प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ७ वें.
बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ.

आजीविक हे वैष्णव आहेत काय - अशोकाच्या स्तंभावरील सातव्या आदेशांत, जैनांच्या संप्रदायग्रंथांत व बौद्ध संप्रदायग्रंथांत आजीविकांचा उल्लेख आलेला आहे. ह्या तिन्ही ठिकाणचे आजीविक एकच आहेत असे ब-याच काळापासून संमत आहे. प्रो. कर्नच्या मतें आजीविक हा वैष्णवांचा एक पोटभेद असून ते नारायणाची पूजा करणा-या प्राचीन तपस्व्यांच्या एका पंथाचे आहेत. प्रो. बुहलरनें ह्याच मताचा अनुवाद करून प्रो. कर्नच्या मताचें विवरण केलेलें आहे (बराबर व नागार्जुनाचा डोंगर येथील लेण्यांतल्या अशोक व दशरथ यांच्या शिलालेखांवर निबंध, जर्नल बाँबे एशियाटिक सोसायटी पु. २०, पृ. ३६२). आपल्या शिलालेखांतील आजीविक व अशोकाच्या सातव्या स्तंभादेशांतील आजीविक हे एकच आहेत असें प्रो. कर्न गृहीत धरतो, व 'ब्राह्मणी आजीविकांशीं धर्ममहामात्रांचा संबंध राहील ही स्तंभावरील आदेशांतून मिळालेली माहिती व आजीविकांविषयीयं उत्पलानें केलेलीं विधानें (वराहमिहिर, बृहज्जातक १५.१ व त्यावरील उत्पलाची टीका पहा) एकत्र करतो. आजीविक हे नारायणाश्रित आहेत असें विधान करून त्याला कालकाचार्यांचा व कालकसंहितेंतील वचनांचा आधार उत्पलानें दिलेला आहे. कालकाचार्य पांचव्या शतकांतला असल्यामुळें त्याचें प्रामाण्य महत्त्वाचें आहे. कालकाचार्यांनीं आजीविक ह्याचा अर्थ एकदंडी असा दिलेला आहे. कालकसंहितेंतला आधार उत्पलानें 'केशवमार्गदीक्षितः केशवभक्तो भागवत इत्यर्थः' असा दिला आहे.

म्हणून प्रो. कर्न व प्रो. बुहलर ह्यांच्या मतें आजीविक हे वैष्णव आहेत.

हें प्रो. कर्न साहेबांचें मत बरोबर नाहीं असें रा. दे. रा. भांडारकर खालीलप्रमाणें दाखवितात:-

उत्पलाच्या टीकेंतला उतारा पुढें दिल्याप्रमाणें आहे:-

''अत्र वृद्धश्रावकग्रहणं महेश्वराश्रितानां प्रव्रज्याना-
मुषलक्षणम् । आजीविकाग्रहणं'च' नारायणाश्रितानाम् ॥''

येथें 'च' कडे दुर्लक्ष्य केल्यामुळें प्रो. कर्नचा गैरसमज झालेला आहे. आजीविक शब्दाचा अर्थ नारायणाश्रित नव्हे, तर आजीविक हा शब्द नारायणाश्रितांचें उपलक्षण आहे. कोणत्या ज्योतिःशास्त्रविषयक परिस्थितींत मनुष्य संन्याशी बनतो व त्या विशिष्ट वेळीं त्याचें विशिष्ट पंथनाम काय असतें याविषयीं उल्लेख वराहमिहिरानें केला आहे. उत्पलानें असें दाखविलें आहे कीं, वराहमिहिराच्या विधानाला कालकाचार्यांचा आधार आहे, व म्हणून कालकाचार्यांनीं दिलेल्या संज्ञा वराहमिहिराच्या संज्ञांशीं जुळल्या पाहिजेत. ही पद्धति कितपत बरोबर आहे हें तज्ज्ञांनीं ठरवावें. म्हणून वृद्धश्रावक व आजीविक यांचा अर्थ कापालिक व एकदण्डी आहे असें उत्पल म्हणतो. कालकाचार्यांच्या दुस-या एका पद्यांत ह्या ज्योतिःशास्त्रविषयक परिस्थिती व संज्ञा दिलेल्या आहेत, त्यांत व मूळच्या कालकाचार्यांच्या पद्यांत दोन ठिकाणीं फरक आहे. त्या ठिकाणीं, वराहमिहिराची संज्ञा व कालकाचार्यांच्या दोन पद्यांतील दोन वेगळ्या संज्ञा येणेप्रमाणें:-

 उच्चस्थानीं असणारा ग्रह  कालकाचार्यांच्या संज्ञा  वराहमिहिराच्या संज्ञा
 १  २  
 चंद्र   कापालिक  हरभक्त अथवा महेश्वराश्रित  वृद्ध श्रावक
 बुध   एकदण्डी  केशवभक्त अथवा नारायणाश्रित  आजीविक

यासाठीं उत्पल म्हणतो कीं, वृद्ध श्रावक व आजीविक हे शब्द महेश्वराश्रित व नारायणाश्रित दर्शविण्याकरितां फक्त उपलक्षण आहेत. म्हणून उत्पलाच्या मतें, आजीविक ह्याचा नारायणाश्रित, केशवभक्त अथवा भागवत असा अर्थ नव्हे, तर तो शब्द फक्त हे शब्द सुचवितो. कालकाचार्यांचेंहि मत उत्पलाप्रमाणेंच आहे. अर्थात् प्रो. कर्न व प्रो. बुहलर यांनीं दिलेली उपपत्ति साधार नाहीं.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .