प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २६ वें.
यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास.

जागतिक सत्तेकरितां इंग्लंड व फ्रान्सची चुरस.- सन १७४० नंतर यूरोपमध्यें नव्या काळाला आरंभ झाला. जर्मनीवर वर्चस्व असावें म्हणून आस्ट्रिया व प्रशिया यांमध्यें स्पर्धा चालली होती. हिंदुस्थान आपल्या ताब्यांत असावें म्हणून ग्रेटब्रिटन व फ्रान्स एकमेकांशीं लढत होते. तेव्हां यूरोपच्या इतिहासांत आस्ट्रियाच्या वारसाबद्दलचें युद्ध व त्याचीच पुरवणी म्हणून पुढें चाललेलें सप्तवार्षिक युद्ध यांचें फार महत्त्व आहे. १७४८ च्या एप्रिल महिन्यांत ग्रेट ब्रिटन, फ्रान्स आणि हॉलंड यांनीं शांततेचा तह केला व तोच पुढें आक्टोबर १८ तारखेला एलाशापेल येथील तह म्हणून प्रसिद्ध झाला. त्या तहाच्या योगानें फ्रान्स व ग्रेटब्रिटन यांनां युद्धांत गेलेला मुलूख परत मिळाला. परंतु इतर यूरोपीय राष्ट्रांचा कांहीं फायदा झाला नाहीं. सार्डीनियाला जरी मिलानच्या सभोंवतालचा मुलूख मिळाला तरी पायसेंझावरील हक्क सोडून देणें भाग पडलें. आस्ट्रियाला सायलेशिया प्रशियाला द्यावें लागलें आणि पार्मा व पायसेंझा डॉन फिलिपच्या स्वाधीन करावीं लागलीं. जिब्राल्टर मिळण्याची सर्व आशा स्पेनला सोडावी लागली. ग्रेटब्रिटनचा वरील तहामुळें बराच फायदा झाला. फक्त कानडी देशांत व हिंदुस्थानांत वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या कामांत त्यांनां थोडा वेळ दम धरावा लागला. पण लवकरच कानडा व हिंदुस्थानांत ग्रेटब्रिटन पुढें सरकल्यामुळें अर्थात् फ्रान्सची पिछेहाट झाली. प्रशियाची शक्ति वाढून आस्ट्रियाशीं स्पर्धा करण्यास त्यास जोर आला. व सार्डीनियामध्यें पुढील इटालीच्या स्वातंत्र्याचें बीं रूजत पडलें.

या नंतरच्या सप्तवार्षिक युद्धाच्या (१७५६-१७६३) सुरूवातीस यूरोपांत एक मुत्सद्दीगिरींत जणूं काय क्रांतीच घडून आली. प्रशिया व ग्रेटब्रिटन यांमध्यें १७५६ मध्यें झालेल्या तहास प्रत्युत्तरादाखल फ्रान्स व आस्ट्रिया यांनीं व्हार्सेल्स येथें एक दोस्तीचा तह केला. हीं दोन राष्ट्रें आतांपर्यंत एकमेकांस पाण्यांत पहात असून त्यांच्यामध्यें झालेल्या या तहामुळें सर्व यूरोपास अचंबा वाटला. परंतु या तहाचा फारसा उपयोग झाला नाहीं. कारण रशियानें आस्ट्रियाच्या मदतीकरितां पाठविलेल्या सैन्याचा फ्रेडरिक दी ग्रेट यानें पार धुव्वा उडवून दिला व तो स्वतः अजिंक्य ठरला. याचीं कारणें अंशतः त्याची इंग्रजांशीं दोस्ती. फ्रेंच सेनापतीची नालायकी, व रशियांतील अंतस्थ भेद हीं होत. १० फेब्रुवारी सन १७६३ रोजीं पारिसचा व १५ फेब्रुवारी रोजीं ह्युबर्टस्वर्गचा तह झाला. यूरोपच्या इतिहासांत हे दोन तह महत्त्वाचे आहेत. कारण पारिसच्या तहामुळें ग्रेटब्रिटनचें साम्राज्य सर्व जगभर प्रस्थापित झालें व दुस-या तहानें प्रशिया व आस्ट्रिया या राज्यांची योग्यता सारखी ठरली.

सप्तवार्षिक युद्धसमाप्तिकालापासून फ्रान्सच्या राज्यक्रांतीपर्यंतचा काल संस्मरणीय गोष्टीनीं परिपूर्ण आहे. फ्रेडरिक दी ग्रेट, मराया थेरेसा हे तर असोत पण दुसरा जोसेफ, दुसरी क्याथेराइन, स्पेनचा तिसरा चार्लस, व टस्कनीचा लिओपोल्ड हे सर्व एकतंत्री पण लोकहितैषी राजे होते. टानुसी, टर्गो, स्क्विलासी, फ्लोरिडा ब्ल्यांका वगैरेसारखे मुत्सद्दी सुधारणाकांक्षी होते. तथापि या वेळीं राजनीतीचा दर्जा किती कमी झाला याची उदाहरणें सांपडतात. फ्रेडरिक दी ग्रेटनें सायलेशिया विनाकारण काबीज केला. नंतर १७७२ मध्यें पोलंडची राजनीतितत्त्वाला सोडून फाळणी झाली. तेव्हां या काळचे राजे प्रजेच्या कल्याणाची इच्छा कितीहि दाखवीत असले तरी, त्यांची समजूत सुधारणा व्हावयाच्या त्या राजेलोकांकडून झाल्या पाहिजेत, त्यांचा उगम प्रजेच्या मागणीपासून होतां कामा नये अशीच होती. या कालांत यूरोपांत घडलेल्या प्रमुख गोष्टी येणे प्रमाणें :
  (१) पोलंडची फाळणी.
  (२) बव्हेरियन सक्सेयन (राजवारसासंबंधी) युद्ध.
  (३) रशियाची प्रशिया व आस्ट्रिया यांच्याशीं दोस्ती.
  (४) फ्रान्स व स्पेन यांचें, ग्रेटब्रिटन व अमेरिकन वसाहती यांमध्यें चाललेल्या युद्धांत पडणें.
  (५)  रशिया व ऑस्ट्रिया यांचा तुर्कस्थानावर हल्ला.
  (६) राष्ट्रत्रिकूट अथवा त्रिराष्ट्रसंधि.

सप्तवार्षिक युद्ध संपतें न संपतें तोंच फ्रान्स आणि स्पेन यांनी ग्रेटब्रिटनवर सूड उगविण्याचा विचार केला. फ्रान्सनें अमेरिकन वसाहतींनां मदत केली; स्पेननेंहि बव्हेरिया घेण्याची इच्छा धरली; रशिया हा यूरोपियन राष्ट्रांत वरचें स्थान पटकावण्याच्या तयारींत होता; इतक्यांत अमेरिकेशीं चाललेल्या युद्धांतून मुक्त होऊन इंग्लंडला या शत्रूंशीं सामना देण्यास अवसर मिळाला व पिटनें हॉलंड व प्रशिया यांच्याशीं दोस्तीचा तह केला (१७८८). हॉलंडमध्यें ढवळाढवळ करून वर्चस्व संपादण्याची फ्रान्सची इच्छा होती परंतु ती त्रिराष्ट्रसंधीमुळें समूळ फसली. डेन्मार्कनें स्वीडनवर मोर्चा फिरविला होता तोहि त्याजला परतवावा लागला. आणि दुस-या जोसेफनंतर टस्कनीचा लिओपोल्ड बादशहा झाल्यावर नेदर्लंडमधली राज्यक्रांति संपली. शिवाय लिओपोल्डच्या मध्यस्थीनें प्रशियाचें आस्ट्रियाशीं असलेलें हाडवैर नाहींसें झालें आणि त्यांच्यामध्यें १७९० च्या जुलै महिन्यांत तह झाला. त्याचप्रमाणें यावर्षीं ग्रेट ब्रिटन व स्पेन यांच्यामध्यें व १७९२ त रशियाचा तुर्कस्थानशीं तह होऊन यूरोपांतील भांडणें मिटल्यासारखीं दिसलीं. वास्तविक यूरोपमध्यें आतां शांतता असावयाची परंतु तसें न होतां उलट लढाया मात्र सुरू झाल्या व वाटर्लूचा संग्राम होईपर्यंत त्या थांबल्या नाहींत.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .