प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.

त्सिन घराणें (ख्रि. पू. २४९-२१०).-  या घराण्यांतला पहिला बादशहा चौ-सिअंग, दुसरा हिआओ-वेन वंग आणि तिसरा च्वान-सिअंग वंग हे तिघे राज्यावर आल्यावर लवकर लवकर मरण पावले. या घराण्यांतला चौथा बादशहा शी व्हांग्ति ख्रि. पू. २४६ मध्यें राज्यावर आला. त्यावेळीं त्याचें वय १३ वर्षांचें होते. पण पुढें लवकरच त्यानें सर्व राज्यसूत्रें आपल्या हातीं घेतलीं. पूर्वींची राजधानी बदलून ती हियेन यंग, अलीकडील सि-गन फू येंथे नेली व तेथे मोठा राजवाडा बांधला. त्याची अत्यंत महत्त्वाची सुधारणा म्हणजे त्यानें पूर्वींची सरंजामी पद्धति बंद केली आणि संस्थानिकांचा कारभार नष्ट करून सर्व प्रांत आपल्या प्रत्यक्ष अमलाखालीं घेतले आणि त्यांवर स्वतःला जबाबदार असे अधिकारी नेमले. शिवाय त्यानें सर्व साम्राज्यांत सडका बांधल्या, कालवे खणले आणि अनेक सुंदर सार्वजनिक इमारती बांधल्या. याप्रमाणें साम्राज्याचा अंतःकारभार सुव्यवस्थित केल्यावर त्यानें सरहद्दीपलीकडच्या तातार नांवाच्या लोकांवर तीन लाख सैन्यानिशीं स्वारी केली. व त्यांची बहुतेक कत्तल करून बाकीच्यानां मोंगोलियांत हांकून लावलें. तिकडून परत आल्यावर होनन येथें पूर्वींच्या सरंजामदारांनीं केलेलें बंड त्यानें मोडले. नंतर त्यानें नान-शान पर्वताच्या दक्षिणेकडील लोकांवर स्वारी करून त्यांनां जिंकलें. या बादशहाचें एक मोठें स्मारक म्हणजे हूण लोकांपासून साम्राज्याचें संरक्षण करण्याकरितां उत्तर सरहद्दीवर समुद्रकिना-यापासून पश्चिमेकडील कोप-यांत कानसुह प्रांतापर्यंत बांधलेली प्रचंड भिंत होय. ही भिंत बांधण्यास ख्रि. पू. २१४ सालीं त्यानें स्वतःच्या देखरेखीखालीं आरंभ केला. या बादशहानें राज्यकारभारांत ज्या आमूलाग्र सुधारणा केल्या त्या पुराणमताभिमानी विद्वानांनां पटल्या नाहींत. त्यांनां पूर्वकालीन सरंजामी कारभार पद्धतींतील व्यवस्थाच अधिक प्रिय होती. व हे लोक प्रजाजनांचीं मनें पूर्वपद्धतीकडे वळवूं लागले. अशा प्रकारची विरोधी चळवळ पूर्णपणें बंद पाडण्याकरितां सदरहू बादशहानें सर्व साम्राज्यांतले इतिहासविषयक ग्रंथ नष्ट करून टाकण्याचा हुकूम दिला, आणि ज्या विद्वानांनीं हा हुकूम मानला नाहीं त्यांनां देहांत शिक्षा दिली. या कृत्यामुळें हा बादशहा फारच अप्रिय बनला आणि ख्रि. पू. २१० मध्यें तो मरण पावतांच देशांत मोठें बंड झालें. त्याचा मुलगा एरह-शी हा दुर्व्यसनी व नालायक असल्यामुळें बंडखोरांनीं त्याला ठार मारलें. या बंडखोरांतच पुढें हान संस्थानचा लिउ पंग राजा आणि दुसरा एक संस्थानिक हिअंग यु या दोघांचे दोन प्रतिस्पर्धी पक्ष बनून त्यांचें आपसांत पांच वर्षें युद्ध चालू होतें. त्यांत अखेर लिउ पंग यानें हिअंग यूला ठार मारलें व तो ख्रि. पू. २०६ मध्यें बादशहा बनला.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .