांत ती सांपडली नाही तरच तेथे या अनुमानपध्दतीचा उपयोग करतां येतो. (२) दुसऱ्या पध्दतीने अनुमान काढतांना आधुनिक मानवसमाज व प्राचीन मानवसमाज यांतील सामान्य साद्दश्य गृहीत धरुन हल्लीप्रमाणेच प्राचीन काळीहि प्रत्येक गोष्ट कार्यकारणभावाशिवाय घडत नव्हती असें आपण समजतों व आज एखाद्या कार्यास जें कारण लागतें तेंच प्राचीन काळीहि लागत होतें, असें लिखाणांतील कित्येक उदाहरणांतून आढळून येत असल्याने ठाऊक नसलेल्या गोष्टीविषयी साद्दश्यमूलंक अनुमानानें तर्क करण्यात आपणांस गैरवाजवी असें काही दिसत नाही; परंतु अशा रीतीने अनुमान काढतेवेळी आपणांस हे लक्षात ठेविलें पाहिजे की, एखादे कार्य घडवून आणण्यांस अवश्य असणारी सर्व कारणें आपणास  अनेकदा ठाऊक नसल्यामुळें किंवा माहीत असूनहि ती सर्व  नेहमी द्दष्टीसमोर ठेवता येत असल्यामुळे अपुऱ्या पूर्वपक्ष वरुन सिध्दांत काढले जाऊन ते सदोष राहण्याची फार भीति असते. याकरिता एखादा सिंध्दात काढण्याकतिरा पूर्वपक्षांत कोणकोणत्या गोष्टी लागतात, याचा नीट विचार करुन न तत्संबंधी सर्व माहिती आपणांस लिखाणावरुन मिळूं शकते किंवा नाही, हें पाहून मग जो काय सिध्दांत काढावयाचा तो काढावा.

समाजशास्त्रांतील नियमांच्या आपल्या अज्ञानामुळें इतकी काळजी घेऊन काढलेली अनुमानेंहि पुष्कळदा चुकीचींच असण्याचा संभव असतों हे ध्यानात ठेवावें; परंतु अशी बरीच अनुमानें साचल्यावर अनेक गोष्टीवरुन तेच सिध्दांत निघूं लागले म्हणजे मात्र त्यांना निश्चित स्वरुप येते.

उ प ल ब्ध मा हि ती च्या सं क ल ना ची आ व श्य क ता व ति चें सा मा न्य स्व रु प. - एखादे शास्त्रांतर्गत ज्ञान उपयुक्त असूनहि अवजडपणामुळे ते मनुष्यास आपलेसे करुन घेता येत नसेल तर त्या शास्त्रापासून आपणांस काहीच फायदा नाही; ही गोष्ट लक्षांत ठेवून, रसायनशास्त्रांत ज्याप्रमाणें पुष्कळशा गोष्टी संकलित करुन सुत्रवत सिध्दांत काढलेले असतात त्याचप्रमाणे आपणांसहि ऐतिहासिक माहिती सूत्ररुपानें लिहिली पाहिजे.

ही सूत्रात्मक माहिती थोडयाच शब्दांत द्यावयाची असली तरी ती दुर्बोध किंवा रुपभ्रष्ट होऊं नये म्हणून काळजी घ्यावयाची झाल्यास एखाद्या गोष्टीच्या स्वरुपाचे निदर्शक असे जे तपशील गाळले असतां आपणांस तिचा यथार्थ बोध होणार नाही तेवढे ठेवून बाकीचे सर्व वगळण्यांत यावे, व संबोधित विधानांची वर्गवारी करीत असतांना ज्या ज्या बाबीविषयी विधाने आपण आपल्या सामुग्रीत शोधीत होतो त्याच बाबीविषयी आपणास जी कांही माहिती मिळाली असेल ती भाववाचक अथवा अलंकारिक शब्द न वापरतां अगदी थोडया पण सोप्या शब्दांत देण्याचा प्रयत्न करावा.

आता आपण संस्था व उत्क्रांती या सारख्या सामान्य गोष्टीसंबधी व विशिष्ट ऐतिहासिक प्रसंगासारख्या गोष्टीसंबंधी माहिती संकलित कशी करावी याचा पृथ पृथ विचार करु.

सा मा न्य गो ष्टी चे स्व रु प स्थ ळ व का ल म र्या दा या वि ष यी मा हि ती चे सं क ल न. - प्रत्येक सामान्य गोष्टीचें स्वरुप, क्षेत्र व कालमर्यादा इतक्या गोष्टीचा निश्चय करणें अवश्य असते म्हणून प्रथमतः (१) एखाद्या गोष्टीचें निर्णायक स्वरुपांश ठरवून मग तेवढया बाबीत ज्या गोष्टीमध्ये सद्दश्य दिसेल त्या सर्व, किरकोळ भेद बाजूस सारुन एकत्र कराव्या व त्यांना कांही व्यापक नांव द्यावें भाषा किंवा कायदेकानूसारख्या संवयीच्या इतिहासामध्यें अशा सूत्रांचे स्वरुप बहुधा अगोदरच निश्चित झालेले असतें व म्हणून तेथे हे काम सुकर होतें. परंतु या संस्थांच्या, म्हणजे सातत्यपूर्ण क्रियांच्या म्हणजे विधी, रीती, यांच्या, तशाच मनुष्य घटनारुपी संस्थाच्या इतिहासांत मनुष्याच्या वास्तविक कृत्यांकडे किंवा विचाराकडे लक्ष दिले जात नाही. ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. उदाहरणार्थ भाषेच्या इतिहासांत मनुष्याकडून एखाद्या शब्दाचा उच्चार कसा केला जात असे. इकडे लक्ष न देता त्या शब्दाच्या रुपाचाच फक्त विचार करण्यांत येत असतो. परंतु आर्थिक किंवा व्यावहारिक चालींच्या इतिहासांत केवळ कृत्यांचाच विचार करावा लागत असल्यानें तेथे अशी व्यापक वाक्यें काढणें बरेंच कठीण जाते; ती लिखाणांत अगोदरच काढून ठेवली असली तरी तत्संबंधी चिकित्सा करुन त्यांची यथार्थता ठरवावी लागते. समूहवाचक संज्ञास्वरुपी नांव शोधून काढतांना देखील हीच अडचण येते; व म्हणून कोणते सामान्य गुण असलेल्या व्यक्तींच्या समूहाकरीतां आपणांस संज्ञा करावयाची आहे हें विचारपूर्वक ठरवून त्यांना लागू पडणारे यथार्थ नांव शोधून काढलें पाहिजे. (२) संस्थेचें क्षेत्र ठरविण्यासाठी कोणकोणत्या समूहांत ती रुढ होती व कोणत्या समूहांत तिचा विशेष प्रसार होता हे द्यावें. कधी कधी हें नकाशाच्या रुपानें दाखविलें असतां अधिक बोधप्रद होते. (३) कालमर्यादा निश्चित करण्यासाठी ती संस्था (मत, संस्था, चाल किंवा समूह) केव्हां प्रथम उदयास आली व केव्हां नष्ट झाली हें शोधून कोणत्या काळांत तिचा विशेष प्रसार होता हें पाहिले पाहिजे.

संस्थेच्या उत्क्रांतीची सामान्यतः पुढें दिल्याप्रमाणे अवस्थांतरे आढळून येतातः- एखादी गोष्ट एक किंवा अधिक व्यक्ति प्रथम स्वंयप्रेरणेने करुं लागतात व मागाहून इतर लोकांकडून त्यांचे अनुकरण केले गेल्यामुळे तिला सामान्यत्व येते. कालांतराने ही सवंय त्या समूहांत बंधनात्मक होते व पुष्कळदा शेवटपावेतो ती या स्थितीत राहून समाजाबरोबर विलयास जाते. कधी कधी तिची बंधनें शिथिल होऊं लागून तिचा ऱ्हास होतो, किंवा समाजांतील कांही व्यक्तींकडून तींत सुधारणा घडवून आणली जाते. उत्क्रांतिविषयक माहिती संकलित करीत असतांना उपरिनिर्दिष्ट प्रत्येक अवस्थेचें क्षेत्र व कालमर्यादा देऊन तिची निरनिराळी स्थित्यंतरे दाखविली पाहिजे व त्यावरुन त्या उत्क्रांतीस सुरवात कोठें व केव्हां झाली, तिचा शेवट कोठें व केव्हां झाला व ती कसकशी होत गेली याचें विवेचन केलें पाहिजे.

अ न न्य सा धा र ण गो ष्टी ची नि व ड व त त्सं बं धी मा हि ती चे सं क ल न. - ज्या गोष्टी आपणांस विशेष वाटतील त्या गोष्टीपैकी सर्वच इतिहासांत समाविष्ट करणें शक्य नसल्याने मानवी व्यापारांच्या उत्क्रांतीमध्ये ज्यांनी प्रमुखत्वेकरुन भाग घेतला असेल अशाच गोष्टी फक्त घेतल्या पाहिजेत, व म्हणून समाजाच्या स्थितीत ज्या व्यक्तींच्या कृत्यामुळें बदल घडून आला त्या व्यक्ती व त्यांची ती कृत्येंच फक्त ऐतिहासिक द्दष्टया महत्वाची समजून त्यांची निवड करावी. इतिहाससंक्षेपाची कांही तत्वें ''बुध्दोत्तर जग'' या भागांत प्रारंभी दिलीच आहेत. ऐतिहासिक पुरुषांच्या संक्षिप्त इतिहास देताना देखील हेंच तत्व ध्यानांत ठेवावें. या पुरूषांचे स्वभाववर्णन देतांना एक गोष्ट लक्षांत ठेवावी की जिवंतपणी देखील मनुष्याच्या स्वभावाची पूर्ण परीक्षा करणें दुरापास्त असल्याकारणानें लिखाणांतील त्रोटक माहितीवरून स्वभावाचे वर्णन करणें हे फार धोक्याचे काम आहे. परंतु तें द्यावयाचे असल्यास, कोणत्याही मनुष्याच्या स्वतःविषयीच्या विधानांवरुन त्याचा स्वभाव न ठरविण्याची आणि काव्यांतील किंवा नाटकांती पात्रांच्या स्वभावाप्रमाणें या खऱ्या माणसाच्या स्वभावांत सुसंगति न दाखविण्याची खबरदारी घ्यावी. ऐतिहासिक प्रसंगाची निवडहि त्यांच्या परिणामावरुनच करावयाची असते. ज्या गोष्टींचा कांही द्दश्य परिणाम झाला नसेल त्या गाळून टाकाव्या व तोच परिणाम घडवून आणणाऱ्या सर्व गोष्टी एके ठिकाणी कराव्या. ऐतिहासिक प्रसंगाचें वर्णन देतांना तो कोठें व केव्हां घडला, व त्याचा परिणाम कोठें व केव्हा दिसून आला एवढें सांगून कोणकोणत्या माणसांनी कोणत्या भौतिक परिस्थितींत कोणत्या उद्देशांनी व पूर्व कल्पनांनी कोणकोणत्या गोष्टी केल्या व त्याचा परिणाम काय झाला इतक्या माहितीचा त्यांत समावेश केला पाहिजे.

ऐ ति हा सि क गो ष्टी ची प रि मा णा त्म क मा हि ती. – ऐतिहासिक गोष्टीचें स्वरुप दिले तरी तिचे परिमाण दिल्यावांचून तिच्या महत्वाची कल्पना होणार नाहीत. लांबी, क्षेत्र, वजन इत्यादी भौतिक चमत्कार व काल यांच्या मापनासाठी सर्वसाधारण मूलमान म्हणजे यूनिट असल्यानें त्यांचे मापन शास्त्रोक्त होऊं शकते. परंतु याप्रमाणे मानसिक गोष्टीचें परिमाण देता येत नाही. विशिष्ट गुण असलेल्या एकूणएक गोष्टी किंवा व्यक्ति जर लिखाणांवरुन अवगत झाल्या असल्या तर आपणांस गणनेचा उपयोग करितां येतो. परंतु तिच्या योगे महत्वमापन होत नाही हे विसरता कामा नये. एखाद्या सैन्यांतील किंवा देशांतील लोकांचा आंकडा कळल्यानें आपणांस त्या सैन्याच्या किंवा देशाच्या महत्वाची कल्पना होऊ शकत नाही. माहितीच्या अभावामुळे इतिहासामध्यें एकांगाच्या गणनेवरुन सर्वांगाची कल्पना करण्याचा पुष्कळदां प्रसंग येतो. पंरतु गणनेसाठी निवडलेल्या भागाचें सर्वांगाशी साद्दश्य असलें तरच या पध्दतीचा उपयोग करितां येतो. गणनेचा आणखी एक प्रकार म्हटला म्हणजे ज्या क्षेत्राचे संशोधन करावयाचे असेल त्यांतील एखाद्या ठिकाणच्या कांही व्यक्ति किंवा गोष्टी घेऊन त्यांत विशिष्ट गुणाचें प्रमाण किंवा शेंकडेवारी काढावयाची. नमुन्यादाखल घेतलेला अंश अपवादात्मक नसून जर सर्व भागांचा निदर्शक असेल किंवा भिन्न भिन्न परिस्थितीतील निरनिराळे अंश निवडून जर त्यांच्या शेकडेवारीदर्शक आंकडयाची सरासरी काढिली तर या रीतीपासून कांही फायदा होऊं शकतो.

आपल्या नजरेस आलेल्या थोडक्या गोष्टीवरुन व्यापक सिध्दांत काढण्याकडे मनुष्याची नैसर्गिक प्रवृत्ति असते. परंतु याप्रमाणे घेतलेल्या गोष्टीचें सर्व भागाशी साद्दश्य असल्याशिवाय आपणांस असें करिता येत नाही. लेखकाचा कल आश्चर्यकारक गोष्टी नमूद करण्याकडे साधारणतः असल्याकारणाने लिखाणांतील बहूतेक गोष्टी अपवादात्मक असतात, व त्यामुळे त्यावरुन व्यापक सिध्दांत काढणे धोक्याचे असते. याकरिता सर्व भागांच्या निदर्शक अशा पुरेशा गोष्टी सांपडल्यावांचून व्यापक सिध्दांत काढूं नयेत.

ऐ ति हा सि क मा हि ती च्या यो ग्य ते वि ष यी क रा व या चा उ ल्ले ख, सं क लि त मा हि ती व रु न व्या प क सि ध्दां त व व्या प क व र्गी क र ण.- अशा रीतीने वर्णनात्मक सूत्रें तयार झाल्यावर त्यांतील निरनिराळया गोष्टीचा परस्पर संबंध दाखवून त्यावरुन समुच्चयात्मक अर्थ काढण्यापूर्वी, निरनिराळया वर्गांतील गोष्टीविषयी आवश्यक असलेल्या माहितीपैकी आपणास किती मिळविता आली आहे, व मिळालेली माहिती कोणत्या योग्यतेची आहे, यांचे थोडक्यांत सिंहावलोकन केले पाहिजे. याकरितां मानवी व्यापराविषयी जी जी माहिती आपण संशोधित विधानांत शोधीत होतो त्यांतील किती माहिती आपण मिळऊं शकलो आहोंत हें प्रथम पहावें, व नंतर प्रत्येक वर्गांतील निरनिराळया विधानांच्या यथार्थतेविषयी केलेल्या निश्चयावरुन एकंदर माहिती निरीक्षणात्मक आहे किंवा ऐकीव आहे, ती लिखाणद्वारें चालत आली आहे, किंवा तिचें ज्ञान दंतकथामूलक आहे, ती एकाच वर्गाच्या लेखकाकडून प्राप्त झाली असल्यानें पूर्वग्रहदूषित आहे किंवा काय, इत्यादी गोष्टीचें थोडक्यांत विवेजन केले पाहिजे.

वर्णनात्मक सूत्रांवरुन वास्तविक गोष्टीच्या लहान लहान समूहांपैकी प्रत्येकाच्या विशेष गुण कळतो. सर्वसामान्य सिध्दांत काढण्याकरिता यांचे पुन्हां एकीकरण करुन अधिक व्यापक सूत्रें आपणांस काढली पाहिजेत. म्हणून ज्या लहान लहान समूहांचे सर्वांशी एकमेकाशी साद्दश्य असेल त्यांना एकत्र करुन संस्था, समाज इत्यादीकांचे व्यापक समूह करावे, व पूर्वी सांगितल्याप्र्रमाणे त्यांचे निर्णायक गुणधर्म, क्षेत्र कालमर्यादा व महत्व ठरवावें, जसजसें आपण अधिकाधिक सामान्यीकरण करीत जाऊं तसतसें आपल्या व्यापक समूहाच्या सर्व घटकांमध्ये आढळून न येणारे गुणधर्म वगळत जाऊन प्रत्येक घटकांत असलेले सामान्य गुणच तेवढे राखले पाहिजेत. असें करीत गेले असतां आपणांस सर्व मनुष्यजातीच्या भाषा, शासनपध्दति इत्यादी व्यापारांतील सामान्य गुण सांपडून मग त्यांची उत्क्रांती कशी होत गेली हे काढतां येईल.

परंतु इतके सामान्यीकरण करणें व्यवहारांत जवळ जवळ अशक्यच असल्यानें निरनिराळया समूहांची एकमेकांशी तुलना करुन त्यांचे व्यापक वर्गीकरण करावें लागतें. हें आपणांस दोन रीतीनें करितां येईल. भाषादि निरनिराळया मानवी व्यापारांपैकी प्रत्येकांतील समूहांचे साद्दश्यावरुन सजातीय असे वर्ग पाडावयाचे ही पहिली पध्दत आहे. दुसरी  रीत म्हटली म्हणजे इतिहासांत नेहमी एकत्र आढळून येणाऱ्या निरनिराळया मानवी समाजांचे साद्दश्यानुरोधानें वर्ग पाढून त्यांचा अभ्यास करावयाचा. हें व्यापक वर्गीकरण कसें करावयाचें याविषयी इतिहासज्ञ अजूनपर्यंत कांही ठरवूं शकले नाहीत.

का र्य का र ण भा व सं शो ध न - मागें एकदां म्हटलेंच होते की एकाच समाजाच्या (कला, राजकीय, संस्था, पारमार्थिक कल्पना इ.) निरनिराळया संवयीमध्ये कांही तरी परस्परसंबंध असतो, व त्यामुळे ज्या कारणांच्या योगानें त्यांपैकी एकीवर परिणाम घडून येतो त्यांचाच परिणाम थोडया अधिक प्रमाणानें इतर संवयीवर देखील झाल्याशिवाय रहात नाही. या परस्परसंबंधाचा उलगडा करण्यासाठी ज्यामुळें हा परस्परसंबंध उत्पन्न होतो त्या निरनिराळया संवयीना कारणीभूत होणाऱ्या सामान्य गोष्टीचा आपणांस विचार केला पाहिजे.

यावरुन दिसून येईल की इतर शास्त्रांप्रमाणेंच इतिहासांत देखील कार्यकारणभाव काढल्याशिवाय चालत नाही. हा कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न आजपावेतो निरनिराळया दिशेने करण्यांत आला आहे. ईश्वरीच्छा हें प्रत्येक गोष्टीचें कारण देण्याकडे मनुष्याची प्रवृत्ति असते; परंतु शास्त्रयिद्दष्टीनें प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची संवय झाल्यामुळे आतां कोणीहि ग्रंथकार इतिहासांत वेदांताची चर्चा करीत नाही. तथापि या अध्यात्मिक कल्पनांचे अवशेष आपणांस थोडया निराळया स्वरुपांत मात्र अजूनहि द्दष्टोत्पत्तीस येतात. उदाहरणार्थ प्रत्येक सामाजिक गोष्ट समाजाच्या हितासच कारणीभूत होते, असे गृहीत धरुन कार्यकारणभाव शोधणारे इतिहासकार, व ईश्वर प्रत्येक गोष्ट मनुष्याच्या कल्याणार्थच करीत असतो असें म्हणणारा वेदांती यांत फरक काय? याच्याच जोडीची दुसरी रीत म्हटली म्हणजे अमुक एक समाज किंवा मनुष्य विशिष्ट कल्पनांच्या प्रसारार्थ उदयास येतात असे धरुन चालून त्यावरुन कारणें शोधून काढावयाची ही आहे. मानवजातीची दिवसेंदिवस प्रगति होत चालली आहे ही कल्पनादेखील तितकीच चुकीची आहे. कारण एक तर प्रगति शब्दास निश्चित असा कांहीच अर्थ नाही, व दुसरें सर्व मानवजातीची एकाच दिशेनें सुधारण होत आहे असे म्हणण्यास कांही आधार नाही.

शास्त्रशुध्द पध्दतीने कार्यकारणभाव शोधण्याचें आजपर्यंत पर्येत झाले नाहीत असे नाही. संशोधकांनी एकाच जातीच्या ऐतिहासिक गोष्टीच्या क्रमाचा अभ्यास करुन त्यावरुन त्यांच्या क्रमाबद्दल कांही नियम काढले आहेत व त्यामुळें अमुक एक गोष्ट घडल्यानंतर दुसरी कोणती घडेल याविषयी अनुमान करिता येतें. परंतु या नियमांचा उपयोग करतांना उदय, वाढ, नाश इत्यादि अलंकारिक शब्द वापरले जाऊं लागल्यामुळे या चालीची  वाढ जणूं काय सेंद्रिय वनस्पतीच्या किंवा प्राण्यांच्या उत्क्रांतीप्रमाणेंच आहे, अशी भावना होऊन एकाचे नियम आपण दुसऱ्यास लाऊं लागतों. यासाठी कोणत्याहि ऐतिहासिक गोष्टीचें कारण शोधतांना या अलंकारिक प्रयोगाबद्दल फार सावधगिरी ठेवावी लागते; व पार्लमेंटचे मत समाजाचे अधिकार, इत्यादी प्रयोग व्यवहांरात बरोबर असले तरी ऐतिहासिक विवेचनांत त्यामुळें फार चुका होतात. एकाच समाजांतील निरनिराळया संवयीच्या उत्क्रांतीच्या तुलनेंने त्यांमध्ये कांही तरी परस्परसंबंध असतो ही गोष्ट प्रथम ध्यानांत आली. परंतु कार्यकारणभावांविषयी कांही नियम काढण्याकरितां, तुलनात्मक पध्दतीनें कोणत्या दोन गोष्टी एकत्र आढळून येतात हें शोधणें, किंवा निरनिराळया समाजांतील एखाद्या संवयीची कोणत्या गोष्टीमुळे एका ठराविक दिशेने उत्क्रांती झाली हें पाहणें या दोन्हीहि पध्दती, प्रत्येक वेळी त्या ऐतिहासिक गोष्टीची पूर्ण परिस्थिति आपण ध्यानांत घेत नसल्याकारणानें सदोष आहेत. बरें एका सबंध समाजाची दुसऱ्या सबंध समाजाशी तुलना करावी तर त्यायोगानें, कोणत्या दोन गोष्टी एकत्र आढळून येत नसल्यानें एक दुसरीचें कारण असूं शकत नाही. एवढेच काय ते कळते; व प्रत्येक गोष्टीच्या पूर्ण परिस्थितीचा विचार करावयास तर पाहिजे तितकी  सविस्तर माहिती उपलब्ध नसते.

परंतु संकलन व इतिहासाचे विभाग करण्यासाठी कार्यकारण भावाचें ज्ञान अत्यावश्यक असल्यानें इतिहासकारास तें काम केल्याशिवाय गत्यंतर नसते. लिखाणकर्त्यांनी दिलेली आपल्या समकालीन वैयक्तिक गोष्टीची कारणें पुष्कळ वेळां लिखाणांत आपणांस आयतीच सांपडत असल्याकारणानें तत्संबंधी आपणांस खात्रीयुक्त माहिती मिळूं शकते. परंतु उत्क्रांतीसारख्या सर्वसाधारण गोष्टीसंबधी कार्यकारणभाव शोधतांना मात्र आपणांस आधुनिक समाजाच्या अभ्यासानें प्राचीन समाजाच्या उत्क्रांतीचा उलगडा करणारी कारणें शोधून काढावी लागतात. या कार्याची दिशा आद्यपपावतों निश्चित झाली नसल्यानें येथे त्याच्या दिग्दर्शनार्थ कांही सूचना देण्यापलीकडे अधिक कांही करिता येत नाही.

भावपृथक्करणानें मनुष्यापासून वेगळया काढल्यामुळे भाषेमध्ये जरी निरनिराळया संवयी भिन्न भिन्न शब्दांनी संबोधल्या जातात तरी त्या सर्वांचा आद्यप्रर्वतक मनुष्यच असतो; व म्हणून मनुष्याच्या परिस्थितीतील ज्या विशेष भागाचा त्याच्या सर्व व्यापारांवर थोडाबहूत परिणाम घडून येतो त्यांतच या परस्परसंबंधाचें कारण द्दष्टोत्पतीस येते. मनुष्याच्या सर्वप्रकारच्या व्यापारांमध्ये सारख्याच द्दढसंबंधाची अपेक्षा करणे उचित नाही. आर्थिक व्यापारांपेक्षा बौध्दिक व्यापारांत त्याची बंधने साहजिकच शिथील असतील व म्हणून लिखाणांत विशिष्ट संवयीचा एखाद्या समाजाचया ठिकाणी आरोप केला असला तरी या व्यक्तिवैचित्र्याचा विचार करण्यास विसरुं नये.

उत्क्रांतीविषयी विचार करितांना एवढे लक्षांत ठेवावें की, उत्क्रांती फक्त सजीव माणसाचीच होऊं शकते, व म्हणून तत्संबधी कारणें शोधताना त्या त्या संवयीच्या मुळाशी असलेल्या माणसांचाच विचार केला पहिजे. प्रत्येक उत्क्रांतीच्या मुळाशी मनुष्यांच्या भौतिक परिस्थितीतील किंवा संवयीतील बदल हेंच कारण असतें. संवयीत बदल होण्याची दोन कारणें आढळून येतात. कधी कधी माणसें तीच राहून स्वेछेनें, अनुकरणानें किंवा बळजबरीनें त्याच्या व्यापारांत फरक पडतो; तर कधी कधी नवीन पिढीच्या किंवा परक्या लोकांच्या आगमनानें त्याचें रुपातर होतें. सर्व मानवी जात सारखी असून ती भिन्न भिन्न परिस्थितींत विभागली गेल्याने निरनिराळ्या प्रकारच्या उत्क्रांत्या घडून येतात; किंवा निरनिराळ्या लोकांत भिन्न भिन्न आनुवंशिक गुण असल्याकारणानें समाजांच्या मिश्रणानें उत्क्रांतीस निरनिराळी रुपें येतात, या प्रश्नाचा उलगडा अद्याप  झालेला नाही.

ऐ ति हा सि क ग्रं थां ती ल प्रा ची न वि व र ण प ध्द ति. - आतां ऐतिहासिक ग्रंथ कोणत्या स्वरुपांत लिहिले जावेत त्यांतील विवरणपध्दति काय असावी एवढाच प्रश्न काय तो शिल्लक राहिला आहे. यूरोपमध्ये देखील १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत ऐतिहासिक ग्रंथ वाङमय स्वरुपीच होते, हें या ग्रंथाच्या नव्या आवृत्या जुन्यांमध्यें कांहीच फेरबदल न करितां छापल्या जात होत्या यावरुन उघड दिसतें. कारण कोणताहि शास्त्रीय विषयावरील ग्रंथ घेतला तरी त्याची नवी आवृत्ति काढतांना मध्यंतरीच्या काळात जे काही नूतन शोध लागले असतील त्यांचा त्यांत समावेश करावा लागत असल्यामुळे नवी आवृत्ति जुन्या आवृत्तीप्रमाणेच सहसा निघत नाही. वाचकांचे मनोरंजन करणें किंवा हितोपदेशाकरितां कांही सिध्दांत काढून देणें हें इतिहासाचे ध्येंय नसून ते काम केवळ प्राचीन गोष्टीचे ज्ञान प्राप्त करुन घेण्यासाठीच करावयाचें असतें ही जाणीव यूरोपांत १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम झाली, व त्यानंतर इतिहासास शास्त्रीय स्वरुप देण्याचा प्रयत्न सुरु झाला. ऐतिहासिक वाङमयाचे मुख्यत्वेकरुन स्फुट निबंध व ऐतिहासिक ग्रंथ असे दोन भाग करिता येतील. यांपैकी प्रत्येक प्रकारच्या पुस्तकांतील विवरणपध्दती कशी असावी याचा आपण विचार करुं.

इतिहासांतील एखाद्या प्रश्नाची किंवा कांही परिमित प्रश्नांची चर्चा करावयाची असली म्हणजे मनुष्य स्फुटनिबंध लिहावयास उद्युक्त होतो. अशा प्रकारच्या अगणित विषयांवर स्फुटनिबंध लिहिण्यास इतिहासांत वांव असला तरी, बिनमहत्वाच्या विषयावर स्फुटनिबंध लिहिण्यांत केवळ कालापव्ययच होत असल्यानें या निबंधाकरिता जो विषय निवडावयाचा तो मोठया दूरदर्शीपणानें निवडला पाहिजे. निबंध उपयुक्त करण्याकरितां पुढे दिलेल्या तीन नियमांकडे विशेषतः लक्ष देण्यांत यावें-(१) निबंधांतील प्रत्येक ऐतिहासिक गोष्टीच्या बाबतीत ती कोणत्या लिखाणांतून घेतली आहे, व ती कितपत विश्वसनीय आहे, या दोन मुद्यांचा उल्लेख केलेला असावा. (२) निरनिराळया गोष्टींचा कार्यकारणभाव कळण्यास सुलभ जावें म्हणून आपल्या निबंधांतील हकीकत कालानुक्रमानें दिलेली असावी. (३) प्रत्येक निबंधास असा मथळा देण्यांत यावा की, त्यावरुन त्यांतील विषयाची बरोबर कल्पना करितां येईल. याशिवाय लक्षांत ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हटली म्हणजे निबंधातील विषयाचा सर्व बाजूंनी विचार केला जावा ही गोष्ट निर्विवाद असली तरी देखील, ज्या गोष्टी आपणांस त्यातून सहज वगळतां आल्या असत्या त्यांचा केवळ आमच्या विद्वतेच्या प्रदर्शनार्थ त्यांत समावेश करणें केव्हांहि इष्ट नसतें.

सामान्यस्वरुपाचे ऐतिहासिक ग्रंथ विशेषतः विद्यार्थी व तज्ज्ञ वर्गांकरिता लिहिलेले असतात. यूरोपियन भाषांमध्ये अशा प्रकारची जी पुस्तकें प्रसिध्द झाली आहेत त्यांमध्ये सर्व संशोधित वास्तविक गोष्टी कालानुक्रमाने थोडया शब्दांत दिलेल्या असतात इतकेंच नव्हें तर मूळांतील वाक्यें खाली देऊन पुढें मूळ लिखाणांची व त्याच्या संशोधकांची संपूर्ण माहितीहि दिलेली असते. जेव्हां ऐतिहसिक गोष्टींचा काळ उपलब्ध  नसतो किंवा जेव्हां त्या समकालीन असतात तेव्हा वर्णानुक्रमरचना स्वीकारण्यांत येते. या ग्रंथाचा उद्देश आपल्या पदरचें कांही न घालता संशोधित माहितीचे यथार्थ ज्ञान करुन द्यावयाचें एवढाच असतो. यापैकी कांही ग्रंथातील वर्णने संक्षिप्त असूनहि इतकी उत्तम आहेत की, ती वाचून एखाद्या ऐतिहासिक गोष्टीविषयी माहिती मिळविली की मग तत्संबंधी दुसरें सविस्तर ग्रंथ वाचण्याची गरज रहात नाही. असले ग्रंथ अनेक तज्ज्ञांच्या सहकारित्वाशिवाय तयार होऊ शकत नाहीत. तथापि ही श्रमविभागणी करण्यापूर्वी हाती घेतलेल्या ग्रंथाचे स्वतंत्र पण सुसंगत असे भाग पाडून स्वतःच्या जबाबदारीची जाणीव करुन देण्याइतके मोठे भाग प्रत्येकाकडे सोंपविता येतात किंवा नाही हे पाहिले पाहिजे. अशा प्रकारचे ग्रंथ प्रसिध्द झाले तरी मनुष्याच्या सर्वांगीण उत्क्रांतीची माहिती देणाऱ्या ग्रंथाची आवश्यकता असतेच. या पुस्तकांमध्ये मनुष्याच्या सामान्य उत्क्रांतीचे ज्ञान करुन देण्यास  अवश्य असणारी त्याच्या  निरनिराळया व्यापरांतील उत्क्रांत्यांची त्रोटक माहिती व ती सुबोध होण्यासाठी लागणाऱ्या प्रसंगाची वर्णने दिली पाहिजेत. सर्व मनुष्यजातीची उत्क्रांती एकसमयावच्छेदेकरुन होत आहे असें मानण्यास आधार नसल्यानें व विशेषतः एवढया माहितीचा अभ्यास करणें व्यवहार्य नसल्याकारणानें जगाच्या इतिहासासारखे व्यापक ग्रंथ न लिहिता राष्ट्रांचे किंवा विशिष्ट काळांचेच  इतिहास या धर्तीवर लिहिण्यास घ्यावे; परंतु ग्रंथाचे शास्त्रीय स्वरुप नष्ट होऊं नये म्हणून पूर्वोक्त शास्त्रीय ग्रंथाप्रमाणे त्यांतहि अलंकारिक भाषा किंवा पुराव्यांवाचून विधानें बिलकुल राहूं देऊ नयेत.

सामान्य लोकांकरिता जे ऐतिहासिक ग्रंथ लिहिले जातात त्यांमध्ये वर सांगितलेले कडक नियम पाळण्यांत येत नाहीत याचें कारण असें आहे की तज्ज्ञ पंडित सामान्य जनतेकरितां ग्रंथ लिहिण्याची पर्वा करीत नाहीत; परंतु अशी पुस्तकें लिहून पुष्कळ पैसे मिळवितां येत असल्यामुळे, अर्धेकच्चे लोक, सामान्यजनता आपल्या ग्रंथातील दोष ओळखण्याइतकी सुशिक्षित नसतें हें पूर्णपणे जाणून, ग्रंथलेखनाचे काम हाती घेतात. याचा परिणाम असा होतो की, या ग्रंथाच्या लेखकांस स्वतःलाच  ज्या गोष्टी नीट समजल्या नसतात. त्या इतरांना समजावून सांगण्याची पाळी आल्या कारणानें विषय सुबोध करुन लोकरंजन करण्याची आपली असमर्थता झांकण्यासाठी त्यांना अलंकारिक भाषा वगैरे शास्त्रनिषिध्द साधनांचा उपयोग करावा लागतो. हा दोष सुधारण्याकरितां या लोकांनी हाती घेतलेल्या विषयावरील इतिहासपंडितांचे सर्व लेख वाचून आपण स्वतःच अगोदर परिश्रमपूर्वक त्या विषयांचें ज्ञान चांगलें संपादन केले पाहिजे. असे केले असता त्यांना आपल्या प्रत्येक विधानास पुरावा देतां येईल. व अलंकारिक भाषा न वापरतांहि इतिहासविषयक शास्त्रीय ग्रंथातील अनवश्यक भाग गाळून व कठीण भागाचें शास्त्रोक्त पण थोडक्यांत विवरण करुन आपलें पुस्तक चित्ताकर्षक करिता येईल. याचा अर्थ असा घ्यावयाचा नाही की, विषय सुबोध करण्याची हमी घेतली की इतिहासकारास अशुध्द, असंस्कृत, बोजड किंवा फाटकी तुटकी भाषा लिहिण्याची पूर्ण मुभा असते. उलटपक्षी इतिहासविषय हा अगोदरच बराच घोंटाळयाचा असल्यामुळें त्यानें वाईट भाषेत ग्रंथ लिहिला असता तें अगदी अक्षम्य होईल.

उ प सं हा र. - प्राचीन लिखाणें विनाशस्वरुपी असल्यामुळें इतिहासाची सुसंबध्द रचना केवळ यद्दच्छेवरच अवलंबून असते. आधीच प्राचीन लिखाणांची संख्या परिमित व त्यांतहि त्यांचा झपाटयानें नाश होत असल्यानें इतिहाससंशोधनानें समाजाच्या उत्पत्तीविषयी व मानवी उत्क्रांतीच्या मूळाविषयी ज्ञान प्राप्त करुन घेण्याच्या कांही लोकांच्या कल्पनेस कधीकाळीहि मूर्तस्वरुप येणें शक्य नाही. इतिहास हें निरीक्षणात्मक शास्त्र नसून त्यांतील ज्ञान सर्वस्वी अनुमानमूलक असतें. कारण प्राचीन व आधुनिक समाजांच्या साद्दश्यात्मक अनुमानांनी लिखाणांतील विधानाचीं चिकित्सा करुन त्याच साद्दश्याच्या जोरावर आपणांस त्यांची संघटना करावी लागते लिखाणें शोधून काढण्यापासून तो त्यावरुन प्राचीन गोष्टीचें ज्ञान करुन घेईपर्यंत शेकडो गोष्टी कराव्या लागत असल्यानें इतिहासशास्त्रांत सहकारित्वाची फार आवश्यकता आहे. प्रथमतः लेखसंग्रहण, मूलपाठसंशोधन व प्राथमिक वर्गीकरण, करणाऱ्या संशोधकांनी एकजुटीने काम करुन थोडक्या काळांत व थोडक्या श्रमांत पूर्वतयारीचें काम उत्तम रीतीने पार पाडलें पाहिजे. त्यानंतर ऐतिहासि विषयावर स्फुटनिबंध लिहिणाऱ्या पंडितांनी व्यापक संघटनेकरितां आपले लेख उपयोगी पडावे म्हणून कांहीतरी सर्वसमंत धर्तीवर काम केले पाहिजे व पुढें अनुभविक इतिहासपंडितांनी आपले वैयक्तिक शोध बाजूस ठेवून व्यापक संघटनेंच काम हाती घेतलें पाहिजे. अशा रीतीने काम झाले तरच सामाजिक उत्क्रांतीच्या स्वरुपाविषयी व कारणाविषयी यथार्थ सिध्दांत निघून आदर्शभूत इतिहासमीमांसा तयार होईल. अस्तित्वांत असलेल्या सर्व लिखाणांचे संशोधन होऊन इतिहासरचनेंचे काम एके दिवशी संपूर्ण झालें तरी इतिहासास निश्चित स्वरुप येणार नाही. समाजशास्त्राच्या आपल्या ज्ञानात जसजशी अधिकाधिक भर पडत जाईल, तसतसा त्यांतील नियमांवरुन तयार केलेल्या इतिहासांतहि फरक होत जातील.

इतिहासाच्या अभ्यासानें व्यवहारांत उपयोगी पडेल असे ज्ञान प्राप्त होते अशी जी काही लोकांची समजूत आहे, ती केवळ भ्रममूलक आहे. आजची परिस्थिती प्राचीन परिस्थितीहून भिन्न असल्यामुळे जुन्या गोष्टीवरुन सद्यःकालांत आपण कसे वागावयास पाहिजे याचा कांही बोध होत नाही. तथापि इतिहासाच्या ज्ञानानें आपणास दिसतात त्या गोष्टी तशा कां आहेत, हें कळूं शकत असल्यानें सद्यःपरिस्थिति चांगली समजूं शकते. यावरुन इतिहास व समाजशास्त्रें यांचा परस्परावलंबीपणा सहज व्यक्त होईल. इतिहासाचा चांगला बोध होण्यासाठी समाजशास्त्राची जितकी आवश्यकता असते, तितकीच त्या शास्त्राच्या पूर्ततेसाठी इतिहासाचीहि असते; परंतु इतिहासापासून मुख्य फायदा म्हटला म्हणजे त्यायोगें बौध्दिकसंस्कृतीस उत्तेजन मिळूं शकते हा होय. इतिहासाच्या अध्ययनानें मनुष्याचा श्रध्दाळू स्वभाव नाहीसा होऊन तो चौकस होतो. त्याचप्रमाणे इतिहासवाचनानें मनुष्यास दुसऱ्याच्या चालीरीति चांगल्या समजूं लागून त्याविषयी सहिष्णुता प्राप्त होते व मानवी जातीची रुपांतरे संवयी बदलत जाऊन कशी घडून येतात, हे नीट समजले म्हणजे प्राणिशास्त्राच्या उत्क्रांतीच्या नियमांचा सामजिक उत्क्रांतीचे स्पष्टीकरण करण्याकडे उपयोग करण्याचा त्यास मोह होत नाही. [लांग्वा आणि सिनेबो यांच्या पुस्तकांच्या आधारानें हा लेखभाग लिहिला आहे.]

भा र ती या चें इ ति हा स शा स्त्र. - वैदिक इतिहासशास्त्रापासून अर्वाचीन इतिहासशास्त्रापर्यंत प्रगति हिंदुस्थानांत कोणल्या अनुक्रमानें झाली याविषयी थोडेसे विवेचन अप्रस्तुत होणार नाही. पुराणामध्यें इतिहासविषय कसा मांडला जात असे याची कल्पना ''बुध्दपूर्वजग'' या पुस्तकांत दिलीच आहे, तर त्या कालापासून खरे राजवाडयाच्या कालापर्यंत इतिहासलेखनशास्त्रांतील भारतीय विकास आपण पाहिला पाहिजे. इतिहासलेखन आपल्याकडे काय झालें यांची जंत्री येथे अप्रस्तुत होय. आपणास वाङमयस्वरुप विकास अथवा इतिहासलेखनपध्दतिविकास तेवढा पहावयाचा आहे.

संस्कृतमधील मुख्य इतिहासग्रंथ म्हणजे काश्मीरची राजतरंगिणी होय. तिचा कर्ता कल्हण यानें ऐतिहासिक सत्याची आवड बरीच दाखविली आहे यात शंका नाही. राजतरंगिणीच्या उत्पादनाचें श्रेय काश्मीरमध्यें बौध्दाचें वैचारिक आणि वैज्ञानिक वर्चस्व होते त्यास देण्यात येते आणि बौध्दधर्म, क्षत्रियमहत्व आणि इतिहासाविषयी आस्था याची संगति जोडण्यांत येते आणि त्या प्रकारच्या विधानास सहाय्यक म्हणून असा वाद मांडला जातो की, जेथे ब्राह्मणाचें महत्व कमी होते, अशा हिंदुस्थानाच्या सरहद्दीवर म्हणजे आसाम, आराकान, ब्रह्मदेश, काश्मीर व सिंहलद्वीप यांसारख्या ठिकाणी बौध्दधर्म आणि ऐतिहासिक लेखनांचे अस्तित्व आहे. या प्रकारच्या विधानांत तथ्य नाही असें नाही; तथापि सिलोनच्या महावंसो दीपवंसो इत्यादी बखरी आपण सूक्ष्मपणें पहिल्यास त्या पुस्तकास इतिहास म्हणण्याऐवजी भिक्षुवाङमय म्हणणे अधिक योग्य होईल. ब्राह्मणांमध्ये संप्रदायासातत्य अथवा पीठसातत्य नसल्यामुळें आणि बौध्दांमध्ये तें असल्यामुळे ब्राह्मणांचे वाङमय निराळया प्रकारचे झाले आणि बौध्दांचे निराळया प्रकारचे झालें. सिंहली बखरीमध्यें धर्मप्रसाराचा इतिहास आणि राजांनी मठांना दिलेली दानें यांचाच प्रामुख्यानें निर्देश आहे आणि पुष्कळशा प्रचलित पौराणिक कथाचे आश्रयस्थान ब्राह्मणी वाड्.मयांतील व्यक्तीच्या ऐवजी बौध्द व्यक्ती केल्या आहेत. इतिहासकारास ज्या राज्याच्या जमाबंदीच्या, करांच्या, राजनीतीच्या किंवा दुसऱ्या कोणत्याहि सामुच्चयिक संसाराच्या गोष्टीस महत्व वाटतें तशा प्रकारच्या गोष्टीविषयी आस्था जितकी कल्हण दाखवितो तितकी वसोकार दाखवीत नाहीत असें दिसून येईल.

हिंदुस्थानांत खरी इतिहासलेखनाची आस्था मुसुलमानांनी उत्पन्न केली. फेरिस्ता, काफीखान, अबुलफजल यांसारखें ग्रंथकार भारतीय इतिहासशास्त्राचे महत्वाचे नमुने म्हणण्यास हरकत नाही. त्यांच्या अनुषगांने इतिहासलेखनाची कला हिंदूमध्येही आली. पुष्कळ ठिकाणी दैनंदिन कृत्याचे गोषवारे किंवा रोजनिशा लिहिणारे अधिकारी होते. ते प्रसंगी मुसुलमान तसेच प्रसंगी हिंदुहि असण्याचा संभव आहे आणि त्यामुळे मुसुलमानी इतिहासशास्त्र, हिंदूत शिरल्यास नवल नाही. मराठी राज्यात बखरी (पहा) निर्माण झाल्यायाशिवाय रोजनिशा वगैरे लिखाण चालू होतेच.

इंग्रजी राज्य स्थापन झाल्यानंतर मराठयांचा इतिहास ग्राटडफनें लिहिला तो असमानधकारक वाटल्यामुळें मराठयांचा सशास्त्र आणि साग्र इतिहास लिहिला जावा म्हणून प्रयत्न झाला. रा.कीर्तने याचा ग्रँट डफवर एक टीकात्मक निबंध प्रसिध्द झाला. विष्णुशास्त्री चिपळुणकर यांनी इतिहासविषयाची व्यापक कल्पना आपल्या निबंधमालेंतील ''इतिहास'' या निबंधाने करुन दिली; पण इतिहासाचें अत्यंत व्यापक स्वरुप आणि इतिहाससंशोधनाची सक्रिय ओळख करुन देण्याचे श्रेय रा.राजवाडे यांस आहे. रा.राजवाडे, खरे पारसनीय आणि त्याचप्रमाणें रा.विनायकराव भावे यांनी इतिहासविषयक साहित्य पुष्कळच प्रसिध्द केले आणि रा.राजवाडे याच्या प्रोत्साहनानें भारत इतिहाससंशोधकमंडळाची स्थापना झाली. रा.रा.राजवाडे यांनी पत्राचे महत्त्व पुढे मांडले आणि इतिहासाला बखरी कशा कमी महत्वाच्या आहे हें दाखविले. उपलब्ध साहित्य पाहून त्यांची व्यवस्थेशीर मांडणी करुन कथासूत्र पहाण्याचे काम रा.खरे व रा.सरदेसाई यांनी चांगल्या तऱ्हेने केले आहे. महाराष्ट्राबाहेरहि काम झाले नाही असें नाही. प्रो.यदुनाथ सरकार यांनी मोगल आणि मराठी इतिहासाकडे लक्ष पुरविले आहे आणि त्यांनी शिवाजी आणि औरंगजेब यांची चरित्रें प्रसिध्द केली. सध्या इतिहासाकडे लक्ष चांगले लागले आहे आणि अधिकारी लेखक जरी थोडे आहेत, तरी पाश्चात्य संशोधकांच्या कसास उतरेंल इतके इतिहासपाडित्य आपल्या देशात स्थापित झाले आहे हे खास.

महाराष्ट्राच्या दक्षिणेस हिंदुसंस्कृतीचे एक तऱ्हेचे सातत्य होते त्यामुळे प्राच्यवस्तुसंशोधनशास्त्र आणि अर्वाचीन इतिहास यांचे धागे एकमेकांत अडकतात आणि त्यामुळे मद्रासकडे इतिहास आणि प्राच्यवस्तुसंशोधनशास्त्र यावर एकच मनुष्य परिश्रम करीत आह असें दिसून येईल. दक्षिणेकडे महत्वाचें संशोधक म्हणजे आंध्रचरिताचें कर्ते कोमुरि वीरभद्र राव, प्रो.रंगास्वामी आय्यंगार, टी. गोपीनाथराव, मि. कनकसभे इत्यादी होत.

हिंदुस्थानच्या इतिहासावर परिश्रम करणारे जे यूरोपीय संशोधक झाले व आहेत, त्यांची माहिती विशिष्ट विषयांवर लेख येतील तेव्हा दिली जाईल.

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .