प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १४ वें.
राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास.

रो नलाकांचा कामगिरी - रोमन लोकांनीं प्राचीन ग्रीक लोकांप्रमाणें रोमन पर्यटनें व व्यापार यांना प्रोत्साहन दिलें नाहीं, परंतु रोमच्या वाढत्या विलासलालसेमुळें ज्ञात जगांतल्या प्रत्येक प्रदेशांतील निरनिराळ्या वस्तूंची जरूर लागू लागल्या कारणानें जहाजें व कारवान यांच्या करवीं आपोआपच व्यापार पुष्कळ वाढला. तथापि रोमन लोकांनीं सर्व यूरोपखंडाचें आणि आशिया व आफ्रिका खण्डांतील ब-याच भागाचें जें संशोधन केलें त्याला कारण त्यांची जबर साम्राज्यतृष्णा व युद्धकलाकौशल्य हेंच होय. प्रत्येक मोहिमीबरोबर जिंकलेल्या नवीन नवीन देशांची पाहणीपुस्तकें व माहितीपुस्तकें तयार होऊं लागली, आणि जगाच्या निरनिराळ्या ज्ञात प्रदेशांतून रोमकडे येण्यास नवीन नवीन वाटा निघूं लागल्या. आपल्या ऐश्वर्याच्या भरांत रोमन लोकांनीं भूमध्यसमुद्राचा सबंध किनारा संशोधित केला व इटाली, ग्रीस, बाल्कन द्वीपकल्प, स्पेन, गॉल, पश्चिमजर्मनी आणि दक्षिणब्रिटन इत्यादि देशांचे किनारे पाहिले. आफ्रिकेंतील इजिप्त, कार्थेज, न्युमिडिआ व मॉरिटेनिआ इत्यादींचा रोमनसाम्राज्यांतच अंतर्भाव झालेला होता. आशियांतील आशियामायनर व सिरिया हे प्रांत रोमन साम्राज्यांतच अंतर्भूत होत असून रोमन लोकांनीं अरबस्थानावर स्वा-या केल्या होत्या व पूर्वीं अलेक्झांडरनें स्वा-या केलेले इराण, बॅक्ट्रिया, सिथिया, हिंदुस्थान इत्यादि दूरदूरच्या देशांबरोबर त्यांचा बराच परिचय झाला होता. विशेषतः हिंदुस्थानशीं घडून आलेल्या दळणवळणामुळें भौगोलिक ज्ञानाचा बराच विस्तार झाला.

साम्रांज्याच्या मर्यादा वाढविण्याकरितां नवीन प्रांतांत रोमन सैन्यांचीं पथक पाठविण्यापूर्वीं त्या प्रांताची माहिती मिळविण्याकरितां संशोधक लोकांच्या तुकड्या पाठविण्याची पद्धति प्रचलित होती. प्लिनी व सेनिका ह्यांनीं असें म्हटले आहे कीं, नीरो बादशहानें याच कामाकरितां (इ .स. ६० च्या सुमारास) नाइल नदीच्या उगमाकडे शंभर शंभराच्या दोन तुकड्या पाठविल्या होत्या, व हे लोक दक्षिणेस इतके दूर गेले होते की शेवटीं दलदलीचा प्रदेश लागून त्यांना नावांतून किंवा पायीं प्रवास करणें अशक्य झालें. ह्यावरून ते ९ उत्तर अक्षांशा पावेतो जाऊन आले असावें असें दिसतें. ख्रि. पू. ७९ च्या थोडे दिवस अगोदर हिप्पालस यानें तांबड्या समुद्रांतून हिंदुस्थानास जमिनीपासून दूर असलेल्या समुद्रमार्गानें येण्याकरितां नियतकालिक वा-याच्या दिशेंत जो नियमितपणें फेरबदल होतो त्याचा फायदा करून घेतला. हा समुद्रमार्ग जरी त्या पूर्वींच माहीत होता, तरी देखील प्लिनीच्यानंतर प्रसिद्ध झालेल्या पेरिप्लुस ऑफ् दि एरिथ्रिअन सी ह्या ग्रंथाच्या कर्त्यानें अरबस्थानच्या द्वीपकल्पाच्या किना-या सभोंवतीं असलेली पूर्वींच्याच रस्त्यांची माहिती दिली आहे. तथापि सिव्हिरस व त्याच्या मागाहून झालेल्या राजांच्या अमदानींत रोमन लोकांचें हिंदुस्थानाशीं जास्तींत जास्त दळणवळण होतें व पॉसेनिअस ह्याच्या लेखावरून रोम व चीन या देशामध्येंहि यापूर्वींच प्रत्यक्ष दळणवळण सुरू झालें होतें असें दिसतें.

रोमन साम्राज्याचे तुकडे झाल्यानंतर कॉन्स्टॉटिनोपल हेंच अनेक विद्या व अत्युच्च कलाकौशल्य यांचें निवासस्थान बनलें, व अलेक्झांड्रिया हें शहर पूर्वेकडील जिनसांच्या आयात व्यापाराचें ठिकाण राहिलें. ज्याच्या कारकीर्दींत पूर्वेकडील साम्राज्यास उतरतीकळा लागली त्या जस्टिनिअन बादशहाने (इ .स. ४८३-५६५) चीन देशांत दोन नेस्टोरिअन धर्मोपदेशक पाठविले होते. व ते एका पोकळ वेतांत रेशमाच्या किड्याचीं दोन अंडी दडवून स्वदेशी परत आले. अशा रीतीनें पेलोपानीसस आणि इतर ग्रीक बेटें यांत रेशमाचे कारखाने स्थापले गेले. ह्याच बादशहाच्या कारकीर्दींत कॉस्मस इंडिकोप्लुस्टस ह्या इजिप्तमधील व्यापा-यानें बरीचशी जलपर्यटनें करून विलक्षण विश्वोप्तत्तिवर्णन व हिंदुस्थानची व्यवस्थित माहिती असलेला आपला भूपृष्ठ विषयक माहितीचा ग्रंथ तयार केला.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .