प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १४ वें.
राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास.

नॉर्थमेन लोकांचें कार्य.- डेन्मार्क व नॉर्वे येथील लोकांचीं चांचेगिरीचीं धाडसें सर्व यूरोपखंडाच्या किना-यावर महशूर असून या लोकांनीं ग्रेटब्रिटन, आयर्लंड, फ्रान्स सिसिली इत्यादि देशांत कायमची वस्ती केली होती. या लोकांनीं मध्ययुगांतील ऐन स्तिमित काळांत भौगोलिक शोधाचें कार्य पुढें चालू ठेविलें होतें. यांच्यापैकीं सर्वच लोक लुटारू व दरोडेखोर नसून कांहीं शांततेनें व्यापार करणारेहि होते. आल्फ्रेड दि ग्रेट हा इंग्लंडचा राजा आपल्या सॅक्सन प्रजेस पूर्वपरंपरागत विद्या शिकवूनच केवळ स्वस्थ बसला नाहीं तर त्यानें त्याबरोबरच स्वतः भाषांतरिलेल्या भूगोलविषयक ग्रंथांत त्या कालीं झालेल्या पर्यटनांची माहितीहि समाविष्ट केली. उदाहरणार्थ, उल्फस्टन नामक व्यापा-यानें बाल्टिक समुद्रांत केलेलीं पर्यटनें जर्मनीच्या भौगोलिक माहितीसह त्यानें लेखनिविष्ट करून ठेविलीं. विशेषतः ज्याच्या उत्तरेकडील ध्रुवप्रदेशाच्या संशोधनाबद्दल आपणांस खात्रीलायक माहिती आहे व जो आपण नॉर्थकेपला वळसा घालून मध्यरात्रीच सूर्याचें दृश्य पाहिल्याचें सांगतो असा पहिला इसम, हेलगेलंडचा ओथरनामक नॉर्वेजिअन प्रवासी याच्या प्रवासाची माहितीहि त्यानें लिहून ठेविली होती. ९ व्या शतकाच्या मध्यांत झालेल्या या पर्यटनामधील मौज वाटण्यासारखा विशेष म्हटला म्हणजे त्यायोगें पहिल्या नॉर्वेजिअन ध्रुवप्रदेशसंशोधकाचा पहिल्या इंग्लिश प्रवाससंग्राहकाशी संबंध आला हा होय. स्कँडिनेव्हियांतील व्यापारी हिंदुस्थानांतून इंग्लंड व आयर्लंड देशांत माल नेऊं लागले. आटव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत हिंदुस्थानचा एक व्यापारी रस्ता नॉव्हगोरॉड वरून बाल्टिक समुद्रापर्यंत जात होता. स्वीडन देशांत व विशेषतः गॉटलंड बेटांत आढळून येणा-या अरबी नाण्यांवरून अरब व नॉर्वेमधील धाडसी लोकांचा परस्परांशीं किती निकट संबंध आला होता हें व्यक्त होतें. स्टॉकहोमच्या संग्रहांत असलेल्या नाण्यांपैकीं पांच षष्ठांश नाणीं इ .स. ९००  व १००० यांच्या दरम्यान खोरासाण व ट्रँन्सऑक्सिआना येथें राज्य करणा-या सामानी राजघराण्याच्या टांकसाळींत पाडलेलीं आहेत. गॉटलंड बेटांतील 'विस्बी' शहरास जें महत्त्व आलें त्याचें मूळ कारण हा पूर्वेकडील व्यापारच होय.

नवव्या शतकाच्या अखेरीस आइसलंडमध्यें नॉर्वेंतील लोकांनीं वसाहत केली; आणि ९८५ च्या सुमारास धाडसी चांचा एरिक दि रेड यानें ग्रीनलंड देश शोधून काढून त्याच्या किना-यावर वस्ती करण्याकरितां आपल्या आइसलंडमधील कांहीं बंधूंचें मन वळविलें. त्याचा मुलगा लीफ एरिकसन व त्याचे इतर अनुयायी हे उत्तर अमेरिकेचा किनारा शोधण्यांत गुंतले होते. आइसलंड देश अगदीं एकीकडे नसता तर तेथील संशोधकांच्या उपर्युक्त चळवळीचा यूरोपवर फार महत्त्वाचा परिणाम घडून आला असता. परंतु वस्तुस्थिति तशी नसल्यामुळें त्यांचे शोध अज्ञात अवस्थेंतच बुजून गेले. १३ व्या शतकाच्या अखेरीस उत्तरेकडील समुद्रांत केलेल्या सफरींची अस्पष्ट माहिति देणारे निकोलो व अँटोनिओ झीनो या वेनिसच्या व्यापा-याची गोष्ट आतां कोणी विश्वासार्ह मानण्यालायक समजत नाहीं.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .