प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

आर्यसमाज, सं स्था प क - आर्यसमाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती हें काठेवाडांतील मोरवी संस्थानातल्या एका खेडयांत १८२४ सालीं जन्मले. त्यांनीं आपल्या हयातींत आपलें मूळ नांव किंवा जन्मस्थान कधीहि कोणास सांगितलें नाहीं; व याचें कारण, अंगीकारलेल्या धर्मकार्यांत नातेवाईक येऊन अडथळा करतील किंवा मरणोत्तर समाजाचा अधिपति म्हणून कोणी आपला नातेवाईक वारसा हक्क सांगू लागेल, असें स्वामी सांगत असत. तथापि १८८३ मध्यें स्वामी परलोकवासी झाल्यावर त्यांचें खरें नांव मूलशंकर अंबाशंकर असल्याचें माहीत झालें. स्वामींचें वडील अंबाशंकर असल्याचें माहीत झालें. स्वामींचें वडील अंबाशंकर हे ब्राह्मण जातीचे शैवपंथी सुखवस्तु गृहस्थ असून त्यांचा धंदा पेढीवाल्याचा होता. मूलशंकर उर्फ स्वामी दयानंदसरस्वती यांच्या आयुष्याचे तीन विभाग पडतात. पहिला. पूर्व वय (१८२४-१८४५), दुसरा प्रवास व अध्ययन (१८४५-१८६३), तिसरा सार्वजनिक कार्य (१८६३-१८८३). आयुष्यांतील पहिल्या दोन विभागांची माहिती स्वामींनीं स्वतः लिहून ठेवलेल्या आत्मचरित्रावरून चांगली मिळते.

आर्यसमाजाच्या या संस्थापकाच्या धर्मबुध्दीसंबंधानें त्याच्या पूर्व वयांत तीन महत्त्वाच्या गोष्टी दिसून येतात. पहिली चवदाव्या वर्षीच मूर्तिपूजेविरुध्द केलेले बंड. त्याचें कारण शैव संप्रदायानुसार एका शिवरात्रीच्या दिवशीं उपोषण करून रात्री शिवालयांत भजन पूजन व जाग्रण करीत असतां त्यांनीं शिवाच्या मूर्तीवर एक उंदीर इकडे तिकडे बागडतांनां व नैवेद्य खातांनां पाहिला. दुसरी गोष्ट संसारत्याग करून मोक्ष मिळवण्याचा त्यानें केलेला निश्चय; याचें कारण बहिणीच्या मृत्यूमुळें त्यांनां झालेलें अपरंपार दुःख. तिसरी गोष्ट एकविसाव्या वर्षी त्यांनीं केलेला गृहत्याग. याचें कारण त्यांच्या आईबापांनीं जुळवून आणलेला विवाह टाळण्याची त्यांची इच्छा. याप्रमाणें मूर्तिपूजेविरुध्द बंड, मोक्ष मिळवण्याचा निश्चय, आणि संसारत्याग या तीन गोष्टींनीं स्वामींच्या भावी आयुष्याचा पाया घातला गेला या पूर्व इतिहासाबद्दल कोणास शंका येण्याचें कारण नाहीं. कारण स्वामीचें मूर्तिपूजेविरुध्द मत अखेरपर्यंत कायम होतें, आणि मूर्तिपूजेविरुध्द चळवळ स्वामींनी हरिद्वार काशी, इत्यादि प्रमुख क्षेत्रीं केली. संसाराबद्दलच्या त्यांच्या विरक्तीबद्दलहि कोणास संशय घेण्याचें कारण नाहीं. कारण स्वामींनीं एकदां जें घर सोडलें तें आप्तेष्टांचें दर्शन घेण्यास सर्व हयातींत एकदांहि ते गृहाकडे गेले नव्हते.

घर सोडल्यानंतर अठरा वर्षे स्वामीनीं संन्याशी होऊन प्रवास करण्यांत व निरनिराळया गुरूंपासून ज्ञान संपादण्यांत घालविलीं, त्यांत प्रथमपासूनच त्यांच्या मनावर वेदग्रंथांचा फार परिणाम झाला व व्यक्तिगत आत्मा आणि परत्मात्मा एकच असल्याबद्दल त्यांची खात्री पटली. ब्रह्मचर्याची दीक्षा देऊन त्यांचें नांव शुध्दचैतन्य असें ठेवण्यांत आलें. पुढें चवथ्या संन्यासाश्रमाची दीक्षा देऊन त्यांनां दयानंद सरस्वती हें नांव देण्यांत आलें. तथापि पुढें लवकरच स्वामी वेदांतमार्ग सोडून योगमार्गाकडे वळले; आणि त्यानंतर स्वामींच्या चरित्रावर अखेरचा धार्मिक परिणाम मथुरा येथें रहाणाऱ्या स्वामी विरजानंद सरस्वती नांवाच्या एका अंध वैदिक विद्वानाचा झाला. हा वैदिक अलीकडील संस्कृत वाङ्मयाचा पक्का द्वेष्टा होता. त्यानें वेद शिकविण्यास आरंभ करण्यापूर्वी सर्व अलीकडील संस्कृत ग्रंथ फेंकून देण्यास सांगितलें व दयानंदांनीं तसें केल्यावर त्यांनां वेद शिकवले. वेदाध्ययन पुरें झाल्यावर त्या अंध गुरूनें ''आतां जगांत हिंडून मनुष्य जातीला आपल्या ज्ञानाचा उपदेश कर'' अशी आशीर्वादात्मक आज्ञा केली. येथें दयानंदाच्या आयुष्याचा दुसरा भाग संपतो.

स्वामींच्या धार्मिक मतांचा इतिहास थोडक्यांत पुढील प्रमाणें आहे. प्रथम पौराणिक ग्रंथांतील मतांचा, नंतर तत्त्वज्ञानात्मक ग्रंथांतील मतांचा, आणि अखेर वैदिक ग्रंथांतील मतांचा पगडा त्यांच्या मनावर पडला.

स्वामी शैवपंथ सोडून वेदांतमार्गी बनले, व शेवटी सांख्य योगाला शेवटपर्यंत चिकटून राहिले. सर्व वेदग्रंथांचा अर्थ सांख्ययोगपर लावला पाहिजे असें त्यांचें मत होतें. आयुष्याची शेवटली वीस वर्षे स्वामींनीं सार्वजनिक कार्यांत घालविलीं. या काळांत धर्मोपदेश करीत सर्व हिंदुस्थानभर ते फिरले. पुण्यामुंबईपासून कलकत्त्यापर्यंत व उत्तरेस लाहोरपर्यंत मोठमोठे पंडित, मौलवी व मिशनरी यांच्या बरोबर त्यांनी वादविवाद केले. प्रथम चार वर्षे स्वमतप्रतिपादन केल्यावर अधिक ध्यानमनन करण्याकरितां व चारित्र्य उत्तम बनविण्याकरितां ते गंगेच्या कांठीं जाऊन राहिले. या अल्पकालीन एकांतवासांत असतांनां स्वामींस प्रत्यक्ष भेटून आलेल्या एका यूरोपीय मिशनऱ्यानें त्यांचें वर्णन पुढीलप्रमाणें लिहून ठेविलें आहेः -

'सायंकालीं नदीच्या वाळवंटांत पाण्याच्या कांठाजवळ बसलेल्या एका फकीराची भेट मीं घेतलीं. त्याच्या विद्वत्तेबद्दल व पवित्राचरणाबद्दल मी अगोदर बाजार पेठेंत पुष्कळांच्या तोंडून ऐकलें होतें. त्या ठिकाणीं तो फकीर एका गवताच्या आसनावर बसलेला होता. त्याचें शरीर भीमासारखे भक्कम व जाडजूड असून चेहरा पाणीदार होता. तो बहुतेक नग्नप्राय स्थितींत होता. मी जवळ गेल्याबरोबर त्यानें आनंदानें संभाषणास सुरुवात केली. संसाराचा पूर्ण त्याग करून परमेश्वरचिंतनांत तो काल घालवीत असे. झालेल्या संभाषणावरून सदरहू फकीराचें मन सुसंस्कृत आणि बुध्दि प्राचीन वैदिक ग्रंथांत तरबेज असल्याचें दिसून आलें. तो संस्कृतमध्यें बोलत होता त्यामुळें आमचें संभाषण एका दुभाष्या मार्फत झालें'

सुमारें अडीच वर्षांनीं स्वामी दयानंद एकांतवास सोडून पुन्हां सार्वजनिक वादविवाद करीत फिरूं लागले. हिंदूंचे प्रसिध्द क्षेत्र काशी वगैरे ठिकाणीं ते मुद्दाम वेदामध्यें मूर्तिपूजा आहे काय? या विषयावर व्याख्यानें देत असत. मूर्तिपूजेविरुध्द त्यांनीं फार जोराची मोहीम सुरू केली. व त्या कामीं आपला दृढनिश्चय तसेंच स्वतःचे मोठें वजन आणि असामान्य वक्तृत्व त्यांनी खर्च केलें.

मुंबई येथें १८७५ एप्रिल १० रोजीं स्वामी दयानंदांनीं आपला आर्यसमाज स्थापन केला. १८७७ मध्यें दिछी येथें भरलेल्या बडया दरबाराच्या वेळीं हजर राहून स्वामींनीं पंजाबांतील कांही सुप्रसिध्द गृहस्थांच्या गांठी घेतल्या. तेव्हां पंजाबांत येण्याबद्दल त्यांनां आमंत्रण झालें. तें मान्य करून स्वामी त्या प्रांतांत गेले. ती त्यांची पंजाबला पहिलीच भेट होती. त्यांच्या संस्थेनें पुढें जेथें विजय मिळविले तें क्षेत्र हेंच होय. १७८८ ते १८८१ या काळांत आर्यसमाज आणि थिऑसॉफिकल सोसायटी यांच्या दरम्यान मोठा चमत्कारिक संबंध आला; पण पुढें दोघे परस्पराबद्दल नाखूष झाले; कारण देवाच्या प्रत्यक्ष स्वरूपाबद्दल त्यांच्यामध्यें मोठा मतभेद उत्पन्न झाला. याशिवाय स्वामी दयानंदाचा ब्रह्मसमाजाचे देवेंद्रनाथ ठाकूर आणि केशवचंद्रसेन, थिऑसॉफिकल सोसायटीचे मॅडम ब्लॅव्हाटस्की आणि कर्नल आल्कॉट, प्रार्थनासमाजाचे भोलानाथ साराभाई, सुधारक मुसुलमानी पंथाचे सर सय्यद अहमद, आणि ख्रिस्ती पंथाचे डॉ. टी. जे. स्कॉट आणि रेव्ह. जे. ग्रे इत्यादि निरनिराळया संप्रदायांच्या पुढाऱ्यांशीं संबंध आला. स्वामीं दयानंदांनीं प्रार्थनासमाज, ब्रह्मसमाज व आर्यसमाज सर्व एक करावे अशी सूचना त्या त्या समाजाच्या पुढाऱ्यांनां केली होती; पण ती कोणासच मान्य झाली नाहीं.

१८८२-१८८३ मध्यें स्वामींनीं राजपुतान्याला भेट दिली आणि तेथें ते अनेक संस्थानिकांचे स्नेही व सल्लागार बनले. जोधपूरच्या महाराजांची बदफैली वर्तनाबद्दल स्वामींनीं चांगली कानउघाडणी केली असें सांगतात. या नंतर लवकरच स्वामी आजारी पडले. त्यांना अन्नामधून विषप्रयोग केला गेला असें कोणी म्हणतात. तें कांहीं असलें तरी हें मात्र खरें कीं, त्याच दुखण्यांत स्वामींचा शेवट झाला. १८८३ आक्टोबर ३० रोजीं अजमीर येथें स्वामी वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी परलोकवासी झाले.

स्वामी दयानंदांची प्रकृति फारच चांगली, चेहरा भव्य आणि मन दृढनिश्चयी होतं. मूर्तिपूजकांबरोबरच्या वादविवादांत महामूर्ख हें विशेषण त्यांच्या तोंडून फार येत असे. त्यांचें संस्कृत ग्रंथांतील पांडित्य, समयसूचकता आणि आत्मविश्वास मोठया पुढाऱ्याला योग्य अशींच होतीं.

मु ख्य त्त्वें. - प्रत्येक आर्यधर्मीयानें पाळावयाचीं मुख्य दहा तत्त्वें पुढीलप्रमाणें आहेतः -

१. सर्व यथार्थ ज्ञानाचा उगम व सर्व वस्तूंचे आदिकारण परमेश्वर आहे.
२. ईश्वर सत् चित् व आनंदस्वरूपी आहे. तो अनादि, अनंत, निराकार, निष्कलंक, सर्वशक्तिमान, सर्वसाक्षी, परमन्यायी व परमदयाळू, सर्व जगाचा निर्माता, शास्ता व पालक आहे. पूजा अथवा उपासना ही त्याचीच करावी.
३. वेद हे त्याचे निःश्वास आहेत; व सर्व यथार्थ ज्ञानाचा उगम वेदांतच असल्यामुळें वेदांचें अध्ययन करणें व करविणें हें प्रत्येक आर्याचें आवश्यक व पवित्र कर्तव्य आहे.
४. प्रत्येक आर्यानें सत्याचें ग्रहण करण्यास व असत्याचा त्याग करण्यास तयार असलें पाहिजे.
५. व्यवहारांतील प्रत्येक कृत्य धर्माला-सदाचाराला-धरून असलें पाहिजे. म्हणजे तें करणें हें नीतिमार्गाला धरून आहे कीं नाहीं, याचा पूर्ण विचार करून तें केलें पाहिजे.
६. आधिभौतिक, सामाजिक, आध्यात्मिक वगैरे प्रत्येक बाबतींत सुधारणा करून मनुष्यजातीचें सर्वांगीण कल्याण साधणें हाच आर्यसमाजाचा मुख्य उद्देश आहे.
७. सर्वांशी प्रेमानें व न्यायानें वागणें हें प्रत्येक आर्याचें कर्तव्य आहे.
८. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा सार्वत्रिक प्रसार झालाचा पाहिजे.
९. केवळ स्वतःच्या कल्याणानें कोणीहि संतुष्ट राहूं नये; तर दुसऱ्याच्या कल्याणांतच आपलें कल्याण आहे अशी सदोदित भावना ठेवावी.
१०. सार्वजनिक हिताहिताचा प्रश्न जेथें उद्भवेल तेथें कोणाहि व्यक्तीनें आपल्या विशिष्ट मताचा अगर विचारांचा आग्रह धरूं नये. पण ज्या गोष्टी केवळ खाजगी व वैयक्तिक हिताहिताच्या असतील त्यांत प्रत्येक व्यक्तीस वाटेल तसें वागण्याची पूर्ण मोकळीक असावी. [वि. ज्ञान. वि. पु. ४८ पृष्ठ ३९५].

आर्यसमाजाच्या तत्वांपैकी परमेश्वराचे अस्तित्व व स्वरूप आणि वैदिक ग्रंथातील सिध्दांत यासंबंधाची पहिली तीन तत्वे धार्मिक व अंत्यत महत्वाची आहेत. व काही तत्वे केवळ नीतिविषयक नियम आहेत. यावरून असे दिसून येईल की आर्यसमाजाची धर्मसूत्रे अगदी थोडक्य़ात आहेत. वरील दहा तत्वे शब्दांच्या कमजास्त फरकाने अनेक ठिकाणी प्रसिध्द झालेली आहेत. विशिष्ट शब्दाबद्दल या धर्म पंथाचा मुळीच आग्रह नसतो.

आर्यसमाजाच्या मुख्य तत्त्वांचा विचार करण्यापूर्वी त्याच्या संस्थापकाच्या मनांत मुख्य उद्देश काय होता हें लक्षांत घेतलें पाहिजे. तो उद्देश म्हणजे हिंदुस्थानची धार्मिक, राजकीय आणि शास्त्रीय बाबतींत उन्नति करणें हा होय. देशांत पसरलेलीं अनेक धर्ममतें पाहून या संस्थापकाचें मन प्रथम गोंधळून गेलें. या धर्मपंथांपैकीं मुसुलमानी आणि ख्रिस्ती हे धर्मपंथ पश्चिमेकडून आलेले आहेत. एतद्देशीय जो हिंदु धर्म तो अनेक मतांचे कडबोळें असून त्यांत शंकराचार्यांच्या अद्वैतसिध्दांतापासून तंत्रग्रंथांतील ग्राम्य व अश्लील धार्मिक विधींचा अंतर्भाव होत असतो. आणि हिंदू धर्मांतील ह्या सर्व पंथांनां सामान्य असलेला जातिभेदहि आहे. अशा धार्मिक परिस्थितीचा व त्यावेळच्या राजकीय परिस्थितीचा संप्रदायस्वरूपावर परिणाम झाला आहे.

त्यावेळीं सर्व हिंदुस्थानावर ब्रिटिशांचा सुव्यवस्थित राज्यकारभार चालू झालेला होता; आणि रेल्वे, तारायंत्रे, कालवे, आगबोटी इत्यादि अनेक प्रकारचीं साधने पाश्चात्यांच्या शास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतीची साक्ष देत होती. अशा स्थितींत स्वामी दयानंदानीं जेव्हां सर्व हिंदुस्थानभर प्रवास केला, तेव्हां हिंदुस्थानची भूतकालीन स्थितीच नव्हे तर वर्तमानकालीन स्थितीहि उत्तम अवलोकन करावयास सांपडली, आणि वेद, उपनिषदें, सूत्रें आणि रामायणमहाभारतादि काव्यें यांच्या अभ्यासाबरोबर इंग्रजी भाषेंतील नव्या नव्या शास्त्रीय शोधांचे ग्रंथ व इतर अनेक पाश्चात्य विचारांनीं भरलेले ग्रंथ वाचावयास मिळाले. अशा ज्ञानार्जनानंतर हिंदू धर्माच्या सुधारणेचा प्रश्न स्वामींच्या पुढें उभा राहिला. ही सुधारणा जुन्या आणि नव्याचा पौरस्त्य आणि पाश्चात्य विचारांचा मिलाफ करून त्यांत हिंदू लोकांची बौध्दिक आणि आध्यात्मिक परंपरा कायम राहील व त्या बरोबरच इतर राष्ट्रांनीं ज्ञानाच्या क्षेत्रांत मिळवलेल्या विजयाबद्दल योग्य आदरबुध्दि राहील अशा तऱ्हेची धर्मांत सुधारणा स्वामींना पाहिजे होती. नव्या सुधारलेल्या धर्मपंथाचीं तत्त्वें सर्व जगाला मान्य होतील अशीं करण्याचा स्वामींचा हेतु होता. हा उद्देश साधण्यास अपौरुषेय उर्फ ईश्वरप्रणीत असे जे वेद, त्या ग्रंथांतील तत्त्वांवर आपला धर्मपंथ उभारावा असें स्वामींनीं ठरविलें.

दयानंदसरस्वती आणि मार्टिन लूथर यांच्यामध्यें अनेक बाबतींत साम्य आहे. ज्याप्रमाणें मार्टीन लूथर यूरोपमध्यें ग्रीक, लॅटीन विद्याचें पुनरुज्जीवन झाल्यावर जन्मास आला, त्याप्रमाणें दयानंदहि हिंदुस्थानांत विद्यांच्या अलीकडे झालेल्या पुनरुज्जीवनानंतर जन्मास आले. दोघांनांहि जुन्या नव्यामधला झगडा स्पष्ट भासूं लागला. दोघेहि आपापल्या परीनें नवमताचा पुरस्कार करूं लागले. लूथरनें पापविमोचन पत्रांवर (इंडल्जन्सेस्) हल्ला केला; दयानंदांनीं मूर्तिपूजेवर हल्ला केला. लूथरनें रोम येथील पोपच्या संप्रदायाविरूध्द बंड करून प्रत्यक्ष बायबल ग्रंथाला सर्वस्वीं प्रमाण मानण्यास सुरुवात केली, त्याप्रमाणें स्वामी दयानंदांनींहि स्मृतिप्रणीत ब्राह्मणी धर्माला विरोध करून जुन्या अत्यंत प्राचीन अशा वैदिक ग्रंथाच्या आधारावर नवा पंथ काढला. लूथरचा मंत्र ''जुन्या मूळ बायबल ग्रंथाप्रमाणें चाला'' असा होता आणि स्वामी दयानंदांचा मंत्र जुन्या मूळ वेदग्रंथाप्रमाणें चाला' असा होता. ही तुलना चरित्रविषयक मात्र करता येत नाहीं स्वामी सन्यासी असल्यामुळें राजा श्रय मिळविण्यासाठीं लूथर जशी लटपटपंची करी तशी स्वामीस करावी लागली नाहीं. शिवाय दुर्बल समुच्चयास बलवान करणें हा स्वामींचा हेतू होता, लूथरचा नव्हता, हा फरकहि लक्षांत ठेवला पाहिजे.

स्वामी दयानंद वेदग्रंथांसंबंधीं एकंदर सिध्दांत पुढील प्रमाणें मांडीत असत. वेद ह्या शब्दाचा अर्थ 'ज्ञान' असा आहे. वेदग्रंथांतील ज्ञान ईश्वरप्रणीत असल्यामुळें अत्यंत शुध्द आणि परिपूर्ण आहे. अशा ह्या ईश्वरी ज्ञानानें भरलेल्या ग्रंथांत सर्व शास्त्रांचीं मूलतत्त्वें ग्रथित केलेलीं आहेत. जगांतील एकंदर तत्त्वें ईश्वरानें दोन मार्गांनीं व्यक्त केलीं आहेत. (१) चार वेदांच्या द्वारें. हे वेद प्रथम अग्नि, वायू, सूर्य आणि आंगिरा या चार ॠषीस कोटयावधि वर्षांपूर्वी, जगदुत्पत्तीच्या आरंभीं, शिकविलें; आणि (२) प्रत्यक्ष सृष्टी उत्पन्न करून तिच्या द्वारें या सृष्टीच्या उत्पत्ति स्थितिलयाचीं तत्वें वेदांत ग्रथित केलेलीं आहेत. वेदांतील तत्त्वें आणि सृष्टींतील तत्त्वें यांच्यांत आत्यंतिक साम्य आहे. एकांतील तत्त्वें दुसऱ्यांतील तत्त्वांशी तंतोतंत जुळतात. स्वामी दयानंद म्हणतः - ''वेदांतील तत्त्वें स्वयंसिध्द आहेत. याबद्दल शंका घेण्यास बिलकुल जागा नाहीं. कारण या ईश्वरप्रणीत ग्रंथांतील तत्त्वेंच सभोंवारच्या सृष्टींत सर्वत्र व्यक्त झालेलीं आहेत.''

या ठिकाणीं वेद हा शब्द द्वयर्थी वापरला आहे हे नीट लक्षांत घेतलें पाहिजे. एक अर्थ असा कीं, ईश्वरप्रणीत ज्ञान, म्हणजे सर्वज्ञ अशा ईश्वराचें ज्ञान आणि वेद म्हणजे जुन्या संस्कृत भाषेंतील चार वेदग्रंथ. हे दोन अर्थ अगदीं निरनिराळे आहेत. पहिल्या अर्थाबद्दल कोणी शंका घेणार नाहीं; परंतु संस्कृत भाषेंतले चार वेद ग्रंथ हेंच सर्व ईश्वरप्रणीत ज्ञान असा जो स्वामी अर्थ करितात तो मात्र मान्य होण्यासारखा नाहीं; परंतु स्वामी मात्र वेदांत सर्व ईश्वरप्रणीत ज्ञान आहे म्हणजेच अर्थात वेदग्रंथांत सर्व शास्त्रीय तत्त्वें सांगितलेलीं आहेत असें मानीत असत. अशी श्रध्दा बनल्यावर प्राचीन, अर्वाचीन, अगदीं अलीकडील प्रत्येक शास्त्रीय शोध निदान बीजरूपाने तरी वेदग्रंथांत सांगितलेला असला पाहिजे असा निर्णय स्वामींनीं ठरविला. अर्थांत अलीकडे पाश्चात्य देशांत जे नवे शास्त्रीय शोध लागले आहेत ते सर्व पौरस्त्य देशातील आमच्या पूर्वज ॠषींच्या ज्ञानचक्षूंस अवगत झालेले होते. तात्पर्य, ज्ञानचंक्षूंनीं सर्व गोष्टी आकलन करण्याची दिव्य देणगी ईश्वरानें पौरस्त्य देशातील आमच्या पूर्वजांनां दिली होती, तर सर्व गोष्टी प्रत्यक्ष करून दाखविण्याची देणगी त्याच परमेश्वरानें आधुनिक पाश्चात्य लोकांनां दिली आहे. सर्व शास्त्रीय शोधांचा कार्यक्रम पौरस्त्यांनीं घालून दिला आहे; आणि तो अमलांत आणण्याचें काम पाश्चात्यांनीं केले आहे. याप्रमाणे स्वामी दयानंदांनीं पौरस्त्यांनां योग्य तें श्रेय दिलें असून पाश्चात्यांनांहि योग्य तें श्रेय त्यांच्या पदरांत टाकलें आहे. आणि स्वामी दयानंद म्हणत असत कीं, वेदांमध्यें सांगितलेलीं तत्त्वें प्रत्यक्ष आमलांत आणून दाखविण्यांत पाश्चात्य लोक एक प्रकारें नकळत वैदिक धर्माचा अवलंब करीत आहे.

सर्व शास्त्रीय ज्ञान वेदग्रंथांत सांठवलेलें आहे हेंच तत्त्व उपबृंहित करून स्वामींनीं असें प्रतिपादन केलें कीं अलीकडील सर्व धर्मांचा मूळ उगम व प्रेरणा या वैदिक ग्रंथांतूनच झाली आहे. वेद हें मूळ मनुष्य जातीला दिलेले ईश्वरी ज्ञान होय. आणि म्हणून पारमार्थिक ज्ञानाचा मूळ उगम तेथें आहे. हें तत्त्व कित्येक ख्रिस्तीलोक मानतात. त्या 'आद्यप्रकटकिरणाच्या' तत्त्वासारखेंच आहे.

वैदिक ग्रंथांसंबंधाचा आर्य समाजानें पुढें मांडलेला सिध्दांत येणें प्रमाणें आहेः- (१) वेद ईश्वरप्रणीत आहेत कारण, त्यांतील ज्ञानाचा सृष्टींतील गोष्टींशीं पूर्ण मेळ असतो. (२) वेद हा एकटाच ग्रंथ कायतो ईश्वरप्रणीत आहे. कारण, दुसऱ्या कोणत्याहि ग्रंथांतील ज्ञानाचा इतका मेळ सृष्टीतील गोष्टींशी पडत नाहीं. (३)म्हणून वेद ग्रंथ हे अखिल मानव जातीच्या शास्त्रीय ज्ञानाचा आणि पारमार्थिक विचारांचा उगम होत. या मूलाधारभूत. तत्त्वानुसार ठरविलेली आर्यसमाजाचीं दोन महान् कर्तव्यें आहेत ती अशीः - हिंदुस्थानला परत वैदिक मार्गावर नेणें; आणि सर्व जगाला वैदिक धर्म शिकवणें.

यांवरून हें स्पष्ट होतें कीं, स्वामी दयानंदांचा मतें फार व्यापक होतीं. ते मोठालीं उदात्त स्वप्नें पहात होते. सर्व भोळया भाविक समजुती सोडून दिलेल्या, शास्त्रीय ज्ञानाचीं सर्व फळें चाखीत असलेल्या, एकेश्वरी असलेल्या, एकेश्वरी मताचा पुरस्कार करणाऱ्या, स्वयंशासित असलेल्या ज्ञानाचा आणि जगांतील सर्व शासत्रीय ज्ञानाचें आणि धर्मांचे आद्य उगमस्थान म्हणून मान पावलेल्या  अशा हिंदुस्थानाचा रम्य देखावा त्यांच्या दृष्टीला दिसत होता.

आर्यसमाजाच्या संस्थापकाच्या मनश्चक्षुंपुढील हें भावी हिंदुस्थानचें उज्वल चित्र खरोखरच फार रमणीय आणि उद्दीपक आहे. परंतु ही उज्वल स्थिति प्राप्त करून घेण्याचें साधन कोणतें? तर वर सांगितल्याप्रमाणें मागें वेदाकडें धांव घेणें, आणि त्या प्राचीन वेदांचा अर्थ पिढीजाद संस्कृतज्ञ सांगतील तो नव्हे किंवा चिकित्सक बुध्दीचे पाश्चात्य पंडित सांगतील तोहि नव्हे, तर आर्यसमाजी पंडित सांगतील तो मान्य करून त्याप्रमाणें वागणें, हें होय. तात्पर्य, आर्यसमाजाचे धार्मिक आधार ग्रंथ दिसावयाला वेद असले तरी वास्तविक या ग्रंथांत आर्यसमाजी विद्वानांच्या चष्म्यांतून ज्या गोष्टी दितील त्या आधार होत, आणि हे विद्वान अर्थ करून ज्या गोष्टी सांगतात त्या आर्यसमाजाबाहेर कोणाहि पौरस्त्य किंवा पाश्चात्य संस्कृतज्ञाला मान्य होत नाहींत, कारण हे पंडित एकाच वैदिक शब्दाचे व वाक्याचे आपल्या लहरी प्रमाणें वाटेल तसे चमत्कारिक व निरनिराळे अर्थ लावतात. अगदीं अलीकडील काळांत लागलेले सर्व शास्त्रीय शोध वेदांत सांगितलेले आहेत असें हें विद्वान म्हणतात, या गोष्टीवरून त्यांच्या अर्थ लावण्याच्या करामतीची कोणासहि सहज कल्पना येईल. स्वामी दयानंदांनीं वेदांचा जो अर्थ लावलेला आहे त्यांत दोन विशेष आहेतः वैदिक कालांतील रूढार्थ न घेतां केवळ व्युत्पत्तिदृष्टया निघणारा अर्थ घेणें, आणि काळ, पुरुष, विभक्ति व अर्थ या सर्व बाबतींत वैदिक रूपें अगदीं अनियमित होती असें मानणें. या विधानाच्या प्रतीतीकरितां स्वामी दयानंदांची ॠग्वेदावरील टीका वाचावी. या संबंधानें मॅक्समुल्लर साहेब म्हणतातः - दयानंदांनीं अगदीं अशक्य असा वैदिक ॠचांचा अर्थ लावून त्या ग्रंथांत अलीकडील शास्त्रीय शोधासुध्दां सर्व ज्ञान भरलेलें आहे अशा स्वतःची व आपल्या अनुयायांची समजूत करून घेतली आहे. वाफेची यंत्रे, आगगाडया, आगबोटी सर्व कांही गोष्टी निदान बीजरूपानें तरी वेदकालीन ॠषींनां माहीत होत्या. वेद म्हणजेच जर ज्ञान, तर वेदांत नाहीं अशी गोष्ट असूं शकेल तरी कशी? असें स्वामीचें म्हणणें आहे!!'' थोडक्यांत सांगवयाचें म्हणजे स्वामींनीं लावलेला अर्थ हा सर्व केवळ स्वतःच्या एका सिध्दांताला धरून होता, आणि तो सिध्दांत वेदांत एकेश्वरी मत प्रतिपादिलें असून 'सर्व शास्त्रांचीं मूलभूत तत्त्वें त्यांत आहेत' हा होय. ही गोष्ट होमरच्या इलियड किंवा व्हर्जिलच्या एनियड काव्यांत शुध्द एकेश्वरीमत व सर्व शास्त्री शोध दिलेले आढळतात असें म्हणण्यासारखीच हास्यास्पद आहे. वेद ईश्वर प्रणीत असून त्यांत फक्त सृष्टिव्यापारासंबंधाचीं तत्वें व नियम असल्यामुळें त्यांत ऐतिहासिक स्थलें किंवा व्यक्ती यांचा बिलकुल उल्लेख नाहीं असाहि आर्यसमाजी पंडितांचा आग्रह आहे (आर्यपत्रिका-लाहोर १९ आक्टोबर १९०१). एवंच आर्यसमाजाचीं सर्व तत्वें वेदांच्या अशास्त्रीय व पूर्वग्रहदूषित अर्थावर उभारलेलीं आहेत असें डॉ. ग्रिस्वल्डनें आपलें मत व्यक्त केलें आहे.

दुसऱ्या पक्षीं, अनेक स्मृतिग्रंथ मिळून व्यावहारिक हिंदु धर्माचें जें बहुबिध स्वरूप दिसतें तें सोडून दिसून मूळ वैदिक ग्रंथ आधारभूत मानण्यांत स्वामी दयानंदांनीं विशेष हुषारी दाखविली यांत शंका नाहीं. प्राचीन ग्रंथांचे अर्थ लावतांना उपयोगांत येत असलेली अलीकडील ऐतिहासिक व चिकित्सक पध्दति माहति असूनहि स्वामीनीं वेदांतील ॠचांचे हास्यास्पद अर्थ लावले ही त्यांची बुध्दिपुरःसर केलेली चूक नव्हे. तो विशिष्ट मनःप्रवृत्तीचा परिणाम आहे. अशीच श्रीकृष्णाच्या गोपीसंबंधीच्या लीलांचा अर्थ लावण्यांतहि दिसून येते.

यासंबंधानें एक भारतीय लेखक विविधज्ञानविस्तारांत लिहितो. -

वेद हे प्रत्यक्ष ईश्वराचे शब्द - ते मंत्रद्रष्टया ॠषींनीं आपल्याला दिले आहेत. धर्मांचें व आचारांचें, सर्व रहस्य वेदांत आहे वेदांत नाहीं असें कांहींच नाहीं. अशी त्यांची निष्ठा होती. पण ही धर्माची गंगाजळी एकाच वर्गाच्या हातांत असावी ही गोष्ट मात्र त्यांना गैर वाटते. ईश्वर व माणूस यांमध्यें तिसऱ्या कोणाहि मध्यस्थाची गरज नाहीं. प्रत्येक व्यक्तीला मग तो जन्मतः कोणत्याहि जातीचा असो-वेदाध्ययन करून तदद्वारा ईश्वराची आराधाना करण्याचा हक्क आहे. वेदांचा अर्थ करण्याची वाटेल त्याला मुभा आहे. वेदांचा शास्त्रोक्त पध्दतीनें अर्थयुक्त अभ्यास करण्याचा प्रघात मोडल्यापासूनच आर्यधर्माच्या अवनतीस सुरुवात झाली. आजकाल आपले आचार वेदोक्त व शुध्द अशा विधींनी नियमित नसून अनेक मतांचीं व वेडगळ समजुतींची त्यांत भर पडली आहे. या वेडगळ समजुतींचें उच्चाटन करण्याचा खरा मार्ग म्हटला म्हणजे वेदाचें सार्वत्रिक व सार्थ अध्ययन हाच एक होय, असें स्वामीजी प्रतिपादीत.

वेदांची आतांपर्यंतचीं सर्व भाष्यें व टीका या अगदीं कुचकामाच्या व टाकाऊ होत असें स्वामींचें मत होतें. महीधरानें तर जाणूनबुजून खोडसाळपणानें वेदांचा भलभलता अर्थ केला आहे, व सायनाचार्यांनीं असा प्रकार जरी केला नसला तरी तत्कालीन धर्ममतांची व रूढीची त्यांच्या मनावर पुरी छाप बसल्यामुळें त्यांचें भाष्यहि दोषपूर्ण व भ्रामक असेंच वठलें आहे, असें ते म्हणत वेदांचा अर्थ लावण्याचे कांहीं ठळक नियय आहेत. त्या नियमान्वयें अर्थ केला तरच तो बरोबर उतरेल, नाहीं तर कदापि नाहीं; व हे नियम माहीत नसल्यामुळें पूर्वीचे टीकाकार वहकले असा स्वामींचा कोटिक्रम होता. या नियमांपैकीं एक प्रमुख नियम प्रख्यात निरुक्तकार यास्काचार्यांनीं असा दिला आहे कीं वेदांतील सर्व शब्द यौगिक म्हणजे व्युत्पत्तिसिध्द अर्थांनीं योजलेले असतात. अर्धात् मूळ धातु, व त्यांना उपसर्ग वगैरे लागून जे फेरफार झाले असतील ते, यांच्या अर्थाला धरूनच वेदांचा अर्थ केला पाहिजे असें झालें. प्रख्यात व्याकरणकार पंतजलि याचेंहि मत असें असल्याचें सांगतात. पाश्चात्य पंडित मोक्षमुलर यांनींहि वेदांच्या कांही भागापुरतें हें तत्त्व मान्य केलें आहे. ते म्हणतात कीं, ''वेदांतील बहुतेक शब्द आपल्या धात्वर्थाला थोडे बहुत तरी चिकटून असतात. एखाद्या पूर्णावस्थेस पोंचलेल्या भाषेप्रमाणें वेदांतील भाषा टणक बनलेलीं नसून ती फार लवचीक आहे. त्यांतील विशेषनामें सुध्दां सार्थ असतात.''

वरील तत्त्वाचा शब्दश: उपयोग करून स्वामी दयानंदांनीं आपलें भाषांतर केलें आहे. त्यामुळें कित्येक सामाम्य शब्दांचें दयानंदांनीं दिलेले अर्थ फारच नवीन-काहीं तरी विक्षिप्तपणाचें-वाटण्यासारखे आहेत, उदाहरणार्थ, ''देवता'' या शब्दाचा अर्थ ''वेदमंत्रामध्यें ज्या ज्या पदार्थांच्या गुणधर्मांचें विवेचन केलेलें असले ते पदार्थ'' असा त्यांनी केलेला आहे, व हे पदार्थ म्हणजे काल, दिक, शक्ति, आत्मा, कर्म वगैरे होत, असेंहि त्यांच्या एका शिष्यानें [पंडित गुरुदत्त] ठरविलें आहे.

अशा तऱ्हेच्या कित्येक प्रकाराबद्दल पाश्चात्य एतद्देशीय पंडितांनीं स्वामी दयानंदावर खूब कडक टीका केली आहे; व ती बऱ्याच ठिकाणीं यथार्थ आहे. (वि. पु. ४८ पृ. ३९८)

वेदग्रंथांसंबंधानें आर्यसमाजाचीं मतें येथवर सांगितलीं. आता तत्त्वज्ञानासंबंधांनें पाहतां सांख्यमत त्यांनीं मान्य केले आहे. या पंथांत प्रकृति आणि पुरुष म्हणजे 'जडद्रव्य' आणि 'आत्मा' अशीं दोन पृथक तत्त्वें मानतात. देव, आत्मा आणि जडद्रव्य ह्या तिघांनां स्वतंत्र अस्तित्व असतें. हीं तिन्ही सनातन आहेत. मोक्ष मिळविणें हेंच प्रत्येक व्यक्तीचें ध्येय असून तें प्रत्येकानें स्वप्रयत्नानें मिळविलें पाहिजे असें आर्यसमाजाचें मत आहे. मोक्षाची पूर्ण तयारी करतां यावी म्हणून पुनर्जन्माची योजना केलेली आहे. कर्म कोणालाहि सुटत नाहीं, कर्म आणि पुनर्जन्म यांची व्यवस्था करणारा तोच ईश्वर होय, ईश्वर हा पृथ्वीवरील नियंत्रित राज्यकारभार करणाऱ्या राजासारखा आहे. म्हणजे ईश्वराच्या हातींहि अनियंत्रित सत्ता नसते, तर त्याची सत्ता आत्मा आणि जडद्रव्य यांच्या सनातन अस्तित्त्वामुळें मर्यादित झालेली असते.

धार्मिक समजुती आणि शास्त्रीय सिध्दंत यांच्यामध्यें युगानुयुग असलेला विरोध नाहींसा करण्याचा आर्यसमाजानें प्रयत्न केला आहे. वेदप्रणीतज्ञान आणि सृष्टीचे नियम या मध्यें पूर्ण एकवाक्यता असून अद्भुत चमत्कार असा विश्वांत कोणताच नाहीं असें आर्यसमाज सांगतो.

नैतिक दृष्टया पाहतां आर्यसमाजाचें एक तत्त्व फार आक्षेपार्ह आहे. हें तत्त्व नियोगासंबंधाचें होय. नियोग म्हणजे प्राचीनकाळचें ''देवरात् सुतोप्तत्ती'' चें तत्त्व नसून अधिक स्वैर स्त्रीपुरुषसंबंधाचेंच तत्त्व होय. सत्यार्थप्रकाशांत पुढील वाक्य आहे; एका पुरुषानें (एका मागून एक) अकरा स्त्रियांशीं संबंध केला आणि त्याचप्रमाणें एका स्त्रीनें नियोगपध्दतीनें अकरा पुरुषांशीं संबंध केला तरी त्यास हरकत नाहीं. ' नियोगासंबंधानें स्वामी दयानंदानें सांगितलेले नियम पुढील प्रमाणें आहेतः -

''आर्यसमाज पतिपत्नी जिवंत असलेल्यांनां त्याचप्रमाणें विधुर व विधवा यांना, खालील नियमानुसार नियोग संबंध करण्यास परवानगी देत आहेः -

१ जेव्हां पति किंवा पत्नी रोग किंवा इतर कांहीं कारणांमुळें प्रजोत्पादनास असमर्थ असेल.
२ जेव्हा पति कांही धार्मिक कारणांकरितां किंवा अध्ययनाकरितां किंवा द्रव्यार्जनाकरतां कांहीं ठराविक काळ घर सोडून गेलेला असेल,
३ जेव्हां पति किंवा पत्नी त्रासदायक किंवा कटुभाषण करणारीं असतील,
४ जेव्हां पत्नी वंध्या असेल किंवा विवाह झाल्यानंतर आठ वर्षांत मूल झालें नसेल,
५ जेव्हां झालेलीं सर्व मुलें अल्पायुषी असतील,
६ जेव्हां पत्नीला सर्व मुलीच झाल्या असतील,
७ जर पत्नी गर्भवती किंवा सतत आजारी असेल किंवा नवरा आजारी असेल, आणि दोघांपैकीं दुसऱ्यास भर ज्वानी असून आपला काम आवरणें शक्य नसेल, तर अशा प्रसंगीं नियोगसंबंध करावा. अशा प्रकारचीं नियोगाचीं मोकळीक देण्याची दोन कारणें सांगण्यांत येतात;

(१) वंश चालण्याकरितां पुरुष संतति निर्माण करणें, आणि (२) कामविकार अनावर झाल्यास त्याच्या उपशमाचा नीतिप्रणीत मार्ग मोकळा करून व्याभिचार, जारकर्म इत्यादि अनाचार बंद करणें. सत्यार्थप्रकाश म्हणतोः - ''विवाहाप्रमाणें नियोगहि सार्वजनिक विधिपूर्वक आचरावा.'' या सर्व वर्णनावरून असें दिसून येईल कीं, स्वामी दयानंदांचीं स्त्रीपुरुष संबंधविषयक मतें प्लेटोप्रमाणेंच चमत्कारिक होतीं निदान या बाबतींत तरी दोघेहि प्रत्यक्ष अनुभवशून्य असे केवळ तत्त्वज्ञानाबरोबर वाहवणारे होते. असें डॉ. ग्रिस्वल्ड म्हणतो. आता येथें हेंहि नमूद करून ठेवणें जरूर आहे कीं, आर्य समाजाच्या अनुयायांना ही वरील नियोगपध्दति अमलांत आणण्याचें धाडस झालें नाहीं आर्यपत्रिकेचे (२० सप्टेंबर १९०२) संपादक म्हणतात ''या उच्च तऱ्हेच्या नियोगपध्दतीचा अवलंब करणारें एकहि उदाहरण अद्यापि झालेलें नाहीं, हें कबूल करण्यास आम्हांस फार दुःख वाटतें.''

याखेरीज आर्यसमाजाची मतें म्हटलीं म्हणजे आर्यसमाज कट्टा एकेश्वरवादी आहे; पण कांहीं पुरुषांत अगर स्त्रियांत ईश्वराचा अंश इतरांहून अधिक असतो, अशीहि त्यांची समजूत आहे. स्तुति, प्रार्थना, उपासना, आचार व विचार हाच सर्वेश्वराच्या आराधनेचा खरा मार्ग होय असें दयानंदांचें मत आहे.

कर्म व पुनर्जन्म या दोहोंवर आर्यसमाजाची पक्की निष्ठा आहे. प्रत्येक कर्माचें - मग तें बरें असो अगर वाईट असो - फळ कर्त्यास भोगावें लागतें मग तें तत्काल लागो अगर लक्षावधी वर्षांनीं भोगावें लागो हं तत्त्व मान्य केलें म्हणजे आत्म्याचें अमरत्व व पुनर्जन्महि ओघानेंच येतात. श्राध्दपक्षाच्या स्वरूपाची पितृपूजा मात्र स्वामी दयानंदास मान्य नव्हती.

प्रत्येक आर्य समाजानें पुढें दिलेले पंचमहायज्ञ दररोज केले पाहिजेत अशी समाजाची आज्ञा आहे.

ब्रह्मयज्ञः - यांत संध्या व स्वाध्याय यांचा समावेश होतो. स्वाध्याय म्हणजे नित्य नियमानें  वेदांपैकीं कांहीं भाग वाचणें अथवा म्हणणें.
देवयज्ञः - होम करून अग्नींत आहुती देणें. कोणत्याहि विधीस या प्रकारच्या होमाची जरूरी असतेच. आर्यसमाजातीयांत या होमाचें महत्त्व फार आहे.
पितृयज्ञः - याचा अर्थ दयानंदांनी वडिलांची आज्ञा पाळणें व त्यांची सेवा करणें असा केला आहे.
अतिथि (मनुष्य) यज्ञः - एखाद्या विद्वान व निराश्रित अतिथीला अथवा संन्याशाला भोजन देणें; ब्रह्मचारी व संन्याशीं यांचें पोषण करणें हें गृहस्थाचें कर्तव्यच आहे अशी आर्यावर्तांत प्राचीन कालापासून समजूत आहे तीस अनुसरूनच वरील नियम आहे.
बलि (वैश्वदेव) यज्ञः - भोजनापूर्वी अंध, पंगु, वगैरे अनाथास अगर पुशपक्ष्यास थोडेबहुत अन्न देणें.

हिंदूंचे सोळा संस्कारहि आर्यसमाजीयांनां मान्य आहेत. मात्र त्यांचें वेदकालीन साधें स्वरूप कायम ठेवून मागाहून त्यांत जी अनेक अेंगें शिरलीं ती अजिबात वगळलीं आहेत. मूर्तिपूजेविषयीं आर्यांचा कटाक्ष असल्यामुळें संस्कारांतील जो भाग मूर्तिपूजेसारखा वाटला तो त्यांनीं कमी केला आहे. या सर्व संस्कारविषयींची माहिती दयानंदांनीं तयार केलेल्या संस्कारविधि नामक ग्रंथांत दिलेलीं आहे.

आर्यसमाजाचें  ध्येय पुढील सर्वमान्य तत्त्वांवर बसविलें आहे. (१) परमेश्वर हा सर्व जगाचा प्रेमळ पिता आहे व सर्व माणसें हीं त्याची मुलें असल्यामुळें त्यांनीं बंधुभावानें वागणें हें त्यांचें कर्तव्य आहे. (२) स्त्री व पुरुष या उभयतांचा सामाजिक दर्जा सारखाच आहे. (३) व्यक्तीव्यक्तींचें व राष्ट्राराष्ट्रांचें परस्परांशीं वर्तन अत्यंत शुध्द व न्याय्य असलें पाहिजे. कोणाहि एका व्यक्तीला त्याच्या गुणांनीं व कर्मांनीं जे हक्क मिळाले असतील तेवढे खेरीज करून निष्कारण इतरांहून श्रेष्ठता मानूं नये (४) भूतदया व औदार्य हीं प्रत्येकानें बाळगिलीं पाहिजेत. स्वामी दयानंदानीं आपलीं धार्मिक मतें लोकांत पसरवून हिंदुस्थानची आणि जगाची सुधारणा करण्याकरितां एक स्वतंत्र संस्था स्थापून तिला 'आर्यसमाज' असें नांव दिलें. आर्य हा शब्द हिंदुस्थानांत अति प्राचीन काळापासून फार चांगल्या अर्थानें वापरण्यांत आला आहे. यामुळें हें नांव धारण करण्यानेंच एक प्रकारचा धर्माभिमान, देशाभिमान, व समाजाभिमान जागृत करण्याचा स्वामींचा उद्देश होता.

इ ति हा स. - स्वामी दयानंद मृत्यु (१८८३)पावल्यानंतर या समाजासंबंधाची एक महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे त्याच्या दोन शाखा झाल्या. त्यांचीं कारणें दोन आहेत. एका अन्नामध्यें मांसाचा समावेश करण्यासंबंधानें मतभेद व दुसरें उच्च शिक्षणासंबंधानें पाळावयाचें धोरण .पहिल्या फरकामुळें एका शाखेला मांसाहारी व दुसऱ्या शाखेला शाकाहारी अशीं नांवें पडली. व दुसऱ्या मतभेदावरून एका शाखेला कॉलेज पक्ष , व दुस-या शाखेला महात्मा पक्ष किंवा पुराणमतवादी पक्ष
अशीं नांवे पडलीं. या वादासंबंधीं खालील तडजोड निघाली असावी असें एके ठिकाणीं (विविध ज्ञान विस्तार पु. ४८ पृ. ३९९) म्हटलें आहे. 'धर्मप्रसाराच्या दृष्टीनें दयानंदांचीं मतें सर्वांस मान्य आहेत असें समजावयाचें पण नियमदशकाच्या पालनापलीकडे व्यक्तिस्वातंत्र्याला हरकत घ्यावयाची नाहीं, अशा अर्थाची ही तडजोड आहे. उदारमतवादी पक्षाचें लाहोर येथें 'दयानंद अँग्लोवेदिक' नांवाचें कॉलेज आहे. त्यांत आधुनिक पध्दतीचें बऱ्याच चांगल्या प्रकारचें शिक्षण देण्यांत येतें. उलटपक्षीं महात्मा पक्षाची हरिद्वार 'गुरुकुल' नांवाची शिक्षणसंस्था असून तेथें प्राचीन शिक्षणविषयक ध्येयानुसार शिक्षण देण्यांत येतें.

घ ट ना आ णि व्य व स्था - आर्यसमाजाच्या स्थानिक, प्रांतिक आणि अखिल भारतीय अशा तीन सभा आहेत. स्थानिक समाजाचे सभासद पुढील अटीवर होतां येतें.

स भा स द हो ण्या च्या अ टी - (१) वर सांगितलेल्या दहा तत्त्वांवर पूर्ण श्रध्दा ठेवणें व स्वामी दयानंदानीं वेदांचा अर्थ लावण्याकरितां ठरवलेल्या नियमावर विश्वास ठेवणें. (२) समाजाच्या खर्चाकरितां आपल्या उत्पन्नाचा एक शतांश वर्गणी म्हणून-दरमहा किंवा दरसाल-देणें. (३) सभेला नियमितपणे हजर राहणें. (४) चांगली वर्तणूक ठेवणें. सभासद होण्यास वय निदान १८ असावें लागतें. हिंदू द्विज जातींपैकीं इसमास समाजांत प्रविष्ट करतांना कोणताहि विशेष विधि नसतो. परंतु ख्रिस्ती किंवा मुसुलमानी इसमास एक प्रकारचा शुध्दि करण्याचा विधि करावा लागतो. स्थानिक समाजाचे सभासद दोन प्रकारचे असतात. (१) उमेदवार सभासद, यांना मताधिकार नसतो. (२) कायम सभासद, यांना मताधिकार असतो. उमेदवारीचा काळ १ वर्षाचा असतो. शिवाय सहानुभूति बाळगणाऱ्या इसमांचा म्हणून एक स्वतंत्र वर्ग असतो. स्थानिक समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, खजिनदार, वाचनालयाचा व्यवस्थापक इतके अधिकारी असतात, व ते कायमच्या सभासदांनीं निवडलेले असतात. हीं सर्व अधिकाऱ्यांचीं नांवें धार्मिक स्वरूपाची नाहींत ही गोष्ट ध्यानांत घेण्यासारखी आहे. प्रांतिक सभा ही स्थानिक समाजानें निवडून दिलेल्या सभासदाची बनलेली असते. प्रत्येक स्थानिक समाजाला २० सभासदांस एक याप्रमाणें प्रतिनिधी पाठविण्याचा हक्क असतो; आर्यसमाजाचा कारभार याप्रमाणें चालतो.

बडतर्फी. - उत्पन्नाचा शतांश फीच्या रूपानें न देणाऱ्यास अगर दुर्वर्तन करणाऱ्या सभासदास तात्पुरतें किंवा कायमचें बडतर्फ करण्याचा अधिकार समाजास आहे.

ई श्व रो पा स ना. - आर्यसमाजाची धार्मिक उपासना आठवडयांतून एकदा दर रविावरी सकाळीं करण्यात येते. या उपासनेला बराच म्हणजे ३-४ तास वेळ लागतो. उपासनेच्या जागीं व्यासपीठाजवल वैदिक अग्नीची वेदि असते. उपासनेला आरंभ अग्नीला हवि अर्पण करण्यापासून होतो. त्यावेळीं मंत्र म्हणतात. नंतर स्वामी दयानंदांनीं केलेलीं प्रार्थनापर पद्यें म्हणण्यांत येतात. मध्यंतरी प्रवचन होते. आणि अखेर आर्यसमाजांतील तत्त्वांचा उच्चार करून उपासना संपवितात. उपसनेला लागणारें साहित्य अग्नींत अर्पण करावयाच्या हविर्द्रव्याव्यतिरिक्त इतर अगदीं साधें असतें. धर्मोपाध्याय किंवा पुरोहित म्हणून कोणी स्वतंत्र धर्माधिकारी नसतो. उपासनेंतील प्रवचनादि मुख्य काम लायक सभासद आळीपाळीनें करतात.

का र्य प ध्द ति. - आर्यसमाजाची काम करण्याची पध्दति हिंदुस्थानांतील मिशनरी सोसायटयांच्या नमुन्याची आहे. आपल्या मतांचा उपदेश करण्याकरितां व सभासद मिळविण्याकरितां सार्वजनिक उपदेशपर व्याख्यानें, शिक्षण, जाहीर पत्रकें, वर्तमानपत्रें यांचा उपयोग करतात. उपदेशक दोन प्रकारचे असतात; ऑनररी आणि पगारी. पहिल्या प्रकारांत वकील, शिक्षक, डॉक्टर, असे उच्च धंद्यातले विद्वान इसम असतात. या आर्यसमाजाची उदारमतवादी उर्फ सुसंस्कृत शाखा शिक्षण प्रसाराकडे विशेष लक्ष देते आणि महात्माशाखा केवळ उपदेशात्मक कार्यावर विशेष भर देते. या प्रत्येक शाखेची अनेक हायस्कुलें, अनाथगृहें, वृत्तपत्रें, आणि मासिकें आहेत.

आं क डे वि ष य क मा हि तीः - आर्यसमाजाचे १९०१ सालीं ९२००० सभासद होतें. हल्ली ते लाखापेक्षां अधिक आहेत. सभासदांची शेंकडा ९८ संख्या पंजाब व संयुक्त प्रांतात आहे. शिवाय ब्रह्मदेश, ब्रिटिश ईस्ट आफ्रिका इत्यादि दूर ठिकाणीं ह्याच्या शाखा आहेत. लाहोर हें या समाजाचें मुख्य ठिकाण आहे. तथापि अजमीर येथें स्वामींचें देहावसान झाल्यामुळें व तेथें वैदिक छापखाना असल्यामुळें त्याठिकाणालाहि बरेंच महत्त्व आहे. अस्पृश्यवर्गांची उन्नति करण्याचे काम या समाजानें बरेंच केलें आहे. ख्रिस्ती व मुसुलमान इसम आपल्या समाजांत ओढून घेण्याचे काम आर्यसमाजानें केलें आहे. प्राचीन काळची चातुर्वण्यव्यवस्था पुन्हां अमलांत आणण्याचा समाजाचा प्रयत्न चालू असून पुनर्विवाहास उत्तेजन आणि बालविवाहास बंदी करण्याचें काम समाज करीत असातो. तात्पर्य आर्यसमाजाचें मुख्य काम सामाजिक सुधारणा होय. सध्या स्वामी श्रध्दानंद हे शुध्दिचळवळीचे पुरस्कर्ते असून हें कार्य ते मोठया जोमानें चालवीत आहेत.

का म गि री - आर्यसमाजाची सर्वांत महत्त्वाची सामाजिक कामगिरी म्हणजे त्यानें चालविलेली शुध्दीची चळवळ होय. शुध्दि या शब्दाचा धात्वर्थ शुध्द करणें, पवित्र करणें, प्रायश्चित्त देणें असा आहे. आर्यसमाजी तो शब्द याहून व्यापक अर्थानें वापरतात तो असा - (१) हिंदुधर्मबाह्य अशा लोकांनां हिंदुधर्माची दीक्षा देऊन आर्यसमाजांत सामील करून घेणें; (२) मूळ हिंदु असून परधर्माचा स्वीकार केलेल्या पण फिरून स्वधर्मांत प्रवेश करून घेऊं इच्छिणाऱ्यास पावन करून घेणें आणि (३) मागासलेल्या आणि अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातींना शिक्षण देऊन त्यांचा उध्दार करणें व त्यांनां आपल्या बरोबरीनें वागविणें. या तिन्ही गोष्टींचा शुध्दीकरणांत अंतर्भाव होतो. पण या कार्यापेक्षांहि आर्यसमाजानें आपल्या मागासलेल्या बंधूंचा उध्दार करण्याकरितां जी खटपट केली व त्यांत जें यश मिळविलें आहे तें अपूर्व होय. त्या उध्दारकृत्याचीं दोन अंगें आहेत. (१) ज्या जातींनां यज्ञोपवीत धारण करण्याचा अधिकार नसून त्या नीच मानल्या जात असतील अशांनां तो अधिकार देऊन त्यांचें द्विजत्व मान्य करावयाचें व (२) ज्या जाती आज कित्येक शतकें अस्पृश्य मानल्या जात असतील त्यांनां शिक्षण वगैरे देऊन त्यांची नैतिक व धार्मिक उन्नति करावयाची व शेवटीं त्यांना आपल्या बरोबरीस आणून पोंचवावयाचें. हें काम आर्यसमाजाच्या वेगवेगळया शाखांनीं व एवढयाच कामापुरतां आर्यसमाजाशीं संबंध ठेवणाऱ्या इतर संस्थांनीं मिळून चालविलेलें आहे पण यांत मुख्य भाग आर्यसमाजाचाच आहे.

या कामगिरीशिवाय आणखी महत्त्वाची कामगिरी म्हणजे दुष्काळपीडानिवारणाची होय.

मुलांच्या शिक्षणासाठीं आर्यसमाजानें दोन आदर्शभूत पाठशाळा स्थापिल्या आहेत त्यांपैकीं एक लाहोर येथील दयानंद आंग्लो वेदिक कॉलेज हें सरकारी युनिव्हरसिटीस जोडलेलें आहे व दुसरें हरिद्वारचें गुरुकुल अगदीं स्वतंत्र आहे.

आर्यसमाजाच्या भवितव्याबद्दल भविष्य करणें कठीण आहे. इतकें मात्र खरें कीं तो प्रार्थनासमाज, ब्रह्मसमाज यांपेक्षां अधिक लोकप्रिय आहे. या तीन समाजांचा धर्माभिमान व देशाभिमान फार उज्वल असतो. शिक्षणप्रसार आणि सामाजिक सुधारणा या दोन साधनांनीं आधुनिक हिंदुस्थानची उन्नति घडवून आणण्याचे  बरेंच श्रेय याला आहे. वर्णव्यवस्था आणि वेदग्रंथ यांचा अभिमान बाळगल्यामुळें या समाजाचा पुराणमतवादी हिंदु लोकांशीं फारसा विरोध येत नाहीं. तथापि पूर्वी उत्पन्न झालेल्या अनेक धार्मिकशाखा व पंथ याप्रमाणें हाहि हिंदुधर्मरूपी पुरुषाच्या उदरात गडप होऊन जाईल किंवा स्वतंत्रपणें कायम राहील हें आज निश्चित सांगतां येत नाहीं.

आर्यसमाजाची स्थापना जरी प्रथम मुंबई येथें (१८७५) झाली, तरी त्याचा फारसा प्रसार मुंबई इलाख्यांत झाला नाहीं. त्यांचें कार्यक्षेत्र अखेरीस मुख्यतः पंजाब (संयुक्त प्रांत) हेंच ठरलें. सध्यां (१९११) या संप्रदायात २४३००० लोक असून यांची वाढ १९०१ पेक्षां अडीचपट झाली आहे. यांपैकीं जवळ जवळ निम्मे मीरत, आग्रा व रोहिलखंड या विभागांत असून जवळ जवळ दोनपंचमांश पंजाबात आहेत. दयानंदसरस्वती वारले. त्या वेळी पंजाब व संयुक्त प्रांतांत आर्यसमाजाच्या ३०० वर शाखा होत्या.

याशिवाय व्याख्याते वगैरे काम करीत असत. उपदेशकांचें काम सर्व प्रांतभर प्रचार करणें व शाखा तपासणें हें असतें. आर्यसमाजांत मुख्यतः मूळच्या सनातनधर्मीयांचाच भरणा असतो; पण बाटलेल्या व जन्मतः असलेल्या ख्रिस्ती व महंमदी लोकांचाहि अन्तर्भाव करून घेण्याची खटपट चालू आहे. स्वामी श्रध्दानंद यांनीं चालविलेली मलकाना रजपुतांस शुध्द करून घेण्याची चळवळ तर प्रसिध्दच आहे. मोपलांनीं बाटविलेल्या हिंदु लोकांस शुध्द करून घेण्याचीहि खटपट यांनी केली. त्याचप्रमाणे मेघ वगैरे अस्पृश्य लोकांस स्पृश्य करून घेण्याची खटपट चालली आहे. बहार आणि ओरिसा प्रांतांतहि यांची सुमारें चार हजार संख्या आहे. राजपुतान्यांत सुमारें दोन हजार, अजमीर मेरवाडा, काश्मीर, मध्यप्रांत व वऱ्हाड यांत सुमारें प्रत्येकी एक हजार आहे.

यांत फक्त चार वर्ण मानतात व ते जन्मतः ठरत नसून धंदा व वेदज्ञान यावरून ठरवितात. उच्च जातीचे लोक आर्यसमाजांत शिरले असतां आपली जात सोडीत नाहींत; पण हलक्या जातीचे लोक सोडतात. यांच्यांतील जातिबंधनें शिथिल होत चालली आहेत. परस्पर रोटीव्यवहार व बेटीव्यवहार यांचें प्रमाणहि वाढत आहे. हे बालविवाह निषिध्द मानतात, विधवाविवाहास मान्यता देतात. अजून कांहीं ठिकाणीं आर्यसमाजी लोकांस सनातनधर्मी हिंदू समजत नाहींत; पण लवकरच ते हिंदूंत अन्तर्भूत होतील.

[सं द र्भ ग्रं थ - चरित्रात्मकः- दि आटोबायॉग्राफी ऑफ दयानंदसरस्वती स्वामी (थिऑसॉफिस्ट, आक्टो. ब. डिसें. १८७९ आणि नोव्हें. १८८०. मॅक्समुल्लर-दयानंदसरस्वती (बायाग्राफिकल एसेज) १८८४. जे. सी. ओमान - कल्टस, कस्टम्स अँड सुपरस्टिशन्स ऑफ इंडिया, १९०८; दि आर्यसमाज अँड इट्स फाऊंडर. पंडित लेखराम व लाला आत्माराम - महर्षि स्वामी दयानंदसरस्वतीजी महाराजका जीवनचरित्र १८९७. बाबा अर्जुनसिंग - दयानंदसरस्वती फाऊंडर ऑफ दि आर्यसमाज १९०१. बाबा छज्जुसिंग - दि लाईफ अँड टीचिंग्स ऑफ स्वामी दयानंदसरस्वती १९०३.

तात्त्विः - ॠग्वेदभाध्य (हिंदी), ॠग्वेदादि भाष्यभूमिका (वरील ग्रंथाला प्रस्तावना) व सत्यार्थप्रकाश. हे तिन्ही ग्रंथ दयानंदजींच्या हातचे असून आर्यसमाजावरचे प्रमाणभूत वाङ्मय समजण्यास हरकत नाहीं.

विवेचकः - पंडित खाकसिंग व एच. मार्टिन क्लार्क - दि प्रिन्सिपल अँड टीचिंग ऑफ दि आर्यसमाज १८८७. हेनरी फोर्मन - दि आर्यसमाज, इट्स टीचिंग्स अँड अॅन एस्टिमेट ऑफ इट १८९०. लाला रुचिराम शहाणी - दि नियोग डाक्ट्रिन ऑफ दि आर्यसमाज, लाहोर १८९७. देवसमाजाचे पंडित एम. एन अग्निहोत्री - पंडित दयानंद अन्व्हेल्ड, एच. डी. ग्रिस्वल्ड - दि आर्यसमाज (ट्रन्झॅक्शन्स ऑफ दि व्हिक्टोरिया इन्स्टिटयूट ३५. १९०३). इश्वरसरण - दि आर्यसमाज, इट्स प्रेझेंट पोझिशन (हिंदुस्थान रिव्ह्यू डिसें. १९०७.) ए हँडबुक ऑफ दि आर्यसमाज बनारस १९०६. वेदिक मॅगॅझिन अँड गुरुकुलसमाचार, पु. १, १९०७-८.

याशिवाय ए ब्रि ए. रि. ए. एनसायक्लो. सोशल रिफॉर्म्स, वि. विस्तार पु. ४८. सेन्सस १९११]

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .