प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.

'तीन राज्यांचा' काळ.- (इ. स. २२२-५९०) या तीन साडेतीन शतकांच्या काळांत चीनमध्यें सर्व अंदाधुंदी माजून राहिली होती. या तीन मुख्य राज्यांशिवाय पुढें दुसरी कित्येक लहान लहान राज्येंहि वर डोके काढूं लागलीं.

सुइ घराणें.- इ. स. ५९० मध्ये वरील सर्व वंडाळी मोडून सुई घराण्यांतील यंगकिएन यानें आपली सत्ता सर्वत्र स्थापित केली स्वतःला बादशहा म्हणून जाहीर केलें. त्यानें सर्वत्र शांतता प्रस्थापित केल्यामुळें लोकांनीं आनंदानें त्याला आपला बादशहा मान्य केलें. त्यानें आपल्या १६ वर्षांच्या कारकीर्दींत सर्वत्र बरीच शांतता राखली व कायद्यांचे नवें सुधारलेलें कोड सुरू केलें साम्राज्याच्या ग्रंथसंग्रहांतील ग्रंथांची संख्या ५००० वरून १०,००० पर्यंत नेली. त्यानें तातार लोकांचा पराभव केला व कोरीयन लोकांनांहि शासन लावलें. हा बादशहा इ. स. ६०४ मध्यें मरण पावल्यावर त्याचा दुसरा मुलगा यांगति यानें वडील भावाकडून आत्महत्त्या करवून राज्य बळकावलें त्यानें तातार लोकांवर स्वारी केली व लुचू बेटें जिंकून साम्राज्यास जोडलीं. यानें ग्रंथांची संख्या ५४,००० पर्यंत वाढविली व पुष्कळच पैसा खर्च करून लोयांग येथें मोठा भव्य राजवाडा बांधला व कित्येक कालवे तयार केले. ह्या फाजील खर्चामुळें लोकांवर कराचें ओझें ज्यास्त बसून असंतोष पसरला व लौकरच बंड झालें. या बंडांत लियुएन या सेनापतीनें पुढाकार घेतला व राजाला ठार मारून कायदेशीर वारस कुंगति यास गादीवर बसविलें. पण पुढल्या वर्षींच तो विषप्रयोगानें मारला गेला.

तंग घराणें (६१७-९६०).- कुंगति मारला गेल्यावर लियुएन हा कौत्सु या नांवानें बादशहा झाला. हा तंग घराण्याचा पहिला बादशहा होय. या सुमारास आशियांत तुर्कांची सत्ता शिखरास पोहोंचली होती. कौत्सूनें पैसे देऊन तुर्कांचें सख्य संपादिलें होतें. पुढें लवकरच तुर्कामध्यें दुही माजली. त्या संधीचा फायदा घेऊन या घराण्याचा दुसरा बादशहा ताइ त्सुंग (इ. स. ६२७-६५०) यानें मध्य आशियामध्यें आपलें वर्चस्व पूर्वींप्रमाणें स्थापिलें. ६४० मध्यें हामि, तुर्फान व तुर्कांचा इतर मुलूख चीनच्या साम्राज्यांत सामील करण्यांत आला व मध्य आशियांत कुचा, खोतान खारस्तान व काश्गर असे चार प्रांत पडून त्यावर लष्करी सुभेदार नेमण्यांत आले व चीन साम्राज्याची सरहद्द पूर्ण इराण व कास्पियन समुद्र येथपर्यंत वाढविण्यांत आली. या सुमारास चीनची इतकी प्रसिद्धी झाली कीं, नेपाळ, मगध, इराण व कान्स्टंटिनोपल येथून चीनच्या बादशहाच्या दरबारीं ६४३ मध्यें वकील आले. ताइत्सुंग याच्या कारकीर्दींत सर्व चीन देशांत राष्ट्रीय ऐक्य व शांतता नांदत होती. त्यामुळें शेतकी व व्यापार वाढून नवें वाङ्मयहि बरेंच निर्माण झाले. सदर्हू बादशहानें नेस्टोरियन पंथी लोकांनां उत्तेजन दिलें व महंमदाकडून आलेल्या वकिलांचा चांगला सत्कार केला. ६५० मध्यें कौत्सुंग हा बादशहा झाला. त्या वेळीं त्याची बायको बु हौ हिचें फार वजन वाढलें. आणि ६८३ मध्यें सदर्हू बादशहा मरण पावल्यावर हिनें कायदेशीर वारस बाजूला सारून स्वतः गादी बळकाविली. विधवा महाराणीनें स्वत: राज्यकारभार हातीं घेतल्याचें चीनच्या इतिहासांत हें पहिलेंच उदाहरण होय. तिनें राज्यकारभारहि सूज्ञ पणाने चालविला. तिच्या सैन्यानें खितान लोकांचा व तिबेटी लोकांचा पराभव केला. ७०५ मध्यें ही महाराणी मरण पावल्यावर तिचा मुलगा चुंग त्सुंग गादीवर आला. परंतु त्याच्या बायकोनें अधिकारलालसेनें त्याला विष घालून ठार मारलें व जुइ त्सुंग या नांवाच्या मुलाला ७१० मध्यें गादीवर बसविलें. परंतु हा दुर्बल व व्यसनी निघाला. युएन त्सुंग हा ७१३ मध्यें बादशहा झाला. त्यानें राज्यकारभाराचे बाबतींत ब-याच सुधारणा केल्या आणि वाङ्मय व विद्या यांनां उत्तेजन दिलें. खेकंदच्या राजानें तिबेटी व अरब लोकांबरोबर लढण्याकरितां मदत मागितल्यावरून या बादशहानें आपलें सैन्य पाठविलें. परंतु त्यांत चिनी सेनापतीचा पूर्ण पराभव झाला. नंतर खितान लोकांनीं उत्तर चिनी प्रांतावर हल्ला केल्यामुळें चिनांत जरा बंडाळी माजली आणि तुर्की वंशांतील आनलु शान नांवाच्या सेनापतीनें बंडांत पुढाकार घेऊन चंग अनवर चाल केली, तेव्हां बादशहानें पळून जाऊन आपला मुलगा सुत्सुंग (७५६-७६२) याला राज्यावर बसविलें. यानें खोकंद व बुखारा या प्रांतांतील फौजेच्या मदतीनें व चार हजार अरब सैन्याच्या मदतीनें आन लु शानचा पराभव केला. या घराण्यांतील पुढील बादशहांच्या कारकीर्दींत तिबेटी लोकांनीं पश्चिम चिनी प्रांतावर सतत हल्ले चालू ठेविले होते. आणि तइ त्सुंग या बादशहानें (७६३-७८०) तुर्क लोकाजवळून त्यांच्या खानाला एक चिनी राजकन्या विवाहाची बायको म्हणून देऊन मदत मिळविली.

या घराण्याच्या वेळीं राजवाड्यांत खोजे लोकांचे बंड फार वाढलें व त्यांच्या गुप्त कटांनां या घराण्यांतले कित्येक बादशहा बळी पडले. तंग घराण्यानें एक शतक चांगल्या त-हेनें राज्य केल्यावर त्या घराण्याला उतरती कळा लागली. आठव्या व नवव्या शतकांतील बहुतेक बादशहा दुर्बल असल्यामुळें सर्वत्र जुलूम व बंडाळी चालू होती. या कालांतील एक विशेष महत्त्वाची गोष्ट ही कीं, वु त्सुंग (८४१-८४७) या बादशहानें मठ व धार्मिक संस्था फार वाढल्यामुळें सर्व देवळें नष्ट केलीं व जोगी व जोगिणी यांचे मठ बंद केले व सर्व मठवाश्यांनां आपल्या कुटुंबांत परत पाठविलें. परदेशांतून आलेल्या ख्रिस्ती, बौद्ध आणि मगी धर्मोपदेशकांनां स्वदेशी परत पाठविलें आणि पुन्हां परत येण्यास मनाई केली. पुढें इ त्सुंग या बादशहाच्या कारकीर्दींत (८६०-८७४) बुद्ध धर्माचें चिनांत पुनरुज्जीवन झालें. या बादशहाला बुद्धाला एक आस्थि सांपडला. तो त्यानें मोठ्या समारंभानें आपल्या राजधानींत आणिला. यानंतर पुन्हां सर्व अव्यवस्था माजून ९०७-९६० यांचे दरम्यान लिअंग, तंग, त्सिन, हान व चौ या पांच घराण्यांनी एका मागून एक पुन्हां बादशाही सत्ता बळकाविली. तथापि तंग घराण्यांतील बादशहा मर्यादित भागावर राज्य करीत होतेच.

सुंग घराणें- (९००-१२७९) तंग घराण्यांतला शेवटचा बादशहा कुंगति याला परच्युत करून सेनापति चौ क्वांग यिन बादशहा झाला. चिनी साम्राज्यांतील बंडाळीच्या परिस्थितीला नवा पराक्रमी व बलाढ्य बादशहा जरूरच होता. यानें खितान तातार लोकांचे हल्ले परत फिरविले व मांचूरिया आणि लाओ तुंग या सर्व प्रांतांवर आपली साम्राज्यसत्ता बसविली. हे सामने चालू असतांच ९७६ मध्यें हा बादशहा मरण पावून त्याचा मुलगा तइ सुंग (९७६-९९७) गादीवर आला. त्यानें खितान लोकांबरोबर युद्ध चालू ठेविलें. परंतु अखेर त्याला त्यांच्या बरोबर तह करावा लागला. यानंतरचा तिसरा बादशहा चेन तुंग (९९७-१०२२) यानें अधिक हल्ले होऊं नयेत म्हणून खंडणी देऊं केली. परंतु हा खंडणी नियमितपणें पोहोंचवीत नसे. त्यामुळें जेन त्सुंग (१०२६-१०६४) याचे कारकीर्दींत खितान लोकांनीं पुन्हा स्वारी करण्याची धमकी दिली. तें संकट टाळण्याकरितां दरसाल दोन लाख टील रूप्याचीं नाणीं इतकी खंडणी व बरेचसे रेशमी कपडे देण्याचें बादशहानें कबूल केले. परंतु ही खंडणी नियमित पोहोंचली नाहीं. यामुळें हवे त्सुंग या बादशहाच्या (११०१-११२६) कारकीर्दींत खितान लोकांनीं लाओ त्सुंग प्रांतावर हल्ला केला. तो परतविण्याकरीतां बादशहानें नूचि तातार लोकांची मदत मागितली, पण तातार लोकांनीं खितन लोकांनां हाकलून दिल्यावर तो प्रांत स्वतःच बळकाविला व पुढें कौत्सुंग या बादशहाच्या कारकीर्दींत (११२७-११६३) चि लि, सेन सि शान सि व हो नान या चिनी प्रांतांवरहि हल्ला केला व बहुतेक उत्तर चीन ताब्यांत घेतला. यामुळें सुंग घराण्याची सत्ता दक्षिण चिनावरच कायती चालू राहिली. व उत्तरेकडे कांही भागावर किन ऊर्फ 'सुवर्ण' घराणें राज्य करूं लागलें. या किन घराण्यानें पेकिंग येथें आपली राजधानी ठेविली. सुंग घराण्यानें प्रथम नानकिंग व हंगचौ येथें राजधानी नेली. या दोन घराण्यांत पुढें बहुतेक सतत युद्ध चालू राहिले.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .