विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अल्बनी - प्राचीन राष्ट्र यांची वस्ती अल्बेनियांत होती. अल्बेनिया हें पूर्व कॉकेशस मधील एका जिल्ह्यांचें प्राचीन नांव असून स्ट्रेबोच्या म्हणण्यावरून (११.४, १-८) सायरस (कुरू) नदीची थडी व आधुनिक शिर्वन एवढया भागाचा समावेश ह्यांत होत असे. अल्वनी लोक वास्तविक सध्यांच्या दधिस्तानच्या आसपास असावेत (प्लि.नी. ६.३९) ते इटाली मधील अल्बा येथून आलेल्या लोकांचे वंशज आहेत, अशी दंतकथा हॅलिकार्नेससच्या डायओनिसिअस यानें दिली आहे. स्ट्रेबोच्या आधारावरून असें समजते की, अल्बनी हे सूर्योपासक व विशेषतः चंद्रोपासक होते. पूर्वी ह्यांच्यांत लहान लहान २६ राज्यें होतीं; तरी स्ट्रेबोच्या वेळेस एकच राजा राज्य करीत होता. रोमन लोकांनां यांची माहिती होती, कारण पाँप, मोठा मिथ्रिडाटीझ (इ.स. पूर्वी ६५) याचा पाठलाग करीत होता. त्यावेळेस अल्बनी लोकांनीं त्यास मदत केली. पाँपेनें त्यांनां आपलें नावापुरतें मांडलिक बनविलें. तरी त्यांचे स्वातंत्र्य नष्ट झालं नाहीं. हॅड्रियनच्या वेळेस अल्बनी लोकांनीं हा प्रदेश जिंकला.(मॉमसेन- प्राव्हिन्सेस ऑफ दि रोमन एंपायर इं. भाषांतर, १८८६) नंतर तो सस्सनिद अंमलाखालीं गेला. अल्बनी लोकानां खाझर लोकांनीं आर्मेनियांत हांकून दिलें. त्यानंतर हूण; व्हरांगियन आणि मोंगल यांच्या एकामागून एक स्वाऱ्या या प्रदेशावर झाल्या. (ए.ब्रि.).