प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.

अरब.- अरब लोक मूळ मानस जातीच्या गौरवर्णी उर्फ कॉकेशियन वंशातले होते. त्याच्यांत अनेक जाती होत्या हे अरबस्तानच्या वालुकामय ओसाड प्रदेशांत धनगरी पेशानें राहत असत. यूरोपांत त्यांस सारासेन 'म्हणजे' ओसाड प्रदेशांतील संतति' या नांवानें ओळखतात. हे लोक मूळ मूर्तिपूजक होते. नंतर ते ख्रिस्ती झाले व शेवटीं महंमद पैगंबराचे कट्टे अनुयायी बनले. धर्माच्या अस्सलपणासंबंधानें पाहिलें तर अरब सर्व मुसुलमानांत श्रेष्ठ होत. महंमदाच्या हाताखालीं अरब लोकांचा अडाणीपणा व आळस नाहीसा होऊन त्यांजमध्यें ऐक्य व उत्साह उत्पन्न झाला व अरबांचे एक राष्ट्र झालें. अरब मुसुलमान हिंदुस्थानांत फारसे आले नाहींत; पण अरबस्तानांतून चारहि दिशांकडे मुसुलमानी संप्रदायाचा प्रसार करीत व देश जिंकीत ते गेले, व आपल्या पराक्रमांनीं जगाच्या इतिहासाचा ओघ त्यांनीं संपूर्णपणें बदलून टाकला. आशिया व आफ्रिका खंडांतील पुष्कळसे प्रदेश आणि स्पेन वगैरे दूरचे देशहि अरबांनीं जिंकले. तथापि त्यांच्या स्वभावांतील मूळचा आकुंचितपणा व नंतरचा जातिद्वेष व अन्तवैमनस्ये व मुसुलमानी कडवेपणा अखेरपर्यंत कायम होता व त्यामुळें पुढें त्यांची भरभराट एकदम खुंटली. तथापि जगाच्या संस्कृतींत अरबांनी मोठीच भर घातली आहे. त्यांनी आपल्या सत्तेच्या सुमारें आठशें वर्षांच्या काळांत (६३२-१४७९) प्राचीन काळाच्या प्राच्य सुधारणेंत जेवढें म्हणून चांगले होतें ते सर्व ग्रहण करून, व त्यांत स्वतःची पुष्कळ भर घालून, त्यांनीं तो भाग ख्रिस्ती यूरोपास दिला. बगदादच्या आब्बासी खलीफांच्या कालांतील ज्याला मुसुलमानांचे 'सुवर्णयुग' म्हणतात त्या पहिल्या दीडशें वर्षांत त्याच्यांत अनेक थोर व कर्ते पुरूष निपजले व त्यांनीं अनेक गहन विषयांत आपले नांव आजरामर करून ठेविलें आहे. शास्त्र, तत्त्वज्ञान, वाङ्मय इत्यादि विषयांत अरब विद्वानांनीं खलीफांच्या पदरीं राहून अलौकिक कीर्ति मिळविली व मोठमोठे उद्योग केले त्यांजपुढें तत्कालीन ख्रिस्ती राष्ट्रें अत्यंत हीनावस्थ व रानटी दिसतात. गिबन म्हणतो, 'मुसुलमानांच्या पहिल्या शंभर दोनशें वर्षांत ऐश्वर्यानें व सत्तेनें खलीफाची बरोबरी करणारे दुसरे राजे पृथ्वीवर नव्हते. या अरबी खलीफांनीं मशिदी, विद्यालयें, दवाखाने, धर्मशाळा रस्ते, पूल, कालवे इत्यादि लोकोपयोगी कामें केलीं व सर्व प्रकारच्या विद्याकलांस उत्तम आश्रय दिला. संस्कृत, खाल्डी, ग्रीक वगैरे भाषांतून उत्तमोत्तम ग्रंथ मिळवून त्यांची अरबी भाषेंत भाषान्तरें करविली, गणित, भूगोल, खगोल, ज्योतिष, वैद्यक, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, इत्यादि विषयांतील त्या वेळच्या अरब विद्वानांचे उद्योग अद्यापपावेतों सर्वत्र मान्य होत आहेत. यूरोपच्या अर्वाचीन प्रगतीस याच अरब विद्वानांचे उद्योग बव्हुतांशी कारण झाले आहेत. अरबांनी स्वतः निर्माण केलेला विषय म्हणजे मुसुलमानी कायदा हा होय. यूरोपीय कायदेपंडित रोमनकायद्याच्या खालोखाल अरबी कायद्यास मान देतात. वाङ्मय यांतहि त्यांनीं फार चांगलें काम केलें. कादंबरीचें रचनाचातुर्य त्यांनीं इराणी लोकांपासून घेतलें. त्यांच्या 'अरेबियन नाइट्स' या पुस्तकानें एकंदर पृथ्वीवरील अमोल व अजरामर ग्रंथांत मोठीच भर घातली आहे.

हिंदुस्थानचे पुष्कळ लोक बगदाद येथें जाऊन राहात असत. चरक व सुश्रुत या दोन आर्यवैद्यक ग्रंथांचे तर्जुमे अरबी भाषेंत दोघा ब्राह्मणांनीं केलेले आहेत. आरबांनीं महत्प्रयास करून मिळविलेलें ज्ञानभांडार पुढें तुर्कांनीं धुळीस मिळविलें. तुर्कांनीं पुस्तक संग्रह जाळले, शास्त्रीय हत्यारें मोडून टाकलीं आणि विद्वानांचा शिरच्छेद केला, त्यामुळें अरब सुधारणा लयास गेली.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .