प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

इंग्रजी वाङ्मय - एकंदर इंग्रजी वाङ्मयाचा विचार करण्यास त्याचें खंडश: परीक्षण करणें अधिक सोयीचें असल्यामुळें त्याचे पुढीलप्रमाणें विभाग केले आहेतः -

वाङ्मयाच्या उपक्रमापासून चॉसरपर्यंत, (२) चॉसरपासून मध्ययुगाच्या शेवटपर्यंत, (३) इलिझाबेदन युग, (४) राजपुनरागमन युग, (५) अठरावें शेतक (इंग्रजी वाङ्मय, आणि) अमेरिकन वाङ्मय (६) एकोणिसावें शतक, इंग्लंडी, अमेरिकन, अँग्लोइंडियन.

वा ङ्म या च्या उ प क्र मा पा सू न चॉ स र प र्यं त.- ख्रिस्ती काळापूर्वी इंग्रजी वाङ्मय अस्तित्वांत नव्हतें. ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करण्यापूर्वी इंग्रज लोकांत रोमन वर्णमाला प्रचलित होती कीं, ते आपल्या मूळ भाषेंतील एखादी लिपी वापरीत होतें, याचा निर्णय करण्याइतका पुरावा उपलब्ध नाहीं.

वाङ्मयाचा उपक्रम होण्यापूर्वी एका प्रकारच्या काव्यकलेचा बराच विकास झाला होता आणि पुष्कळशी कविता पिढयानुपिढया चालत आली होती, ही गोष्ट निर्विवाद आहे. ही अलिखित कविता निर्माण करण्याचें श्रेय राजे व सरदार यांस गाऊन दाखविणाऱ्या शाहीरांकडे आहे. जर्मन राजघराण्यांतील धीरवीर पुरुषांचे पराक्रम त्यांत वर्णिले असत. त्या कविता कशा प्रकारच्या होत्या हें आपणांस 'बीवूल्फ' यांतील उपलब्ध असलेल्या उताऱ्यावरून समजण्यासारखें आहे.

लोकांनीं ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यानंतर तत्पूर्वीचे वैभव वर्णन करणाऱ्या शाहीरकृतीचा ऱ्हास होत गेला, तथापि पूर्णपणें ख्रिस्तभक्त झाल्यावरहि वोडनच्या वंशजांचा आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाविषयींचा सर्व अभिमान नष्ट व्हावा, ही गोष्ट शक्य नव्हती. चॉसर यास 'वेडचें गाणें' माहींत होतें, यावरून जर्मन वीर पुरुषांच्या पराक्रमाचीं वर्णनपर गाणीं गाण्याचा प्रघात चवदाव्या शतकापर्यंत नाहींसा झाला नव्हता हें उघड होतें. तीं गाणीं आज उपलब्ध नाहींत याचें आश्चर्य वाटण्याचें कारण नाहीं. कारण परंपरागत गाणीं किंवा स्वतः रचलेलीं गाणीं कोणी उतरून घेऊं नयेत याविषयीं तत्कालीन शाहीर अगदीं मत्सरपूर्वक काळजी घेत होते, ही गोष्ट लक्षांत घेण्यासारखी आहे. शिवाय प्राचीन हस्तलिखित लिखाण उतरून ठेवण्याचें व जतन करण्याचें काम ज्या ख्रिस्ती पुरोहितांकडे होतें, त्यांच्याकडून ऐहिक विषयपर कवितांचें नीट जतन होणें जवळजवळ अशक्य होतें. वीरश्रीच्या आख्यायिका ज्यांत आहेत अशा चार वर्णनपर काव्यांचे विभाग हल्ली उपलब्ध आहेतः (१) बिवूल्फ, (२) विडसिथ, (३) फिनेसवर्ग आणि (४) वाल्डेर. विडसिथ यांत विशेष काव्यगुण नाहींत परंतु प्राचीन ज्ञानाच्या दृष्टीनें याचें महत्व फार आहे. जर्मन आख्यायिकांत असलेल्या सुप्रसिध्द राजांचा त्यांत नामनिर्देश असून तें सर्व काव्य 'विडसिथ' नांवाच्या शाहीराकडून वदविलें आहे. सदर 'विडसिथ' हा त्या सुप्रसिध्द राजांच्या दरबारीं गेलेला असून त्यानें आपल्या गायन कलेंतील नैपुण्याबद्दल त्यांजकडून बरींच बक्षिसें मिळविली, असाहि त्यांत मजकूर आहे. त्या सुप्रसिध्द राजांच्या यादींत अर्मनरिक व अल्बॉइन यासारख्या ऐतिहासिक पुरुषांचीं नांवें आहेत. सदर ऐतिहासिक पुरुष अनेक शतकांच्या अंतरानें होऊन गेलेले असून प्रस्तुत काव्यांत ते समकालीन असल्याबद्दल उल्लेख आहे. 'फिनेसबर्ग' या काव्याच्या हल्ली उपलब्ध असलेल्या भागांत युध्दाचें सुंदर वर्णन आहे. 'वाल्डेर' काव्य पांचव्या शतकांत प्रचलित असलेल्या फ्रँकिश व बरगन्डियन आख्यायिकांवर रचलेलें आहे.

जे शाहीर प्राचीन वीरश्रीच्या आख्यायिकांचें वर्णन करीत म्हणून वर सांगितलें आहे, ते आपल्या आश्रयदात्यांच्या व त्यांच्या पूर्वजांच्या पराक्रमांचेंहि वर्णन करीत असत. यावरून ब्रिटनच्या स्वारींतील व डेन्स लोकांच्या झगडयांतील अनेक प्रसंगांवर त्या काळीं पुष्कळसा काव्यसंग्रह निर्माण झाला असावा. यापैकीं सांप्रत दोनच नमुने उपलब्ध आहेत आणि ते दोन्ही दहाव्या शतकांतले आहेत. एक 'ब्रुननबूरची लढाई' व दुसरी 'माल्डनची लढाई'.

इंग्लिश लोकांनीं किती जलद व पूर्णत्वानें ख्रिस्ती संस्कृतीचें ग्रहण केलें, ही एक आश्चर्य करण्यासारखी ऐतिहासिक गोष्ट आहे. ऑगस्टाईन इ. स. ५९७ त इंग्लंडच्या किनाऱ्यावर उतरला व नंतर चाळीस वर्षांतच अल्ढेल्म नांवाचा अत्यंत विद्वान आणि त्या काळांतील उत्कृष्ट लॅटिन लिहिणारा एक इंग्लिशमन निर्माण झाला. पुढच्या पिढींत आंग्ल भूमीनें बीड यास जन्म दिला. ज्ञानाच्या भरीवपणांत व विविधतेंत आणि वाङ्मयप्रभुत्वाच्या दृष्टीनें बीडला अनेक शतकेंपर्यंत यूरोपमध्यें कोणी प्रतिस्पर्धी नव्हता. अल्ढेल्म व बीड हे त्यांच्या लॅटिन ग्रंथाबद्दल प्रसिध्द आहेत. परंतु अल्ढेल्म यानें देशी भाषेंतहि उत्तम कविता लिहिल्या होत्या असें म्हणतात. सांप्रत उपलब्ध असलेलें प्राचीन इंग्रजी वाङ्मय हें बहुतेक ख्रिस्ती धर्मविषयक आहे. यावरून इंग्लंडांत ख्रिस्ती धर्मावांचून इतर कोणता धर्म कधींच नव्हता असा समज होण्याचा संभव आहे. इतिहासकार या नात्यानें बीड यास मात्र ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याबद्दलची हकीकत देणें भाग पडलें आहे. ख्रिस्ती धर्मापूर्वीच्या वेडगळ चालीरीति बऱ्याच दीर्घकाळपर्यंत प्रचारांत होत्या, असें तत्कालीन धर्मखात्याच्या कृत्यांवरून आणि अद्याप उपलब्ध असलेल्या त्या वेळच्या कांहीं जादू मंत्रांवरून दिसून येतें. परंतु प्राचीन देवतांची पूजा करण्याचा प्रघात मात्र लवकर नाहींसा झाला. याप्रमाणें ख्रिस्ती धर्मापूर्वीचा इंग्लंडांतील मूळचा धर्म कांहीं एक हकीकत मागें न ठेवतां नष्ट झाला.

प्राचीन इंग्रजी धार्मिक कविता बहुतेक मठामध्यें आणि ख्रिस्ती धर्माशीं व लॅटिन भक्तिविषयक वाङ्मयाशीं परिचित असलेल्या लेखकांनीं लिहिलेली आहे. 'ड्रीम ऑफ दि रूड' हें काव्य बाजूस ठेवलें तर तत्कालीन काव्यांत कविप्रतिभा दिसून येत नाही; तथापि तो काळ लक्षांत घेतला तर आपल्या अपेक्षेंपेक्षांहि त्यांत अधिक संस्कृति व सदभिरुचि दिसून येते. त्या काव्यांतील साहित्य व विचार मुख्यतः लॅटिन मूळांतून घेतलेले असून शब्दयोजनेच्या बाबतींत मूळच्या वीरश्रीच्या काव्याचें अनुकरण केलें आहे.

विद्वानांनीं लिहिलेलीं या दृष्टीनें 'एक्झिटर बुकांतील' कोडयांचें धार्मिक कवितेशीं बरेंच साम्य आहे, परंतु सदर्हू कोडयांवर मूळ इंग्रजी चारित्र्याचा छाप अधिक स्पष्टपणें दिसून येतो. त्यांतील कांहीं कोडीं तर पुराण इंग्रजी काव्यांचे उत्कृष्ट नमुने आहेत. कांही कोडी सूत्रस्वरूपाची असून नैतिक व व्यवहारोपयोगी ज्ञान देणारीं आहेत. त्यांतील नीति ख्रिस्ती धर्मांतील आहे परंतु कांहीं शहाणपणाच्या म्हणी ख्रिस्ती धर्माच्या पूर्वकाळापासून परंपरेनें चालत आल्या असाव्यात, असें म्हणण्यास हरकत नाहीं. 'सॉलोमन व सॅटर्न यांच्यांतील संवाद' हे एक त्याचें उदाहरण आहे. 'हद्दपार स्त्रीची कहाणी' पतिसंदेश, प्रवासी हा नाटयांतील एकपात्री भाषणांचा समुच्चय, हा पुराणइंग्रजी काव्याचा एक विशिष्ट व मनोवेधक भाग आहे. सदरहु समुच्चय कधीं रचण्यांत आला असावा,हें निश्चयानें सांगतां येत नाहीं, तरी ज्याअर्थी तो एक्झिटर बुकांत दिलेला सांपडतो, त्याअर्थी त्याची रचना दहाव्या शताकच्या पूर्वी झालेली असावी.

जरी इंग्रजी काव्याचा उगम इंग्लंडांत ख्रिस्तीधर्माचा प्रवेश होण्यापूर्वी बराच दूर काळपर्यंत नेतां येतो,तरी इंग्रजी गद्याचा खरोखरीचा उपक्रम ऑल्फ्रेडच्या कारकीर्दीत झाला असें म्हटलें पाहिजे. यावरून यापूर्वी कोणत्याच प्रकारचें गद्य नव्हतें असें नाहीं; परंतु बाराव्या शतकांत उतरून ठेवलेलें लिखाण पाहिलें तरी, त्याच्या अप्रगल्भ व त्रुटित लेखन पध्दतीवरून त्याच्या अतिप्राचीनत्वाची साक्ष पटते. अशा रीतीनें सातव्या शतकाच्या प्रारंभापासून नवव्या शतकाच्या गद्यापर्यंत जरी बरेंच इंग्रजी गद्य प्रसिध्द झालें असलें तरी वाङ्मय या सदरांत पडण्यासारखे ग्रंथ लिहिण्यास लॅटिन हीच एक योग्य भाषा आहे, अशी त्या वेळीं लोकांची समजूत होती आणि अल्ढेल्म व बीड यांच्या वेळीं जसे लेखक विद्वान होते, तसेच ते पुढें होत जाते तर, इंग्रजी गद्य ग्रंथ निर्माण होण्याचा काळ आणखी लांबला असता.

ज्या ग्रंथाचीं आल्फ्रेडनें व त्यानें नेमलेल्या लेखकांनीं भाषांतरें केलीं त्यापैकीं ''सेंट जॉर्जेस पॅस्टोरल केअर'' व 'डॉयलॉग्ज' हे ग्रंथ उघड उघड उपाध्येमंडळीस उद्देशून लिहिले आहेत. इतर भाषांतरें जरी सर्वसामान्य वाचकांकरितां केलीं असलीं तरी ती सर्व धार्मिक स्वरूपाचीं आहेत. आल्फ्रेडनें भाषांतरांखेरीज अगदीं स्वतंत्र ग्रंथरचनाहि केलेली आहे.

आल्फ्रेडची वाङ्मयविषयक अन्य कामगिरी म्हटली म्हणजे त्याचे कायदे आणि त्यानें सुरू केलेली अँग्लोसॅक्सन बखर ही होय. आल्फ्रेडनंतरची पुराण इंग्रजी गद्य ग्रंथरचना सर्वस्वी पुरोहितवर्गानें केलली आहे. वर सांगितलेल्या बखरीव्यतिरिक्त त्या वेळचें इतर सर्व वाङ्मय लॅटिनची भाषांतरें, धार्मिक प्रवचनें आणि संतचरित्रें यांनीं भरलेलें आहे. शब्देतिहास दृष्टीनेंच काय ते त्याचें महत्त्व आहे. हेंच म्हणणें ऑल्फ्रेडच्या ग्रंथरचनेसहि लागू आहे.

फ्यूरीचा अॅबो याचा शिष्य विर्टफर्थ मठाधिपति यानें अकराव्या शतकाच्या प्रारंभीं एक विश्वज्ञानात्मक लहानसे पुस्तक लिहिजें.त्यांत कालगणनाशास्त्र, ज्योतिषशास्त्र, गणितशास्त्र, छंदःशास्त्र, साहित्यशास्त्र व नीतिशास्त्र या सर्वांचा सारांशच दिलेला आहे; परंतु पुस्तकाच्या एकंदर रचनेवरून ग्रंथकर्त्याची बुध्दिमत्ता दिसून येते. औषधी वनस्पतींचे गुणधर्म इत्यादि विषयांवरचे त्या वेळचे ग्रंथ लॅटिन ग्रंथांतील उताऱ्या वरून तयार केलेले आहेत. या ग्रंथांतून जे स्वतंत्र विचार प्रदर्शित केले आहेत, त्यावरून शास्त्रीय माहितीपेक्षां त्या वेळच्या समजुती किती वेडगळ होत्या याची माहिती मिळते.

ज्यांचा यूरोपच्या वाङ्मयावर बराच परिणाम घडला होता, त्या अपोलियन ऑफ टायर (टायरचा अपोलिअस) आणि लेटर ऑफ अलेक्झांडर (अलेक्झांडरचें पत्र) या नांवाच्या दोन लॅटिन कादंबऱ्यांचें अकराव्या शतकांत इंग्रजींत भाषांतर झालें. त्याच वेळेस ''दि वंडर्स ऑफ दि ईस्ट'' (पूर्वेकडील चमत्कार) या नांवाचें एक चोपडेंहि प्रसिध्द झालें. या सर्व ग्रंथरचनेवरून इंग्रज लोकांचीं मनें आतां धार्मिक विषय सोडून इतर विषयाकडे वळलीं होती, असें दिसून येतें.

नॉर्मन लोकांच्या स्वारीनंतर इंग्रजी मठांत परदेशीय लोकांची गर्दी झाल्यामुळें मूळच्या इंग्रजी वाङ्मयाच्या विकासास बराच मोठा अडथळा उपस्थित झाला. थोडयाच वेळांत मठांच्या शाळेंत शिकणाऱ्या मुलांनीं मूळ भाषेंतून लेखनवाचन शिकण्याचें सोडून दिलें, व ती फ्रेंच भाषेंतून लेखनवाचन शिकूं लागलीं. बारावें शतक हा अँग्लो लॅटिन वाङ्मयाच्या इतिहासांतला मोठा उज्ज्वल काळ असून त्यांत फ्रेंच भाषेंत लिहिलेली बरीच महत्त्वाची ग्रंथरचना झाली; परंतु मूळ देशी भाषेंतील ग्रंथरचना फारच अल्प होती आणि स्वतंत्र विचाराची तर मुळींच नव्हती, असें म्हटलें तरी चालेल. ह्या वेळेपासून चॉसरच्या वेळेपर्यंत लोकांस धार्मिक शिक्षण देण्यापलीकडे देशी भाषेचा दुसरा कांहीं उपयोग झाला नव्हता. या काळांत राष्ट्राचा बौध्दिक विकास कसा झाला, हें समजून घ्यावयाचें असेल, तर लॅटिन भाषेंत झालेल्या ग्रंथरचनेकडे पाहिलें पाहिजे. तेराव्या शतकाच्या प्रारंभीं प्रसिध्द झालेल्या अँक्रेनरिवले नांवाच्या पुस्तकांत भिक्षुणीस उपदेश केलेला आहे. सदरहू पुस्तकांत ग्रंथकर्त्यांच्या ठिकाणची प्रतिभा चांगल्याच रीतीनें दृष्टीस पडते व तें त्यांतील मजकुराच्या धोरणाच्या दृष्टीनेंहि फार मनोवेधक आहे. ग्रंथकर्त्यांचें भाषाप्रभुत्व जरी इतक्या उच्चदर्जाचें होतें, तरी त्याची संस्कृति इंग्लिश पध्दतींची नसून फ्रेंच पध्दतीची होती. चवदाव्या शतकाच्या प्रारंभी रिचर्ड रोलेचे आणि त्याच्या सांप्रदायिकांचे ग्रंथ बरेच लोकप्रिय झले. पुढील काळांतील धर्मविचार व गद्यलेखनपध्दति यांच्यावर त्या ग्रंथांचा जितका परिणाम झाला तितका दुसऱ्या कशानेंहि झाला नाहीं.

नार्मन लोकांच्या स्वारीमुळें मूळ भाषेंतील गद्यलेखनाच्या विकासांत जसा खंड पडला तसा तो पद्यरचनेच्या विकासांतहि पडला. जुन्या कवींची जुनी भाषा समजेनाशी झाल्यामुळे बाराव्या शतकाच्या उत्तरार्धांतील व तेराव्या शतकांतील कवींवर त्यांच्या काव्यांचा कांहीं एक परिणाम झाला नाहीं. तेराव्या शतकांतील कवितेवर फ्रेंच काव्यांचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नांहीं. इ. स. १३०० च्या सुमारास इंग्लंडच्या निरनिराळया विभागांत बरीच संतचरित्रात्मक व धर्मप्रवचनपर कविता निर्माण झाली.बाराव्या शतकाच्या प्रारंभापासून ज्या फ्रेंच अद्भुत रसात्मक काव्य पध्दतीचा अंमल सर्व यूरोपखंडभर चालू होता. त्याचा इ. स. १२५० पर्यंत इंग्लंडच्या काव्यरचनेवर कांहीं परिणाम झाला नाहीं. त्या पुढील शंभर वर्षांत मात्र इंग्लंडमध्यें त्या काव्यपध्दतीचा प्रसार विलक्षण जोरानें झाला.

चवदाव्या शतकाच्या पूर्वांर्धांत इंग्लंडमध्यें जो वाङ्मयाचा विस्तार झाला व त्याचें जें स्वरूप दृष्टीस पडलें, त्यावरून देशी भाषेची अनास्था कमी होऊन तिच्यांत पुष्कळसें वाङ्मय उत्पन्न होण्याची चिन्हें सपष्टपणें दिसूं लागलीं. मध्यम व उच्च वर्गांतील लोकांच्या व्यवहारांत फ्रेंच भाषेचा अनुपयोग सुरू झाल्यापासून आणि शाळांतून फ्रेंचच्या जागीं इंग्रजी भाषेची प्रस्थापना झाल्यापासून इंग्रजी ग्रंथसमूहाची उणीव भासूं लागली. ही उणीव भरून काढण्याकरितां जरी केवळ परभाषेंतील ग्रंथांचीं भाषांतरें व रूपांतरें निर्माण झालीं तरी त्या योगानें देशांत रसिकता व या पुढील काव्यनिर्मिति यांची भूमिका तयार झाली.

(२) चॉ स र पा सू न यू रो पां ती ल वि द्या व, क ला यां च्या पु न र ज्जी व ना प र्यं त - चॉसरच्या वेळेस जी उत्तम व विस्तृत ग्रंथरचना झाली तिच्यामुळें निकट काळावरच केवळ नव्हे तर भविष्यकाळच्या वाङ्मयावर जो परिणाम झाला त्यामळें चॉसरचें युग अत्यंत महत्त्वाचें आहे. चॉसर (इ. स. १३४०-१४००) हा प्रथम कांहीं काळपर्यंत फ्रेंच काव्यांचें अनुकरण करणारा, व केवळ कुशल पद्यरचना करणारा कवि होता. त्याच्या पद्यरचनेची तीच तींच ठराविक साधनें असून तिची तऱ्हाहि तितक्याच ठराविक स्वरूपाची होती. शेकडों वर्षे राजदरबारी कवींनीं सूर्यास्त, गाणारे पक्षी, सुंदर ललना व त्यांचे प्रियकर यांची मधुरमीलनें यांविषयीं ज्या पध्दतीनें व ज्या भाषेंत वर्णनें केली आहेत, त्याच पध्दतीनें व त्याच भाषेंत चॉसर कवीनेंहि केलीं. यावेळींहि त्याच्या कवितेंत सत्यसृष्टींतील जिवंत प्राण्यांच्या सूक्ष्म व सप्रेम निरीक्षणाची, लंडनच्या सभोंवार असलेल्या उद्यानांतील व शेतांतील रंगीबेरंगी व सुगंधित पुष्पांच्या वर्णनांची आणि रानावनांत सुस्वर आलाप काढणाऱ्या पक्ष्यांची कल्पना देणाऱ्या पद्यरचनेची उणीव नव्हती. तथापि त्याची काव्यरचना व त्या काळची फ्रेंच काव्यरचना यांत फारसा फरक दिसून येत नाहीं. परंतु ज्यावेळीं तो तसल्या प्रकारच्या काव्यरचनेंत निष्णात होण्याची खटपट करीत होता, त्यावेळीं इटलींतील नवीन पध्दतीच्या गद्यात्मक व पद्यात्मक वाङ्मयाशीं त्याचा परिचय झाला. या नवीन पध्दतीच्या काव्यरचनेंत फ्रेंच काव्यांत दृष्टीस पडणारी अद्भुतरसाची व असत्य सृष्टीची ठराविक रीतच जरी प्रचलित होती तरी ती नवीन पध्दत अधिक व्यापक स्वरूपाची, अधिक जोमदार व अधिक भावनाप्रचुर होती. काव्य़ाप्रमाणेच नवीन पध्दतीचें गद्यहि पूर्वीच्या गद्याहून अगदीं भिन्न स्वरूपाचें होतें. या नवीन पध्दतीच्या गद्याशीं बोकॅशिओच्या लेखांवरून चॉसरचा परिचय झाला. त्याच्या लेखनपध्दतीवर या सर्वांचा परिणाम झाला आणि त्यामुळें त्याची वर्णन करण्याची शैली सर्वस्वी नवीन वळणावर गेली. चॉसरच्या लेखनपध्दतीवर जो हा परिणाम झाला तो फ्रेंच पध्दतीपेक्षां इटॅलिअन पध्दत अधिक चांगली होती म्हणून नव्हे तर त्या दोन पध्दतींत जो फरक होता त्यायोगानें चॉसरच्या विचारास जी चालना मिळाली त्यामुळें घडून आला. चॉसर हा कसातरी यदृच्छेनें झालेला निष्काळजी कवि नसून सुंदर शब्द योजना, उदात्त कल्पना, निरनिराळया प्रसंगांची व्यवस्थित जुळणी इत्यादि गोष्टीकडे विचारपूर्वक लक्ष देणारा होता. यामुळें त्याचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ जो 'कँटरबरी टेल्स' (कँटरबरी कथा) त्यांत इतके उत्तमोत्त गुण दिसून येतात कीं, त्याची लेखनपध्दति अगदीं निर्दोष वाटूं लागते. सुबकपणा, साधेपणा, भारदस्तपणा इत्यादि गुणांनीं युक्त व विषयाला साजणारी त्याची भाषापध्दति केवळ नमुनेदार आहे. त्याची पद्यरचना बिनचुक आहे. इतकेंच नव्हे तर ती सुश्राव्य् व विविध आहे.

आपल्या कलेंत निष्णात असलेला असा त्या काळचा चॉसर हा एकटाच लेखक नव्हता. गॉवर हा बराच विद्वान व बुध्दिवान होता तरी, त्याच्या ठिकाणीं पहिल्या प्रतीची काव्यप्रतिभा व कौशल्य या दोहोंचाहि अभाव होता. सुबकपणा व सुबोधपणा हे अत्युत्तम गुण जरी त्याच्या ग्रंथांत प्रामुख्यानें दृष्टीस पडतात तरी वाच्यार्थापलीकडचा व्यंगार्थ सुचविणारी व त्यामुळें वाचकांच्या मनांतील भावना प्रदीप्त करणारी शब्दयोजना जी महाकवींच्या कृतींत दिसून येते, तिचा त्याच्या ग्रंथांत अभाव आहे.

याशिवाय त्यावेळीं अनेक कुशल कवि होऊन गेले. परंतु आपणांस विशेष विचार करण्यासारखा मुद्दा म्हटला म्हणजे कोणत्या कवींत किती काव्यप्रतिभा होती हा नसून कोणत्या ग्रंथकारांनीं आपल्या कलेंत क्रांति घडवून आणण्यासारखें शोध लावले हा आहे. कारण काव्यप्रतिभा ही ज्याच्या त्याच्या बरोबर निघून जाते, परंतु लेखन कलेंतील का्रंतिकारक नवीन शोध मागून होणाऱ्या सर्व ग्रंथकारांस उपयोगी पडण्यासारखे असतात. जसे मार्लोनें शाघून काढलेली निर्यमक कायमपध्दति, पोपनें उपयोगांत आणलेली यमुकप्रचुर काव्यपध्दती, ग्रेची संबोधनात्मक लघुकाव्यपध्दति आणि पोनें जिचा प्रघात पाडला ती संक्षिप्तकथापध्दति या सर्वांचा उपयोग मागून झालेल्या कवींस करतां आला अशा तऱ्हेचे शोध चॉसरनें किवा त्याच्या समकालीन कवींनीं लावले नाहींत.

तथापि चॉसरच्या लेखनाचा परिणाम बराच व्यापक व दीर्घकाळ टिकणारा झाला. दरबारी किंवा उच्च प्रतीच्या कवींच्याच केवळ नव्हे तर अगदीं हलक्यासलक्या कवींच्या कृतींतहि त्याच्या लेखनाचें अनुकरण केलेलें आढळून येतें. लिडगेट, हाक्लीव्ह व हावीस हे चॉसरचे मुख्य अनुयायी होते. हाक्लीव्हची लेखनशैली लिडगेट इतकी आवेशाची नव्हती. तो स्वभावानें शांत परंतु अधिक विनोदी व अधिक कल्पक होता.

लिडगेटचें ग्रंथकर्तृत्व बरेंच विस्तृत आहे. कवी या नात्यानें त्याची ख्याती मोठी असल्यानें अनेक निनांवी कवतिा त्याच्या नांवावर विकल्या जात होत्या. त्या सर्व वजा केल्या तरी त्याची काव्यसंख्या आश्चर्य करण्याइतकी मोठी आहे. त्याच्या काव्यासंबंधानें साधारणपणें असें म्हणतां येईल कीं त्याची भाषांतर स्वरूपाची कविता वीररस प्रधान असून स्वतंत्र कविता प्रेमविषयक व उपदेशपर आहे. त्याच्या ग्रंथांतील किंवा त्या काळच्या एकंदर वाङ्मयांतील मोठा दोष म्हटला म्हणजे ग्रंथकारानें जें जें कांहीं पाहिलें, ऐकलें किंवा वाचलें असेल, त्याचा त्याच्या मनावर काय परिणाम झाला; व त्यापासून त्याच्या मनांत काय विचारलहरी उत्पन्न झाल्या, त्या आपल्या काव्यांत न आणतां केवळ पाहिलेल्या, ऐकलेल्या किंवा वाचलेल्या गोष्टी उगीच थोडया फरकानें आपल्या काव्यांत मांडणें हा होय.

या दोन लेखकांनंतर स्टीफेन हावीस उदयास आला, पण त्याचें लेखन त्यांच्या इतक्याहि दर्जाचें नाहीं. तो चॉसरचा अनुयायी होता असें म्हणण्यापेक्षां लिडगेटचा होता असें म्हटलें तर अधिक शोभेल. परंतु लिडगेटच्या लिहिण्यांतून जो कुठें आवेश व कुठें करुणरस दृष्टीस पडतो तोहि त्याच्या लेखनांत नसून लिडगेटचे दोष मात्र अधिक प्रमाणांत दिसून येतात.

आतांपर्यंतच्या कवींत कल्पनाशक्ति व काव्यप्रतिभा यांचा अभाव दिसून येतो. यामुळें त्यांच्याकडून चांगली कविता निर्माण होऊं नये हें साहजिक आहे. परंतु या काळांत चांगलीं व बुध्दिवान माणसें वाङ्मयाकडे कां लक्ष देत नव्हतीं हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कदाचित त्यावेळीं चालू असलेल्या युध्दामुळें किंवा लोकांचें लक्ष औद्योगिक प्रगतीकडे लागल्यामुळें देशांतील तरुणांचें लक्ष वाङ्मयाकडे जात नसावें हें संभवनीय दिसतें. परंतु वरील प्रश्नाचा खात्रीपूर्वक निर्णय करतां येण्यासारखा नाहीं.

चॉसरचे अनुयायी प्रतिभावान नव्हते हें जरी मान्य केलें तरी त्यांनां चॉसरचें अनुकरणहि नीटपणें करितां येऊं नये ही आश्चर्याची गोष्ट आहे. लेखक या नात्यानें चॉसरच्या अंगी काय काय गुण होते व त्या गुणांचा त्याच्या पुढच्या पुढच्या ग्रंथांत कसकसा विकास होत गेला, हें त्याच्या लक्षांत आलें नाहीं, इतकेंच नव्हे तर त्यानीं त्याचे पहिले पहिलेच ग्रंथ पसंत केले व त्यांचेंच अनुकरण केलें.

मध्ययुगामध्यें इंग्लंडांत कांहीं स्त्रीलेखिका होऊन गेल्या. इ. स. १४०० च्या पूर्वी नॉरविचच्या ज्युलिआनानें ''रिव्हे लेशन्स ऑफ डिव्हाईन लव्ह'' या नांवाचें पुस्तक लिहिलें. त्याचप्रमाणें डेम ज्युलिआना बर्नरस इनें ''बुक ऑफ सेन्ट आल्बान्स'' नांवाच्या ग्रंथांत मृगयेवर निबंध लिहिला. शेवटीं सातव्या हेन्रीची आई मारगरेट ही विद्वान लोकांस व लेखकांस मदत करीत असे. इतकेंच नव्हे तर, तिनें स्वतः ''इमिटेशिओ ख्रिस्ती'' या ग्रंथाच्या चवथ्या पुस्तकांचें भाषांतर केलें. मारगरेट नांवाच्या दुसऱ्या एका बाईनें कॅक्स्टन यास त्याच्या भाषांतराच्या व छापण्याच्या कामीं उत्तेजन दिलें. यावरून त्याकाळच्या स्त्रिया पुस्तकांच्या चाहत्या व लेखकांच्या आश्रयदात्या होत्या असें दिसतें आणि स्केल्टन याच्या 'गार्लंड ऑफ लॉरेल' या ग्रंथावरून त्याच भोंवती स्त्रियांचा घोळका जमत असे, असें दिसून येते. मध्ययुगांतील स्त्रिया या शिवायहि अनेक गोष्टींत निष्णात होत्या. वैद्यक, न्याय व धर्म या बाबतींतहि त्या भाग घेत होत्या.

पंधराव्या शतकांतील अगदीं स्वतंत्र व जोरदार कविताहि सामान्य स्वरूपाची व सामान्य लोकांकरितां लिहिलेली असून तिच्यांत विशेष कौशल्याचा भाग नाहीं. ही कविता तीन प्रकारची आहे. (१) गीतें (२) पोवाडे आणि (३) नाटकें. कांहीं गीतें व्यावहारिक विषयावर आहेत. तर कांहीं धार्मिक विषयावर आहेत. पंधराव्या शतकांत रचल्या गेलेल्या गीतांपैकीं शेंकडों गीतें नष्ट झालीं असतील. कांहीं गीतें कांहीं काळ प्रचलित राहून ती लिहून ठेवण्याइतकीहि कोणी काळजी घेतली नाहीं. परंतु सुदैवानें थोडीं गीतें अजून उपलब्ध आहेत आणि ती पाहिलीं म्हणजे त्याकाळीं इतकी सुंदर गीतरचना झाली याचें कौतुक वाटतें.

गीतांप्रमाणें पोवाडेहि फार प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. परंतु समाजाच्या एखाद्या अवस्थेंतील त्याच्या व्यक्तीचें सर्व साधारण ज्ञान, त्यांच्यांतील आख्यायिका व त्यांच्या भावना हीं सर्व व्यक्त करणारे पोवाडे मागाहून शिल्लक राहतात असें समजणें चुकीचें आहे. तसेंच पोवाडे म्हणजे अवनत स्थितींतील अद्भुतरसात्मक गीतें असा अर्थ करणेंहि चुकीचें होईल. कारण पंधराव्या शतकांतील कांहीं पोवाडयांत अतिप्राचीन आख्यायिका व सामाजिक गीतनृत्यांचें ठराविक भाग आणि विशिष्ट पध्दति दिलेल्या आढळतात. पंधराव्या शतकानंतर पोवाडयाचें सामाजिक स्वरूप जाऊन त्याच्या जागी आख्यायिका आणि ठराविक व विशिष्ट पध्दति यांच्या अनुरोधानें पोवाडयांची रचना होऊं लागल्यानें त्याला वैयक्तिक स्वरूप प्राप्त झालें. याप्रमाणें फार प्राचीन काळच्या युध्दांचें, विश्वासघाताचें व आकस्मिक दुःखाचें वर्णन त्यांत येत गेल्यानें श्रोत्यांच्या भावना उद्दीपित करण्यास पोवाडा हें एक उत्तम साधन झालें. ज्याच्या योगानें पोवाडा रचणाऱ्या शाहीराच्या कल्पना व भावना प्रदीप्त होतील, अशा तऱ्हेचें कथानक शोधून काढलें म्हणजे तें कथानक पद्यरचनेंत गोवण्या पलिकडे त्या शाहीराचें कार्य शिल्लक रहात नसे. तथापि एकंदर इंग्रजी वाड:मयाच्या इतिहासाचा विचार करिता पंधराव्या शतकांत उत्तम पोवाडे रचले गेले असें म्हटले पाहिजे.

पंधराव्या शतकांत साधे, वीरश्रीचे व वर्णनात्मक पोवाडे निर्माण झाले इतकेंच नव्हे तर कांहीं वीरश्रीच्या पोवाडयांचें नाटकांत रूपांतर करण्यांत आलें. अशा रीतीनें किती पोवाडयांचें नाटकांत रूपांतर झालें, हे नक्की सांगतां येण्यासारखें नाहीं. परंतु उपलब्ध असलेल्या माहितीवरून त्यावेळीं असा सर्व साधारण प्रघात होता, असा तर्क करण्यास जागा आहे. अशा प्रकारचीं तीनच नाटकें हल्ली उपलब्ध आहेत व ती तिन्ही रॉबिन हूडसंबंधानें आहेत. या नाटकांखेरीज नाताळच्या सणांत ज्यांचे प्रयोग करण्यांत येत असत, अशीं नाटकें पंधराव्या शतकांत उदयास आलीं. त्यानंतर धार्मिक नाटकें किंवा पौराणिक खेळ करण्याची पध्दत सुरू झाली. त्याचप्रमाणें नैतिक नाटकें करण्याचा उगमहि पंधराव्या शतकांत झाला.

धार्मिक व नैतिक नाटकांखेरीज पंधराव्या शतकांत कांहीं अद्भुत नाटकेंहि रचण्यांत आलीं. अद्भुत नाटकांत साधुसंतांचीं चरित्रे धर्माच्या बाबतींत त्यांनीं सोसलेले छळ आणि त्यांनीं केलेले चमत्कार यांचें वर्णन असे.

पंधराव्या शतकांत जर चांगलें पद्यहि निर्माण झालें नाहीं, तर चांगलें गद्य झालें नाहीं यांत आश्चर्य करण्यासारखें काय आहे? चॉसरनें गद्याकडे विशेष लक्ष दिले नाहीं. विक्लिफची लेखनपध्दति अवजड होती आणि मँडेव्हिलेचे भाषांतरकार-लेखक यांनीं उत्तम भाषांतर करण्यापलीकडे कांहीं केलें नाहीं. पंधराव्या शतकांत बरेंच गद्य लिहून झालें, परंतु तें मुख्यत्वेंकरून धार्मिक व शैक्षणिक विषयासंबंधीं होतें. जॉन कॅप्ग्रेव्ह, रेजिनॉल्ड पीकॉक, सर जॉन फॉर्टेस्क्यू, कॅवस्टन व मलोरी हे त्यावेळेचे प्रमुख गद्य लेखक होते. कॅप्ग्रेव्ह हा पहिला इंग्रजी गद्यलेखक होता, परंतु त्याचा सर्व कल लॅटिनमध्यें लिहिण्याकडे होता. लॅटिन न समजण्याकरितां तो कधीं इंग्रजींत लिहित असे. तथापि त्याचें लिहिणें अगदींच साधारण प्रतीचे होतें. पीकॉक व फॉर्टेस्क्यू हे त्याच्याहून अधिक उच्च दर्जाचे लेखक होते. पीकॉक (इ. स. १३९५-१४६०) याची तर्कबुध्दि फार तीव्र होती. इतकेंच नव्हे तर वाद करण्यांत आपला हात धरणारा कोणी नाहीं आणि वादविवाद करतांना जे मुद्दे इतरांस सुचत नाहींत, ते आपणांस सुचतात अशा प्रकारचा त्याला मोठा अभिमान वाटत असे. रचनेच्या व व्यवस्थितपणाच्या दृष्टीनें त्याचे ग्रंथ फार उत्तम आहेत. त्याच्या कल्पना अगदीं सोप्या व विशद, रीतीनें मांडलेल्या असतात आणि त्याचीं वाक्यें जरी कुठे कुठे लांबलचक असलीं तरी ती त्या वेळच्या दुसऱ्या कोणत्याहि लेखकापेक्षां अधिक आधुनिक पध्दतीचीं आहेत. त्याची भाषापध्दति अलंकारिक असून त्याच्या लेखनांत समजूतदारपणाचा भाग बराच असल्यामुळें त्याच्या ग्रंथाच्या वाचनानें वाचकांचें मनोरंजन झाल्याशिवाय रहात नाहीं. फॉटेंस्क्यू हा कॅप्ग्रेव्हप्रमाणें बहुधा  लॅटिनमध्ये लिहित असे आणि पीकॉकप्रमाणे त्याचे लेख तत्त्वज्ञानाच्या व वादविवादाच्या स्वरूपाचे होते.

भाषांतरकार व ग्रंथप्रकाशक या नात्यानें कॅक्सटन यानें जें लेखनकार्य केलें त्यामुळें वाङ्मयांत नवीन युग उत्पन्न झालें नाही. परंतु त्यानें स्थापन केलेल्या छापखान्यामुळें एकंदर देशांतील संस्कृतीच्या संरक्षणास व प्रसारास उत्तेजन मिळूण वाङ्मयाची बरीच वाढ झाली. कॅक्स्टननें व ज्यांचे ग्रंथ त्यानें छापले त्या लेखकांपैकीं कोणाहि वाङमयाची नवी तऱ्हा किंवा नवा प्रकार उत्पन्न केला नाहीं. तथापि ग्रंथ प्रकाशनाचें काम करीत असतां लोकांच्या अभिरुचीस चांगले वळण लावण्याची तो खटपट करीत असे. त्यानें प्रकाशित केलेल्या ग्रंथामध्यें सर थॉमस मॅलोरीचा, मॉर्ट डि आर्थर या नांवाचा ग्रंथ हा एकच अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. इतकेंच काय पण पंधराव्या शतकांतील सर्व वाङ्मयांतहि तो एकटाच महत्त्वाचा ग्रंथ आहे.

त्या वेळच्या इंग्लंडांतील युध्दजन्य परिस्थितीमुळें आणि उद्योगधंद्यांच्या वाढीमुळें जरी उच्च बुध्दिमत्तेचीं माणसें वाङ्मयापासून परावृत्त झालीं असलीं तरी साधारण प्रतीच्या लेखकांच्या कार्यांत त्यामुळें कांहीं अडथळा उत्पन्न झाला नाहीं. त्या काळची ग्रंथसख्या मोठी असून त्यांतील विषय विविध आहेत. त्या वेळचे तीनशें निरनिराळे स्वतंत्र ग्रंथ प्रसिध्द झाले असून तितकेच अद्याप अप्रसिध्द स्थितींत आहेत. त्यांत प्रणयविषयक, रूमकात्मक, रूपकविहीन, वर्णनात्मक व बोधपर कविता, वीणाकाव्यें व अर्धवट वीणाकाव्यें, आत्मचरित्रपर व पापप्रक्षालक कविता, स्तुतिपर व भिक्षांदेहीच्या कविता, गद्यात्मक व पद्यात्मक करमणुकीच्या व उपदेशाच्या गोष्टी, प्राचीन व अर्वाचीन इतिहास इत्यादि इत्यादि अनेक विषयावर त्या वेळीं ग्रंथरचना झाली. या ग्रंथरचनेशिवाय त्या वेळीं लॅटिन भाषेंतहि बरीच ग्रंथरचना झाली आणि त्या काळाचे व मागील काळचे लॅटिन व फ्रेंच भाषेंतल ग्रंथ त्या काळाचे सुशिक्षित लोक वाचीत असत.

चवदाव्या व पंधराव्या शतकांत जरी इटॅलियन पुनरुज्जीवनाची चळवळ इंग्लंडांतील लोकांस माहीत होती तरी चॉसर खेरीज करून कोणावर त्या चळवळीचा काहीं परिणाम झाला नाहीं. कारण सोळाव्या शतकापूर्वी इटॅलियन वाङ्मय जाणणारा चॉसर हा एकटाच लेखक होता. त्या वेळीं इटालियन इंग्लंडला जात व जे इंग्रज इटालीला जात ते वाङ्मयाकरितां जात नसून विद्वत्ता संपादन करण्याकरितां जात असत. फ्री, ग्रे, फ्लेमिंग, टिली गन्थोर्प इत्यादि गृहस्थानीं इटालींत जाऊन जें अध्ययन केलें त्यामुळें ते व्याकरण व साहित्य या शास्त्रांत निष्णांत झाले परंतु ते इंग्लंडांत परत आल्यावर त्यांनीं आपलें लक्ष राज्यकारभारांत घातल्यामुळें त्यांच्याकडून वाङ्मयविषयक कांहीं कार्य झालें नाहीं. परंतु त्यांच्यामुळें इंग्लंडांत लिनेकर, कॉलेट, मोर इत्यादि गृहस्थांनीं जी बौध्दिक जागृति केली तिचा रस्ता मोकळा झाला आणि त्यांतुनच अखेर स्पेन्सर, बेकर, शेक्सपिअर, जॉन्सन, गिल्बर्ट, हार्वे, हॅरिअट यांचें युग निर्माण झालें.

इंग्लंडांतील मध्ययुग केव्हां संपलें हें नक्की सांगता येण्यासारखें नाहीं. पुनरुज्जीवन युगांतील संस्कृति व नवीन ज्ञान यांचा इंग्लंडांत प्रवेश झाल्यानंतर आणि अभियुक्त व इटालियन नमुनेदार वाङ्मयाचे अनुकरण करण्याचा इंग्लंडांत प्रघात सुरू झाल्यानंतरहि बराच काळ मध्ययुगांतील वीररसप्रधान काव्यें व वीणाकाव्यें (लिरिक्स) यांची चहा व अनुकरण चालू होतें. त्याचप्रमाणें शेक्सपिअरचा उदय होईपर्यंत नाटयकलेचीं जुनें नवें अशीं दोन्हाहि स्वरूपें एकाच वेळीं अस्तित्वांत होतीं.

एकंदरींत पंधराव्या शतकाच्या वाङ्मयांत कांहीं जोरदार परंतु ग्राम्य भाषेंत लिहिलेल्या ग्रंथांखेरीज वाङ्मय प्रेमीजनांचे लक्ष वेधींल असें कांही नाही. परंतु गुणांच्या दृष्टीनें जरी चवदाव्या शतकांतील वाङ्मयापेक्षां पंधराव्या शतकांतील वाङ्मय फार कमी दर्जाचें आहे तरी त्याचा एकंदर विस्तीर्णपणा व त्यांतील विषयांची विविधता पाहिली म्हणजे त्यावरून त्या वेळीं वाचकांची संख्या किती झपाटयानें वाढली होती हें कळून येते. वाचकांच्या संख्येची वाढ वाङ्मयाची वाढ होण्यास कारणीभूत झाली आणि नाटकांचे अनेक प्रयोग होत गेल्यानें मॉर्लो व शेक्सपिअर आणि बोमंट व फ्लेचर यांच्या सारख्या नाटककारांची कृति पहाण्यास योग्य असा श्रोतृवर्ग तयार झाला.

इ लि झा बे थ न यु ग. - मोरच्या ''युटोपिया'' (१५१६) पासून तों मिल्टनच्या ''सॅम्सन अगानेस्टि'' (१६७१) पर्यंत इंग्रजी वाङ्मयाचा इतिहास एकसारखा व अखंडित आहे. त्या काळाच्या वाङ्मयास त्याचें स्वरूप प्राप्त होण्यास तीन गोष्टी कारणीभूत झाल्या. त्यापैकीं दोन वाङ्मयकक्षेच्या बाहेरच्या आहेत एक इलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धांत राजकीय बाबतींतला लढा मिटून शांतता प्रस्थापित झाली. ही व दुसरी धर्मसुधारणेच्या चळवळीनें धार्मिक बाबतींला प्रश्न निकालांत निघाला ही. तिसरी गोष्ट म्हटली महणजे पुनरुज्जीवनाच्या चळवळीनें संस्कृति व शिक्षण यांचा इंग्लंडांत जारीनें प्रसार झाला. या राजकीय व धार्मिक शैक्षणिक स्वरूपाच्या तीन गोष्टी जरी इलिझाबेथन युगांतील वाङ्मयास कारणीभूत झाल्या तरी त्यांची कालमर्यादा व किंमत निरनिराळी होती. येथें या तीन गोष्टी वाङ्मयप्रसारास कशा कारणीभूत झाल्या याचा थोडक्यांत विचार करणें जरूर आहे.

रा ज की य का र ण. - इ. स. १५७९ पर्यंत टयूडर घराण्याची कारकीर्द ग्रंथकारांस उत्तेजन देण्यासारखी नव्हती सातव्या हेन्रीच्या कारकीर्दीची हकीकत प्रथम बेकनने लिहिली व आठव्या हेन्रीच्या कारकीर्दीचें नाटक पहिल्या जेम्सच्या कारकीर्दीत शेक्सपिअर व फ्लेचर यांनीं लिहिलें. आठव्या हेन्रीच्या कारकीर्दीतील उत्तरार्ध इतक्या कांहीं क्रूर कृत्यांनीं भरलेला होता कीं, त्याच्या वंशजांच्या हयातींत त्या कृत्यांचें चित्र रेखाटणें सुरक्षित नव्हतें. त्याच्यानंतर गादीवर येणाऱ्या दोन राजांच्या कारकीर्दीत देशांत चहूंकडे धार्मिक युध्द चालू होतें व इलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीच्या पहिल्या वीस वर्षांत काव्यफूर्ति उत्पन्न होण्यासारख्या गोष्टी घडून आल्या नाहींत. परंतु इ. स. १५८० पासून इलिझाबेथ राणीच्या मोठेपणाची, यशस्वी कारकीर्दीची व वाढत्या उत्कर्षाची देशांत चहूंकडे जाणीव उत्पन्न झाली व त्या योगानें काव्यें व नाटकें उत्पन्न झालीं. इंग्लंडविषयीं अभिमान, इंग्लंडचा आत्मविश्वास इत्यादि भावनांनीं इ. स. १६२२ त पूर्ण झालेला ड्रेटनचा 'पोलिओल्बिअन' हा ग्रंथ ओतप्राते भरलेला आहे.

ध र्म क्रां तिः - धर्मसुधारणेच्या चळवळीमुळें बरेंच वाङ्मय निर्माण झालें सर थॉमस मूर, टिंडाल व त्याचे मित्र यांनीं त्या वादविषयक वाङ्मयांत भाग घेतला. धार्मिक विचार व्यक्त करणें, भाषांतर व वत्कृत्व इत्यादि कामाकडे गद्याचा उपयोग होत गेल्यानें त्याची बरीच वाढ झाली. प्रथम हे धार्मिक लेखक निर्माण होण्यास फार विलंब लागला व हुकरपर्यंत कोणी नाणावलेला धार्मिक लेखक झाला नाहीं. परंतु त्याच्यामागून शंभर वर्षेपर्यंत अनेंक धार्मिक वक्ते उत्पन्न झाले.

अ भि यु क्त सं स्कृ ति. - ही संस्कृति इंग्लंडांत उत्पन्न होण्यापूर्वी प्रथम ग्रीक व लॅटिन भाषांचें ज्ञान, त्या भाषांतील वाङ्मयाचें अध्ययन, व प्राचीनकाळच्या चालीरीतींची व मनस्थितीची यथार्थ कल्पना यांचा प्रसार सुरू झाला. तथापि बराच काळपर्यंत इंग्लंडांत कोणी विद्वान लेखक निर्माण झाला नाहीं. स्वतंत्र विचारांचा उगम या दृष्टीनें ग्रीक संस्कृतीचें अनुकरण करण्याची प्रवृत्ति प्रथम ''यूरोपीय ग्रंथांत दिसून येते. परंतु पुढें लॅटिन व ग्रीक ग्रंथांची गद्यात्मक व पद्यात्मक भाषांतरें अधिकाधिक होऊं लागलीं.

इ ट ली व फ्रा न्स. - रोम व अथेन्स येथील विचार व कला यांचें ज्ञान इंग्लंडच्या लोकांस नेहमीं इटली व फ्रान्स या देशांकडून प्राप्त होत असल्यामुळें तें ज्ञान पुष्कळ वेळां त्या देशाच्या विशिष्ट गुणधर्मांनीं युक्त असे. त्या वेळचे नाटककार सेनेकाचीं नाटकें लॅटिन व इंग्लिश या भाषेंतून तर वाचीत असतच, परंतु ते इतर देशांतील लेखकांनीं त्याच्या नाटकांची केलेलीं भाषांतरेंहि वाचीत असत. हीच पध्दत इतर सर्व विषयांवरील लेखकांची होती. यामुळें इटलीची बुध्दिमत्ता इंग्लंडच्या बुध्दिमत्तेस तीन रीतींनीं उपयोगी पडली. (१) नष्टप्राय झालेल्या संगीतशास्त्रांचें व छंदःशास्त्रांचें पुनरुज्जीवन झालें; (२) काव्याचे निरनिराळे प्रकार निर्माण झाले; व (३) शासनशास्त्र व आचारशास्त्र यांतील उत्तमोत्तम विचार निर्माण झाले. इटालियन लेखक मॅकिऑव्हिली याच्या ग्रंथांच्या वाचनानें बेकनचीं मतें निश्चित झालीं. त्याचप्रमाणें इतर विषयावरील अन्यदेशीय ग्रंथकारांच्या लेखनाचाहि इंग्रजी लेखकांवर परिणाम झाला.

आतां आपण इ. स. १५८० पर्यंत इंग्रजी गद्य, पद्य व नाटय यांचा कसकसा विकास होत गेला याचें अवलोकन करूं.

इ. स. १५८० पर्यंतचें गद्य. - इंग्रजी गद्याचा विकास फार सावकाशपणें झाला. बराच काळपर्यंत लॅटिनभाषा व इंग्रजी भाषेच्या मूळ भाषा यांचा मधून मधून लढा व संयोग होत होत अखेर पूर्ण मिलाफ झाला. या पुढें विकास कसा होत गेला हें आपणांस सरकारी कागदपत्रें, इलिझाबेथ राणी, स्कॉटलंडची मेरी व त्यावेळचे पुढारी यांचीं लिहून ठेवलेलीं भाषणें, प्रवासवर्णनें व चरित्रें, सिसरो व बेथिअस यांच्या ग्रंथांचीं त्यावेळीं झालेलीं भाषांतरें इत्यादि साधनांवरून कळण्यासारखें आहे. शेक्सपियर याच्या वेळेपर्यंत इंग्रजी भाषेचा विकास बहुतेक ख्रिस्ती उपाध्याय, भाषांतरकार व बखरकार यांनींच केलेला आहे.

इ. स. १५८० पर्यंतचें पद्य. - आठव्या हेन्रीच्या कारकीर्दीत वीणाकाव्याच्या धर्तीची काव्यरचना करण्याची प्रवृत्ति उदयास आली. सर थॉमस वॅटच्या गीतांमधून चॉसरच्या वेळेपासून दृष्टीस न पडणारी अशी शृंगारिक कविता आणि नियमबध्द पद्यरचना दृष्टीस पडते. त्याच्या मागून हेन्री हावर्ड, अर्ल ऑफ सरे यानें त्याचें कार्य पुढें चालविले आणि चॉसर व इटालियन पध्दतीची काव्यरचना निर्माण करण्याचें श्रेय संपादन केलें. त्यानंतर काव्यरचनेंत बराच खंड पडला. जवळ जवळ वीसवर्षेपर्यंत सॅकव्हिलीच्या 'इन्डक्शन' नांवाच्या काव्याखेरीज नांव घेण्यासारखें दुसरें काव्य निर्माण झालें नाहीं आणि त्यापुढेंहि स्पेन्सरचा उदय होईपर्यंत जॉर्ज गॅस्कॉइने याशिवाय दुसरा काव्यलेखक झाला नाहीं.

इ. स. १५८० पर्यंतचें नाटय. - प्राचीनकाळच्या नाटयाचा अंमल किती होता हें प्रस्तुत काळच्या नाटयावरून कळून येतें. हा अमंल दोन प्रकारचा हाता. एक हुबेहूब त्या सारखी नाटयरचना उत्पन्न करणारा आणि दुसरा, त्यापासून अत्यन्त भिन्न अशी नाटयरचना उत्पन्न करणारा. पूर्वीच्या ''नैतिक नाटकांतून'' सातव्या हेनरीच्या कारकीर्दीत 'इन्टरल्यूड' नाटकांत निरनिराळया नमुनेदार व्यवसायाचें किंवा धंद्याचें संभाषण असत, जॉन हेवूड हा प्रमुख इंटरल्यूड लेखक होता. इ. स. १५८० पर्यंत झालेल्या नाटकांत लेखकांची बुध्दिमत्ता फारच थोडी दिसून येते. परंतु त्यांतील मजकूर ऐतिहासिकदृष्टया महत्त्वाचा आहे. प्रथम शिक्षक मंडळींनीं इंटरल्यूडपासून आनंदपर्यवसायी नाटयरचना निर्माण केली. फ्लाटसच्या आधारानें निरनिराळीं संविधानकें रचून आणि मधून-मधून विनोदपूर्ण अंक व प्रवेश असें त्यांचे विभाग पाडून ते आपल्या विद्यार्थ्यांस नाटकें रचून देत असत व त्यांच्याकडून त्यांचे प्रयोग करवीत असत. परंतु या नाटकांतून लेखनशैली, संवाद व छंदोबध्द रचना यांचा अभाव असे. आनंदपर्यवसायी नाटकांतील पद्यरचनेस ग्रीन यानें व त्यांतील गद्यास लिली यानें व्यवस्थित स्वरूप दिलें. इंग्लंडांतील प्रारंभीचीं शोकपर्यवसायी नाटकें सेनेकाच्या नाटकांच्या नमुन्यावर रचलेलीं आहेत. सेनेकाचें अनुकरण करून केलेली नाटयरचना चांगली होत नसे असें नाहीं. निदान फ्रान्समध्यें तरी सेनेकाच्या अनुकरणानें उत्तमोत्तम नाटकें निर्माण झालीं. परंतु इंग्लंडमध्यें मात्र त्याच्या अनुकरणाचा फारसा उपयोग झाला नाहीं. तथापि सेनेकाच्या नाटकांतील अल्पसा भाग इंग्रजी नाटयांत कायमचा प्रविष्ट होऊन राहिला. उदाहरणार्थ नमुनेदार शोकपर्यवसायी नाटक कसें असावें, त्यांत सुडाची मूळ कल्पना असावी, दैवगति व परमेश्वरी न्याय यासारख्या भव्य कल्पना त्यांत असाव्यात, त्यांतील कविता वृत्तबध्द नसावी, त्यांत एखादा भुताचा प्रवेश असावा, अनेक नटांनीं मिळून म्हणावयाचें गीत (कोरस) असावें, नाटकांतलें नाटक असावें व बरीचशीं बोधपर वचनें असावीत इत्यादि कल्पना इंग्रजी नाटयाला कायमच्या चिकटून बसल्या. अशा रीतीनें इ. स. १५८० पर्यंत इंग्रजी नाटयाचा सांगाडा तयार झाला होता. तथापि त्यांत अद्याप व्यवस्थितपणा व निर्दोष पद्यरचना उत्पन्न झाली नव्हती. अभियुक्त वाङ्मयाच्या तावडींतून सुटल्यानंतर हे गुण त्यांत उत्पन्न व्हावयाचे होते. ऐतिहासिक नाटकांसहि नुकताच प्रारंभ होऊन जॉन व पांचवा हेनरी यांच्यावरचीं नाटकें रंगभूमीवर दिसूं लागली होती.

स्पे न्स र पा सू न ड न प र्यं त ची प द्य र च ना. - नवीन तऱ्हेची पद्यरचना करण्याचें श्रेय सर फिलिप सिडने व एडमंड स्पेन्सर यांजकडे आहे. 'दि शेफर्ड्स कॅलेंडर' या काव्याच्या कांही भागांतच जरी स्पेन्सरचें कौशल्य दिसून येथें तरी गोपगीत, औपरोधिक आणि गौरवपर इत्यादि लेखनपध्दतीचें व निरनिराळया वृत्तांचे नवीन प्रयोग सुरू केल्याबद्दल त्या काव्याचा जिकडे तिकडे बोलबाला झाला. सदर काव्यांतील खेडवळ आणि जुन्या पध्दतीच्या शब्दप्रयोगाबद्दल जरी त्यांवर टीका झाली तरी इंग्लंडांतील मूळ भाषांपेक्षांहि त्या शब्दप्रयोगांचा काव्यावर अधिक परिणाम झाला. स्पेन्सरनें आपल्या 'अक्टोबर' नामक काव्यांत प्रदर्शित केलेला शोकपर्यवसायी नाटक लिहिण्याचा बेत तडीस गेला नाहीं. त्यानें लिहिलेल्या आनंदपर्यवसायी नाटकांचा पत्ता नाहीं. या कारणास्तव त्याचें नांव नाटककारांच्या सदरांत न पडतां कवींच्या सामान्य सदरांत पडतें. त्याचें सर्वोत्कृष्ट काव्य 'दि फेअरी क्वीन' हें होय. तें एक अन्योक्तिरूप महाकाव्य असून त्यांत नैतिक चांगुलपणाचा जयजयकार केलेला आहे. या काव्याचे पहिले तीन भाग इ. स. १५९० मध्यें व त्यापुढचे तीन भाग इ. स. १५९६ त प्रसिध्द झाले. त्यांचा पुढचा 'ऑफ कॉन्स्टन्सी' नांवाचा भाग स्पेन्सरच्या मृत्यूनंतर इ. स. १६०९ मध्यें जी त्याच्या काव्याची आवृत्ति निघाली तींत प्रथम आढळतो. या काव्यांत त्या काळची समाजस्थिति व आकांक्षा पूर्णपणें प्रतिबिंबित झाल्या आहेत. या काव्यांतील सृष्टिशोभावर्णनपर भाग व संविधानक हीं अॅरिओस्टोच्या 'ऑरलँडो फ्यूरिओसो' या मूळ ग्रंथावरून घेतली. दोन्ही काव्यांत शूर शिलेदारांच्या धाडसांच्या कथा एकमेकांत गुंफल्या आहेत. दोन्ही काव्यांत दैत्यांचा वध, मजबूत जागा हस्तगत करणें, निरपराधी लोकांची सुटका, त्यांत चेटुक, जादूटोणा करणाऱ्या लोकांनी अडथळे उपस्थित करणें किंवा जादूच्या तरवारीनें शिंगानें व आरशानें त्या सुटकेस मदत करणें इत्यादि गोष्टी सर्वसाधारण आहेत. या सर्व गोष्टींच्या गोंधळास नैतिक व मधून मधून राजकीय स्वरूप देण्याचा स्पेन्सरनें प्रयत्न केलेला आहे. त्यानें ख्रिस्ताच्या कबरस्थानाकरितां केलेलें युध्द हा टॅसोच्या ग्रंथांतील विषय घेऊन त्यांवरून विश्वांत नेहमीं दृष्टीस पडणारा सत् व असत् यांतील झगडा विस्तृत रीतीनें वर्णन केला आहे. या झगडयांतच पातिव्रत्य व व्याभिचार, राजनिष्ठा व राजद्रोह, इंग्लंड व स्पेन, इंग्लंड व रोम, इलिझाबेथ व तिचे विरोधी राज्यापहारक, आयरिश सुभेदार व आयरिश बंडखोर, न्याय व अन्याय यांतील सर्व झगडयांचा समावेश केला आहे. त्याच्या काव्याच्या हल्ली उपलब्ध असलेल्या सहा विभागांस ज्या सद्गुणांचीं नांवें दिलेलीं आहेत ते सद्गुण आपण ऑरिस्टॉटलनें दिलेल्या सद्गुणांच्या यादींतून घेतले असें तो म्हणतो; परंतु पवित्रपणा, नेमस्तपणा, पातिव्रत्य, न्याय, मैत्री व शिष्टपणा हे सद्गुण म्हणजे मध्ययुगीन, प्युरिटन लोकांच्या व ग्रीक लोकांच्या कल्पनांचे मिश्रण आहे.

पुनःप्रस्थापनेच्या काळापर्यंत स्पेन्सरचे व्रत पुढें अनेक पंथांच्या कवींनीं चालविलें. स्पेन्सरच्या काव्यरचनेची हातोटी व त्यांतील माधुर्य हे गुण एडवर्ड फेअरफॅक्स यास प्राप्त झाले. त्याची अन्योक्तिरूप लिहिण्याची तऱ्हा जाइल्स फ्लेचर यानें उचलली. त्याची सांकेतिक लेखनकला कांहीं अंशानें फिनिअस फ्लेचरकडे आली. त्याचे इतर कांहीं गुण हेनरी मोर व जोसेफ बोमंट यांच्या वाटयास आले. याचप्रमाणें त्याचे इतर अनेक गुण अनेक कवींमध्यें विभागले गेले.

ड्रेटन व डॅनिअल - इलिझाबेथन युगांतील नमुनेदार कवि म्हटला म्हणजे मायकेल ड्रेटन हा होय. त्यानें गोपगीत लिहिण्यांत स्पेन्सरचें; सॉनेट लिहिण्यांत डॅनिअल, सिडने, स्पेन्सर व शेक्सपिअर यांचें; ऐतिहासिक व संतकथात्मक काव्यें रचण्यांत डॅनिअलचें आणि पौराणिक कविता करण्यांत मार्लोचें अनुकरण केलें; तथापि कांहीं गोष्टीत त्याचें वैशिष्टय दिसून येतें. सॅम्युअल डॅनिअल हा त्याच्याहून अधिक एकान्तवासप्रिय व चिन्ताग्रस्त मनाचा असल्यामुळें त्याच्या त्या मनःस्थितीचा परिणाम त्याच्या ऐतिहासिक काव्यावर झाल्याशिवाय राहिला नाहीं. त्याच्या सर्व देशाभिमानपर व ऐतिहासिक कविता इलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत शेवटल्या वीस वर्षांत लिहिल्या होत्या.

सॉनेट्स - शृंगारिक चतुर्दशक ही काव्यरचना वॅटनें प्रमाण इंग्रजी वाङ्मयांत आणली इ. स. १५९० पासून इ. स. १६०० पर्यंत तिचा बराच प्रसार झाला. त्यानंतर वॅट्सन यानें तिला फिरून चालना दिली. परंतु जेव्हां सिडने यानें चतुर्दशक रचण्यास प्रारंभ केला तेव्हां त्यानें त्यास बरेंच भावनाप्रधान केलें. त्यामुळें त्यांत नाटयांतील कल्पना व जगाचा खराखरा अनुभव ग्रथित केलेला दृष्टीस पडूं लागला. सिडनेची अॅस्ट्रोफेल अँड स्टेला, ड्रेटनची आयडिया, स्पेन्सरचीं अमोरेटी आणि शेक्सपिअरचीं चतुर्दशकें यांत खरोखरची काव्यप्रतिभा दृष्टीस पडतें.

पौ रा णि क क था वि ष य क का व्यें - शृंगारिक पौराणिक कथाकाव्यें करण्याची पध्दत इंग्लंडच्या कवींनीं तत्कालीन इटालियन कवींपासून घेतली हें खरें. तथापि प्रारंभीं ती त्यांनीं ओव्हिडपासून घेतली. इ. स. १५८८ पासून इ. स. १५९८ पर्यंतच्या दहा वर्षांच्या काळांत लॉज याचें ''सिलिस मेटामॉरफोसिस'', शेक्सपीअरचें ''व्हीनस अँड अॅडोनीस'' व ''रेप ऑफ ल्यूक्रीस'', मार्लोचें ''हीरो अँड लिआंडर'' व ड्रेटनचें ''एंडिमिअन अॅन्ड फीबि'' इतकी पौराणिक काव्यें उत्पन्न झाली.

वी णा का व्यें. - इलिझाबेथच्या वेळच्या चतुर्दशकांमध्यें पौराणिक काव्यांत किंवा वीणाकाव्यांत जर आपण मोलिअर, बर्न्स, किंवा शेले यांच्या ग्रंथांतून आढळणाऱ्या भावना शोधूं लागलों तर आपली निराशा होऊन आपण त्या कवितेस निरस ह्मणूं त्या काळीं वीणाकाव्याचा फारच जोरानें प्रसार झाला. वॅट यानें प्रथम या काव्यरचनेचा शोध लावला. परंतु त्याच्या वेळेपासून स्पेन्सरच्या वेळेपर्यंत विशेष नांवाजण्यासारखें वीणाकाव्य निर्माण झालें नाहीं. इतर प्रकारच्या वाङ्मयाप्रमाणें वीणाकाव्यरचनेंतहि शेक्सपिअर अग्रगण्य होता. परंतु वीणाकाव्यासारख्या किरकोळ काव्यरचनेंत ग्रीन व डेक्कर यांच्यासारख्या साधारण कवींस जितकें यश आलें, तितकें चॅपमन व जॉन्सन या सारख्या थोर कवींस आलें नाहीं. लॉज व ब्रेटन, ड्रेटन व डॅनिअल, ऑक्सफर्ड, रॅले आणि साउथवेल या सर्वांच्या वीणाकाव्यांवरूनहि काव्यरचना निरनिराळया प्रकारच्या व वर्गांच्या लोकांत प्रचलित होती असें दिसून येतें.

ड न पा सू न मि ल्ट न प र्यं त चें प द्य. - इलिझाबेथन युग पालटल्यानंतर पद्यविषयांत बदल झाला. इंग्लंडच्या प्रमुख कवीपैकीं जॉन्सन व जॉन डन (१५७३-१६३१) आणि डनच्या मागून झालेले अनेक कवी यांच्या पद्यांत, नैसर्गिक मनुष्य व त्याचा ऐहिक सुख भोगण्याचा हक्क यांच्या विरुध्द प्रतिपादन केलेलें आढळतें. त्यामुळें त्या काळची कविता विशेष वैराग्यपर व गूढवादविषयक झालेली आहे. जॉर्ज हर्बर्ट, कॅशॉ, हेन्री व्हॉघान आणि थॉमस ट्रॅहर्न हे त्यावेळचे धर्मविचारप्रधान कवी होते. कल्पनाप्रचुर कवीच्या पंथातील या कवींमध्यें धर्मश्रध्दा विशेष होती. डन, कॅप्यू कार्टराइट व क्लीव्हलंड आणि अॅब्राहम कावले हे त्याच पंथांतील इतर कवि होते. डॉ. जॉनसन यानें आपल्या कावलेच्या चरित्रांत या कल्पनाप्रचुर पंथावर व त्यांतील कवींच्या दोषांवर बरीच खरमरीत टीका केली आहे, आणि त्याच्या या टीकंतील बराचसा भाग बरोबरहि आहे. जॉनसनची जर कोठें चूक झाली असेल तर ती येवढीच कीं, त्यानें त्या कवींचे गुण मुळींच लक्षांत घेतले नाहींत, आणि इतिहासाच्या दृष्टीनें त्यांचें किती महत्त्व होतें त्याचाहि त्यानें विचार केला नाहीं.

डनच्या कवितेंत बराच बौध्दिक भाग असून ती विवेचनात्मक व आत्मपरीक्षणपर होती. त्याच्या कवितेवरून त्याच्या भावना त्याच्या अंतःकरणांत खळबळ उडवून देत असाव्यात, असें दिसून येतें. स्पेन्सर व मिल्टन यांच्या दरम्यानच्या काळांत वीणाकाव्य व काव्याचे इतर प्रकार यांच्यांत बरेच फरक घडून आले.

डनच्या मागून प्रसिध्दीस आलेल्या कवींमध्यें रॉबर्ट हेरिक हा प्रमुख होता. त्याची एकंदर वीणाकाव्यधर्तीची व सूत्रस्वरूपाची मिळून दोन हजार कविता असून ती ''हेस्पेराइडस् अँड नोबल नंबर्स'' या नांवानें संगृहीत केली आहे. फुलें व कुमारिका यांच्यांतील साम्य, त्यांच्या सौंदर्याचा त्वरित होणारा नाश, त्याच्या नाशाकडे पाहून कवीस होणारा खेद, त्याची स्वतःची नश्वरता, विषय सुखाची क्षणभंगुरता, त्याच्या मित्रांचे सद्गुण, ग्रामस्थांचें खेळ व विद्या इत्यादि विषयावर त्याची कविता आहे.

मिल्टनः - जॉन मिल्टन (इ. स. १६०८ - इ. स. १६७४) प्रमाणें अगदीं अल्पवयांत कोणत्याहि कवींनें काव्य रचनेची निर्दोष पध्दति शोधून काढली नाहीं. त्याच्या तारुण्यांतील कविता कांहीशीं स्पेन्सरच्या वळणावर गेली होती, परंतु त्याच्या विस्तृत वाचनामुळें त्याच्या काव्यरचनेंत लवकरच सुधारणा घडून आली.त्यानें आपल्या विसावे वर्षी लिहिलेल्या ''नेटिव्हिटि ओड'' या काव्यांत त्याची कल्पकता व शब्दयोजना अगदीं स्वतंत्र होती; शिवाय त्यांतील काव्यरचनाहि एखाद्या निष्णात लेखकांच्या कवितेप्रमाणें रेखीव व ठराविक पध्दतीची होती. ल अलेग्रो, इल पेन्सेरोसो, कोमस, लिसिडस या काव्यांतून एक प्रकारची ठराविक, अलंकारिक व पुनरुजीवनकाळास अनुरूप अशी रचनापध्दति दिसून येते असें इतिहासज्ञांचें म्हणणें आहे. त्याच्या कवितेंत वीणाकाव्यात्मक व स्वाभाविकपणाचा भाग फार कमी आहे, असें जरी टीकाकरांचें म्हणणें पडतें तरी त्याच्या काव्यरचनेंतील चातुर्य व सौंदर्य पाहून त्यांची मति थक्क होते. त्याच्या चतुर्दशकांमध्येंहि त्याची तीच लेखनकरामत दिसून येते.

तरुणपणापासून ज्या वीरश्रीयुक्त विषयावर काव्य रचण्याचा त्यानें संकल्प केला होता तो शेवटीं ''मानवाचें अधःपतन'' हा त्यानें ठरविला. हा विषय त्याच्या समजुतीप्रमाणें सर्वांत मोठा आहे. या काव्यविषयाचें स्थळ म्हणजे स्वर्गपातालादि मिळून सारें विश्व होतें आणि त्याचा काळ ख्रिस्तजन्मापासून अखेरच्या न्यायाच्या दिवसापर्यंत इतका अनंत होता. या काव्यविषयावर नाटक लिहिण्याचा प्रथम मिल्टनचा बेत होता व त्याप्रमाणें त्यानें ''स्वर्गच्युति'' (पॅरेडाइस लॉस्ट) नांवाच्या नाटकाची योजनाहि केली होती. परंतु पुढें त्यास त्या विषयावर नाटयापेक्षां महाकाव्यच लिहिणें अधिक श्रेयस्कर असें वाटून त्यानें त्यास महाकाव्याचें स्वरूप दिले. त्याच्या काव्यांत सैतान व त्याचे अनुयायी यांचे अलौकिक धैर्य दिसून येतें. पराभव झाला असतांहि ते खचत नाहीं आणि जेत्याविषयीचा त्यांचा अनादर कमी होत नाहीं. या त्यांच्या अजिंक्य निश्चयामुळें त्यांच्या पुढें देव, देवदूत आणि आद्य मानवी जोडपें हें सर्व फिके दिसतात. यांच्या पुढच्या म्हणजे ''पुनः स्वर्गप्राप्ति'' (पॅरॅडाइस गीगेन्ड) काव्यांत संविधानक फार थोडें आहे. देवाशीं विरोध करणाऱ्या सैतानाचा आवेश, बराच कमी झाला आहे. आणि ख्रिस्ताचें वर्तन एखाद्या पंडितंमन्य पंतोजीप्रमाणें दिसून येतें. सॅम्सन अॅगोनिस्ट यांतील नैतिक विवेचन व त्याची एकंदर रचना ही सोफोक्लीसच्या धर्तीवर आहे, व त्यांतील धार्मिक भाग सर्वस्वी ख्रिस्ती नाहीं. सॅम्सनच्या ठिकाणीं असलेले दोष त्याच्या हालअपेष्टेमुळें विसरले जाता व या नवीन उत्पन्न होणाऱ्या सहानुभूतीमुळें त्या नाटयकाव्यावरचें वाचकांचे प्रेम कमी होत नाहीं.

मिल्टनच्या उत्तरवयांतील त्याची लेखनशैली व काव्यरचनारीति यांमध्यें त्याच्या मनोव्यापाराची एकाग्रता दिसून येते. इ. स. १६५८ च्या सुमारास ज्यावेळीं मिल्टननें काव्यरचनेस सुरवात केली, त्यावेळीं वरिश्रीची भाषा लिहिण्याच्या कलेंत त्याला कसलीहि मदत नव्हती. नुकत्याच अस्तित्वांत आलेल्या नाटयकलेंतील अनुभव अगदींच निरुपयोगी होते. कावले व डॅव्हेनंट यांनीं लिहिलेल्या काव्याचे नमुने अनुकरणाच्या दृष्टीनें कुचकामाचे होते. यामुळें ग्रीक आणि लॅटिन यांचीं स्मृति ताजी असल्यामुळें मिल्टननें मॉर्ले शेक्सपिअर इत्यादिकांचें अनुकरण करण्यास सुरुरवात केली आणि त्यांची भाषाशैली व काव्यरचना पध्दति यांच्याच पायावर त्यानें आपली काव्यरचना केलेली आहे. संबोधनात्मक भाषणें वक्तृत्वपूर्ण भाषणें, वर्णनात्मक भाग इत्यादि बाबतींत तो किती वाकबगार होता हे त्यांच्या ''स्वर्गच्युति'' काव्यावरून प्रामुख्यानें दिसून येतें. आत्मगत व सामुदायिक भाषणें रचण्याच्या कामीं तर डान्टेच्या वेळेपासून त्याच्या इतका पटाईत कवि कोणीच झाला नाहीं.

इ. स. १५८० पा सू न इ. स. १६४२ प र्यं त ची ना टय र च ना - इ. स. १५८० पासून इ. स. १५९५ पर्यंत होऊन गेलेल्या विश्व विद्यालयीन विद्वानांनीं नाटयकलेची स्थापना केली. त्यांपैकीं मुख्यनाटयलेखक म्हटले म्हणजे लिली, किड, पील, ग्रीन व मार्लोवे हे होत. जॉन लिलि यानें दरबारी सोंगाडयांचीं विनोदी व खोंचदार भाषणें गद्यांत प्रथम आणली. लीली यानें इ. स. १५८० पासून इ. स. १५९१ पर्यंत कँपसपे, सॅफो अँड फॅओ, मिडस व इतर आनंदपर्यवसायी नाटकें लिहिलीं. त्यांत अभिनंदनपर भाग, पौराणिक कथाविषयक रूपकें, कोणत्या तरी विषयास धरून लिहिलेली औपरोधिक प्रकरणें, गोपगीतात्मक विष्कंभक व गीतें इत्यादि भाग आहेत. थॉमस किडनें लिहिलेल्या नाटकांत व विशेषेंकरून ''दि स्पॅनिश ट्रॅजेडी'' या नाटकांत त्यानें पूर्वीच्या नाटयरचनेस नवीन स्वरूप दिलें. शेक्सपिअरच्या पूर्वी लिहिलेल्या परंतु हल्ली उपलब्धनसलेल्या हॅमलेट नाटकाचा तो कर्ता असावा. त्यानें आपल्या मागून झालेल्या नाटकाकरितां सध्देतुमूलक परंतु घातकी सूडाचा विषय तयार करून ठेवला, व त्याचा चॅपमन, मार्स्टन वेब्स्टर इत्यादि नाटककारांनीं उपयोग करून घेतला त्याच्या मुख्य नाटकाचें भाषांतर करून त्याचे प्रयोगहि जर्मनींत बरेच दिवस होत होते. किडच्या लिहिण्यांत सुसंगतपणाचा अभाव आहे परंतु त्याचें ठिकाणीं नाटयरचना चातुर्य बऱ्याच मोठया प्रमाणांत होतें.

टॅम्बरलेनचे दोन भाग, ''दि लाइफ अॅन्ड डेथ ऑफ डॉक्टर फॉस्टस,'' 'दि ज्यू ऑफ माल्टा', 'एडवर्ड दुसरा' आणि 'हीरो अॅन्ड लिआंडर' हें अपूर्ण काव्य इतके ख्रिस्टोफर मार्लोवेचे ग्रंथ आहेत. मार्लेवेनें (१५६४-१५९३) शोकपर्यवसायी नाटकें लिहिण्यास प्रारंभ करून त्यांस अनुरूप अशी भाषासरणी व पद्यरना उत्पन्न केली. वीरश्रीयुक्त भाषणें लिहिण्यांत जरी त्यांचा हात खंडा असे तरी ''हेलनचें अवतरण'' ''मॉर्टिमरचें प्रयाण'' ''हीरो व लिआन्डर यांचें मिलिन'' इत्यादि लांब लांब उताऱ्यांतहि त्याच्या लिहिण्यांत कोठें क्लिष्टता किंवा दुर्बोधता उत्पन्न झाली नाही. आत्यंतिक सौन्दर्य, अनंत साम्राज्य व गूढ ज्ञान या विषयींची तृष्णा त्याच्या इतक्या चांगल्या रीतीनें कोणीच व्यक्त केली नाहीं. त्याच्या इतर गुणांच्या मानानें त्याच्यांत रचनाचातुर्य कमी प्रतीचें होतें. तथापि गॉएटेनें फॉस्टसच्या संविधानकाबद्दल त्याची स्तुति केलेली आहे. असुरांचें दुःख व निराश व्यक्त करण्यांत मिल्टननें मार्लोवेचेंच अनुकरण केलें. ज्या बाबतींत मार्लोवेच्या ठिकाणीं अत्युत्कृष्ट गुण होते, त्याबाबतींत शेक्सपिअरला त्याच्यावर सरशी करतां आली नाहीं.

शेक्सपिअरः - मध्ययुग पालटल्यावर भूतलावरील, मानवी चरित्र सर्वांस माहीत होऊन त्यानें सर्वांचें चित्त वेधलें होतें आणि हा चित्तवेधकपणा पूर्णपणें व खुबीदार रीतीनें व्यक्त करणें हाच नाटक लिहिण्याचा उद्देश असतो. शेक्सपिअर हा सर्वांत श्रेष्ठ इंग्रजी नाटककार होता, इतकेंच नव्हे तर त्यानें सर्वांच्या आधीं मानवी स्वभाववर्णनपर नाटकें लिहिण्याचा उपक्रम केला; परंतु त्यानें हा उपक्रम सुरवातीपासूनच केला नाहीं. प्रथम त्याच्यावर दुसऱ्या लेखकांचा अम्मल चालत होता. त्याचें ''टायटस अँड्रोनिकस'' हें नाटक किडच्या धर्तीवर लिहिलें आहे. ''हेनरी सहावा''या एकच नांवाखालीं मोडणारीं तीन ऐतिहासिक नाटकें लिहिण्यांत त्यानें मार्लोवेचें अनुकरण केलें होतें. 'रिचर्ड तिसरा' हें नाटक जरीं मार्लोवेचें संविधानक व भाषासरणी यांचें अनुकरण करून लिहिलें तरी त्यांत शेक्सपिअरनें आपल्या अंगीं किती लेखननैपुण्य आहे, हें प्रत्ययास म्हणून दिलें आहे. कांहीं काळानें शेक्सपिअरवरील अन्य लेखकांचा अम्मल नाहींसा झाला, व त्याचें लेखनकार्य स्वतंत्र रीतीनें चालू लागलें. ''किंग जॉन'' या नाटकांत आत्मनिवेदनकाव्यपर, वीररसपर,उपरोधपर व भावनापर इतके गुण एकत्रित झाले आहेत. यानंतर शेक्सपिअरनें निर्यमक कविता करण्यांत प्राविण्य संपादन केलें. ''रिचर्ड दुसरा'', ''ए मिडसमर नाइट्स ड्रीम'', ''दि मर्चंट ऑफ व्हेनीस'', व ''रोमिओ अँड जुलिअट'' या नाटकांतून तें प्राविण्य दिसून येतें. सदर नाटकें व ''दि कॉमेडी ऑफ एरर्स'', ''लव्हज लेबर लॉस्ट'', व ''दि टू जंटलमेन ऑफ व्हेरोना'' हीं नाटकें लिहितांनां शेक्सपिअरच्या लिहिण्यांत निर्यमक व सयमक कविता यांची एक सारखी चढाओढ लागली होती. अखेर विशेष कारणांवाचून सयमक कविता लिहावयाची नाहीं असें त्यानें ठरविलें असावें.

यापुढें लिहिलेल्या ऐतिहासिक, अद्भुतरसात्मक व विनोदपर नाटकांत शोकपर्यवसानाचा अभाव दिसून येतो. शेक्सपिअरच्या सर्व विनोदी पात्रांत फॉलस्टाफचा विनोद फार बहारीचा आहे. त्याचें वर्णन लोकामान्याच्या (१९२४) हिंदुस्थान अंकांत प्रो. राजवाडे यांनीं केलें आहे. हें पात्र ज्या नाटकांत आहे त्या ''हेनरी पांचवा'' या दृश्य काव्यास नाटक म्हणण्यापेक्षा प्रहसन म्हणणें अधिक शोभेल. सदर नाटकांत जोरदार भाषणें, आल्हादजनक विनोद व इंग्लंडविषयक शेक्सपिअरचें प्रेम यावांचून दुसरें कांहीं आढळत नाहीं. ऐतिहासिक नाटकांतील पात्रें शूरवीर आहेत, तर '' अॅज यू लाइक इट'', ''मच अॅडो अबाउट नथींग'', व ''ट्वेल्थ नाइट'' या सारख्या आनंदपर्यवसायी नाटकांत स्त्रियांचें प्राबल्य आहे. या स्त्री पात्रांच्या तोंडीं गद्यात्मक भाषणें घालावीं लागल्यामुळें या नाटकांतील गद्य सुंदर व विनोदपर असें दिसून येतें.

शेक्सपिअरच्या दुःखपर्यवसायी नाटकांमध्यें ज्याप्रमाणें मनुष्यस्वभावाचें आविष्करण झालेलें आहे, तसें ल्युक्रीशिअसच्या वेळेपासून झालेले नव्हतें. ज्या गुप्त कटांच्या व धामधुमीच्या काळांत सदर नाटकें लिहिलीं गेलीं त्या काळाचा व त्या नाटकांतील संविधानकांचा बराच मेळ दिसून येतो. त्याच दहा वर्षांच्या काळांत जॉनसन, चॅपमन, डेकर, मार्स्टन यांनी आपलीं दुःखपर्यवसायी नाटकें लिहिलीं. शेक्सपिअरचें व या नाटककारांचें जरी पुष्कळ बाबतींत सादृश्य असलें तरी शेक्सपिअरच्या ''हॅम्लेट'', ''मॅकबेथ'' ''किंगलिअर'' ''ऑथेल्लो'' तीन रोमन नाटकें आणि ''ट्रॉइलस आणि क्रेसीडा'' व ''टायमन ऑफ अथेन्स'' या नाटकांशीं इतर कोणत्याहि नाटकांची तुलना करतां येणार नाहीं. या नाटकांतून नवीन दुःखपर्यवसानात्मक तत्त्वज्ञान, नवीन काव्यविवेचनरीति, नवीन नाटयरचनापध्दति व मानवीस्वभावाचें आविष्करण करण्याची नवीन तऱ्हा दिसून येतात. शेक्सपिअरच्या चतुर्दशकांमध्यें सत्य व सौंदर्य, सत् व असत् यावर प्रदर्शित केलेले विचार पहावयास सांपडतात.

सुखःदुखात्मक नाटकें लिहिणें हा शेक्सपीअरच्या नाटय लेखनाचा शेवटचा भाग होय. हा भाग तो ''पेरिक्लिस प्रिन्स ऑफ टायर'' हें नाटक लिहूं लागल्यापासून म्हणजे इ. स. १६०८ पासून सुरू झाला. कधीं कधीं जगामध्यें दुःखाअंतीं सुख प्राप्त होते हें पाहून त्यानें आपल्या आयुष्याच्या शेवटल्या भागांत सुखदुःखात्मक नाटकें लिहिण्याचा विचार केला असावा. पेरीक्लीस, दि वुइंटर्स टेल, सिंबेलाईन व दि टेंपेस्ट या नाटकांतून अनेक गुन्ह्यांचे, लोकापवादाचे व वियोगाचे प्रसंग दाखविल्यानंतर त्या सर्वांचें मधुर पर्यवसान झालेलें दाखविलें आहे. या पर्यवसान भागांत वियोग झालेल्यांचा संयोग झालेला दाखवून बिनसलेल्या प्रेमाची पुनः प्रस्थापना केलेली आहे.

शेक्सपिअरचा मोठेपणा त्याच्या ठिकाणीं असलेल्या तीन अत्युत्कृष्ट गुणांवर अधिष्ठित झालेला आहे. एक काव्यरचनांचातुर्य, दुसरा, मनुष्यस्वभावाचें संपूर्ण ज्ञान व त्याचें यथार्थ चित्र रेखाटणें, आणि तिसरा, नाटयकला नैपुण्य. शेक्सपिअर व डांटे यांची तुलना केली तर डांटेच्या लेखनांत आपणांस अधिक प्रगल्भता व संपूर्णता दिसूनयेते. त्याचें कारण उघड आहे. शेक्सपिअरला ज्याप्रमाणें शेकडों जणांच्या तोंडीं शोभणारी भाषा घालावी लागली तशी घालण्याचें डांटेला कारण नव्हतें. शेक्सपिअर हा श्रेष्ठ प्रकरचा कवि असून त्याला विविध प्रकारचें कार्य करावें लागलें. ''सानेट्स'' लिहितांनां त्याला आपले मनोगतविचार व्यक्त करण्यापलिकडे कांहीं करावयाचें नव्हतें; परंतु नाटयलेखनांत मात्र त्याला आपल्या हजारों श्रोत्यांचा विचार करावा लागे. शेक्सपीअरचें नाटयनैपुण्य आतां प्रत्येक राष्ट्राला संमत झालें आहे. त्याप्रमाणें त्याचीं नाटकें सर्व ठिकाणीं करण्यासारखीं आहेत, हें तर उघड आहे; परंतु याहूनहि त्यांच्यांत अधिक गुण आहे, तो असा कीं, श्रोत्यामध्यें उत्कंठा उत्पन्न करणें, ती कांहीं काळ तशीच तरंगत ठेवणें व शेवटीं तिला दूर करणें व ती श्रोत्यांनां पटेल अशा रीतीनें दूर करणें, या त्याच्या गुणामुळें त्याचें लेखन श्रोत्यांच्या मनावर फारच परिणामकारक होतें. त्याचें लिहिणें इतकें उघड असे कीं, त्यामुळें त्यानें आपल्यावर इस्त्रालय लोकांचा, पोपचा आणि फ्रान्सचा द्वेष ओढवून घेतला. त्यानें इलिझाबेथ राणीवर स्तुतीचा वर्षाव केला, इंग्लंड व स्कॉटलंड यांच्या राजकीय संयोगाचा जयजयकार केला, पांचव्या हेन्रीच्या पराक्रमाचे गोडवे गाइले आणि इंग्लंडच्या वैभवाचें चटकदार वर्णन केलें. परंतु सर्व नाटककारांत त्यास अग्रपूजेचा मान देण्याचीं दुसरीं अनेक महत्त्वाचीं कारणें आहेत. त्याच्या नाटकांतींल कोणतीं पात्रें केव्हां आपल्या प्रेमास व कोणतीं केव्हां आपल्या तिरस्कारास पात्र व्हावींत हें तो आपणांस स्पष्टपणें न सांगतां त्या त्या पात्रांच्या तोंडच्या उद्गारांवरून व त्यांच्या वर्तनावरून समजावून देतो आणि याकामी नॉरवेचा सुप्रसिध्द नाटककार इबसेन याहूनहि त्याची श्रेष्ठता अधिक आहे. असें जरी आहे तरी ज्याप्रमाणें, ऐहिक व्यवहारांत कसल्याहि न्यायपात्र माणसांस अगदीं निर्भेळ न्याय मिळत नाहीं त्या प्रमाणें तो आपल्या कोणत्याहि पात्रास तसल्या प्रकारचा न्याय मिळाल्याचें दाखवीत नाहीं. त्याच्या चटकदार व सुपीक लेखनशैलांस त्याच्या नाटयनियमांस धरून केलेल्या मानवीचरित्रनिरूपणाची जोड मिळाल्यामुळें नाटककारांत त्याला इतकें श्रेष्ठतम स्थान प्राप्त झालें आहे.

जॉनसन. - शेक्सपिअरची नाटयलेखनपध्दति अनुकरणानें प्राप्त होण्यासारखी नसल्याकारणानें जरी बोमंट, फ्लेचर, वेब्स्टर व इतर नाटककारांच्या नाटकांत त्याची नक्कल पहावयास सांपडते तरी त्याच्या मागें त्याचा स्वतंत्र संप्रदाय असा कांहीं शिल्लक राहिला नाहीं. शेक्सपिअरचा मित्र बेन जॉनसन याच्या ठिकाणीं जरी त्याची काव्यप्रतिभा नव्हती तरी बुध्दिमत्तेच्या कामांत जॉनसन हा जवळ जवळ शेक्सपिअरच्या बरोबरीचा होता. इ. स. १६४२ त नाटकगृहें बंद होईपर्यंत जॉनसनचीं नाटकें बरींच लोकादरास पात्र झालीं होतीं, आणि इ. स. १६६० नंतर देखील त्याच्या आनंदपर्यवसायी नाटकांचें अनुकरण करणारे नाटककार झाले. रोमच्या इतिहासांतील एखाद्या गुंतागुंतीच्या व लांबलचक प्रसंगावर नाटक रचणें किंवा लंडनच्या रस्त्यांत त्याच्या डोळयादेखत घडलेल्या एखाद्या प्रकारचें चित्र रेखाटणें असो, त्याला दोन्हींहि गोष्टी सारख्याच यशस्वी रीतीनें करितां येत होत्या. त्याजपाशीं तात्त्वि सिध्दांतांचा बराच मोठा भरणा होता. त्याचप्रमाणें वर्णनचातुर्य व रचनाकौशल्य हे गुण जरी त्याच्या ठिकाणीं प्रामुख्यानें वास करीत होते, तरी त्याच्या लिहिण्यांत सरळपणा व मोकळेपणा नाहीं. मानवजातीचें हिडिस चित्र दाखवून आपण तिला सुधारूं असा विचार करणाऱ्या एखाद्या औपरोधिक लेखकाप्रमाणें त्याचें लिहिणें होतें. त्याची पद्यरचना मोठी नेटनेटकी व ठाकठिकीची होती. तो गद्यलेखनांतहि निष्णात होता. बेन जानसनची प्रसिध्द नाटकें येणेंप्रमाणें - ''एव्रीमन इन् हिज ह्युमर'', ''व्हलपोन ऑर दि फाक्स'', दि अल केमिस्ट सेजॅनस कॅटिलाइन वगैरे.

चॅपमन - जॉर्ज चॅपमन हा तीव्र भावना व्यक्त करणें व शृंगारिक नाटकांतहि गांभीर्य कायम ठेवणें, या विशिष्ट गुणामध्यें सर्व नाटककारांत श्रेष्ठ होता. परंतु त्याच्या क्षोभप्रधान नाटकांत प्रयोगाच्या दृष्टीनें बरेंच वैगुण्य दिसून येतें. त्याचीं महत्त्वाची नाटकें, ''दिब्लाइंड बेगर ऑफ अलेक्झांड्रिया'',  'ऑल फूल्स' 'दि जंटलमन अशर' वगैरे होत. त्याच्या होमरच्या भाषांतराबद्दल जॉनसन व किट्स यांनींहि त्याची प्रशंसा केली आहे. आणि हें भाषांतराचें कार्य म्हणजे त्याच्यां आयुष्यांतील मोठेंच कार्य होय.

डेकर आणि हेवुड. - थॉमस डेकर व थॉमस हेवूड यांनीं निरनिराळया प्रकारचे ग्रंथ लिहिले आहेत. डेकर याच्यांत काव्यकल्पना उत्तम प्रकारची होती तर हेवुड हा त्याच्या वेळचें समाजचित्र उत्तम रीतीनें रेखाटण्यांत कुशल होता. 'ओल्ड फॉर्च्युनेटस' व 'दि ऑनेस्ट व्होअर' हे डेकरचे व 'इंग्लिश ट्रॅव्हलर' व 'वुमन किल्ड वुइथ काइंडनेस' हे हेवूडचे प्रसिध्द गंथ होते.

मिडल्टन व वेब्स्टर. - मिडल्टन हा जोरदार व वर्णनात्मक नाटकें व दुष्ट व प्रबल मनोविकारांचीं प्रहसनें लिहिण्यांत निष्णात होता. त्याचप्रमाणें वेब्स्टरच्या लेखनपध्दतीनें दया व दहशत, राग व तिरस्कार इत्यादि मनोविकार चांगल्या रीतीनें व्यक्त झाले असून ती पुष्कळशी काव्यमय आहे. 'दि ओल्ड लॉ', 'दि चेंजलिंग', 'वुइमेन बिवेअर वुइमन' हीं मिडल्टनचीं आणि ''डचेस ऑफ मॉल्फि'' व्हिक्टोरिया कोरोंबोना ऑर दि व्हाइट डेव्हिल इत्यादि वेब्स्टरचीं नाटकें होत.

बोमंट व फ्लेचर. - बोमंट फ्लेचर व मॅसिन्जर यांनीं सुखमय, दुःखमय व सुखदुःखमय अशीं तिन्ही प्रकारची बरीचशीं नाटकें लिहिलीं आहेत. त्या तिघांमध्यें बोमंटच्या लिहिण्यांतील विनोद व शुध्द आणि मनोहर पद्यरचना लक्षांत घेऊन त्यासच अग्रस्थान द्यावें लागेल. फ्लेचरच्या नाटकांत पहिल्या जेम्सच्या वेळच्या ऐषआरामाचें व छानछुकीचें समाजचित्र आपणांस पहावयास मिळतें. त्याला विनोद उत्तम साधला असून नाटकांतील संभाषणें अगदीं स्वाभिकपणें घालण्याचीहि कला साध्य झालीं होतीसें दिसतें. त्याच्या नाटकांतील पात्रें अगदीं ऐनवेळीं आपले स्वभाव पालटतात. यांचीं नाटकें - 'फिलॅस्टर' 'दि मेड्स ट्रॅजेडी' 'बाँडूका' वगैरे.

मॅसिन्जर. - मॅसिन्जरच्या नाटकांत रचनाकौशल्य विशेष दिसून येतें व त्यांतील वत्कृत्वाचा प्रवाहहि संथ व एकसारखा आहे. त्याचप्रमाणें त्याच्या नाटकांत तात्त्विक व राजकीय विचार फारच कौशल्यानें गोवलेले आहेत. 'एन्यु वे टु पे ओल्ड डेट्स', 'दि बाँडमन', 'दि रोमन अॅक्टर' वगैरे नाटकें यानें लिहिलीं आहेत.

फोर्ड व शर्ले. - यापुढें प्युरिटन लोकांनीं इ. स. १६४२ त नाटकगृहें बंद करीपर्यंत जॉन फोर्ड, व जेम्स शर्ले या दोन नाटककारांनीं नाटयलेखकानांतील उच्च संप्रदाय कायम ठेवला 'दि ब्रोकन हार्ट' हें फोर्डचें नाटक प्रसिध्द आहे 'मेड्स रिहेंज' 'ट्रेटर' इत्यादि पुष्कळ नाटकें शर्ले यानें लिहिलीं आहेत.

ग द्य र च ना - इ. स. १५७९ ते इ. स. १६६० पर्यंतची कादंबऱ्या. - इलिझाबेथच्या वेळच्या कादंबऱ्यांची लेखनपध्दति चांगली नसल्याकारणानें त्या बहुतेक लुप्त झाल्या आहेत. परंतु त्यांचा उपयोग नाटयलेखनाचें पोषण होण्याकडे झाला. लिलीच्या ''यूफस'' व ''यूफस अँड हिज इंग्लंड'' या प्रथम प्रसिध्दीस आलेल्या कादंबऱ्या होत. त्यांत सूक्ष्म अवलोकन व विनोदी भाषणपध्दति दृष्टीस पडते परंतु त्यांत खरें सौन्दर्य व तीव्र भावना दृष्टीस पडत नाहींत. लिलीच्या ग्रंथांतील नारिकेलपाक लेखन पध्दति त्याच्या ग्रीन व लॉज या सारख्या अनुयायास बरींच वर्षे अनुकरणीय झाली होती. या नंतर प्रख्यातीस आलेल्या नॅशची कादंबरी ''जॅक हिल्टन'' किंवा ''दि अनफॉर्च्युनेट ट्रॅव्हलर'' ही अगदीं स्वतंत्र पध्दतीची होती. याप्रमाणें या काळचें कादंबरीवाङ्मय अगदीं अल्पस्वरूपाचें होतें. पुढील शतकांत फ्रेंच कादंबरीकारांच्या उदाहरणानें व अनुकरणानें इंग्लंडांत अद्भुत व शृंगारिक कादंबऱ्या निर्माण झाल्या.

टी का त्म क वा ङ्म य. - सिडने याने आपल्या ''डिफेन्स ऑफ पोएसी'' या पुस्तकांत व जॉन्सन यानें आपल्या ''डिस्कव्हरीज'' या पुस्तकांत प्रचलित प्रश्नांची प्रचलित उत्तरें नमूद करून ठेवलेलीं आहेत परंतु त्यावरून त्या काळच्या उत्पादित वाङ्मयाची कल्पना होत नाहीं. काव्यांत सत्य असतें हें ठरविण्याकरितां कवींवर ज्ञान संगृहित करण्याचें व लोकशिक्षणाचें काम अशीं दोन प्रकारचीं कामें सोंपविण्यांत आली होती. काव्याची उपयुक्तता प्रस्थापित करण्याकरितां काव्य हं आनंदानें व सध्देतूनें सन्मार्गास लावतें, असें त्याचें समर्थन करण्यांत येत होतें. परंतु हें विधान फार झालें तर अन्योक्तिरुप व उपदेशपर काव्यासच लागू पडण्यासारखें आहे. शेक्सपिअरच्या नाटकांत दुःखपर्यवसानाचा अध्यात्म्कि तत्त्वांशीं कसा मेळ घालण्यांत आला आहे हे टीकाकाराच्या बराच काळपर्यंत लक्षांत आलें नाहीं.

भा षा न्त रा त्म क वा ङ्म य - या काळांतील टीकाकारांपेक्षां भाषांतरकारांची कामगिरी अधिक किंमतीची आहे. बर्नरच्या फ्रॉइसार्ट (इ. स. १५२३-१५२५)  या ग्रंथापासून तें उर्कुहार्टच्या (इ. स. १६५३) या ग्रंथापर्यंत या भाषांतरकारांच्या कार्यपरंपरेस दीर्घकालीन असा खंड कधीच पडला नाहीं. या भाषांतरकारापैकी जरी बरेच जण अप्रसिध्द होते, तरी त्यांच्या एकंदर संख्येवरून किती लोकांचें गद्यलेखनाकडे लक्ष लागलें होतें, हे दिसून येते. फायलेमन हालंड नांवाच्या भाषांतरकारानें लिव्ही, प्लिनी, र्सुटोनिअस यांच्या ग्रंथाचे व प्लूटार्कच्या नीतिशास्त्रविषयक ग्रंथाचें आणि कॅम्डनच्या ''ब्रिटानिआ'' या ग्रंथाचें भाषांतर केलें. आणि त्याची इंग्रजी भाषाहि अत्यंत प्रशस्त व शुध्द आहे. नार्थ यानें प्लूटार्कच्या चरित्राचें, फ्लोरिओ यानें मान्टेनच्या निबंधाचे आणि शेल्टन यानें डॉन क्विक्झोट या पुस्तकांचें अशा रीतीनें भाषांतर केलें आहे. ही भाषांतरें जरी अगदीं शब्दश: बरोबर नसलीं तरी त्यांतील मतलबाच्या व शैलीच्या दृष्टीनें मूळाबरहूकूम आहेत.

हूकरः - रिचर्ड हूकरचा ''लॉज ऑफ इक्लेझिआस्टिक पॉलिटि'' हा इंग्रजी भाषेंतील विशेष नांव घेण्यासारखा, निदान विक्लिफ नंतर, इंग्रजानें लिहिलेला असा पहिलाच धर्मशास्त्रविषयक ग्रंथ आहे. त्याची भाषा बरीच क्लिष्ट असून त्यांतील वाक्यें लांबलचक व गुंतागुंतीचीं आहेत. हूकरच्या मागून झालेल्या जेरेमी टेलरसारख्या धार्मिक लेखकांस ही गुंतागुंतीची भाषासरणी न साधल्यामुळें त्यांनीं तुटक तुटक व साधीं वाक्यें लिहिणयाची पध्दति उपयोगांत आणली.

बेकनः - फ्रान्सिस बेकन (इ. स. १५६१-१६२६) पासून इंग्रजी तत्त्वज्ञानास प्रारंभ झाला. तो कायदेपंडित व वक्ता होता. त्याचा निरनिराळया व्यवहारांत हात होता, त्याची बुध्दि फार तरतरीत होती, आणि त्याचा लॅटिन वाङ्मयाशीं चांगला परिचय होता. या सर्व गोष्टीची झाक त्याच्या भाषासरणीवर उमटल्याशिवाय राहिली नाहीं. आपल्या धंद्यांतील नैपुण्याची जाणीव, आपल्या बौध्दिक बलाविषयीं आत्मविश्वास, शास्त्राच्या भावी उन्नतीवरील निष्ठा, निसर्ग व अनुभव यांच्या अनुरोधानें वागण्याचा दृढनिश्चय, जागाचा यच्चयावत् अनुभव सांठवून ठेवण्याची संवय, जगाचें सूक्ष्म अवलोकन आणि तें सर्व सूत्ररूपानें नमूद करून ठेवण्याची लकब, या सर्व गुणांमुळें जरी त्याच्यांत कवित्व नव्हतें तरी तो सुप्रसिध्द गॉएटेच्या बरोबरीचा होता, असें म्हणण्यास हरकत नाहीं. नकाशांत पाहिल्याप्रमाणें त्याला सर्व जगाचें  यथार्थज्ञान होतें. आणि मानवी बुध्दीतील नैसर्गिक दोष काढून टाकून जगाचे सर्व व्यवहार आपल्या पूर्णपणें ताब्यांत ठेवण्याची त्याची आकांक्षा होती. त्या आकाक्षेला धरून त्यानें अनेक पुस्तकें लिहिण्याचें योजिलें होतें, परंतु ती सर्व त्याचे हातून पुरी झालीं नाहींत. '' अॅडव्हान्समेंट ऑफ लर्निंग'' या पुस्तकांत त्यानें आपल्या योजनेचा नकाशा काढला, ''दि नोव्हम ऑर्गनम'' या ग्रंथांत त्यानें ''स्कूलमेन'' च्या तत्त्वज्ञानपध्दतींतील दोष दाखवून तर्कशास्त्रांतील प्रत्यक्ष संकलन पध्दतीची मांडणी केली; आणि ''दि न्यू अॅटलॅटिस'' या ग्रंथांत त्यानें ज्याचे आचारविचार पूर्ण शास्त्रीय पध्दतीनें रचलेले आहेत आणि ज्याची उभारणी नैतिक पायावर केलेली आहे अशा समाजाचें काल्पनिक वर्णन केले आहे. कोणत्याहि देशी भाषेपेक्षा लॅटिन ही अधिक चिरायु होईल अशी त्यावेळच्या बडया मंडळीची समजूत होती. आणि बेकनचीहि तशीच समजूत असल्यामुळें त्यानें आपले मुख्य शास्त्रीय ग्रंथ लॅटिन भाषेंतच लिहिले आहेत. त्याच्या ''निबंधांत'' त्यानें मानवी आयुष्य व व्यवहार यावर जन्मभर संकलित केलेली मतें नमूद केलेली आहेत. या नमूद केलेल्या मतांवरून तो फार व्यवहारदक्ष व मुत्सद्दी, कोणास न भाळणारा, न्याय-अन्याय यांपेक्षां कार्यकारणावर जास्त नजर देणारा, स्त्रीपुरुषांवर फारसा भरंवसा न ठेवणारा, उदास परंतु सत्यास चिकटून राहणारा, आणि मधून मधून रुक्ष व संकुचित तर मधून मधून उदात्त व शहाणपणाची तत्त्वें प्रतिपादन करणारा, दिसून येतो. त्याची लेखनशैली विशेष परिणामकारक आहे. ती कारणपरत्वें संकुचित किंवा विस्तृत होते. अधिकारभ्रष्ट झाल्यानंतर त्यानें लिहिलेला सातव्या हेन्रीच्या कारकीर्दीचा इतिहास (इ. स. १६२२) हा क्लॅरेन्डनच्या पूर्वीचा पहिलाच इंग्रजी ऐतिहासिक ग्रंथ होय. परंतु त्या काळचा मुख्य गद्यलेखक म्हटला म्हणजे शेक्सपिअर हा होय. शिवाय बेकन व शेक्सपिअर यांच्या बरोबर बेन जॉन्सन याचेंहि नांव गद्यलेखकाच्या यादींत प्रामुख्यानें नमूद केलें पाहिजें.

स्टुअर्ट घराण्यांतील राजांची कारकीर्द संपण्याच्या सुमारास गद्य ग्रंथांत पाच निरनिराळया प्रकारची भर पडली. (१) तत्त्वज्ञान (२) धर्मशास्त्र (३) मृत्यूवरील काव्य कल्पनां (४) मनुष्यांचें व चालीरीतींचें अवलोकन, आणि (५) प्राचीन इतिहास. तो काळ नाणावलेल्या वैयक्तिक गद्यलेखकांचा असून अमुक एका विशिष्ट प्रकारचें किंवा ठशाचें गद्य निर्माण होण्याचा नव्हता. अद्याप लॅटिन भाषेचा लोकांच्या मनावर इतका पगडा होता कीं, त्यामुळें पुष्कळ वेळां बुध्दिवान लेखक आपले ग्रंथ इंग्रजींत लिहिण्याच्या ऐवजीं लॅटिनमध्यें लिहीत असत. ''समाजरचनेचा मूळ करार'' राजाची अनियंत्रित सत्ता, धर्मखात्यावर राजाचा ताबा, आणि मानवी प्राणी इत्यादि विषयांवरील हॉबचे विचार वाचून सर्व पक्षांतील लोकांस राग आला. आणि त्याचा ठसा तत्कालीन विचारांवर आणि वादविषयक वाङ्मयावर उमटला.

जेरेमी टेलर हा इंग्लंडातील सरतेशेवटचा दोषादोष विवेचक व स्कूलमन होता. त्यानेंच प्रथम धर्मसहिष्णुतेचा पुरस्कार केला. ग्रीक व लॅटिन ग्रंथांतून, पौरस्त्य ग्रंथांतून, प्राणिवर्गांतून, थोराच्या व पोरांच्या चरित्रांतून, घेतलेले निरनिराळे दृष्टांत त्याच्या ग्रंथांत सांपडतात. याचे ग्रंथ 'लिबर्टी ऑफ प्रोफेसिइंग' व ''लाइफ अॅण्ड डेथ ऑफ जीजस क्राइस्ट'' हे आहेत.

या काळात जे अनेक ऐतिहासिक माहीतीनें भरलेले वादविषयक लेख व मासिक पुस्तकें प्रसिध्द झालीं, त्यांत क्लॅरेन्डनचा ''हिस्टर ऑफ रिबेलिअन'' हा ग्रंथ विशेष महत्त्वाचा होता. बेकनचा ''हेनरी दि सेव्हंथ'' हा ग्रंथ बाजूस ठेविला तर त्या काळाचें ऐतिहासिक लेखन केवळ प्रयोग स्थितींतलें होतें. रॅलेचा ''दि हिस्टरी ऑफ दि वर्ल्ड'' हा ग्रंथ फक्त त्यांतील काहीं उताऱ्यावरून प्रसिध्द आहे. क्लॅरेन्डनच्या नंतर मिल्टननें आपले वादविवादात्मक गद्य ग्रंथ इ. स. १६४३ पासून इ. स. १६६० पर्यंत लिहिले.

''पु नः प्र स्था प ना,'' का ल, इ. स. १६६० ते इ. स. १७०० प र्यं त चें वा ङ्म य: - सतराव्या शतकाच्या तिसऱ्या पादांत इंग्लंडांतील वाङ्मयाच्या पुनरुज्जीवनास नवीनच दिशा लागली. इ. स. १५८० पासून यूरोपच्या ''बुध्दि व कला'' या क्षेत्रांत बरीच खळबळ उडून गेली होती. अंतःप्रेरणा म्हणून जिला म्हणतात ती इटलीमधून लयास गेली होती आणि ग्रीक व लॅटिन या जुन्या भाषांपासून कोणास प्रोत्साहन मिळेनासें झालें होतें. स्पेन देशांत नाटयकलेची भरभराट होती, परंतु तिचा प्रभाव चहूंकडे विखुरलेला असून अप्रत्यक्ष होता. जर्मन देशांत वाङ्मयाचा नुकताच कोठें उदय झाला होता. परंतु त्याचा इंग्लंडवर कांहीं परिणाम झाला नव्हता. फ्रान्सच्या दक्षिण व उत्तर या दोन्ही दिशांस मात्र वाङ्मयाचें वर्चस्व प्रस्थापित झालें आणि अर्ध्या शतकांत त्यास चांगलेंच चिरस्थायित्त्व आलें. या फ्रान्सच्या वाङ्मयविषयक प्रभावापुढें इंग्लंडच्या बौध्दिक बळास हार खावी लागली, परंतु थोडयाच वेळांत त्यानें आपली जागा परत मिळविली आणि इ. स. १७२० पर्यंत तर इंग्लंडनें सर्व पारडें उलट फिरवून फ्रान्सवर वाङ्मयाच्या बाबतींत आपली सरशी करून दाखवली. ड्रायडनच्या वेळेस मात्र इंग्लंडच्या वाङ्मयास फ्रेंच वाङ्मयापासून बरीचशी मदत प्राप्त झाली.

फ्रें च वा ङ्म या चा प रि णा मः-  फ्रान्समधील प्रॉटेस्टंट लोक इंग्लंडच्या आश्रयाला येऊन राहिले होते. त्यानीं बऱ्याच फ्रेंच ग्रंथांचीं भाषांतरें केलीं. त्यांचा परिणाम गद्यपद्यात्मक वाङ्मय, नाटय व औपरोधिक वाङ्मय, टीकात्मक व सूत्ररूपी वाङ्मय आणि धार्मिक व सर्वसामान्य तात्त्वि विचार यांजवर झाल्याशिवाय राहिला नाही. प्लेटो, होमर व ग्रीक नाटककार यांच्या वाङ्मयाचा अंमल कमी होऊन ज्युव्हेनल, होरेस इत्यादि लॅटिन ग्रंथकारांचे वजन वाढत गेलें. या लॅटिन ग्रंथांचा इंग्रजी वाङ्मयावर बराच परिणाम झाला हें, त्यांचें ड्रायडन यानें भाषांतर केलें या गोष्टीवरूनच स्पष्ट होतें. कॉर्नेली व रॅसीन या फ्रेंच नाटककारांनीं आपली शोकमय नाटयाची पध्दत सेनेकापासून घेतली होती आणि इंग्लंडमध्यें या वेळीं त्यांचें वजन अधिकाधिक पडत असल्यामुळें शेक्सपिअर, फ्लेचर इत्यादिकांचे अनुकरण करण्याची प्रवृत्ति कमी होत चालली. फ्रेंच टीकाकारांच्याहि लेखनपध्दतीचें ड्रायडन यानें अनुकरण केलें. या अनुकरणेच्छेमुळें काव्यस्फूर्तीचा लय झाला. वीरसप्रधान काव्य, वीणाकाव्य व शोकमयनाटय इत्यादि लेखनपध्दतीचा ऱ्हास झाला आणि अशा रीतीनें उत्पादक शक्ति नाहींशी झाल्यामुळें लेखकांचें लक्ष जुन्या ग्रंथांचें भाषांतर किंवा रूपांतर करण्यांतच गुंतून गेलें. याचा परिणाम असा झाला कीं, इंग्लंडमध्यें हा काळ म्हणजे दुय्यम प्रतीच्या पद्यरचनेचा आणि नवीन व कधीं कधीं कडक टीकात्मक ग्रंथरचनेचा काळ होऊन बसला.

शा स्त्र व वा ङ्म य. - तीच संशोधनबुध्दि शास्त्र व तात्त्विक विचार या क्षेत्रात विशेष तीव्रपणानें दिसूं लागली. नवीन स्थापन झालेल्या 'रॉयल सोसायटी' या संस्थेच्या कार्याचा वाङ्मयावर प्रत्यक्ष परिणाम झाला. अगदीं शुध्द, सरळ व स्वाभाविक बोलण्याच्या पध्दतीप्रमाणें लेखन पध्दति असावी असा त्या संस्थेचा इतिहासकार स्प्रॅट यानें त्या संस्थेच्या कार्यक्रमांत निर्बंध घातला होता. ही वेळ शास्त्रीय संशोधनास अनुकूल होती. जॉन लॉक याचा 'एसे कन्सर्निंग ह्यूमन अंडरस्टँडिंग' हा ग्रंथ याच वेळेस बाहेर पडला. त्याच्या ग्रंथावरून हॉबच्या वेळेपासून तत्त्वज्ञानविषयक लेखनांत किती फरक पडला हें दिसून येतें.

द र बा री व सा मा जि क प रि स्थि ती चा प रि णा म - पुनः प्रस्थापनेपूर्वी मिल्टन व मार्व्हेल यांच्यासारखे अपवाद बाजूस ठेवले तर सर्व ग्रंथकार राजाश्रयानें व दरबारी छत्राखालीं रहात असत. परंतु ''सिव्हिल वॉर'' पासून हा त्यांचा आश्रय सुटला होता; तो नवीन राजाची गादीवर प्रस्थापना झाल्यानंतर त्यांस फिरून प्राप्त झाला. दुसरा चार्लस ग्रंथकारांस मदत करी, त्यांच्याशीं आनंदानें संभाषण करी, शास्त्राला उत्तेजन देई व नाटकमंडळयांसहि आश्रय देत असे. त्यामुळें ग्रंथलेखनास चांगलेंच उत्तेजन मिळालें.

ग द्य म य व टी का त्म क वा ङ्म य - गद्यलेखनपध्दतीत जो फरक पडत गेला त्याचें श्रेय कोणत्याहि एका वैयक्तिक लेखकाकडे देतां येणार नाहीं. आपण जर प्रथम ऑटवेची किंवा लेडी रेचेल रसेल हिचीं पत्रें किंवा पेपीची रोजनिशी किंवा पूर्वीच्या राजकीय खटल्यांतील जबान्या किंवा नाटकांतील संभाषणें वाचलीं; नंतर एल' एट्रेंजची पत्रकें किंवा बर्नेटचा 'हिस्टरी ऑफ माय ओन टाइम' हा ग्रंथ वाचला आणि अशा रीतीनें वाचीत वाचीत अखेर ड्रायडनचा 'प्रिफेस टु हिज फेबल्स' हा ग्रंथ वाचला तर गद्याचा ओघ कसकसा वहात जाऊन शेवटीं आपण जिला आधुनिक भाषासरणी किंवा लेखनपध्दति म्हणतों ती कशी निर्माण झाली हें कळून येईल. ड्रायडनच्या सफाईदार लेखन पध्दतीचा विचार केला म्हणजे त्यानें नाटयग्रंथ लिहिण्यापेक्षां सर्व गद्यात्मक ग्रंथच कां लिहिले नाहींत, याबद्दल खेद वाटतो. ड्रायडनचे गद्यग्रंथ म्हणजे त्यानें आपल्या नाटकांस जोडलेल्या प्रस्तावना होत; तथापि त्याच्या या टीकात्मक ग्रंथाच्या दर्जाचे गद्यग्रंथ पुढील शंभर वर्षांतहि पहावयास मिळत नाहींत. या काळाच्या गद्यास वळण देण्याच्या कामीं ड्रायडनच्या बरोबर आणखी चार गद्य लेखकांच्या नांवाचा उल्लेख करण्यांत येतो. ते गद्यलेखक म्हणजे स्प्रॅट, टिलटसन, सर वुइल्यम टेंपल व हॅलिफॅक्स हे होत. या सर्वांत हॅलिफॅक्सचे राजकीय विषयावरील निबंध व म्हणी आधुनिक गद्याच्या तोडीच्या असून ड्रायडन व स्विफ्ट यांच्या दरम्यानच्या काळांत अत्यंत लोकादरास पात्र झाल्या होत्या.

प्यू रि ट न पं था चे ग द्य ग्रं थ का र - बॅक्स्टर व होवे, फॉक्स व बनिअन हे प्यूरिटन पंथाचे गद्य ग्रंथकार होते व त्यांच्या लेखनास ख्रिस्ती धर्मग्रंथापासून स्फूर्ति मिळाली होती. यापैकीं पहिल्या दोन ग्रंथकारात विद्वत्तेचाहि भाग बराच होता. बॅक्स्टर याचा ग्रंथलेखनाचा व्याप बराच मोठा होता. आणि त्याचे 'सेंट्स एव्हरलास्टिंग रेस्ट' व ''आत्मचरित्र'' हे ग्रंथ त्यावेळीं बरेच लोकप्रिय झाले होते होवेच्या 'दि लिव्हिंग टोपल ऑफ गॉड' या ग्रंथाची आणि फॉक्सच्या 'जर्नलची' ची त्या वेळेस बरीच ख्याति होती. बनिअनचें शिक्षण जरी या सर्वांत कमी प्रतीचें होतें तरी त्याला स्वभावतःच लेखनकला चांगली साधली होती. त्याच्या धार्मिक मतांप्रमाणेंच त्या काळच्या जवळजवळ अर्ध्याअधिक राष्ट्राची मतें होतीं. त्यानें नुसता ख्रिस्ती धर्मग्रंथच वाचला नसून त्या वेळच्या इतर लोकांप्रमाणें राक्षसांच्या, यात्रेकरूंच्या व धाडसांच्या अन्योक्तिरूप गोष्टीहि वाचल्या होत्या. त्यानें लिहिलेलें 'दि पिलग्रिम्स प्रोग्रेस' हें पुस्तक तज्जातीय ग्रंथाच्या रुक्ष अरण्यांतील एक रमणीय फुलझाड होते असें म्हणण्यास हरकत नाहीं. 'दि प्रोग्रेस' हें बनिअनला पडलेलें स्वप्न आहे तथापि त्यानें सांगितलेलें तें स्वप्न वाचीत असतां ते जितकें त्याला स्पष्टपणें दिसत असावेसें वाटतें, तितकें पुष्कळ जणांस त्यांच्या जागृतींतले विचारहि कळत नसतील. त्यांतील प्रस्तुत व अप्रस्तुत हे एकमेकांत इतके मिसळले आहेत कीं तें पुस्तक वाचतांनां आपण एखादा अन्योक्तिरूप ग्रंथ वाचीत आहोंत असें देखील वाटत नाहीं. ''ग्रेस आबाउंडिंग दि होली वॉर'', ''दि लाइफ अँड डेथ ऑफ मि. बॅड मन'' हे बनिअनचे इतर ग्रंथ होत. पारमार्थिक विचारसरणी, विनोदी लेखनशैली, खुबीदार परंतु साधी व जोरदार भाषा हे गुण तत्कालीन इतर ग्रंथकारांपेक्षां बनिअनमध्यें विशेष प्रमाणांत वास करीत होते.

जुन्या व नव्या पद्यरचनेंत फरक घडून आला, तो अगदीं अनपेक्षित रीतीनें घडला असें नाहीं. जुने विषय मागें पडून मागें पडलेले उदयास आले, आणि काहीं कांही पद्यांत तर अगदींच नवीन विषय दृष्टीस पडूं लागले. जॉन ओल्डहॅम व अँड्रयु मार्व्हेल यांच्या लेखनांत दोन्ही प्रकारची पद्यरचा पहावयास सांपडते. दोघांनींहि प्रथम कल्पनात्मक पद्यें व विलापगीतें रचून शेवटीं औपरोधिक काव्यरचना केली. याच सुमारास सॅम्युअल बटलरनें प्रसिध्द केलेल्या ''ह्युडिब्रास'' (१६६३-१६७८) काव्यांत आपणास निराळयाच प्रकारचें औपरोधिक काव्य पहावयास सांपडतें.

ड्रायडन. - गद्यांत, पद्यांत व कांहीं अंशी नाटयांतहि जॉन ड्रायडन हा त्या काळीं अग्रगण्य होता. त्यानें प्रथम क्रॉमवेलवर आणि नंतर चार्लसवर प्रशंसापर काव्यें लिहिलीं. त्यांतील कविता उत्तम आहेत परंतु प्रशंसा मिथ्या आहे. त्याच्या अॅनस मिरॅबिलिस या काव्यांत ग्रंथिक सन्निपात, आग व दर्यावरील युध्दांतील विजय यांचे सविस्तर वर्णन आहे. निर्यमक व सयमक कविता यांच्यांतील व इलिझाबेथन युगांतील नाटय व फ्रेंच नाटय यांच्यांतील संवादस्वरूपाचा त्यानें लिहिलेला ड्रॅमॅटिक पोएसी या विषयावरील निबंध जवळ जवळ आधुनिक भाषापध्दतीचा आहे. ही गद्यलेखन पध्दति ड्रायडनला अचानक रीतीनें साध्य झाली. पद्य लेखनकला साध्य करून घेण्यास मात्र त्याला कांहीं विलंब लागला. इ. स. १६८० पर्यंत नाटकं लिहून तो आपला निर्वाह करीत असे. परंतु त्याचीं ती नाटकं त्यांच्या गद्य प्रस्तावनाइतकींहि टिकलीं नाहींत. त्याच्या विरोधपर ग्रंथांत वादविवादात्मक पद्यात,अर्पणपत्रिकांत आणि भाषांतर स्वरूपी लेखांत मात्र, त्याची भाषासरणी व पद्यरचनापध्दति पूर्णत्वास पोहोंचली होती, असें म्हणण्यास हरकत नाहीं.

शो क म य ना ट कें. - पुनः प्रस्थापना काळांतील व राज्यक्रांतीच्या वेळचीं शोकमय नाटकें बहुतेक रुक्ष आहेत. मौजेनें वाचण्यास तर ती सर्वथैव निरुपयोगी आहेत. परंतु त्यांत कल्पनेच्या भराऱ्या बऱ्याच उंच असून ती ऐतिहासिक माहितीच्या दृष्टीनें महत्त्वाची आहेत. थॉमस ऑटवे व नॅथॅनील ली हेहि त्या वेळचे शोकमय नाटकें लिहिणारे होते. दोघांनींहि निर्यमक कवितेचा उपयोग केला आहे. ऑटवेचें 'व्हेनिस प्रिझव्हर्ड्' हें नाटक वीररसप्राधान्याच्या दृष्टीनें शेक्सपिअरच्या तोडीचें आहे. परंतु त्याची हलक्या प्रतीची लेखनशैली आणि पद्यरचना इतर वेळीं ग्राह्य होणें शक्य नाहीं. ली हा कवि या दृष्टीनें अधिक सरस होता परंतु त्याला नाटयकला चांगलीशीं साधली नाहीं.

आ नं द म य ना ट कें. - जॉनसनचें अनुकरण करणें सोपें असल्यामुळें ''पुनःप्रस्थापना'' युगांतील नाटककारांनीं प्रथम त्याचेंच अनुकरण केलें. शाडवेल व वुइल्सन यांच्या नाटकांत तत्कालीन समाजस्थिति उत्तम रीतीनें प्रतिबिंबित झालेली पहावयास सांपडते. ड्रायडनच्या आनंदमय नाटकांत त्याचे उत्तम गुण दृष्टीस पडत नाहींत. इतर नाटककारांप्रमाणें त्यानें फ्रेंच नाटकांतील बऱ्याचशा कल्पना घेतल्या असून मोलिअरचें अनुकरण करतांनां त्याच्या कृतीला अगदीं हिडिस स्वरूप दिलें आहे. सर जॉर्ज एथरेज यानें आपल्या नाटकांत त्या काळच्या समाजांत दिसून येणारा चैनीपणा व उध्दटपणा उत्तम रीतीनें रेखाटला आहे. मॅसिंजर व काँग्रीव्ह यांच्या मधल्या काळांत वायचरले हा एकटाच आनंदमय नाटकें लिहिणारा सुप्रसिध्द नाटककार झाला. त्यानें आपली नाटकें गद्यांत लिहिलीं आहेत आणि तें गद्य अतिशय उत्तम असून अगदीं आधुनिक स्वरूपाचें आहे.

अ ठ रा वें श त क. - इ. स. १६६० च्या 'पुनःप्रस्थापना' काळांत ज्या सामाजिक स्थित्यंतरांस प्रारंभ झाला. त्यांचा अंमल अॅन राणीच्या कारकीर्दीत (१७०२-१७१४) चांगलाच बसलेला दिसून आला. समाजांतील सर्व दर्जाच्या लोकांत पुस्तकी ज्ञानाचा प्रवेश झाला. त्यामुळें हा काळ वर्गीकरणाचा व विस्ताराचा होता. देशांत ग्रंथवाचनाचा प्रसार जसजसा अधिक होत गेला, तसतसा इंग्रजी ग्रंथकारांचा एककल्लीपणा व त्यांच्या लिहिण्यांतील दुर्वोधपणा नाहींसा होत गेला. अठरावें शतक हें विशेषकरून गद्यलेखनाचें युग होतें, आणि जरी या काळांत अतिशय उत्कृष्ट गद्य दाखवितां येणार नाहीं, तरी गद्याचे निरनिराळे प्रकार पहावयास सांपडतात. बोलिंगब्रोक, अॅडिसन व वर्कले यांची सरदारी बाण्याची लेखनपध्दति फील्डिंगची सभ्यपणाची, बटलर, मिडलटन, स्मिथ व बेन्थॅम यांची तार्किक व वादविवादाची, जॉनसन व त्याच्या चहात्यांची समगतिक व समतोलाची; ह्युम व मॅकिनटॉश यांची शुध्द व प्रवाही; वॉलपोलची हलकी, सोपी, व विनोदी, कौपरची दैवी संभाषणाची, ग्रे व बर्कले यांची रंगेलपणाची, बर्कची गंभीरपणाची, स्विफ्ट व डिफो यांची निबंधलेखकांस शोभण्यासारखी, स्टर्नची लबाडीच्या सलगीची, शेरिडानची नाटकी व नटवेपणाची, गिबनची डामडौलाची आणि गोल्डस्मिथची झुळझुळ वाहणारी इतक्या तऱ्हेची भाषापध्दति जी आपणास अठराव्या शतकाच्या इंग्रजी वाङ्मयांत दृष्टीस पडते तितक्या तऱ्हेची दुसऱ्या कोठेंहि दृष्टीस पडत नाहीं. परंतु वाङ्मयाचें ऐतिहासिक पर्यालोचन करणारास त्याच्या गुणांची कशी वाढ झालीं हें पाहण्यापेक्षां त्यांतील निरनिराळया प्रकारांचा विकास झाला हें पाहणें अधिक श्रेयस्कर आहे. अठराव्या शतकांत गद्य वाङ्मयाच्या निरनिराळया प्रकारांचा विकास अतिशय उत्तम रीतीनें झाला. वाङ्मयाच्या बहिरंगाचाच तेवढा विचार केला तर असें दिसून येतें की अठराव्या शतकांतील गद्य व पद्य हीं दोन्ही ड्रायडनच्या नमुन्यावर विकास पावत गेलीं. वाङ्मयाच्या अंतरंगाचा म्हणजे त्यांत येणाऱ्या विषयाचा विकास शहरवासीयांच्या रहाणीवर अवलंबून असल्यामुळें आणि ती रहाणी व्यापाराच्या वाढीबरोबर बदलत जात असल्यामुळें अठराव्या शतकांतील इंग्रजी व्यापार जसा झपाटयानें वाढत गेला तसा वाङ्मयाच्या अंतरंगालाहि नानाविधपणा प्राप्त होत गेला. लोकांची अभिरुचीहि झपाटयानें बदलत गेली. वाचकांची संख्या दरदिवशीं वाढत गेली. वृत्तपत्रांबरोबर पुस्तकांच्या जाहिराती देण्याचा प्रघात सुरू झाला आणि आतां विद्वान ग्रंथकारांनीं काय लिहावें हा मुख्य प्रश्न नसून अनेकविध वाचकांस वाचावयास काय पाहिजे हा मुख्य प्रश्न होता. या शतकांत भरभराटीस आलेले वाङ्मयाचे प्रकार म्हटले म्हणजे निबंधलेखन व औपरोधिक वाङ्मय, आणि त्याचे प्रमुख लेखक ऑडिसन व स्टील, स्विफ्ट व गोल्डस्मिथ आणि पोप व चर्चिल हे होत. पोप व त्याच्यामागून लेडी मेरी वार्टले मॉन्टग्यू या दोघा लेखकांनीं प्रथम पत्रलेखनाचें कला या दृष्टीनें सविस्तर विवेचन केलें. व्यक्तिविषयक टीका व चरित्रें यांपासून वाचकांस पुष्कळशीं ऐतिहासिक माहिती मिळते परंतु या वाङ्मयाच्या प्रकाराचा हा वेळ पर्यंत इंग्रजीत अभाव दिसून येतो. अॅडिसनचे कल्पनामय निबंध आणि डीफोची साधीं चरित्रें यांच्या योगानें इंग्रजी कादंबरी वाङ्मयाचा मार्ग खुला करून दिला. त्याचप्रमाणें स्थलवर्णनपर, नियतकालिक व टीकात्मक ग्रंथांचीहि या शतकांतील वाङ्मयांत बरीच भर पडली.

अठराव्या शतकाच्या सुरवातीस जॉन लॉक व जोसेफ अॅडिसन हेच बहुजनसमाजास वळण देणारे ग्रंथकार होते. इ. स. १७०४ च्या आक्टोबर महिन्यांत जेव्हां लॉकनें आपल्या वयाच्या बहात्तराव्या वर्षी इहलोक सोडला, तेव्हां त्यानें गेल्या शतकांत कोणीहि केलें नाहीं, इतकें जनमत तयार केलें होते. सामाजिक कर्तव्य व सामाजिक जबाबदारी हीं त्याचीं दोन मुख्य तत्त्वें होतीं. या दोन तत्त्वांची आवश्यकता प्रतिपादन करतांना तो आपल्या ''ह्यूमन अंडरस्टँडिंग'' या ग्रंथांत म्हणतोः - ज्ञानाच्या कोणत्याहि भागांत सारासार विचारावांचून चालावयाचें नाहीं. परंतु जोसेफ अॅडिसन (१६७२-१७१९) हा त्या काळीं नव्याचा विशेष अभिमानी होता. त्यानें प्रथम सतराव्या शतकाच्या भाषेंतील कठिण शब्दांचे प्रयोग, तिच्यांतील खुशामतीचे प्रकार, तिचा डामडौल व अवडंबर आणि तिच्यांतील शब्दार्थविरोध वगैरे सर्व दूर झुगारून दिले. इंग्रजी कादंबरी वाङ्मयाचा उदय होण्यापूर्वीच्या शतकार्धास ''स्पेक्टेटरचें'' शतकार्ध म्हटलें तर अतिशयोक्ति होणार नाहीं.

स्विफ्टच्या अधिक कल्पकबुध्दीच्या आणि स्टीलच्या अधिक शोधक व आनंदी स्वभावाच्या संसर्गानें अॅडिसनचें मन विकसित झालें होतें. लांबलचक प्रवचनें व अघळपघळ भाषणें यांच्याऐवजीं जर सद्बुध्दि सदभिरुची व सद्भावयुक्त नीति यांचे धडे वाचकांस दिले व तोहि अगदीं सोप्या व सफाईदार भाषेंत दिलें तर ते त्या नागरिक युगांत जास्त ग्राह्य होतील हें रिचर्ड स्टीलनें (१६७२-१७२९) प्रथम ओळखलें आणि त्याप्रमाणें करण्याचा त्यानें ''टॅटलर'' नांवाच्या मासिक पुस्तकांत (१७०९-१७१०) प्रारंभहि केला. सद्गुणाच्या स्तुतिपर व मूर्खपणाच्या निंदापर असा एखादा निबंध आपल्या मित्राच्या नियित कालिकांत मधून मधून प्रसिध्द करणें हें काम अॅडिसनच्या लायकीचें असून तसें करण्यास त्याला आयतीच संधि मिळाली. इ. स. १७११ त जेव्हां टॅटलर बंद पडून त्याची जागा स्पेक्टेटरनें घेतली तेव्हां अॅडिसन तें चालविण्याच्या कामीं विशेष उत्साहानें भाग घेऊं लागला. अॅडिसनच्या लेखन शैलीवर विचार केला म्हणजे असें म्हणावें लागतें कीं, कंटाळवाण्या तत्कालीन इंग्रजी लेखनपध्दतीच्या जागीं कॉफीपानगृहांत वाङ्मयाचा प्रसार करण्याकरितां, सुबक, चटकदार व थाटामाटाची फ्रेंचपध्दतीची भाषा वापरणारां असा योग्य लखेक पाहिजे होता तसा तो योग्य वेळीं पुढें आला. स्टील हा लोकांच्या मर्जीतून उतरला. स्विफ्टच्या लेखांकडेहि कोणी पाहीनासें झालें व तो पुढें वेडा झाला परंतु अॅडिसनचें महत्त्व इतकें वाढलें कीं, त्या काळच्या प्रत्येक सद्गृहस्थास त्याचे निबंध वाचणें अत्यावश्यक होऊन बसलें. इ. स. १७१७ पासून इ. स. १७७५ पर्यंत लोकमतास वळण देण्याच्या कामीं तर अॅडिसन लॉकच्या तोडीचा लेखक होता.

स्विफ्टः - समाजाचा घटकावयव अशा रीतीनें मनुष्यमात्राचा विचार न करितां, मनुष्याच्या खाजगी व राजकीय चारित्र्याची दुसरी बाजू जोनॅथन स्विफ्ट यानें लोकांपुढें मांडली. विनोद, तर्कशास्त्र, जोरकसपणा, आटोपशीरपणा व सोपेपणा इत्यादि गुणांत त्याच्या लेखनशैलीची बरोबरी कोणत्याहि लेखकास येणार नाहीं.

बोलिंगब्रोक - बोलिंगब्रोकच्या ग्रंथांतील मजकुराच्या किंवा त्याच्या लेखनपध्दतीच्या अशा कोणत्याहि दृष्टीनें विचार केला तरी त्याच्या लेखनाचें आतां विशेष महत्त्व वाटत नाहीं. त्याच्या कल्पना जरी परोच्छिष्ट होत्या तरी ऐतिहासिक दृष्टया त्याच्या ग्रंथांचें महत्त्व आहे. त्याची भारदस्त, समतोल व अलंकारिक भाषासरणी राजकारणी पुरुषांस आदर्शभूत होती.

डीफो. - डीफोनें आपला रॉबिन्सन क्रुसो नांवाचा ग्रंथ आपल्या वयाच्या साठाव्या वर्षी लिहिला. हुबेहूबपणा हा त्याच्या वर्णनांतील विशिष्ट गुण होता. डीफोचें कथानक, अॅडिसनचें मानवी स्वभाववर्णन, फील्डिंगचें समाजस्थितिचित्र आणि रिचर्डसन व स्टर्न यांचें भावना वर्णन हे सर्व गुणधर्म एकवटले म्हणजे आपणांस अठराव्या शतकांत कादंबरी वाङमयाचे सर्व गुणधर्म पहावयास मिळतात. पोपपंथी कवींनीं फक्त सयमक पद्यरचनेचा एक प्रकार शोधून काढला. परंतु अॅडिसन स्टील, स्विफ्ट व  डीफो यांनीं गद्यांतील कादंबरीचा एक स्वतंत्र भाग शोधून काढला. यामुळें १७ व्या शतकांतील पद्यलेखकांपेक्षां गद्यलेखकांची कामगिरी अधिक महत्त्वाची आहे.

पोप - तीव्र मनोविकार, कल्पना व गायनाभिरुचि इत्यादि प्रतिभासंपन्न कवींत लागणाऱ्या गुणांचा अलेक्झांडर पोपमध्यें (१६८८-१७४४) अभाव होता. त्याचें अत्युत्कृष्ट काव्य म्हटलें म्हणजे ''सटायर्स अँड एपिसल्स'', परंतु तें पद्यात्मक गद्य या स्वरूपाचें आहे. खुबीदार, जोरदार व खोंचदार शब्दप्रयोगामध्यें मात्र त्याचा हात धरणारा कोणी नाहीं. त्याच्या ठराविक कल्पना, त्याच्या लिहिण्यांतील विषारी खोंचा आणि त्याचा खुबीदार वाग्विस्तार या गुणांमुळें त्या नागर युगांतील लोकांनीं त्याचे देव्हारे माजविले होते. सुप्रसिध्द ग्रंथकार व्हाल्टेर यानें तर सर्वोत्कृष्ट कवि म्हणून पोपची शिफारस केली होती आणि पोपच्या अंतकालीं त्याच्या लेखनपध्दतीचें वर्चस्व सर्व सुधारलेल्या राष्ट्रांत प्रस्थापित झालें होतें. काव्यलेखनानें द्रव्यार्जन करणारा पोप हा पहिलाच इंग्रज-कवि होता. त्याच्या काव्यपध्दतीचें जिकडे तिकडे इतकें अनुकरण झालें व त्यामुळें त्याचें इतकें स्तोम माजलें कीं, त्याचा काव्यसंप्रदाय कायमचा होतो कीं काय, अशी एकवेळ भीति वाटूं लागली होती. प्रायर, गे, पार्नेल, अकेन्साइड, पाम्फ्रेट, गार्थ, यंग, जॉन्सन, गोल्डस्मिथ, फॉकनेर, ग्लोव्हर, ग्रेन्जर, डार्विन, रॉजर्स, हेले आणि इतर शेंकडो कवी काव्यलेखनाच्या बाबतींत पोपला आपला गुरू मानीत असत. याप्रमाणें इ. स. १७१४ पासून इ. स. १७९८ पर्यंत जरी पोपच्या काव्य पध्दतीचा बहुतेक सार्वत्रिक प्रसार झाला होता तरी त्यावेंळी त्याच्याहून निराळया व स्वतंत्र पध्दतीनें काव्य लिहिणारे कवी होतेच.

टॉम्सन. - जेम्स टॉम्सन यानें आपलें 'दि वुइंटर' हें काव्य लिहून इंग्रजी काव्यवाङ्मयांत नवीनच प्रघात सुरू केला. लेडी विचिल्सी, ''सायइर'' कव्याचा लेखक जॉन फिलिप्स, आणि ''ग्राँगर हिल'' काव्याचा कर्ता जॉन डायर यांनीं काव्यांत सृष्टीचें सत्यपूर्ण व अकृत्रिम आणि त्याजबरोबर अद्भुत रसात्मकहि वर्णन असावें असें प्रतिपादन केलें होतें. परंतु बॉलर व कौले यांच्या वेळेपासून काव्यामध्यें जो कृत्रिमपणा व भाषेचा रुक्षपणा शिरला होता त्याच्या विरुध्द टॉम्सन यानें प्रथम विरोध करण्यास सुरुवात केली. ज्यावेळीं पोपची पद्यरचना सर्वमान्य झाली होती, त्यावेळीं टॉमसनने उत्कृष्ट काव्यास निर्यमक पद्यरचना सोयीची आहे असें म्हणून पोपच्या पद्यरचनेचें अनुकरण केलें नाहीं. त्यानें आपली निसर्गसौन्दर्याची कल्पना त्याचे अनुयायी सॅव्हेज, आर्मस्ट्रांग, सामर्व्हिली, लँगहॉर्न, मिकल व शेन्स्टोन यांच्यापर्यंतच नव्हे तर शोकगीत रचणारे कोलिन्स, ग्रे व कौपर यांच्या पर्यंत आणि अप्रत्यक्षपणें इ. स. १७९८ च्या बीणाकाव्य लेखकांपर्यंत पोहोंचविली.

यावरून अठराव्या शतकांत सर्व काव्यरचना पोपच्या धर्तीची होती असें म्हणणें वाजवी होणार नाहीं. ज्या वेळीं लोकांची अभिरुचि पोपच्या काव्यरचनेची चहाती होती त्यावेळी जर कोणी तद्भिन्न काव्यरचना करूं लागला तर त्याची नाउमेद होणार हें उघड होतें. तथापि तशा स्थितींतहि तसलें काम करण्यास जे कवी पुढें आले त्यात कोलेन्स, स्मार्ट, कौपर, ब्लॅक हे चार कवी मनानें दुर्बल होते ग्रे हा एकान्तवास प्रिय होता आणि शेन्टोन व टाम्सन हे एकान्तवासप्रिय असून शिवाय आळशी होते.

कादंबरी - अठराव्या शतकांत जे गद्य लेखक झाले त्यांत रिचर्डसन, फील्डिंग, स्मालेट व स्टर्न हे आद्य कादंबरीकार बरेच सुप्रसिध्द व स्वतंत्रबुध्दीचे होते. या सुमारास इंग्लंडमध्यें मध्यमवर्ग उदयास आला होता. त्यांतील लोकांस बरीच फुरसत असल्यामुळें त्यांस त्यांच्या फावल्या वेळीं करमणुकीचीं पुस्तकें वाचण्याची आवश्यकता भासूं लागली होती. शिवाय जेरेमी कोलिअर यानें नाटयावर कोरडे ओढल्यापासून नाटयावरून लोकांचें मन उतरलें होतें. आणि तीहि गोष्ट लोकांस कादंबरीची आवश्यकता भासविण्यास कारणीभूत झाली. टॅट्लर व स्पेक्टेटर या साप्ताहिकांनीं कादंबरीची भूमिका तयार केली होती. फ्रान्समध्यें या सुमारास कादंबरीवाङ्मयाचा बराच प्रसार झाला होता, आणि त्यामुळें जेव्हां सॅम्युएल रिचर्डसन (इ. स. १६८९-१७६२) यानें आपल्या पामेला व क्लॅरिसा या सुप्रसिध्द कादंबऱ्या लिहिल्या, तेव्हां त्यानें कादंबरीलेखनाची कला नवीन शोधून काढली असें म्हणण्यापेक्षां त्यानें ती इंग्लंडामध्यें नवीन आणली असें म्हणणें अधिक सयुक्तिक होईल.

फील्डिंगः - रिचर्डसन हेन्री फील्डिंग (इ. स. १७०७-१७५४) यांच्या परस्परविरोधी झुंजेमुळें इंग्लंडांतील कादंबरीवाङ्मयाची बऱ्याच जोरानें भरभराट झाली. पातिव्रत्य व सद्गुण यांच्यावर विशेष कटाक्ष असल्यामुळें रिचर्डसनच्या कादंबऱ्यांतून नीर्ताचे विशेष स्तोम माजविण्यांत आलें होतें. त्यानंतर जेव्हां फील्डिंगच्या लिहिण्यांत नैतिक बाबीसंबंधी बेपर्वाई दिसूं लागली, तेव्हां तत्कालीन वाचकांस ती एक प्रकारची सुधारणाच झाली असें वाटूं लागलें. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे रिचर्डसन व फील्डिंग यांच्या लिहिण्याच्या दिशा अगदीं विरुध्द असल्यामुळें त्यांच्या कादंबऱ्यांतून इंग्रज लोकांच्या चारित्र्यांतील अगदीं परस्परविरुध्द बाजू वाचकांच्या नजरेस पडतात. फील्डिंग हा राजपक्षीस तर रिचर्डसन प्रजापक्षीय होता. फील्डिंग हा साधा सद्गृहस्थ, तर रिचर्डसन व्यापारी होता. फील्डिंग हा नागरिकांचा, तर रिचर्डसन हा खेडवळ लोकांचा प्रतिनिधि होता. रिचर्डसनच्या ठिकाणीं अवलोकनाची उत्कृष्ट कला व बुध्दिमत्तेची तीव्रता होती परंतु फील्डिंगच्या ग्रंथांतून जी विनोदाची रेलचेल व जे लेखनचातुर्य दिसून येतें ते रिचर्डसनमध्यें नव्हतें. साधारणपणें इंग्रज लेखकांत दिसून न येणारा दृष्टीचा व्यापकपणा व सूक्ष्मपणा, प्राचीन पध्दतीची संस्कृति आणि फ्रेंच तऱ्हेची औपरोधिक लेखनपध्दति हे सर्व गुण फील्डिंगमध्यें एकवटलेले दृष्टीस पडतात. स्त्रीचरित्राचें यथार्थ वर्णन करण्याची हातोटी ज्याप्रमाणें रिचर्डसनला किंवा विदूषकी विनोद करण्याची कला ज्याप्रमाणें स्मॉलेटला साधली होती, त्याप्रमाणें ती फील्डिंगला साधली नव्हती. फील्डिंगच्या ठिकाणीं काव्यस्फूर्तीचा अभाव होता. परंतु सदभिरुची, सुसंस्कृति, व्यवस्थितपणा, उल्हसितपणा, विनोद, मर्मभेदक उपरोध आणि सार्वत्रिक तारतम्यभाव इत्यादि जे गुण नाणावलेल्या गद्यलेखकांत अवश्य दृष्टीस पडतात ते सर्व फील्डिंगमध्यें होते. त्याची ''टॉम जोन्स'' नांवाची उत्कृष्ट कादंबरी सुरुवातीच्या इंग्रजी कादंबरी वाङ्मयांत अग्रगण्य होती.

स्मॉलेटः - फील्डिंगपेक्षांहि स्मॉलेटनें प्रपंचांतील पुष्कळ वादळें पाहिलीं होतीं. त्यानें आपल्या ''रॉडरिक रँडम'' नांवाच्या कादंबरींत खालच्या वर्गाची स्थिति वर्णिली आहे.

स्ट र्नः - लॉरेन्स स्टर्न हा चवथा आद्य कादंबरीकार होऊन गेला. तो जुन्या पध्दतीचा व विनोदी होता. फील्डिंग व स्मॉलेट यांनीं जरी डॉन क्विक्झोट व फ्रेंच कादंबरीकार यांची बरीच मदत घेतली होती तरी त्याचबरोबर त्यांनीं प्रत्यक्ष व्यवहाराचेंहि बरेंच अवलोकन केलें होतें. परंतु स्टर्नची गोष्ट निराळी होती. त्याची लेखनपध्दति कृत्रिम होती. त्याचें पुष्कळसें ज्ञान पुस्तकी होतें आणि त्याच्या लिहिण्यांत तऱ्हेवाईकपणाचा बराच भाग होता.

येणेंप्रमाणें रिचर्डसन, फील्डिंग, स्मॉलेट व स्टर्न या चार लेखकांनीं प्रथम कादंबरीवाङ्मयाची जमीन उत्तम रीतीनें सुपीक करून ठेवली. रिचर्डसनच्या हयातींतच उत्तम कादंबरीकार म्हणून त्याची सर्व यूरोपभर ख्याती झाली होती. स्टर्न यानें पुढें झालेल्या कादंबरीकारांस एका नवीन लेखनपध्दतीचा धडा घालून दिला.

जॉनसन. - अठराव्या शतकाच्या मध्यकालांत कादंबरीकारोव्यतिरिक्त इतरहि अनेक गद्य ग्रंथकार होऊन गेले. या इतर लेखकांत डॉ. जॉनसन, ऑलिव्हर गोल्डस्मिथ, लॉर्ड चेस्टरफील्ड, व हॉरेस वॉलपोल हे प्रमुख होते. या लेखकांपैकीं एक डॉ. जानसन वजा करून बाकीच्या लेखकांच्या ग्रंथांत तत्कालीन फ्रेंच लेखनशैलीचा सुबोधपणा उतरला होता. चेस्टरफील्ड व वॉलपोल हे दोघे तर यूरोपखंडाचें त्यावेळचें ज्ञान व भावना यांच्याशीं परिचित असलेले व अमीरउमरावांच्या राहाणीचा अनुभव असलेले लेखक होते. जॉनसन हा एकटाच केवळ इंग्रजी पध्दतीनें विचार करणारा व लिहिणारा होता. त्याचें इंग्लंडाबाहेरील जगाचें ज्ञान पुस्तकांतून मिळविलेलें होतं. तो जाडा विद्वान असून नीतीचें व धर्माचें उत्तम विवेचन करणाराहि होता. त्याची लेखनशैली टेलर, बॅरो व साउदे यांच्या पध्दतीची होती. तींतील वाक्यरचना क्लिष्ट असून, जागोंजाग भाषेचे चढउतार आहेत. शिवाय इंग्लिश व लॅटिन भाषेंतील समतोल मिश्रणहि तिच्यांत आहे. अॅडिसन व बोलिंगब्रोक यांच्याहि लेखनाचा परिणाम कोठें कोठें दृष्टीस पडतो. जॉनसनला निबंध, औपरोधिक कविता व नीतिपर गोष्टी (उ. रासेलस) यांची फार आवड होती परंतु त्या कामाला जी कल्पकता लागते ती त्याच्यांत नसल्याकारणानें तो उत्कृष्ट चरित्रकार व टीकाकार म्हणून प्रसिध्द आहे. टीकाकार या दृष्टीनेंहि त्याचे ठिकाणीं स्वतंत्र कल्पनेचा अभाव दृष्टीस पडतो. तो अधिकारी लेखकांचाच बहुधा अनुवाद करतो. उदाहरणार्थ टीका कशी असावी या विषयीं ड्रायडन, रॅपिन, बॉइलू, ली बॉसू, रायमर, डेनिस, पोप इत्यादि टीकाकारांनीं प्राचीन ग्रंथकारांपासून जे नियम काढले ते प्रमाण मानून ते सर्वथैव योग्य होत असें तो मानीत असे. त्याची टीका नेहमीं व्यवस्थित होती परंतु टीका करतांना वाचकांची खात्री पटवून देण्याऐवजीं तो आपलीं मतें फक्त ठासून प्रतिपादन करीत असे. त्याचे टीकात्मक ग्रंथ वाचतांना त्यानें त्यांत काढलेल्या अनुमानांचा आपल्यावर परिणाम होत नसून आपलें सारें लक्ष मानवी जीवनचरित्रावरील त्याच्या संयुक्तिक कोटिक्रमानें व वाङ्मयप्रदेशांतील त्याच्या मार्मिक विचारसरणीनें वेधलें जातें. जॉनसनचे लेख उत्कृष्ट असत व त्याच्या कल्पनाहि मननीय होत्या. परंतु चारित्र्य व संभाषणपध्दति, अगाध ज्ञान व अचाट स्मरणशक्ति हे त्याचे गुण लोकोत्तर होते. या लोकोत्तर गुणामुळें त्या काळीं लोक त्याला अद्वितीय मानीत असतच, परंतु त्यामुळेंच त्याला जेम्स बॉसवेल सारखा चतुर, चाणाक्ष व दीर्घोद्योगी चरित्रकार मिळाला. बॉसवेलनें जॉनसनचें स्वभावचित्र इतकें साद्यंत व हुबेहूब रेखाटलें आहे कीं, तसें आजपर्यंत कोणत्याहि इतर देशांत व काळांत पाहावयास सांपडत नाहीं. जॉनसननें कादंबरी किंवा गोष्ट लिहिण्याचा एकवेळच प्रयत्न करून रासेलस हा ग्रंथ प्रसिध्द केला. रासेलसमध्यें विनोदाचा, पात्रांच्या विविधतेचा किंवा मनोरंजकपणाचा भाग नसल्याकारणानें त्यांतील संविधानक म्हणजे मानवी आशा व आकांक्षा यांच्या फोलपणावर रचलेलें एक लांबलचक पुराणच झालें आहे. तथापि त्या पुस्तकांत कांहीं निराळेपणा असल्यामुळें त्यास वाङ्मयांत कायमचें स्थान आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. याचें मराठींत चिपळोणकरांनीं केलेलें भाषांतर फारच सुंदर आहे.

गोल्डस्मिथ. - डॉ. जान्सनमध्यें ज्या गुणांचा पूर्ण अभाव होता ते ऑलिव्हर गोल्डस्मिथच्या ठिकाणीं पूर्णत्त्वानें वास करीत होते. त्याच्या लेखनपध्दतींत अठराव्या शतकाच्या वाङ्मयांतील विशदपणा, साधेपणा व सुबक आणि अस्खलित प्रवाह इत्यादि गुणांचा संपूर्ण विकास झालेला होता. नाटककार, कादंबरीकार व निबंधकार यांपैकीं कोणत्याहि दृष्टीनें जरी गोल्डस्मिथच्या ग्रंथाकडे पाहिलें तरी त्यांतील मजकूर अगदींच किरकोळ व नेहमीच्या व्यवहारांतला आहे. तो मजकूर घेऊन जर दुसऱ्या कोणी ग्रंथरचना केली असती तर ती कवडीमोल व कुचकामाची झाली असती यांत तिळप्राय शंका नाहीं. जेव्हां जेव्हां गोल्डस्थिम मानवी जीवनक्रमाविषयीं लिहितो तेव्हां तेव्हां त्याच्या अल्पस्वल्प वर्णनांतहि विनोद व संगतवार नैतिक विचारसरणी दृष्टीस पडते. गोल्डस्मिथचीं संविधानकें आयरिश आहेत. टीका करण्याची पध्दत जरी त्यानें फ्रेंचापासून घेतली होती तरी तिच्यांत जॉनसन, रेनॉल्ड्स व बर्क यांच्या धाटणीचीहि छटा दिसून येते. त्याची गद्यलेखनपध्दति म्हणजे पूर्णावस्थेस गेलेली अॅडिसनची लेखनपध्दतीच होय. त्याची ग्रंथरचना विविधप्रकारची आहे. त्याच्या व जॉनसनच्या विविध ग्रंथरचनेचा व इतर गुणांचा विचार केला म्हणजे ते प्रतिकूल परिस्थितींत आपल्या उदरनिर्वाहाकरितां लेखनव्यवसाय करणारे लेखक होते या गोष्टीची आठवण झाल्यावाचूंन रहात नाहीं.

इ. स. १७४० पासून इ. स. १७६० पर्यंत पूर्वीच्या पेक्षां निराळया परिस्थितींत गद्यग्रंथरचनेचें काम झालें. इ. स. १७१८ मध्यें लेडी मेरी वार्टले माँटेग्यू हिचीं पत्रें प्रसिध्द झालीं. त्यानंतर दहा वर्षांनीं लॉर्ड हार्वेनें लिहिलेली दुसऱ्या जॉर्जच्या कारकीर्दीची हकीकत बाहेर पडली. इ. स. १७४० मध्यें लॉर्ड चेस्टरफील्ड व हॉरेस वॉलपोल या दोघांनीं आपली अप्रतिम पत्रमाला रचण्याचें काम सुरू केलें. हे सर्व लेख जरी मूळ प्रसिध्द करण्याच्या हेतूनें लिहिले नव्हते तरी त्यांवरून चटकदार वर्णन करण्याच्या बाबतींत इंग्रजी गद्यलेखनपध्दतीची वाढ किती झपाटयानें होत चालली होती हें दिसून येतें. सदर पत्रांच्या वाचनानें वाचकांचें मनोरंजन होऊन त्यांस व्यापकज्ञान व जगाच्या व्यवहारांची सार्वत्रिक माहिती होण्यासारखी आहे त्यांत काव्यात्मक किंवा कल्पनात्मक भाग कमी असला तरी लौकिक व्यवहारांची संपूर्ण बाजू दिलेली आहे. लॉर्ड चेस्टरफील्डे आपल्या मुलाला व नातवाला लिहिलेल्या पत्रांतील सफाईदार लेखनशैली, उपरोध व विनोद हे इंग्रजी गद्यवाङ्मयांत प्रथमच पहावयास सांपडतात. चालीरीती व सामाजिक सौजन्य हे चेस्टरफील्डच्या लेखनाचे विषय असल्यामुळें त्याच्या भाषेंत ठाकठीकपणा, व्यस्थितपणा, नीटनेटकेपणा, खुबीदारपणा वगैरे प्रामुख्यानें दिसून येतात. हॉरेस वॉलपोलची लेखनपध्दति अतिशय व्यावहारिक, तऱ्हेवाईक व झोंबरणारी अशी आहे.

ग्रं थ क र्तृ त्वा ची वा ढ. - जॉनसनच्या वेळी ग्रंथरचनेचे अनेक प्रकार अस्तित्त्वांत आले.चरित्रकार या दृष्टीनें बॉसवेलनें आपलें नांव अजरामर करून ठेवलें. अॅडॅमस्मिथनें ''दि वेल्थ ऑफ नेशन्स'' हा ग्रंथ लिहून अर्थशास्त्राचा पाया घातला. सर जोशिया रेनॉल्डस यानें आपल्या ''फिफ्टीन डिस्कोर्सेस'' या ग्रंथांत कलेसंबंधी तात्त्वि विचार प्रथमच प्रसिध्द केले.  रॉबर्टसन व गिबन यांनीं ऐतिहासिक तत्त्वज्ञानाच्या ग्रंथरचनेचा नवीन प्रकार शोधून काढला यावरून हल्ली प्रचारांत असलेलीं वाङ्मयाचीं सर्व अंगें जॉनसनच्या वेळीं उगम पावलीं असें म्हणावयास हरकत नाहीं.

इ ति हा स का र. - क्लॅरेन्डन व बर्नेट यांनीं आपल्या वेळचे इतिहास लिहून ठेवले आहेत. हे दोघे लोकप्रिय आहेत; तथापि क्लॅरेन्डनचा इतिहास गद्यभाषापध्दतीच्या दृष्टीनेंहि वाखाणण्यासारखा आहे. इ. स. १७३५ त बोलिंगब्रोक यानें इतिहास या विषयाचें नैतिक, राजकीय व तात्त्विक दृष्टीनें जें विवेचन केलें तें संस्मरणीय आहे. तथापि अठरावें शतक अर्धे अधिक उलटून जाईपर्यंत ऐतिहासिक पुनर्रचनेच्या दृष्टीनें इंग्लंडचें वाङ्मय फ्रान्स, इटली व जर्मनी या देशांतील वाङ्मयाच्या मागें होतें. ह्यूमनें आपल्या ''हिस्टरी ऑफ इंग्लंड'' या ग्रंथाचा पहिला खंड इ. स. १७५४ मध्यें  प्रसिध्द केला. रॉबर्टसनचा ''हिस्टरी ऑफ इंग्लंड'' हा ग्रंथ इ. स. १७५९ त व ''चार्लस पांचवा'' हा इ. स. १७६९ त बाहेर पडला. गिबनचा ''डिक्लाइन अँड फॉल ऑफ दि रोमन एंपायर'' हा इ. स. १७७६ त प्रसिध्द झाला. एडवर्ग गिबन हा इतिहासकार या दृष्टीनें जरी ह्यूम व रॉबर्टसन यांप्रमाणेंच आशावादी होता तरी त्याची भारदस्त भाषासरणी आपल्या विषयावरील एकाग्र भक्ति, दीर्घ परिश्रम व चिकित्सक बुध्दि या सद्गुणांनी त्याची कृति संस्मरणीय झाली आहे.

धर्म विचारांतहि क्रांति होऊन स्वतंत्र विचाराचे लखेक मूळ धर्मशासत्र ग्रंथावर हल्ले चढवूं लागले होते. परंतु या सुमारास धार्मिक व राजकीय विषयांत पुराणमताचा अभिमानी, पूर्वीपासून चालत आलेल्या अलिखित शासन घटनेचा चहाता व भावनाप्रधान गद्यलेखनांत निष्णात असलेला एडमंड बर्क हा उदयास आला.

कौपर, वुइल्यम ब्लेक व रॉबर्ट बर्न्स. - या सुमारास लोकांचा दृष्टिकोन बदलला होता. त्यांस कृत्रिमपणाचा वीट येऊन नैसर्गिक व साहजिकपणा विशेष आवडूं लागला. पोपच्या निधनानंतर थोडयाच दिवसांत ग्रे, वार्टन हर्ड इत्यादि कवि त्याचा श्रेष्ठपणा नाकबूल करून अठराव्या शतकाच्या वाङ्मयांत दृष्टीस पडणारी सदभिरुचि व प्रबुध्द विचारसरणी यांच्यापेक्षां कल्पना व प्रतिभा यांची किंमत अधिक मानूं लागले. वुइल्यम कौपर, वुइल्यम ब्लेक व रॉबर्ट बर्न्स हे या वेळचे इंग्लंडांतले प्रमुख पण परस्पर भिन्न कवि होते. कौपरच्या काव्यांत स्पष्ट व आनंदी कल्पनांचें मान फार कमी आहे. काव्यस्फूर्ति व कल्पनेच्या भराऱ्या यांचा तर त्याच्या काव्यांत मागमूसहि नाही. त्याची उत्कृष्ट कविता बहुतेक प्रासंगिक आहे व प्रासंगिक कवितेस लागणारे सारे गुण त्याच्या काव्यांत दृष्टीस पडतात. त्याच्या ग्रंथांत तात्कालीन संस्कृतीची त्वरित गति, सर्व भूतविषयक अनुकंपा, निसर्गसौंदर्याची आवड, गृहसौख्य, पशूंचें हक्क व ललितवाङ्मयांत सांपडणारे मोहक गुण इत्यादि गोष्टी दृष्टीस पडतात. अद्भुतरसात्मक काव्य पध्दतीचें पुनरुज्जीवन करणाऱ्या कवीमध्यें वुइल्यम ब्लेक यास आद्यस्थान दिलें पाहिजे. इलिझाबेथन युगांत प्रचलित असलेली वीणाकाव्यपध्दति कोलरिजच्या पूर्वी प्रथम त्यानेंच उचलली. त्याचीं ''साँग्ज ऑफ इनोसन्स'' व ''साँग्ज ऑफ एक्स्पीरिअन्स'' हीं गाण्याला फारच सोयीचीं आहेत. परंतु या काळचा पल्यिा प्रतीचा प्रतिभासंपन्न कवि म्हटला म्हणजे रॉबर्ट बर्न्स हा होय. फिरत्या किनरीवाल्यास गाणीं रचून देणाऱ्या व राष्ट्रगीतें व देशभक्तिपर कवनें रचणाऱ्या त्याच्या देशांतील इतर सर्व कवींमध्यें बर्न्स हा श्रेष्ठ होता. तथापि बर्न्सची एकंदर अवस्था अनुकंपनीय होती. त्याची काव्यप्रतिभा त्याच्या ग्रंथांतून मधून मधून डोकावते परंतु तिचें पूर्ण अविष्करण होण्यास अवसर मिळाला नाहीं. संपूर्ण शिक्षण, योग्य फुरसत, दीर्घ परिश्रम व दीर्घायुष्य यांपैकीं एकहि त्याच्या वांटयास आलें नाहीं. त्याच्या कविता जरी प्रासंगिक खंडमय व शीर्घ कवितेच्या जातीच्या आहेत तरी त्यात काव्यप्रतिभेचें खरें नाणें आहे. त्याचें अवलोकन बिनचूक आहे, त्याचा विनोद प्रगल्भ आहे व त्याची बुध्दि कुशाग्र व विपुल आहे. स्वातंत्र्य व राज्यक्रांति याविषयींच्या तात्त्विक विचारांची तो फारशी पर्वा करीत नाहीं. तथापि तो देशभक्त होता व सामाजिक प्रतिष्ठेचा व श्रीमंतीचा मनापासून तिटकारा करणारा होता.

ए को णि सा वें श त क. - वरील विवेचनावरून वाचकांच्या लक्षांत आलें असेल कीं अठराव्या शतकांत निरनिराळया प्रकारच्या काव्यरचनेचे प्रयोग करण्यांत आले असून त्यांत निसर्गाच्या अध्ययनाचा व वर्णनाचाहि भाग आला होता. तथापि त्या काळच्या कवितेचें मुख्य स्वरूप म्हटलें म्हणजे औपरोधिक व वर्णनपर होतें.

एकोणिसाव्या शतकांतील काव्यरचनेला मुख्य वळण वर्ड्स्वर्थादि कविमंडळानें लावलें. प्रचारांतील साधी व सरळ भाषा वापरणें हें वर्डस्वर्थचें ध्येय होतें. शिवाय निसर्गानें मनुष्याचा विकास होतो अशी त्याची कल्पना असल्यामळें पर्वताची विविक्तता, धबधब्याची मुखरता व मेघ आणि वायु यांचें उच्च स्थान अपणांस प्राप्त व्हावें असें त्यास वाटूं लागलें आणि अशा रीतीनें तो अखेर ईश्वरमयत्व वाद प्रतिपादन करू लागला. मोठाल्या शहराच्या कोंदट वातावरणांत राहणाऱ्या सुशिक्षित लोकांस हे वर्ड्सवर्थचें निसर्गविषयक विचार पूर्वीच्या कृत्रिम गोपगीतांपेक्षां अधिक पसंत पडूं लागले. अनेक प्रसंगांनी नटवलेल्या व अतिशयोक्तीनें भरलेल्या ठराविक पध्दतीच्या काव्यरचनेपेक्षां मानवी विकारांच्या साध्या कहाणीचें यथाबध्दस्तुवर्णन करणारी कविता अधिक श्रेष्ठ होय असें वर्डस्वर्थचें म्हणणें होतें. परंतु त्याचें म्हणणें उचलून धरण्याला व त्याचा पुरस्कार करण्याला जर कोलरिज सारखा प्रतिभा संपन्न जोडीदार पुढें आला नसता तर तें जागच्या जागींच राहिलें असतें.

कोलरिज. - भावनाप्रधान्य, कल्पकता, साधेपणा व गूढार्थप्रतिपादन इत्यादि. जे गुण उत्तम कवींमध्यें असावयास पाहिजेत ते सर्व कोलरिजमध्यें होते. ''दि राइम ऑफ दि एन्शन्ट मरीनर'', ''क्रिस्टाबेल'', ''कुब्लाखान'' हीं त्याची तीन स्फुट काव्यें उत्तम काव्यांत गणण्यासाखीं आहेत असें तज्ज्ञाचें मत आहे. ड्रायडन व पोप याच्या पूर्वकालीन कवींचा जो कोलरिजवर इतका पगडा बसला तों त्याचा मित्र जो चार्लस लँब याच्या संगतीचा परिणाम होय. त्या पूर्वकालीन कवींच्या कल्पनासौंदर्याविषयीं लँबनें जी गुणग्राहकता दाखविली आहे त्यावरूनच त्याच्या ठिकाणीं काव्यप्रतिभा किती उच्च दर्जाची होती हें कळून येते, आणि काव्यांत कल्पना व संगीत याचें किती महत्त्व आहे हें संभाषणांनीं, पत्रांनीं, ग्रंथांतील निवडक वेच्यांनीं आणि निबंधानीं त्यानें इ. स. १८०० या वर्षी कल्पक बुध्दीच्या लोखकांवर इतकें उत्कृष्ट बिंबविलें आहे कीं, त्या योगानें त्यानें त्यावेळच्या काव्याच्या सौन्दर्यकल्पनेंत जवळ जवळ क्रान्ति घडवून आणली. लँबच्या वाङ्मयविषयक कल्पना काय होत्या हें त्याच्या ''ऐसज ऑफ एलिआ'' या ग्रंथांवरून कळून येण्यासारखें आहे. लँब व त्याचा मोठा प्रतिस्पर्धी वुइल्यम हॅझलिट या दोघां लेखकांच्या मतानें टीका करणें हें विद्वत्तेचे किंवा तुलनात्मक विचारसरणीचें किंवा न्यायबुध्दीचें काम नसून कल्पनेचें आहे.

हॅझलिट. - हॅझलिट हा उत्तम निबंधकार व टीकाकार होता. त्याला कृत्रिमपणाचा तिटकारा होता. त्याची लेखन पध्दति जवळ जवळ बर्कच्या वत्कृत्वपूर्ण भाषणपध्दतीप्रमाणें आहे.

लीहंट व डिक्विन्से. - ली हंट हा स्वतः कांही मोठा लेखक नव्हता. परंतु दुसऱ्यांस मोठे ग्रंथकार करण्याला तो कारणीभूत झाला. मिल्टनची उदात्त व गंभीर भाषासरणी डिक्विन्सेच्या ग्रंथांतून सांपडते.

कीट्स -जॉन कीट्स (इ. स. १७९५-१८२१) हा शेलेंपेक्षा तीन वर्षांनीं लहान होता. तो तत्कालीन कवींमध्यें अत्यंत काव्यरचनाकुशल होता आणि पंचवीसाव्या वर्षी जर त्याच्या आयुष्याची दोरी एकाएकी तुटली नसती तर तो सर्व कवींमध्यें अग्रगण्य झाला असता. बायरनचें काव्य नेहमीं आत्मपर असे, वर्डस्वर्थ हा आत्म महत्त्वाच्या दृष्टीनें विश्वाकडे पहाणारा होता, कोलरिज तत्त्वज्ञानी होता व शेले हा बौध्दिक सौंदर्याची महती गाणारा होता; परंतु ज्याचें काव्य वाचीत असतां वाचकांचें लक्ष कवीकडे न जातां काव्यविषयांत गुंतून रहातें असा कीट्स हा एकच कवि होऊन गेला. त्याच्या अकाली मरणानें इंग्रजी वाङ्मयाचें फार नुकसान झालें.

शेले. - पी. बी. शेले हा बायरनचा सहचारी होता, परंतु त्या दोघांच्या अध्यात्म विचारांत महदंतर होतें. बुध्दिप्रामाण्यवादी त्याचा तिरस्कार करींत आणि तत्कालीन कवी त्यांचा मत्सर करण्याऐवजीं कीव करीत असत. आतां ज्या प्रमाणें त्याचे ग्रंथ वाचणारा व ते वाचून उत्कृष्ट कृति म्हणून त्यास मान देणारा सामान्य वाचक वर्ग आहे तसा त्याच्या वेळेस तयार झालेला नसल्यामुळें तो आपलीं काव्यें फक्त कवीकरतांच लिहीत असे. त्याच्या काव्यांतील कल्पनांचे सौंदर्य अप्रतिम आहे. त्याच्या काव्यांत मानवी स्वभाव वर्णनपर भाग नसतो ही मोठी उणीव आहे. तो नेहमी कल्पनासृष्टींत संचार करणारा कवि होता.

लॉर्ड बायरनः - लॉर्ड बायरन हा जितका प्रथम लोकप्रिय तितकाच पुढें अप्रिय झाला. बायरनचीं काव्यें मुख्यत्वेंकरून ऐतिहासिक व टीकात्मक आहेत. त्याच्या काव्यांत कीट्सच्या सन्दर भावना, शेलेचे पारमार्थिक विचार किंवा वर्ड्स्वर्थच्या निसर्गविषयक कल्पना दृष्टीस पडत नाहींत. त्याच्या काव्यांतील शीघ्रकवित्वाचे दोष पाहून कांही वेळां वाचकांच्या मनाचा विरस होतो. एकदां लिहिलेल्या कविता सफाईदार करण्याचा तो प्रयत्न करीत नसे मी ''वाघासारखा आहे, माझी पहिली झांप चुकली तर मी गुरगुरत जंगलांत निघून जाईन'' अशा प्रकारची त्याच्या मनाची ठेवण होती. त्याची काव्यरचना जोरदार व तेजस्वी आहे. परंतु त्याला गूढ विचारांची जोड नाहीं. इंग्लंडपेक्षां यूरोपांतील इतर देशांत बायरनला मोठा मान देत असत.

स्कॉटः - सर वाल्टर स्कॉटची कविता अगदीं पहिल्या प्रतीची नाहीं. मनन व निदिघ्यास करण्यासारखी ती नसून पाठ करण्यास सोयीची आहे. त्याचे गद्यग्रंथहि मोठेसे नांवाजण्यासारखे नाहींत. त्याच्या अवाढव्य ग्रंथविस्ताराच व त्याच्या बुध्दिमत्तेच्या विविधतेचा विचार केला म्हणजे मात्र वाङ्मयक्षेत्रांत त्याला अगदीं शेक्सपिअरच्या शेजारींच न बसविलें तरी तो आपल्या काळांत सर्वांत श्रेष्ठ होता असें म्हणणें प्राप्त होतें. पूर्ण वीस वर्षे अहोरात्र परिश्रम करून त्यानें आपल्या मस्तकांत सर्व साधनसामुग्रीचा संच करून ठेवला असल्यामुळें त्याला इतकें जलद लिहितां येत असे. स्कॉटच्या ग्रंथांत पुराणमतांचे व अद्भुत विचारांचें मिश्रण झालेले दृष्टीस पडतें. त्याला इतिहासाची फार आवड असल्यामुळें त्याच्या मनाचा ओढा पुराणमताकडे होता.

जेन ऑस्टीन वगैरेः - कादंबरीकार या दृष्टीनें जेन ऑस्टीनची योग्यता फार मोठी आहे. औपरोधिक भाष वापरण्याच्या बाबतींत तर तिचा हातखंडा होता आणि तिची संविधानकें हीं ठाकठिकीचीं व मनोरंजक आहेत. तिच्या नंतर थॉमस लव्ह पीकॉक (१७८५-१८६६) हा प्रख्यात कादंबरीकार होऊन गेला. तो जाडा विद्वान होता व त्याच्या लेखनपध्दतीचा त्याचा जावई जॉर्ज मेरिडिथ (१८२८-१९०९) याच्यावर बराच परिणाम झाला.

व्हि क्टो रि अ न वा ङ्म य यु ग. - सर्व इंग्रजी वाङ्मयांत हें व्हिक्टोरिया राणीचें युग बौध्दिक संपत्तीच्या बाबतींत अधिक विविध स्वरूपाचें आहे. वाङ्मयाच्या अभिवृध्दीला सर्वस्वी अनुकूल अशी सदर राणीच्या कारकीर्दीतील परिस्थिति कोणत्याहि काळांत कोणत्याहि देशाच्या वांटयाला आली नसेल. या युगांत मानवी ज्ञानाचें व सामर्थ्याचें क्षेत्र जसजसें वाढत गेलें तसतसें तें वाङ्मयाला परिपोषकच होत गेलें. या युगांतील लेखकांचें प्रचंड ग्रंथलेखन पाहून मन गोंधळून जातें. दोन तीन पुस्तकें लिहून त्याच्या मनाची शांति होत नसल्यामुळें प्रत्येकानें आपला एक भला मोठा ग्रंथसमूहच लिहून ठेवलेला आहे. ''ख्रिस्ती धर्म ग्रंथ'' किंवा ''शेक्सपिअरचे समग्र ग्रंथ'' याच्या वीसपट तरी कार्लाइल, रस्किन, फ्रौडे, डिकन्स, थॅकरे, न्यूमन, स्पेन्सर, ट्रोलोप यापैकीं प्रत्येकाचा ग्रंथविस्तार आहे. इतके ग्रंथ वाचण्याला वाचक वर्गहि तितक्याच प्रमाणांत वाढत गेला. कारण मध्यम वर्गांतील लोकामध्यें या काळीं वाचनाची इच्छा बऱ्याच झपाटयानें वाढली.

डिकन्सः - चार्लस डिक्सन (इ. स. १८१२-१८७०) हा एका गरीब कारकुनाचा मुलगा होता. तो स्वयंशिक्षित असूनहि त्यानें आपल्या स्वतःस तत्कालीन वाङ्मयेतिहासांत अग्रस्थान मिळविलें. डिकन्सनें ग्रंथरचनेचे नियम मोडले, त्याच्या ग्रंथांत कांहीं ठिकाणीं असंबध्दता दृष्टीस पडते व कांहीं बाबतींत योग्य मर्यादेचें अतिक्रमणहि केलेलें आहे, तथापि, त्याचे विनोदी ग्रंथ वाचून वाचकांचें मनोरंजन तथापि, त्याचे विनोदी ग्रंथ वाचून वाचकांचें मनोरंजन झाल्यावांचून रहात नाहीं.

थॅकरेः - वुइल्यम मेकपीस थॅकरे (१८११/१८६३) याच्या कादंबऱ्या डिकन्सपेक्षांहि अधिक ऐतिहासिक आहेत आणि त्यांतील बहुतेक प्रमुख पात्रांच्या वंशावळीहि त्यानें दिलेल्या आहेत. इ. स. १८४८ त जेव्हां थॅकरेनें ''व्हॅनिटी फेअर'' ही आपली कादंबरी लिहिली आणि त्या योगानें त्याची चहूंकडे कीर्ति झाली, तेव्हां ''डेव्हिड कॉपरफील्ड'' व ''ग्रेट एक्स्पेक्टेशन्स'' या दोन कादंबऱ्यांखेरीज करून डिकन्सच्या बहुतेक मोठाल्या कादंबऱ्या प्रसिध्द झाल्या होत्या. थॅकरेनें बहुतेक डिकन्सचेच धार्मिक, नैतिक व राजकीय विचार उचलले होते. परंतु त्यानें डिकन्सचा नाटकीपणाचा दुर्गुण मात्र आपल्या कृतींत येऊं दिला नाहीं. त्याची लेखनपध्दतीहि प्रशंसनीय आहे. थॅकरे हा वसुधैव. कुटुंबवृत्तीचा होता, परंतु डिकन्सची दृष्टि लंडनच्या चतुःसीमेपलीकडे गेली नाहीं. एखाद्या विषयावर टीका, त्याचें स्पष्टीकरण किंवा त्याचें विवेचन करण्यास लागणारा संथपणा व गंभीरपणा थॅकरेच्या ठिकाणीं होता परंतु डिकन्सचा स्वभाव अत्यंत विनोदी असल्यामुळें त्याजकडून असलीं कामें होणें शक्य नव्हतें. शिवाय डिकन्सपेक्षां थॅकरेमध्यें विविधगुणसंपन्नता अधिक होती, कारण तो केवळ कादंबरीकार नसून प्रबंधकार, निबंधकार, इतिहासकार व टीकाकारहि होता.

शार्लट ब्राँटी. - (इ. स. १८१६ ते १८५५) शार्लट ब्राँटीची मुख्य कल्पना अशी होती कीं, स्त्रीपुरुषांचें परस्परांसंबंधी उत्कट प्रेम हें फार पवित्र असून जगांतील अतिशय श्रेष्ठ दर्जाचा आयुष्यक्रम, जोम व आनंद यांस तें कारणीभूत होतें. जॉर्ज इलिअट हिचें (इ. स. १८१९ ते १८८०) मत याच्या अगदीं उलट होतें. तिच्या मतानें तसल्या उत्कट प्रेमांत अंध व कठोर स्वार्थीपणाशिवाय दुसरें कांहीं नसतें. या दोन स्त्री-कादंबरीकारानंतर मिसेस गॅसकिल, किंग्सले, ट्रोलोप, रीड, मेरिडिथ, हार्डी इत्यादि अनेक कादंबरीकार झाले.

टेनिसनः - ज्याप्रमाणें व्हिक्टोरिअन युगामध्यें डिकन्स सारखा उत्कृष्ट कादंबरीकर झाला, त्याचप्रमाणें टेनिसन सारखा उत्कृष्ट कवीहि निर्माण झाला. डौलदार व हुबेहुब वर्णनाच्या गुणाला काव्यरचनाचातुर्याच्या इतर गुणांची जोड देऊन टेनिसननें वीणाकाव्य व लघुकाव्य या जातींचीं उत्कृष्ट काव्यें लिहिण्यास सुरवात केली. आणि आरंभींच्या काव्यांवर झालेल्या टीकेच्या सहाय्यानें आपल्या पुढल्या कृतींत सुधारणा करतां करतां ''दि लोटस ईटर्स'', ''दि ड्रीम ऑफ फेअर वुमेन'' व ''मार्ट ड आर्थर'' या सारखीं सर्वोत्कृष्ट काव्यें त्यानें निर्माण केली. शिवाय तत्कालीन लोकांचीं मनें अस्वस्थ करण्यासारखे जे प्रश्न होते ते हातीं घेऊन त्यानें ते आपल्या ''इन मेमोरिअम'', ''दि प्रिन्सेस'' व ''मॉड'' या काव्यांतून उत्तम रीतीनें सोडविले आहेत.

ब्राउनिंगः - परमार्थाच्या बाबतींत पंगू असलेल्या वाचकांनां त्यांचा पंगूपणा घालविण्याच्या कामीं उपयोगी पडण्यासारखे ब्राउनिंगचे विचार होते. ब्राउनिंगचा मुख्य दोष इतकाच आहे कीं, त्याच्या अत्युकृष्ट कल्पनाहि पूर्णपणें विशद केलेल्या नाहींत. त्याचा जडवादी मतावर मोठा कटाक्ष आहे आणि विविध अडचणींतूनहि आपण आपला जीवनक्रम यशस्वी कसा करावा हे सांगण्याचा त्यानें प्रयत्न केला आहे. त्यानें मानवी चारित्र्य व हेतू यांचें जे विवेचन केलें आहे त्याचें बुध्दिवान लोकहि विचार व मनन करितात. ब्राउनिंगच्या कल्पना पुढें रस्किन, मॉरिस, सिमॉन्डस व पेटर या लेखकांच्या ग्रंथांतून प्रसार पावल्या.

आर्नोल्डः - टेनिसन व ब्राउनिंगनंतर तितक्याच योग्यतेचा असा कवि म्हणजे आर्नोल्ड हा होय. तो वर्डस्वर्थ संप्रदायाचा होता. मनुष्यांच्या इच्छा इहलोकी तृप्त होत नसल्यामुळें जी त्यांच्या मनाला एकप्रकारची रुखरुख वाटते तीस निसर्गासारखें दुसरें उपशामक औषध नाहीं असें त्यानें प्रतिपादन केलें आहे. त्याच्या काव्यांत एकप्रकारची उदासीनतेची झांक दृष्टीस पडते. आर्नोल्डच्या पश्चात् रॉझेटी, त्याची बहीण ख्रिस्तिना, वुइल्यम मॉरिस व स्विन्बर्न हे कवी होऊन गेले.

मेकॉलेः - अचाट स्मरणशक्ति, विलक्षण आत्मविश्वास आणि अप्रतीम भाषाप्रभुत्व इतक्या गोष्टींची अनुकूलता मेकॉलेस असल्यामुळें त्याचा इतिहासग्रंथ इतका अमूल्य असा झाला आहे. मेकालेमध्यें दोष इतकाच होता कीं तो आपलीं राजकीय मतें प्रस्थापित करण्याकडे इतिहासाचा उपयोग करून घेत असे आणि त्यामुळें त्याची इतिहासकार या दृष्टीनें किंमत बेताचीच आहे.

कार्लाईल व मेकॉलेः - आधिभौतिक ज्ञान व आधिभौतिक सामर्थ्य यांची त्या काळीं झालेली वाढ पाहून मेकालेस आनंदाच्या उकळया फुटत असत. आपल्या देशाचें वैभव, यांत्रिक कलेचें ज्ञान, विद्युत् व स्थलांतर करण्याचीं साधनें यांचें ज्ञान इत्यादिकांची प्रगति झालेली पाहून त्याचा आनंद गगनांत मावेनासा होई. पण कार्लाईल यास असल्या आधिभौतिक सामर्थ्याच्या वाढीचा तिटकारा होता. त्यानें सुधारलेल्या काळाची स्तुति करण्याऐवजीं कडक टीका केली आहे. कायदेकानू, सुधारणाकायदे व राजकीय प्रतिनिधिसभा वगैरेवर मेकाले याची फार फार भिस्त होती. परंतु कार्लाईल त्या सर्वांत सैतानी डाव म्हणत असे. बेन्थॅम व कॉब्डेन, भिल्ल व मेकॉले यांनीं त्यावेळीं आपल्या देशांचें वैभव व सुखसंपत्ति वाढविण्याचे जे प्रयत्न केले ते सर्व चुकीचे होते असें कार्लार्ललचें मत होते. त्याच्या मतानें त्यावेळीं सुधारणेचा अतिरेक झालेला होता, व त्याविरुध्द प्रतिक्रिया सुरू करणें त्यास अत्यंत अवश्य झालें होतें. इतिहासकार म्हणून कार्लाईलची आणि गिबन व मेकॉले यांची बरोबरीच्या नात्यानें तुलना करितां येणार नाहीं, परंतु त्याच्या भेदक दृष्टीमुळें चरित्रकार व आत्मचरित्रकार या नात्यानें त्याची कृति सरस वठली आहे.

वा ङ्म या ची न वी न दि शा. - इ. स. १८८१ मध्यें कार्लाइल व जॉर्ज इलिअट निवर्तल्यावर नवीन पध्दतीचे इतिहासकार, कादंबरीकार, टीकाकार व चरित्रकार निर्माण झाले.

इ ति हा स. - हा वेळपर्यंत मेकॉले, वकल व कर्लाईल यांनीं बदलेल्या परिस्थितीला अनुसरून आपले इतिहास लिहिले; परंतु या पुढील इतिहासकार देशाच्या इतिहासांत कोणकोणत्या क्रमानीं बदल होत गेले हे पाहून त्या क्रमांचा इतिहास ते लिहीत गेले. लेके, लॉर्ड अॅक्टन, क्रेटन, मोर्ले, ब्राइस यांनीं फक्त ऐतिहासिक निबंध लिहिले परंतु थोरोल्ड, रॉजर्स, स्टब्स, गार्डिनर व मेटलंड यांनीं देशाच्या इतिहासांत ज्या क्रमांनीं बदल होत गेले तसे त्यांचे इतिहास लिहिले. इ. स. १९०३ मध्यें प्रो. बेरी यांनीं आपल्या केंब्रिज येथील प्रास्ताविक भाषणांत इतिहास शास्त्रीय पध्दतीनेच लिहिला गेला पाहिजे असें प्रतिपादन केले आणि तेव्हांपासून इतिहाससंशोधनाच्या कामास बराच जोर मिळाला.

का दं ब री. - इ. स. १८८१ पासून कादंबरीच्या लेखन पध्दतींतहि क्रांति घडून आली. या क्रांतीच्या पूर्वी मेरिडिथ व हार्डी, विल्की कोलिन्स, अँटनी ट्रोलोप, बेझंट व राइस ब्लॅकमोर, वुइल्यम ब्लॅक आणि मिसेस लिन लिंटन, ऱ्होडा ब्रौटन, मिससे हेनरीवुड, मिस ब्रॅडन, मिससे हंफ्रे वार्ड इत्यादि स्त्रीकादंबरीकार यानीं कादंबरीलेखन पध्दतीचा एक कायमचा ठसा बसवून टाकला होता. हा ठसा हार्डीच्या कादंबऱ्यांतून तर दृष्टीस पडतोच परंतु तो जॉर्ज गिसिंग, जॉर्ज मूर, मार्क रुदरफोर्ड, एच. जी. वेल्स, आर्नोल्ड बेनेट व जॉन गोल्डस्वर्दी यांच्या कादंबऱ्यांतून विशेष स्पष्ट रीतीनें आढळून येतो. यानंतर स्टिव्हेन्सन प्रभृति कादंबरीकार उदयास येऊन त्यांनीं त्या पध्दतींत बदल घडवून आणला. स्व्हिेन्सननें अलकडील फ्रेंच पध्दतीच्या लहान लहान गोष्टी इंग्रजींत लिहिण्यास सुरुवात केली. या कामीं रुडियार्ड किप्लिंग यानें स्टिव्हेन्सनवर सरशी केली. या कामीं रुडियार्ड किप्लिंग यानें स्टिव्हेन्सनवर सरशी केली. याप्रमाणें कादंबरी लेखनपध्दतींत दुसऱ्याहि अनेक प्रकारचे बदल घडून आले.

टी का. - वाङ्मयाच्या इतर अंगाबरोबर टीका करण्याच्या पध्दतींतहि या काळीं बराच बदल घडून आला. लेस्ली स्टीफेन, स्टेन्टसबरी, स्टॉफोर्ड ब्रुक, ऑस्टिन डॉव्सन, कोर्ट होप, सिडने कॉल्व्हिन, वॅट्स डन्टन हे अलीकडचे परंतु जुन्या पध्दतीचे टीकाकार सर्व वाङ्मयावर आपलें टीकास्त्र सरसकट चालवीत. त्यांच्याहून नवीन पध्दतीच्या टीकाकारांची टीका करण्याची रीत निराळी आहे. पूर्वीच्या टीकाकारांप्रमाणें हे टीकाकार वाङ्मयाच्या निरुपयोगी भागांवर आपले सामर्थ्य खर्ची न घालतां त्यांतील जेवढा भाग उपयुक्त व ज्ञानाला पोषक असेल.तेवढयाकडे वाचकाचें लक्ष लावूण देण्याची खटपट करतात. या नवीन पध्दतीच्या टीकाकारांच्या श्रेणींत पॅटिसन व जेब, मायर्स, हटन, डौडन ए. सी. ब्रॅडले, वुइल्यम आर्चर, रिचर्ड गार्नेट, इ. गॉस व अॅड्रयू लँग यांचा प्रमुखत्वानें निर्देश केला पाहिजे.

क वि ता - टेनिसन व ब्राउनिंग नंतर इंग्लंडांत कवितेचा जवळ जवळ अस्तच झाला असें म्हणण्यायस हरकत नाही. तथापि विसाव्या शतकाच्या प्रारंभी सी. एमू. डौटी. आल्फ्रेड नॉईज, हरबर्ट ट्रेंच व लॉरेन्स बिनिअन हे कवी उदयास आले. परंतु ए. ई. हुस्मन व डब्ल्यू. ई. हेन्ले यांनीं आपल्या उत्तम काव्यरचनाचातुर्यानें कविमालिकेंत त्यांच्यापेक्षां अधिक श्रेष्ठ स्थान प्राप्त करून घेतलें. हेनरी न्यूबोल्ट, मिसेस मेनेल व स्टिफेन फिलिप्स यांच्या काव्यांत कवित्वाचें खरें नाणें दृष्टीस पडतें. परंतु या सर्व कवींत जॉर्ज मेरिडिथ व थॉमस हार्डी यांच्या कविता सर्वोत्कृष्ट होत असें पुष्कळांचें मत आहे. हल्ली यीटसची कविता बरेंच प्रामुख्य पावली आहे.

ना ट कें. - हल्ली प्रचलित असलेल्या नव्या पध्दतीच्या नाटकांस गेल्या शतकाच्या शेवटल्या वीस वर्षांतच सुरवात झाली. त्या काळांत झालेल्या टॉम रॉबर्टसन या नाटककाराचीं नाटकें यथार्थ व सत्यस्वरूपाच्या दृष्टीनें अंधुक व अस्पष्ट छायाचित्रें आहेत. यापुढें ऑगीर, डयुमास व सार्डो या फ्रेंच नाटककारांच्या अतिशय श्रेष्ठ प्रतीच्या नाटकांचा इंग्रजी नाटककारांच्या मनावर हळूहळू परिणाम होऊं लागला. त्यामुळें इब्सेन, ऑस्कर वाइल्ड, व ए. डब्ल्यू पिनरो हे इंग्रजी नाटककार त्या पध्दतीचा इंग्रजी नाटकांत कसा उपक्रम करावा याचा विचार करूं लागले. गिलबर्ट मरे यानें या प्रचारांत येऊं पहाणाऱ्या नव्या नाटकपध्दतीस अधिक चालना दिली. बर्नार्ड शॉ व त्याचे ग्रॉन्व्हिल, बार्कर प्रभृति अनुयायी यांनीं तींत विनोदाची भर घातली.

वि सा व्या श त कां त झा ले ले फे र ब द ल. - विसाव्या शतकाच्या वाङ्मयांत कांहीं कांहीं बाबतींत पूर्वीचीच व्यवस्था कायम राहिली आहे. इ. स. १८९५ पासून इंग्लंड अमेरिका येथील विश्वविद्यालय यांच्या परिक्षेंत इंग्रजी वाङ्मय हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय म्हणून नेमण्यांत येऊं लागला. त्यामुळें वाङ्मयाचें तुलनात्मक व ऐतिहासिक दृष्टीनें विवेचन सुरू झालें व पुस्तकें व वाचनाचीं साधनें झपाटयानें वाढूं लागलीं आहेत.

अ र्वा ची न वा ङ्म य. - १९२१ च्या मागील कांहीं वर्षांचें सिंहावलोक्रन करितां असें आढळून येईल कीं, वाङ्मयाच्या गुणधर्मांत फारसा फरक झालेला नाहीं; पण जागतिक वाङ्मयाच्या दृष्टीनें पाहतां या काळांतील इंग्रज लेखक फारसे वरर आलेले आडळणार नाहीत. १९२१ सालीं हयात असलेल्या कादंबरीकारांत थॉमस हार्डीला उच्च स्थान द्यावें लागेल. 'दि डिन्यास्टस' हें शोकपर्यवसायी महाकाव्य त्याच्या एकंदर शोकरसप्रधान कादंबऱ्यांमध्यें अति सरस ठरेल. हार्डीच्या तोडीचा ग्रंथकार सर जे. एम. बॅरी होय. त्याचें 'फेरी' हें नाटक इंग्लिश रंगभूमीवर अति लोकप्रिय म्हणून ठरलें आहे. हार्डी आणि बॅरी या दोघांनीं रंगभूमीवर असें एक वातावरण निर्माण केलें आहे कीं, इंग्रजी वाङ्मयाला साजेसा कोणताहि कवि त्यांत स्वैर संचार करूं शकेल. १९२१ चा वाङ्मयीन आढावा घेतल्यास एच्. जी. वेल्स आणि बर्नार्ड शॉ यांची रचना प्रथम नजरेंत भरेल. एच. जी. वेल्स हा आपल्या काळचा समाजशास्त्रीय आत्मचरित्रकार व शॉ स्वीफ्टसारखा औपरोधिक लेखक म्हणून प्रसिध्द आहे. वेल्सचे 'जोआन' आणि 'पिटर', 'दि टाईम मशीन', 'डॉक्टर मारेझड आयलंड', 'दि व्हील्स ऑफ चान्स', 'वॉर ऑफ दि वर्ल्ड', 'किप्स' इत्यादि ग्रंथ व शॉचे 'कान्फरेन्सीयर', 'कॉमन सेन्स अँड दि वॉर', 'वुइडोअर्स हाउसेस', 'आर्म्स अँड दि मॅन', 'कँडिडा', 'प्लेज, प्लेझंट अँड अन प्लेझंट', 'सीझर अँड क्लिओपॅट्रा', 'जॉन बुल्स अँड अदर आयलंड' इत्यादि ग्रंथ प्रसिध्द आहेत. हार्डि, बॅरी, वेल्स आणि शॉ या चौघांखेरीज मोर्ले, फ्रेडरिक, हॅरिसन, ब्राईस, ट्रेव्हेलिअनसारखे सन्मान्य पंडित, सेंट्सबरी, गॉसे, सिडने, कॉलव्हिन, डब्ल्यू, पी. कर यांच्यासारखे प्रसिध्द टीकाकार, पिनेरी आणि हेनरी अर्थर जोन्स हे नाटककार, रूडियर्ड किप्लिंग, वुइल्यम वाटसन, डब्ल्यू बी यीटस, अॅलिस मे. येल आणि रॉबर्ट ब्रीजेस यांच्यासारखे १९०० च्या पूर्वीच लोकांपूढें आलेले ग्रंथकार, हे सर्व मिळून सुमारें पन्नासांची भरती होईल. इतरहि पुष्कळ लेखक निघतील.

१९१० ते २१ या काळांतील अगदीं निराळया वळणाचे कादंबरीकार म्हणजे वेल्स, आर्नोल्ड, बेनेट, गाल्सवर्दी, कॉम्टन, मॅकॅन्झी, स्टिफन, मॅकेना, इ. ल्युकस, डब्ल्यू, जे. लॉक, डब्ल्यु. एल. जॉर्ज, ह्यूजेस वालपोल, गिल्बर्ट कॅनॉन आणि मे. सिन्क्लेअर, इत्यादि होत. व्हिक्टोरिअन काळांतल्यापेक्षां हल्ली कादंबऱ्यांच्या अंतरंगात बराच फरक पडलेला आहे. 'मानसिक पृथक्करण' हे त्यांचे वैशिष्टय होय. गाल्सवर्दीच्या 'डार्क फ्लावर' आणि 'बियाँड' या काव्यांतून स्त्रीपुरुषांमधील परस्पर आकर्षणाची उपपत्ति दिली आहे. वेल्स आणि शॉ यांचा जीवशक्तीवर मोठा जोर आहे.

कादंबरी क्षेत्राबाहेरचें पण त्यांच्यासारखेंच रम्य वाङ्मय म्हणजे ऐतिहासिक चरित्रें होय. इंग्लंडमध्यें 'डिक्शनरी ऑफ नॅशनल बायॉग्राफी' नांवाचा एक राष्ट्रीय पुरुषांच्या चरित्रांचा कोश तयार झाला आहे. 'लाईफ ऑफ डिझ रायीली' हा जी. इ. बकलेचा ग्रंथ व लिटन स्ट्रॅचेकृत 'एमिनंट व्हिक्टोरिअन्स' 'क्विन व्हिक्टोरिया' हीं चरित्रें नवीन आहेत.

या काळच्या इंग्रजी काव्याकडे पाहतां असें दिसून येईल कीं, टेनिसन, ब्राउनिंग, रॉझेटी आणि मॉरिस यांच्या गैरहजिरीमुळें पडलेला खड्डा सौंदर्यशास्त्रीय चलनवलनाने थोडा फार भरून निघाला आहे. नवीन कवींत रॉसेलस अबरकॉम्बी, सी एम. टाउटी, स्टर्ज मूर, बेलॉक, चेस्टरटन, डब्ल्यू. एच. डेव्हीज, ए. नॉयेस, एल. विनियन, जेम्स इ. फ्लेकर, एडवर्ड थॉमस, रूपर्ट ब्रुक, डब्ल्यू. डब्ल्यू. गिबसन, रॉल्फ हॉडसन, जॉन मॅसेफील्ड, जॉन फ्रीमन, सीज फ्रीड ससून इत्यादि प्रसिध्द आहेत. गेल्या युध्दकाळांत इहलोक सोडून गेलेले प्रसिध्द कवी म्हणजे रूपर्ट ब्रुक (१८८७-१९१५) व एडवर्ड थॉमस (१८७८-१९१७) हे होत.

१९ व्या शतकाच्या प्रारंभी ऑंग्लो आयरिश वाङ्मयाचा जन्म झाला असला तरी इंग्रजी भाषेंत आयरिश संस्कृतीचे ग्रंथ निर्माण करण्याचा प्रयत्न १८४० पर्यंत झाला नाहीं. हा प्रयत्न थॉमस डेव्हीसनें आपल्या 'नेशन' नांवाच्या वर्तमानपत्रद्वारें केला. तेव्हांपासून पुष्कळ आयरिश गद्यपद्य लेखक निर्माण झाले, त्या शतकाच्या अखेरीस आयर्लंडमध्यें जी सामाजिक व राजकीय चळवळीची लाट उसळली तींतून गालिकसंघ बाहेर पडून नवीन तऱ्हेचें आयरिश वाङ्मय निर्माण होऊं लागलें. हा गालिकसंप्रदाय राष्ट्रीय नसून प्रांतविशिष्ट आहे असें इंग्रज पंडित म्हणतात. सिनफेनांचें वाङ्मय तात्पुरतें सुंदर दिसलें तरी फारसें टिकाऊ नाहीं, तें स्वतंत्र म्हणून कदाचित् पुढें येईल; पण इंग्रजी वाङ्मयाला मागे सारणार नाहीं असें हेच पंडित सांगतात; तथापि या नूतनवाङ्मयीन चळवळीमुळें प्राचीन आयर्लंडची माहिती जगापुढें येऊन इतक्या दिवस तुटलेली आयरिश परंपरा पुन्हां जोडली गेली आहे. डब्ल्यू. बी. यीट्स, जॉर्ज डब्ल्यू रसेल, डगलस हैड, स्टँडिश ओ ग्राडी, जे एम. सिंज आणि जॉर्ज मूर हे प्रख्यात आयरिश लेखक होत.

इं ग्र जी वा ङ्म या चे ज गा व र प रि णा म. - इंग्रज राष्ट्र हें ज्याप्रमाणें जगांतील अत्यंत यशस्वी राष्ट्र आहे, त्याप्रमाणें इंग्रजी वाङ्मय हें जगांतील अत्यंत यशस्वी वाङ्मय आहे. इंग्लंडचा ख्रिस्ती संप्रदाय स्वतंत्र झाला, त्याचा परिणाम असा झाल कीं, धार्मिक वाङ्मयाची भाषा इंग्लंडची लॅटिन न राहतां इंग्रजीच बनली. इंग्लंडचें कायद्याचें वाङ्मय रोमन कायद्याचें वृत्तिरूप न राहतां स्वतंत्र आहे. यामुळें राष्ट्राच्या सर्व अंगास व सर्व क्रियास उपयोगी पडणाऱ्या वाङ्मयाची वाहक भाषा इंग्रजीच बनली. सर्व जगावर इंग्रजांचा प्रवेश झाला, त्यामुळें जगांतील प्रत्येक भागावर इंग्रजी वाङ्मय आहेच. ऑस्ट्रेलेशिया, उत्तरअमेरिका, आफ्रिकेचा बृहद्भाग यांचें वाङ्मय इंग्रजीच आहे. त्याचें स्वरूप प्रत्येक देशाचें वर्णन करतांना दिलेलें सांपडेल. आतांपर्यंत वर दिलेलें जें वाङ्मय आहे. तें इंग्लंडचें राष्ट्रीय वाङ्मय होय. परंतु इंग्रजी भाषेंतील सर्व वाङ्मय इंग्लंडचें राष्ट्रीय वाङ्मय नव्हे. इंग्रजी वाङ्मय आतां साकृतिक झालें आहे. इंग्रजी वाङ्मयाचा परिणाम शेजारच्या देशांवर झालाच; इंग्रजी राजकीय कल्पनांचा प्रसार सर्व जगभर झाला आहे. हिंदुस्थानसारख्या देशांशीं जेव्हां इंग्लंडचा संबंध आला, तेव्हां इंग्रजी सत्तेनें देशी भाषांच्या विकासास गळफांस लावला. आणि देशी भाषांची राज्यव्यवहार व शिक्षण यांमधून हकालपट्टी केली. तथापि इंग्रजी वाङ्मयाचा इष्ट परिणाम देशी भाषांवर झाला नाहीं, असें मात्र नाहीं.

हिंदुस्थानांत इंग्रजी राज्य सुरू होऊन इंग्रजी भाषेचा अभ्यास जेव्हां होऊं लागला तेव्हां साहजिकच इंग्रजी वाङ्मयाचें अनुकरण करण्याची आपल्या लोकांस बुध्दि झाली. एकोणिसावें शतक हें हिंदुस्थानच्या निरनिराळया भागांतील देश्य वाङ्मयाचें नूतन युग म्हणतां येईल. या काळांत इंग्रजी ग्रंथाचीं भाषांतरें व रूपांतरें होऊं लागलीं व भाषेला नवचेतना मिळाली. प्रत्येक भारतीय भाषेंतलें हल्लीचें वाङ्मय इंग्रजी धर्तीवर आहे हें नाकबूल करतां यावयाचें नाहीं. कोणतेंहि नवीन पुस्तक लिहावयाचें झालें कीं त्याची सामुग्री व साहित्य इंग्रजी ग्रंथांतच पहावयाचें. शास्त्रीय वाङ्मय तर सर्वस्वी यूरोपीय भाषांतून आणि विशेषें करून इंग्रजींतून घ्यावें लागतें. तेव्हां कोणतेंहि भारतीय वाङ्मय इंग्रजी वाङ्मयाशीं फटकून राहूं शकत नाहीं. हें निर्दय सत्य आहे; त्यास इलाज नाहीं.

महाराष्ट्रीय आणि इतर भारतीय वाङ्मयावर जो परिणाम झाला तो सविस्तर देण्याचें हें स्थळ नव्हे. तो मराठी, बंगाली वगैरे वाङ्मयावरील लेखांत दृष्टीस पडेल. येथें एवढेंच सांगतां येईल कीं पूर्वीची अध्यात्मपर व निवृत्तिपर दृष्टि लोपून तिच्या जागीं नवीन प्रवृत्तिपर व व्यावहारिक दृष्टि आली. पूर्वीची संकुचित कल्पना जाऊन मनश्चक्षूंपुढें अफाट सृष्टिक्षेत्र खेळूं लागलें. नवीन मराठी गद्याला सुरुवात झाली व जुनें वळण बदललें. मागचें महाराष्ट्रीय वाङ्मय बहुतेक पद्यमय होतें. आतां इंग्रजी अनुकरणानें गद्यांत जास्त भर पडूं लागली. मागील वाङ्मयांला जी लोकांची अविवेचक धार्मिकबुध्दि कारणीभूत होती, ती इंग्रजी शिक्षणानें लोपत जाऊन नूतन वाङ्मयाचे विषय पूर्ण प्रापंचिक बनले. मराठी गद्यग्रंथांची मोठया प्रमाणावर जी पैदास झाली, ती इंग्रजी वाङ्मय समुच्चयांचा आश्रय केल्यामुळेंच होय. चिपळूणकर, आगरकर, विनायक कोंडदेव ओक महाजनी, यांसारख्या सुशिक्षित लेखकांनीहि इंग्रजी ग्रंथाची भाषांतरें करून मराठी वाङ्मयांत भर घातली.

ख्रिस्ती मिशनऱ्यांनीं स्वमत प्रसारार्थ बायबल व इतर ख्रिस्ती संप्रदायांतील ग्रंथ मराठी भाषेचा अभ्यास करून तीत भाषांतरिले आहेत. हे मराठींतील ख्रिस्ती वाङ्मय किती व्यापक व विविध आहे हे 'महाराष्ट्रीय वाङ्मयसूचि' चाळल्यास दिसून येईल.

शास्त्रें व इतिहास या ज्ञानांगांवरच्या इंग्रजी वाङ्मयाधारें रचिलेल्या ग्रंथांपेक्षां नाटकें कादंबऱ्यांचीं अशी पुस्तकें फार दिसतील. जेन आस्टीन, गोल्डस्मिथ, चार्लस गारव्हिस, सॅम्युअल जानसन, रेनॉल्डस, स्कॉट, स्विफ्ट, मिसेस हेनरी बुड, शार्लोटी ब्राँटी, कॉनन डॉईल, मेरी कॉरली इत्यादि अनेक इंग्रजी, ग्रंथकारांच्या कादंबऱ्या मराठींत झपाटयानें आल्या. हल्लीच्या मनोरंजक नियतकालिकांतून व सरस-सुरस सारख्या ग्रंथमालांतूनहि इंग्रजी गोष्टींची भाषांतरें-रूपांतरें या पलीकडे कांही सांपडणार नाहीं. आपले लेखक इंग्रजी वाङ्मयाचे इतके एकनिष्ठ सेवक बनले आहेत.

इंग्रजी वाङ्मयाचा अभ्यास सुरू झाल्यावर साहजिकच शेक्सपियरची गांठ पडली व त्याचीं नाटकें मराठींत आणावींत असें वाटूं लागून त्या दिशेनें प्रयत्न झाला. शेक्सपियरच्या बहुतेक नाटकांचीं भाषांतरें झालेलीं आहेत; हॅभलेटसारख्या कांहीं नाटकांचीं तीन निरनिराळीं रूपांतरें झालीं. पुढें पुढें इंग्रजी नाटकांच्या धर्तीवर स्वतंत्र नाटयरचना होऊं लागली, त्याप्रमाणें कांहीं आधुनिक मराठी नाटकें तर संस्कृत नाटकाहून सरस वठलीं आहेत.

आतां मराठी काव्याकडे वळूं. इंग्रजी राज्यास सुरुवात झाल्यानंतर प्रथम आपल्याकडील विद्वानांचा कल संस्कृत काव्यें मराठींत आणण्याकडे होता. नंतर लवकरच इंग्रजी तऱ्हेवर कविता सुरू झाली. पूर्वीचे कवितेचे विषय पुराणें व वेदांत यांपैकीं असत. ते आतां पार बदलले; विषयमर्यादाहि वाढली. स्काट वगैरे सारख्या मोठया कवींचें अनुकरण फारसें झालें नाहीं तथापि मिल्टन, बायरन, कीट्स, शेले, वर्डस्वर्थ, यांसारख्या दुर्बल आणि कच्च्या दमाच्या कवीचें अनुकरण मात्र सपाटून झालें. जुनी काल्पनिक एकछापीं सृष्टिवर्णनें बाजूला सारून पाश्चात्य पध्दतीवर प्रत्यक्ष ज्ञानाची वर्णनें करूं लागले. कविताभाषा व रचना या बाबतींतहि त्यांनीं रूढि सोडली. तेव्हां प्रथम प्रथम ते अप्रिय झाले असल्यास नवल नाहीं.

[संदर्भ वाङ्मय - दि केंब्रिज हिस्टरी ऑफ इंग्लिश लिटरेचर. एच्. मोर्ले - इंग्लिश रायटर्स. सेंट्सबरी - एलिझाबेथन लिटरेचर. हॅने - दि लेटर रिनाय सन्स. ओ. एल्टन - दि आगस्टन एज. टैने - हिस्टरी ऑफ इंग्लिश लिटरेचर. थॉम्पसन, स्टूडंट्स हिस्टरी ऑफ इंग्लिश लिटरेचर. बेन - हिस्टरी ऑफ इंग्लिश थॉट इन दि नाईन्टीन्थ सेंचरी. ए. ब्रि. ए. रि; ए. इत्यादि]

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .