प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

मुसुलमानी आघात व हिंदूंची पूर्वप्रयाणें.- मुसुलमानी स्वा-यांचे जे परिणाम झाले, त्या परिणामांच्या निवेदनामध्यें एक गोष्ट लक्ष्यांतून सुटते, ती गोष्ट म्हटली म्हणजे हिंदूंची जसजशी वायव्येकडून पिछेहाट होत गेली तसतसा त्यांचा कांहीं अंशा सरहद्दीवर आणि कांहीं हिंदुस्थानाबाहेर प्रसार होत गेला. नेपाळशीं संबंध जरी लिच्छवीच्या पासून होता तरी तेथें ब्राह्मणानुयायी हिंदूंचें निश्चित राज्य स्थापन झाले नव्हतें. नेपाळ येथे हिंदु राज्य स्थापन झालें व तें आपला शह तिबेटवर देऊं लागलें; तो इतका कीं तिबेटला रशिया गिळंकृत करील कीं नेपाळ गिळंकृत करील या प्रकारचा संशय वीस वर्षांपूर्वींपर्यंत होता असें कावा गुचीच्या तिबेटांतील प्रवासाच्या ग्रंथावरून दिसतें. अजून देखील सरहद्दीवर बौद्ध संप्रदायाचा संकोच होऊन हिंदुत्ववर्धनाची क्रिया चालू आहेच. १४ व्या शतकापर्यंत हिंदूंचा प्रसार पूर्वेकडील द्वीपाकडे एकसारखा होत होता; आणि ज्या ठिकाणीं मुसुलमानी संप्रदाय अगोदर शिरला, अशा ठिकाणीं सुद्धां हिंदूंनीं पुढें राज्य स्थापन केलें, अशा प्रकारची परिस्थिति दिसून येत होती. चीनच्या दक्षिण भागावर देखील एक हिंदु राज्य स्थापन झालें होतें, अशा अर्थाचा एक लेख मॉडर्न रिव्ह्यूमध्यें कांहीं वर्षांपूर्वीं येऊन गेला. तो लेख ज्या चिनी ग्रंथाच्या आधारें लिहिला आहे, त्या ग्रंथाच्या दिलेल्या उता-यावरून तें राज्य खास हिंदूचें होतें हें अजून पटत नाहीं. पश्चिमेकडून आघात झाला असतां हिंदू पूर्वेकडे वळले ही क्रिया झाली असणें स्वाभाविक आहे. परंतु त्याची सविस्तर माहिती अजून मांडली गेली नाहीं. ज्ञानकोशाच्या पहिल्या भागांत ब्रह्मदेशापासून फिलिपाईन्सपर्यंत जो हिंदुत्वविकास दिला आहे, त्यांतील कांहीं विकास या मुसुलमानांच्या आघाताच्या काळीं झाला असावा अशी कल्पना होते.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .