प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.

सिंहावलोकन.- कान्स्टंटाईनपासून ओड्रोअँकरच्या स्वारी पर्यंत (३३७-४७६) साम्राज्याचा इतिहास मागें (पृ. १०८-९) सांगितलाच आहे पण तो पुन्हां आठवणींसाठीं उद्धृत करतों.

कॉन्स्टंटाइन दी ग्रेट याला तीन पुत्र होते व त्याच्या मरणानंतर साम्राज्याची एक नवीन विभागणी होऊन भाऊबंदकीला सुरवात झाली व प्रथम कॉन्स्टन्सनें दुस-या कॉन्स्टसचा हिस्सा बळकाविला (३४०), आणि सबंध पश्चिमेचा राजा होऊन राहिला. दुस-या कॉन्स्टन्सियसनें त्याचा नाश करून ३५० मध्यें आपण साम्राज्याचा एकटा सत्ताधीश बनला. त्याला संतान नसल्यानें त्याचा चुलत भाऊ ज्युलियन दी अँपोस्टेट त्याच्या मागून नादीवर आला. या काळीं जर्मन लोक आणि इराणी लोक यांच्याबरोबर युद्ध चाललें होतें. पूर्वेकडील लढाईंत ज्यूलियन मृत्यू पावला व तह होऊन पूर्वेंकडील युद्ध थांबलें; पण जर्मनांची जास्त जास्त चढाई होत जाऊन शेवटीं अँड्रियानोपलच्या लढाईनें रोमन आणि ट्यूटन यांच्यामधील लढ्याला नवीन स्वरूप प्राप्त झालें. थिओडोशियस दी ग्रेट यानें गॉथशीं सख्य करून कांहीं काळ टिकाव धरला. चौथ्या शतकांत विशेष कर्ते व मेहनती असे राज्यकर्ते एका मागून एक होऊन गेल्यानें साम्राज्याला धक्का लागला नाहीं पण त्यांच्या मागून येणा-या दुर्बल राजांनां संकटांनीं ग्रासलें. थिओडोसियसच्या मरणानंतर जर्मनांच्या उत्कर्षाची संधी प्राप्त होऊन त्यांनीं ती वाया दवडली नाहीं. त्या काळीं तीन लोक प्रामुख्यानें वावरत होते. त्यांत सरहद्दीपलीकडील ट्यूटॉनिक लोकांखेरीज साम्राज्यामध्यें वसाहत करून राहिलेले विसीगॉथ, व्हांडाल सारखे परतंत्र लोक होते. खेरीज साम्राज्यामध्यें नोकरीस असलेले व अर्धवट रोमन झालेले जर्मन लोकहि त्या ठिकाणीं होते. या जर्मनांपैकीं कांहीं वरिष्ठ अधिकारावर होते, तेव्हां साम्राज्याचें किंवा त्याच्या भागाचें कोणत्या तरी स्वरूपांत जर्मनीकरण होणें अपरिहार्य झालें. पण जर चौथ्या शतकांतील राज्यकर्त्यांच्या तोडीचेच पांचव्या शतकांतील राज्यकर्ते असते तर या क्रियेला नवीनच वळण लागले असतें. थिओडोसियसचे मुलगे नालायक असून त्यांनीं ज्या राज्याची आपसांत वाटणी करून घेतली त्या साम्राज्याची भवितव्यता त्यांच्याच कारकीर्दींत निश्चित झाली. पूर्व आणि पश्चिम यांच्यामधील लढ्याला या भावांच्या अमदानींत यादवीचें स्वरूप प्राप्त झालें. जर्मनांचा पूर्वेकडून होणारा हल्ला परतविला पण थोड्याच वर्षांत बरेचसे पश्चिमेकडील प्रांत हातावेगळे झाले व ९० वर्षांच्या अखेरीस रोमन बादशहाची नजीकची सत्ता अँड्रियाटिकच्या पश्चिमेस पोचेनासी झाली. ओनोरियसच्या कारकीर्दींत ब्रिटन सोडून द्यावें लागले. अँक्विटाइनमध्यें व्हिसीगॉथिक राज्य प्रस्थापित झालें व स्पेनचा बराचसा भाग व्हांडाल आणि सुयेव्हे लोकांनीं आक्रमिका. तिस-या व्हॅलेनशिनियनच्या अमदानींत उत्तर अफ्रिकेमध्यें व्हांडालनीं राज्य स्थापिलें. स्पेन देश व्हिसिगॉथ आणि सुयेव्हे यांच्यामध्यें विभागला गेला; आग्नेय गॉलमध्यें बरगंडियन राज्याची स्थापना झाली. ४८६ मध्यें गॉलमधील रोमन लोकांची शेवटची मालकी फ्रँक लोकांकडे गेली. साम्राज्याचे तुकडे तुकडे करणारे त्याचे शत्रू जे जर्मन त्यांच्यापासून साम्राज्याचें मोठें रक्षण करणारे लोक जर्मन वंशाचेच होते हें लक्षात ठेवण्याजोगें आहे. ३९९-४०० मध्यें अर्केडियसच्या तक्ताला भीतिप्रद अशी सामर्थ्यवान् गॉथिक चळवळ एका जर्मनानेंच शमवून टाकिली. साम्राज्याविषयीं मनांत अतिशय आदर बाळगणा-या जर्मनांनीं प्रथम रोमन भूमीवर बादशहाचें मांडलीक म्हणून आपलें राज्य स्थापिलें. आपण जेते म्हणून नव्हे तर प्रजा म्हणून त्यांनीं स्थानिक रोमनांचे मुलूख कबजांत घेतले.

मध्य यूरोपांत हूणांची सत्ता एकदम वाढून त्यांचें तिसरें बलिष्ठ राष्ट्र बनलें. त्याचा विस्तार -हाईनपासून काकेशसपर्यंत आणि डॅन्युबपासून बाल्टिक पावेतों होता. सार्वभौमत्वांत रोम आणि इराण साम्राज्याशीं त्याची तुलना करतां येत होती. हूणांनीं जर्मनांची अभिवृद्धि व ते साम्राज्याचा करीत असलेला नाश बंद केला. पण त्यांनां स्वत: साम्राज्यावर विजय मिळवितां आला नाहीं. अँटिलाच्या मृत्यूनंतर (४५३) त्याचें राज्य ढासळलें व त्याच्या जर्मन नोकरांनीं त्या अवशेषावर मोठमोठालीं राज्यें निर्माण केलीं.

तिसरा व्हॅलेनसिनियनां मरण पावल्यावर थिओडोशियन राज्य पश्चिमेस लयाला गेलें व त्याच्यामागून झालेल्या पाश्चात्य बादशहांची सत्ता इटलीपलीकडे फारच थोडी शिल्लक राहिली. या वीस वर्षांच्या अवधींत जर्मन कुळांतला सेनापति रिसिमर हा त्या द्वीपकल्पांत बव्हंशीं सत्ताधारी असून तो बादशहांनां गादीवर बसवीत व उतरवीतहि असे. त्याच्या मृत्यूनंतर पश्चिम साम्राज्याचें तक्त टिकाऊ राहिलें नाहीं. सेनापति ऑरेस्टेसनें आपला लहानगा पुत्र रोमुलस याला कायदेशीर वारस जो ऑगस्टस ज्यूलिअस नेपोस याच्या जागीं गादीवर बसविलें पण त्याला फार दिवस राज्य लाभलें नाहीं. ४७६ मध्यें ओड्रोअँकरच्या नेतृत्वाखालीं एक जर्मन सैन्याची बंडाळी होऊन तिनें राज्य उलथून पाडिलें. ओड्रोअँकरनें त्याचा कांहीं भाग जर्मन सैनिकांनां वाटून दिला व कॉन्स्टंटिनोपल येथील बादशहाच्या सार्वभौमत्वाखालीं एक इटालीअन राज्य स्थापिलें.

पश्चिमेकडील प्रांतांची जशी दशा झाली तशी पूर्वेकडील प्रांतांची झाली नाहीं. यावरून साम्राज्याचें बल पूर्वेकडे होतें हें उघड झालें. हे प्रांत जास्त लोकवस्तीचे असून त्यांवर स्वारी करणारांनां मोठमोठे अडथळे होत, पण आतांपर्यंत पूर्वेकडचा शत्रू बलिष्ठ असतांहि येथील साम्राज्यानें अखंड शांतता राखली हें फार महत्त्वाचें आहे. इराणशीं चालू असलेलें भांडण ३६४ त जोव्हियनच्या तहानें मिटलें जाऊन पुन्हां ६ व्या शतकापर्यंत तें उद्भवलें नाहीं. राज्यकर्त्यांनीं जमावसुलीच्या कामांत आणि परराष्ट्रीय व्यवहारांत हुषारीचें व नरमपणाचें धोरण स्वीकारल्यामुळें शंभर वर्षांत खालावलेलें साम्राज्य पुन्हा सुव्यवस्थित व सामर्थ्यवान झालें. दुसरा थिओडोशियस राजा दुर्बल होता तरी त्याचा राज्यकारभार अंथेमियस, त्याची बहिण पुल्चेरिहा आणि खोजा ख्रिशाफियस यांनीं उत्तम रीतीनें चालविला होता. आर्मेनियन बाबतींत त्याची कारकीर्द महत्त्वाची होती. पहिल्या थिओडोशिअसनें या पाचरवजा संस्थानाची रोमन आणि इराणी लोक यांच्यामध्यें विभागणी करण्याला सम्मति देण्याची चूक करून ठेविली. सॅसॅनिड सत्तेनें ग्रीक भाषेच्या उपयोगाला त्या ठिकाणीं बंदी करण्याचा प्रयत्न केला, पण दुस-या थिओडोशियसनें आर्मेनियन भाषेंत बायबलचें भाषांतर करण्याच्या प्रयत्नाल चांगली पुष्टी दिली व त्यामुळें ग्रीक भाषेंतून घेतलेलीं अनेक भाषांतरित पुस्तकें निर्माण झालीं व त्याचा परिणाम आर्मोनियन आणि यूरोपियन संस्कृतीचा कायमचा संबंध घडून येण्यांत झाला. याच कारकिर्दींत कॉन्स्टंटिनोपालच्या मोठाल्या भिंती बांधून झाल्या, त्या ठिकाणीं एक विद्यापीठ स्थापन झालें व कायद्यांचा ''कोडे थिओडोशियानस'' नांवाच्या ग्रंथांत संग्रह करण्यांत आला. या ग्रंथावरून साम्राज्यांतील तत्कालिन समाजस्थिति चांगली कळून येते.

झ्रेनोच्या कारकिर्दींत बाल्कन द्वीपकल्पांत एक ऑस्ट्रोगॉथिक राज्य स्थापन होण्याचीं चिन्हें दिसूं लागलीं, पण हें सकट इटलींतच उत्पन्न झालें. त्या ठिकाणीं थिओडोरिकनें स्थापलेलें राज्य वास्तविक ओड्रोअँकरच्या अंमलाच्या परंपरेंतील होतें. ओड्रोअँकर आणि अलॅरिक प्रमाणें तो दोन अधिकार धारण करीत होता. एक जर्मन राजा म्हणून व दुसरा रोमन अधिकारी म्हणून. अनॅस्टाशियस बादशहाबरोबर झालेल्या तहनाम्याप्रमाणें त्याचे अधिकार होते व त्यानें हा तहनामा राज्यनिष्ठपणें पाळला होता. कायदे करण्याचा हक्क बादहाकडेच राखून ठेवण्यांत आला होता व थिओडोरिकनें तो कधींहि मागितला नाहीं, पण एकंदरींत तो स्वतंत्र असे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .