प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.

सातवें शतक.- मॉरिसच्या मृत्यूनंतर (६०२) निकराचें व शेवटचें युद्ध सुरू झालें. फोकासच्या नालायक अमदानींत पूर्वेकडील प्रांत इराण्यांनीं पादाक्रांत केले या दुष्ट राजाची अप्रिय कारकीर्द ६१० मध्यें अफ्रिकेच्या सुभेदाराच्या मध्यस्थीनें संपली. या सुभेदाराचा हिरॅक्लीस नांवाचा मुलगा कॉन्स्टंटिनोपल येथें जेव्हां उतरला तेव्हां लोकांत जास्त वजन असलेल्या पक्षानें त्याचा सत्कार केला. मॉरिसला मारणा-या फोकासलाहि लोकांनीं ठार मारिलें, व विजयी वीराला बादशाहीचा अभिषेक केला पण या योगें तो मोठ्या आणीबाणीच्या प्रसंगांत सापडला. अँटिऑक, दमास्कस व इतर मोठीं शहरें इराणी लोकांनीं जिंकून घेतलीं होतीं आणि ६१४ मध्यें यरूशलेमचा नाश करण्यांत येऊन होलीक्रॉस व पॅट्रिआर्क क्टेसिफोन येथें नेण्यांत आलें. ही गोष्ट सर्व ख्रिस्ती राष्ट्रांत बरीच मोठी खळबळ उडवून सोडणारी होती. ६१६ मध्यें इजिप्त काबीज करण्यांत आलें. फोकासच्या हाताखालीं सैन्याची अत्यंत दुरवस्था झाली होती व हिरॅक्लियस कॉन्टंटिनोपल वांचविण्याच्या कामीं इतका निराश बनला कीं, राजधानीचें शहर कार्थेजला हलविण्याचें त्यानें मनांत आणिलें. पण या अति आणीबाणीच्या प्रसंगामुळें प्रजेच्या नैतिक भावनेंत फरक पडला. लोकांत स्वदेशाभिमान जागृत करणारा पेट्रिआर्च सेर्गियस हाच असल्यानें त्यानें जेव्हां लोकांचीं मनें वळविलीं तेव्हां हिरॅक्लियसला चांगलें सैन्य तयार करण्याचें अवघड काम करतां आलें. ६२२ ते ६२८ पर्यंत झालेल्या मोहिमांत त्याच्या श्रमाचें चीज होऊन त्याला आपले प्रांत परत मिळवितां आले व इराणला आपल्या कबजांत ठेवतां आलें.

या चिरस्मरणीय युद्धांत इराणी लोकांनीं अँव्हर व स्लाव्ह यांच्या मदतीनें कॉन्स्टंटिनोपल घेण्याचा प्रयत्न केला होता (६२६). नंतर लवकरच अँव्हर लोकांची सत्ता खालावत गेली व स्लाव्ह आणि बल्गेरियन यांनीं त्यांचे जूं झुगारून दिलें. सबंध हातचा गेलेला इलीरियन मुलुख सुद्धां रोमन सरकार पुन्हां आपल्या ताब्यांत घेईल असें वाटूं लागलें. वायव्येकडे हिरॅक्लियसनें स्लाव्ह लोकांशीं तह केला असावा असें दिसतें. साम्राज्याचे मांडलिक अशा नात्यानें त्यांचे स्थान निश्चित बनलें आणखी जास्त कांहीं करण्याला भवितव्यानें उसंत ठेविली नाहीं. अति घोर तिमिरानें व्याप्त असा क्षण जातो न जातो तोंच नवीन वादळी ढग अनपेक्षित दिशेनें येऊन त्यांनीं आकाश व्यापून टाकिलें.

या ठिकाणीं असें नमूद करणें अवश्य आहे कीं, सहाव्या शतकाच्या अंतापूर्वीं राष्ट्रांत हेलेनिक तत्त्वाचें वर्चस्व इतकें झालें होतें कीं, यापुढें साम्राज्याला ग्रीक असें नांव द्यावें लागेल. जस्टिनिअनची मातृभाषा लॅटिन होती व तो रोम येथील लॅटिन परंपरेचा मोठा भक्त होता पण त्याला सुद्धां आपले मागाहून केलेले कायदे ग्रीकमध्यें प्रसिद्ध करणें भाग पडलें. व त्याच्या अमदानीपासून ग्रीक ही सरकारी भाषा बनली.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .