विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आनंदमूर्ति - मूळगांव भालगांवः जन्मठिकाण-आगळ-गांव;मातापिता-सावित्री ब्रह्मदेव, आडनांव जोशी, गोत्र वसिष्ठ ॠग्वेदी, यांचें मूळचें नांव अनंत. यांचें आनंदमूर्ति हें नांव पडण्याचें कारण पुढील कथेंत अर्वाचीन कोशकारांनीं दिलें आहेः- रघुनाथस्वामी म्हणून कोणी एक नाशिकचे राहणार होते, त्यांचा क्रम गंगोत्रीस जाऊन तेथें कावड भरावी व रामेश्वरास अर्पण करावी. तेथून सेतु (वाळु) घ्यावा आणि तो गंगेस आणून अर्पावा व त्याचप्रमाणें पुन्हां करावें. याप्रमाणें चालत असतां अनंतभट्ट हा त्यांचा शिष्य होऊन त्यांजबरोबर यात्रा करूं लागला एकदां रामेश्वरास जातांना रघुनाथ स्वामींचा मुक्काम प्रतिखेपेप्रमाणेंच ब्रह्मनाळ येथें झाला असतां, लोकांनीं प्रार्थना केली की, आतां आपला वृद्धापकाळ आला आहे यास्तव येथेंच राहावें. परंतु ती गोष्ट त्यांनीं अमान्य करून त्या सर्वांस सांगितलें कीं, हा अनंतभट्ट येथें राहील व हा राहिला असतां आम्हीं राहिलों असें जाणून तुम्ही याची सेवा करावी. इतकें सांगून यास तेथें ठेविलें व आपण निघून गेले. तेव्हांपासून यांच्या आनंदित वृत्तीवरून यांस आनंदमूर्ति असें नांव पडलें. हा पुरुष अत्यन्त समाधानी होता व समर्थ रामदास स्वामी यांच्या पंचायतनांत याची गणना होती. याची समाधि शके १६१८ मध्यें कार्तिक शुद्ध १४ चे दिवशीं ब्रह्मनाळींच झाली (रामदास चरित्र.) याचे ग्रंथ प्रसिद्ध नाहींत पण पदें आहेत. आनंदमूर्तीची वाणी रसाळ असून ते फार प्रेमळ कीर्तन करीत असें महाराष्ट्र सारस्वतकार लिहितात.
[ संदर्भग्रंथ.-अ.को. महाराष्ट्र सारस्वात. सं.क.का. सूचि रामदास रामदासी ]